चालू घडामोडी राजकारण

नमो…रागा आणि बाशिंगाचा धागा !

Written by shekhar patil

खर तर वलयांकीत व्यक्तींची लफडी वा विवाहाची चर्चा करायला सर्वांना आवडते. याला अनेकदा जाहीर स्वरूपही प्राप्त होते. यात सलमानसारखा सुपरस्टार, विराटसारख्या प्रतिभावंत क्रिकेटपटूपासून ते अगदी राखी सावंतसारख्या नटमोगरीपर्यंच्या प्रकरणांना चविने चघळले जाते. या सर्वांना मागे टाकणार्‍या विषयाचे खाद्य आता नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या अन् राहूल गांधी यांच्या प्रलंबित असणार्‍या विवाहाच्या बातम्यांमधून समस्त देशवासियांना मिळाले आहे. दोन्ही बाजूंनी याबाबत तावातावाने करण्यात आलेले युक्तीवाद पाहता हसावे की रडावे तेच उमजत नाही. या गदारोळात देशहिताचे मुद्दे केव्हाच मागे पडले असून ही लढाई आता वैयक्तीक पातळीवर घसरल्याचे दिसून येत आहे.

कोळसा खाणवाटप गैरव्यवहार, स्पेक्ट्रम घोटाळा, राष्ट्रकूल प्रकरण, आदर्श सोसायटीचा घोळ, आयपीएल फिक्सिंग, सत्यमने गुंतवणुकदारांना लावलेला चुना, हेलिकॉप्टर खरेदीतील दलाली आदी प्रकरणे आपल्याला कधी ऐकल्याचे आठवते का हो? डी. राजा, कनिमोळी, सुरेश कलमाडी, येडियुरप्पा, मधु कोडा आदी सदगृहस्थांची नावेदेखील आपल्या कानावरून कधी गेल्यासारखी वाटताहेत का? महागाईने आपल्या घराचे बजेट बिघडले की नाही? सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचाराने आपण जेरीस आलोत की नाही? दहशतवादाने आपण भयभीत झालोत की नाही? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे किमान लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मिळतील अशी आपल्याला अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र जनतेच्या हिताची आणि देशाच्या विकासाची चर्चा निवडणुकीच्या प्रचारातून गायब असून अस्मिता फुलविणारे भावनिक मुद्दे अन् विरोधकांवर शेलक्या भाषेतील चिखलफेकीला उधाण आले आहे. याचाच ताजा अध्याय नरेंद्र मोदी यांनी आपल्या विवाहाच्या दिलेल्या कबुलीनंतर आपल्यासमोर घडत आहे. आजवर निवडणुकीच्या शपथपत्रात वैवाहिक स्थितीचा रकाना खाली ठेवला तरी चालत होता. अगदी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही राज्यसभेची उमेदवारी दाखल करतांना हा कॉलम खाली ठेवला होता. मात्र मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर निर्णय देतांना उमेदवाराने वैवाहिक स्थिती स्पष्ट करण्याचे आदेश दिल्यानंतर मोदींनी संभाव्य कारवाई टाळण्यासाठी आपण विवाहित असल्याची प्रथमच कबुली दिली आहे. यातून मोदींच्या सभांच्या झंझावातांनी धास्तावलेल्या कॉंग्रेस आणि मित्रपक्षांना मोठा मुद्दा मिळाला.

आज राहूल गांधींसह वाचाळवीर दिग्विजयसिंग यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांपासून ते अगदी गाव पातळीवरील विरोधक मोदींवर या मुद्यावरून निशाणा साधत आहेत. ‘जे एका महिलेचा सांभाळ करू शकत नाहीत ते देश काय चालवणार?’ असा या टिकेचा सुर आहे. आसामचे मुख्यमंत्री तरूण गोगोई यांनी तर मोदींच्या पत्नी जसोदाबेन यांना त्यागाचे प्रतिक मानून त्यांना चक्क ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळावा अशी अचाट मागणीदेखील करून टाकली. या वादात दररोज नवनवीन वाक्बाणांचा वापर होत आहे. अर्थात मोदी यांच्यावर होणारा हल्ला पाहून भाजप समर्थकही पुढे आले अन् त्यांनी कॉंग्रेसी नेत्यांची पार जुनी प्रकरणे बाहेर काढली. यात पंडित नेहरू यांच्या एडविना माऊंटबॅटन यांच्यासोबतच्या कथित प्रेम प्रकरणापासून ते थेट राहूल गांधी यांच्या परदेशी मैत्रीणीसह विद्यमान काही नेत्यांची लफडी बाहेर काढण्यात आली. शिवसेनेने तर ‘सामना’च्या अग्रलेखातून ‘आधी राहूलबाबांना बाशिंग बांधा…मगच मोदींच्या विवाहाची चर्चा करा’ असा अनाहूत सल्लादेखील देऊन टाकला. उथळ इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांसह अनिर्बंध सोशल मीडियाने या प्रकारांना खतपाणी घातल्याने आज या निवडणुकीतील हेच महत्वाचे मुद्दे बनले आहेत. यामुळे जनहिताचे प्रश्‍न आणि मुद्दे आपसूकच बाजूला सारले गेले आहेत.

चारित्र्य मोठे की कर्तबगारी? हा प्रश्‍न फक्त राजकारणातच नव्हे तर जीवनातील प्रत्येक क्षेत्रात विचारण्यात येतो. राजकारणी निष्कलंक चारित्र्याचा असावा, यातच वरिष्ठ नेत्यांचे जीवन आदर्श असावे अशी अपेक्षा करण्यात येते. समाजाचे नेतृत्व करणार्‍यांकडून करण्यात येणारी ही अपेक्षा तशी गैरदेखील नाही. मात्र भोवताली क्षणाक्षणाला मोहाच्या असंख्य संधी असतांना याला भलेभले बळी पडल्याची उदाहरणेदेखील कमी नाहीत. अगदी दिल्लीपासून ते गाव पातळीवरील नेत्यांची प्रेम प्रकरणे, व्यभिचार, लफडी, स्कँडल्स आणि यातून घडलेले गैरप्रकार या बाबी आपल्याला नवीन नाहीत. यातील काही प्रकरणांना तर दंतकथांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. याला देशाच्या सर्वोच्च राजकीय पदांवर आरूढ झालेले मान्यवरही अपवाद ठरले नाहीत. यापैकी पंडित नेहरू आणि लेडी माऊंटबॅटन यांचे उदाहरण वर दिलेलेच आहे. या प्रकरणावर अनेक पुस्तकेदेखील लिहण्यात आली आहेत. भारतीय इतिहासातल्या अत्यंत कोलाहलपुर्ण कालखंडातील ही कथा आजही चवीने उगाळली जाते. देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री हे निष्कलंक चारित्र्याचे होते. त्यांच्या वैयक्तीक आयुष्यावर अगदी राजकीय विरोधकदेखील बोट उचलू शकले नाहीत. यानंतर मात्र बहुतांश पंतप्रधानांच्या खासगी आयुष्याबाबत कुजबुज होत राहिली. पी.व्ही. नरसिंहराव यांनी आपल्या ‘इनसायडर’ या आत्मचरित्रपर कादंबरीत याची स्विकारोक्तीही दिली आहे. भारतीय राजकारणातील लैंगिकतेवर अगदी खुल्लमखुल्ला लिहिण्याचे धाडस राव यांनी दाखविल्यामुळे समाजाला धक्का बसला होता. याहूनही भयंकर हादरा अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘आपण अविवाहीत असलो तरी ब्रह्मचारी नाही’ हे सांगितल्यावर बसला होता. अर्थात राव यांची कादंबरी आणि वाजपेयी यांच्या वक्तव्याचा कालखंड हा उदारीकरणानंतरचा होता हे आपण लक्षात घ्यायला हवे. आज समाजात खुलेपणा आलाय. विवाहबाह्य संबंधांना वैयक्तीक बाब म्हणून मान्यता मिळू लागली आहे. अगदी ‘लिव्ह इन रिलेशनशीप’चे युग अवतरले तरी राजकारण्यांकडून आदर्श चारित्र्याची आपण फक्त अपेक्षा करू शकतो. मात्र याची पुर्तता होईलच याची शाश्‍वती नाही. यातूनच राजकारण्यांच्या वैयक्तीक आयुष्याचा एक हत्यार म्हणून वापर करावयाचा झाल्यास काय होते हे नरेंद्र मोदी आणि राहूल गांधी यांच्या प्रकरणातून दिसून येत आहे.

नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कर्तृत्वावर विश्‍वास ठेवून भारतीय जनता पक्षाने त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनविले आहे. लोकांची पसंती असल्यास मोदी आपले सरकार स्थापन करतील अन्यथा विरोधात बसतील. हा निर्णय भारताची जनता करणार आहे. मात्र मोदी यांच्या कौटुंबिक मुद्याला राष्ट्रीय प्रश्‍नाप्रमाणे सादर करणे ही बाब लोकशाहीच्या संकेताला हरताळ फासणारी आहे. समजा मोदी हे अगदी आदर्श भारतीय पती असते तर याच विरोधकांनी त्यांना पसंती दिली असती काय? काहीही असो विद्यमान केंद्र सरकारच्या नाकर्तेपणाला झाकण्यासाठी हा आयता मुद्दा त्यांच्याकडून उपयोगात आणला जात आहे. इकडे भाजपसह मित्रपक्षांचे नेतेदेखील याच पातळीला जाऊन राहूल गांधी यांच्या अविवाहीतपणावर निशाणा साधण्याचा थिल्लर प्रकार करत आहेत. राहूल गांधी यांनी लग्न करावे, अविवाहीत रहावे वा अथवा कुण्या मैत्रीणीसोबत ‘रिलेशनशीप’मध्ये रहावे हा त्यांचा वैयक्तीक प्रश्‍न आहे. भाजप समर्थकांनी याला दिलेले हिणकस स्वरूप अशोभनीय आणि असंस्कृत असेच आहे.

आज आपण डोळे उघडून बघितले तर भोवताली बरेच काही बदलत असल्याचे दिसून येत आहे. नैतिकतेच्या संकल्पनाही वेगाने बदलत आहेत. आपण स्वत: हे बदल अनुभवत आहोत. मात्र राजकारण्यांच्या कर्तबगारीचे मापन करण्यासाठी त्यांच्या फक्त चारित्र्यालाच परंपरेच्या ढोबळ चष्म्यातून पाहणे हा आपला दुटप्पीपणा आहे. आज देशाला प्रगतीपथावर घेऊन जाणार्‍या नेतृत्वाची आवश्यकता आहे. नरेंद्र मोदी यांचे विकासाचे गुजरात मॉडेल हे देशाला लागू पडेल का? राहूल गांधी यांच्या सामाजिक न्यायाच्या भुमिकेतून विकास साधला जाईल का? केजरीवाल यांच्यासारखी राजकारणातील झुळूक देशाला नवीन दिशा देणार का? या विषयांवर आज चर्चा होणे अपेक्षित आहे. देशाविषयी त्यांच्या विकासाचे व्हीजन समजून घेणे गरजेचे आहे. प्रश्‍न विचारायचेच तर मोदींना अल्पसंख्यांकावरील भुमिका वा गुजरातच्या विकासातील त्रुटी, राहूल यांना युपीएच्या कालखंडातील भ्रष्टाचार आणि केजरीवाल यांना त्यांच्या अराजक विचारधारेवर विचारा. यासाठी वैयक्तीक मोदी, राहूल वा केजरींना ओढणे अयोग्य आहे. मात्र आज नेमके हेच घडत आहे. खरं तर सत्ताधार्‍यांना घेरण्यासाठी मोदी आणि त्यांच्या सहकार्‍यांकडे अनेक मुद्दे आहेत. मात्र यावर चर्चा होण्याला बगल देण्यात कॉंग्रेसला यश आले आहे. अर्थात यानंतर हे अस्त्र त्यांच्यावरच उलटवण्याची चतुराई भाजप समर्थकांनी दाखविली असली तरी यात देशहिताचा मुद्दा अलगदपणे बाजूला पडल्याचे भान त्यांना नाही.

‘आपलं ठेवावं झाकून अन् दुसर्‍याच पहावं वाकून’ ही म्हण भारतीय समाजाला अगदी चपखल बसणारी आहे. दुसर्‍याच्या खासगी आयुष्यात डोकावणे आणि त्यावर कपोलकल्पित चर्वण करणे हा आपला खरा राष्ट्रीय टाईमपास आहे. यातूनच सेलिब्रिटीजच्या आयुष्यातील खर्‍या-खोट्या घटनांना कल्पनेचा मुलामा चढवण्यात येतो. सिने कलावंत, क्रिकेट खेळाडू आदींप्रमाणे राजकारण आणि राजकारणी हेदेखील आपले सर्वांचे आवडीचे विषय. त्यांच्याबाबत कुचाळक्या करणे आपल्याला भलतेच भावते. यातूनच आपण भावनाशील. कुणालाही क्षणात डोक्यावर घेतो तर दुसर्‍या क्षणी पायदळी तुडवितो. याचाच फायदा चलाख राजकारणी घेत असले तरी यासाठी आपणही जबाबदार असतो. अगदी ‘बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना’ या उक्तीनुसार मोदींच्या झालेल्या आणि राहूलच्या संभाव्य विवाहाच्या गुर्‍हाळात करोडो भारतीय अक्षरश: ‘दिवाने’ झाले आहेत. या दोन्ही मान्यवरांच्या विवाहाच्या गावगप्पांबाबत खरं तर आपणच उतावीळपणे गुडघ्याला बाशिंग बांधलेले आहे. फक्त आपण ते मान्य करणार नाही इतकेच!

About the author

shekhar patil

1 Comment

  • बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना –
    आज सकाळीच शेजारच्या गल्लीतील वाड्यात लगबग सुरु झाली होती. काही घरगुती कार्यक्रम होता., साहजिक घरगुती म्हंटलं म्हणजे फक्त ओळखीचेच येणार.
    पण इकडे २ गल्ली सोडून सकाळपासूनच काही मंडळी घोड्यावर बसली होती. जबरदस्ती वाड्यात डोकावून बघायचा केविलवाणा प्रयन्त होता. थोड्यावेळात तिकडे बँड चा आवाज यायला लागला तसे ह्यांचे पाय थरथरायला लागले. तिकडे आवाज मोठ्याने वाढला तशी इकडली मंडळी बेभान होऊन नाचायला लागली होती. जणू काय “बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना”
    आता संध्याकाळ होत आली होती अन बहुतेक तिकडे कार्यक्रम आटोपला होता पण इकडे २ ऱ्या गल्लीत नाचण्यावरून भानगडी झाल्यात. काहींना वाढप्याचे काम करायचे होते पण आमंत्रण नसताना कसे जायचे ह्यातच चिडचिड झाली होती.
    आता तिकडे वाड्यात शांतात होती अन इकडे नाचून – नाचून पाय दुखलेली मंडळी उपाशी झोपली होती. ..

Leave a Comment