चालू घडामोडी विज्ञान-तंत्रज्ञान

ट्विटरचे दशक

विश्‍वविख्यात मायक्रो ब्लॉगिंग सेवा ट्विटर आता दहा वर्षांची झालीय. दहा वर्षे हा तसा फारसा मोठा कालखंड नसतांनाही ट्विटरने जगावर पाडलेली छाप ही विलक्षण अशीच मानावी लागणार आहे.

विश्‍वविख्यात मायक्रो ब्लॉगिंग सेवा ट्विटर आता दहा वर्षांची झालीय. दहा वर्षे हा तसा फारसा मोठा कालखंड नसतांनाही ट्विटरने जगावर पाडलेली छाप ही विलक्षण अशीच मानावी लागणार आहे. दशकपुर्तीनिमित्त या साईटचा इतिहास, वर्तमान आणि भविष्याचा वेध घेतल्यास फारसे अप्रस्तुत ठरणार नाही.

ट्विटरचे सायबरविश्‍वात आगमन होत असतांना तीन महत्वाच्या बाबी घडल्या होत्या. एक तर ‘डॉटकॉम बबल’ फुटला होता; सोशल नेटवर्कींग हे बाळसे धरण्याच्या अवस्थेत होते तर ब्लॉगींगचे क्षेत्र प्रचंड प्रमाणात विस्तारणार असल्याचा समज पसरला होता. खर तर गत सहस्त्रकाच्या शेवटी जणू काही मानवी जीवनातील प्रत्येक बाब ‘ऑनलाईन’ होणार आणि त्यातून बक्कळ कमाई होणार अशी आवई उठली होती. यातूनच सिलीकॉन व्हॅलीत रग्गड पैसा आला पण हा फुगा फुटला. हा पैसा जणू काही हवेत विरून गेला. यामुळे अर्थातच काही काळ नैराश्याचे वातावरण पसरले होते. एकविसाव्या शतकाच्या सुरवातीपासून सोशल नेटवर्कींग साईट लोकप्रिय होऊ लागल्या तरी यातून मोठा ‘ब्रँड’ तयार झाला नव्हता. नाही म्हणायला ऑर्कुट आणि मायस्पेस सारख्या साईट लोकप्रिय झाल्यात तरी त्या उंच भरारी घेऊ शकल्या नाहीत. मात्र या काळात ब्लॉगींग लोकप्रिय झाले होते. ब्लॉगर आणि वर्डप्रेससारख्या सुलभ सेवांमुळे ब्लॉगींगनेही कात टाकली. अन् याच कालखंडात फेसबुक आणि त्या पाठोपाठ ट्विटरचा उदय झाला.

फेसबुकने अत्यंत सुलभपणे आपल्या युजरला विविध प्रकारचे स्टेटस अपडेट करण्याची सुविधा प्रदान केली. तर ट्विटरने अवघ्या १४० शब्दांमध्ये ‘ट्विट’ करण्याची सोय करून दिली. अर्थात फेसबुकप्रमाणेच ट्विटरनेही मौलिक संकल्पना जगासमोर आणली नाही. ट्विटरच्या आधीदेखील मायक्रो-ब्लॉगींग वेगळ्या स्वरूपात उपलब्ध होतीच. याहू मॅसेजरसारख्या मंचावर विपुल प्रमाणात चॅटींगमध्ये संक्षिप्त भाषा वापरली जात होती. यातच जगभरात मोबाईल फोन्सचा वापर वाढल्यानेही संक्षिप्त संदेश लोकप्रिय होऊ लागले होते. ट्विटरने हीच बाब लक्षात घेत १४० शब्दांचा फॉर्म्युला अंमलात आणला जो सुपरहिट ठरला. एकविसाव्या शतकात लाईव्ह, रिअल-टाईम या संज्ञा मान्यता पावल्या आहेत. याचा विचार करता ट्विटर हे खर्‍या अर्थाने क्षणार्धात जगाशी संवाद साधण्याचे माध्यम बनले. आज जगभरातील विविध देशांचे प्रमुख, विविध क्षेत्रांमधील सेलिब्रिटीजसह सर्वसामान्यांनाही याचमुळे ट्विटरची भुरळ पडली आहे. ओसामा बीन लादेनचा खात्मा, मायकेल जॅक्सनचा मृत्यू आदींपासून ते जगातील महत्वाच्या ‘ब्रेकिंग न्यूज’ ट्विटरनेच सर्वप्रथम दिल्या असून यात अद्यापही खंड पडलेला नाही. मध्यपुर्वेतल्या अरब देशांमधील क्रांतींपासून ते ओबामा, मोदींसारख्या महत्वाच्या नेत्यांच्या ‘इमेज मेकिंग’मध्ये ट्विटरचा असणारा वाटा कुणी नाकारू शकत नाही. एवढेच नव्हे तर ‘इसीस’चे क्रौर्यदेखील याच माध्यमातून जगापर्यंत पोहचले. अर्थात जगातील घटनांचे प्रतिबिंब ट्विटरवर पडल्याचे दिसून येत आहे.

आज ट्विटरवर काय नाही? ब्रेकिंग न्यूज, कार्पोरेट प्रमोशन्स, महत्वाच्या राजकीय/ शासकीय घोषणा, कुणाचा निषेध तर कुणाच्या समर्थनाच्या मोहिमा, युजर्सला आवडणार्‍या कंटेंटपासून ते वैयक्तीक आयुष्यातील अनेक घटना ट्विटच्या माध्यमातून जगापर्यंत पोहचत आहेत. ट्विटरनेच लोकप्रिय केलेल्या ‘हॅशटॅग्ज’च्या माध्यमातून या सर्व अजस्त्र माहितीचे वर्गिकरण अगदी सुलभपणे शक्य झाले आहे. ट्विटरने जगाला दिलेल्या महत्वाच्या बाबींपैकी एक म्हणून ख्यात झालेले ‘हॅशटॅग्ज’ हे अनेक सोशल साईटने आत्मसात केल्याने आपल्या आयुष्याचाही अविभाज्य घटक बनले आहे.
ट्विटरची नेहमी फेसबुकसोबत तुलना करण्यात येते. त्यात गैरदेखील नाही. मात्र आज फेसबुकने घेतलेली भरारी पाहता ट्विटर खूपच मागे पडल्याचे दिसून येत आहे. फेसबुकचीच मालकी असणारे इन्स्टाग्राम हे फोटो शेअरिंग ऍप आणि व्हाटसऍप या मॅसेंेजरनेही केव्हाच ट्विटरला मागे टाकले आहे. या दोन्ही साईटमध्ये अनेक बाबतीत साध्यर्म असले तरी काही बाबतीत भिन्नतादेखील आहे. सर्वात मोठा फरक (जो सहसा अनेकांना समजत नाही!) म्हणजे फेसबुक आणि ट्विटरची टाईमलाईन ही भिन्न प्रकारे कार्य करते. फेसबुकवर एक विशिष्ट अलगॉरिदम आहे. याच्या मदतीने आपण ज्या मित्रांचे स्टेटस वा लाईक केलेले पेजेस/ग्रुप्स जास्त वेळेस पाहतो वा त्यावर ‘इंटरऍक्शन’ (उदा. लाईक/कॉमेंट/शेअर आदी) करतो ते आपल्याला जास्त वेळेस दिसतात. तर ट्विटरची टाईमलाईन मात्र कालानुक्रमे गतीमान पध्दतीने पुढे सरकत असते. यामुळे आपण एखाद्या महत्वाच्या व्यक्तीला ‘फॉलो’ करत असले तर त्याचे ट्विट आपण ‘रिअल टाईम’ पाहू शकतो. एकदा त्याने ट्विट केल्यानंतर आपल्याला ते तत्काळ दिसते. एकदा का ते आपल्या नजरेतून गेले की, एक तर टाईमलाईनच्या खाली जाऊन अथवा संबंधीत व्यक्तीच्या खात्यावर जाऊन त्याला शोधावे लागते. हे ट्विट करतांना आपण लॉगीन केलेले नसले तरी पुन्हा लॉगीन केल्यावर एकत्रीत ट्विटमध्ये ते असते. याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. या कालानुक्रमे अपडेटमुळे ट्विटर हे प्रचंड गतीमान बनले आहे. एकविसाव्या शतकातील ‘लाईव्ह कल्चर’शी ते सुसंगत असल्याने साहजीकच तुफान लोकप्रिय बनले. यात अगदी क्षणार्धात कोणत्याही व्यक्तीशी आपण थेट संपर्क साधू शकतो. याचा फायदा असा झाला की, अन्य दुसर्‍या कोणत्याही माध्यमाशिवाय संदेशाचे देवाणघेवाण सहजशक्य झाले. याचा सर्वात मोठा फटका साहजीकच प्रसारमाध्यमांना बसला. आज राष्ट्रप्रमुख, विविध खात्यांचे मंत्री वा सेलिब्रिटीजच नव्हे तर अगदी विविध शासकीय कार्यालयेदेखील महत्वाच्या घोषणा ट्विटरवरून करू लागले आहेत. यामुळे आज सहसा ‘पत्रकार परिषद’ घेऊन विविध माहिती वा घोषणा करण्याचा ‘ट्रेंड’ आता कालबाह्य होण्याच्या मार्गावर आला आहे. आता ट्विटच्या माध्यमातून केलेल्या घोषणा ‘अधिकृत’ मानल्या जातात ही बाब लक्षणीय अशीच आहे. ट्विटरनेच नंतर सहा सेकंदांचा व्हिडीओ शेअर करण्याची सुविधा देणारे ‘वाईन’ तर ‘लाईव्ह स्ट्रीमिंग’ करणार्‍या पेरिस्कोपला जगासमोर आणून पारंपरिक मीडियासमोर अजून मोठे आव्हान उभे केले आहे. येत्या काही महिन्यांमध्ये दूरचित्रवाणी कार्यक्रमही ट्विटरवर दिसणार आहेत. अर्थात यामुळे मनोरंजनाच्या क्षेत्रातही ट्विटर धमाल करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ट्विटरने थेट जनतेपर्यंत माहिती पोहचवण्याची प्रसारमाध्यमांची मिरासदारीच मोडली नाही तर प्रशासनातही पारदर्शकता आणली आहे. आज आपण एखाद्या रेल्वेगाडीतील असुविधा अथवा रेल्वे स्थानकावरील अडचणीबाबत कुणीही थेट रेल्वे मंत्रालयाशी क्षणार्धात संपर्क साधू शकतो. बरं हा संवाद पुर्णपणे जगासमोर सुरू असल्याने यावर कार्यवाही करणे भाग असतेच. ही पारदर्शकता अन्य केंद्रीय व राज्य सरकारची खातीच नव्हे तर अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांनादेखील येत्या काही दिवसांमध्ये दाखवावी लागणार आहे. देशोदेशीच्या प्रशासनांमध्ये आधीच याचा विपुल वापर सुरू झाला आहे. म्हणजेच जागतिक पातळीवरील ‘सुसाशन’ अर्थात ‘गुड गव्हर्नन्स’मध्ये ट्विटर सर्वात मोलाची भुमिका पार पाडत आहे.

मात्र ट्विटर हे जितके उपयुक्त असले तरी याला दुसरी बाजूदेखील आहे. सायबरविश्‍वात नेहमी ‘प्रपोगंडा वॉर’ होत असते. यासाठी ट्विटर हे महत्वाचे माध्यम बनले आहे. आजच्या ‘व्हायरल कल्चर’मध्ये ट्विटरवरच विविध हॅशटॅग्जच्या माध्यमातून प्रत्येक क्षणाला विचारांची तुंबळ लढाई होत असते. यात अनेक जण ताळतंत्र सोडतात. सभ्यतेच्या मर्यादादेखील अनेकदा पार केल्या जातात. यातून अफवाबाजांचेही फावते. ट्विटरवर अनेकदा अफवा पसरतात. विशेषत: एखाद्या सेलिब्रिटीच्या मृत्यूच्या अफवा तर यावरून अनेकदा व्हायरल होतात. अर्थात प्रचार युध्दासाठी ट्विटर हे रणभुमिचे काम करते. एखाद्याला बदनाम करणे वा खिल्ली उडविणे आदींसाठीही हेच उपयुक्त माध्यम आहे. याचाच वापर करून ‘इसीस’ सारख्या क्रूर संघटनेने जगभरात आपल्या दहशतीची धडकी भरविली आहे. अर्थात काहीही असो-जगाप्रमाणेच ट्विटर हे जीवंत अन् गतीमान आहे. मात्र दशकपुर्ती होत असतांना या साईटसमोर अस्तित्वाचेच आव्हान उभे राहिले आहे असे सांगितल्यास आपल्याला विश्‍वास बसणार नाही. पण ही बाब खरी आहे.
ट्विटरची वाढ गेल्या वर्षभरापासून खुंटली आहे. फेसबुक हे ज्या पध्दतीने सर्वसामान्यांपर्यंत पोहचले त्या तुलनेत ट्विटरला लोकप्रियता लाभली नाही. एक तर ट्विटर हे अभिजनांचे असल्याचा समज जगभरात पसरला असून ही ओळख अद्यापही पुसता आली नाही. यातच फेसबुकचा इंटरफेस थोडा सुलभ असल्याने त्या साईटला तुफान लोकप्रियता मिळाली. असे ट्विटरचे झाले नाही. अलीकडच्या काळात ट्विटरला नवीन युजर्स मिळत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. फेसबुक दीड अब्जांच्या पार गेले असतांना ट्विटरचे युजर्स ३२ कोटींवर अडकले आहेत. याचा सरळ फटका उत्पन्नावर पडला असून जाहिरातीत लक्षणीय तुट दिसून आली आहे. यामुळे अनेकांनी ट्विटरचा अंत होणार असल्याचे भाकितही केले आहे. ट्विटरवरच #riptwitter हा ट्रेंड मध्यंतरी खूप गाजला. अनेकांच्या मते ट्विटर शेवटची घटका मोजत आहे. शेअर बाजारातही या साईटचा समभाग गडगडला आहे. अशा अत्यंत विपरीत परिस्थितीत

मध्यंतरी कंपनीतून बाहेर पडलेले सहसंस्थापक जॅक डोर्सी यांना पुन्हा पाचारण करण्यात आला आहे. मात्र ज्या पध्दतीने स्टीव्ह जॉब्ज यांनी ऍपलला अपयशाच्या गर्तेतून काढले त्याप्रमाणे डोर्सी हे ट्विटरला वाचवू शकतील की नाही? याबाबत संभ्रम आहे. आज ट्विटर या विपरीत स्थितीतून बाहेर पडण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. अलीकडेच या साईटने फेसबुकप्रमाणेच अलगॉरिदमवर आधारित टाईमलाईन कर्यान्वित केली आहे. विविध प्रकारे युजर्स आपल्या साईटवर जास्त वेळ घालवतील यासाठी ट्विटरचे व्यवस्थापन आटोकाट प्रयत्न करत आहे. मात्र फेसबुकसारख्या सुलभ सोशल साईट आणि व्हाटसऍपसारख्या इन्टंट मॅसेंजरर्सच्या तुफान लोकप्रियतेपुढे ट्विटर अक्षरश: पीछाडीवर पडले आहे. मध्यंतरी ट्विटरने ‘डायरेक्ट मॅसेज’साठी दहा हजार शब्दांपर्यंत संदेश पाठविण्याची सुविधा प्रदान केली. फेसबुकप्रमाणेच ‘लाईक’ हे नवीन फिचर आणले. या साईटवरून लवकरच वस्तू खरेदी करण्याची सुविधादेखील मिळणार आहे. याची चाचपणीदेखील सुरू झाली आहे. अर्थात युजर्सला आकर्षित करण्यासाठी ट्विटर सर्व प्रकारांचा उपयोग करत आहे. मात्र असे असूनही नवीन युजर्स मिळविण्यासह जाहिरातीच्या उत्पन्नात वाढीचे त्यांचे प्रयत्न थिटे पडत आहेत.

याचमुळे यशस्वी दशकपुर्ती होऊनही ट्विटरचे आगामी काळात अस्तित्व तरी कायम राहणार का? हा प्रश्‍न विचारण्यात येत आहे. म्हणजे एकाच वेळी जगावर छाप टाकणार्‍या आणि स्वत:चे अस्तित्व टिकवण्याचा आटापिटा करण्याचा दुर्मिळ योग ट्विटरला लाभला आहे. अर्थात काहीही असले तरी आधुनिक जगाच्या इतिहासात ट्विटरला अनन्यसाधारण महत्व लाभले आहे.

About the author

shekhar patil

Leave a Comment