Featured अनुभव

चैतन्यदायी भोंगर्‍या

Written by shekhar patil

वसंत ऋतुची चाहूल लागतच सातपुड्याच्या कान्याकोपर्‍याला होलिकोत्सवाचे वेध लागते. जवळपास सव्वा महिन्यापर्यंतचा हा कालखंड सर्व आदिवासी बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा असतो. यातील पहिला महत्वाचा टप्पा म्हणजे होळीआधी आदिवासी बहुल गावांमध्ये भरणारा भोंगर्‍या बाजार होय. तर प्रत्यक्ष होळी पेटल्यानंतर चार-पाच दिवस रंगोत्सव साजरा झाल्यानंतर हा उत्सव संपतो. अर्थात सध्या हा महोत्सव ऐन भरात असून यामुळे सातपुड्यातील दर्‍या-खोर्‍यांमध्ये चैतन्याला उधाण आलेले आहे.

५ मार्च २०१२ रोजी मी पहिल्यांदा वैजापूर (ता. चोपडा) येथील भोंगर्‍या बाजाराला भेट दिली. तेव्हाही मी जवळपास अडीच-तीन तासांचे व्हिडीओ चित्रीकरण केले होते. यानंतर जवळपास पाच वर्षांनी म्हणजेच शनिवार दिनांक ११ मार्च २०१७ रोजी हाच योग पुन्हा जुळून आला. आताही व्हिडीओ चित्रीकरण केले. या दोन भेटींमध्ये पाच वर्षांच्या कालखंडात भोंगर्‍यातील अनेक स्थित्यंतरे टिपता आली. मात्र या उत्सवातील चैतन्यदायी वातावरण मला तसूभरही कमी झालेले आढळले नाही. मैदानी प्रदेशांमधील रहिवासी आणि आदिवासींच्या जीवनशैलीतील फरक हा त्यांच्या दैवतांपर्यंतही स्पष्टपणे दिसून येतो. हा समुदाय मूळचा निसर्गपूजक. निसर्गावरच त्यांचे दैनंदिन व्यवहार सुरू असत. अर्थात त्यांचे सण व उत्सवदेखील यावरच आधारित आहेत. नागरी समुदायांसाठी दिवाळी आणि दसर्‍याचे जे महत्व आहे ते आदिवासींच्या जीवनात होळीला आहे. वर्षातील हा त्यांचा सर्वात मोठा उत्सव. यामुळे नोकरी वा शिक्षणानिमित्त कुणी कितीही दुरवर गेला असला तरी या उत्सवादरम्यान तो घरी नक्की येतोच.

साधारणपणे माघ पौर्णिमेपासून आदिवासी समुदायाच्या होलिकोत्सवाची तयारी सुरू होते. यात होळीसाठी मानाचा बांबू निवडण्यापासून ते यासाठी गावकर्‍यांना निमंत्रण देण्याचे विविध टप्पे आहेत. जंगलात दूरवर जाऊन दरवर्षी मोठ्यात मोठा बांबू विधीवत पूजन करून मूळापासून उखडून गावात आणला जातो. यानंतर येथील मोकळ्या मैदानात होलिकोत्सवाची जय्यत तयारी करण्यात येते. यालाच समांतर असणारा या महोत्सवाचा अविभाज्य घटक म्हणजे भोंगर्‍या बाजार होय. एका बाजूने आपापल्या गावात होळीची तयारी करतांना यासाठी आवश्यक असणार्‍या बाबींच्या खरेदीसाठी भोंगर्‍या बाजार उपयोगात येतो. अर्थात कुणालाही आमंत्रण न देता अथवा कोणत्याही प्रकारची जाहिरातबाजी न करता या प्रकारच्या बाजारांमध्ये आदिवासी बांधव मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात. हे त्यांचे शेकडो वर्षांपासून चालत आलेले ‘सोशल नेटवर्कींग’ मानावे लागेल.

भोंगर्‍या हा शब्द अनेक पध्दतीने वापरण्यात येतो. अनेकांच्या मते हा भगौरिया या हिंदी शब्दाचा अपभ्रंश आहे. मध्यप्रदेशच्या निमाड प्रांतातील आदिवासी बहूल भागांमध्ये दहाव्या-अकराव्या शतकापासून होळीआधी विविध गावांमध्ये भरणार्‍या बाजारांचे उल्लेख आढळून येतात. याला आजवर एक रोमँटीक आयाम जोडण्यात येत असतो. तो म्हणजे प्राचीन भारतीय वसंतोत्सव वा मदनोत्सवाचा. या महोत्सवांप्रमाणेच भोंगर्‍यात आदिवासी तरूण-तरूणी हे आपला जीवनसाथी निवडत असतात. यासाठी कुणीही तरूण हा त्याला या बाजारात त्याला आवडलेल्या तरूणीला पान खावयास देतो. त्या तरूणीने पान स्वीकारले तर ती त्याच्या प्रेमाचा स्वीकार करते असे सांगण्यात येते. याचप्रमाणे आवडत्या तरूणीच्या अंगावर गुलाल टाकूनही प्रेमाची अभिव्यक्ती करण्यात येते असा समज आहे. अलीकडे तर वृत्तवाहिन्यांवर भोंगर्‍या म्हणजे जणू काही देशी ‘व्हॅलेंटाईन्स डे’ असल्याचे दर्शविण्यात येते. कधी काळी हे असेलही, मात्र सध्या ‘भोंगर्‍या’त असले काहीही होत नाही. माझ्या दोन्ही भेटींमध्ये आदिवासी समुदायातील मान्यवरांनी अन्य समाजात हा साफ चुकीचा समज रूढ झाल्याबद्दल खंत व्यक्त केली. चोपडा तालुक्यात असणार्‍या बारेला आणि पावरा या दोन्ही आदिवासी शाखांमध्ये होळी पर्वातल्या सव्वा महिन्यात तर विवाहच होत नाहीत. एवढेच नव्हे तर या कालखंडात कुणी विवाह केला तर पंच मंडळीतर्फे त्यांना दंड ठोठावण्यात येत असतो. अर्थात कुणी अशी आगळीक करत नाहीच. जर होळीच्या कालखंडात विवाह होतच नाहीत तर भोंगर्‍यात विवाह जुळतात हे खरे कसे ? हा सवालदेखील सुशिक्षित आदिवासी बांधव अलीकडे उपस्थित करू लागले आहेत. नागरी समुदायाने ‘भोंगर्‍या’कडे निकोप दृष्टीने पाहण्याची गरजदेखील यातून स्पष्टपणे अधोरेखित झाली आहे. यामुळे ढोबळपणे विचार करता होळी उत्सवासाठी आवश्यक असणार्‍या जिन्नसांची खरेदी करण्यासाठी ठिकठिकाणी भरण्यात येणारे बाजार म्हणजेच ‘भोंगर्‍या बाजार’ होय असा अर्थ आपण घेऊ शकतो.

नाच-गाणे हा आदिवासींच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. यामुळे साहजीकच होलिकोत्सवाच्या केंद्रस्थानी ते असणारच. प्रत्यक्ष होळी पेटल्यानंतर त्याच्या भोवती रात्रभर अविरतपणे नृत्य केले जाते. याच पध्दतीने भोंगर्‍या बाजारातही गाणे-बजावणे आलेच. ही मंडळी ढोलाभोवती गोलाकार नृत्य करते. मांदल नावाचा हा मोठा ढोल एका व्यक्तीला अगदी कसरत करत पेलावा लागतो. तर काही मोठे ढोल हा खाली आधार घेऊन ठेवले जातात. याच्या जोडीला थाळी आणि बासरी असते. अर्थात मांदल, थाळी आणि बासरी या अवघ्या तीन वाद्यांच्या मदतीने तनामनाला झपाटून टाकणारा ताल निर्मित करण्यात येतो. आपण आजवर विविध ठेक्यांचे संगीत ऐकले असेल. मात्र भोंगर्‍यातील आदिवासींचा ताल हा त्यापेक्षा वेगळा असतो. यात आबालवृध्द स्त्री-पुरूष धुंदपणे नाचत असतात. बाजारातून सर्वात आधी त्या गावातील मानाचा ढोल फिरतो. यानंतर दूरवरून आलेले विविध गावांचे ढोल आणि त्यासोबत त्या-त्या गावांमधील स्त्री-पुरूष अगदी जगाला विसरून नृत्य करत असतात. सायंकाळपर्यंत हा सगळा प्रकार चालतो. यानंतर संबंधीत पथके हे आपापल्या गावी परततात. अर्थात या बाजारातून सर्वांनी आपणास आवश्यक असणारी खरेदी केलेली असते. यात जास्तीत जास्त खाद्यपदार्थ असतात. याशिवाय जीवनावश्यक वस्तूंचीही खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात येते.

भोंगर्‍यातील एक प्रमुख घटक अर्थातच मोहाचे मद्य हे असते. आदिवासींच्या जीवनात मोहफुलाचे महत्वाचे स्थान आहे. अनेक लोकांना या फुलांना वेचण्यातून रोजगार मिळतो. तर श्रमपरिहारासाठी यापासून तयार करण्यात आलेल्या मद्याचा वापर करण्यात येतो. सातपुड्याच्या पायथ्याशी ‘मोहा’च्या नावावर फसवणुकीचा प्रकार होतात. यात नवसागरसह अन्य घातक रसायनांची भेसळ करण्यात येते. मात्र शुध्द मोहाची दारू ही चवीला थोडी विचीत्र म्हणजे तुरट लागत असून तिचा वासही उग्र असतो. मात्र ती आरोग्यवर्धक मानली जाते. विशेष करून या मद्याचा ‘हँगओव्हर’ होत नाही. किंबहुना दुसर्‍या दिवशी खूप ताजेतवाने वाटत असल्याचा अनेकांचा अनुभव आहे. या मद्याचे रासायनिक विश्‍लेषण करून याच्या फायद्यांचे अचूक ब्रँडिंग करण्याची आवश्यकता असल्याचे या भेटीत काही आदिवासी मित्रांनी आवर्जून सांगितले. तर दुसरीकडे समाजातील सुशिक्षित वर्गात मद्याला त्याज्य मानणार्‍यांची संख्याही वाढत असल्याचे चित्र आहे. काही मंडळी आदिवासींच्या मद्यप्रेमाला नाके मुरडतात. मात्र देशभरातील होलीकोत्सवात भांगसारख्या पदार्थांचा मुक्त वापर होत असतांना आदिवासींच्या पारंपरिक मद्यावरून त्यांना कमी लेखणे हे केव्हाही गैर. सकारात्मक बाब म्हणजे उत्सव वगळता अन्य दिवसांमध्ये मद्याचा फारसे सेवन न करणारा एक मोठा वर्ग आता या समाजात उदयास आला आहे.

आदिवासींच्या होलिकोत्सवातील पळस वृक्षाचे फुलही खूप महत्वाचे असते. खरं तर ‘पळसाला पाने तीन’ या म्हणीच्या पलीकडे आपल्याला या वृक्षाबाबत फारशी माहिती नसते. मात्र पळसाची फुले ही ऋतुराज वसंताच्या वैभवात भर घालणारी असतात. वैजापूरला जातांनाच्या रस्त्यावरही दोन्ही बाजूस फुललेला पळस मनाला धुंद करतो. आदिवासी होळीनंतरच्या रंगोत्सवात पळसासह अन्य फुलांपासून तयार केलेला रंग उपयोगात आणतात. हा रंग निघण्यासाठी खूप कठीण असला तरी तो खर्‍या अर्थाने ‘इको फ्रेंडली’ असल्याने त्वचेसाठी त्रासदायक नसतो. मात्र अलीकडे तरूणाईचा कल हा गडद, आकर्षक मात्र घातक असणार्‍या कृत्रीम रंगांकडे वळला आहे. परिणामी येत्या काही वर्षांमध्ये आदिवासींच्या जीवनातील पळसाचे स्थान हळूहळू कमी होत जाईल हे स्पष्ट आहे. अर्थात पळसच नव्हे तर आदिवासींच्या होलिकोत्सवात आधुनिकतेचा अपरिहार्य स्पर्श हा अनेक बाबींमधून दिसून आला आहे. भोंगर्‍याला दिलेल्या दुसर्‍या भेटीतून हेच स्पष्टपणे अधोरेखित झाले आहे. पाच वर्षांपूर्वी बाजारात अनेकांना छायाचित्रीकरणाचे अप्रूप वाटत असे. आता तर मांदल भोवती नाचणार्‍यांच्या हातात सेल्फी स्टीक दिसू लागल्या आहेत. ठिकठिकाणी अनेक कुटुंबे सेल्फी घेत असल्याचे चित्रही दिसून आले. आधी उपस्थितांपैकी किमान निम्मे लोक हे आपल्या पारंपरिक वेशभूषेत असत. आता मात्र हे प्रमाणही खूप कमी झाल्याचे दिसून आले. हा एकंदरीतच या समुदायाच्या जीवनमानात झालेल्या बदलाचे हे प्रतिबिंब मानावे लागेल. याचे स्वागत झालेच पाहिजे. मात्र यातून होलिकोत्सवाचा निखळ आनंद लयास तर जाणार नाही ना? ही बाबही विचारात घ्यायलाच हवी. खरं तर आजही हा बहुसंख्य समुदाय अत्यंत खडतर जीवन जगतो. कुपोषण आणि त्यातून जडलेल्या व्याधी, शिक्षणाकडे झालेले दुर्लक्ष, विविध शासकीय योजनांमधील त्रुटी या बाबींमुळे आजही हा समाज आत्यंतिक गरीबीत जगत आहे. एवढे असूनही होलिकोत्सवात आपल्या सर्व वेदना विसरून अत्यानंदाने फुललेले चेहरे बाहेरच्यांना स्तिमीत करतात. अत्यंत काबाडकष्ट करणारे हे लोक काही दिवसांसाठी का होईना इतके आनंदी कसे बनतात ? हा प्रश्‍न आता सर्व सुख-सुविधा असणार्‍या आपल्यासारख्या पांढरपेशांनी स्वत:ला विचारायला हवा. आधुनिकतेने आपल्या जीवनातील आनंदाचे लहान-सहान क्षण हिरावून घेतले आहेत. यामुळे निसर्गाच्या कुशीत मुक्तपणे बाळगणार्‍या लेकरांचा चैतन्यदायी होलिकोत्सव आपण जीवनात नेमके काय हिरावून बसलोय? याची भेदक जाणीव करून देणारा असतो.

परंपरेला आधुनिकतेचा स्पर्श भोंगर्‍यात ठिकठिकाणी जाणवला.

About the author

shekhar patil

Leave a Comment