अनुभव चालू घडामोडी

देहबोली सच्ची आणि लुच्ची

‘‘शेखरभाऊ…तुम्ही बॉडी लँग्वेजबद्दल लय बोलता..जरा मला ‘तिच्या’ मनातील विचार ओळखण्यासाठी मदत करा ना’’ असे आर्जव जळगावातील नव्यानेच मित्र झालेल्या तरूणाने केल्यावर मला भारीच नवल वाटले होते.

‘‘शेखरभाऊ…तुम्ही बॉडी लँग्वेजबद्दल लय बोलता..जरा मला ‘तिच्या’ मनातील विचार ओळखण्यासाठी मदत करा ना’’ असे आर्जव जळगावातील नव्यानेच मित्र झालेल्या तरूणाने केल्यावर मला भारीच नवल वाटले होते. मायला आपल्याला असाही कुणी सल्ला विचारेल अशी कल्पना मला स्वप्नातही आली नव्हती. असो. मी त्याला गुलाबी देहबोलीच्या सर्व खाणा-खुणा समजवण्याचा प्रयत्न केला. त्या काळात (ही २००४ची घटना आहे.) मीदेखील (माझ्या भावी पत्नीसोबतच!) प्रेमात आकंठ बुडालेलो असल्याने हा सगळाच प्रकार भलताच रोमँटीक वाटत होता. माझ्या परीने मी त्याला सगळे काही समजावले. त्या पठ्ठ्याचे संबंधीत तरूणीशी सुतही जुळले. अर्थात (तो हुशार असल्याने!) हे प्रकरण विवाहापर्यंत पोहचले नसले तरी यातून मला खुपच मजा वाटली. आज अचानक हा किस्सा आठवला आणि म्हटले चला यार आजचा विषय…बॉडी लँग्वेज!

article_photo

आपण शब्दांनी जगाशी संवाद साधत असले तरी आपले संपुर्ण अस्तित्वच बोलत असते. यामुळे अगदी अनोळखी भाषा बोलणारेही खाणाखुणांनी सहज संवाद साधू शकतात. माझा एक मित्र गेल्या वर्षी चीनला गेला होता. त्याने दुभाषाची मदत न घेता व अगदी इंग्रजीचाही वापर न करता असंख्य चिनी लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे हा मराठीतून तर समोरचे चीनी भाषेतून बोलतांना खुप गोंधळ उडायचा तरी हा आपल्या जीवनातील सर्वात अद्भुत अनुभव असल्याने त्याने मला सांगितले होते. तर सांगायचा मुद्दा असा की, शब्दाविना साधण्यात येणारे अर्थात ‘नॉन व्हर्बल’ कम्युनिकेशन ही अध्ययनाची स्वतंत्र शाखा आहे. बी.एस्सी. झाल्यानंतर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करतांना देहबोलीबाबत बरेच काही शिकायला मिळाले. याबाबत काही प्रशिक्षणही मिळाले. अर्थात डोक्यात किडा वळवळल्याने या विषयाशी संबंधीत काही विषयांचे वाचनही केले. अगदी ऍलन पीज या लेखकाच्या सर्वमान्य पुस्तकापासून ते अन्य पुस्तके वाचनात आली. राजकारण्यांपासून ते गुन्हेगारांपर्यंतच्या देहबोलीचे अध्ययन केले. याचसोबत माझ्यासमोर अव्यक्त होणार्‍यांनाही ‘वाचण्याचा’ छंद लागला. मित्रांचे टोळके, क्रिकेटचे मैदान, गणेशोत्सव, दुर्गोत्सव, रेल्वे वा बस स्थानकासारखी सार्वजनिक स्थळे, जाहीर कार्यक्रम आदींमधून मला अनेक मनोरंजक बाबी दिसू लागल्या. आपण देहबोली बर्‍यापैकी समजू शकतो असा आत्मविश्‍वास आला. अर्थात माझे आकलन किती तोकडे होते याचा पहिला धक्का मला पीटर अंकल यांनी दिला.

पीटर अंकल या अवलियाविषयी सविस्तर कधी तरी लिहणारच मात्र आज ओघाने त्यांचा उल्लेख आलाय….तर मी सांगत होतो देहबोलीबद्दल! देशदुतमध्ये असतांना प्रारंभीची दोन वर्षे मी भुसावळहून ये-जा करीत असे. साधारणत: आठ वाजेपर्यंत घरी आल्यावर नंतर भोजन करून मी भुसावळातल्या विश्राम हॉटेलसमोरील आमच्या कट्ट्यावर जात असे.

एक दिवस असेच उभे असतांना अचानक अंकल म्हणाले…‘‘रूको!’’

आम्ही हबकलो. वाटले सालं असे कायं झालं?

लागलीच ते पुढे म्हणाले की, ‘‘देखो अपने पास से जानेवाली ये औरत पोलीस स्टेशन मे कंप्लेंट लिखवाने जा रही है!’’

आम्ही मित्र लागलीच खो-खो हसू लागलो.

म्हटले, ‘अंकल तुम्हारी उमर हो गयी है…छोडो ऐसा भी कही होता है?’’

अर्थात आम्ही त्यांची खिल्ली उडवत असतांनाच ती महिला हाकेच्या अंतरावर असणार्‍या भुसावळ शहर पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा शिरली तेव्हा थक्क होण्याची पाळी आमची होती. सुमारे अर्ध्या तासानंतर आम्ही सर्वजण पोलीस ठाण्यात गेलो तेव्हा ती महिला आपल्या शेजार्‍यांविरूध्द मारहाणीचा गुन्हा दाखल करत होती. आम्ही अंकलना (नेहमीप्रमाणे) दंडवत घातले. नंतर बाहेर आल्यावर सिगरेटचा झुरका घेत अंकल मोठ्या तत्ववेत्त्याच्या स्टाईलमध्ये म्हणाले,

‘बच्चो…हर एक आदमी शब्दो के बिना भी बोलता है| सिर्फ तुम्हे सुनने के लिए रिसेप्टीव्ह बनना है|’’

यानंतर अंकलनी अनेक वेळा याच प्रकारे देहबोलीची उदाहरणे सिध्द करून दाखविली. एकदा दोन महिला आणि दोन लहान बालकांबाबत त्यांनी पुन्हा ही मंडळी पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचे भाकीत केले. मात्र ते सर्वजण पोलीस स्टेशनमध्ये न जाता पुढे निघून गेल्याने आमचे कुतुहल चाळवले. काही मिनिटांनी ते पुन्हा परत आले. असे तब्बल तीनदा झाल्यानंतर ते पोलीस स्टेशनमध्ये शिरले तेव्हा अंकलच्या दृष्टीचे आम्हाला फार कौतुक वाटले. यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाणार्‍या व्यक्तींशिवायही आम्हाला असेच देहबोलीचे चमत्कार दाखविले. अगदी त्यांना कलटी मारून पार्टी करण्याचा प्लॅनही त्यांनी अनेकदा उधळून लावला. अर्थात नंतर अंकल विजयी मुद्रेने पार्टीत ‘बसले’ अन् आम्ही त्यांची खुशामद करतोय अशा घटनाही अनेकदा घडल्या. या घटनांमधून देहबोलीच्या आकलनाची आपली क्षमता किती तोकडी आहे याची जाणीवही झाली. अर्थात माझा विद्यानगरमधील दुसरा मित्रही याच प्रकारे आम्हा मित्रांना चमत्कार दाखवत होता.

माझा हा मित्र आज मोठा अधिकारी आहे. बालपणापासूनच तो अचूक भाकिते करण्यात एक्सपर्ट होता. अर्थात त्याचे अनुमान बहुतांश नकारात्मक असून ते खरे ठरत असल्याने आम्ही इतर मित्र त्याच्यावर नेहमी चिडत. म्हणजे अगदी आमचा कॉलनीचा संघ विजयाच्या मार्गावर असतांना मॅच हरणार, अमुक-तमुकचे आता वाईट दिवस येतील अशी त्याची अनेक भाकिते खरी ठरत. यातच सामूहिक क्रिकेट मॅच पाहतांना तो सचिनसह अनेक खेळाडू बाद होण्याचे काही मिनिटांपुर्वीच सांगायचा. यामुळे तो बिचारा अनेकदा आमच्या रोषाचा धनी व्हायचा. अखेर आम्ही त्याला या प्रकारांचे रहस्य विचारले असता त्यानेही देहबोलीकडेच बोट दाखविले. तो म्हणायचा की, ‘‘मैदानावरचा सचिन असो की कुणीही! प्रत्येक जण त्याच्या शारिरीक हालचालीतून बरेच काही सांगत असतो आणि ते मला लागलीच कळते!’’ बॉडी लँग्वेजच्या या आकलनास तर्काची जोड देऊन हा पठ्ठ्या बहुतांश अचूक भाकित करत असे. अर्थात देहबोलीच्या माझ्या पुस्तकी ज्ञानाला पिटर अंकल आणि माझ्या या मित्राने अगदी जोरदार धक्के दिल्याने मी याविषयी अध्ययन करणेच सोडून दिले. उर्वरित कसर माझ्या एका सहकार्‍याने पुर्ण केली.

माझा हा सहकारी एका खेडेगावातील ‘साईमत’चा वार्ताहर असून तो आमच्याकडे कार्यालयातही कामाला आहे. बहुतांश वेळेस घरी येतांना मी त्याला कोपर्‍यापर्यंत सोडतो. असेच एकदा अजिंठा चौफुलीवर सोडल्यानंतर मला वेळ असल्याने मी त्याच्याशी बोलत बसलो. अचानक एक बाई भीक मागतांना आम्हाला दिसली.

तो म्हणाला ‘‘साहेब…या बाईचा मातलेपणा दाखवतो. तुम्ही फक्त मजा पहा.’’

ती बाई आमच्याकडे आली. त्याने समोरच्या भेळवाल्यास तिला एक प्लेट भेळ देण्याचे सांगितले. मात्र त्या बाईने भेळचे पार्सल बांधण्यास सांगितले. माझा हा सहकारी सांगू लागला की ‘‘आता ती बाई कोपर्‍यावर जाऊन ती भेळ फेकून देईल.’’ ती बाई कोपर्‍यावर जाताच हा तिच्यामागे पळत गेला. आणि खरोखर त्या बाईने फेकलेल्या भेळेची पुडी घेऊन आला. आयला मी थक्क! त्याला याचे कारण विचारले असता तो म्हणाला, ‘‘साहेब तिच्या चेहर्‍यावर भुक दिसत नव्हती. तिला रोख पैसे हवे होते.’’ त्याच्या आकलनाने मी चाट बनलो हे सांगणे नकोच. अर्थात मला ही घटना योगायोगाचा भाग वाटली. मात्र काही दिवसांनी मी एका कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून गेला असता तो माझ्यासोबत व्हिडीओ कॅमेरा घेऊन आला. मी भाषण वगैरे दिले. निघतांना तो म्हणाला, ‘‘साहेब त्या दोन मुलींपैकी एक तरी मला उद्या मीसकॉल करील…तुम्ही पहा!’’

मी ही बाब हसण्यावरी नेली. दुसर्‍या दिवशी सकाळी त्या दोन्ही अनोळखी मुलीचे संभाषणच त्याने मला नंतर ऐकवले तेव्हा साहजीकच मी अवाक् झालो. आता हा तरूण दिसायला यथातथाच असून त्याचे उच्चारही गावंढळ आहेत. तो फारसा श्रीमंतही नाही. बॉडी लँग्वेज काय असते हे त्याला माहितही नाही. म्हणजे तरूणींबाबतच नव्हे तर कोणाचाही स्वभाव ओळखण्यात तो इतका एक्सपर्ट आहे की काही क्षणातच तो एखाद्याबद्दल मत व्यक्त करतो व ते काही काळातच खरे ठरते. गुलाबी देहबोलीसह अनेक व्यक्तींच्या स्वभाववैशिष्टांची त्याने आम्हाला इतकी उदाहरणे सिध्द करून दाखविली की आम्ही त्याला ‘आता बस्स!’ असे बजावले आहे.

मित्रांनो देहबोलीत तथ्य आहेच. याचप्रमाणे फसव्या देहबोलीने समोरच्याला चकवादेखील देता येतो. तर काही वेळेस पुरेशा आकलनाअभावी आपण समोरच्याविषयी गैरसमजही करत असतो. मात्र हा प्रकार समजून घेण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची रिसेप्टीव्हिटी आवश्यक आहे. आता देहबोली हा एक गंभीर विषय असल्याचा माझ्यासारख्यांचा समज आहे. माझ्या जळगावातील मित्राने प्रेमप्रकरणाचे आकलन करण्यासाठी याचा वापर केला. पीटर अंकलसारखे जीवनाचा गाढा अभ्यास असणारे या प्रकाराला सहजगत्या वापरत असत. माझा अधिकारी मित्र देहबोली आणि ‘थिअरी ऑफ प्रॉबेब्लीटी’चा वापर करून नकारात्मक बाबींना सहज ओळखू शकतो. तर देहबोली हा शब्दही माहित नसणार्‍या माझ्या सहकार्‍याला समोरच्या व्यक्तीच्या स्वभावाचे अगदी बिनचुक आकलन होते. मात्र बहुतांश लोक देहबोली आणि यातून होणारे संवाद वहन याबाबत फारसे जागृत नाहीत. अर्थात प्रत्येक जण आपापल्या परीने ‘नॉन व्हर्बल’ संवादाचे आकलन करत असतोच. याची त्यांना जाणीव असो की नसो!

article_photo1

About the author

shekhar patil

6 Comments

Leave a Comment