Featured अनुभव पत्रकारिता

देशदूतचे ‘दे धमाल’ दिवस

पहिल्या दिवसाचे काम आटोपल्यानंतर मी ‘देशदूत’विषयी काही निरिक्षणे नोंदविली. काही अपवाद वगळता यातील बहुतांश निष्कर्ष येणार्‍या वर्षांमध्ये खरे ठरले. मोटारसायकलीने वा बसने भुसावळहून ये-जा करणे शक्य नसल्याने मी रेल्वेचा पास काढला. जळगाव रेल्वे स्थानकावरून देशदूतला रिक्षाने येतांना प्रारंभी अडचणी जाणवल्या. मात्र सुप्रीम, जळगाव केमिकल्स आदी कंपन्यांमधील अपडाऊन करणार्‍या कर्मचार्‍यांशी ओळख झाल्यानंतर रिक्षावालेही ‘फिक्स’ झाले अन् सहप्रवासीदेखील! भुसावळहून सकाळी सुरत पॅसेंजरने मी येत असे. खरे तर त्यानंतरच्या नवजीवननेही सकाळी दहाची वेळ गाठणे शक्य असे. मात्र वेळेच्या किमान अर्धा-एक तास आधी येण्याची सवय मी स्वत:ला लावून घेतली. याचे अनेक फायदे झाले. एक तर भल्या सकाळी संपादकीय विभागातील ट्रेमध्ये ठेवलेल्या बातम्या पाहून कामाचे नियोजन अचूक होत असे. लवकर येऊन बातम्या संपादित करून डीटीपी ऑपरेटर्सजवळ दिल्या की काम खल्लास. साधारणत: दहाच्या सुमारास ऑपरेटर आल्यानंतर थोडा वेळ गप्पा करून काम सुरू होत असे. यानंतर विना छताच्या संपादकीय विभागात बसण्यापेक्षा आम्ही सर्व सहकारी वातानुकुलीत डीटीपी विभागातच बसत असू. फक्त कुणी वार्ताहर वा अन्य व्यक्ती भेटण्यासाठी आल्यासच आम्ही तिकडे जात असू अन्यथा काम संपेपर्यंत सुभाष सोनवणे साहेबांकडील बैठक वगळता डीटीपी विभागातच आम्ही बसत असू. हा दैनंदिन कार्यक्रम इतका पक्का झाली की मी आजही तेव्हाचा देशदूत आपल्यासमोर साकार करू शकतो.

आमच्या ठरलेल्या पप्पूच्या रिक्षातून साधारणत: पावणेनऊ वा फार तर नऊच्या सुमारास मी देशदूतच्या (उत्तरेकडील सध्या बंद झालेल्या ) गेटमधून आता शिरताच प्रवेशद्वारावरच दराडे बाबांचा स्नेहयुक्त स्वर कानी पडायचा. अनेकदा बाबा न्याहारी करत असायचे. ‘या-अमृत घ्या’ झाल्यानंतर थोडा वेळ चर्चा होई. तेव्हा सकाळी सातपासून कामावर आलेले माळीबाबा (रामपाल मौर्य) राहतच. दराडेबाबा हा अत्यंत मायाळू माणूस. त्यांच्यावर पुढच्या काळात अनेक संकटे कोसळली तरी त्यांनी याचा खंबीरपणे मुकाबला केला. त्यांच्याशी दोन शब्द बोलल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावर आल्यानंतर स्वागतकक्षात साडेआठची ड्युटी असणारे टेलिफोन ऑपरेटर लक्ष्मण महाजन, शिपाई लालाजी (छगनलाल जैसवाल), योगराज पाटील, किरण सोनार आदी भेटत. अनेकदा कार्यालयाची साफसफाई करतांना त्यांच्यात हास्यविनोद सुरू असे. अनेकदा सुख-दु:खाच्या घटना शेअर होत. देशदूतमधील काही वल्ली माझ्या भावजीवनाच्या अविभाज्य घटक बनल्या. सरशिपाई (सरसेनापतीच्या धर्तीवर!) लालाजी हा माणूस म्हणजे देशदूतचा पुराणपुरूष होय. हे वर्तमानपत्र सुरू होण्याआधीपासून लालाजी नोकरीस आहेत. देशदूतला लागून असणारी लहानशी हॉटेल त्यांचा मुलगा मनोज चालवतो. अत्यंत विनोदी स्वभावाचे लालाजी आपल्या लहान मुलाच्या कर्करोगाने आणि यातच झालेल्या त्याच्या मृत्यूने कसे उन्मळून पडले अन् पुन्हा कशा उमेदिने उभे राहिले हे मी पुर्ण अनुभवले. आजही कधी तरी लालाजी मुलाच्या हॉटेलवरून कडक रामराम ठोकतात तेव्हा त्यातील प्रेमाचा ओलावा लपून राहत नाही. संपादकीयचे माझ्या वाट्याचे काम आटोपल्यानंतर जवळपास सर्व कार्यालय भरलेले असायचे. स्वागतकक्षाला लागूनच जाहिरात विभाग होता. यात विनोद नेवासकर साहेबांसह अत्यंत चुणचुणीत नदीम शेख, विनोदी प्रदीप जाधव, प्रसन्न स्वभावाचा मात्र सतत संभ्रमात असणारा जगदीश कुंटे, रिकव्हरी सांभाळणारे मनोज भादलीकर आदी मंडळी भेटत असे. खुद्द नेवासकर हे मिश्किल स्वभावाचे असून त्यांचा हळूच केलेला विनोद अनेकदा भलताच भन्नाट असे. तेथून डाव्या बाजूला डीटीपीमध्ये रामसिंग व कैलास परदेशी तसेच राजू पाटील असत. अनेकदा दुपारी पुरवणी लावण्याच्या निमित्ताने डीटीपी विभाग प्रमुख योगेश शुक्ल येत असे. प्रारंभी या माणसाचे मला कोडंच वाटत असे. नोकरी सोडेपर्यंत हे कोडे मला बरेचसे सुटले हा भाग वेगळा!

प्रवेशद्वाराच्या अगदी समोर शिक्षक म्हणून सेवानिवृत्त होऊन देशदूतमध्ये मुद्रीतशोधक म्हणून कामास असणारे जगताप सर बसत. डीटीपीतून सरळ चिंचोळ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला प्रारंभ वितरण विभाग होता. यात वितरण व्यवस्थापक सुभाष गोळेसर व त्यांचे सहकारी राहत. यात विजय महाजन, अजय पाटील, कैलास सोनवणे, मनोज सोनवणे, रवींद्र हळकुंडे आदी मंडळी रहायची. यातील विजय महाजन व अजय पाटील हे कायम दौर्‍यावर असल्याने महिन्यातून आठ-दहा दिवस येत असत. गोळेसरही अनेकदा दौर्‍यावर जात. मला जाणवलेली सर्वात लक्षणीय बाब म्हणजे एखादा वार्ताहर वा एजंट ज्या बिनधास्तपणे वा प्रेमाने वितरण विभागात जायचा तेव्हढा ओलावा तो संपादकीय विभागाबाबत दाखवत नसे. वितरण विभागाने त्यांच्याशी उत्तम संबंध कायम राखले होते. ते त्यांच्या समस्या समजून घेत अन् त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्नही करत. यामुळे आपणही वार्ताहर आणि एजंटशी चांगले संबंध जोपसण्याची खुणगाठ मी मनाशी बांधली. पुढे यावर अंमलबजावणीदेखील केली. या विभागाच्या आता गोळेसरांची कॅबीन होती. दुसर्‍या जिल्ह्यातून आलेल्या सुभाष गोळेसर यांनी जळगाव जिल्ह्यात जे संबंध जोपासले ते मॅनेजमेंटचा अभ्यास करणार्‍या कुणालाही विचार करायला लावणारे होते. अर्थात याचे फळ त्यांना मिळून त्यांनी देशदूतच्या व्यवस्थापकपदाची जबाबदारी सांभाळली. गोळेसरांच्या कॅबीनच्या बाजूला कंपनीचा सर्व्हर ठेवलेला होता. येथेच ‘ईडीपी’ विभागप्रमुख प्रशांत भालेराव यांची बैठक व्यवस्था होती. वितरण विभागाच्या अगदी समोर जाहिरात व्यवस्थापक मनीष पात्रिकर यांची तर त्यांच्याच बाजूला व्यवस्थापक सुनील (एस.के.) ठाकूर यांची तर त्यांना लागूनच संपादक सुभाष सोनवणे यांची कॅबिन होती. ठाकूर सरांच्या कॅबिनसमोर आमचा संपादकीय विभाग होता. याला लागूनच लायब्ररी होती. सायंकाळी सहाच्या सुमारास चंद्रकांत पाटील याची धुरा सांभाळत असत. त्यांच्या कॅबिनच्या समोर आणि सोनवणे सरांच्या कॅबिनला लागून कार्मिक विभाग होता. या विभागाचे प्रमुख समीक भट्टाचार्य हा एक कलंदर माणूस. स्वत:ला वाचनाद्वारे अपडेट ठेवणार्‍या या बंगाली तरूणाने मराठी सहजगत्या आत्मसात केली होती. त्यांचे सहकारी जितेंद्र दुसाने होते. या कॅबीनला लागूनच लेखा विभाग होता. याचे प्रमुख नितीन सोनवणे होते. त्यांचे एक सहकारी सुनील निळे हे भुसावळातून ये-जा करत. बँकेचा काम करणारे दोडे तर रोखपाल बाभुळके होते. मी लागलो त्याच दिवशी या विभागात किर्ती कोठारी हा तरूण रूजू झाला.

देशदूतच्या मुख्य कार्यालयाला लागून असणार्‍या दुसर्‍या शेडमध्ये प्रिंटींग विभाग होता. सुरवातील श्री. सावकारे आणि त्यानंतर ऐहतशाम देशमुख हे या विभागाचे प्रमुख होते. त्यांच्याशिवाय या विभागात अरूण पाटील, प्रकाश पाटील, ढवळे, जाधव, दिनकर पन्हाड आदी मंडळी होती. प्रारंभी स्टोअर विभाग हा छपाई विभागाला लागून असणार्‍या छोट्याशा शेडमध्ये होता. यात अनिल मोरे आणि त्यांचे सहकारी शरद पाटील हे असायचे. आता ही मंडळी सर्व दिवसपाळीला कामाला होती. आमची ड्युटी साडेसहाला संपत असे तर रात्रपाळी सहाला सुरू होत असे. यामुळे या अर्ध्या तासात रात्रीची बहुतांश मंडळी कामावर येत असे. किशोर शिंपी, विवेक खडसे व फकिरा खाटीक या सर्व ‘प्रुफ रिडर’ मंडळीचा डेरा ग्रंथपाल चंद्रकांत पाटील यांच्या कॅबिनमध्ये असे. अनेकदा ते लालाजीच्या टपरीवर चहा घेण्यासाठी जात. यातील शिंपी हे कायम चौकस, खडसे मामा नेहमी त्राग्यात तर खाटीक शांत असत. संपादकीयपैकी क्रीडा प्रतिनिधी राजू खेडकर हा कार्मिक विभागात स्वाक्षरी केल्यानंतर थेट डीटीपीत शिरत असे. तो आणि ऑपरेटर दिलीप वराडे अवघ्या दीड-दोन तासात क्रीडा पान लावत. तेव्हा सायंकाळी सहा वाजेला ‘ई टिव्ही’वर बातमीपत्र असे. याप्रसंगी सुभाष सोनवणे यांच्या कॅबिनमध्ये हेमंत अलोने, विवेक उपासनी, भरत चौधरी, श्रीपाद सबनीस, विलास पवार आदी सहकारी कागद-पेन घेऊन बसलेले असत. यातील ठळक बातम्या नियोजनात घेतल्या जात. दरम्यान, डीटीपीमध्ये एस.एल.दादा पाटील, प्रथमदर्शनी अगदी फटकळ वाटणारे दिलीप वराडे, सुहास बोरोले, आपण भले आणि आपले काम भले अशा वृत्तीचा सुनील दांडगे, कोणतेही काम न कुरकुरता करणारा सुधाकर, हसरा अतुल भंगाळे आदी सहकारी हळूहळू येत. यातच त्यांचा सरदार अर्थात योगेश शुक्लही येत असे. जाहिरात विभागात शेड्युलींग क्लार्क किशोर कुळकर्णी (के.के.), रात्रपाळीचा शिपाई (सहसा योगराज) येत असत. पार्सल विभागप्रमुख प्रीतम सारस्वत याच्यासह रिक्षावाले नितीन शर्मा दिवसा कधीतरी दिसायचे.

काम आटोपून रेल्वे गाडी मिळावी म्हणून माझ्यासह अमळनेरचे रमेश चौधरी, सुनील निळे व अमळनेर येथील किर्ती कोठारी आदी धावपळ करत निघायचो तेव्हा गेटवर सिक्युरिटी पाटील (कदम शक्यतो तिसर्‍या शिफ्टला असत) आलेले असत. यावेळी दराडेबाबांच्या निघण्याची घाई सुरू असे. या गडबडीतच आम्हाला रेमंड चौफुलीपर्यंत पायी जावे लागत असे. येथून रिक्षा पकडल्यानंतर रेल्वे स्थानकावर गाडी पकडण्यासाठी धांदल उडत असते. एका अर्थाने सकाळी नऊ ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंतचा वेळ हा अत्यंत गडबडीत जात असे. घरी जातांना किमान आठ-सव्वाआठ वाजत. यानंतर मित्रांना थोडा वेळ भेटून अंथरूणात जाणे क्रमप्राप्त होते. या अत्यंत व्यस्त वेळापत्रकात देशदूतमध्ये मी वेळेचे अचूक व्यवस्थापन करून दुपारी मिळालेल्या फावल्या वेळेत लिखाण केल्याचा मला खूप लाभ झाला.

देशदूतमधील अनेक ‘अर्क’ मंडळी अजूनही आठवतात. यापैकी प्रदीप जाधव, कैलास सोनवणे व मनोज सोनवणे हे दुसर्‍यांची मजा घेण्यात आश्‍चर्य वाटावे इतपत पारंगत होते. विशेष म्हणजे एकमेकांचे जीवलग मित्र असणार्‍या या तिघांचे ‘टायमिंग’ अगदी अचूक असे. समजा एखाद्या वेळेस यातील दोन जण एकाची फिरकी घेत असतांना तिसरा आला तर तो प्रसंगावधान राखून त्यांच्याच सुरात सुरू मिळवून बोलायचा. यामुळे अनेक जण फसत असत. असेच एकदा मनोज सोनवणे अगदी गंभीर चेहरा करून संपादकीय विभागात आला. त्याने तातडीने देशदूतची फाईल चाळण्यास सुरूवात केली. तेथे मी आणि गिरीश निकम असल्याने आम्ही त्याला ‘काय झाले?’ असे विचारले. यावर त्याने चिंताक्रांत चेहर्‍याने चोपडा तालुक्यातील मोहंमद जॉन पाटील या सरपंचाच्या निवडीची बातमी लागली का? अशी विचारणा केली. थोड्याच वेळात कैलास सोनवणेही आला. त्याने ही बातमी जाहिरातदाराची असल्याचे सांगितले. मला ही गंमत लक्षात आली तरी गिरीशही त्यांना बातमी शोधण्यासाठी मदत करू लागला. हळूच मनोज आणि कैलास बाजूला सरकले व गिरीश बातमी शोधत राहिला. थोड्या वेळाने सर्व जण खो खो हसायला लागले हे सांगणे नकोच. अशा अनेक गमती घडल्या. अचानक वीज गेल्यास डीटीपी विभागात गडद अंधार होत असे. यामुळे वीज जाताच कुणालाही कामाच्या निमित्ताने डीटीपीत बोलावून त्याला बदडण्याची पध्दतही होती. एकदा वीज गेल्यानंतर खुद्द ठाकूर साहेब डीटीपीत आले असता कुणी हात चालवणार यापुर्वीत एकाने साहेब आल्याची वर्दी दिल्याने सर्व जण वाचले. देशदूतमध्ये अनेक दिवस हा किस्सा गाजला.

चर्चेच्या गुर्‍हाळासाठी सर्वांचा आवडता वेळ हा अर्थातच जेवणाचा होता. देशदूतमध्ये दिवसपाळीला संपादकीय आणि डीटीपी विभाग एकत्र भोजनाला बसे. आमच्यासोबत टेलिफोन ऑपरेटर लक्ष्मण महाजन आणि शिपाई किरण सोनार हेदेखील येत. पावसाळा व कडक उन्हाळा वगळता आम्ही कार्यालयासमोरच्या लॉनवर भोजन करत असू. अन्यथा प्रिंटींग विभाग वा संपादकीयमध्ये आमची पंगत जमत असे. हिरवळीवर तर अगदी वनभोजनाचा ‘फिल’ येत असे. आमच्या ग्रुपशिवाय जाहिरात, डीटीपी, प्रिंटींग आणि वित्त विभाग स्वतंत्रपणे भोजन करत असत. कार्मिक व्यवस्थापक समीक भट्टाचार्य, जितेंद्र दुसाने, अनिल मोरे आणि नितीन सोनवणे हे अनिल मोरे यांच्या कॅबिनला भोजन करत. ठाकूर साहेब त्यांच्या कॅबिनला भोजन करायचे तर सोनवणे साहेब हे घरी भोजन करून येत असत. यातील वितरण विभागाचा भोजन सोहळा हा अत्यंत अफलातून असायचा. या विभागातील सर्व जण आपापले डबे टेबलावर ठेवून आजूबाजूला उभे राहून भोजनावर अक्षरश: आक्रमण करायचे. त्यांच्यात एखादा नवखा गेल्यास बिचार्‍याचे हालच होत असत. भोजनानंतर पाय मोकळे करण्यासाठी गेटपर्यंत जाण्याचा अनेकांचा नेम होता. रात्रपाळीत संपादकीय, डीटीपीसह सर्व विभागाचे सहकारी संपादकीय विभागातच भोजन करत. आमच्या ग्रुपमध्ये भोजनाप्रसंगी धमाल मजा चालत असे. अगदी तत्वचिंतनापासून ते फालतू गप्पांपर्यंतचे सगळे काम आम्ही जेवतांना केले. जळगाव आवृत्तीला किरण पाध्ये यांची बदली झाल्यानंतर तेदेखील आमच्यासोबत येऊ लागले. त्यांच्यामुळेच उन्हाळ्यात जेवणानंतर ताक घेण्याची सवय लागली. अर्थात ताक आणणे त्यात मिठ-मसाला मिसळणे आदी बाबी एखाद्या कर्मकांडासमान भक्तीभावाने केल्या जात. समीक भट्टाचार्य यांच्या जागेवर आलेले राजेंद्र पवार साहेब आमच्यात आल्यानंतर ते, मी आणि पाध्ये यांची अनेकदा साहित्यावरही चर्चा होऊ लागली. यात चंचल स्वभावाच्या लक्ष्मणला उपदेशाचे डोस आणि रामसिंग परदेशी याची फिरकी याबाबीही नित्याच्याच होऊ लागल्या. आमचे भोजन सुरू असतांना अनेक प्रतिनिधी, वार्ताहर वा एजंटही सोबत येऊन बसत. यातून सुख-दु:खाची विचारणा होई.

देशदूतमधील बहुतांश कर्मचारी हे मध्यमवर्ग आणि गरीब मध्यमवर्गातील होते. काही ‘पोहचलेले’, काही विनोदी, काही परिस्थितीने गांजलेले, काही टाईमपास करणारे तर काही प्रचंड काबाडकष्ट करणारे होते. जगातील कोणत्याही संस्थेत असणारे सर्व घटक देशदूतमध्ये उपस्थित होते. एका अर्थाने ही एक अत्यंत गतीमान अशी संस्था होती. काही दिवसांतच या संस्थेशी एकजीव होत असतांना माझे सृजन सुसाट गतीने सुरूच होते. वर नमूद केलेले सहकारी हे साधारणत: २००२ची अखेर आणि २००३च्या प्रारंभीचे आहेत. यानंतर अनेक जण सोडून गेले तर बरेच नवीन आले. या सर्वांचा आढावा घेत देशदूतमधील साडेसात वर्षाच्या काळातील माझे सृजन, यातील महत्वाचे टप्पे, मला लाभलेले मार्गदर्शन, यातून घडलेला माझा पिंड आदींविषयी वाचा पुढील भागात…!!

(देशदूतमधील माझ्या शेकडो लेखांमधील हा एक लेख!! )

my article

About the author

shekhar patil

2 Comments

Leave a Comment