विज्ञान-तंत्रज्ञान

तीन शब्दात पत्ता: एक अफलातून फंडा !

Written by shekhar patil

तंत्रज्ञानाने आपले जीवन आमूलाग्र बदलून टाकले आहे. प्रत्येक क्षणाला यात काही तरी नवीन घडत आहे. अशाच एका नाविन्याचा ध्यास घेतलेल्या कंपनीने संपुर्ण जगातील कोणत्याही कान्याकोपर्‍याला अवघ्या तीन शब्दांच्या पत्त्यामध्ये अचूकपणे व्यक्त करण्याची प्रणाली विकसित केली आहे. काय आहे हे तंत्रज्ञान? याचा दैनंदिन जीवनात काय उपयोग होणार? आपण यातील एखादा पत्ता ‘खरेदी’ करू शकणार का? या सर्व बाबींचा उहापोह करणारा हा लेख.

प्राचीन काळापासून मानवाला कोणत्याही भौगौलिक वा मानवनिर्मित ठिकाणाला अचूकपणे व्यक्त करण्याची आवश्यकता भासत आहे. यातूनच ‘पत्ता’ उदयास आला. बहुतांश प्राचीन संस्कृत्यांचा उगम हा नदी वा अन्य जलसाठ्यांजवळ झालेला असल्याचे उघड आहे. अर्थात एखादे गाव वा नगर हे अमुक-तमुक नदीच्या काठावर वसले असल्याचा उल्लेख हजारो वर्षांपासून प्रचलित आहे. याशिवाय एखाद्या डोंगरावर वा दरीत तसेच अन्य महत्वाच्या भौगोलिक खुणांच्या आधारे प्राचीन काळापासून गावांची ओळख पक्की झाली आहे. यातूनच नकाशाशास्त्र विकसित झाले. अलीकडच्या काळात तर उपग्रहीय छायाचित्रे, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम आदी अत्याधुनिक प्रणालींच्या मदतीने अगदी अचूकपणे कोणतेही ठिकाण शोधता येते.

पत्त्यांच्या विकासातील महत्वाचे टप्पे आपण अगदी सुलभपणे समजू शकतो. आता मी जळगावातल्या अयोध्यानगरात राहतो. हा शहराचा नव्याने विकसित झालेला भाग आहे. याच्या विविध भागांना अगदी ‘युनिक’ असे पत्ते आहेत. मात्र काही वर्षांपुर्वी माझ्या घराचे ठिकाण हे जळगावनजीकच्या मेहरूण या गावच्या शिवारातील अमुक-तमुक गट क्रमांकाच्या प्लॉटमध्ये असल्याचे सांगण्यात आले असते. तर त्याआधी हे ठिकाण एखाद्या विशिष्ट क्रमांकाच्या शेताचा भाग असते. आज माझे घर हे जळगाव शहरातील अयोध्यानगरातल्या गणपती मंदिराजवळ अमुक-तमुक ठिकाणी असल्याचे मी सांगू शकतो. माझ्या घरी पोस्ट वा कुरियर अचूकपणे यावे म्हणून मी इमारतीच्या नावासह पीनकोड क्रमांक टाकतो. कुणी बाहेर गावावरून माझ्याकडे येत असल्यास मुंबई-नागपुर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाला (आशियाई महामार्ग क्रमांक ४६) लागून असणार्‍या जळगावातल्या अमुक-तमुक भागात इथे-तिथे राहतो असे सहजपणे सांगू शकतो. यातील कुणी टेक्नोसॅव्ही असल्यास त्याला माझ्या घराचा अचूक पत्ता असणारा नकाशा शेअर केल्यानंतर तो माझ्या घरी अचूकपणे पोहचू शकेल. तर स्मार्टफोन वा कारच्या नेव्हिगेशन प्रणालीच्या मदतीनेही कुणीही अचूकपणे माझ्या घरी येईल. तसेच मी राहत असलेल्या इमारतीचा ‘एरियल व्ह्यू’ देखील पाठवू शकतो. अगदी प्राचीन काळ तर जाऊ द्या…पण गेल्या काही दशकांमध्ये पत्ता देण्याच्या प्रणालीत झालेले बदल लक्षात घ्या. एखाद्या खुर्द वा बुद्रुक गावातील एखादे मंदिर, शाळा, रस्ता, ग्रामपंचायत आदी वैशिष्टपुर्ण स्थानाच्या आधारे गावात पत्ते अस्तित्वात आहेत. (काही जणांचे नाव पंचक्रोशीत परिचित असल्यास त्याला याची गरजदेखील पडत नाही. उदा. गावातील सरपंच वा एखादा विख्यात व्यक्ती !) तर शहरे आणि महानगरांमध्ये याचसोबत संबंधीत भागाचा पीनकोड, विशिष्ट नावांचे रस्ते, इमारतींची नावे, घरांचे क्रमांक, वैशिष्टपुर्ण भौगोलिक वा मानवनिर्मित ठिकाणे आदींचा उपयोग करण्यात येतो. याचसोबत आता वर नमुद केल्याप्रमाणे उपग्रहीय छायाचित्रे आणि जीपीएस प्रणाली अस्तित्वात आली आहे. याचा विचार करता आपण पारंपरिक आणि आधुनिक पत्त्यांचा संगम असणार्‍या कालखंडात जगतोय असे म्हटल्यास फारसे वावगे ठरणार नाही. या पार्श्‍वभुमिवर आगामी काळात पत्त्यांच्या प्रणालीत नेमकी काय सुधारणा होईल? हे कुणीही अचूकपणे सांगू शकणार नाही. मात्र ब्रिटनमधील एका कंपनीने संपुर्ण जगाला वरदान ठरणारी एक अत्यंत अचूक, नाविन्यपुर्ण, अफलातून आणि अर्थातच परिणामकारक प्रणाली विकसित केली आहे. याचे नाव आहे…‘व्हाट३वर्डस’ !

अक्षांश-रेखांश उपयुक्त असले तरी….

जगभरात सध्या नकाशाशास्त्रात प्रचंड संशोधन सुरू आहे. यातील सर्वात अत्याधुनिक आणि आधुनिक प्रणाली म्हणजेच जीपीएस होय. पृथ्वीवरील कोणत्याही भागाला अक्षांश आणि रेखांशमध्ये अगदी अचूकपणे नमुद करता येते. आता हा लेख लिहतांना मी बसलेल्या ठिकाणाचे ‘युनिक’ अक्षांक्ष-रेखांश आहे. मी उठून दुसर्‍या खोलीत गेल्यास लागलीच हे बदलतील. म्हणजेच आजच्या घडीला जगातील कोणत्याही ठिकाणाला अक्षांक्ष-रेखांशच्या माध्यमातून अगदी अचूकपणे दर्शविणे शक्य आहे. आज बहुतांश स्मार्टफोनमध्ये जीपीएसची सुविधा देण्यात आली आहे. याचसोबत स्मार्टवॉच व अन्य उपकरणे तसेच वाहनांमध्येही जीपीएस आहे. जगाच्या इतिहासात प्रथमच इतक्या लोकांजवळ अचूक स्थान दर्शविणारी उपकरणे असली तरी याच्या मर्यादादेखील आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. जीपीएस उपकरणाद्वारे आपल्याला समजणारे अक्षांश-रेखांश हे लांबलचक आकडे अथवा क्लिष्ट ‘डीएमएस’ (डिग्री, मिनिट, सेकंद) या दोन माध्यमातून व्यक्त केले जातात. ते लक्षात ठेवणे फारसे सोपे नसते. (उदा. दैनिक जनशक्तिच्या जळगाव कार्यालयाचे अक्षांश व रेखांश अनुक्रमे 21.013188 & 75.565663 असे तर ‘डीएमएस’ प्रणालीत 21°00’47.5″N & 75°33’56.4″E असे आहेत.) आता याला ‘पत्ता’ म्हणून कुणाला दिले तर कुणीही आधुनिक उपकरणांच्या सहाय्याने आमचे ऑफिस अचूकपणे शोधू शकेल. मात्र ही १६ अक्षरे कुणी लक्षात ठेवू शकणार नाही. आणि ते दुसर्‍यांना देतांना विचीत्रदेखील वाटतील. नेमकी हीच बाब लक्षात घेत ‘व्हाटस३वर्ड’ ही संकल्पना अस्तित्वात आली आहे.

‘व्हाट३वर्डस’ आहे तरी काय?

क्रिस शेल्ड्रिक व जॅक वॅले-कोहेन यांनी २०१३ साली ‘व्हाट३वर्डस’ या कंपनीची स्थापना केली. यात त्यांनी सुलभ पण अत्यंत नाविन्यपुर्ण संकल्पनेला जगासमोर आणले. त्यांनी पृथ्वीच्या संपुर्ण क्षेत्रफळाला ( भुमि, महासागर/सागर, सर्व पर्वत आणि दोन्ही धु्रवांसह) ३ बाय ३ मीटर इतक्या क्षेत्राच्या ५७ ट्रिलियन (एक ट्रिलियन म्हणजे १ लाख कोटी !) म्हणजेच तब्बल ५७,०००,०००,०००,०००,००० इतक्या चौरसाकार ठोकळ्यांमध्ये विभाजीत केले. यातील प्रत्येक ठोकळ्याला त्यांनी स्वतंत्र आणि सुलभ ओळख प्रदान केली. यात या प्रत्येक ठोकळ्याला फक्त तीन शब्दांचे नाव देण्यात आले आहे. आता ५७ ट्रिलियन ठोकळ्यांना स्वतंत्र ओळख देणे सोपे नाही. मात्र यासाठी विशिष्ट संगणकीय अलॉगरिदम वापरण्यात आला. याच्या मदतीने जगाच्या अगदी कान्याकोपर्‍यातील ३ बाय ३ चौरस आकाराच्या क्षेत्राला आता स्वतंत्र ओळख मिळणे शक्य झाले आहे. आणि हे तीन शब्द इंग्रजीसह जगातील नऊ भाषांमधील नियमित वापरातील असल्याने त्यांना लक्षात ठेवणेदेखील अगदी सोपे आहे. यामुळे मी वर नमुद केल्याप्रमाणे माझ्या कार्यालयाचा जीपीएसने दिलेला क्रमांक लक्षात ठेवण्याऐवजी तीन शब्द लक्षात ठेवणे केव्हाही सोपे! ‘व्हाट३वर्ड’च्या वेबसाईटवर जगातील कोणत्याही भागाचा या पध्दतीने पत्ता शोधणे सोपे आहे. आपणही हे काम सहजगत्या करू शकतात. (व्हाट३वर्डस प्रणालीची थोडक्यात माहिती आपण खालील व्हिडीओत आपण पाहू शकतात. )

या प्रणालीचे लाभ

जगातील प्रत्येक व्यक्तीचा ‘डीएनए’ अथवा त्याच्या बोटांचे ठसे हे एकमेवाद्वितीय असतात. याच पध्दतीने जगातील कोणत्याही ठिकाणाला ( ३ बाय ३ मीटर) अगदी सुलभपणे तीन शब्दांत ‘युनिक’ क्रमांक देण्याची ही प्रणाली आहे. एका अध्ययनानुसार जगातील तब्बल चार अब्ज लोकांना अचूक भौगोलिक ओळख मिळालेली नाही. यामुळे अगदी पोस्टसेवेपासून ते विविध लोकल्याणकारी योजनांचे लाभ, आपत्तीत मदत पोहचवणे आदी जिकरीचे होते. यामुळे ‘व्हाट३वर्ड’चा वापर करून प्रत्येक जण आपापल्या वास्तव्याचे अचूक भौगोलिक ठिकाण जगाला सांगू शकेल. अनेकदा विदेशात फिरतांना पर्यटकांना अडचणी येतात. त्यांना या प्रणालीचा लाभ होऊ शकतो. याशिवाय, अचूकपणे वस्तू वा पार्सल पोहचवण्यासाठी डाक खात्यासह ई-कॉमर्स कंपन्यांना याचा लाभ होईल. एखाद्या भौगोलिक ठिकाणावर जाण्यासाठीचा मार्ग यातून शोधता येईल. यातून जगातील कोणत्याही भागावर पोहचण्यासाठीचे ‘नेव्हिगेशन’ खूप सोपे होणार आहे. एखाद्या अपरिचित ठिकाणाचे भौगौलिक नाव आपल्याला माहित नसले तरी या पध्दतीने तीन शब्दातल्या पत्त्याने आपले काम सुलभ होईल. आता उरला प्रश्‍न इमारतींचा. म्हणजे जगातली अनेक शहरे आणि महानगरांमध्ये उंचच उंच इमारती आहेत. यामुळे त्यांना पत्ता शोधण्यासाठीही ही प्रणाली उपयुक्त आहे. म्हणजे ‘जनशक्ति’च्या कार्यालयाच्या खाली अथवा वर असणार्‍या कार्यालयांनी आमचाच तीन शब्दातील पत्ता टाकून स्वत:चे नाव टाकले तरी पुरे ! म्हणजे त्या भौगोलिक ठिकाणावरील अन्य पत्त्यांचाही प्रश्‍न मिटला. यामुळे गगनचुंबी इमारतींमध्येही या प्रणालीचा उपयोग करता येईल.

या प्रणालीत कोणत्याही ३ बाय ३ मीटर इतक्या भागाला पत्ता देण्यात येतो.

या प्रणालीत कोणत्याही ३ बाय ३ मीटर इतक्या भागाला पत्ता देण्यात येतो.

बहुभाषिक सपोर्ट

‘व्हाट३वर्डस’ या प्रणालीतील मुख्य भाषा इंग्रजी आहे. या भाषेतील ४० हजार शब्दांचा उपयोग करून पृथ्वीवरील सर्वच्या सर्व म्हणजे ५७ ट्रिलियन पत्ते तयार केले आहेत. तर फ्रेंच, स्पॅनिश, रशियन, पोर्तुगीज, स्वाहिली, जर्मन, तुर्कीश व स्वीडीश या अन्य भाषांमधील २५ हजार शब्दांच्या उपयोग करून फक्त जमीनीवरील पत्ते तयार करण्यात आले आहेत. सध्या नऊ भाषांमध्ये हे पत्ते उपलब्ध असले तरी ‘व्हाट३वर्डस’ आपल्या प्रणालीसाठी अन्य भाषांचा सपोर्टदेखील देणार आहे. यामुळे आगामी काळात ही प्रणाली हिंदी वा मराठीत आल्यास नवल नको. या कंपनीचा संगणकीय प्रोग्रॅम प्रत्येक पत्त्याला स्वयंचलित पध्दतीने दुसर्‍या भाषेत भाषांतरीत करतो. अर्थात या सर्व भाषांमध्ये हा पत्ता ‘युनिक’च असतो. ‘व्हाट३वर्डस’ कंपनीने आपल्या प्रणालीचा ‘एपीआय’ (ऍप्लीकेशन प्रोग्रॅमिंग इंटरफेस) हा अन्य डेव्हलपर्ससाठी खुला केला आहे. याच्या मदतीने कुणीही स्मार्टफोन ऍप्लीकेशन्स तयार करू शकतो. सर्वात महत्वाची बाब म्हणजे जगभरातील ५७ ट्रिलियन पत्त्यांचा डाटाबेस अवघ्या दहा मेगाबाईट इतक्या अल्प स्टोअरेजमध्ये सामावणारा आहे. ही माहिती ऍपच्या माध्यमातून डाऊनलोड करून कुणीही याचा ऑफलाईन उपयोगही करू शकतो. म्हणजेच इंटरनेटची कनेक्टिव्हिटी नसली तरीही या पध्दतीने जगातील कोणताही पत्ता शोधणे शक्य आहे. याचप्रमाणे हा पत्ता कुणालाही शेअर करण्याची सुविधादेखील प्रदान करण्यात आली आहे.

‘व्हाट३वर्डस’ची ही सेवा ‘कस्टमाईज्ड’ करणेदेखील शक्य आहे. मी वर नमुद केल्यानुसार ‘व्हाट३वर्डस’ प्रणालीचा उपयोग केला असता ‘दैनिक जनशक्ति’च्या जळगाव कार्यालयाचा तीन शब्दातील पत्ता graces.mulberry.nickel हा आहे. आता आम्हाला यापेक्षा अधिक सुलभ आणि सहज लक्षात ठेवण्याजोगा dainik.janshakti.jalgaon असा पत्ता पाहिजे असल्यास तोदेखील या कंपनीकडे नोंदणी करून मिळू शकेल. ( आधी प्रचलित असणार्‍या ‘पोस्ट बॉक्स क्रमांक’ वा टेलिग्राम कोड या सेवा याच पध्दतीने मिळत होत्या!) यासाठी अत्यंत अल्प म्हणजे वर्षाला दीड-दोन डॉलर्स इतकी आकारणी करण्यात येणार आहे. सायबरविश्‍वात ‘डोमेन नेम’चे जितके महत्व आहे तितकेच आगामी काळात जिओटॅगिंगसाठी ‘व्हाट३वर्डस’च्या तीन शब्दांच्या पत्त्याचे राहू शकते असा अनेक तज्ज्ञांनी दावा केला आहे. म्हणजेच यातून या कंपनीला व्यवसायाचीही उत्तम संधी आहेच.

याच्या मदतीने अगदी महासागरातील भागालाही पत्ता मिळाला आहे.

याच्या मदतीने अगदी महासागरातील भागालाही पत्ता मिळाला आहे.

याचे भविष्य काय?

‘व्हाट३वर्डस’ प्रणाली २०१३ साली सादर करण्यात आल्यानंतरच टेक्नोवर्ल्डमधील जाणकारांची उत्सुकता चाळवली होती. लागलीच यात गुंतवणुकीचा ओघ वाढला. अलीकडेच अरामॅक्स या कंपनीने ‘व्हाट३वर्डस’ प्रणालीचा अंगिकार करत यामध्ये गुंतवणूक केली आहे. याशिवाय अनेक कंपन्यांनी या प्रणालीचा वापर केला आहे. यात प्रामुख्याने लॉजिस्टीक कंपन्यांचा समावेश आहे. मंगोलिया सरकारने तर आपल्या संपुर्ण देशासाठी या तीन शब्दांच्या पत्त्यांचा अंगिकार केला आहे. आगामी काळात बहुतांश ‘स्मार्ट’ उपकरणांमध्ये जीपीएसचा समावेश असणार हे स्पष्ट असतांना आता ‘व्हाट३वर्डस’च्या माध्यमातून याला अचूक व सुलभ तीन शब्दांच्या प्रणालीची जोड मिळाल्यास पृथ्वीवरील कोणत्याही भागाचा अचूक पत्ता शोधणे सहजशक्य होईल. ‘व्हाट३वर्डस’ हे वेबसाईट तसेच अँड्रॉईड व आयओएस स्मार्टफोन ऍप्लीकेशनच्या सहाय्याने वापरता येते. तर याच्या ‘एपीआय’चा वापर करून अनेक ऍप्लीकेशन्सदेखील तयार करण्यात आली आहेत.

ही प्रणाली वरील क्षेत्रांमध्ये उपयुक्त ठरू शकते.

ही प्रणाली वरील क्षेत्रांमध्ये उपयुक्त ठरू शकते.

(व्हाट३वर्डसच्या मदतीने आफ्रिकेत औषधी वितरण केले जात आहे.)

(मंगोलिया देशाने तर आपल्या सर्व नागरिकांना याच प्रणालीने पत्ता प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.)

सर्व छायाचित्रे ही ‘व्हाट३वर्डस’च्या सौजन्याने.

About the author

shekhar patil

Leave a Comment