क्रीडा

तन-मनाला झपाटून टाकणारे उत्सव गान

Written by shekhar patil

एखादे गाणे हे अनेक भाषांमध्ये अन् रूपांमध्येही विलक्षण लोकप्रिय ठरल्याची उदाहरणे बोटावर मोजण्याइतकी आहेत. केनान याच्या ‘वेव्हिन फ्लॅग’ या गाण्याच्या वाट्याला हे भाग्य आले आहे.

अनेक गाणी वैश्‍विक पातळीवर लोकप्रिय झालेली आहेत. तथापि एखादे गाणे हे अनेक भाषांमध्ये अन् अनेक रूपांमध्येही विलक्षण लोकप्रिय ठरल्याची उदाहरणे बोटावर मोजण्याइतकी आहेत. मुळचा सोमालियन असणारा कवि/गायक केनान याच्या ‘वेव्हिन फ्लॅग’ या गाण्याच्या वाट्याला हे भाग्य आले आहे. मला खूप आवडणार्‍या या गाण्याविषयी….

लेख वाचण्याआधी हे गाणे एकदा अनुभवा !

मला फुटबॉलची आवड असल्याने २०१०साली दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आलेल्या विश्‍वचषक स्पर्धेत हे गाणे पहिल्यांदा ऐकले तेव्हा याचा बेभान करणारा ताल थेट रोमारोमात भिनला. आजवर हे गाणे शेकडो वेळेस ऐकले, यावर नाचलोही मात्र याची धुंदी उतरण्यास तयार नाही. या गाण्याचे सर्व व्हर्शन्स अनेकदा ऐकून आणि याबाबतचे लिखाण वाचल्यानंतर बर्‍याच दिवसांपासून यावर लिहावे असा विचार करत होतो. अखेर आज तो योग जुळून आला. या एकाच गाण्याला अनेक आयाम आहेत. एकीकडे पृथ्वीतलावरील सर्वाधीक लोकप्रिय असणारा फुटबॉल. दुसरीकडे या गाण्याचा गीतकार आणि गायक केनानच्या विलक्षण संघर्षमय जीवनाचा तर तिसरा आयाम कोकोकोलाच्या कल्पक जाहीराततंत्राचा.

प्रत्येक महत्वाच्या क्रीडा स्पर्धेला विविध कंपन्या प्रायोजित करत असतात. याचा एकमेव उद्देश संबंधीत क्रीडा प्रकार आणि त्या स्पर्धेतून कंपनीला लाभ व्हावा हाच असतो. नव्वदच्या दशकापासून पेप्सीको आणि कोकोकोला या आघाडीच्या शीतपेय बनविणार्‍या कंपन्यांनी जागतिक पातळीवर अत्यंत आक्रमक मार्केटिंगची रणनिती आखल्याचे आपल्याला दिसून येते. २००६च्या विश्‍वचषकात कंपनीने अत्यंत कल्पक जाहिरातींसह काटेकोरपणे ऍड कँपेन राबविले. याचा परिणाम म्हणून कंपनीच्या विक्रीत तब्बल पाच टक्क्यांनी वाढ झाली. या पार्श्‍वभुमिवर २०१० साली दक्षिण आफ्रिकेत होणार्‍या फुटबॉलच्या विश्‍वचषकासाठी कोको-कोलाने वैश्‍विक पातळीवर अत्यंत भव्य-दिव्य कँपेन राबविण्याचे ठरविले. ही कंपनी फुटबॉल विश्‍वचषकाच्या सहा प्रमुख प्रायोजकांपैकी एक असल्याचा लाभ मिळणारच होता. यामुळे फुटबॉलची उर्जा, कोकची ‘ओपन हॅपीनेस’ ही थीम आणि आफ्रिका खंडाचा आत्मा याची सरमिसळ करून ही मोहीम सुरू करण्याचे ठरविण्यात आले. याच्या केंद्रस्थानी अर्थातच विश्‍वचषक गान (अँथेम ) असल्याने याची शोध सुरू झाला. या विश्‍वचषकाचे अधिकृत गाणे म्हणून विख्यात कोलंबियन गायिका शाकिरा हिच्या आवाजातील ‘वाका वाका’ची आधीच निवड करण्यात आली होती. मात्र यासोबत मैदानात आणि मैदानाबाहेर रसिकांना झपाटून टाकणार्‍या गाण्याचा शोध सुरू झाला. यासाठी आफ्रिकेतील असंख्य गायक, संगीतकारांना आमंत्रित करण्यात आले. मात्र ‘कोक’च्या ग्लोबल एंटरटेनमेंट मार्केटींग प्रमुख जो बेलिओटी याचे समाधान होत नव्हते. एक वेळेस गायक आफ्रिकेतला नसला तरी चालेला मात्र त्याची जीवनकथा ही प्रेरणादायी असावी अशी त्याची अट होती. मात्र अखेर त्याला केनानच्या रूपाने हवा तो हिरा गवसला. तिशीत असणारा केनान हा मुळचा सोमालियाचा व अमेरिका, कॅनडामार्गे पुन्हा अमेरिकेला स्थायिक झालेला. रॅप गायक म्हणून त्याला थोडेफार नाव होते. तसे संगीत क्षेत्रात तो नवीन नसला तरी त्याचे उमेदवारीचे दिवस संपलेले नव्हते. २००९ साली त्याचा ‘ट्रोबाडोर’ हा अल्बम कॅनडात बर्‍यापैकी प्रसिध्द झालेला होता. याच अल्बममधील ‘वेव्हिन फ्लॅग’ या गाण्याची ‘कोको-कोला’ने आपल्या अँड कँपेनसाठी निवड केली.

केनानचे हे मुळ गाणे!

२००६ सालच्या विश्‍वचषकात ‘कोक’ने एकूण १३ विविध जाहिरातींचा वापर केला होता. यासाठी ४५ दशलक्ष डॉलर्स खर्च करण्यात आले होते. २०१० साली मात्र एकाच थीमला मध्यवर्ती ठेवून जगाच्या विविध भागात जाहिरातींचा भडीमार करण्याची रणनिती ठरविण्यात आली. अर्थात ही मध्यवर्ती थीम म्हणजेच केनानचे ‘वेव्हिन फ्लॅग’ हे गाणे होते. खरं तर हे मुळ गाणे गृहयुध्दाने ग्रासलेल्या सोमाली लोकांच्या व्यथा वेदनांचे वर्णन करणारे होते. अर्थात या सर्वांवर मात करत पुढे जाण्याचा यात संदेश देण्यात आला होता. गाण्याचा मुळ गाभा कायम ठेवत ‘कोक’ने स्वत: केनान यालाच यात बदल करण्याचे सुचविले. यानुसार मुळचे काळीज पिळवटून टाकत आयुष्यात पुढे जाण्याचा संदेश देणारे तसे गंभीर भासणारे हे गाणे फुटबॉलसारख्या मर्दानी आणि खर्‍या अर्थाने रसरशीत व चैतन्यदायी खेळाचे प्रतिक बनले. वर नमुद केल्याप्रमाणे या गाण्याला दुसरा आयाम होता तो याचा गीतकार आणि गायक केनान याच्या संघर्षमय जीवनाचा. गत सुमारे २५ वर्षांपासून सोमालिया गृहयुध्दाने धुमसत आहे. ‘अल शबाब’ ही दहशतवादी संघटना इस्लामी कायदा लागू करण्यासाठी सरकारशी दोन हात करत आहे. यातून १९९१च्या सुमारास गृहयुध्द भडकले. (याचे अंगावर काटा आणणारे चित्रण आपल्याला ‘ब्लॅक हॉक डाऊन’ या हॉलिवुडपटात पहायला मिळते.) यावेळी केनान हा फक्त १३ वर्षांचा होता.

सोमालियाची राजधानी मोगादिशू या महानगरातील समुद्र किनार्‍यावर त्याचे सुंदर घर होते. तसे केनानचे घराणे सोमालियात ख्यातकिर्द होते. त्याचे आजोबा हाजी मोहंमद हे प्रसिध्द कवि होते. त्याची आई आणि काकू गायिका होत्या. यामुळे घरात गाणे-बजावण्यासह कलावंतांचा राबता होता. ख्यालीखुशालीत आयुष्य व्यतीत होत असतांना युध्द सुरू झाले अन् केनानचे भावविश्‍व उद्ध्वस्त झाले. बंदुका अन् तोफांचे कानठळ्या बसविणारे आवाज, भोवताली उसळलेली हिंसेचा आगडोंब, रस्त्यावर टायर जाळून धुडगुस घालणारा हिंसक जमाव, रस्तोरस्ती वाहणारे रक्ताचे पाट या बाबींनी तो उन्मळून पडला. अनेकदा तो मृत्युच्या मुखातून परत आला. एकदा तो आपल्या बालमित्रांसह खेळत असतांना त्यांना बटाट्यासारखा पदार्थ दिसला. खरं तर तो हातबँब होता. मात्र तो आणि त्याचे मित्र चेंडूप्रमाणे त्याचा झेल घेत खेळू लागले. यात हातबॉंबची पिन निघाली अन् केनानला आपल्या हातात बॉंब असल्याची जाणीव झाली. त्याने भेदरून बॉंब समोर असणार्‍या शाळेच्या गेटवर फेकला आणि क्षणार्धात त्याचा स्फोट झाला. दुसर्‍या एका प्रसंगात तो आणि त्याचे मित्र रस्त्यावरून जाणार्‍या चिलखती गाड्यांच्या बाजूने जात होते. या मुलांनी एका सैनिकाची टवाळी करण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतापलेल्या त्या सैनिकाने या मुलांवरच अंधाधुंद गोळीबार केला. यात केनानसोबत असणारे तिन्ही मित्र मृत्युमुखी पडले. मात्र चमत्कारिकरित्या तो बचावला तरी या घटनेने तो प्रचंड भयग्रस्त झाला. एकदा तर त्याच्या मित्राची आई आपल्या मृत मुलाचे शिर घेऊन आल्याने तो हबकला होता. या भयंकर वातावरणापासून दुर जाण्यासाठी केनानच्या आईने जिकरीचे प्रयत्न केले. मोगादिशू शहरातून अमेरिकेला जाणार्‍या शेवटच्या फ्लाईटमध्ये कसा तरी त्याच्या कुटुंबियांचा नंबर लागला. न्युयॉर्क शहरात त्याचे वडील आधीच स्थायिक झाले होते. यामुळे केनान आपली आई आणि भावंडांसह अमेरिकेला नवीन स्वप्न घेऊन गेला. प्रत्यक्षात मात्र तेथेही त्यांना समाधान मिळाले नाही.

सोमाली निर्वासितांच्या ‘घेट्टो’मध्ये केनान वाढू लागला. नवा देश, नवी भाषा, नवी संस्कृती मात्र संघर्ष जुनाच अशी त्याची स्थिती झाली. आपल्या भोवतीच्या मुलांप्रमाणेच तो अल्पवयातच गुन्हेगारीकडे ओढला गेला. त्याचे अनेक मित्र पोलिसांसोबत मारले गेले, काहींनी आत्महत्या केल्या तर काही व्यसनांनी मरण पावले. या भयंकर कालखंडात केनानला संगीताने उभारी दिली. दरम्यान, तो आपल्या आईसह कॅनडात स्थायिक झाला होता. १९९९ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका शिष्टमंडळासमोर त्याने सोमाली निर्वासितांच्या व्यथा मांडल्या. याच शिष्टमंडळात विख्यात सेनेलीज गायक युसू एन-डोर हादेखील होता. त्याने केनानमधील पाणी जोखले आणि त्याला संगीत क्षेत्रात कारकिर्द करण्यास सांगितले. यानुसार त्याने सटरफटर कार्यक्रम सुरू केले. नंतर काही अल्बमही काढले. यानंतर वर नमुद केल्याप्रमाणे ‘कोक’च्या ऍड कँपेनसाठी त्याची निवड झाली अन् या तरूणाच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

केनानने ‘वेव्हिन फ्लॅग’च्या गाण्यात बदल केला. याचे मुख्य कडवे कायम ठेवण्यात आले. इतर कडवे मात्र बदलण्यात आले. यात ‘कोको कोला’च्या जाहिरातींच्या जिंगल्सचे संगीत खुबीने पेरण्यात आले. याला ‘वेव्हिन फ्लॅग सेलिब्रेशन मिक्स’ असे नाव देण्यात आले. यानंतर महत्वाचे काम म्हणजे या गाण्याला वैश्‍विक चेहरा प्रदान करण्यासाठी इंग्रजीशिवाय अन्य भाषांमध्ये ते जाणे आवश्यक होते. यामुळे प्रारंभी इंग्रजी, स्पॅनीश, चिनी आदी महत्वाच्या सहा भाषांमध्ये याचे रूपांतर करण्यात आले. यात केनानला त्या-त्या देशातील दिग्गज गायकांसोबत काम करण्याची संधी मिळाली. यानंतर अधिकृतरित्या हे गाणे तब्बल १८ भाषांमध्ये रूपांतरीत करण्यात आले. या गाण्याची धुन आणि शब्द इतके झपाटून टाकणारे होते की ‘कोक’ने या मोहिमेसाठी तब्बल ३० कोटी डॉलर्स खर्च केले. जून २०१०मध्ये विश्‍वचषक सुरू होण्याआधी जगातील ८६ देशांमधून विश्‍वचषकाची प्रतिकृती फिरवण्यात आली. या सर्व ठिकाणी केनानच्या कॉन्सर्ट झाल्या. याला तुफान प्रतिसाद मिळाला. यातून रग्गड कमाई झाली. अर्थात ‘कोक’सोबत केनानलाही याचा वाटा मिळालाच. तब्बल २२५ दिवसांच्या जागतिक दौर्‍यानंतर ११ जून २०१० रोजी विश्‍वचषकाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात केनान जेव्हा स्टेजवर आला तेव्हा त्याला भरून आले होते. एका हातात सोमालियाचा राष्ट्रध्वज घेऊन तो ‘व्हेन आय गेट ओल्डर…आय विल बी स्ट्रॉंगर…’ म्हणू लागला तेव्हा स्टेडियमच नव्हे तर या दुरचित्रवाणीच्या माध्यमातून या कार्यक्रमाला पाहणारे कोट्यवधी लोकही थरारले. विश्‍वचषक सुरू असतांना तर हे गाणे शिखरावर होते. हा विश्‍वचषक जिंकून स्पेनचा संघ मायदेशी परतला तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी जमलेल्या पंधरा लाखांपेक्षा जास्त चाहत्यांच्या ओठांवर हेच गाणे होते तर त्यांचे पायही यावरच नाचत होते.

‘वेव्हिन फ्लॅग’च्या अलोट लोकप्रियतेचे रहस्य कुणी अचूकपणे सांगू शकणार नाही. मात्र याचे शब्द, याचे संगीत आणि चित्रीकरण या तिघांच्या मिश्रणातून फुटबॉलसारख्या पृथ्वीतलावरील सर्वाधीक लोकप्रिय खेळाच्या आत्म्याला आपण स्पर्श करत असल्याचा ‘फिल’ येतो. फुटबॉलमध्ये विलक्षण गतीसोबत लयदेखील आहे. धुसमुसळेपणा अन् नजाकतही. हा खेळ तांत्रिकही आहे अन् कलात्मकही. मानवी जीवनातील चैतन्याचे ते रसरशीत स्वरूप आहे. ते नेमके या गाण्यात प्रतिध्वनीत झाले आहे. गिटारच्या रसाळ धुनपासून सुरू झालेले हे गाणे तनामनाला झिंग आणणार्‍या आफ्रिकन ड्रमच्या माध्यमातून आपल्या अस्तित्वाचा ताबा घेते. याच्या विविध आवृत्त्यांमध्ये स्थानिक वाद्यांचा वापर करण्यात आला आहे. एका अर्थाने जगातल्या विविध भाषा आणि वाद्यांचा अफलातून मिलाफ यात झाल्याने ते वैश्‍विक गान बनले आहे. यात विलक्षण उर्जा तर आहेच पण जय, पराजयाची फिकीर न बाळगता फुटबॉलसारख्या ‘ब्युटिफुल गेम’चा मनमुराद मजा लुटण्याचा संदेशही यात देण्यात आला आहे. याचे चित्रीकरणही भन्नाट आहे. खुद्द केनान यात मुक्तपणे नाचलाय. याशिवाय वेगवेगळ्या आवृत्त्यांमधील नृत्यही भन्नाट आहे. विशेष बाब म्हणजे यात नृत्याच्या कोणत्या स्टेप्स असाव्यात यासाठी ‘कोक’ने जगभरातून लोकांना ‘गोल सेलिब्रेशन’चे व्हिडीओज आपल्या वेबसाईटवर अपलोड करण्याचे आवाहन केले होते. प्रत्यक्षात दहा लाखांहून जास्त व्हिडीओ अपलोड करण्यात आले. यातून निवडक स्टेप्स या गाण्यात टाकण्यात आल्या. तसेच या गाण्यात ‘कोक’ने आपली सिग्नेचर ट्युन ही ‘वॉटरमार्क’ म्हणूनही टाकली. म्हणजे काळजाचा ठाव घेणारे शब्द, रोमारोमात भिनणारे भिनणारे संगीत आणि याच्या जोडीला तितक्याच उच्च प्रतिच्या चित्रीकरणाने हे गाणे अजरामर झाले आहे.

आज या गाण्याच्या निर्मितीला पाच वर्षे होत असतांनाही याची लोकप्रियता अबाधित आहे. याच्या अधिकृत १८ व्हर्शनसह अनधिकृतरित्या याला शेकडो पध्दतीने रूपांतरीत करण्यात आले आहे. ‘कोक’च्या या ऍड कँपेनला तुफान प्रतिसाद मिळाला. यातून या कंपनीच्या जागतिक विक्रीत सुमारे सहा टक्के वाढ झाली. अर्थात या गाण्याने केनानचे आयुष्यदेखील बदलून टाकले. आज तो सोमालियाचा राष्ट्रीय नायक असून आफ्रिकन एकतेचा दुत म्हणून ओळखला जातो. या गाण्याच्या यशानंतर त्याने तब्बल २० वर्षानंतर मोगादिशूला भेट दिली. अर्थात तेथे अद्यापही परिस्थिती सुधरलेली नसल्यामुळे त्याला कडेकोट बंदोबस्त पुरविण्यात आला. आपल्या आवडत्या मायभुमीची अवस्था पाहून तो खिन्न झाला. आता तो यावरच नवीन अल्बमच्या तयारीला लागला आहे. अर्थात भविष्यात त्याचे कोणतेही गाणी हिट झाले नाही तरी ‘वेव्हिन फ्लॅग’ या एका गाण्याने त्याला अढळपद मिळवून दिले आहे.
(माझ्या माहितीनुसार ‘हम होंगे कामयाव एक दिन’ हे गाणे ज्यावरून घेतले आहे त्या ‘वी शाल ओव्हरकम’ या गाण्यानंतर ‘वेव्हिन फ्लॅग’ हे खर्‍या अर्थाने ग्लोबल गाणे ठरले आहे.)

‘वेव्हिन फ्लॅग’:- संपुर्ण गीत

oh,oh,oh,oh,oh,oh x2

Give me freedom, give me fire
Give me reason, take me higher
See the champions take the field now
You define us, make us feel proud

In the streets our heads are liftin’
As we lose our inhibition
Celebration, it surrounds us
Every nation, all around us

Saying forever young
Singing songs underneath the sun
Let’s rejoice in the beautiful game
And together at the end of the day, we all say

When I get older I will be stronger
They’ll call me freedom just like a wavin’ flag
When I get older I will be stronger
They’ll call me freedom just like a wavin’ flag

So wave your flag, now wave your flag
Now wave your flag

Give you freedom, give you fire
Give you reason, take you higher
See the champions take the field now
You define us, make us feel proud

In the streets our heads are liftin’
As we lose our inhibition
Celebration, it surrounds us
Every nation, all around us

Saying forever young
Singing songs underneath the sun
Let’s rejoice in the beautiful game
And together at the end of the day, we all say

When I get older I will be stronger
They’ll call me freedom just like a wavin’ flag
When I get older I will be stronger
They’ll call me freedom just like a wavin’ flag

So wave your flag, now wave your flag
Now wave your flag, now wave your flag
Now wave your flag, now wave your flag
Now wave your flag

We all say, when I get older I will be stronger
They’ll call me freedom just like a wavin’ flag
When I get older I will be stronger
They’ll call me freedom just like a wavin’ flag

So wave your flag, now wave your flag
Now wave your flag, now wave your flag
Now wave your flag, now wave your flag
Now wave your flag

And everybody will be singing it
And we all will be singing it

Spanish version

Arabic Version

Chinese Version

About the author

shekhar patil

Leave a Comment