Featured slider साहित्य

जगणं समृध्द करणारा ‘दादा’ माणूस

Written by shekhar patil

मराठीतील सर्वश्रेष्ठ कादंबरीकार डॉ. भालचंद्र नेमाडे आज वयाच्या ऐंशीव्या दशकात प्रवेश करत आहेत. त्यांनी अवघ्या पंचविशीत असतांना लिहलेल्या कोसलाबाबत आता नव्याने सांगण्यासारखे काहीही उरलेले नाही. कारण यावर गत अर्ध शतकापासून भरभरून लिहले, बोलले जात आहे. खरं तर, कादंबर्‍यांसह नाटक, चित्रपट, कथा आदींमध्ये कुणालाही सर्वगुणसंपन्न नायक हवाहवासा असतो. मात्र कोसलातील पांडुरंग सांगवीकर हा ‘लार्जर दॅन लाईफ’ तर सोडाच पण याच्या अगदी उलट अति-सर्वसाधारण म्हणजे तुम्हा-आम्हासारखाच वाटतो. याचमुळे अनेक पिढ्या तारूण्यातून मध्यमवयाकडे उलटल्या तरी कोसलाचे गारूड मराठी मनावरून उतरण्यास तयार नाही. यातील अँटी हिरो पांडुरंग सांगवीकर आजही प्रत्येकाला आपला वाटतो, त्याच्या आयुष्यातील घटनांमध्ये आपले प्रतिबिंब शोधतो ही बाब अतिशय विलक्षण अशीच आहे. कोसलाने मराठी साहित्यात उमटलेली रेषा ओलांडून कुणी पुढे जाणार तोच हिंदूच्या माध्यमातून त्याच्याही पुढे झेपावणारा हा खान्देशी मिशीवाला बाबा म्हणजे अजब रसायन आहे. आपलाच मापदंड आपणच मोडून काढण्याचा हा विलक्षण योग कुणाच्या आयुष्यात सहसा येत नाही. पु. ल. देशपांडे यांनी त्यांच्याबाबत मत व्यक्त करतांना या तरूणाने (नेमाडे यांनी) अगदी अचूक क्षणी पेंगत असणार्‍या मराठी साहित्यक्षेत्राला बरोबर पकडल्याचे समर्पक वक्तव्य केले होते. याच पध्दतीत ‘पोस्ट कोसला’ अर्थात कोसला पश्‍चातच्या कालखंडात डुलक्या घेणार्‍या साहित्यक्षेत्रालाही पुन्हा भालचंद्र नेमाडेंनीच पकडले हेदेखील कुणी अमान्य करणार नाही.

आजच्या बरोबर तीन वर्षांपूर्वी डॉ. नेमाडे हे सांगवी येथे होते. त्यांच्या समृध्द अडगळीने तुडुंब भरलेल्या घरात मस्तपैकी मांडी मारून एैसपैस गप्पा मारण्याचा योग आला. यात त्यांचा अफाट बुध्दीमत्तेचा व तीक्ष्ण मिश्कील स्वभावाचा प्रत्यय आला. याप्रसंगी त्यांनी औरंगाबाद येथील एका पानवाल्याने आपल्याला उर्दू शायरीची गोडी कशी लावली याचे अगदी रसाळ किस्से सांगितले. खरं तर, नेमाडेदादांचे अत्यंत निकटवर्तीय असणारे प्रशांत धांडे माझे मित्र आहेत. त्यांच्याशीही नेहमी चर्चा होत असते. तर नेमाडे कुटुंबियांशी जवळपास दहा वर्षे अत्यंत निकटचे संबंध आलेले माझे स्नेही चंद्रकांत भंडारी यांनी त्यांच्या लिखाणावरील निस्सीम प्रेमाबाबत मला बरेच काही सांगितले आहे. म्हणजे एखादा शब्द अडला तर अगदी पाच-सहा महिने यावर मंथन करणारा हा महान लेखक अक्षरश: संपूर्ण रात्रभर लेखन, वाचन, ममन, चिंतन करतो. विविध विषयांमध्ये त्यांना अगदी त्यातील तज्ज्ञांइतके ज्ञान आहे. ते सातत्याने नवनवीन विषयांना जाणून घेत असतात आदी. अर्थात क्वचितच एखादा लेखक इतके अविरत परिश्रम करत असेल. यामुळे ते प्रत्येक क्षेत्रात पूर्ण तयारीनेच उतरले. मग ते विद्यार्थ्यांना शिकवणे असो की, कादंबरी, कविता वा समीक्षा लेखन ! मात्र ही ‘तयारी’ करतांना त्यांना किती परिश्रम करावे लागतात याची जाणीव सहसा कुणाला नसेलच.

पांडुरंग सांगवीकरच्या कालखंडातील सांगवी ते पुणे असणारा परीघ आता वैश्‍वीक पातळीपर्यंत विस्तारला आहे. खुद्द सांगवीतच आता ग्लोबलायझेशनच्या खुणा उमटू लागल्या आहेत. पांडुरंगनंतर चांगदेव पाटील आणि नामदेव भोळे यांचा आयुष्यपट हा महाराष्ट्रातील जातीयवादाच्या आडव्या-उभ्या भेदांवर तिरकस भाष्य करणारा आहे. तर हिंदूमधील खंडेराव विठ्ठल हा अखील भारतीय उपखंडाच्या व्यापक पटलावर वावरणारा आहे. पाकिस्तानातल्या प्राचीन संस्कृतींच्या उत्खननापासून ते सातपुड्याच्या पायथ्याशी असणार्‍या मोरगावसारख्या लहानशा गावापर्यंतच्या कथानकाचा पट हा विविध काळांमधून आणि असंख्य पात्रांच्या माध्यमातून ते आपल्या समोर मांडतात तेव्हा थक्क होण्याशिवाय कोणताही पर्याय उरत नाही. एका अर्थाने ते संस्कृतीचेच उत्खनन करत असल्याचे आपल्याला जाणवते. येथवर लेखक म्हणून डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्यातील बदलही आपण अनुभवतो. कोसलात पारंपरीक शैलीस छेद देणारी भाषा ही मराठी जनांना भावली. यानंतर हिंदूपर्यंत येतांना त्यांची भाषा अजून भरजरी बनली आहे. याचेच अतिशय विलक्षण मोहक रूप हिंदूतून आपल्याला अनुभवता येते. नेमाडेंची महिलांविषयीची आत्यंतिक कणव ही त्यांच्या सृजनातून अनेकदा समोर आली आहे. हिंदूत याचा सर्वोच्च अविष्कार आपल्याला अनुभवता येतो. याच्या जोडीला ग्रामीण भागातील जातीय व धार्मीक ताणेबाणे, शतकानुशतके चालणारे शोषण, भटक्या जमातींच्या आयुष्यातील भणंगपणा, पितृसत्ताक व सरंजामी विचारवर्चस्वातून होणारे अत्याचार आदी विविध बाबींना अतिशय भेदकपणे मांडण्यात आले आहे. याच्या जोडीला आयुष्यातील व्यर्थतेवर भाष्य आहेच. मात्र एकीकडे भारतीय उपखंडातील प्रवास दर्शविल्यानंतर खंडेराव पुन्हा एकदा गावाकडे परतण्याची बाबही आपण लक्षात घेतली पाहिजे. कोसलातील पांडुरंग हताशेने घरी परततो. तर खंडेरावावर कुटुंबाची जबाबदारी आल्यामुळे त्याला गावी परतावे लागते. अर्थात आपले गाव हे डॉ. नेमाडे यांना पुन्हा-पुन्हा खुणावते की काय? असे वाटू लागते. आणि खुद्द त्यांच्या वर्तनातूनच ही बाब खरी असल्याचे अनेकांनी अनुभवले आहे.

हेदेखील वाचा : पुरून उरले ते नेमाडेच !

यशाच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान झाल्यावरही भालचंद्र नेमाडे हे आपले जन्मगाव असणार्‍या सांगवीला विसरलेले नाही. ते अनेकदा येथे येतात. बराच काळ मुक्काम ठोकतात. परिचितांशी गप्पांचा फडही रंगवतात. यामुळे पांडुरंग ते खंडेराव या सर्व नायकांना गावाकडे आणण्याची प्रेरणा त्यांना स्वत:तूनच मिळाल्याची बाब उघड आहे. अलीकडेच त्यांनी आपल्या गावाच्याच परिसरात कृषी साहित्याचे अनोखे संग्रहालय सुरू करण्याची इच्छादेखील व्यक्त केली आहे. एका अर्थाने नेमाडेंना आपल्या ‘रूटस्’चे प्रचंड आकर्षण असल्याचे दिसून येते. अर्थात, त्यांनी मांडलेल्या देशीवादात आपला भोवताल आणि जाणीवांशी प्रामाणिक राहून केलेले लिखाण असतेच. यामुळे त्यांचे नायक हे शेवटी आपल्या मुळाकडेच आकर्षीत होत असल्याचे आपण अनुभवू शकतो. या पार्श्‍वभूमिवर, हिंदूच्या आगामी भागांमधील नायकदेखील याच पध्दतीत मातृभूमिशी नाते जोडणारा असेल काय ? हिंदूत भारतीय उपखंडाला कवेत घेणारे नेमाडे पुढे वैश्‍वीक पातळीवरील कथानक मांडणार काय ? असे झाल्यास आजवर जातीय विषमतेवर भेदक भाष्य करणारे त्यांचे नायक ग्लोबल जगातील गुंत्यांबाबत कसे रिअ‍ॅक्ट होणार ? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यासाठी समस्त मराठी रसिक उत्सुक आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे त्यांचे सर्व नायक हे अविवाहीत आहेत. ‘कारे’पणाच्या बर्‍या-वाईट अनुभवांना ते जगासमोर मांडतात. कुटुंबव्यवस्थेतील गुंतागुंत हे एक त्रयस्थाच्या नजरेने पाहतात. तथापि, स्वत: आगामी भागात ते विवाहसंस्थेत जाऊन तेथील अनुभूती कशा पध्दतीने व्यक्त करतील हे पाहणेदेखील औत्सुक्याचे ठरणार आहे. अर्थात, या सर्व अनुभूती आपले आयुष्य अजून समृध्द करतील.

खरं तर, वयाची ऐंशी वर्षे म्हणजे नजर पार लागण्याचा काळ. मात्र या वयातही अविरतपणे लेखन, मननात मग्न असणारे डॉ. भालचंद्र नेमाडे हे मराठी मातीतील एक ऋषीतुल्य व्यक्तीमत्व होय. त्यांच्या सृजनातल्या कोसलातील निर्मळ झरा हिंदूपर्यंत येईपर्यंत एका धीरगंभीर नदीत परिवर्तीत झाला आहे. हिंदू चतुष्ट्य पुर्ण होईपर्यंत तो एका महासागरात परिवर्तीत होणार यात शंकाच नाही. यासाठी नेमाडेदादांना खूपखूप शुभेच्छा.

About the author

shekhar patil

Leave a Comment