Featured slider चालू घडामोडी

जाहिरात है सदा के लिये !

Written by shekhar patil

आज राष्ट्रीय जाहिरात दिन. जाहिरात ही पासष्टावी आणि मानवी इतिहासातील सर्वात महत्वाची कला मानली जाते. अगदी विविध प्रोपगंडा टाईप विचारांपासून ते व्यावसायिक उत्पादनांपर्यंत आपापला विचार, मत प्रणाली आणि अर्थातच उत्पादने खपविण्यासाठी जाहिरात हा अविभाज्य घटक आहेच. मुळात जाहिरातीचा प्रकार म्हणजे ‘गागर मे सागर’ या प्रकारचा होय. कमीत कमी शब्द, प्रतिमा वा व्हिज्युअल्सचा वापर करून अत्यंत परिणामकारकतेने जगाला हवा तो संदेश देणे म्हणजे थट्टाबाजीचा खेळ नव्हे. याबाबत विवेचन करण्याआधी एक किस्सा.

एका वर्तमानपत्राचा जाहिरात प्रतिनिधी विख्यात अमेरिकन उद्योगपती हेन्री फोर्ड यांच्याकडे जाहिरात मागण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होता. तथापि, फोर्ड काही दाद देत नव्हता. आपण सर्वसामान्यांना परवडणारी जगातील पहिली कार बनवली असून हे उत्पादन ‘युनिक’ असल्यामुळे जाहिरातीची गरज काय? असा विचार मनात करून फोर्ड नेहमी त्या तरूणाला पिटाळून लावत असे. एकदा पुन्हा एकदा तो प्रतिनिधी फोर्ड यांच्याकडे गेला. त्याच्या चिकाटीचे कौतुक वाटल्याने फोर्डने त्याला कार्यालयात बोलावून कॉफी घेण्याचे निमंत्रण दिले. कॉफीसोबत गप्पा सुरू झाल्या. इतक्यात त्याच्या कार्यालयाच्या बाजूला असणार्‍या डोंगरावरील चर्चमधून घंटानाद सुरू झाला. त्या प्रतिनिधीने फोर्ड यांना हा आवाज कसला? असे विचारले. यावर फोर्ड यांनी डोंगरावर तब्बल चारशे वर्ष जुने चर्च असल्याचे सांगून तेथूनच हा घंटानादाचा आवाज येत असल्याची माहिती दिली.

यावर त्या वर्तमानपत्राच्या प्रतिनिधीने हेन्री फोर्ड यांना म्हटले की,
“महोदय…चारशे वर्षे जुन्या असणार्‍या चर्चलाही भक्तांना बोलावण्यासाठी घंटानाद करावा लागतो….एका अर्थाने प्रत्यक्ष परमेश्‍वराचा दरबारही जाहिरातीपासून वंचित राहिलेला नाही. आपण याला अपवाद कसे ठरणार?”
हेन्री फोर्ड यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्या वर्तमानपत्राच्या प्रतिनिधीला त्या वेळेपर्यंतच्या अमेरिकेच्या इतिहासातील जाहिरातीचे सर्वात मोठे कंत्राट दिले. यानंतर फोर्ड कंपनीने आपल्या आयकॉनीक टी मॉडेलच्या प्रचारासाठी अतिशय कल्पक कँपेनिंग केले. यामुळे अर्थातच फोर्ड कंपनीच्या प्रगतीला पंख लागले. आजही यातील कॉपी रायटींग व डिझाईन अभ्यासनीय आहे.

मुद्रीत माध्यमे प्रचलित होण्याआधीही जाहिरात विविध प्रकारांनी अस्तित्वात होती. यातील प्रमुख भाग हा अर्थातच परफॉर्मींग आर्टवर आधारित होता. आजही अगदी आपल्या दारावर येणारे फेरीवाले याचाच उपयोग करत आहेत. प्रिंट मीडिया विकसित झाल्यावर अर्थात जाहिरात कलादेखील याच माध्यमातून वयात आली. यथावकाश नभोवाणी, दूरचित्रवाणी आदींपासून ते थेट डिजीटल अ‍ॅडपर्यंतचा हा प्रवास अव्याहतपणे सुरूच आहे. अलीकडच्या काळात वर्तमानपत्रांच्या जाहिरातींना फ्लेक्स, सोशल मीडिया आदींनी आव्हान दिले आहे. तर लवकरच व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीतील जाहिरातींचे युग सुरू होणार आहे. मात्र प्रिंट ते डिजीटलपर्यंतच्या प्रवासापेक्षा पुढील मार्ग थोडा खडतर आहे. कारण टेक कंपन्यांचा यातील हस्तक्षेप हा मोठा अडसर आहे. अर्थात गुगलसह अन्य टेक कंपन्यांनी ‘पे पर क्लिक’ हे अत्यंत पारदर्शक मॉड्यूल विकसित केल्यामुळे जाहिरातदारांना लाभ झालाय हे कुणी अमान्य करणार नाही. अर्थात जाहिरातीवर जितक्यांदा क्लिक होईल तितकेच पैसे मोजण्याची ही न्याय्य प्रणाली डिजीटल युगात अवतरली आहे. भविष्यात यातील अनेक रूपे आपल्यासमोर येणार असून प्रसारमाध्यमांमध्ये काम करणार्‍यांसह जाहिरातदार आणि ग्राहक या सर्वांनी याची प्राथमिक माहिती करून घेणे गरजेचे आहे.

भारतीय जाहिरातींच्या इतिहासात अनेक महत्वाचे अध्याय आहेत. यातील सर्वात उत्तम उदाहरण अमूलच्या ‘टेस्ट ऑफ इंडिया’ या अतिशय सुलभ आणि आकर्षक अशा कॅचलाईनसह प्रदीर्घ काळापासून सुरू असणार्‍या जाहिरात कँपेनिंगकडे आपण पाहू शकतो. ताज्या घटनांवर विलक्षण खोडकर आणि अर्थातच समर्पक भाष्य करणार्‍या अमूलच्या जाहिराती आजही ताज्या, मनाला भावणार्‍या व समकालीन वाटतात. याच प्रमाणे टेस्ट द थंडर, ये दिल मांगे मोअर, हमारा बजाज, करलो दुनिया मुठ्ठी मे, लगे रहो, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी आदींसारख्या अनेक कॅचलाईन्सचा उल्लेख आल्यावर आपल्यासमोर यातील जाहिरातींची मालिकाच उभी राहते. यातील सर्वच उल्लेख येथे घेता येणार नाहीत. मात्र परिणामकारक जाहिरातीसाठी दर्जेदार कॉपी रायटिंग व डिझाईनसह अनेक घटकांची आवश्यकता असल्याचे आपल्या दिसून येते. यात मनाचा ठाव घेणारी जिंगल हा महत्वाचा घटक आहे. याशिवाय या जाहिरातीतील मॉडेल्सही तितकेच महत्वाचे असतात. खरं तर जाहिरात म्हटल्यावर स्त्री हवीच असा एक विचारप्रवाहदेखील आहेत. मात्र यासोबत विविध सेलिब्रिटींनाही चांगलाच भाव असतो. यातून अनेक जाहिरातीच्या चेहर्‍यांचे ब्रँड बनले आहेत. यातून काही ढोबळ आकृतीबंधही बनले आहेत. यात अत्यंत सुखी, समाधानी कुटुंब हा आवश्यक घटक आहे. अमुक-तमुक प्रॉडक्ट वापरल्यामुळे यश मिळते, मुली पिंगा घालतात असला समजदेखील दृढ करणार्‍या जाहिराती फोफावल्या आहेत. भारतीयांच्या वर्णाविषयक न्यूनगंडामुळे फेअरनेस क्रिमची भली मोठ्ठी बाजारपेठ अस्तित्वात आली असून ती जाहिरातींवर उभी राहिली आहे. तर विविध सेलीब्रिटींच्या यशात एखाद्या प्रॉडक्टचा किता हातभार आहे हे दर्शविणार्‍या जाहिरातींची उदाहरणे तर असंख्य आहेत. आता तर विविध गॅजेटस्, महागड्या कार आदींच्या जाहिराती पाहतांना आपण अक्षरश: आ वासतो. यातच ऑनलाईन आणि ऑफलाईन युगाचा संकर दर्शविणार्‍या जाहिरातीदेखील आपण बघतो. अर्थात आता फेसबुक, गुगलपासून ते विविध ई-कॉमर्स कंपन्या वर्तमानपत्रांमधून पान भरून विपुल जाहिराती करतात. अगदी गाव पातळीवरही देशी-विदेशी कंपन्यांच्या स्मार्टफोनच्या जाहिरातींचा भडीमार हा आपल्याला चकीत करणारा ठरत आहे.

गेल्या अनेक दशकांपासून अनेक भारतीय कॉपी रायटर्सचे सृजन अव्याहतपणे सुरू आहे. त्यांच्या अनेक जाहिराती अजरामर झाल्या आहेत. यातून अनेक ब्रँड यशस्वी झाले आहेत. अनेक मॉडेल्स आणि सेलिब्रिटींनाही यातून रग्गड पैसा मिळाला आहे. मात्र या सर्वांचा विचार केला असता बाबा रामदेव यांनी अलीकडे ज्या पध्दतीने आपल्या विविध प्रॉडक्टची मार्केटींग केलीय ते भविष्यात जाहिराततंत्राच्या अभ्यासक्रमात महत्वाचा अध्याय म्हणून गणले जाणार आहे. मुळातच रामदेवबाबांनी अत्यंत व्यापक असणार्‍या योगातील हठयोगातील मोजकी आसने आणि प्राणायामाला तुफान मार्केटींगची जोड देऊन स्वत:च्या नावाचा एक विश्‍वासार्ह ब्रँड तयार केला. यानंतर अन्नातील भेसळ आणि अन्य टॉक्सीन्सबाबत भारतात जागृती सुरू होत असल्याच्या कालखंडात ‘शुध्दता’ याच निकषाला मध्यवर्ती स्थान देत विविध उत्पादने बाजारपेठेत उतारली. आणि अर्थात यांच्या चेहरादेखील तेच बनले. बाबांच्या जाहिरातीत कुठेही आपल्या भडकपणा दिसणार नाही. फक्त केमीकल व घातक विषाक्त पदार्थ रहीत उत्पादने आणि याच्या जोडीला रामदेवबाबांचा शुध्दतेचा आग्रह. यातूनच पतंजलीसारखा ब्रँड अनेक मातब्बर देशी-विदेशी कंपन्यांना धडकी भरवणारा ठरला आहे. बाबांची ही व्यावसायिक यात्रा कुठवर चालेल हे कुणी सांगू शकणार नाही. मात्र जाहिरात तंत्रातील त्यांची ‘शुध्दता’ अभ्यासनीय नक्कीच आहे. असो. सगळ्याच बाबींचे विवेचन इथे करणे शक्य नाही.

आणि सर्वात महत्वाचा मुद्दा…आजवर जाहिरातीसाठी कोणतेही माध्यम आवश्यक होते. किंबहुना याशिवाय जाहिरात शक्यच नसल्याचे आपणा सर्वांना ज्ञात आहे. मात्र आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जगातील प्रत्येक व्यक्तीच्या हातात एक अत्यंत सशक्त माध्यम आले आहे. अर्थात आपला विचार समर्पकपणे व्यक्त करण्याची जबाबदारीदेखील प्रत्येकावर आहेच.

शेवटी पुन्हा एकदा हेन्री फोर्ड! फोर्ड यांच्या मते-“पैशांची बचत करण्यासाठी कुणी जर जाहिरात करत नसेल तर तो व्यक्ती घड्याळाला बंद करून वेळेची बचत करण्याचा प्रयत्न करतोय असे समजा!”

अर्थात जाहिरात अटळ आहे. ती विचारांची असेल वा उत्पादनांची! अर्थात डी-बिअर्सच्या हिर्‍याबाबतच्या अजरामर झालेल्या कॅचलाईनमध्ये आपण थोड बदल करून नक्कीच म्हणू शकतो….‘जाहिरात है सदा के लिये!’

About the author

shekhar patil

Leave a Comment