चालू घडामोडी

दुध भेसळखोरांना फाशीच हवी

पघातात अगदी कुणाचाही जीव घेतला तरी आपल्या देशात वाहन चालक अगदी सहजगत्या जामिनवर सुटतो. अशीच मुजोरी कोट्यवधींच्या जीवनाशी खेळणार्‍या भेसळखोरांची आहे. वाहन अपघाताप्रमाणेच अन्न भेसळीच्या खटल्यांमध्ये शिक्षा होणार्‍यांचे प्रमाण अत्यल्प आहे. या पार्श्‍वभूमीवर, राज्य सरकारने दुधात भेसळ करणार्‍यांना फाशीच्या शिक्षेचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवून दिलासादायक पाऊल उचलले आहे.

महाराष्ट्राच्या दुग्धविकास खात्याचे राज्यमंत्री ना. गुलाबराव देवकर यांनी विधानसभेत अन्नभेसळ प्रतिबंधक कायद्यात दुरूस्ती करून दुधात भेसळ करणार्‍यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात यावी अशी शिफारस राज्य सरकारने केंद्राला केली असल्याची माहिती दिली. दुध भेसळ हा अत्यंत संवेदनशील पण दुर्लक्षित असा विषय आहे. अब्जावधींचे अर्थकारण असणार्‍या दुग्ध व्यवसायात कित्येक वर्षांपासून अपप्रकार होत आहेत. नजीकच्या काळात तर याचे अत्यंत भयावह पैलू समोर आलेत. दुधात पाणी मिसळणे हे पूर्वापार चालत आले आहे. यावरून अनेक विनोद आणि किस्से प्रचलित आहेत. मात्र ‘आता दुधात पाणी चांगले’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. कारण पाण्याची भेसळ ही कुणाच्या जीवावर उठत नव्हती. दुध भेसळीचे नवीन प्रकार मात्र अक्षरश: जीवघेणे आहेत.

दुध घट्ट भासावे म्हणून त्यात स्टार्च वा तांदूळ बारीक करून टाकण्यात येत असे. अर्थात ही भेसळही त्या तुलनेत आरोग्याला घातक नव्हती. मात्र दुधात युरीया मिसळण्याचे प्रकार समोर आल्याने हे प्रकरणी किती गंभीर आहे याची जाणीव झाली. दुधात युरीया मिश्रीत केल्यामुळे ते घट्ट दिसते. यामुळे यात हवे तितके पाणी टाकता येते. मात्र दुधातील युरियाच्या मिश्रणामुळे आरोग्याची मोठ्या प्रमाणात हानी होते. यामुळे मुत्रपिंडासह अन्य विकार हमखास जडण्याची शक्यता असते. अलीकडच्या काळात तर दुधात भेसळ करण्याऐवची ते चक्क कृत्रीम पध्दतीने तयार करण्याचा प्रकार वाढीस लागला आहे. अगदी चमचाभर रसायनाच्या मदतीने १०० लीटर दुध तयार करणेही शक्य आहे. हे दुध युरियामिश्रीत दुधापेक्षाही जीवघेणे असल्याचे निदर्शनास आले आहे. बरं भेसळ ही दुधापुरती मर्यादीत न राहता दुग्धजन्य पदार्थांमध्येही सर्रास होत असते. दिपावलीच्या काळात देशभरात ‘कृत्रीम मावा’ प्रकरण भलतेच गाजले होते. राज्यातही बर्‍याच ठिकाणी या भेसळीविरोधात कारवाई करण्यात आली तरी याचे पुढे काय झाले हे कुणाला समजलेच नाही. याला सर्वस्वी आपले अत्यंत तकलादू कायदेच कारणीभूत होत यात शंकाच नाही.

या पार्श्‍वभूमीवर, राज्य सरकारची अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा कठोर बनवत दुध भेसळखोरांना फाशी देण्याची केलेली शिफारस योग्यच म्हणावी लागेल. अर्थात ही शिफारस आजच अंमलात येणार नाही. केंद्राने अगदी यावर विचार केला तरी याला कायद्याचे स्वरूप प्राप्त होण्यासाठी काही वर्षे लागतील. यातच महाराष्ट्रासह देशातील दुग्ध व्यवसायावर राजकारण्यांची पकड आहे. ते इतक्या कठोर कायद्याची तरतूद करू देणार नाहीत. कायदा झालाच तरी याची अंमलबजावणी होणार का? हादेखील प्रश्‍न आहे. ना. देवकर यांनी विधानसभेत गत दोन वर्षात दुध भेसळ करणार्‍या २७ ठिकाणांवर धाडी टाकल्याची माहिती दिली. आता राज्यात दररोज अक्षरश: हजारो ठिकाणी भेसळ होत असतांना दोन वर्षात फक्त २७ ठिकाणी धाडी टाकणारे संबंधीत खाते हे किती ‘कार्यक्षम’ आहे याची चुणूक दिसते. यामुळे भेसळखोरांना फाशीची तरतूद करण्याची तडफ दाखविणार्‍या राज्य सरकारने हा कायदा झालाच तर याची कठोर अंमलबजावणीही करावी ही अपेक्षा. याचसोबत इतर खाद्य पदार्थांमधील भेसळीला आळा घालण्यासाठीही अशाच प्रकारची तरतूद करण्याची आवश्यकता आहे. चीनसारख्या राष्ट्रांमध्ये भेसळखोरीला सदोष मनुष्य वधासमान मानत दोषींना मृत्यूदंड ठोठावण्याची तरतूद आहे. दुध भेसळखोरीचे भयावह स्वरूप पाहता याची भेसळ करणारांनाही फाशीचीच शिक्षा हवी यात दुमत नसावे.

About the author

shekhar patil

Leave a Comment