Featured slider विज्ञान-तंत्रज्ञान

टेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल

Written by shekhar patil

आज माझ्या टेकवार्ता (https://www.techvarta.com) या तंत्रज्ञानविषयक सर्वांगीण माहिती देणार्‍या पोर्टलला बरोबर चार वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय प्रसारमाध्यमांमधील डिजीटल पब्लीशींगचे क्षेत्र अगदी प्राथमिक अवस्थेत असतांना यातील अमर्याद संधी माझ्या लक्षात आली होती. यामुळे याहू जिओसिटीज, ब्लॉगस्पॉट आदींपासून सुरू झालेला प्रवास २००८ साली शेखरपाटील.कॉम या ब्लॉगच्या माध्यमातून नवीन आयामातून सुरू झाला. लागलीच ‘जळगाव लाईव्ह’सारखा जबरदस्त ब्रँड उभारण्यात आला. २०१० पासून च संकेतस्थळावर व्हिडीओ अपलोड करणार्‍या मोजक्या पोर्टल्समध्ये आमचा समावेश होता. यात प्रारंभी सर्व काम मीच करत असे. नंतर तुषार भांबरे, विजय वाघमारे, मिलींद कोल्हे, जितेंद्र कोतवाल आदी सहकारी तयार झाले. साईमतमध्ये शिपाई म्हणून काम करणार्‍या व अत्यंत चौकस बुध्दीच्या जितेंद्र पाटीलच्या हातात मी खास पोर्टलसाठी घेतलेला महागडा कॅमेरा देऊन त्याला थेट मैदानावर पिटाळले. अस्सल गावरान बोलीत बोलणार्‍या या तरूणाने अनेक बहारदार स्टोरीज आणल्या. आजच्या जवळपास सात वर्षांपूर्वी सुरेशदादा जैन यांना अटक झाल्यानंतर जळगाव लाईव्हने पहिल्यांदा बातमी ब्रेक केली होती. आणि व्हाटसअ‍ॅपपूर्वीच्या कालखंडात अवघ्या चार तासाच याला सव्वा लाख हिट आल्यावर या माध्यमाची जबरदस्त ताकद मी अनुभवली. दुदैवाने हे व्हेन्चर बंद पडले. मात्र याआधीच एका नवीन प्रोजेक्टचे बिजारोपण झाले होते. २० जून २०१४ रोजी टेकवार्ता हे पोर्टल सुरू केले. यात ‘जळगाव लाईव्ह’च्या चुका टाळल्या. टेकवार्तामध्ये फक्त आणि फक्त एकट्यानेच राबण्याचे ठरविले. सुरवातीला त्रास झाला. मात्र, थोड्याच दिवसात मजा येऊ लागली आणि नंतर झिंग चढली.

मी पत्रकारितेत यावे असे मला चंद्रकांत यादव या जळगावातील अफाट बुध्दीमत्ता आणि तितकेच शानदार व्यक्तीमत्व असणार्‍या वरीष्ठ पत्रकाराने सुचविले होते. योगायोगाची बाब म्हणजे टेकवार्ता सुरू करण्याआधी मी पुन्हा एकदा त्यांचा कौल घेतला. हे पोर्टल खूप धमाल करणार असल्याची त्यांची प्रतिक्रिया ऐकून मला हुरूप आला. अशा प्रकारे टेकवार्ताची सुरूवात झाली. मी आयुष्यात कोणत्याही व्हेन्चरचे उदघाटन केलेले नाही. ‘जळगाव लाईव्ह’चे तर महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाल्यानंतर म्हणजे अडीच वर्षांनी लोकार्पण केले होते. यामुळे टेकवार्ता सुरू करतांना अगदी जवळच्या मित्रांनाही सांगितले नव्हते. हे पोर्टल सुरू करतांना माझ्यासमोर निश्‍चित असे ध्येय नव्हते. तथापि, आपण इंटरनेटवर तंत्रज्ञानातील ज्या अद्ययावत घडामोडी वाचतो त्यांनाच सुलभ मराठीत उपलब्ध करून देण्याचे मनाशी ठरविले होते. याशिवाय वास्तवावर आधारित वृत्तांकनाला मी सातत्याने प्राधान्य देण्याचे ठरविले. यात चमत्कृतीजन्य दावे असणाऱ्या आशयाची शीर्षके आदींना मी जाणीवपूर्वक टाळले. अनेक पोर्टल्सवरील टेक न्यूजमध्ये कंटेंट आणि शीर्षकात कोणताही ताळमेळ नसतो. यामुळे वाचक बातमी वाचल्यानंतर शिव्या देतो. यामुळे हे सर्व प्रकार मी टाळले. अर्थात टेकवार्तावर अवास्तव दावे असणार्‍या बातम्या, फिचर्स आदींना थारा देण्यात आला नाही. यामुळे प्रारंभी वाचक मिळविण्यात अडचणी आल्या. मात्र टेकवार्तावरील बातम्यांनी विश्‍वासार्हता निर्माण केली, जी आजवर टिकून आहे. मी दररोज साधारणपणे तंत्रज्ञानातील ८० ते १०० हेडलाईन्सवरून नजर फिरवतो. यातील सुमारे ३० बातम्या वाचून यातील १० ते १२ बातम्यांचा अनुवाद करतो. हे सर्व काम सकाळी ७ ते १० या माझ्यासाठी ‘नॉन-प्रॉडक्टीव्ह’ असणार्‍या वेळेत पूर्ण होत असते.

वास्तविक पाहता, टेक्नॉलॉजी म्हटले की, बहुतांश जणांना फक्त नवीन स्मार्टफोन वा फार तर व्हाटसअ‍ॅप, फेसबुकसाख्या घटकांचीच आठवण येते. यामुळे मराठीत (खरं तर सर्वच भारतीय भाषांमध्ये) तंत्रज्ञानविषयक बातम्या या फक्त आणि फक्त स्मार्टफोन वा लोकप्रिय अ‍ॅपच्या भोवतीच फिरणार्‍या असतात. मात्र तंत्रज्ञानाचे क्षेत्र अतिशय अफाट आहे. यात प्रत्येक दिवसाला नवीन दालन उघडते. तर काही घटक निरोप घेत असतात. काहींबाबत खूप हाईप निर्माण होऊन थोड्या दिवसातच त्याचा फुगा फुटतो. तर काही अचानक तुफान लोकप्रिय होत असतात. या सर्व बारकाव्यांवर लक्ष ठेवत टेकवार्ताची वाटचाल सुरू आहे. आज पाचव्या वर्षात पदार्पण करतांना आजवरच्या वाटचालीच्या आढाव्यासह भविष्याचा वेध घेतला असता काही ठळक बाबी समोर येतात. अर्थात या लेखाजोख्यातून आजवरच्या वाटचालीतील बेरीज-वजाबाकीदेखील आपोआपच डोळ्यासमोर उभी राहते.

टेकवार्ताने मला काय दिले ?

हा प्रश्‍न मला सर्वच जण विचारतात. याला मोजक्या शब्दांमध्ये उत्तर देणे कठीण आहे. मात्र याला काही मुद्यांच्या आधारे याला आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो.

१) जबरदस्त आत्मविश्‍वास- वर्तमानपत्रासह सोशल मीडियातील लिखाणाने मला आधीच थोडा लौकीक मिळवून दिला आहे. माझा स्वत:चा ब्लॉगदेखील खूप लोकप्रिय असला तरी याचा अवाका मर्यादीत असल्याची जाणीव मला आहे. यावर मी अगदी दररोज लिखाण अपडेट करू शकत नाही. ‘जळगाव लाईव्ह’ सारखा ब्रँड तयार केला तरी याच्या इकॉनॉमीकल मॉड्युलमध्ये आम्ही मागे पडलो. या पार्श्‍वभूमिवर, अगदी एक हाती चालविलेल्या टेकवार्ताने माझ्या आत्मविश्‍वासात केलेली वाढ मी शब्दांमध्ये नमूद करू शकत नाही. एकट्यानेच काम करण्याची मजा यातून मला आली. सर्वात महत्वाची बाब म्हणजे दुसर्‍यांवर अवलंबून राहणे सोडल्यामुळे जबाबदारीची जाणीवदेखील प्रगाढ झाली. आणि ही जबाबदारी अव्याहतपणे पार पाडल्यामुळे साहजकीच आत्मविश्‍वास मोठ्या प्रमाणात वाढला. आता जिथे हात टाकू तिथे ऑनलाईन व्हेन्चर यशस्वी करू असा आत्मविश्‍वास आला आहे. ही माझी चार वर्षांमधील सर्वात मोठी कमाई होय.

२) लोकमान्यता- टेकवार्ताच्या आधी मी टेक्नोसॅव्ही असल्याचे अनेकांना माहित होते. याच्या सोबतीला विविध विषयांवरील लिखाणामुळेही मला ख्याती मिळाली होती. तथापि, एखाद्या विषयात पारंगत असल्याची मान्यता मला फक्त आणि फक्त टेकवार्तानेच मिळवून दिली. याला थोडा वेळ लागला. मात्र आज अनेक मान्यवर तंत्रज्ञानातील अडचणीसाठी मला कॉल करतात. यात पत्रकारिता, राजकारण, उद्योग, समाजसेवा, व्यापार आदींमधील अनेक ख्यातनाम व्यक्तीमत्वांचा समावेश आहे. अनेकांशी माझे मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले आहेत. याहूनही लक्षणीय बाब म्हणजे अन्य वर्तमानपत्रांमध्ये माझ्या लिखाणाचा समावेश होऊ लागला. आज मी जनशक्तीमध्ये कार्यरत आहे. असे असले तरी लोकमत, सकाळ, सामना आदी विविध वर्तमानपत्रांनी माझ्या लिखाणाला प्रसिध्दी दिली आहे. तर काही वाहिन्यांच्या कार्यक्रमातही थेट अथवा मोबाईलवरून सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. अनेकदा कोणत्याही मुद्यावर टेकवार्ताचा संदर्भ दिला जात असल्याचेही आता निदर्शनास येत आहे. यामुळे तंत्रज्ञानविषयक लिखाणाच्या क्षेत्रात मला थोडाफार नावलौकीक मिळाल्याची बाबा नाकारता येत नाही.

३) पैसा- टेकवार्ता सुरू करतांना यातून नेमका पैसा कसा येणार ? याबाबत माझ्याकडे कोणतेही मॉड्युल नव्हते. यामुळे दोन वर्षानंतर थोडेफार पैसे येऊ लागले तेव्हा आनंद गगनात मावेनासा झाला. मात्र अलीकडे याच्या प्रमाणात चांगलीच वृध्दी झाली आहे. टेकवार्ताच्या मॉनेटायझेशनचे विविध मार्ग आता नजरेस पडत आहेत. आज अगदी पत्रकारिता सोडून मी पूर्णवेळ काम केले तरी यात अतिशय उत्तम करियर करू शकतो अशी स्थिती आहे. तथापि, अद्यापही माझा मूळचा पिंड ‘नॉन-प्रोफेशनलीझम’ या प्रकारातील असल्याचा फटका मला खूप मोठ्या प्रमाणात बसल्याचेही मी खुल्या दिलाने स्वीकारले आहे. अन्यथा, दोन-चार टेक-फिचर्सच्या बळावर ‘आयटी तज्ज्ञ’ म्हणून मिरवणारे आणि त्यांना डोक्यावर घेणारे आपण सर्व जण पाहत आहोत. याच्या तुलनेत मी खूप मागे असल्याचे नम्रपणे मान्य करत आहे.

४) वेळेचे भान- मुळातच वर्तमानपत्रात काम करणार्‍या कोणत्याही व्यक्तीला प्रचंड प्रमाणात ‘टाईम कॉन्शसनेस’ असतो. मात्र वेब व्हेंचरमध्ये हा सर्वात महत्वाचा घटक असल्याचे आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. अर्थात कोणत्याही संकेतस्थळावर नियमितपणे बातम्यांचे अपडेशन नसेल तर ते यशस्वी होणार नाही हे निश्‍चत आहे. एखादा व्यापारी हा ग्राहक असो वा नसो दुकान उघडून बसतो. याच पध्दतीत व्हिजीटर्स असो वा नसो आपले संकेतस्थळ कायम सुरू राहणे आणि यावर अपडेशन होणे गरजेचे आहे. आपल्या वेबसाईटवर सातत्याने अपडेशन होत असेल तर व्हिजीटर्स नियमितपणे येतात. यामुळे एखाद्या दिवशी मी खूप बिझी असेल, बाहेरगावी जावे लागेल अथवा कौटुंबिक काम असेल तर मी अपडेशनचे अचूक नियोजन करून ठेवतो. गत वर्षी (८ मे २०१७) माझ्या वडिलांचे देहावसान झाले. या दिवशीसुध्दा अचूक नियोजनाच्या बळावरच मी पाच बातम्या अपडेट केल्याची बाब येथे मुद्दाम नमूद करावीशी वाटते. यामुळे पोर्टलवरील नियमीत अपडेशन आणि ते डाऊन झाल्यास तातडीने सुरू करणे खूप आवश्यक असल्याचे टेकवार्ताने शिकवले. गत चार वर्षात कदाचित मी एखादी सांज भोजन करायचे विसरून गेला असेल. मात्र पोर्टलवरील अपडेशनला कधीही खो दिला नसल्याचे येथे नम्रतापूर्वक नमूद करत आहे.

५) दुसर्‍यावर विसंबून राहू नका- मी गेल्या चार वर्षात प्रचंड आसुसलेपणाने टेकवार्ताचे संगोपन केले. यामुळे आज याला थोडाफार नावलौकीक मिळाला आहे. स्वत:ला झोकून देत कोणताही प्रोजेक्ट केल्यास तो नक्कीच यशस्वी होत असल्याचे मला या प्रवासातून दिसून आले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे कोणत्याही ऑनलाईन व्हेंचरमध्ये दुसर्‍यावर विसंबून राहणे किती धोकेदायक असते हे मला आधीच्या दोन अनुभवांमधून दिसून आले आहे. एक तर लोकांना या माध्यमाचा हवा तसा अनुभव नसून यातील कार्यसंस्कृतीचाही गंध नसतो. यामुळे इतरांना सोबत घेऊन कोणतेही संकेतस्थळ सुरू केल्यास याच्या यशावर विपरीत परिणाम होत असल्याचा कटु अनुभव गाठीशी आहे. यामुळे टेकवार्तामध्ये मी स्वत: लक्ष घातले आहे. याचे अनेक साईड इफेक्ट झाले. एक तर, मी यात गुंतून पडलो. अन्य प्रोजेक्ट मागे पडले. सर्वात महत्वाचे म्हणजे खूप मोठा खर्च अंगावर घ्यावा लागला. याच्या जोडीला प्रचंड कष्ट होतेच. मात्र टेकवार्ता आज बर्‍यापैकी प्रस्थापित ब्रँड झाला असतांना याची सर्व फळे एकट्याला चाखायला मिळणार असल्याचा आनंददेखील आहेच. भविष्यात इतरांना सोबत घेऊन अन्य प्रोजेक्ट करणार आहेच. मात्र माझ्यातील क्षमता ओळखण्याची अतिशय कठीण अशी परीक्षा टेकवार्ताने घेतली. यात उत्तीर्ण झाल्यामुळे आता इतर प्रोजेक्ट अधिक दमदारपणे करणार हे निश्‍चित.

भविष्यात काय ?

टेकवार्ताला थेट विकत घेण्यासाठी अथवा यात गुंतवणूक करण्यासाठी काही आकर्षक ऑफर्स आधीच आल्या आहेत. यात मीडिया हाऊसेससह आयटी कंपन्यांचाही समावेश आहे. आज तरी यावर मी विचार केलेला नाही. मात्र भविष्यात नेमके काय होणार हे आजच सांगता येणार नाही. तथापि, टेकवार्तावर लवकरच नाविन्यपूर्ण घटकांचा समावेश करण्यात येणार असल्याचे मी ठामपणे सांगू शकतो. यावर तंत्रज्ञानातील विविध अंगांना अतिशय सुलभ पध्दतीत आपल्यासमोर सादर केले जाईल याची ग्वाही देतो. माय मराठीच्या डिजीटल वाटचालीत एक महत्वाचा अध्याय हा टेकवार्ताच्या स्वरूपात आधीच निर्माण करण्यात आल्याचे समाधान आहेच. यात भविष्यात अजून भर घातली जाणार आहे. काही ऑनलाईन व्हेंचरवर आधीच प्रचंड गतीने काम सुरू असून याबाबत लवकरच घोषणा होऊ शकते.

अनमोल सहकार्य

टेकवार्तामध्ये शिपायापासून ते सीईओ पर्यंत, आणि कंटेंट रायटरपासून ते संपादकापर्यंतच्या सर्व भूमिका मीच पार पाडत आहे. मात्र या वाटचालीत अनेक मान्यवरांनी केलेली मदत विसरू शकणार नाही. माझ्या कुटुंबाने मला समजून घेतले. घरी तासन-तास लॅपटॉपमध्ये डोके खुपसून असतांनाही त्यांनी कोणती तक्रार केली नाही. साईमतचे मालक/संपादक प्रमोद बर्‍हाटे आणि जनशक्तिचे मालक/संपादक कुंदन ढाके यांनी दिलेल्या स्वातंत्र्याबाबतही मी कायम ऋणी राहणार आहे. या दोन्ही ठिकाणी मिळालेल्या ‘क्रियेटीव्ह स्पेस’चा मी समर्पक वापर केल्याचे समाधान आहेच. माझी समर्पित वृत्ती काही सहकार्‍यांनीही घेतल्याचा आनंददेखील आहेच. तुषार भांबरे आणि सौरभ पुराणिक या सहकार्‍यांमुळे माझा बराच वेळ वाचला. आधी कोणतीही तांत्रीक अडचण आल्यास मला स्वत: डोकेमारी करावी लागत असते. या दोघांमुळे मी आता निर्धास्त असतो. टेकवार्ता सुरू होण्याच्या प्रारंभीच्या काळात चंद्रकांत यादव आणि विक्रांत पाटील या पत्रकार मित्रांच्या सूचनांचा खूप लाभ झाला. नंतर विजय वाघमारे आणि निलेश झालटे यांच्याही सूचना उपयोगात आल्या. पत्रकारितेत नसूनही विष्णू पाटील, संजय सपकाळे आणि योगेश सूर्यवंशी हे सातत्याने नवनवीन सुधारणांबाबत चर्चा करत असतात. तर टेकवार्ताच्या वाटचालीत कधी गतिरोध आल्यास सुनील चौधरी हा माझा अवलीया मित्र मदतीला धावून येतो. त्याच्यासोबतचे डिस्कशन हे माझ्यासाठी नेहमी बुस्टर डोस ठरत असते. याशिवाय अनेकांनी मला मार्गदर्शन केलेय. या सर्वांना आज वंदन करतो. आणि याच झपाटलेपणाने भविष्यातही काम करत राहील याची ग्वाही देतो.

About the author

shekhar patil

4 Comments

  • अतिशय प्रेरणादायी आहे सर आपला प्रवास, आम्हा नवख्याना खूप प्रेरणा देऊन जातो सर आपला हा प्रवास, आपणही असं काही तरी करावं यासाठी विचार करायला लावणारा असा हा तुमचा अनुभव आहे

  • सही मायने में बडे आदमी के सारे लक्षण आपमें मौजुद है… दिल, दिमाग से बडे तो आप हैही देखना दौलतभी एक ना एक दिन चलकर आप के कदमो तक आयेगी…

Leave a Comment