Featured चालू घडामोडी राजकारण

जादुई वास्तववादातला महानायक

Written by shekhar patil

जगाचा इतिहास हा खरं तर जेत्यांचा आणि त्यातही नायकांच्याच यशोगाथेचा गौरव करणारा असतो. प्रत्येक युगाचे आपापले नायक असतात. आयतीच चालून आलेली पोकळी भरून काढत काही सुमारांनाही कधी नायकाचा गौरव मिळतो तर अतुलनीय कामगिरी करणारेही बर्‍याचदा उपेक्षित राहतात. याचा विचार करता नुकतेच काळाच्या पडद्याआड गेलेले क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांची गणना दुर्मिळातील दुर्मीळ म्हणजेच आपल्या हयातीतच दंतकथा बनलेल्या महान नेत्यांच्या बरोबरीने करावी लागणार आहे. अगदी मुठभर आकारमान असणार्‍या राष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्यास जागतिक इतिहासात क्रांतीचे एक अजोड प्रतिक म्हणून आणि स्वत:ला याचा महानायक म्हणून दखल घेण्यास भाग पाडणार्‍या फिडेल यांच्या रूपाने विसाव्या शतकातील शेवटचा नायक इहलोकी गेला आहे.

‘क्रांती’ हा शब्दच किती भारावून टाकणारा आहे ! या शब्दाचा उल्लेख आल्याबरोबर अंगावर रोमांच उभे राहणार नाही असा माणूस शोधणे विरळच. क्रांती म्हणजे प्रस्थापितांशी टक्कर. जगातील प्रत्येक विचारधारा, प्रत्येक भाषा, प्रत्येक राष्ट्र आणि प्रत्येक संस्कृतीत क्रांतीचे गुणगान करण्यात येते. प्रत्येक देशाच्या इतिहासात कधी ना कधी तरी क्रांती होतच असते. विसाव्या शतकाचा विचार केला तर बहुतांश क्रांत्या या डाव्या विचारधारेशी संबंधीत होत्या. यामुळे साम्यवाद आणि क्रांती हे शब्द जणू काही समानार्थीच बनले. तसेच क्रांतीचे नायकदेखील समाजवादाचा विचार मांडणार्‍या मार्क्स-एंगल्सपासून ते याला प्रत्यक्षात साकारण्यासाठी प्रयत्न करणार्‍या लेनिन, स्टॅलिन, ट्रॉटस्की, माओ आदींसह फिडेल कॅस्ट्रो, चे ग्वेरा, हो चि मिन्ह आदींनाही नायकांचा सन्मान लाभला. याशिवाय देशोदेशी अनेक स्थानिक नायकही उदयास आले. मात्र फिडेल कॅस्ट्रो आणि जे ग्वेरा या जोडगोळीच्या वलयाइतके भाग्य कुणालाही लाभले नाही. यामागे अनेक कारणे आहेत. एक तर खुद्द साम्यवादाचा जनक असणार्‍या सोविएत संघात या विचारधारेचे पतन झाले असून हे संघराज्यही इतिहासजमा झाले आहे. सोविएत संघाच्या अधिपत्याखालील कम्युनिस्ट राष्ट्रांमधील पोलादी पडदादेखील केव्हाच वितळला आहे. तर चीनमध्ये पुर्णपणे कम्युनिझम नष्ट झाला नसला तरी या राष्ट्राने केव्हाच भांडवलशाही मार्गाची कास धरली आहे. मात्र अद्यापही अमेरिकेच्या डोळ्याला डोळा भिडवत क्युबाने समाजवादाचा लाल झेंडा मोठ्या गौरवाने फडकत ठेवला असून याचे सर्वश्री श्रेय हे फिडेल कॅस्ट्रो यांच्या नेतृत्वालाच आहे हे अमान्य करता येणार नाही. सलग पाच दशकांपर्यंत जगातील सर्वाधीक शक्तीशाली देशाच्या अरेरावीला पुरून उरत; अनेकदा त्यांना खिजवत कॅस्ट्रो यांनी क्युबाची सांभाळलेली धुरा ही जगाच्या इतिहासातील एक मानाचे पान म्हणून गणली जात आहे. मात्र दीर्घ काळ सत्तेवर राहण्याइतपतच कॅस्ट्रो यांची महत्ता नाही; तर त्यांच्या आयुष्यात असे बरेच काही आहे जे त्यांना समकालीन नेत्यांच्या कित्येक पटीने उंची प्रदान करणारे ठरले आहे. यात त्यांच्या वैयक्तीक आयुष्यातील अनेक खर्‍या-खोट्या बाबींनी त्यांच्याभोवती एक दैवदुर्लभ असे करिश्माई वलय निर्माण केले.

आपल्या भोवती अनेक ‘नायक’ असतात. क्रिकेटसह विविध खेळांचे खेळाडू, कलावंत, सिनेनट, राजकीय/धार्मिक/सामाजिक/भाषिक/सांप्रदायिक मान्यवर, राष्ट्रप्रमुख आदींना नायकांचा सन्मान मिळतो. मात्र ‘जिवंतपणीची दंतकथा’ बनण्याचे भाग्य शंभरातून एखाद्याच्याच भाग्यात असते. हा योग फिडेल कॅस्ट्रो यांच्या आयुष्यात होता. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांच्याभोवतील अनेक गुढ बाबींचे वलय पसरले. खरं तर कम्युनिस्ट राष्ट्रांमध्ये नि:पक्षपाती प्रसारमाध्यमे उपलब्ध नसल्यामुळे सरकार आणि नेत्यांविरूध्दची तटस्थ माहिती जगासमोर येणे अवघड असते. सोविएत संघात ‘ग्लासनोस्त’ आणि ‘पेरेस्ट्रोईका’ आले. येथे कम्युनिझमच नव्हे तर लेनीन, स्टॅलीनचे पुतळेदेखील उरले नाहीत. चीनमध्येही नियंत्रीत प्रमाणात का होईना प्रसारमाध्यमे आहेतच. तेथे अद्याप माओ ‘राष्ट्रनायक’ असला तरी त्यांची महत्ता कमी झाली आहेच. तर दुसरीकडे मात्र क्युबात अजूनही प्रसारमाध्यमे नाहीत. तेथे अगदी इंटरनेटदेखील फार उशीरा दाखल झाले असून त्यावरही मोठ्या प्रमाणात निर्बंध आहेत. यामुळे फिडेल कॅस्ट्रो यांच्या कार्याचे अचूक मूल्यमापन अथवा त्यांच्या आयुष्याविषयीची खरी माहिती जगासमोर येणे अवघडच. या सर्व बाबींचा विचार करता कॅस्ट्रो यांच्याभोवती आपोआपच सत्य आणि कल्पनेचा बेमालूम मिलाफ असणारे वलय निर्माण झाले. यातूनच त्यांची ‘लार्जर दॅन लाईफ’ प्रतिमाही आपोआपच तयार झाली. महान कोलंबियन लेखक तथा कॅस्ट्रो यांचे मित्र गॅब्रियल गार्सिया मार्केज यांच्या लिखाणातील ‘मॅजिकल रिअ‍ॅलिझम’ म्हणजेच जादूई वास्तववाद संपूर्ण जगात वाखाणण्यात आला आहे. याच प्रमाणे फिडेल कॅस्ट्रो यांच्या आयुष्याला मिथकाचा जादूई स्पर्श होत यातून एका महानायकाचा जन्म झाला हे वास्तव नाकारता येत नाही. हाच महानायक जगातील अनेक राष्ट्रांमधील स्वातंत्र्यलढ्यांसह कोट्यवधी आबालावृध्दांचे प्रेरणास्थान बनला.

अलीकडेच कॅस्ट्रो यांचे देहावसान झाल्यानंतर त्यांच्या कार्याला मोठ्या प्रमाणात उजाळा देण्यात येत आहे. त्यांचे मूल्यमापनदेखील होत आहे. कॅस्ट्रो यांच्या वाटचालीचे अवलोकन केले असता ते निधड्या छातीने क्रांतीकारकच नव्हे तर चतुर राजकारणीदेखील असल्याचे आपल्या लक्षात येते. कॅस्ट्रो बंधूंचा उदय हा मी वर नमुद केल्यानुसार पोकळी भरून काढण्याच्या स्थितीतून झाला. बटीस्टा या क्रूर हुकुमशहाच्या राजीवटीने त्रस्त झालेल्या क्युबन जनतेला मुक्त करण्यासाठी अनुकुल स्थिती आधीच निर्माण झाली होती. सोवियत संघ अथवा चीनमधील क्रांतीप्रमाणे क्युबातील क्रांती अवघड नव्हती. अगदी कॅस्ट्रो यांना हो ची मिन्ह यांच्याप्रमाणे दीर्घ काळ शत्रूशी लढावेदेखील लागले नाही. क्युबा हे चिमुकले राष्ट्र जागतिक सत्तासंघर्षात फारसे महत्वाचेही नव्हते. मात्र अमेरिका आणि सोवियत रशियातील संघर्षात सोंगटी म्हणून वापरल्या जाणार्‍या क्युबाला बुध्दीबळातील एखाद्या वजीर वा बादशहासमान महत्व प्राप्त करून घेण्याचे कसब फिडेल कॅस्ट्रो यांना साधले. सर्वात महत्वाची बाब म्हणजे क्रांती करतांना कॅस्ट्रो आणि त्यांच्या सहकार्‍यांसमोर समाजवादाचा विचार नव्हता. अगदी क्युबाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अमेरिकेचा दौर्‍यावर गेले असता त्यांनी आपला देशदेखील लोकशाही मार्गावरून जाणार असल्याची ग्वाही दिली होती. मात्र काही वर्षातच ते पूर्णपणे डाव्या विचारधारेकडे झुकले. अ‍ॅटलांटीक महासागरात कॅरेबियन द्वीप समुहांमध्ये सोवियत रशियाला एक हक्काचा देश म्हणून क्युबा उपयुक्त ठरला. तर दुसरीकडे याच्या बदल्यात क्युबानेही रशियाकडून बरेच काही पदरात पाडून घेतले. विशेष करून क्युबाची अर्थव्यवस्था अवलंबून असणार्‍या साखरेचा सर्वात मोठा खरेदीदार देश म्हणून रशियाने मदतीचा हात पुढे केला. याशिवाय अन्य सामरीक, आर्थिक आणि अन्य मदतही होतीच. कॅस्ट्रो यांनी अमेरिका आणि रशियातील शीतयुध्दाच्या चरमोत्कर्षाच्या कालखंडातही आपला संयम ढळू दिला नाही ही बाब मात्र विशेष होय. यामुळे अनेकदा दोन्ही महासत्तांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले तरी कॅस्ट्रो यांनी दोघांच्या सत्तासंघर्षात भरडण्यापासून क्युबाला वाचविले. हा मुत्सद्दीपणा दाखविल्याने युध्द टळले; क्युबाचीही हानी झाली नाही आणि तो देशही प्रगतीपथावर गेला. यामुळे कॅस्ट्रो यांच्या ऐतिहासिक मूल्यमापनात त्यांच्या शौर्यासोबत मुत्सद्दीपणालाही विचारात घ्यावे लागणार आहे.

एका देशाचा प्रमुख म्हणून मात्र कॅस्ट्रो यांच्या कारकिर्दीत अनेक त्रुटी आहेत. हुकुमशहा बटीस्टाची राजवट उलथून लावल्यानंतर ते अनेकदा बटीस्टाप्रमाणेच क्रूर वागल्याची अनेक उदाहरणे आहेत. आपल्या विरोधकांना अजिबात दयामाया न दाखविण्याच्या अनेक घटना तर अंगावर काटा आणणार्‍या आहेत. यातील बर्‍याच बाबी तर जगासमोर आल्यादेखील नाहीत. मात्र राजकीय विरोधकांना दिलेल्या यातना, मानवाधिकारांचे उल्लंघन आदींबाबत अनेकदा त्यांच्यावर आरोप करण्यात आले. क्युबाची अर्थव्यवस्था आज बर्‍यापैकी स्थितीत असली तरी कॅस्ट्रो यांचे अनेक निर्णय चुकले. यामुळे अनेकदा अर्थव्यवस्था अडचणीत आली. तर सर्वात महत्वाची बाब म्हणजे क्युबामध्ये अद्यापही खुलेपणा नाही. तेथे व्यक्ती व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मूलभुत मानवाधिकार, निष्पक्ष प्रसारमाध्यमे, खुली लोकशाही प्रणाली या बाबींची वानवा आहे. सुदैवाने त्यांचे उत्तराधीकारी राऊल कॅस्ट्रो यांनी थोडा उदार मार्ग पत्करला आहे. अलीकडेच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी क्युबाला भेट देत दोन्ही राष्ट्रांमधील शत्रूत्वाचा अडसर दूर करण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल टाकले. कॅस्ट्रो यांनी आढ्यतेने बराक ओबामा यांची (त्यांनी इच्छा प्रकट करूनही) मुलाखत टाळली. याआधी या वर्षाच्या प्रारंभी पोप फ्रान्सीस यांनी रशियन ऑर्थोडॉक्स चर्चचे प्रमुख किरील यांच्याशी क्युबातच ऐतिहासिक भेट घेतली. रोम कॅथॉलिक आणि रशियन ऑर्थोडॉक्स चर्चमधील विभाजनानंतर या दोन पंथांच्या प्रमुखांनी तब्बल हजार वर्षांनी भेट घेतली. क्युबातील क्रांतीनंतर १९६२ साली कॅस्ट्रो यांनी देशातील सर्व कॅथॉलिक शाळा बंद केल्या. यासोबत क्युबा हे नास्तिक राष्ट्र असल्याचेही घोषित करण्यात आले. हा निर्णय कम्युनिझमच्या विचारधारेशी सुसंगत असाच होता. मात्र काळाच्या ओघात नागरिकांवर नास्तीकता लादणे इतके सोपे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. परिणामी १९९१ साली नास्तिक (अथेईस्ट) असणारा क्युबा देश अधिकृतपणे निधर्मी (सेक्युलर) बनला. हा बदलदेखील खूप क्रांतीकारक असाच होता. यावर पोप फ्रान्सीस आणि किरील यांच्या भेटीने क्युबात ख्रिश्‍चनिझमच्या वर्चस्वाची द्वाही फिरली. यावेळी राऊल कॅस्ट्रो यांनी क्युबाची भूमि ही एकतेचे काम करणार असल्याची घोषणा केली. फिडेल कॅस्ट्रो यांच्या हयातीत ही घोषणा प्रत्यक्षात साकार झाली असती तर तो एक ऐतिहासिक क्षण ठरला असता. मात्र काळाला हे मान्य नव्हते इतकेच आपण म्हणू शकतो.

कोणत्याही नायकाचे आयुष्य जितके बंदिस्त तितकेच त्यावर कल्पनेची पुटे चढविणे सोपे असते. याचा विचार करता सत्य आणि आभासीपणातील सीमारेषा अगदी पुसट करणारी अनुकुल स्थिती मिळाल्यानेच फिडेल कॅस्ट्रो यांना त्यांच्या हयातीतच उत्तुंग व्यक्तीमत्व म्हणून मान्यता मिळाली. त्यांचे आयुष्य, त्यांचे विचार, लफड्यांसह खासगी आयुष्यातील विविध बाबी आदींचे मोठ्या प्रमाणात चर्वण झाले. अमेरिकेने त्यांना मारण्याचे केलेले प्रयत्न हादेखील मोठा औत्सुक्याचा विषय आहे. खुद्द कॅस्ट्रो यांच्या मते ऑलिंपीकमध्ये हल्ल्यांमधून वाचण्याची एखादी स्पर्धा असती तर त्यांनी नक्कीच सुवर्णपदक पटकावले असते. सहाशेपक्षा जास्त वेळेस त्यांना मारण्याचे प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येते. मात्र यातही अनेकदा सत्य आणि कल्पना यांचा बेमालूम संगम असल्याचे आपल्याला दिसून येते. आजच्या आधुनिक युगात कुणाचे खासगी आयुष्य इतके बंदीस्त राहू शकत नाही. अर्थात कुणाच्या आयुष्याला कल्पनेचे रंग चढविणेदेखील फारसे सोपे नाही. याचा विचार करता फिडेल कॅस्ट्रो हे विसाव्या शतकातील शेवटचे महानायक ठरू शकतात. अत्याधुनिक संपर्क साधनांमुळे प्रत्येकाच्या आयुष्यात (सेलिब्रिटींच्या तर अजूनच जास्त) डोकावून पाहणारे युग अवतरले असल्याने भविष्यात असे व्यक्तीमत्व होणार नाही हे निश्‍चित.

fidel-castro1

About the author

shekhar patil

Leave a Comment