Featured slider चालू घडामोडी विज्ञान-तंत्रज्ञान

दुखणे : फुकटचे, विकतचे आणि सरकारी !

Written by shekhar patil

केंब्रिज अ‍ॅनालिटीका प्रकरणाच्या माध्यमातून सोशल मीडिया व खर तर एकंदरीतच डिजीटल विश्‍वातील सुरक्षेबाबत जगभरात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. याचे नवनवीन आयाम आपल्यासमोर येत आहेत. याच्या नंतर तर फेसबुकवर युजरचा सर्व कॉल लॉग संग्रहीत होत असल्याचा गौप्यस्फोटही करण्यात आला आहे. फेसबुकने सोयिस्करपणे आपण हे युजरच्या परवानगीनेच करत असल्याचे सांगत हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र मुळातच अनेक फसव्या जाहिराती, काही वित्तीय संस्थांचे व्यवहार आदींमध्ये छुप्या अटी, शर्ती व नियम याबाबत कुणीही फारसे जागरूक राहत नाही. अगदी याच प्रमाणे डिजीटल विश्‍वात मुशाफिरी करत असतांना आपण पुरेशी सावधगिरी बाळगत नाही. यामुळे केंब्रिज अ‍ॅनालिटीका सारखे एखादे प्रकरण समोर येते तेव्हा प्रचंड खळबळ उडते. अर्थात काही दिवसांनी हे प्रकरण विस्मरणात जाणार हे सांगण्याची गरज नाहीच. सायबर सुरक्षा हा अतिशय महत्वाचा पण सर्वात दुर्लक्षीत घटक आहे. आपले डिजीटल वर्तन हे कुणी तरी ट्रॅक करत असल्याची जाणीव ही भयंकर अस्वस्थ करणारी असते हे कुणी नाकारू शकणार नाही. मात्र हे दुखणे विविध पातळ्यांवरील असल्याची बाब आपण लक्षात घेणे गरजेचे आहे.

इंटरनेटने कनेक्ट असणारे कोणतेही उपकरण अथवा सेवा या पुर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा कुणीही करू शकणार नाही. यांना हॅक करणे, दुरवरून हेरगिरी करणे अथवा यातील माहितीवर डल्ला मारणे सहजशक्य आहे. जिथे अमेरिकेसह जगभरातील विविध देशांच्या सरकारी वेबसाईट वा डाटा सर्व्हर सुरक्षित नाहीत तेथे तुमच्या-आमच्या सारख्यांची काय बिशाद ! अर्थात पृथ्वीतलावरील कुणीही व्यक्ती जेव्हाही डिजीटल विश्‍वात मुशाफिरी करतो तेव्हा त्याने कितीही प्रयत्न केले तरी तो परिपूर्ण रितीने सुरक्षित राहू शकत नाही. याला कारणीभूत असणारा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे अर्थातच फुकट मिळणार्‍या सेवा होय. आज आपल्या दैनंदीन जीवनाचा अविभाज्य घटक बनलेल्या सर्च, ई-मेल्ससह विविध सोशल साईट, स्मार्टफोन अ‍ॅप्लीकेशन्स, मॅसेंजर्स आणि विविध युटीलीटीज या बहुतांश मोफत देण्यात येत आहेत. म्हणजे दररोज जगभरात अब्जावधी सर्च होणार्‍या गुगलपासून ते आपल्याला वेड लावणार्‍या व्हाटसअ‍ॅपर्यंत सर्व सेवा जेव्हा मोफत देण्यात येतात तेव्हा कुणी यामागील अर्थकारण लक्षात घेत नाही. एका क्लिकसरशी माहितीचे अजस्त्र भांडार आपल्यासमोर उघडणारे गुगल असो की, जगभरातील अब्जावधी लोकांना कनेक्ट करणारे फेसबुक! सर्व टेक कंपन्या वरून सेवाभावी आणि मानवतावादी मुखवटा धारण करत असल्या तरी त्यांच्या उत्पन्नाचे आकडे अब्जावधींच्या घरात असल्याची बाब आपण समजून घेतल्यास यातील विरोधाभास आपल्या सहजपणे लक्षात येऊ शकतो. म्हणजेच मोफतच्या नावाखाली मिळणारे सगळे काही हे आपल्यासोबत काही साईड इफेक्टदेखील घेऊन येत असते. यात अर्थातच तुम्हा-आम्हा सर्वांच्या वैयक्तीक गोपनीय माहितीचा संग्रह आणि याच्या व्यावसायिक वापराचा समावेश असतोच. आणि याला आपल्याच परवानगीने जमा करण्याची केलेली मखलाशी कुणाच्या लक्षात येत नाही हे दुर्दैव.

सायबरविश्‍वातील मोफत घटकच आपल्या माहितीशी छेडछाड करत असतील असा आपला समज असेल तो साफ चुकीचा आहे. या प्रकारातील दुसरे दुखणे हे विकत या प्रकारातील आहे. आपण विविध उपकरणे विकत घेतो. याचा मोठ्या हौसेने वापर करतो. मात्र बहुतांश उपकरणे हे वापरण्यासाठी सुरक्षित नसतात. यात सुरक्षाविषयक अनेक त्रुटी असतात. फक्त सॉफ्टवेअरच्या माध्यमातूनच माहितीची चोरी होत नसून हार्डवेअर अर्थात उपकरणांमधूनही हा प्रकार राजरोसपणे होत असल्याकडे आपण साफ दुर्लक्ष करतो. मध्यंतरी अनेक चीनी स्मार्टफोन उत्पादकांवर याच पध्दतीने माहिती चोरीचा आरोप झाला होता. केंद्र सरकारने संबंधीतांना याबाबत नोटीसादेखील बजावल्या होत्या. याचे पुढे नेमके काय झाले ? हे कुणालाच कळले नाही. मध्यंतरी चीनी उत्पादकांवर बंदी घालण्यासाठी सुरू झालेल्या चळवळीतही हा मुद्दा केंद्रस्थानी होता. मात्र आज पूर्ण जगच एक बाजारपेठ झाली असल्यामुळे एखाद्या देशातील कंपन्यांवर बंदी घालणे फारसे सोपे नाही. यातच भारतातील पहिल्या दहा स्मार्टफोन उत्पादकांपैकी पाच कंपन्या चीनी आहेत. या लिस्टमध्ये दहाव्या क्रमांकावर असणार्‍या मायक्रोमॅक्स या एकमेव भारतीय उत्पादकाचे बहुतांश मॉडेल्सदेखील मेड इन चायना असल्याची बाब लक्षात घेतली असता याची व्याप्ती आपल्या लक्षात येऊ शकते. आता काही विदेशी कंपन्यांनी भारतात सर्व्हर ठेवण्याची तयारी दर्शविली असून मेक इन इंडियाच्या अंतर्गत भारतात उत्पादन करण्याची तयारी दर्शविली असली तरी यामुळे फारसा फरक पडणार नाही. स्मार्टफोनसह अन्य उपकरणांमधील वाय-फाय प्रणाली, कॅमेरा, वेब कॅमेरा, मायक्रोफोन ही आपल्या डिजीटल व्यवहारांवर हेरगिरी करणारी हुकमी साधने आहेत. दस्तुरखुद्द मार्क झुकरबर्ग हा जुलै २०१६ मध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात आपल्या लॅपटॉपमधल्या वेबकॅम व मायक्रोफोनवर टेप लावलेल्या स्थितीत दिसून आला होता. जगातल्या अब्जावधी लोकांना एका वृदह नेटवर्कमध्ये गुंफण्याची किमया करणार्‍या झुकरबर्गला लॅपटॉपच्या माध्यमातून होणार्‍या हेरगिरीबाबत वाटणारी भिती ही तेव्हा चर्चेचा विषय बनली होती. आता याच भितीचा आयाम हा मार्क झुकरबर्गच्या फेसबुकच्याच माध्यमातून जगासमोर यावा हा काळाचा महिमाच मानावा लागेल. अर्थात आपण पैसे मोजून घेणारे उपकरण सुरक्षित असेलच याची खात्री कुणी देऊ शकणार नाही.

यातील एक अन्य आयामदेखील आपण लक्षात घेण्याची गरज आहे. माहिती लीक होण्याबाबत जागरूक असणार्‍या ग्राहकांना अभेद्य सुरक्षा पुरविण्याचा प्रयत्न काही कंपन्या करत आहेत. मात्र याचा दुरूपयोगही होण्याची शक्यता आहे. मध्यंतरी काश्मिरातील चकमकीत अबू दुजाना हा दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाला होता. मात्र त्याचा आयफोन ७ हा स्मार्टफोन जवानांच्या हाती लागला होता. यातील माहिती जाणून घेण्यासाठी भारतीय सुरक्षा यंत्रणांनी खूप प्रयत्न केले तरी त्यात अपयश आल्याचे वृत्त आपल्या वाचनात असेलच. यासाठी एफबीआयची मदत घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र आधीच अ‍ॅपलने आपल्या कोणत्याही युजरच्या आयफोनला अनलॉक करण्यासाठी एफबीआयला मदत करण्यास साफ इन्कार केला होता. परिणामी, अबू दुजानाच्या आयफोनमधून माहिती काढण्यात अपयश आले. म्हणजे अ‍ॅपलने आपल्या युजर्सला सुरक्षा प्रदान करण्यासाठी प्रयत्न केले तरी याचा अशा प्रकारे गैरवापर होण्याची शक्यतादेखील आहेच. याच प्रकारे अतिशय अभेद्य सुरक्षा कवच प्रदान करण्यात आलेल्या टेलिग्राम मॅसेंजरचा वापर दहशतवादी करत असल्यामुळे जगभरातील सुरक्षा यंत्रणा त्रस्त झालेल्या आहेत. म्हणजे सुरक्षेची काळजी घेतली नाही तर युजर्स त्रस्त आणि जास्त काळजी घेतली तर शासकीय यंत्रणांना डोकेदुखी असा दुहेरी पेच आता निर्माण झाला आहे.

सायबरविश्‍वातील गोपनीय माहितीचा तिसरा संवेदनशील आयाम हा शासकीय पातळीवरील आहे. अलीकडच्या काळात आधारच्या माहितीचा अजस्त्र डाटाबेस हा डार्क वेबवर ( छुपे समांतर इंटरनेट ) उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर अनेक साईटवर आधारचा डाटा ऑनलाईन उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले आहे. अर्थात शासकीय पातळीवरून नागरिकांना जमा करण्यात आलेल्या माहितीचा तपशील हा पूर्णपणे सुरक्षित नसल्याची बाब स्पष्टपणे अधोरेखीत झाली आहे. आधारवर देशातील प्रत्येक नागरिकाचा बायोमॅट्रीक डाटाबेस आहे. यामुळे याचा गैरवापर हा अनेक भयंकर घटनांना कारणीभूत ठरू शकतो. आधारच्याही पलीकडे आता शासनाच्या विविध सेवा ऑनलाईन होत असून यावरील सुरक्षेकडे कुणी दुर्लक्ष करू शकत नाही.

सायबर सुरक्षेतील त्रुटी या एकमेकांशी कनेक्ट असल्याची बाबही आपण लक्षात घेण्याची गरज आहे. म्हणजे माझे फेसबुकचे अकाऊंट खूप सुरक्षित असले तरी मी एखाद्या मोफत मिळणार्‍या ई-मेल अकाऊंटमध्ये याच्या लॉगीनचे डिटेल्स ठेवलेले असल्यास आपोआपच फेसबुक खाते आणि ई-मेल या दोन्ही सेवांमधील माहिती चोरली जाण्याची भिती आहेच. यामुळे प्रत्येकाने सायबरविश्‍वात मुशाफिरी करतांना सर्वांगीण सुरक्षेला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे.

इंटरनेट हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनले आहे. यामुळे आपल्याला ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचा खजिना उपलब्ध झाला आहे. याच्या जोडीला दैनंदिन जीवनातील अनेक अनिवार्य सेवादेखील यावरच आधारित आहेत. भविष्यात इंटरनेट ऑफ थिंग्जच्या मदतीने जगातील अब्जावधी उपकरणे एकमेकांशी जुळणार आहेत. स्मार्ट होम, स्मार्ट ऑफिसेस, कनेक्टेड कार आदी विविध इकोसिस्टीम्स अस्तित्वात येतील. यात सुरक्षेची एखादी चूकही खूप महागात पडू शकते. यामुळे सायबर सुरक्षा हा आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा घटक असून याकडे आपण गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. अन्यथा विविध मार्गांनी आपली गोपनीय माहिती चोरली जाण्याची टांगती तलवार कायम राहणार आहे.

( प्रस्तुत लेख हा दैनिक सामनाच्या उत्सव या साप्ताहिक पुरवणीत दिनांक १ एप्रिल २०१८ रोजी प्रकाशित झाला आहे. )

About the author

shekhar patil

Leave a Comment