चालू घडामोडी राजकारण साहित्य

‘जाति-जाति’ का शोर मचाते केवल कायर, क्रूर !

गांधी, पटेल, डॉ. आंबेडकर आदी महापुरूषांचा वैचारिक व राजकीय वारसा पळविण्याचा प्रयत्न केल्यानंतर भाजपने आता राष्ट्रकवि रामधारीसिंह दिनकर यांच्याबाबतही हाच प्रकार सुरू केला आहे.

महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरूषांचा वैचारिक व राजकीय वारसा पळविण्याचा प्रयत्न केल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आता राष्ट्रकवि रामधारीसिंह दिनकर यांच्याबाबतही हाच प्रकार सुरू केला आहे. यामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तीमत्वानंतर साहित्यिकांनाही आपल्या विचारधारेत ‘मोल्ड’ करण्याचा पॅटर्न सुरू होणार की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे.

खरं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असणार्‍या ‘पांचजन्य’मध्ये दिनकर यांच्यावर स्तुतीसुमने उधळण्यात आली तेव्हाच यामागे खास रणनिती असल्याचे स्पष्ट झाले होते. या वर्षी दिनकर यांच्या ‘परशुराम की प्रतीक्षा’ आणि ‘संस्कृती के चार अध्याय’ या पुस्तकांच्या प्रकाशनला ५० वर्षे होत आहेत. याचे औचित्य साधून ‘पांचजन्य’च्या ताज्या अंकात दिनकर यांना मध्यवर्ती स्थान देण्यात आले आहे. यातील एका लेखात कॉंग्रेसने दिनकर यांच्यावर कसा अन्याय केलाय हे मांडण्यात आले आहे. वास्तविक पाहता खुद्द दिनकर हे पंडित नेहरू यांचे निकटवर्तीय मानले जात. त्यांना दोनदा राज्यसभेवर संधीदेखील मिळाली होती. मात्र ‘पांचजन्य’च्या मते कॉंग्रेसने त्यांची सतत उपेक्षा केली. दिनकर आणि मैथिलीशरण गुप्त यांच्यासारख्या कविंना पाठ्य पुस्तकांमधून हळूहळू काढून टाकण्याचे कामही कॉंग्रेसनेच केल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दिनकर यांच्या ‘संस्कृती के चार अध्याय’ या काव्य संग्रहाने देशाचे खरे रूप सादर केले असल्याचे यात म्हटले आहे. याचसोबत ‘भारता’ची वाखाणणी करणार्‍या कविंना कथित सेक्युलर हे विशिष्ट चष्म्यातून पाहत असल्याचा आरोपदेखील करण्यात आला आहे. याचा सरळ रोख दिनकर यांच्यासारखे साहित्यिक हे सेक्युलरांचे नावडते व पर्यायाने धर्मवाद्यांचे आवडते असल्याचे गणित यात हुशारीने मांडण्यात आले आहे. अर्थात ‘पांचजन्य’मधील लेख प्रकाशित होत नाही तोच खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनकर यांच्या कार्याचा गौरव करतांना त्यांना हुशारीने बिहारमधील भुमिहार जातीच्या गौरवाशी जोडून हुकमी पत्ते फेकले आहे.

मूल जानना बड़ा कठिन है नदियों का, वीरों का,
धनुष छोड़कर और गोत्र क्या होता रणधीरों का ?
पाते हैं सम्मान तपोबल से भूतल पर शूर,
‘जाति-जाति’ का शोर मचाते केवल कायर, क्रूर|

या दिनकर यांच्या लोकप्रिय काव्यपंक्ती म्हणत मोदी यांनी दिनकर हे जातीवादाचे कसे विरोधक होते हे दर्शविले. दिनकर यांनी एका नेत्याला १९६१ साली लिहलेल्या पत्रात केवळ एक वा दोन जातींच्या समर्थनाने राजकारण करता येत नसल्याचा त्यांनी सुचक उल्लेख करत जाती-पातींच्या पलीकडे जाण्याचे Dinkar आवाहन केले होते. मात्र याच्या अगदी उलट या माध्यमातून भाजपने पध्दतशीरपणे बिहारमधील राजकारणात जातीवादाची अस्मिता फुलविणारा एक नवीन अध्याय सुरू केला आहे. रामधारी सिंह दिनकर हे बिहारमधील भुमिहार या समुदायातील होते. संख्येच्या दृष्टीने कमी असणारा मात्र राजकीयदृष्ट्या अत्यंत जागृत, जमीनदारांचा समावेश असणारा तसेच प्रगतीशील असा हा सवर्ण समाज आहे. बिहार आणि पुर्व उत्तरप्रदेशात त्यांचे प्राबल्य आहे. मंडलपश्‍चात कालखंडात व विशेषत: लालूप्रसाद यादव यांची सत्ता असतांना हा समाज राजकीयदृष्ट्या परिघावर फेकला गेला होता. अर्थात लालूराज समाप्त झाल्यानंतर नितीशकुमार यांनी या समाजाशी जुळवून घेतले. नितीश यांनी भाजपशी फारकत घेतल्यानंतर हा समाज साहजीकच भाजपसोबत राहिला. लोकसभा निवडणुकीतल्या बिहारमधील भाजपच्या यशात या समुदायाचा महत्वाचा वाटा असल्याचे स्पष्ट होते. आता या वर्षाच्या अखेरीस बिहारमधील विधानसभेची निवडणूक होत असल्याने भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा या समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्याचा पध्दतशीर प्रयत्न करत असल्याचे संकेत मिळाले आहेत. या समाजातील सी.पी. ठाकूर यांच्यासारखे नेते भाजपमध्येही अडगळीत पडले असले तरी गिरीराजसिंह यांच्यासारख्या नेत्यांना मोदींनी पुढे आणले आहे. यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भुमिहार समुदायाला गोंजारण्याची भाजपची खेळी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे बिहारमध्ये भाजप आणि मित्रपक्षांना अतिशय उज्ज्वल यश लाभले. यानंतर झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये मात्र विरोधक एकवटल्याने भाजपला अपेक्षित यश लाभले नाही. यातच लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार यांच्यासारखे सुमारे २० वर्षांपासून एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असणारे मातब्बर एकत्र आले आहेत. देश पातळीवर जनता परिवाराच्या झेंड्याखाली ते एकवटले आहेत. यातच आता लालूप्रसाद यादव यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनाही जनता परिवारात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. नितीश आणि लालू यांच्या माध्यमातून बिहारमधील ओबीसी समाज जनता परिवारामागे एकवटण्याची शक्यता आहे. याच्या जोडीला दलीत व मुस्लीम मतदार आल्यानंतर भाजपला आवर घालणे शक्य असल्याचा होरा त्यांनी मांडला आहे. या पार्श्‍वभुमिवर भारतीय जनता पक्षाची भिस्त प्रामुख्याने सवर्ण मतदारांवर असणार आहे. यानुसार भुमिहार समुदायाला आपलेसे करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमात दिनकर यांच्या कार्याचे पुनर्स्मरण करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे घोषित करण्यात आले. यानुसार बिहार आणि देशभरात कार्यक्रम होणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे याप्रसंगी दिनकर यांना ‘भारतरत्न’ सन्मान प्रदान करावा ही मागणीदेखील करण्यात आली. अर्थात या सर्व बाबींपेक्षा भारतीय जनता पक्षाने दिनकर यांच्या रूपाने एका उत्तुंग व्यक्तीमत्वाला प्रतिक म्हणून सादर करण्याचे ठरविल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

रामधारीसिंह दिनकर यांच्या कार्याची वाखाणणी करतांना भाजपने हुशारीने जाती मुक्त बिहारचा नारादेखील दिला आहे. जातीचे राजकारण करण्यात पटाईत असणार्‍या लालू आणि नितीश यांच्या जोडगोडीला या माध्यमातून मात देण्याचा त्यांचा इरादा स्पष्ट झाला आहे. मात्र मुळात दिनकर यांच्यासारख्या खर्‍या अर्थाने देशप्रेमी साहित्यिकाच्या प्रतिकाला हिसकावणे कितपत योग्य आहे? भाजपने आधीच केंद्रात सत्तेवर आल्यानंतर महात्मा गांधी व सरदार पटेल यांचा वारसा हिसकावून घेतला. यानंतर उत्तरप्रदेशात कट्टर निधर्मी विचारधारेचे पुरस्कर्ते असणारे राजा महेंद्रप्रताप सिंग यांची जयंती अलीगड मुस्लीम विद्यापीठात साजरी व्हावी म्हणून आग्रह धरण्यात आला. यातून वाद निर्माण करण्याचे प्रयत्नदेखील झाले. यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कालखंडात त्यांचे विचार हे संघाच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाशी मिळतेजुळते असल्याचे ठासून सांगण्यात आले. आणि आता चक्क राष्ट्रकवि म्हणून ख्यात असणारे रामधारीसिंह दिनकर यांना प्रतिक म्हणून मिरवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या बाबींचा विचार करता आगामी काळात विविध राज्यांमधील महापुरूषांसोबत साहित्यिकांनाही जाती वा विशिष्ट विचारांमध्ये बंदिस्त करण्याचा ‘पॅटर्न’ समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्राचा विचार करता संत, महात्मे, समाजसुधारक वा राजकारणार्‍यांना आधीच जनतेने जातींमध्ये विभाजीत करून टाकले आहे. आता साहित्यिकांचा नंबर आहे. यामुळे खरंच आपण एकविसाव्या शतकात जगत आहोत काय? हा विचार करण्याची वेळही आली आहे.

रामधारीसिंह दिनकर हे प्रखर जाज्वल्य देशभक्त साहित्यिक होते. त्यांचे उर्वशीसारख्या खंडकाव्याला कालजयी कृतीचा सन्मान मिळाला आहे. ते खुद्द जाती-पातीचे घोर विरोधक होते. आयुष्यभर कॉंग्रेसच्या सर्वसमावेशकतेचे समर्थक राहिलेले दिनकर हे आपल्या आयुष्याच्या शेवटच्या कालखंडात इंदिरा गांधी यांच्या हुकुमशाही प्रवृत्ती विरोधात जयप्रकाश नारायण यांच्या समर्थनार्थ उभे राहिले होते. अशा या महान साहित्यिकाला एका जातीमध्ये बंदिस्त करून भाजपला काय लाभ होणार याचे उत्तर तर भविष्यातच दडले आहे. पण आता कोणत्या साहित्यिकाचा नंबर? हेच पाहणे औत्सुक्याचे आहे.

About the author

shekhar patil

Leave a Comment