Featured slider साहित्य

ज्ञानयात्री राहूल सांकृत्यायन

Written by shekhar patil

आज महापंडित राहूल सांकृत्यायन यांची १२५ वी जयंती. कुणी व्यक्ती एकाच जीवनात किती विविध क्षेत्रांमध्ये सहजपणे मुशाफिरी करू शकते याचे उत्तम उदाहरण राहूलजींशिवाय कुणाचे असू शकत नाही. प्रवासाची आणि अर्थातच संपर्काची कोणतीही आधुनीक साधने नसतांना त्यांनी अनेक देशांच्या यात्रा केल्या. हे निव्वळ पर्यटन नव्हते, तर तीव्र ज्ञानासक्ती आणि अर्थातच स्वत्वाच्या शोधातून त्यांनी विपुल प्रवास केला. याच्या जोडीला हिंदी साहित्यात मोलाची भर टाकणार्‍या अनेक कालजयी कृतींचे रचियेता म्हणूनही ते ख्यात आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे राहूल सांकृत्यायन यांचे जीवनच हे एखाद्या कादंबरीपेक्षा जास्त चित्तथरारक आहे.

भारताचे माजी परराष्ट्रमंत्री नटवरसिंह यांच्या नाव ‘वन लाईफ इज नॉट इनफ’ या आत्मचरित्राचे नाव मला खूप भावते. जीवनाची तीव्र आसक्ती असणार्‍यांना एक जीवन खुपच तोकडे वाटते. मात्र दुसरीकडे सार्थकतेचा शोध घेतला तर क्षणभंगुर वाटणारे जीवन किती सहजतेने विविध आयामांमधून जगता येते याला राहूल सांकृत्यायन यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या जीवनकार्याला एखाद्या लेखातून अभिव्यक्त करणे फारसे सोपे नाही. कारण हा माणूस इतक्या पॅशनेटली जगला की, त्यांना मोजक्या शब्दांमध्ये पकडणे जिकरीचे ठरते. त्यांनी विपुल लिखाण केले. तथापि, तब्बल २५०० पानांचे सहा खंडातील आत्मचरित्र लिहणार्‍या राहूलजींना अचूकपणे समजून घेणेही फारसे सोपे नाही. एका परंपरावादी ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेल्या बालकाचा वैष्णव मठाचा महंत, आर्यसमाजी, काँग्रेसी कार्यकर्ता, शेतकरी नेता, बुध्दीस्ट ते कम्युनिस्ट असा झालेला प्रवास हा स्तिमीत करणाराच आहे. हा प्रवास निव्वळ केदारनाथ पांडेय ते राहूल सांकृत्यायन या नावांमधीलही नव्हे. तर ही त्यांची जीवनयात्रा एकाच वेळी विविध समांतर आयामांमधून झाल्याचे दिसून येते.

राहूल सांकृत्यायन यांचे नाव येताच डोळ्यासमोर सर्वप्रथम एक भटक्या व्यक्ती उभा राहतो. आज जग सर्वसामान्यांच्या मुठीत आले आहे. कुणीही सर्वसाधारण व्यक्ती जगाच्या अगदी कान्याकोपर्‍यात सहजपणे जाऊ शकतो. प्रवासासह संपर्काच्या अत्याधुनीक सुविधा आज उपलब्ध असल्यामुळ भटकंती करणे फार सोपे झाले आहे. तथापि, एक शतकापूर्वीच्या कालखंडात राहूलजींनी अनेक देशांच्या सफरी केल्या. खरं तर जगाच्या इतिहासातील भटके लोक वा समूह हे (अल्प अपवाद वगळता) एक तर व्यापार, सत्ता अथवा धर्मप्रचार याच कारणांसाठी आपला जीव धोक्यात घालून प्रवास करत होते हे दिसून आले आहे. प्राचीन भारतातील बौध्द धर्माच्या प्रसारासाठी शेकडो भिख्खु जगाच्या विविध देशांमध्ये विखुरले. ख्रिस्ती मिशनरीजनीही जगाच्या कान्याकोपर्यात धर्मप्रचाराचे काम केले. तर चीनसारख्या देशातून जीवावर उदार होत युऑन श्‍वांग आणि फाहेनसारख्यांनी भारतातील ज्ञान आपल्या देशात नेण्यासाठी आयुष्य अर्पण केले. मात्र दुसरीकडे राहूल सांकृत्यायन यांनी भरपूर प्रवास केला. मात्र याला दोन आयाम होते. एकात ते स्वत:चा शोध घेत राहिले. एका अर्थाने भटकंतीतून त्यांनी अंतर्यात्रा केली. जगाच्या विविध देशांमधील धर्म, तत्वज्ञान, उपासना पध्दती, इतिहास, साहित्य आदींना त्यांनी समजून घेतले. यातून वेळोवेळी त्यांचे मत परिवर्तन झाले. याचमुळे परम आस्तिकतेकडून त्यांचा निरिश्‍वरवादाकडे प्रवास झाला. कम्युनिस्टांमधील पोथिनिष्ठताही त्यांनी भावली नाही. यावर त्यांनी कडाडून प्रहार केला. यामुळे राहूलजींना आयुष्याच्या उत्तरार्धात कम्युनिस्टांकडून उपेक्षादेखील सहन करावी लागली. डावा विचार आणि इस्लामी संस्कृतीचे भारतीयकरण व्हावे हा विचार त्यांनी १९४८ सालीच्या एका भाषणातून मांडल्यानंतर हलकल्लोळ उडाला. त्यांनी भाषाशुध्दीचाही प्रश्‍न हिरीरीने मांडला. बहुभाषाविद् असणार्‍या राहूलजींनी मातृभाषा हीच व्यवहारातील भाषा आणि ज्ञानभाषा असावी असा आग्रह धरला. आज एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी त्यांचे हे विचार समकालीन वाटतात ही बाब लक्षात घेण्याची गरज आहे.

दुनीया की सैर कर गाफील,
जिंदगानी फिर कहा ?
जिंदगी गर कुछ रही
तो ये जवानी फिर कहा ?

हा शेर कानावर पडल्यामुळे आपण भटकंतीसाठी प्रेरीत झाल्याचे राहूलजींनी आपल्या आत्मचरित्रात नमूद केले आहे. त्यांनी हजारो किलोमीटरचा प्रवास केला. या दरम्यान अनेकदा त्यांच्या जीवावर बेतले. त्यांना अपार कष्ट, वेदना सहन कराव्या लागल्या. फिरस्ती करतांना पैशांची सातत्याने चणचण तर होतीच. मात्र असे असतांनाही अदम्य इच्छाशक्तीच्या मदतीने त्यांनी पायाला अक्षरश: चाके लावली. बालपणापासूनच त्यांना आध्यात्मात रूची होती. यामुळे त्यांच्या भटकंतीला याचा पहिला आयाम होतात. याच्या जोडीला प्राचीन ग्रंथ, हस्तलिखीते आदींमधील ज्ञान संपादन करण्याच्या इच्छेपायी त्यांनी आपल्या भटकंतीत त्या-त्या भागातील धार्मिक ग्रंथांना भारतात आणण्याचा सपाटा लावला. काही शतकांपूर्वीच भारतातून बुध्द धर्माचा प्रचार लोप पावल्यावर श्रीलंका, तिबेट, चीन, जपान आदींसारख्या देशांमध्ये या धर्माशी संबंधीत दुर्मीळ ग्रंथ असल्याची माहिती त्यांना मिळाली. यामुळे या देशांमधून त्यांनी अनेक दुर्मीळ हस्तलिखीते भारतात आणली. विशेष करून तिबेटमधून त्यांनी आणलेल्या विपुल ग्रंथभांडारामुळे भारताच्या प्राच्यविद्या शाखेत मोलाची भर पडली. एका अर्थाने केदारनाथ पांडे या नावाचा त्याग करून एका मठात उदासीन बाबा महंत आणि आर्यसमाजात दामोदरदास स्वामी ही नाव धारण केल्यानंतर त्यांच्या जीवनाला भटकंतीने नवीन दिशा दिली. बौध्द धर्माचे गहन अध्ययन केल्यानंतर १९३० मध्ये त्यांनी धम्माचा स्वीकार केला. यासोबत तथागत गौतम बुध्दांच्या पुत्राचे राहूल हे नाव धारण केले. आणि मूळ गोत्र असणार्‍या संस्कृतमुळे सांकृत्यायन हे उपनाव लावले. याच नावाने ते पुढे ख्यात झाले.

विविध देशांमधील दुर्गम भागांना भेट देत तेथील धर्मग्रंथ, तत्वज्ञान, इतिहास, पुरातत्वशास्त्र आदींचे अध्ययन करून अधून-मधून भारतात परतण्याचा मार्ग राहूल सांकृत्यायन यांनी पत्करला. याच दरम्यान जुलमी ब्रिटीश सत्तेला उलथून टाकणार्या चळवळीने त्यांना आकर्षीत केले. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र्यलढ्यात त्यांनी सहभाग घेतला. अनेक वर्षे कारावासही भोगला. मात्र काँग्रेस नेतृत्वाचे भांडवलदारांशी असणारे साटेलोटे आणि एकंदरीतच सर्वसमावेशकतेचा अभाव पाहून ते काँग्रेसपासून दूर गेले. यानंतर राहूलजींनी स्वत:ला शेतकरी आंदोलनात झोकून दिले. यामुळे पुन्हा कारावास भोगला. दरम्यान, देशभरातील शोषीत घटकांच्या उत्थानाचे कार्य मार्क्सवादाच्या माध्यमातूनच शक्य असल्याचे जाणून घेतल्यानंतर राहूलजींनी डाव्या विचारांची पताका आपल्या खांद्यावर घेतली. अर्थात या विचारधारेमधील त्रुटींवर कडाडून प्रहार करण्यासही त्यांनी पुढेमागे पाहिले नाही. यामुळे त्यांची कम्युनिस्ट पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. आता हीच लालभाई मंडळी राहूल सांकृत्यायन यांचा वारसा सांगतेय हा काळाने उगवलेला सूडच मानावा लागणार आहे. वर नमूद केल्यानुसार मार्क्सवादाचे भारतीयकरण करण्याचा आग्रह राहूलजींनी धरला होता. साठच्या दशकाच्या उत्तरार्धात कम्युनिस्ट पक्षाच्या उडालेल्या शकलांमध्ये या विचाराचे प्रतिबिंब दिसून आले. यानंतर डाव्यांना लवचीकता स्वीकारावी लागली. आजच्या ७० वर्षांपूर्वीच राहूलजींनी याचे सूतोवाच केले होते हे विशेष.

आपली अंतर्यात्रा, बहिर्यात्रा, राजकीय व सामाजिक आंदोलनांमधील सहभाग आणि अर्थातच विपुल अध्ययनात मग्न असणार्‍या राहूलजींनी वेळात वेळ काढून विपुल सृजन केले. खरं तर ते हिंदी व संस्कृतच नव्हे तर तर इंग्रजी, उर्दू, फारसी, अरबी, पाली, प्राकृत आदी भाषांमध्ये पारंगत होते. तर त्यांना एकंदरीत तब्बल ३६ भाषांचे ज्ञान होते. मात्र हिंदीवरील त्यांचे निस्सीम प्रेम शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहिले. हिंदी आणि उर्दूतील फरक स्पष्ट करून त्यांनी एक राष्ट्र एक भाषाचा पुरस्कार केला. हिंदीला ‘खडी बोली’ हे नाव राहूलजींनीच दिलेय. आपण आयुष्यात अनेकदा नाव बदलले, विचार बदलले, राजकीय विचारधारा बदलली तरी हिंदीप्रेम मात्र कायम ठेवल्याचे त्यांनीच एका ठिकाणी उद्धृत केले आहे. भाषा ही पुस्तकांमधून वा उच्चभ्रू समाजातून नव्हे तर कष्टकरी वर्गातून विकसित होत असल्याचेही त्यांचे ठाम मत होते. अर्थात अस्सल हिंदीत्वाचा मृदगंध राहूल सांकृत्यायन यांच्या सृजनातून दरवळला आहे. लौकीक अर्थाने आठवीपर्यंतच शिक्षण झालेल्या राहूल सांकृत्यायन यांना ‘महापंडित’ या उपाधीने गौरवान्वित करण्यात आले. आज ते हिंदी भाषेचे भूषण म्हणून ओळखले जातात.

राहूल सांकृत्यायन यांनी कथा, कादंबरी, नाटक, प्रवासवर्णन, चरित्र/आत्मचरित्र, धर्म/आध्यात्म, इतिहास, तत्वज्ञान, निबंध, लेख, नाटक अशा विविध माध्यमांमधून विपुल लिखाण केले आहे. याच्या जोडीला अनेक प्राचीन धर्मग्रंथ आणि दुर्मीळ हस्तलिखीतांचे संपादनही त्यांनी केले आहे. खरं तर राहूलजींचे अनेक ग्रंथ जगातील अनेक भाषांमध्ये अनुवादीत झाले आहेत. तथापि, ‘वोल्गा से गंगा’ या ग्रंथाने त्यांना अमर केले आहे. मानवी संस्कृतीच्या विकासाला कालानुक्रमबध्द कथांच्या माध्यमातून त्यांनी अतिशय अभिनव पध्दतीने दर्शविले आहे. त्यांचा हा ग्रंथ अजरामर झाला आहे. इसवी सनपूर्व ६,००० ते १९४२ पर्यंतच्या कालखंडाचा व्यापक पट असणारा हा ग्रंथ आजही तुफान लोकप्रिय आहे.

त्यांनी उत्तमोत्तम अनुवाद केलेत. हिंदी भाषिकांना त्यांनी हे नवे दालन उपलब्ध करून दिले. याच्या जोडीला अनेक भाषणांमधून त्यांनी अनेक विषयांवर मौलिक विचार व्यक्त केले आहेत. मार्क्स, लेनीन, स्टालीन, माओ आदी समाजवादी नेत्यांची चरीत्रे त्यांनी लिहली. तर बौध्द तत्वज्ञानाला सुलभ हिंदीत अनुवादीत करण्याचे महत्कार्यदेखील त्यांचेच ! राहूल सांकृत्यायन यांचे वक्तृत्वदेखील विलक्षण होते. अमोघ वक्ते म्हणून ख्यात असणारे राहूलजी अतिशय शुध्द आणि प्रवाही हिंदीतून कोणत्याही विषयावर बोलण्यासाठी ख्यात होते. त्यांची अनेक भाषणे नंतर पुस्तकांच्या स्वरूपात प्रकाशितदेखील करण्यात आली आहेत.

राहूल सांकृत्यायन यांच्या वैयक्तीक आयुष्यातदेखील अनेक चढ-उतार दिसून आले. अबोध वयात झालेल्या विवाहाला नाकारून घरातून पलायन करणार्‍या राहूल सांकृत्यायन यांच्या आयुष्यात अनेक महिला आल्या. इलेना या रशियन महिलेसोबत त्यांनी संसार थाटला. त्यांना मुलगाही झाला. तथापि, भारतात आल्यानंतर त्यांनी कमला या नेपाळी तरूणीसोबत विवाह केला. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांना विस्मरणाची व्याधी जडली. शेवटच्या काही महिन्यांमध्ये याचेच रूपांतर स्मृतीभ्रंशात झाले. अशाच विकल अवस्थेत त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला. ९ एप्रिल १८९३ रोजी जन्मलेल्या आणि १४ एप्रिल १९६३ साली देहत्याग केलेल्या राहूल सांकृत्यायन यांना हिंदी साहित्यात मानाचे स्थान आहे. त्यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आणि नंतरच्या ५५व्या पुण्यतिथीनिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यांच्या जीवन कार्याला उजाळा देण्यात येत आहे. त्यांच्या जीवन आणि कार्यावर असंख्य पुस्तके लिहण्यात आले असून हा क्रम अव्याहतपणे सुरू आहे. मात्र अद्यापही त्यांच्या जीवनावर एखादी डॉक्युमेंटरी अथवा चित्रपट आलेला नाही. याहूनही धक्कादायक बाब म्हणजे राहूलजींनी तिबेटमधून आणलेल्या १० हजारांपेक्षा जास्त हस्तलिखीतांच्या अनुवादाचे कामदेखील अनेक दशकांपासून ठप्प पडले आहे. या महान लेखकाच्या १२५व्या जयंतीनिमित्त मायबाप सरकारने किमान हे काम तरी मार्गी लावण्याची तसदी घेतली तरी त्यांना खर्‍या अर्थाने आदरांजली अर्पण करण्यासारखे होईल.

राहूल सांकृत्यायन यांना नेमक्या एका प्रतिमेत बध्द करणे अशक्य आहे. आपल्या आयुष्यातील सार्थकतेचा शोध घेणारा अंतर्यात्री, धाडसी प्रवासी, विलक्षण प्रतिभावंत साहित्यिक, महान स्वातंत्र्य सेनानी, शोषितांविषयी आत्यंतीक कणव असणारा संवेदनशील व्यक्ती, फर्डा वक्ता, थोर इतिहासकार, तत्वज्ञानी, पुरातत्वज्ञ अशी राहूलजींची अनेक रूपे जगासमोर आली आहेत. मात्र या सर्वांमध्ये त्यांच्या विद्रोहीपणाची धार ही अन्य सर्व प्रतिमांवर मात करणारी ठरली आहे. वैयक्तीक जीवनासह त्यांच्या सृजनातूनही विद्रोहाचे सूर आपल्याला दिसून येतात. राहूलजींनी ‘तुम्हारी क्षय’ या ग्रंथातून अनेक धार्मिक, ऐतिहासीक, जातीय, वांशिक अस्मितांच्या ठिकर्‍या उडवल्या आहेत. यात एका ठिकाणी ते म्हणतात, –
“गरीबों की गरीबी और दरिद्रता के जीवन का कोई बदला नही। हाँ, यदि वे हर एकादशी के उपवास, हर रमजान के रोजे तथा सभी तीरथ-व्रत, हज और जियारत बिना नागा और बिना बेपरवाही से करते रहे, अपने पेट को काटकर यदि पण्डे-मुजावरों का पेट भरते रहे, तो उन्हें भी स्वर्ग और बहिश्त के किसी कोने की कोठरी तथा बची-खुची हूर-अप्सरा मिल जायेगी। गरीबों को बस इसी स्वर्ग की उम्मीद पर अपनी जिन्दगी काटनी है। किन्तु जिस सरग-बहिश्त की आशा पर जिन्दगी भर के दुःख के पहाड़ों को ढोना है, उस सरग-बहिश्त का अस्तित्व ही आज बीसवीं सदी के इस भूगोल में कहीं नहीं है। पहले जमीन चपटी थी। सरग इसके उत्तर के उन सात पहाड़ों और सात-समुद्रों के पार था। आज तो न उस चपटी जमीन का पता है और न उत्तर के उन सात पहाड़ों और सात समुद्रों का। जिस सुमेरु के ऊपर इन्द्र की अमरावती क्षीरसागर के भीतर शेषशायी भगवान थे, वह अब सिर्फ लड़कों के दिल बहलाने की कहानियाँ मात्र है। ईसाइयों और मुसलमानों के बहिश्त के लिए भी उसी समय के भूगोल में स्थान था। आजकल के भूगोल ने तो उनकी जड़ ही काट दी है। फिर उस आशा पर लोगों को भूखों रखना क्या भारी धोखा नहीं है?”

आजसुध्दा हे विचार सर्वधर्मीय परंपरावाद्यांना झोंबणारे आहेत. हाच विद्रोह महापंडित राहूल सांकृत्यायन यांना ‘लीजंड’ बनविणारा ठरला आहे. अशा या थोर व्यक्तीमत्वाला अभिवादन !

निवडक साहित्य सूची

कथासंग्रह- सतमी के बच्चे, वोल्गा से गंगा, बहुरंगी मधुपुरी, कनैला की कथा
कादंबरी- बाईसवीं सदी, जीने के लिए, सिंह सेनापति, जय यौधेय, भागो नहीं, दुनिया को बदलो, मधुर स्वप्न, राजस्थान निवास, विस्मृत यात्री, दिवोदास

चरित्र – सरदार पृथ्वीसिंह, नए भारत के नए नेता, बचपन की स्मृतियाँ, अतीत से वर्तमान, स्तालिन, लेनिन, कार्ल मार्क्स, माओ-त्से-तुंग, घुमक्कड़ स्वामी, मेरे असहयोग के साथी, जिनका मैं कृतज्ञ, वीर चन्द्रसिंह गढ़वाली, सिंहल घुमक्कड़ जयवर्धन, कप्तान लाल, सिंहल के वीर पुरुष, महामानव बुद्ध

आत्मचरित्र : मेरी जीवन यात्रा (सहा खंड)

प्रवासवर्णन – लंका, जापान, इरान, किन्नर देश की ओर, चीन में क्या देखा, मेरी लद्दाख यात्रा, मेरी तिब्बत यात्रा, तिब्बत में सवा बर्ष, रूस में पच्चीस मास

About the author

shekhar patil

2 Comments

  • ज्ञानयात्री राहुल सांकृत्यायन जी व त्यांची विस्तृत ग्रंथ संपदा बद्दल छान माहिती दिली .या साठी शेखर भाऊ आपणास विशेष धन्यवाद.

  • शेखर जी
    तुम्ही झाकलं माणिक जगासमोर आणलं या लेखाच्या माध्यमातून।
    की ज्ञा कु

Leave a Comment