Featured चालू घडामोडी विज्ञान-तंत्रज्ञान

चॅलेंज ‘ब्ल्यू व्हेल’चे…परीक्षा पालकांची !

Written by shekhar patil

आजच्या आधुनीक युगात विकृतींचा विकार किती झपाट्याने पसरतो याचे उदाहरण म्हणून आपण ‘ब्ल्यू व्हेल चॅलेंज’ या गेमकडे पाहू शकतो. अगदी अल्प कालखंडात जगभरातील पालक, शिक्षक आणि समाजसेवकांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडणारा हा आत्मघाती गेम भारताच्या ग्रामीण भागातही पोहचल्याची बाब अतिशय धक्कादायक अशीच आहे. खरं तर गेमिंग हा प्रकार गेल्या दोन दशकात आपल्याकडे चांगलाच रूळला आहे. सीआरटी ट्युबच्या संगणकाच्या कृष्णधवल पडद्यावरील प्राथमिक गेमपासून ते आता स्मार्टफोन आणि गेमिंग कन्सोलवरील विविध गेम्स हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक केव्हा बनलेत हे कळलेदेखील नाही. अर्थात आधी मनोरंजन वा टाईमपासून म्हणून खेळले जाणार्‍या या गेम्सनी आपल्याला व्यसनासारखे केव्हा झपाटून टाकले हेदेखील कळले नाही. बरं, तासनतास कुणी एखाद्या गेममध्ये आकंठ बुडून जात असले तरी ठीक ! मात्र एखादा गेमच आत्मघाताकडे घेऊन जात असेल तर ? नेमकी हीच भिती ब्ल्यू व्हेल चॅलेंज या जलद गतीने फोफावणार्‍या विषवल्लीमुळे अधोरेखित झाल्याने समाजमन सुन्न झाले आहे.

ब्ल्यू व्हेल चॅलेंज हा नावातच स्पष्ट असल्याप्रमाणे ‘चॅलेंज’ या प्रकारातील गेम आहे. साधारणपणे सुरवातीला एक थरारक खेळ म्हणून वाटणारा हा गेम शेवटी कठोर व भयंकर स्वरूप धारण करतो. विशेष करून या गेमचे गारूड कुमारवयीन मुलांच्या मनावर असून तेच याला बळी पडत असल्याचे दिसून आले आहे. ब्ल्यू व्हेल चॅलेंज हा गेम एखादे खास अ‍ॅप्लीकेशन वा अमुक-तमुक ग्रुपमधून खेळला जात असल्याची कोणतीही बाब समोर आलेली नाही. हे सर्व गुप्तपणे चालते. यामुळे पालकांनी मुलावर कितीही लक्ष ठेवले तरी ते सहजपणे सर्व डिजीटल पुरावे लपवू शकतात. मात्र हा गेम खेळत असतांना त्यांच्या वर्तनात होत असलेले बदल जाणून घेत संभाव्य धोका ओळखणे शक्य आहे. ब्ल्यू व्हेल चॅलेंजमधील बहुतांश आव्हानांमध्ये असाधारण वर्तन अर्थात अ‍ॅबनॉर्मल बिहेव्हियर दिसून येते. म्हणजे आपला मुलगा रात्री-अपरात्री उठून स्मार्टफोन वा अन्य संगणकीय उपकरणांसमोर बसतोय. त्याच्या अंगावर जखमा दिसत आहेत. तो झपाटल्यासारखा वागतोय असे दिसून आल्यास तो ब्ल्यू व्हेल चॅलेंजच्या जाळ्यात अडकल्याचे समजू शकते. नेमक्या याच पध्दतीने वर्तनातील बदल हेरून अनेक मुलांना आत्मघातापासून वाचविण्यात आले आहे. हा गेम अत्याधुनीक जगाची विकृती असल्याने याचा सामनादेखील तितक्याच तत्परतेने व नाविन्यपूर्ण मार्गांचा अवलंब करत करणे आवश्यक आहे. आपण संगणक वा स्मार्टफोनादी उपकरणांचे हॅकींग ऐकले वा अनुभवले असेल. तथापि, ब्ल्यू व्हेल चॅलेंजच्या माध्यमातून समोरचा व्यक्ती हा कुमारवयीन मुलांना थरारक आयुष्याची चव चाखण्याच्या नावाखाली ब्रेनवॉश करून त्याचा मेंदू व अर्थातच सारासाराविवेक बुध्दीच हॅक करत त्याला आत्मघात करायला लावतो. मात्र हॅकींगला प्रतिकार करण्यासाठी जसे अँटी व्हायरसेस आणि सावधगिरीचे अन्य मार्ग आहेत, अगदी त्याच पध्दतीने पालक, शिक्षक आणि या गेमला फशी पडण्याच्या तयारीत असणार्‍या मुलाच्या मित्रांना त्याच्यातील बदल हेरून या आत्मघाताला आळा सहजपणे घालता येईल. ब्ल्यू व्हेल चॅलेंज हा गेम अमुक-तमुक प्रकाराने ओळखला जाण्याची चिन्हे कळणे तसे खूप कठीण आहे. मात्र आपली मुले तासन्तास स्मार्टफोन वा संगणकावर नेमके काय पाहतात? ते कोणते गेम खेळतात ? त्या गेम्समध्ये हिंसक प्रमाण किती आहे? याची प्रथमदर्शनी माहिती पालकांनी घेण्याची गरज आहे. सुदैवाने गुगलचे प्ले स्टोअर आणि अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवर ब्ल्यू व्हेल चॅलेंजशी संबंधीत अ‍ॅप्लीकेशन्स बॅन करण्यात आली आहेत. मात्र एक अ‍ॅप डीलीट केले की ते दुसर्‍या नावाने सुरू होत असल्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. यामुळे मुलांच्या स्मार्ट उपकरणांमध्ये अ‍ॅप्लीकेशन्सची माहिती पालकांना हवीच हे अपेक्षित आहे. विशेष करून उपकरणांमधील अ‍ॅप्सच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. गुगल प्ले स्टोअरवर ‘अ‍ॅप लॉक’ लावणे सहजशक्य आहे. याचा वापर करूनदेखील घातक अ‍ॅप्सचा वापर टाळता येते. तर आपल्या मुलांच्या उपकरणांवर नजर ठेवण्यासाठी काही स्मार्टफोन अ‍ॅप्लीकेशन्सदेखील उपलब्ध आहेत. याचा वापर केल्यास आपल्या मुलांच्या डिजीटल वर्तनावरदेखील लक्ष ठेवणे शक्य आहे.

( (मी टेकवार्तावर आधीच ब्ल्यू व्हेल चॅलेंज म्हणजे काय रे भाऊ ? हा लेख प्रसिध्द केला असून तो आपण लिंकवर क्लिक करून वाचू शकतात.)

आपला मुलगा ब्ल्यू व्हेल चॅलेंज वा अन्य कोणत्याही घातक गेमच्या विळख्यात सापडला असल्यास त्याची माहिती त्याच्या वर्तनातून मिळू शकते. याची लक्षणे दिसल्यानंतर मुलाशी संवाद साधून त्याला यातून बाहेर काढता येईल. यासाठी मनोचिकित्सक वा समुपदेशकांची मदतदेखील होऊ शकते. सर्वात महत्वाची बाब म्हणजे मुले घराशिवाय शाळेतदेखील खूप वेळ घालवत असतात. यामुळे त्यांच्या वर्तनातील बदल हा शिक्षकांना समजू शकतो. यामुळे शिक्षकांचीही यात मोलाची भूमिका राहू शकते. साधारणपणे ब्ल्यू व्हेल चॅलेंज या गेमला बळी पडणारी मुले हे टिन एजर्स या प्रकारातील आणि वैयक्तीक आयुष्यात एकलकोंड्या स्वभावाची असल्याची बाब अनेक अध्ययनांमधून दिसून आली आहे. यामुळे असे स्वभाववैशिष्ट्य असणार्‍या मुलांच्या पालकांनी याबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अन्यथा सर्व उपाययोजना फोल ठरतील. यामुळे ब्ल्यू व्हेल चॅलेंज हे मुलांनाच नव्हे तर यापेक्षाही त्यांच्या पालकांसमोर कठीण आव्हान असल्याची बाब उघड आहे.

खरं तर अलीकडच्या काळात पालक आणि मुलांमधील संवाद हरविल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेष करून आधुनीक युगाचे लक्षण मानल्या जाणार्‍या आटोपशीर कुटुंबांमध्ये पती-पत्नी दोन्ही कामावर असतात. यात मुलांना शिक्षणासह सर्व सोयी चांगल्या पध्दतीने उपलब्ध केलेल्या असल्या तरी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी वेळ बर्‍याच पालकांकडे नसतो. यात कुमारवय हे अत्यंत संवेदनशील असते. यात होणारे मनो-शारीरीक बदल स्वीकारतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असते. यातच कुटुंबातील संवाद हरवला तर मुले साहजीकच आभासी डिजीटल विश्‍वाकडे वळतात. यात सोशल मीडियापासून ते विविध मॅसेंजर्स, गेम्स आदींच्या आहारी ते कधी जातात ते समजतही नाही. वैयक्तीक आयुष्यातील एकाकीपणापासून दुर पळणारी ही मुले आभासी विश्‍वात जीवनातील रोमांचकपणा शोधायला जातात. सोशल मीडियात ते आपली आभासी प्रतिमा उभी करतात. मात्र याच्याही पलीकडे जाऊन त्यांना जीवनातील थरार अनुभवायचा असतो तेव्हा सत्य आणि आभासातील पुसटशी सीमारेषा त्यांना कळेनाशी होते. नव्वदच्या दशकातील ‘शक्तीमान’ या विख्यात मालिकेतील नायकाप्रमाणे अनेकांनी आपल्याला कुणी तरी ‘सुपरहिरो’ वाचवण्यासाठी येईल याच्या भ्रमात अचाट कृत्य केल्याच्या घटना घडल्या होत्या. यात अनेक बालकांनी प्राण गमावले होते. ते युग दूरचित्रवाणी मालिकांच्या लोकप्रियतेचे होते. आज स्मार्टफोनच्या माध्यमातून प्रत्येकाच्या हातात सत्याला कल्पनेचे पंख लावणारे उपकरण सहजगत्या उपलब्ध झाले आहे. यामुळे कधी काळी मालिकांमधून ‘सुपरहिरो’ शोधणारी बालके आता आपणच अशा पध्दतीने नायक बनू शकतो या मानसिकतेत आल्याची बाब ही अतिशय धक्कादायक अशीच आहे. आगामी, खरं तर आताच डिजीटल साधनांच्या वापरामुळे आलेल्या विकृतीवर मानसशास्त्रीय उपचारांची एक स्वतंत्र शाखा कार्यान्वित होऊ शकते. किंबहुना ती काळाची गरज गरज बनली आहे.

(प्रस्तुत लेख दैनिक सकाळच्या जळगाव आवृत्तीत दिनांक १३ ऑगस्ट २०१७ रोजी प्रसिध्द झाला आहे.)

About the author

shekhar patil

Leave a Comment