Featured Uncategorized विज्ञान-तंत्रज्ञान

चाहूल माध्यम क्रांतीची

अयोध्या प्रकरणाचा निकाल हा अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या इंटरनेटवरील संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला. याद्वारे देशाच्या इतिहासातील सर्वात उत्कंठावर्धक अध्यायाची नोंद झाली. याच दिवशी प्रसारमाध्यमांमधील एका नव्या युगाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली असून याकडे मात्र बहुतांश जणांचे दुर्लक्ष झाले आहे.

अयोध्या प्रकरण हे बऱ्याच अर्थांनी अनोखे होते. याचा निकालही अत्यंत अभूतपूर्व पध्दतीने लागला. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना या खटल्याच्या निकालाची प्रत मिळण्याआधीच ती इंटरनेटद्वारे जगासाठी उपलब्ध झाली होती. आजवरची प्रथा तोडून अशा प्रकारे जाहीर करण्यात आलेला निकाल हा नव्या युगाची नांदी ठरणार आहे. मानवी इतिहासात मुद्रीत प्रसारमाध्यमांना अत्यंत महत्वाचे स्थान असले तरी विसाव्या शतकाच्या शेवटी या माध्यमाला प्रथमच मोठ्या प्रमाणात आव्हान उभे राहिले. प्रथम विविध दूरचित्रवाणी वाहिन्या आणि नंतर आलेल्या इंटरनेटने मीडियाचे स्वरूपही मोठ्या प्रमाणात बदलले. आता तर एसएमएस, एमएमएस आदींच्या रूपाने असंख्य हातांमध्ये संपर्काचे हुकमी साधन आले आहे. प्रसारमाध्यमांमध्ये अत्याधुनिक उपकरणांनी आलेली प्रचंड गती ही जीवनाच्या सर्वच क्षेत्रात अनुभवास आली तरी सरकारी पातळीवर याची फारशी दखल घेण्यात आली नाही हे ही तितकेच खरे. यामुळे विविध वृत्तवाहिन्या आणि न्यूज पोर्टल्स प्रत्येक सेकंदाची दखल घेत असतांना सरकारी मालकीचे दुरदर्शन मात्र अजूनही भूतकाळातच वावरत असल्याचे केविलवाणे चित्र आहे. विविध सरकारी खाते आणि मंत्रालयांमध्ये ‘ई प्रणाली’ राबविल्याचा आव आणण्यात आला तरी प्रत्यक्षातील चित्र वेगळेच आहे. सरकारी खात्यांच्या संकेतस्थळांची दुर्दशा ही या बाबतीत अत्यंत सूचक अशी आहे. या पार्श्वभूमीवर, अलाहाबाद उच्च न्यायालयाने अयोध्या खटल्याचा निकाल सुनावण्यासाठी केलेली व्यवस्था ही आश्चर्याचा सुखद धक्काच मानावा लागेल.

गेल्या काही वर्षांपासून पारंपरिक प्रसारमाध्यमांना अत्यंत सशक्त असा पर्याय उभा राहिला आहे. ‘न्यू मीडिया’ अथवा ‘सोशल मीडिया’ नावाने हा प्रकार जगभर रूढ झाला आहे. ब्लॉग्ज, फेसबुक-ऑकुर्टसारख्या सोशल नेटवर्कींग साईटस्‌ अन्‌ ‘यू ट्यब’ सारख्या मुक्त साधनांचा वापर करून अगदी सर्वसामान्यांच्या हातातही जगभर आपला विचार अथवा बातमी पोहचवण्याची ताकद आली होती. यामुळे जगभरातील बलाढ्य ‘मीडिया हाऊसेस’ची मिरासदारी मोडकळीस आली. अर्थात यामुळे सायबरविश्वातही ‘ब्रेकिंग न्यूज’ची जीवघेणी स्पर्धा अवतरली. मायकल जॅक्सनसारख्या सुपरस्टारच्या निधनाचे पहिले वृत्त एका संकेतस्थळाने प्रसिध्द करून या माध्यमाची ताकद जगाला दाखवून दिली. ‘विकीलिक्स’ या संकेतस्थळाने अमेरिकेच्या युध्दविषयक धोरणातील तृटींना जगासमोर आणण्याचे कार्य केले. भारतात ‘सोशल मीडिया’ला वलयांकित व्यक्तींमुळे प्रसिध्दी मिळाली. अमिताभसारख्या दिग्गजांनी ब्लॉगिंगला तर शाहरूख, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर आदींमुळे ट्विटरविषयी सर्वसामान्यांना माहिती मिळाली. काही राजकारण्यांनाही याची मोहिनी पडली. शशि थरूर यांच्या ट्विटस्‌ भलत्याच गाजल्या. अखेर या महोदयांना मंत्रीपदावरून जावे लागले. विविध सेलिब्रिटीज आपल्या भावनांना मुक्तपणे व्यक्त करण्यासाठी ट्विटरचा मुक्त वापर करू लागल्या आहेत. आपल्या देशात एखादे ‘विकिलीक्स’ उघड झाले नाही मात्र अनेक ब्लॉगर्सनी विविध समाजोपयोगी प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे. ‘आयपीएल’ मधील गैरप्रकारावर एका तोतया खेळाडूच्या नावाने तयार करण्यात आलेल्या ब्लॉगद्वारे नवीन प्रकाश पडला. प्रसारमाध्यमांमधील ‘सुरस’ कथा भडास फॉर मीडिया, बातमीदार, कळते समजते आदी ब्लॉग्जच्या माध्यमातून जगासमोर आल्या ही बाबही लक्षणीय मानावी लागेल.

हे सारे होत असतांना केंद्र आणि राज्य सरकारांनी या नव्या माध्यमाची क्षमता पुरेपूर ओळखली नाही. किंबहुना याचा योग्य प्रकारे वापर करण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती कुणी दाखवली नाही. या पार्श्वभूमीवर, अयोध्या खटल्याचा निकाल इंटरनेटवर जाहीर करून अलाहाबाद उच्च न्यायालयाने एक उत्तम पायंडा पाडला आहे.
सध्या प्रशासनातील पारदर्शकतेविषयी सातत्याने चर्चा होत आहे. प्रत्यक्षात मात्र सरकारी यंत्रणेला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे वावडे आहे. अयोध्येच्या अत्याधुनिक निकालतंत्रामुळे याबाबत आशेचा नवा किरण दिसून आला आहे. इंटरनेटवरील निकालाच्या प्रतीमुळे अगदी सर्वसामान्यांनाही या खटल्याची इत्यंभूत माहिती मिळणे शक्य झाले. भविष्यात तर युट्युबसारख्या साधनांच्या सहाय्याने एखादा खटला अथवा महत्वाच्या घटनेचे चित्रीकरणही आपल्याला उपलब्ध होऊ शकते. मोबाईल इंटरनेट अथवा एमएमएससारख्या अत्याधुनिक पध्दतीच्या माध्यमातून अक्षरश: कोट्यवधी आबालवृध्दांपर्यंत कोणतीही माहिती पाठवणे आता सहजशक्य झाले आहे. अयोध्या निकालाच्या रूपाने याची ताकद सरकारी यंत्रणेला कळाली आहे. परिणामी येत्या काळात हा प्रकार रूढ होण्याची शक्यता निश्‍चितच आहे. अयोध्या निकालाचे नवे तंत्र या संदर्भात क्रांतीकारक मानावा लागेल.

(प्रसिध्दी दिनांक ४ ऑक्टोबर २०१०)

About the author

shekhar patil