चालू घडामोडी विज्ञान-तंत्रज्ञान

ज्ञानाचा मुक्तस्त्रोत

Written by shekhar patil

अमेरिकेतील विख्यात ‘खान अकॅडमी’ने आता हिंदीतली आपली सेवा सुरू केली आहे. मुळात मोठी व्याप्ती असणारा हा विषय मुळातून समजून घेतल्यास आपल्याला ही ऐतिहासिक घटना असल्याचे समजेल.

सायबरविश्‍वातील बहुतांश घडामोडी या आपल्या आयुष्याशी अत्यंत निगडीत असल्याचे दिसून येते. दररोज तंत्रज्ञानातील घडामोडी समजून घेतांना मला याची जाणीव प्रकर्षाने होते. याचा विचार करता अलीकडची एक घटना ही अतिशय लक्षणीय असल्याचे माझे मत आहे. अमेरिकेतील विख्यात ‘खान अकॅडमी’ने आता हिंदीतली आपली सेवा सुरू केली आहे. आता आपण तातडीने यात काय ते विशेष? असे म्हणाल. मात्र मुळात मोठी व्याप्ती असणारा हा विषय मुळातून समजून घेतल्यास आपल्याला ही ऐतिहासिक घटना असल्याचे समजेल.

सर्वप्रथम ‘खान अकॅडमी’ची महत्ता समजून घेण्यासाठी सायबर विश्‍वातील ‘ओपनसोर्स’ची मोलाची कामगिरी जाणून घ्यावी लागेल. नव्वदच्या दशकाच्या मध्ययावर इंटरनेट जगात पोहचत असतांना जगातील प्रत्येक बाब ‘ऑनलाईन’ होईल अन् यासाठी पैसे मोजावे लागतील. अर्थात इंटरनेट म्हणजे पैसाच पैसा…यावरूनच सर्व व्यवहार होतील, असा गैरसमज पसरला. मात्र सहस्त्रक संपण्याच्या आधीच हा ‘डॉटकॉम फुगा’ फुटला. इंटरनेटवर थेट पैसे कमावणे किती कठीण आहे याची जाणीव कंपन्यांना आली. यातच मुक्तस्त्रोत अर्थात ‘ओपनसोर्स’ला बळकटी मिळाली. आधी मायक्रोसॉफ्टने सॉप्टवेअर्स विकून अब्जावधी डॉलर्स कमावले असतांना लिनक्ससारख्या प्रणाली मोफत आल्या अन् भविष्यात यातूनच विकसित झालेल्या अँड्रॉईडसारख्या अत्याधुनिक सिस्टीमही याच प्रकारातील गणल्या गेल्या. संगणकीय सॉफ्टवेअर्समध्ये मुक्तस्त्रोत बाळसे धरत असतांना इंटरनेटवर अन्य प्रकारांमध्येही तो प्रचलित झाला. मग यातूनच मोफत चित्रपट, संगीत, पुस्तके, छायाचित्रे, व्हिडीओज आदी प्रदान करणार्‍या साईट अवतीर्ण झाल्या. याच गदारोळात २००६ साली अमेरिकेत सलमान खान या तरूणाने ‘खान अकॅडमी’ सुरू केली. यात कोणत्याही विषयाशी संबंधीत ट्युटोरिअलची व्हिडीओ शुटींग करून ते युट्युब चॅनलवर मोफत उपलब्ध करून देण्यास सलमानने प्रारंभ केला. आता ही संकल्पना अगदी सोपी असली तरी तेव्हापर्यंत कुणाच्या मनातही हा विचार आला नव्हता. आधी गणितासह काही मोजक्या विषयांचे व्हिडीओ टाकल्याने त्याला अफाट लोकप्रियता मिळाली. यामुळे त्याने जाणीवपुर्वक याचा विस्तार केला. आज आपण कल्पनादेखील करणार नाही इतक्या विलक्षण रितीने ‘खान अकॅडमी’ भरभराटीस आली आहे. विशेष बाब म्हणजे ही अकॅडमी ८० टक्के देणग्या तर २० टक्के युजर्सनी स्वखुशीने दिलेल्या देणगीवर चालत आहेत. मायक्रोसॉफ्ट, गुगल, फेसबुक आदींसारख्या कंपन्यांसह अनेक स्वयंसेवी संस्थांनी या अकॅडमीला देणग्या दिल्या आहेत. अगदी बिल गेटस्सारख्या जगातील सर्वात धनाढ्य व्यक्तीनेही आपण ‘खान अकॅडमी’चा उपयोग करत असल्याची माहिती दिलीय हे विशेष.

आज जगातील असा कोणताही विषय नाही की ज्यावर ‘खान अकॅडमी’चा व्हिडीओ नाही. अगदी शालेय शिक्षणातील प्राथमिक विषयांपासून ते पीएच.डी.च्या संशोधकांना मार्गदर्शनपर जागतिक दर्जाच्या व्हिडीओजचे भांडार त्यांच्याकडे आहे. यात विविध तज्ज्ञांनी शिकवलेले विषय आहेत. दररोज नवनवीन व्हिडीओजची यात भर पडत आहे. ‘खान अकॅडमी’च्या साईटला महिन्याला दोन कोटी लोक व्हिजीट करत असतात. तर त्यांच्या युट्युब चॅनलचे तब्बल २० लाख सबसक्रायबर्स आहेत. या अकॅडमीचे सर्व व्हिडीओज इंग्रजीत असले तरी ते अन्य भाषांमध्ये अनुवादीत करण्यात आले आहेत. स्पॅनीश, चिनी, पोर्तुगीज आदी प्रमुख भाषांमध्ये या संस्थेने आपली सेवा सुरू केली होती. आता नुकतीच ही सेवा हिंदी भाषेसाठी सुरू करण्यात आली आहे. आपण https://www.youtube.com/user/KhanAcademyHindi या युआरएलवर जाऊन ‘खान अकॅडमी’चे हिंदीतून विविध विषयांवरील व्हिडीओज पाहू शकतात. भारतासह जगात हिंदी समजणार्‍यांची संख्या सुमारे १०० कोटी असल्याचे मानले जाते. या पार्श्‍वभुमिवर आता या एक अब्ज जनतेसाठी ज्ञानाचा मुक्तस्त्रोत उपलब्ध झाला आहे. यातच लवकरच अन्य भारतीय भाषांमध्येही हे व्हिडीओज उपलब्ध करण्यात येणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे इंटरनेटची सुविधा नसणार्‍या शाळांमध्ये हे व्हिडीओ डाऊनलोड करून दाखविण्याची योजनादेखील सलमान खान यांनी बनविली आहे. म्हणजेच ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पध्दतीने ज्ञानदानाचे कार्य होणार आहे.

भारतीय शिक्षण प्रणालीत आजवर अब्जावधी रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. अगदी प्रौढ शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत विविध योजनांच्या माध्यमातून खूप प्रयत्न करूनही उच्च दर्जाचे शिक्षण देण्यात आपण कमी पडलो आहोत. यामुळे एखाद्या अध्ययनात वाकबगार असणार्‍या तज्ज्ञाच्या तासिकेचे व्हिडीओ चित्रीकरण करून ते जगाला मोफत उपलब्ध करण्यात फारशी अडचण येण्याची शक्यता नाही. ‘खान अकॅडमी’ने नेमक्या याच पध्दतीने ज्ञानाचा अजस्त्र मुक्तस्त्रोत जगाला उपलब्ध करून दिला आहे. आता हिंदीत ‘खान अकॅडमी’ आल्याने ज्ञानावर एकाधिकाराचा प्रयत्न करणार्‍या शिक्षण संस्था, खासगी कोचिंग क्लासेस आदींना दणका बसणार हे निश्‍चित. आता रतन टाटा यांनी खान अकॅडमीसोबत सहकार्याचा करार करून भारतात मोफत ऑनलाईन शिक्षणाला पाठबळ दिले आहे. मुळातच शिक्षण क्षेत्र हे त्यातील ‘प्रॉफिट’ साठी ओळखले जात असतांना खान अकॅडमीसारख्या ‘नॉन प्रॉफिट’ संस्था या सर्वसामान्यांसाठी अत्यंत आश्‍वासक अशाच आहेत. भारतात वा महाराष्ट्रात असा एखादा सलमान खान निर्माण होईल तेव्हापर्यंत आपण किमान ‘खान अकॅडमी’ला भेट देऊन आपल्याला हव्या त्या विषयाचे ज्ञान मिळवू शकतात. मी स्वत: याचे अनेक व्हिडीओज पाहिले असून ते अत्यंत उच्च दर्जाचे असून मला खूप उपयोगात पडले आहेत.

जाता-जाता: सध्या व्हाटसऍपसारख्या मॅसेंजरला मिळालेली अलोट लोकप्रियता पाहता एखादा भारतीय सलमान खान याच्याच माध्यमातून उच्च दर्जाचे ज्ञान अगदी कोट्यवधी स्मार्टफोनवर पोहचवू शकतो. म्हणजे उत्तम पध्दतीने शिकवणार्‍यासमोर स्मार्टफोन धरून ते ‘ट्युटोरिअल’ व्हाटसऍपच्या माध्यमातून लागलीच व्हायरल केल्यास याचा किती व्यापक परिणाम होईल याची कल्पना आपण तरी करू शकतो का? यातच फोर-जी क्रांतीचे पडघमही ऐकू येत आहेत. यामुळे कुणीही अत्यंत परिणामकारकरित्या ज्ञानदान करू शकतो. गरज आहे ती पुढाकार घेण्याची…खान अकॅडमीची कॅचलाईन ‘यू कॅन लर्न एनिथिंग’ ही या संस्थेच्या ध्येयधोरणांना अत्यंत समर्पकपणे व्यक्त करणारी तर आहेच पण; आता ज्ञानावर कोणतीही बंधने लादण्याचे दिवस गेल्याची द्वाहीदेखील फिरवणारी आहे.

सलमान खान

सलमान खान

About the author

shekhar patil

Leave a Comment