Uncategorized क्रीडा

जय हो!

त सुमारे २८ वर्षांपासून ज्या क्षणाची देशातील क्रिकेट रसिक आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण ‘याची देही याचि डोळा’ पाहण्याचे भाग्य नुकतेच आपणास लाभले आहे. क्रिकेट जगतातील अनेक शिखरांना स्पर्श करणारे विक्रमवीर आपल्याकडे असले तरी विश्‍वचषकरूपी ‘माऊंट एव्हरेस्ट’ आपण पुन्हा सर करू शकत नाही याचे शल्य सच्चा क्रिकेटप्रेमी उराशी बाळगून होता. २००३च्या स्पर्धेत अगदी हातातोंडाशी आलेला घास अत्यंत दारूण रितीने सोडावा लागल्यानंतर तर आपण कधी ‘वर्ल्ड कप’ पटकावू हे स्वप्न पाहणेही कोट्यवधी रसिकांनी सोडून दिले होते. मात्र या बाबतीत कोणताही अवास्तव दावा न करता ‘धोनी ब्रिगेड’ने ही अवघड कामगिरी पार पाडली तेव्हा कोटी कोटी कंठांमधून जयघोष निनादला. हा विश्‍वविजय ही नव्या युगाची नांदी ठरो हीच प्रार्थना गदगदलेल्या ह्दयांमधून निघत आहे.

भारतीय उपखंडातील देशांमध्ये तर क्रिकेट हा खेळ नव्हे तर एक संस्कृती बनला आहे. आता तर याने धर्माचे स्वरूपही धारण केल्याचे दिसून येत आहे. अब्जावधींचे अर्थकारण असणार्‍या या खेळातील नायक हे तुम्हा आम्हा सर्वांच्या भावजीवनाचा अविभाज्य घटक आहेत. यामुळे खुद्द या खेळाचे जन्मस्थान असणार्‍या ब्रिटनमध्ये क्रिकेटची लोकप्रियता घसरली तरी भारतीय उपखंडात मात्र अक्षरश: कोट्यवधींवर याचे गारूड आहे. या विश्‍वचषकात याच भागातील दोन संघ विजेतेपदासाठी झुंजले ही बाब या संदर्भात लक्षात घेण्याजोगी आहे.

भारतीय क्रिकेटला उज्ज्वल इतिहास आहे. एकेकाळी लिंबू-टिंबू म्हणून हिणवण्यात आलेल्या आपल्या संघाला सुनील गावस्करच्या या विक्रमादित्याने स्वाभिमान शिकविला. यानंतर कपिल देव या रांगड्या गड्याने समोरच्याच्या डोळ्याला डोळा भिडवण्याची उभारी दिली. यातूनच १९८३चा विश्‍वविजय साकारला. गावस्कर-कपिलच्या आदर्शावर पाऊल ठेवून गुणवंत क्रिकेटपटूंच्या पिढ्या उदयास आल्या. त्यांनी वैयक्तीक आणि सांघीक पातळीवर यशाची अनेक शिखरे गाठली. मात्र १९८३चा पराक्रम करण्यात आपण कुठे तरी कमी पडत होतो. या सर्व जखमा सहजासहजी भरून निघतील असे वाटत नव्हते मात्र या विजयामुळे हे घाव तर भरलेच पण आता आसुसलेल्या मनांना नवी उभारी देणारी स्वप्नेही मिळाली आहेत.

हा विश्‍वचषक नेमका कुणामुळे मिळाला अथवा यातील इतर पैलूंवर खूप काही लिहून-बोलून झालेय. मला मात्र यातून विश्‍वविजेतेपदाचे एक वर्तुळ पुरे झाल्याचे जाणवत आहे. गत २८ वर्षात जग किती बदललयं! १९८३ साली सर्व संघाला मिळालेल्या रकमेपेक्षा जास्तची पारितोषिके आज आश्‍विनसमान नवोदिताला मिळालीत. सर्व भारतीय संघाचा विचार केला तर प्रत्येक खेळाडू करोडपती झालाय. धोनी-सचिन सारख्यांना तर येत्या काही दिवसातच अब्जावधींचे जाहीरातींचे कंत्राटे मिळणार यात शंकाच नाही. अर्थात हे प्रतिभावंत या सार्‍यांसाठी पात्र आहेतच. गेल्या २८ वर्षात झालेला एक लक्षणीय बदल म्हणजे एके काळी देशातील तमाम क्रिकेटपटू हे महानगरांमधील उच्च मध्यमवर्गातून येत असत. आता मात्र लहानशा शहरांमधून क्रिकेटचे तारे उदयास येत आहेत. खुद्द आपला सेनापती महेंद्रसिंह धोनी हा रांचीसारख्या शहरातील सामान्य कुटुंबातून या ठिकाणापर्यंत पोहचलाय. गावस्कर-कपिल-सचिनला आदर्श मानणार्‍या पिढीसमोर आता धोनीसारखे नवीन आदर्श निर्माण झाले आहेत. एक प्रकारे क्रिकेट हा अभिजनांनाच नव्हे तर सर्वसामान्यांचा जसा खेळ आहे त्याच प्रकारे याचे नायकही समाजाच्या कोणत्याही स्तरातून येऊ शकतात हे धोनीसारख्यांनी दाखवून दिले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने एकदिवसीय, कसोटी आणि ‘टी-२०’ सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी करणार्‍या आपल्या संघाने विश्‍वचषकावर कब्जा करून आपण क्रिकेटचे खरे राजे आहोत हे दाखवून दिले आहे. १९८३चा आपला विजय हा ‘लक’ असल्याची हेटाळणी करण्यात आली होती. यावेळेस मात्र आपल्याशिवाय ही स्पर्धा जिंकण्यास कुणीही पात्र नाही असे म्हटले जात होते. झालेही तसेच! अर्थात क्रिकेट हा खेळ ‘हुकला तो संपला’ या प्रकारचा आहे. विश्‍वविजय हा आपल्या अभिमानाचा आणि राष्ट्रीय स्वाभिमानाचा विषय असल्याने या दिग्वीजयाचा कैफ रसिकांच्या मनांवरून कित्येक महिने उतरणार नाही हे निश्‍चित. खेळाडूंना मात्र पाय जमिनीवर पाय ठेवून वागावे लागणार आहे. अर्थात आपली विजयी सेना एका विश्‍वविजयाने हुरळून जाणार नाही अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

About the author

shekhar patil

Leave a Comment