चालू घडामोडी चित्रपट

…त्यांना उत्तर हवेय !

प्रचंड प्रमाणात लिंगभेद असणार्‍या समाजात महिलांची होणारी कुचंबणा तसेच आपले तेच खरे असे मानणार्‍या हेकेखोर मीडियाला दीपिका पदुकोणनंतर कथित सेक्स स्कँडलमध्ये अडकलेल्या श्‍वेता बासू हिने जोरदार चपराक दिली हे बरे झाले.

प्रचंड प्रमाणात लिंगभेद असणार्‍या समाजात महिलांची होणारी कुचंबणा तसेच आपले तेच खरे असे मानणार्‍या हेकेखोर मीडियाला दीपिका पदुकोणनंतर कथित सेक्स स्कँडलमध्ये अडकलेल्या श्‍वेता बासू हिने जोरदार चपराक दिली हे बरे झाले. अर्थात त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नावर सर्वांनी अंतर्मुख होण्याची आवश्यकता आहे.

साधारणत: देशभरात अनेक हाय प्रोफाईल देहविक्रयाचे रॅकेट उघडकीस येत असतात. यात अनेक नवोदित मॉडेल्स व अभिनेत्रींपासून ते यशस्वी कलावंतांचाही समावेश असल्याचे उघडकीस येते. यामुळे थोडा वेळ खळबळ उडते. नंतर मात्र सारे काही शांत होते. कुणी कितीही शुचितेचा आव आणला तरी देहविक्रयाचा व्यवसाय हा समाजजीवनाचा एक भाग आहे हे मान्य करावेच लागेल. विशेषत: लैंगिकतेचा निचरा होण्यासाठी ही एक सामाजिक गरज आहे. ९९ टक्के महिला सुरक्षित हव्या असतील तर एक टक्का महिलांना देहविक्रय करावा लागणार ही निकडही आपण लक्षात घ्यायला हवी. अर्थात सामूहिक जगण्याला ही गरज भासतच नसल्याचा आव आणत आपण पांढरपेक्षा नजरेतून या सर्व प्रकाराने पाहतो. प्रसारमाध्यमांकडेही जवळपास हाच चष्मा आहे. यामुळे अमुक-तमुक महिला व्यवसाय करते वा अमका भाग बदनाम वस्ती आहे ही आपल्यासाठी हेटाळणीयुक्त औत्युक्याची बाब बनते. अनेक ठिकाणी देहविक्रयाच्या व्यवसायावर धाडी पडतात तेव्हा समाजाची लचके तोडणारी नजर ही त्यात पकडल्या जाणार्‍या महिलांवरच असते. एखाद्या रॅकेटमध्ये हाय प्रोफाईल मॉडेल पकडली जाते तेव्हा तिच्याकडी जाणारी बडी धेंडे मात्र साळसुदपणे समाजात वावरत असतात. देहविक्री करणार्‍या महिला जर अपराध करत असतील तर त्यांच्याकडे जाणारे पुरूष नक्कीच पुण्याचे काम करत नाहीत. मात्र समाजाची याकडे पाहण्याची भुमिका ही दुटप्पी अशीच आहे. श्‍वेता बासू हिच्या प्रकरणातही नेमका हाच प्रकार घडला आहे.

श्‍वेता बासू ही ‘मकडी’ या चित्रपटातील बाल भुमिकेमुळे प्रकाशझोतात आली होती. तिला अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. यानंतर तिने इकबाल चित्रपटातील सहभुमिकेसह काही तेलगू चित्रपटांमध्ये काम केले तरी तिची कारकीर्द अजून बहरली नव्हती. यातच ऑगस्ट महिन्यात हैदराबाद येथील एका हॉटेलमध्ये ती कथितरित्या काही व्यापार्‍यांसोबत आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आली. लागलीच नॅशनल मीडियात ही बातमी झाली. झाले…मग सत्यस्थिती समोर येईपर्यंत तिचे यथेच्छ चारित्र्यहनन करण्यात आले. यात अगदी तिने कुटुंबाचे पालन-पोषण करण्यासाठी देहविक्रीच्या व्यवसायाची कबुली दिल्यापासून ते ती लवकरच तिच्याकडे येणार्‍या बड्या ग्राहकांची यादी पोलिसांना देणार याबाबतच्या बातम्या मीडियातून झळकल्या. दरम्यान, श्‍वेता बासू हिला हैदराबाद येथील महिला सुधारगृहात ठेवण्यात आले. नंतर न्यायालयाने तिला महिला सुधारगृहातून सोडण्याचे आदेश दिले. यानुसार तब्बल ५९ दिवसानंतर ती ३० ऑक्टोबर रोजी घरी पोहचली. प्रसारमाध्यमांनी केलेली नालस्ती पाहून तिला धक्का बसला. यानंतर तिचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात आला. ५ डिसेंबर रोजी हैदराबाद येथील न्यायालयाने तिची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. यानंतर मात्र शांत न बसता तिने काल देशातील प्रसारमाध्यमांच्या नावे एक पत्र जारी करून मीडियाला निरूत्तर करणारे काही प्रश्‍न विचारले आहेत.

आपल्या या खुल्या पत्रात श्‍वेताने म्हटले आहे की, ‘‘बालपणापासून मी अनेक पत्रकारांची फॅन होती. पत्रकार वेळप्रसंगी आपला जीव धोक्यात टाकून युध्दभुमीवर, दहशतवादी हल्ल्यात व नैसर्गिक आपत्तीतूनही समाजाला खरी माहिती देण्याचे काम करतात. याचमुळे मीदेखील पत्रकारितेची पदवी संपादन केली. मात्र माझ्या प्रकरणात पत्रकारांनी बजावलेली भुमिका ही अत्यंत धक्कादायक होती. मला माझ्या कुटुंबाचे पालन-पोषण करण्यासाठी कोणताही मार्ग न उरल्याने काही जणांनी वेश्यावृत्तीत ढकलले आणि माझ्यासारख्या अनेक अभिनेत्री या व्यवसायात असल्याचा तद्दन खोटा जबाब माझ्या नावावर खपविण्यात आला. सुदैवाने माझे कुटुंब, आप्तजन आणि मित्रमंडळीचा यावर विश्‍वास बसला नाही. मात्र मुर्खासारख्या सिगरेटी ओढत ऐशीच्या दशकातील एखाद्या बॉलिवुडच्या चित्रपटासमान खोट्या बातम्या लिहणार्‍यांनी पत्रकारितेची बाराखडी गिरवायला हवी’’ असा टोला तिने मारला आहे. ‘‘हैदराबाद पोलिसांनी कोणत्याही स्वरूपाची ‘प्रेस नोट’ जारी न करतांनाही आपला कथित जबाब प्रसारमाध्यमांमधून आलाच कसा? आणि मीडियाने म्हटल्याप्रमाणे मी जर जबाब दिला असेल तर माझ्याशी कथितरित्या शय्यासोबत केलेल्या बड्या मंडळींची नावे शोधून दाखवा’’ असे तिने सरळ आव्हान दिले आहे. यानंतर तिने लांबलचक पत्रातून आपण हे सर्व मागे सोडून सुखाने आयुष्य जगणार असल्याचा आशावाद व्यक्त केला आहे.

मुळातच आपल्या समाजात लिंगभेद मोठ्या प्रमाणात आहे. महिलांच्या वागण्यावर काटेकोर निर्बंध असले तरी पुरूषांना मात्र सर्व काही सुट आहे. यामुळे मुलींना जीन्स आणि मोबाईल बंदी करणार्‍या पंचायती याच कारणामुळे मुले बिघडतील तरी त्यांच्यावर निर्बंध लादत नाहीच. म्हणजे बिघडतात फक्त मुलीच…मुलांचा तर तो हक्कच आहे अशा स्वरूपाची आपली दुटप्पी भुमिका आहे. भयंकर बाब म्हणजे मीडियातल्या एका मोठ्या घटकाचीही हीच प्रवृत्ती आहे. श्‍वेता बासू हिचे प्रकरण घडण्याआधी विख्यात अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्याबाबतही असलाच प्रकार घडला होता. एका जुन्या छायाचित्रात दीपिकाच्या गळ्याखालील भाग उघड झाल्याचे भांडवल करत एका इंग्रजी वृत्तपत्राने जणू काय मोठा गौप्यस्फोट केल्याचा आव आणत हे प्रकरण मिटक्या मारत जगासमोर आणले होते. दिपिकाने यावर गप्प न बसता ‘होय मी स्त्री आहे…मलाही स्तन आहेत…मात्र तुम्हाला याची काय अडचण?’ असे फटकावले होते. स्त्रीला शरिराच्या पलीकडे न पाहणार्‍या मानसिकतेवरील हा घणाघात खूप गाजला होता. या निर्लज्ज कृतीवर तेव्हा अनेक जण तुटून पडले होते. त्या वर्तमानपत्राला हे वृत्त मागे घ्यावे लागले होते. त्यावेळी दीपिकाने असेच एक पत्र जारी करून प्रसारमाध्यमांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले होते. ‘‘पडद्यावरील जीवन आणि प्रत्यक्षातील जीवनातील अंतर मीडियाने समजून घ्यायला हवे. पडद्यावर नायकाचे ‘सिक्स आणि एट पॅक्स’ पाहणारा आपला समाज पडद्याबाहेर त्या हिरोच्या अंतर्वस्त्राला झुम करून पाहत नाही मग महिलांच्याच वाट्याला हे का?’’ असा प्रश्‍न तिने विचारला होता. कुणी तिच्या प्रश्‍नाला उत्तर दिले नाही. आता श्‍वेता बासू हिच्या प्रश्‍नावरही आहे कुणाकडे उत्तर ?

deepika_shveta

About the author

shekhar patil

2 Comments

  • शेखर जी अंतर्मुख करनारा लेख आ
    पण लिहिला आहे.अभिनन्दन .अभ्यासपूर्ण लेख.आपणास अनंत शुभेच्छा….

Leave a Comment