राजकारण

चिदंबरमबुवांची भविष्यवाणी

भ्रष्टाचार, महागाई आणि विविध घोटाळ्यांनी केंद्र सरकारची लक्तरे वेशीवर टांगली असतांनाच कॉंग्रेसचे महाअधिवेशन नुकतेच झाले. या आधी ‘विकिलीक्स’या वेबसाईटने राहूल गांधी यांचे हिंदू दहशतवादाबद्दल कथित उद्गार जगजाहीर करून खळबळ उडवून दिली होती. यामुळे या अधिवेशनात हा मुद्दा गाजणार याची चिन्हे दिसत होती. अर्थात कॉंग्रेसी राजपुत्राने स्वत: याविषयावर मौन बाळगत दिग्वीजयसिंह यांच्यासारख्यांकडून आपले विचार वदवून घेतले. एकशे पंचवीस वर्षांच्या इतिहासात गांधी-नेहरू घराण्याच्या पलीकडे न पाहणार्‍या कॉंग्रेसी नेत्यांनी या अधिवेशनात राहूल गांधी यांच्या राज्याभिषेकाची पुरेपूर तयारी केल्याचे जाणवले. गांधी माता-पुत्राची हाजी-हाजी करणार्‍यांच्या गलबल्यात गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आपले ज्योतिषविषयक ज्ञानही पाजळले. भाजपावर प्रहार करतांना त्यांनी येत्या १० वर्षातही ‘आपका नंबर नही आयेगा’ असे सांगत जनता कॉंग्रेसच्याच पाठीशी असल्याचे झोकात नमूद केले.
पी. चिदंबरम हे तसे नेमस्त गृहस्थ. कधी कुणाच्या अध्यात-मध्यात न पडणार्‍या चिदंबरम यांचे पक्षात आणि पक्षाबाहेरही विरोधक फारसे नाहीत. नेहमी बुध्दीमत्तेच्या तेजाने झळकणारा त्यांचा चेहरा मात्र केंद्रीय गृहमंत्रीपदाचा भार आल्यापासून चिंतेने ग्रासल्यागत वाटत आहे. अर्थात भारताचे गृहमंत्रीपद हे काटेरी मुकुटासमानच होय. यामुळे या पदावर काम करणे सहजसोपे नाही. २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर शिवराज पाटील यांच्या जागी चिदंबरम यांची वर्णी लागली तेव्हा देशाला त्यांच्याकडून फार मोठी अपेक्षा होती. मात्र, त्यांनीही सातत्याने शिवराज पाटील यांच्यासमान पुचाट भूमिका घेतली. याचा परिणाम आपण पाहतच आहोत. देशातील निम्म्यापेक्षा जास्त भूभागात नक्षलवाद्यांनी थैमान घातले आहे. दहशतवादी कृत्यांमध्ये जराही घट झाली नाही. असे असतांना गृहमंत्रीपदाच्या माध्यमातून यावर कठोर उपाययोजना करण्याऐवजी चिदंबरम यांनी वाचाळपणाच केला.
वाराणसी स्फोटाबाबत केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी उत्तर प्रदेश सरकारला आधीच धोक्याचा इशारा दिला होता, असे सांगत केंद्राची व पर्यायाने आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्नही केला. राजकीय कारकीर्दीत अशा स्वरूपाची कोलांटउडी अपरिहार्य असली तरी याचे समर्थन कुणी करू शकणार नाही. यातच चिदंबरम महोदयांनी सर्वप्रथम देशाला भगव्या दहशतवादापासून धोका असल्याचे सांगून खळबळ उडवून दिली. याचीच री दिग्वीजयसिंह, राहूल गांधी यांनी ओढली. या अनुषंगाने भगव्या दहशतवादाच्या ताज्या वादाचे जनक हे चिदंबरमच आहे यात दुमत नाही. वास्तविक पाहता कॉंग्रेसच्या महाअधिवेशनात अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा या अत्यंत कळीच्या मुद्यावर ठाम भूमिका स्पष्ट करणे अपेक्षित होते. मात्र यात देशाचे गृहमंत्री सोनिया गांधींना ‘सुपर पीएम’ बनण्याची गळ घालत आरत्या ओवाळतात. राहूलच्या बाळबोध भाषणात त्यांना राजीव गांधींची छवी दिसते. राहूलच्या संभाव्य मंत्रीमंडळात स्थान मिळण्यासाठी ही लाचारी जरूरी असली तरी येणारी तब्बल दहा वर्षे जनता आपल्यासोबत राहणार हा त्यांचा आशावाद म्हणजे विनोदी स्वप्नरंजनच मानावे लागेल.
गगनाला भिडलेल्या महागाईने ‘आम आदमी’ पिचलेला आहे. देशात धर्म आणि भाषेच्या मुद्यावरून फुट पडत आहे. सीमेवरही स्फोटक वातावरण आहे. यामुळे कॉंग्रेस १० वर्षे सत्तेवर राहिल्यास नवनवीन कलमाडी, राजा, राडिया, भूमाफिया मुख्यमंत्री, लाचखोर राजकारणी आणि नोकरशहांशिवाय आपणास काय मिळणार आहे? महागाई आणि भ्रष्टाचारावर मौन बाळगणारे कॉंग्रेसी कथित भगव्या दहशतवादावर तुटून पडत गांधी माता-पुत्राची हुजरेगिरी करत असल्याचे चित्र आज दिसून येत आहे. यात चिदंबरम यांच्यासारखे चांगल्या प्रतिमेचे नेतेही सहभागी होतात ही आपल्या लोकशाहीची शोकांतिकाच मानावी लागेल. अर्थात, काहीही लटपटी खटपटी करून कॉंग्रेसप्रणित सत्ता अबाधित राहण्याची चिदंबरम यांची भविष्यवाणी खरी ठरल्यास काय होणार? याची कल्पनाही न केलेलीच बरी!

About the author

shekhar patil

Leave a Comment