चित्रपट

जगण्यातील अंतर्विरोधावर भाष्य करणारा ‘झोरबा द ग्रीक’

Written by shekhar patil

मॉडर्न क्लासीक म्हणून गणल्या गेलेल्या निकोस कजांन्स्कीस यांच्या ‘झोरबा द ग्रीक’ या पुस्तकावर आधारित याच नावाने तयार करण्यात आलेला चित्रपट पुन्हा पाहिला. अर्थात आज याचविषयी.

मॉडर्न क्लासीक म्हणून गणल्या गेलेल्या निकोस कजांन्स्कीस यांच्या ‘झोरबा द ग्रीक’ या पुस्तकावर आधारित याच नावाने तयार करण्यात आलेला चित्रपट पुन्हा पाहिला. अर्थात आज याचविषयी.

ओशो रजनीश यांचा माझ्यावर अमीट प्रभाव आहे. अवखळ वयातच ओशो गवसले. त्यांनी जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी दिली. याचसोबत काय वाचावे याची दिशादेखील दिली. खुद्द ओशो हे एक उत्तम वाचक होते. आपल्या हजारो प्रवचनांमधून त्यांनी अनेक पुस्तके, लेखक व त्यातील विचार आदींवर भाष्य केले आहे. याचसोबत ते त्यांना आवडलेल्या पुस्तकांविषयी स्वतंत्र बोललेदेखील आहेत. १११ पुस्तकांच्या या यादीत प्राचीन धर्मग्रंथांपासून आधुनिक साहित्याचा समावेश आहे. मानवी जीवनाला समृध्द करणार्‍या या प्रतिभावंतांची ओशोंनी मुक्तकंठाने वाखाणणी केली आहे. यात काही पुस्तकांवर त्यांचे विशेष प्रेम असल्याचे स्पष्ट दिसून येते. यातच निकोस कजांन्स्कीस या लेखकाच्या ‘झोरबा द ग्रीक’ या पुस्तकाचा समावेश आहे. मी मुळ पुस्तक फार आधीच वाचले होते. जाणीवपुर्वक चित्रपट पाहण्यास प्रारंभ केल्यानंतर अर्थात या पुस्तकावर आधारित सिनेमाचा अपरिहार्य समावेश आलाच.
Zorba the Greek

निकोस कजांन्स्कीस यांच्या ‘झोरबा द ग्रीक’ला मॉडर्न क्लासीक म्हणून मान्यता मिळाली आहे. कजांन्स्कीस यांच्या हयातीतच या पुस्तकाला उदंड लोकप्रियता आणि समीक्षकांची पसंती लाभली असली तरी याचे चित्रपटातील रूपांतर त्यांच्या मृत्युपश्‍चात करण्यात आले. पुस्तकी किडा असणारा सुत्रधार बेसिल एक आदर्शवादी तरूण तर झोरबा हा साठीतला विलक्षण उर्जावान कलंदर असतो. संपुर्ण चित्रपटात दोन परस्परविरोधी विचार अत्यंत खुबीने दर्शविण्यात आले आहेत. एक अंतर्मुख स्वभावाचा नायक तर दुसरा बहिर्मुखी झोरबा. एक जीवनाकडे स्वप्नाळू आदर्शवादाच्या नजरेतून पाहणारा तर दुसरा आला तो क्षण आसुसल्यागत उपभोगणारा. यामुळे झोरबा चटकन मध्यमवयीन फ्रेंच हॉटेल मालकीणला पटवून टाकतो. इकडे गावातील तमाम टगे मंडळीच्या निशाण्यावर असलेल्या विधवा तरूणीच्या डोळ्यातील प्रेमाचे भाव नायकाला समजतात पण तो पुढाकार घेत नाही. झोरबासोबत राहून धीट झाल्याने तो हिंमत केल्याने त्यांचे मिलन होते खरे पण ते क्षणभंगुरच ठरते.

या चित्रपटात नायक आणि झोरबा यांच्यातील वैचारिक द्वंद्वासोबत तेथील भोवतालही अत्यंत परिणामकारकतेने दर्शविण्यात आला आहे. या लहानशा गावातील बहुतांश लोक दरिद्री असतात. गावकर्‍यांवर चर्चचा मोठा पगडा आहे. मात्र नितीनियमांच्या आडचा रानटीपणाही येथेच फोफावलेला असतो. विधवेवर केलेल्या एकतर्फी प्रेमातून आत्महत्या केलेल्या तरूणाचा बाप ज्या विलक्षण थंडपणे तिचा गळा कापतो ते अंगावर शहारे आणते. त्याहूनही भयंकर बाब निर्विकारपणे चर्चमध्ये कर्मकांड सुरू असतांना गावकरी त्या महिलेस अक्षरश: घेरून दगडफेक करतात. हा पाशवीपणा सुरू असतांना नायक अगतिकपणे पाहण्यावाचून काहीही करू शकत नाही. यानंतर फ्रेंच हॉटेल मालकीणचा मृत्युदेखील असाच धक्कादायक. झोरबाच्या कुशीत ती जीव सोडत असतांना गावातल्या बायाबापड्या तिची मालमत्ता लुटण्यासाठी टपून बसलेल्या असतात ही बाब भयंकर वाटते. या दोन्ही प्रसंगांमध्ये नायक हतबल असतो. विधवेच्या जीव धोक्यात असतांना तो वेड्याला झोरबाला शोधून आणण्यासाठी सांगतो तर हॉटेल मालकीण मरत असतांना तो पोलिसांना बोलावण्यासाठी जातो. अर्थात त्याच्याकडे माणुसकी असली तरी धाडस नसते. याच्या विरूध्द झोरबा कोणतीही पर्वा न करता दोन्ही प्रसंगांमध्ये धिरोदत्तपणे वागतो.

नायक आणि झोरबा यांच्यातील मतभेद त्यांच्या कामातही दिसून येतो. उमद्या स्वभावाचा बेसिल हा खाण कामगारांशी सलगीने वागू पाहताच झोरबा त्याला सावधगिरीचा इशारा देत त्यांच्याशी थोडे अंतर राखून वागण्याचे सुचवितो. खाणकाम सुरू असतांनाच झोरबाच्या डोक्यात डोंगर माथ्यावर असणार्‍या जंगलातील लाकडे तोडून ती तारांवर सरकत्या प्रणालीच्या मदतीने खाली आणण्याची भन्नाट कल्पना सुचलेली असते. खाण बंद केल्यानंतर ते दोन्ही जण यावरच लक्ष्य केंद्रीत करतात. मात्र अर्थातच हा प्रोजेक्टही फेल होतो. मात्र हे अपयश येऊनही झोरबा आशावादी असतो. या सर्व कालखंडात नायकाची मानसिकताही बदलते. अर्थात याचमुळे नायकही अपयशात आनंद साजरा करत झोरबासोबत उन्मुक्त होऊन नाचायला सुरूवात करतो.

‘झोरबा द ग्रीक’ मध्ये मानवात असणार्‍या अंतर्मुखपणा आणि बहिर्मुखपणातील संघर्षावर नेमके बोट ठेवण्यात आले आहे. पुस्तकी व अर्थातच बेगडी जीवन जगणारे, कल्पनांमध्ये विहार करणारे आणि अगदी प्रवाही जीवन जगणार्‍यांमधील भेदक फरक नायक आणि झोरबा यांच्या माध्यमातून दर्शविण्यात आला आहे. झोरबाची जातकुळी ही प्राचीन ग्रीक ‘पेगन’ संस्कृतीशी वा थेट आपल्याकडील चार्वाकच्या लोकायत पंथाशी जवळीक असणारी. यानुसार तो जीवनातील प्रत्येक क्षणाचा आसुसलेपणाने आनंद घेत स्वच्छंदी जीवन जगतो. त्याला कथित नितीनियमांचा विधीनिषेध नाही. अगदी स्वत:चा मुलगा मेल्यानंतर अन्य लोक रडत असतांना हा नाचतो. दारू, जुगार, खोटे बोलणे, महिलांशी व्यभिचार यात त्याला काहीही गैर वाटत नाही. मात्र याच वेळी अन्यायाविरूध्द तो पेटूनही उठतो. यामुळे विधवेची बकरी पळविणार्‍या टग्यांसमोर तो उभा राहतो. याचसोबत तो विधवेला वाचविण्याचा प्रयत्नही करतो. इकडे नायकाच्या मनातही जगण्याची तीव्र आसक्ती असते. मात्र नितीनियम आणि धास्तीमुळे तो प्रत्यक्ष जीवन जगू शकत नाही. झोरबा हा भोगवादी तर नायक हा आदर्शवादी आणि अमुर्त कल्पनांमध्ये विहार करणारा. नेमक्या याच विरोधाभासाला ओशोंनी अनेकदा अधोरेखित केले आहे. झोरबा आणि नायक यांच्याशिवाय मानवात बुध्दाचाही अंश असतो. म्हणजे झोरबाचा भोग, नायकाचा विचार आणि बुध्दाचे ध्यान हे परिपुर्ण मानवाची निर्मिती करतील असे प्रतिपादन त्यांनी केले. यातूनच ‘झोरबा द बुध्दा’ या पध्दतीचा मानव आपल्याला अभिप्रेत असल्याचे प्रतिपादन ओशोंनी वारंवार केले आहे.

‘झोरबा दी ग्रीक’ या पुस्तकाचे चित्रपटात रूपांतर करतांना अनेक बदल करण्यात आले आहेत. पुस्तकात अत्यंत सविस्तरपणे हे कथानक देण्यात आले आहे. यात झोरबाने अनेक विवाह केलेले असतात. त्याला खुप मुलेही असतात. मात्र तो कोणतीही जबाबदारी अंगावर न घेता उन्मुक्तपणे जीवन जगत असल्याचे नमुद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे डोंगर माथ्यावरून लाकडे आणण्याचा प्रयोग अयशस्वी झाल्यानंतर झोरबाचे पुढे काय होते हा प्रश्‍न आपल्याला पडतो. याचे विवरणही पुस्तकात देण्यात आले आहे. यातून झोरबा या व्यक्तीरेखेबाबत आपल्याला अजून सविस्तरपणे माहिती मिळते. अर्थात चित्रपटाच्या माध्यमाला मर्यादा असल्या तरी मानवातील द्वंद्वाचे दोन पात्रांमधून समर्पक चित्रण करण्यात दिग्दर्शक मिखाईल कोकयानीस हे यशस्वी ठरले आहेत. बेसिल-ऍलन बीटस, मादाम होर्तोन्से-लिला केद्रोव्हा, विधवा-इरीन पेपाज यांनी आपापल्या भुमिका उत्तम वठविल्या आहेत. मात्र या चित्रपटाचा खरा नायक असणारा झोरबा अँथनी क्विन याने अत्यंत समरतेने जीवंत केला आहे. जणू काही ही भुमिका त्याच्यासाठीच लिहण्यात आली होती. अँथनी क्विनच्या अविस्मरणीय भुमिकांपैकी एक म्हणून याचा उल्लेख होतो.

झोरबा एकदा म्हणतो ‘‘Boss, you’ve got everthing except one thing: madness! A man needs a little madness, or else……he never dares cut the rope and be free.’’ कथित सुजाणपणाचे बंध तोडण्यास सांगणारा झोरबा आपल्याला अर्थातच नायकापेक्षा जवळचा वाटतो. ‘‘Life is trouble. Only death is not. To be alive is to undo your belt and *look* for trouble.’’ असे सांगत जीवनाचा प्रत्येक क्षण तो आसुसलेपणाने जगतो. आणि हे पडद्यावर पाहिल्यानंतर आपल्यालाही एक उत्तम कलाकृती अनुभवल्याचे समाधान वाटते.

पहा-झोरबाचे उन्मुक्त नृत्य !

About the author

shekhar patil

1 Comment

  • प्रिय शेखरभाऊ
    आपण कोणत्याही विषयावर अफ़लातून लिहितात हीच आपली विशेषता मनाला भावते.
    आपल्या लेखनीला शुभेच्छा !

Leave a Comment