Featured विज्ञान-तंत्रज्ञान

‘थर’थराट खेळ !

Written by shekhar patil

काही दिवसांपुर्वीच मुंबईतल्या व्याख्यानात मी ‘ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटी’बद्दल थोडे विवेचन केले होते. यात स्मार्टफोनच्या मदतीने वास्तवाला कल्पनेचे पंख कसे लावता येतील? याचा उहापोहदेखील केला होता. आता गमतीची बाब म्हणजे काही दिवसांतच हा प्रकार सोशल मीडियात एका अ‍ॅपच्या निमित्ताने चर्वण केला जात आहे.

सध्या सोशल मीडियात दोन हजार आणि पाचशेच्या नवीन नोटांना स्कॅन केल्यानंतर नरेंद्र मोदी यांचे नोटाबंदीची घोषणा करतांनाचे भाषण पाहता येत असल्याचे वृत्त लक्षवेधी ठरले आहे. हे फेक असल्यापासून ते याच्या वैधतेबाबत प्रश्‍न निर्माण करण्यात येत आहेत. तर काहींना हा प्रकार भलताच चित्तथरारक वाटत असून यात नोटमध्येच काही तरी आहे की काय? याबाबत चर्चा सुरू आहे. एका विख्यात इंग्रजी वर्तमानपत्राने तर पुन्हा एकदा या नोटमध्ये ‘चीप’ असल्याचे ठोकून दिले आहे. खरं तर मित्रांनो हा तंत्रज्ञानाचा अगदी साधा-सोपा खेळ आहे. मात्र हे समजून घेण्याआधी यामागील तंत्रज्ञानाबद्दल प्राथमिक माहिती मिळवणे आवश्यक आहे.

आपल्यापैकी काही जणांनी फोटोशॉपसह अन्य फोटो एडिटींग अथवा पिनॅकल स्टुडिओसह अन्य व्हिडीओ एडिटींग सॉफ्टवेअर्स वापरले असतील. ज्यांनी याचा कधीही वापर केला नाही अथवा नियमित वापर करूनही याची मुख्य संकल्पना लक्षात घेतली नाही त्यांच्यासाठी ही सर्वप्रथम ही माहिती सुलभ पध्दतीने सांगण्याचा मी प्रयत्न करतो. तर महत्वाचा मुद्दा समजून घ्या की हा सर्व ‘लेअर्स’ म्हणजेच थरांचा खेळ आहे. एखादी प्रतिमा ‘एडिट’ करण्यात येते तेव्हा खरं तर मूळ फोटो हा अगदी जसाचा तसा कायम असतो. मात्र यावर विविध थरांमध्ये संपादनाचे काम केले जाते. उदाहरणार्थ समजा- मूळ प्रतिमेत एखाद्या व्यक्तीला मिशा असून त्या एका थरामध्ये काढल्या तर दुसर्‍या थरामध्ये त्याचे मूळचे केस काळे असल्यास ते सोनेरी करण्यात आले. बाजूने पाहिले असता ही प्रतिमा-मूळ फोटो, पहिला लेअर (मिशा काढलेला) आणि दुसरा लेअर (केस सोनेरी केलेला) अशा तीन थरांमध्ये आपल्याला दिसून येते. मात्र समोरून ही प्रतिमा पाहिली असता मूळ प्रतिमेतील व्यक्तीच्या मिशा काढलेल्या असून त्या माणसाचे केस सोनेरी झालेले दिसतात. हा एक प्रकारचा दृष्टीभ्रम असतो. खरं तर फोटो अगदी जसाचा तसाच असतो. मात्र त्यावरील थर बदललेले असतात. यानंतर हे सर्व थर एकमेकांमध्ये मिक्स करून नवीन प्रतिमा तयार होते. त्यात अर्थातच आधीच्या प्रतिमेत बदल झालेला असतो. याच पध्दतीने व्हिडीओ एडिटींग करतांना मूळ व्हिज्युअल्सवर विविध थरांमध्ये शीर्षक, उपशीर्षक, विविध इफेक्ट टाकण्यात येतात. यानंतर आधी नमुद केलेल्या पध्दतीनुसार समोरून हा व्हिडीओ पाहिल्यास सगळे काही हव्या त्या पध्दतीने बदललेले दिसून येते. याच पध्दतीने विविध ‘लेअर्स’वर अचूक पध्दतीने संपादन करून वास्तवाला भन्नाट पध्दतीने कल्पनेचे पंख लावणे शक्य आहे.

आता मूळ मुद्दा:- सध्या सोशल मीडियात गाजत असलेले ‘मोदी कि-नोट अ‍ॅप’ (https://goo.gl/fvD3m8) हे विस्तारीत सत्यता म्हणजेच ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटी अ‍ॅप आहे. यात स्मार्टफोनच्या कॅमेर्‍याच्या मदतीने विशिष्ट वस्तू, आकार, प्रतिमा आदी स्कॅन केल्यानंतर स्क्रीनवर हवा तो इफेक्ट आणता येतो. ‘मोदी कि-नोट अ‍ॅप’मध्ये पाचशे आणि दोन हजार रूपयांच्या नवीन नोटेवरील अंतराळयानाचे छायाचित्र स्कॅन करण्यासाठी मूळ प्रतिमा म्हणून सेव्ह करण्यात आले आहे. तर दुसरीकडे स्मार्टफोनच्या लेयरमध्ये याला नरेंद्र मोदी हे नोटबंदीचे भाषण करत असलेल्या व्हिडीओची जोड देण्यात आली आहे. आता ही प्रक्रिया पुन्हा एकदा समजून घ्या:- आपण स्मार्टफोन सुरू करतो…संबंधीत अ‍ॅप ओपन केल्यावर कॅमेराही सुरू होतो….नोटवरून स्मार्टफोन फिरवला जातो…आणि वास्तव आणि आभासी जगाला जोडणारी कुंजी अर्थात नोटेवरील प्रतिमा एकदा का व्हेरिफाय झाली की थेट आपण अ‍ॅपमध्ये इनबिल्ट अवस्थेत असणार्‍या व्हिडीओवर ‘रिडायरेक्ट’ होतो. म्हणजे या ठिकाणी पाचशे वा दोन हजाराची नवीन नोट संबंधीत व्हिडीओ ओपन करण्यासाठी जणू एखाद्या ‘पासवर्ड’चे काम करते. काही दिवसांपूर्वीच मी ‘क्युआर-कोड’च्या माध्यमातून ‘दैनिक जनशक्ति’मध्ये मी करत असलेल्या प्रयोगांची माहिती दिली होती. तेथे ‘क्युआर कोड’ हा सत्य आणि आभासी जगताला जोडणारा सेतू होता तर ‘मोदी कि-नोट अ‍ॅप’मध्ये हेच काम पाचशे आणि दोन हजारांची नवीन नोट करतेय इतकेच !

म्हणजेच लक्षात घ्या:- ‘मोदी कि-नोट अ‍ॅप’ हा तंत्रज्ञानाचा एक किरकोळ खेळ आहे. यामागे ना कोणती ‘चीप’ आहे ना केंद्र सरकारची उच्च तंत्रज्ञानयुक्त एखादी ट्रिक ! या पध्दतीने कुणीही (हो कुणीही) सहजसोपी ट्रिक करू शकतात. अगदी तुमच्या मुलाच्या फोटोवरून स्मार्टफोनचा कॅमेरा फिरवल्यानंतर त्याचा आवाज वा त्याला आवडणारे गाणे/व्हिडीओ आपोआप सुरू होऊ शकतो. अगदी नवीन पाचशे वा दोन हजार रूपयांची नोट स्कॅन केल्यानंतर केंद्र सरकारला शिव्या-शाप देणार्‍या जनतेचा व्हिडीओदेखील आपोआप सुरू होऊ शकतो. यासाठी अनेक टुल्स उपलब्ध आहेत. याबाबत कधीतरी! मात्र सध्या तरी ‘मोदी कि-नोट अ‍ॅप’ हे फार काही भलतेच अफलातून तंत्रज्ञान असल्याचा समज मनातून काढून टाका. एक ‘हायटेक’ गंमत म्हणून याकडे पहा. खुद्द अ‍ॅपच्या निर्मार्त्यांनीही हे एक ‘प्रँक अ‍ॅप’ असल्याचे आधीच नमुद केले आहे. मात्र ‘भक्त ’आणि विरोधक या दोन्ही बाजूची मंडळी यामुळे डोक्याला उगाचच ताण देत आहेत. याला काय म्हणणार ?

About the author

shekhar patil

Leave a Comment