राजकारण

ठाकरी तमाशा

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रणधुमाळीने आता कळस गाठला आहे. मुंबई महापालिकेची रंगीत तालीम अथवा उपांत्य फेरी समजली जाणाऱ्या या निवडणुकीत युती आ‌णि आघाडी आणि मनसेने शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. शेवटच्या टप्पयात मात्र या रणधुमाळीने विचित्र वळण घेतले आहे. ‘कडोंमप’ची निवडणूक ही कधीच मुद्यांवरून गुद्यांवर आली आहे. याला आता कौटुंबिक कलहाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
‘कडोंमप’च्या निवडणुकीतील ठाकरे कुटुंबाच्या वैयक्तीक वादाने सुज्ञ जनांना काहीही सुचेनासे झाले आहे. मनसे आणि शिवसेनेमध्ये असणारे राजकीय मतभेद हे संकेताला धरून असावे. मात्र त्यांची लढाई ही वैयक्तीक पातळीवर घसरल्याने जनतेचे चांगलेच मनोरंजन होत आहे. फुटीरता ही शिवसेनेसाठी नवीन बाब नाही. अगदी ग्रामीण भागापासून ते अनेक आमदार-खासदारांनी या पक्षाला रामराम ठोकला तरी छगन भुजबळ, नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी दिलेल्या हादऱ्यांनी शिवसेना मात्र अक्षरश: हादरली होती. यामुळे या तिघांना संधी मिळेल तेव्हा तोंडसुख घेण्याची एकही संधी सेना नेते सोडत नाहीत. छगन भुजबळ हे तर कित्येक वर्षे शिवसैनिकांचे आवडते ‘टार्गेट’ होते. कित्येक वर्षे ‘सामना’त त्यांचा उल्लेख ‘लखोबा’ याच नावाने करण्यात येत होता. यथावकाश या ‌विरोधाची तीव्रता कमी झाले. भुजबळांनी मातोश्रीवर हजेरी लावल्यावर तर उरला सुरला विरोधही गळून पडला. यानंतर नारायण राणे यांच्याविरूध्द शिवसेनेची खुन्नस आद्यापही टिकून आहे. यातच राज ठाकरे यांनी विद्रोही सूर आळवत ‘मनसे’ संसार थाटला तेव्हा पार शिवसेनेची शकले उडल्यासारखी स्थिती झाली. यानंतर उध्दव ठाकरे यांनी पक्षावर चांगली पकड मिळवली असली तरी राज्याच्या शहरी भागात शिवसेनेच्या पानीपताला ‘मनसे’ कारणीभूत असल्याचे वारंवार सिध्द झाले. लोकसभेत सेना चांगली कामगिरी करू शकला नाही. विधानसभेत तर सर्वार्थाने अनुकुल परिस्थिती असतांनाही मनसेमुळे सत्तेपपासून वंचित रहावे लागले याची सल युतीच्या मनात आहे. आता ‘कडोंमप’मध्येही याचीच पुनरावृत्ती होण्याची धास्ती युतीच्या व विशेषत: शिवसेनेला आहे. यातच आपल्या कट्टर शत्रूला अजून एक जोरदार धक्का देण्यासाठी मनसे उतावीळ झाली आहे. सध्या सुरू असलेली चिखलेफेक हा याचाच परिपाक मानावा लागेल.
‌शिवसेना सोडूनही दुसरीकडे स्थिरावलेल्याविषयी शिवसैनिकांच्या मनात एक ‘कॉंम्प्लेक्स’ आहे. मनसेप्रमुख हे तर ‘ठाकरे’ असल्याने याची तीव्रता जास्त असणे स्वाभाविक आहे. आजवर राज आणि उध्दव यांनी एकमेकांवर अगदी खालच्या पातळीवरून टीका केली तरी या वादात बाळासाहेबांनी थेट उडी घेतली नव्हती. राज यांचाही राग विठ्ठलापेक्षा भोवतीच्या बडव्यांवरच जास्त असल्याचे त्यांनी वारंवार सांगितले आहे. या वर्षाच्या दसरा मेळाव्यात सेनाप्रमुखांनी राजवर थेट प्रहार केला. राज काही दिवस शांत राहिले तरी ‘कडोंमप’च्या निवडणुकीचे मुहूर्त साधून त्यांनी थेट आपल्या विठ्ठलावरच ‘वार’ केला आहे. आता सभांमधून वाक्‌बाणांनी लढणारे राज व उध्दव तसेच ‘सामना’च्या माध्यमातून दणका देणाऱ्या सेनाप्रमुखांच्या माध्यमातून ठाकरे कुटुंबातील भाऊबंदकीस उधाण आले आहे.
शिवसेना सध्या भाजपासोबत ‘कडोंमप’मध्ये सत्तेवर आहे. त्यांच्या कारभारावर मनसेने केलेली टीका ही राजकीय प्रणालीचा अविभाज्य घटक आहे. याला शिवसेनेला उत्तर देण्याचा अधिकारही आहे. मात्र हे सारे राजकीय संकेतांनुसार व्हायला हवे. ठाकरे बंधूंमधील वर्चस्वाच्या लढाईमुळे कुटुंबाची लक्तरे पार वेशीवर टांगली गेलीत याची शुध्द कुणालाही नाही. यातून जनतेला कोणताही नवा विचार अथवा मुद्दा मिळणार नाही. आपल्या घरगुती भांडणासाठी ठाकरे बंधूंनी जनतेला वेठीस धरणे कितपत योग्य आहे? याचा विचार आता आपणच करायचा आहे. अन्यथा ‘कडोंमप’मध्ये ही अवस्था तर मुंबई पालिकेच्या निवडणुकीत काय होणार? ही कल्पनाही आज करवत नाही.

About the author

shekhar patil

Leave a Comment