तंत्रज्ञान

अदभूत विश्‍व ‘डिजीटल ड्रग्ज’चे…!

सुमधुर आवाजाची भुरळ न पडणारा विरळच! पावसाची रिपरिप, गर्जणारा सागर, अवखळ वार्‍याचे संगीत, पक्षांचा किलबिलाट, जलप्रपाताचा धीरगंभीर तर निर्झराचा निर्मळ आवाज आदींनी आपण भावविभोर होतो. निसर्गातील या किमयेला मानवाने संगीताच्या साच्यात बसविण्याचे प्रयत्न केले. अभिजात ते पॉप आणि लोकगीते ते संगणकीकृत संगीताचा मूळ हेतू हा मानवी मनाला स्पर्श करणे हाच असतो. मेंदूवरील संगिताच्या परिणामाविषयी मानवाला प्राचीन काळापासून ज्ञान आहे. विविध धार्मिक विधींमध्ये संगीत हा अविभाज्य घटक असतो. काही पंथांनी तर संगितातील दिव्यतेवरच मुख्य भर दिला. आधुनिक काळातील विविध प्रकारच्या मनोचिकित्सेतही याला महत्वाचे स्थान आहे. आता तर ध्वनीचा औषध व एवढेच नव्हे तर अंमली पदार्थ म्हणून विपुल प्रमाणात उपयोग करण्यात येत असल्याने दिसून येत आहे. याला ‘डिजिटल ड्रग्ज’ असे नाव देण्यात आलेले आहे. गेल्या आठवड्यात विज्ञान-तंत्रज्ञानावर लिखाण करणार्‍या जगविख्यात स्तंभलेखिका किम कोमेंदो यांनी या क्षेत्रातील अत्यंत भयावह पैलू जगासमोर आणला आहे. यामुळे ‘डिजिटल ड्रग्ज’ विषयी कुतुहलाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मानवाच्या प्रत्येक अनुभुतीशी मेंदुतील एक लहर संबंधीत असते. झोपेत असतांना मेंदू विशिष्ट फ्रिक्वन्सीवर असतो. जागृतावस्थेत वेगळी, दारू पिल्यावर भिन्न तर गहन ध्यानातही मेंदू विशिष्ट लहरींवर स्थिर झालेला असतो. यामुळे बाह्य रितीने मेंदूतल्या लहरी ‘फिक्स’ करून आपणास हवी तशी अनुभुती शक्य असल्याचे शास्त्रज्ञांच्या कधीच लक्षात आले होते. या अनुषंगाने संगीत हे परिणामकारक ठरू शकते;

छायाचित्र आंतरजालावरून साभार.

या संकल्पनेनुसार करण्यात आलेल्या संशोधनातून ‘डिजीटल ड्रग्ज’ ही संकल्पना उदयास आली. ‘डिजिटल ड्रग्ज’ समजून घेण्याआधी त्यामागील तत्वाचे आकलन होणे आवश्यक आहे. १८३९ साली जर्मन शास्त्रज्ञ हेन्रीक विल्यम डोव्ह यांनी ‘बायनॅऊरेल इफेक्ट’ शोधून काढला. मानवाच्या दोन कानांमध्ये दोन विविध वारंवारितेचे (फ्रिक्वेन्सी) ध्वनी ऐकवले असता त्यांच्यातील फरकाचा तिसरा ‘बीट’ तयार होतो. याचा मेंदूवर थेट परिणाम होत असल्याचे प्रतिपादन डोव्ह यांनी केले होते. त्या काळातील तुटपुंज्या सुविधेमुळे ते यावर सखोल संशोधन करु शकले नाही. विज्ञान जगतासाठीही हा विषय काहीसा गुढच राहिला. १९७३ साली गेरॉल्ड ओस्टर या शास्त्रज्ञाने ‘सायंटिफिक अमेरिकन’ या नियतकालिकातील आपल्या प्रबंधात या विषयाचा अत्यंत सखोल आणि व्यापक आयाम मांडताच प्रचंड खळबळ उडाली. यात त्यांनी ‘बायनॅऊरेल बीटस्’वर अतिशय सखोल असे विवेचन केले होते. त्यांनी स्टीरिओ हेडफोनच्या मदतीने दोन कानांमध्ये वेगवेगळ्या फ्रिक्वेनसीचे ध्वनी ऐकवले असता ‘बायनॅऊरेल बीटस्’ तयार होत असल्याचे दाखवून दिले. यानंतर मेंदूमध्ये ‘फ्रिक्वेन्सी फॉलोइंग रिस्पॉन्स’ या तत्वानसार प्रक्रिया घडून येत असते. या ‘बीट’नुसार मेंदूची फ्रिक्वेन्सी बदलत असल्याचेही त्यांना दिसून आले. याचा अर्थ असा की, बाह्य उपचाराने मेंदूच्या कार्यप्रणालीवर परिणाम करणे शक्य असल्याचे यातून दिसून आले. ही बाब अत्यंत महत्वाची होती. ओस्टर यांनी कंपवात (पार्किन्सन) झालेल्या एका रुग्णाला हे ध्वनी ऐकवले असता एक आठवड्यापर्यंत त्या रुग्णाला याचे आकलन झाले नाही. यानंतर मात्र त्यांच्या मेंदूने याला स्विकारले. याशिवाय त्या रुग्णावर याचे अनुकुल परिणाम झाल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले.

मानवाला होणारे ध्वनीचे आकलन आणि मेंदूची कार्यप्रणाली समल्यावर ‘बायनॅऊरेल बीटस्’ची परिणामकारकता समजू शकते. मानवाला २० हर्टझ् ते २० हजार हर्टझ् इतकी फ्रिक्वेन्सी असणारा कोणताही ध्वनी ऐकू येतो. याच्या विपरीत मेंदूची दिवसभरातील विविध अवस्थांमध्ये ० ते ३० हर्टझ् इतकी वारंवारीता असते. याचाच अर्थ असा की मेंदूच्या कामकाजावर प्रभाव टाकण्यासाठी याच ‘फ्रिक्वेन्सी रेंज’चा ‘बीट’ हवा. आपल्या विविध ‘मूडस्’शी संबंधीत फ्रिक्वेन्सीची माहिती या लेखातील कोष्टकात देण्यात आलेली आहे. समजा आपल्याला अत्यंत प्रगाढ निद्रेचा ‘इफेक्ट’ हवा आहे. यासाठी संगीताचा एक ट्रॅक १०० हर्टझ्चा असल्यास दुसरा १०४चा घ्यावा लागेल. यातून चार हर्टझ्चा ‘डेल्टा बीट’ तयार होईल. मेंदूमध्ये ही संख्या निद्रेशी संबंधित असल्याने हे संगीत ऐकणार्‍या व्यक्तीला प्रगाढ निद्रेचा अनुभव येईल. हाच प्रयोग विविध फ्रिक्वेन्सीवर करता येणे शक्य असल्याचे प्रतिपादन ओस्टर यांनी आपल्या प्रबंधात केले होते.

या अभिनव संशोधनामुळे शास्त्रीय जगतात बर्‍याच अंशी खळबळ उडाली होती. काळानुरुप या क्षेत्रात अत्यंत सखोल अध्ययन करण्यात आले. याचा मानसोपचार तज्ञांना मोठ्या प्रमाणात लाभ झाला. आज अनेक मानसिक रोगांनी मानवाला ग्रासले आहे. या सर्व मनोविकारांवर यशस्वीपणे मात करण्यासाठी ‘बायनॅऊरेल बीटस्’ उपयुक्त असल्याचे दिसून आले. १९७०च्या दशकाच्या शेवटी ‘वॉकमन’ वापरात येताच या क्षेत्रात अभुतपूर्व क्रांती घडून आली. यापूर्वी अशा स्वरुपाच्या थेरपीसाठी चिकित्सकाकडे जावे लागतहोते. ‘वॉकमन’ हेडफोनच्या मदतीने अगदी वैयक्तीक पातळीवरही अशा स्वरुपाच्या संगीताचा आस्वाद घेणे सहजशक्य झाले. इंटरनेटच्या आगमनानंतर तर हा प्रकार अजूनच फोफावला. याचे ‘डिजिटल ड्रग्ज’ म्हणून नामकरण करण्यात आले.

आज इंटरनेटवर ‘डिजिटल ड्रग्ज’शी संबंधित विपुल सामग्री उपलब्ध आहे. यात नवीन संशोधन, लेख, विचारांची देवाण-घेवाण करणारे समूह, डाऊनलोड करता येणारे संगीत आदींचा समावेश आहे. मेंदूच्या विविध ‘मूडस्’साठी संगीताचे खास प्रकार (याला I-doze अथवा I-dose असे म्हटले जाते) आता विकसित करण्यात आलेले आहेत. या डोसेसची परिणामकारकता कुणीही अनुभवू शकते. काही कंपन्यांनी या संगीताच्या सीडीज व्यावसायीक पातळीवर उपलब्ध केलेल्या आहेत. बर्‍याच साईटस्वर तर हे संगीत एमपीथ्रीच्या स्वरुपात मोफत उपलब्ध आहे. काही विकारांवर मात करण्यासाठी ‘डिजिटल ड्रग्ज’ हे मानवाला अत्यंत उपयुक्त ठरु शकते. आज मानवाचे बहुतांशी विकार हे सायकोसोमॅटिक अर्थात शरीर आणि मन या दोघांशी संबंधित असल्यावर शास्त्रज्ञांचे मतैक्य आहे. याचाच अर्थ असा की, प्रत्येक रोगाचा मानवी मनावर पर्यायाने मेंदूवर परिणाम होतच असतो. यावर मात करण्यासाठी आवश्यक त्या ‘बायनॅऊरेल बीटस्’ने युक्त ‘डिजिटल ड्रग्ज’ अत्यंत उपयुक्त ठरु शकतात. आधुनिक युगातील तणावाने मानवाची झोप हिरावून घेतली आहे. आज जगभर सुखदायक निद्रेसाठी दरवर्षी अब्जावधी डॉलर्स मूल्याच्या औषधांचा वापर करण्यात येत आहे. हा उपाय मात्र वरवरचा असून या ‘ट्रॅक्विलायझर्स’ प्रकारच्या गोळ्यांचे व्यसन जडण्याचा धोका असतो. अत्यंत गाढ निद्रेसाठी डेल्टा (०.५ ते ४ हर्टस्) या प्रकारचा ‘बीट’ असणारे संगीत उपयुक्त ठरु शकते. फक्त एक तासभर अशा स्वरुपाचे संगीत ऐकल्याने चार तासाची स्वप्नरहित गाढ निद्रा घेतल्याचा अनुभव बर्‍याच जणांना येतो. परिणामी ‘नॉन मेडिसिनल ट्रॅक्विलायझर्स’ म्हणून ‘डिजिटल ड्रग्ज’ उपयुक्त ठरु शकतात. याच्याशी संबंधीत पीझीझ (pzizz) हे उपकरण बर्‍यापैकी लोकप्रिय झाले आहे. अनिद्रा, नैराश्य, तणाव, आत्मविश्‍वासाचा अभाव, भग्न व्यक्तीमत्व आदींवर याच्या मदतीने उपचार शक्य असल्याचेही दिसून आले आहे. याशिवाय ग्रहणशक्ती, आकलनक्षमता व सृजनशक्ती वाढवण्यासाठीही याचा वापर करण्यात येत आहे. काही शास्त्रज्ञांनी तर अतिंद्रिय शक्तींचा विकास करणारे संगीत तयार केल्याचा दावा केला आहे. ‘डिजिटल ड्रग्ज’चे आध्यात्मिक उपयोग कोष्टकात दिलेले आहेत. या सर्व बाबी मानवाला उपकारक असल्या तरी किम कोमेंदो यांनी मात्र याची काळी बाजूही जगासमोर आणली असून आता सर्वांसाठी तोच चिंतेचा विषय बनला आहे.

आता काही कंपन्या आणि इंटरनेटवरील समूह हे ‘बायनॅऊरेल बीटस्’च्या मदतीने चक्क अंमली पदार्थाची झिंग आणणार्‍या संगीताची निर्मिती करत असल्याचे दिसून आले आहे. याचाच अर्थ असा की, विशिष्ट प्रकारचे संगीत ऐकल्यावर अल्कोहोल, मरिजुआना, हेराईन वा अफूची ‘किक’ बसू शकते. इंटरनेटवरील काही संकेतस्थळांवर या प्रकारचे संगीत अगदी मोफत उपलब्ध आहे. काही ठिकाणी तर अगदी लैगिक संबंधाची अनुभूती देणारे संगीत उपलब्ध आहे. या संदर्भात जगभर जागृती झालेली नसल्याने कायद्यात याविषयी काहीही तरतूद करण्यात आलेली नाही. अंमली पदार्थ बाळगणे अथवा याचा वापर करणे हा जगातील सर्व देशांमध्ये गुन्हा असला तरी असाच परिणाम देणार्‍या संगीताविषयी कायदे करण्यात आलेले नाहीत. परिणामी आगामी कालखंडात संगीतावर आधारित व्यसनांची संख्या वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे अल्पवयीन अथवा पौगंडावस्थेतील मुलांना याचा विळखा बसण्याची जास्त भिती आहे.
‘डिजिटल ड्रग्ज’च्या निमित्ताने तंत्रज्ञानाचा वापर हा सुजाणतेनेच करायला हवा हे प्रकर्षाने अधोरेखीत झाले आहे. कोणताही नवा शोध वा तंत्रज्ञान हे निरपेक्ष असते. याचा योग्य वापर करणे मात्र मानवाच्याच हातात असते. ‘डिजिटल ड्रग्ज’च्या माध्यमातून मानवजातीला शारिरीक आणि मानसिक विकारांसाठी एक अत्यंत उपयुक्त उपचारप्रणाली मिळण्याची शक्यता आहे. मात्र ही बाब मेंदूशी संबंधित असल्याने याचा प्रयोग जपूनच करायला हवा.

मेंदूतील विविध तरंग
विविध फ्रिक्वेन्सीचा मेंदूवर होणार्‍या परिणामाला विशिष्ट नावे देण्यात आलेली आहेत. यात विविध फ्रिक्वेन्सीमुळे मेंदूवर खाली नमूद केल्याप्रमाणे परिणाम होतो.
स्थिती फ्रिक्वेन्सी परिणाम
डेल्टा ०.५-४ हर्टज् प्रगाढ निद्रा
थेटा ४-८ हर्टज् निद्रापूर्व अवस्था
अल्फा ८-१३ हर्टज् शिथिल पण जागृतावस्था
बीटा १३-३० हर्टज् जागृतावस्था
गॅमा ३० पेक्षा जास्त अत्यंतिक जागृतावस्था

आध्यात्मिक आयाम

ध्यानाची क्षमता आणि मानवी चेतना वाढवण्यासाठी ‘डिजिटल ड्रग्ज’ अत्यंत उपकारक आहेत. यासाठी मेंदूला योग्य त्या ‘सूचना’ देण्याची सुविधा याद्वारे उपलब्ध झाली आहे. ध्यानावस्थेत प्रगती करण्यासाठी ‘बायनॅऊरेल बीटस्’युक्त संगीताच्या विपुल सीडीज तयार करण्यात आलेल्या आहेत. या संगीताच्या मदतीने टेलीपॅथी, शरिराबाहेरचा प्रवास, दुसर्‍यांच्या मनातील विचार ओळखणे, विविध चक्रांना उर्जा प्रदान करत त्यांना जागृत करणे. पूर्वजन्मातील स्मृती जागवणे, संमोहन आदी बाबीदेखील शक्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन’ अर्थात सृजनशील कल्पनाचित्रे रंगविणे अथवा आपल्याला हवे तसे स्वप्न पाहणेही (ल्युसिड ड्रीम) यामुळे शक्य झाले आहे. या संदर्भात जगभर अत्यंत सखोल पातळीवर संशोधन करण्यात येत आहे. याकडे आध्यत्मिक क्षेत्राचेही लक्ष लागल्याचे दिसून येत आहे.

(प्रसिद्धी दिनांक १७ ऑगस्ट 2009)

>>>>>>>>>>>>><<<<<<<<<<<<<<>>>>>>>>>>>>>>>>>>><<<<<<<<<<<<<<<<<

नवमाध्यमांची क्रांती

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली ‘जंतर मंतर’ वरील आंदोलनाचा पहिला टप्पा नुकताच यशस्वीपणे पार पडला. यानिमित्ताने देशभरात उसळलेली लाट ही अत्यंत आश्‍चर्यकारक अशीच आहे. या आंदोलनातील तरूणाईचा सक्रीय सहभाग आणि यासाठी त्यांनी वापरलेली अत्याधुनिक संपर्कसाधने ही येणार्‍या युगाची नांदी ठरणार आहे.

२१ सप्टेंबर १९९५ रोजी सकाळी नवी दिल्ली येथील एका गणेश मूर्तीने दुध पिल्याची घटना अवघ्या काही तासात जगभर पोहचली होती ही बाब आपणास आठवत असेल. आजच्या तुलनेत अगदीच प्राथमिक स्वरूपाची संपर्क यंत्रणा असूनही गणपतीचे कथित दुध प्राशन प्रचंड गतीने पसरले होते. आज तर अगदी क्षणाक्षणाची खबर देणार्‍या वृत्तवाहिन्या, न्यूज पोर्टल्स आणि सोशल नेटवर्कींग साईटस् आदींची रेलचेल आहे. या माध्यमांची ताकद वेळोवेळी सिध्दही झाली आहे. मात्र अण्णा हजारे यांच्या आंदोलनात या माध्यमांनी बजावलेली भूमिका ही अत्यंत विस्मयजनक अशीच म्हणावी लागेल.
क्रिकेटच्या विश्‍वचषकात अवघा देश रंगलेला असतांना अण्णा हजारे यांनी आपले नियोजित उपोषण पुढे ढकलल्याची बातमी वर्तमानपत्रांच्या अगदी कोपर्‍यात छापून आली होती. दोन एप्रिलला आपल्या संघाने विश्‍वचषक पटकावल्यावर तर येत्या काही महिन्यांपर्यंत या खेळाडुंचे कोडकौतुक सुरू राहिल असे वाटले होते. मात्र आता हा विश्‍वचषक काही महिन्यांपूर्वी झाला की काय? ही शंका वाटू लागली आहे. ही किमया घडलीय अत्याधुनिक प्रसारमाध्यमे त्यातही न्यू मीडियामुळे! देशात आजवर अनेक आंदोलने झाले. यापैकी लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाने अत्यंत व्यापक स्वरूप धारण केले होते. विश्‍वनाथ प्रताप सिंग यांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर भ्रष्टाचारांचे आरोप केल्यावरही देश ढवळून निघाला होता. या दोन्ही कालखंडापेक्षा अण्णा हजारे यांना अत्यंत व्यापक पाठिंबा मिळाला.

जयप्रकाश नारायण अथवा व्ही.पी. सिंग यांच्या कालखंडात प्रसारमाध्यमे हे मुख्यत: छापील स्वरूपातील होती. यात हस्तक्षेप करण्याचा अथवा आपले मत प्रदर्शीत करण्याचा वाचकांना अधिकार नव्हता. असल्यास त्यावर मर्यादा होती. आजही छापील प्रसारमाध्यमांचे स्थान अबाधित असले तरी जनतेच्या मदतीला कुणाचेही निर्बंध नसणारा न्यू मीडिया आला आहे. फेसबुक, ट्विटर यांच्या सारख्या सोशल नेटवर्कींग साईटस्, ब्लॉग्ज, कम्युनिटी पोर्टल्स आदींवर सरकारी अथवा खासगी बंधने नाहीत. यामुळे लक्षावधी नागरिकांनी या माध्यमाचा यथेच्छ वापर करत या आंदोलनात आपापल्या परीने हातभार लावला. यापूर्वी कोणत्याही आंदोलनास समर्थन द्यावयाचे झाल्यास यात सक्रीय सहभागी व्हावे लागत असे. आज मात्र कोट्यवधी नागरिकांनी आपल्या घरी अथवा कार्यालयात बसूनही अण्णांच्या आंदोलनाचा वन्ही चेतविला. सायबरविश्‍वात अण्णांच्या आंदोलनास प्रचंड पाठिंबा मिळण्यासाठी अर्थातच तरूणाईच्या मनातील आक्रोश कारणीभूत ठरला. आपल्या देशात तरूणाईचा टक्का जगात सर्वाधिक आहे. त्यांना मार्ग दाखविणारे अण्णा हजारेंसारखे समाजसेवक आणि याच्या जोडीला न्यू मीडिया असल्यास देशात क्रांती घडविणे अगदीच अशक्य नाही हेदेखील या आंदोलनाने दाखवून दिले आहे.

अण्णा हजारे यांच्या आंदोलनास कितपत यश आले अथवा याचा शेवट काय होणार याविषयी मतभिन्नता असू शकते. मात्र या आंदोलनाने देशाच्या इतिहासात एक विभाजन रेषा तयार झाली हे मात्र निश्‍चित. येणार्‍या काळात क्रांतीचा बिगुल या नवमाध्यमांच्या मदतीनेच फुंकला जाणार आहे. या क्रांतीलढ्यासाठी कोणत्याही शस्त्रास्त्रांची आवश्यकता नाही. सत्ताधार्‍यांची गुर्मी उतरवण्यासाठी अण्णा हजारे सारखे निस्वार्थी नेतृत्व असले की बस्स! कोणते वर्तमानपत्र अथवा चॅनलने प्रसिध्दी दिली नाही तरी एखाद्या वणव्याप्रमाणे क्रांतीचा संदेश पसरवणे शक्य आहे. एका अर्थाने आता प्रसारमाध्यमांचे लोकशाहीकरण झाले आहे. याला ‘मॅनेज’ करणे शक्य नसल्यामुळेच सत्ताधार्‍यांना धडकी भरली आहे.

=============——————======================—————===============—————

चाहूल माध्यम क्रांतीची

अयोध्या प्रकरणाचा निकाल हा अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या इंटरनेटवरील संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला. याद्वारे देशाच्या इतिहासातील सर्वात उत्कंठावर्धक अध्यायाची नोंद झाली. याच दिवशी प्रसारमाध्यमांमधील एका नव्या युगाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली असून याकडे मात्र बहुतांश जणांचे दुर्लक्ष झाले आहे.

अयोध्या प्रकरण हे बऱ्याच अर्थांनी अनोखे होते. याचा निकालही अत्यंत अभूतपूर्व पध्दतीने लागला. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना या खटल्याच्या निकालाची प्रत मिळण्याआधीच ती इंटरनेटद्वारे जगासाठी उपलब्ध झाली होती. आजवरची प्रथा तोडून अशा प्रकारे जाहीर करण्यात आलेला निकाल हा नव्या युगाची नांदी ठरणार आहे. मानवी इतिहासात मुद्रीत प्रसारमाध्यमांना अत्यंत महत्वाचे स्थान असले तरी विसाव्या शतकाच्या शेवटी या माध्यमाला प्रथमच मोठ्या प्रमाणात आव्हान उभे राहिले. प्रथम विविध दूरचित्रवाणी वाहिन्या आणि नंतर आलेल्या इंटरनेटने मीडियाचे स्वरूपही मोठ्या प्रमाणात बदलले. आता तर एसएमएस, एमएमएस आदींच्या रूपाने असंख्य हातांमध्ये संपर्काचे हुकमी साधन आले आहे. प्रसारमाध्यमांमध्ये अत्याधुनिक उपकरणांनी आलेली प्रचंड गती ही जीवनाच्या सर्वच क्षेत्रात अनुभवास आली तरी सरकारी पातळीवर याची फारशी दखल घेण्यात आली नाही हे ही तितकेच खरे. यामुळे विविध वृत्तवाहिन्या आणि न्यूज पोर्टल्स प्रत्येक सेकंदाची दखल घेत असतांना सरकारी मालकीचे दुरदर्शन मात्र अजूनही भूतकाळातच वावरत असल्याचे केविलवाणे चित्र आहे. विविध सरकारी खाते आणि मंत्रालयांमध्ये ‘ई प्रणाली’ राबविल्याचा आव आणण्यात आला तरी प्रत्यक्षातील चित्र वेगळेच आहे. सरकारी खात्यांच्या संकेतस्थळांची दुर्दशा ही या बाबतीत अत्यंत सूचक अशी आहे. या पार्श्वभूमीवर, अलाहाबाद उच्च न्यायालयाने अयोध्या खटल्याचा निकाल सुनावण्यासाठी केलेली व्यवस्था ही आश्चर्याचा सुखद धक्काच मानावा लागेल.

गेल्या काही वर्षांपासून पारंपरिक प्रसारमाध्यमांना अत्यंत सशक्त असा पर्याय उभा राहिला आहे. ‘न्यू मीडिया’ अथवा ‘सोशल मीडिया’ नावाने हा प्रकार जगभर रूढ झाला आहे. ब्लॉग्ज, फेसबुक-ऑकुर्टसारख्या सोशल नेटवर्कींग साईटस्‌ अन्‌ ‘यू ट्यब’ सारख्या मुक्त साधनांचा वापर करून अगदी सर्वसामान्यांच्या हातातही जगभर आपला विचार अथवा बातमी पोहचवण्याची ताकद आली होती. यामुळे जगभरातील बलाढ्य ‘मीडिया हाऊसेस’ची मिरासदारी मोडकळीस आली. अर्थात यामुळे सायबरविश्वातही ‘ब्रेकिंग न्यूज’ची जीवघेणी स्पर्धा अवतरली. मायकल जॅक्सनसारख्या सुपरस्टारच्या निधनाचे पहिले वृत्त एका संकेतस्थळाने प्रसिध्द करून या माध्यमाची ताकद जगाला दाखवून दिली. ‘विकीलिक्स’ या संकेतस्थळाने अमेरिकेच्या युध्दविषयक धोरणातील तृटींना जगासमोर आणण्याचे कार्य केले. भारतात ‘सोशल मीडिया’ला वलयांकित व्यक्तींमुळे प्रसिध्दी मिळाली. अमिताभसारख्या दिग्गजांनी ब्लॉगिंगला तर शाहरूख, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर आदींमुळे ट्विटरविषयी सर्वसामान्यांना माहिती मिळाली. काही राजकारण्यांनाही याची मोहिनी पडली. शशि थरूर यांच्या ट्विटस्‌ भलत्याच गाजल्या. अखेर या महोदयांना मंत्रीपदावरून जावे लागले. विविध सेलिब्रिटीज आपल्या भावनांना मुक्तपणे व्यक्त करण्यासाठी ट्विटरचा मुक्त वापर करू लागल्या आहेत. आपल्या देशात एखादे ‘विकिलीक्स’ उघड झाले नाही मात्र अनेक ब्लॉगर्सनी विविध समाजोपयोगी प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे. ‘आयपीएल’ मधील गैरप्रकारावर एका तोतया खेळाडूच्या नावाने तयार करण्यात आलेल्या ब्लॉगद्वारे नवीन प्रकाश पडला. प्रसारमाध्यमांमधील ‘सुरस’ कथा भडास फॉर मीडिया, बातमीदार, कळते समजते आदी ब्लॉग्जच्या माध्यमातून जगासमोर आल्या ही बाबही लक्षणीय मानावी लागेल.

हे सारे होत असतांना केंद्र आणि राज्य सरकारांनी या नव्या माध्यमाची क्षमता पुरेपूर ओळखली नाही. किंबहुना याचा योग्य प्रकारे वापर करण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती कुणी दाखवली नाही. या पार्श्वभूमीवर, अयोध्या खटल्याचा निकाल इंटरनेटवर जाहीर करून अलाहाबाद उच्च न्यायालयाने एक उत्तम पायंडा पाडला आहे.
सध्या प्रशासनातील पारदर्शकतेविषयी सातत्याने चर्चा होत आहे. प्रत्यक्षात मात्र सरकारी यंत्रणेला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे वावडे आहे. अयोध्येच्या अत्याधुनिक निकालतंत्रामुळे याबाबत आशेचा नवा किरण दिसून आला आहे. इंटरनेटवरील निकालाच्या प्रतीमुळे अगदी सर्वसामान्यांनाही या खटल्याची इत्यंभूत माहिती मिळणे शक्य झाले. भविष्यात तर युट्युबसारख्या साधनांच्या सहाय्याने एखादा खटला अथवा महत्वाच्या घटनेचे चित्रीकरणही आपल्याला उपलब्ध होऊ शकते. मोबाईल इंटरनेट अथवा एमएमएससारख्या अत्याधुनिक पध्दतीच्या माध्यमातून अक्षरश: कोट्यवधी आबालवृध्दांपर्यंत कोणतीही माहिती पाठवणे आता सहजशक्य झाले आहे. अयोध्या निकालाच्या रूपाने याची ताकद सरकारी यंत्रणेला कळाली आहे. परिणामी येत्या काळात हा प्रकार रूढ होण्याची शक्यता निश्‍चितच आहे. अयोध्या निकालाचे नवे तंत्र या संदर्भात क्रांतीकारक मानावा लागेल.

(प्रसिध्दी दिनांक ४ ऑक्टोबर २०१०)

<<<<<>>>>>>>>>>>>><<<<<<<<<<<>>>>>>>>>>>><<<<<

प्रयत्ने वाळू रगडता, वीजही मिळे

प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याने वाळूतून अगदी तेलही काढणे शक्य असल्याची म्हण आपल्या मराठी भाषेत प्रचलित आहे. वाळूपासून कुणी तेल काढल्याचे ऐकिवात नाही. मात्र एका भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाने यापासून चक्क वीज निर्मित करून संपूर्ण जगामध्ये धमाल उडवून दिली आहे.

गेल्या बुधवारी अमेरिकेतील ‘ब्लुम एनर्जी’ या कंपनीचे संचालक डॉ. के.आर. श्रीधर यांनी एका कार्यक्रमात आपले ‘ब्लुम बॉक्स’ हे उपकरण अधिकृतरित्या बाजारपेठेत उतरवले. गेल्या काही वर्षांपासून डॉ. श्रीधर यांच्या संशोधनाविषयी शास्त्रीय जगतामध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता असली तरी याविषयी अत्यंत गुप्तता बाळगण्यात आली होती. 21 फेब्रुवारी रोजी ‘सीबीएस’ या वाहिनीवर त्यांची ‘सिक्स्टी मिनिटस्‌’ या कार्यक्रमात मुलाखत प्रसारित करण्यात आल्यावर सर्वसामान्यांना याची माहिती झाली. यानंतर तीन दिवसांनी उद्योग आणि शास्त्रीय तसेच राजकीय क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये हे प्रॉडक्ट जगासमोर आल्यानंतर तर सर्वत्र याचीच चर्चा सुरू झाली आहे. विशेषज्ञांच्या मते, या संशोधनाने मानवी प्रगतीला क्रांतीकारी वळण लागणार आहे. एकविसाव्या शतकावर याचीच मुद्रा उमटणार असल्याचे भाकितही करण्यात आले आहे. हे संशोधन नेमके आहे तरी काय? याच्या प्रत्यक्षात उपयोगातून कोणते लाभ होणार? आपल्या जीवनात यामुळे काय फरक पडणार? याचाच घेतलेला हा वेध.

‘ब्लूम बॉक्स’ची माहिती घेण्याआधी या अनुषंगाने झालेल्या संशोधनाची पूर्वपिठीका समजून घेणे गरजेचे आहे. ‘ब्लूम एनर्जी’ या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. के.आर. श्रीधर हे असून त्यांच्याच अभिनव संशोधनातून हे उपकरण तयार करण्यात आले आहे. श्रीधर यांनी चेन्नई विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनइरिंगची पदवी संपादन केल्यावर, अमेरिकेत उच्च शिक्षण घेतले आहे. तेथील अरिझोना विद्यापीठात अध्ययनाचे काम करत असताना त्यांनी ‘नासा’ या संस्थेसाठीदेखील काम केले आहे. काही वर्षांपूर्वी या संस्थेने मंगळावर मानवी वसाहत उभारण्यासाठी एक अत्यंत व्यापक मोहिम आखली होती. मंगळावर पाणी आणि सूर्यप्रकाश उपलब्ध असला तरी तेथे प्राणवायू नसल्याने मानवाचे वास्तव्य अशक्य आहे. यामुळे श्रीधर याच्यावर सौर उर्जा आणि मंगळावरील पाण्याचा उपयोग करून प्राणवायू आणि हायड्रोजनची निर्मिती करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. यातील प्राणवायू मानवाच्या श्वसनासाठी तर हायड्रोजन हा वाहनांना इंधन म्हणून वापरता येईल अशी ही योजना होती. श्रीधर यांनी यासाठी एक रिअक्टर तयार केला. याच्या मदतीने त्यांनी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. काही कारणांनी ‘नासा’ची ही योजना लांबणीवर पडल्याने ते निराश झाले. एकदा त्यांच्या मनात ‘मंगळासाठी तयार करण्यात आलेली प्रक्रिया उलट केली तर…’ हा विचार आला अन्‌ या संकल्पनेने त्यांना झपाटून टाकले. प्राणवायू आणि हायड्रोजनच्या मदतीने उर्जा तयार करण्याचा त्यांनी ध्यास घेतला. यातून 2002 साली त्यांनी ‘ब्लूम एनर्जी’ ही कंपनी सुरू केली. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी तयार केलेली उपकरणे ही काही विख्यात कंपन्या वापरत असल्या तरी याविषयीची माहिती अद्याप जाहीर करण्यात आली नव्हती. आता मात्र या संशोधनाचे सर्व तपशील जगजाहीर करण्यात आले आहेत.

डॉ. श्रीधर यांचा ‘ब्लूम बॉक्स’ ही एक प्रकारची अनोखी बॅटरीच आहे. यात वाळूपासून तयार करण्यात आलेल्या अत्यंत पातळ चकत्यांवर हिरव्या आणि निळ्या रंगाच्या शाईचे विशिष्ट आवरण चढवण्यात आले आहे. हेच ऍनोड आणि कॅथोडचे काम करतात. यावर धन आणि ऋण प्रभार जमा होतो. या चकत्यांना धातुच्या पट्यांनी विलग करण्यात आले आहे. या भागावर नैसर्गिक वायू सोडल्यास रासायनिक प्रक्रिया होऊन वीज निर्मिती होते. या उपकरणात इंधन म्हणून नैसर्गिक वायू, इथीलिन, मद्यार्क, मिथेन, कचर्‍यातून उत्सर्जित होणारा वायू तसेच गोबर गॅसही चालू शकतो. डॉ. श्रीधर यांनी तयार केलेल्या एका चकतीतून 25 वॅट विजेचे उत्पादन होते. या शेकडो चकत्यांना एकत्र जोडून त्यांनी 100 किलोवॅट उत्पादन करणारा ‘ब्लूम बॉक्स’ तयार केला आहे. याला त्यांनी ‘एनर्जी सर्व्हर’ हे नाव दिले आहे. एखाद्या कार्यालयातील माहितीचा संग्रह ज्याप्रमाणे संगणकीय सर्व्हरवर असतो त्याचप्रमाणे हा उर्जेचा संग्राहक राहणार आहे. या उपकरणाचे अनेक लाभ आहेत. याचा आकार अत्यंत आटोपशीर आहे. 100 केव्ही क्षमतेचे हे उपकरण एखाद्या लहान कारच्या जागेवरही मावू शकते. याच्या रासायनिक प्रक्रियेमध्ये सुमारे 800 अंश सेल्सइस इतके तापमान निर्मित होत असले तरी, यात अत्यंत उच्च दर्जाची शीतकरण यंत्रणा बसविण्यात आलेली असल्याने, उष्णतेचा जराही त्रास जाणवत नाही. या उपकरणाद्वारे तयार करण्यात आलेल्या विजेचा खर्च हा इतर स्त्रोतांच्या मानाने खूप कमी आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे पारंपरिक उर्जा निर्मितीपेक्षा यात पर्यावरणाची हानी अत्यल्प प्रमाणात होत असल्याचे सिध्द झाले आहे. डॉ. श्रीधर यांचे संशोधन अद्भुत आणि युगप्रवर्तक असल्याची एकमुखी प्रतिक्रिया जगभर उमटली आहे.

वीज हा आधुनिक युगाचा अविभाज्य घटक असला तरी मानवापुढील ही मोठी समस्यादेखील आहे. पारंपरिक पध्दतीने तयार करण्यात येणार्‍या विजेमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. एवढे करूनही पृथ्वीवर सर्वांनाच वीज मिळत नाही. ‘युनो’च्या आकडेवारीनुसार, जगातील सुमारे दीड अब्ज अर्थात एक चतुर्थांश नागरिक उर्जेपासून अद्यापही वंचित आहेत. मर्यादित उर्जास्त्रोत, उत्पादनाचा अवाढव्य खर्च यासोबत पर्यावरणाचे नुकसान यामुळे बर्‍याच देशांमध्ये उर्जा संकट अत्यंत तीव्र स्वरूप धारण करू पाहत आहे. आपणही भारनियमनाच्या रूपाने याचे चटके सहन करत आहोत. या सर्व बाबींवर ‘ब्लूम बॉक्स’ हे अत्यंत परिणामकारक ठरणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विजेचे दूरवर वहन (ट्रान्समिशन) करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च लागतो. विजेचे उत्पादन आणि प्रत्यक्ष उपयोग यादरम्यान होणारी गळती हा सर्वत्र चिंतेचा विषय आहे. यातच वहन करण्यासाठी अत्यंत महागडी यंत्रणा उभारावी लागते. या पार्श्वभूमिवर, डॉ. श्रीधर यांच्या उपकरणाने आमूलाग्र बदल होणे शक्य आहे.

विजेची विद्यमान सुविधा ही दूरध्वनीप्रमाणे असली तरी ‘ब्लुम बॉक्स’ मात्र मोबाईलप्रमाणे आहे. मोबाईलमुळे कोट्यवधींच्या हाताशी संपर्काचे हुकमी साधन आले. याचप्रमाणे ‘एनर्जी सर्व्हर’ हा विद्युत निर्मिती आणि वापराचे विकेंद्रीकरण करण्यास समर्थ आहे. उर्जा निर्मिती आणि वितरणाच्या अजस्त्र यंत्रणेऐवजी ठिकठिकाणी अगदी आटोपशीर आकाराचे ‘ब्लुम बॉक्सेस’ बसविण्यात आल्यास, ते अत्यंत परिणामकारक ठरणार आहेत. 100 किलो वॅट क्षमतेच्या ‘ब्लुम बॉक्स’चे मूल्य आठ लक्ष अमेरिकन डॉलर्स इतके आहे. हा प्राथमिक खर्च थोडासा जास्त असला तरी यातून होणारी वीज निर्मिती ही स्वस्त आहे. डॉ. श्रीधर यांच्या दाव्यानुसार, फक्त तीन वर्षातच या उपकरणाची किंमत वसूल होऊ शकते. सध्या बाजारात अन्य ‘फ्युएल सेल’ही उपलब्ध असले तरी डॉ. श्रीधर यांच्या उपकरणाविषयी जगात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. यामागे अनेक कारणे आहेत. अपारंपरिक उर्जास्त्रोतांवर जगभर अत्यंत सखोल संशोधन सुरू आहे. काही देशांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापरही करण्यात येत आहे. अर्थात या विद्यमान पध्दतींमध्ये मोठ्या प्रमाणात दोष आहेत. सौर आणि पवन उर्जा ही स्वस्त आणि पर्यावरणाला अनुकूल असली तरी त्याला अनेक मर्यादा आहेत. एक तर स्त्रोत (ऊन अथवा वारा) उपलब्ध नसल्यास त्यांच्यापासून उर्जा तयार होत नाही. याशिवाय, असल्या स्वरूपाने तयार झालेल्या उर्जेचा संचयही शक्य नाही. या पार्श्वभूमिवर, ‘ब्लुम बॉक्स’मध्ये अनेक अनोख्या सुविधा आहेत. एक तर हा अगदी आटोपशीर आकाराचा आहे. औद्योगिक वापरासाठी लागणारा ‘एनर्जी सर्व्हर’ हा गॅरेजमध्ये सहजगत्या बसवणे शक्य आहे. याशिवाय, डॉ. श्रीधर हे अवघ्या तीन हजार डॉलर्स मूल्यामध्ये घरगुती वापरासाठी एक किलोवॅट क्षमतेचा बॉक्स तयार करत आहेत. हा तर अगदी हातावर मावणारा असून, तो घराच्या कोणत्याही कोपर्‍यात मावू शकतो. या उपकरणाद्वारे अगदी 24 तास विजेचे उत्पादन शक्य आहे. महत्वाची बाब म्हणजे यात उर्जेचा संग्रहदेखील शक्य आहे. यामुळे आगामी काळात या बॉक्सला सौर वा पवन उर्जा निमितीचे युनिट जोडल्यास या क्षेत्रात आमूलाग्र क्रांती घडून येऊ शकते. बर्‍याचदा एखादे मजेशीर संशोधन जाहीर होत असले तरी कालौघात त्याचा प्रत्यक्ष वापर शक्य होत नाही. मात्र ‘ब्लुम बॉक्स’ याला अपवाद आहे. डॉ. श्रीधर यांनी 2002 साली हे उपकरण विकसित केले होते. मात्र याचा व्यावसायिक स्तरावर उपयोगही सुरू झाल्यानंतरच त्यांनी याविषयी जगाला माहिती दिली. एक प्रकारे ‘आधी केले मग सांगितले’ अशा प्रकाराचा अवलंब केल्याने डॉ. श्रीधर यांच्या उपकरणाच्या विश्वासार्हतेवर शिक्कामोर्तब झाले आहे.
डॉ. श्रीधर
=======================

Leave a Comment