चालू घडामोडी

राजकारण्यांचे नवीन प्रचारास्त्र

Posted on September 28, 2012

पंतप्रधानांचे ‘पब्लीक इन्फॉर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर अँड इनोव्हेशन’विषयक सल्लागार सॅम पित्रोदा यांची ‘ट्विटर’वरील प्रथम अधिकृत सरकारी पत्रकार परिषद अपेक्षेइतकी यशस्वी ठरली नसली तरी या माध्यमातून सोशल मीडियाचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘गुगल प्लस’वरील चॅटींगला एक महिनाही उलटत नाही तोच दिल्लीतील सत्ताधार्‍यांचा एक निकटवर्तीय अशाच स्वरूपाच्या हायटेक संपर्क प्रणालीचा उपयोग करतो ही निव्वळ योगायोगाची बाब नाही. अर्थात यातून सोशल मीडियाची ताकद भारतीय राजकारण्यांच्या लक्षात येऊ लागली हे मानण्यास वावगे ठरणार नाही.

अनेकदा वादाच्या भोवर्‍यात सापडूनही ‘सोशल मीडिया’ची परिणामकारकता कुणीही अमान्य करू शकत नाही. पारंपरिक मुद्रीत आणि इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांना थेट आव्हान देण्याची ताकद असणार्‍या या माध्यमाचा राजकारण्यांनाही परिणामकारकरित्या वापर करून घेता येतो. ओबामा यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी या माध्यमाचा अत्यंत परिणामकारक वापर करून घेतला. कोट्यवधी अमेरिकन जनतेपर्यंत ‘येस वुई कॅन!’ हा चैतन्यदायक संदेश पोहचवण्यात फेसबुक, ट्विटर, मायस्पेस आणि ब्लॉग यांचा अत्यंत महत्वाचा वाटा होता हे कुणापासून लपून राहिले नाही. ‘बराक ओबामा’नामक ग्लोबल ब्रँड उभारणीतही सोशल मीडियाचा सिंहाचा वाटा आहे. यानंतर लिबिया, इजिप्तसह मध्यपुर्व देशांमधील जनआक्रोश, अमेरिका व युरोपमधील ऑक्युपाय आंदोलन आदींमध्ये याच माध्यमांनी निर्णायक भूमिका निभावली. आपल्याकडेही अण्णा हजारे-बाबा रामदेव आदींच्या आंदोलनाच्या प्रचार-प्रसारात ही माध्यमेच प्रभावी ठरली. अरविंद केजरीवाल यांच्या ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’चा पाया यावरच उभा आहे. सांगायचा मुद्दा असा की, सोशल मीडिया या माध्यमाचे सामर्थ्य वारंवार सिध्द झाले आहे.

सोशल मीडियाचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे कोणत्याही मध्यस्थाविना जगाशी थेट संवाद होय. अर्थात हा संवाद पारंपरिक माध्यमाप्रमाणे एकमार्गी नाही. या माध्यमात कुणीही बिनधास्त मत प्रकट करू शकतो. दुसर्‍यांच्या मतावर प्रतिक्रिया देऊ शकतो. याला शेअर करू शकतो वा यावर विरोध प्रकट करू शकतो. व्यापक अर्थाने विचार करता सोशल मीडिया हे माहिती संवादाचे खर्‍या अर्थाने लोकशाहीकरण आहे. याचमुळे की काय सॅम पित्रोदा यांनी आपल्या पत्रकार परिषदेचा विषय ‘माहितीचे लोकशाहीकरण’ हा ठेवला होता. देशातील दुरसंचार क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे पित्रोदा हे तसे ढोबळ मानाने राजकीय व्यक्ती नव्हेत. मात्र ज्या शासनात ते सल्लागार आहेत त्यांची बाजू सावरणे त्यांना भाग होते. यामुळे ‘नॅशनल नॉलेज कमिशन’, ‘पब्लिक इन्फॉर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर’ आदींविषयी भरभरून ‘ट्विट’ करणार्‍या पित्रोदा यांना केंद्र शासनाचा सोशल मीडियावरील निर्बंधाचा पवित्रा, देशातील महाग ब्रॉडबँड सेवा आदींविषयी सारवासारव करावी लागली. काहीही असो केंद्र सरकारने या प्रथम ‘व्हर्च्युअल प्रेस कॉन्फ्रन्स’च्या माध्यमातून सोशल मीडिया फ्रेंडली होण्याकडे प्रथम पाऊल टाकले आहे.

भारतातील इंटरनेटधारकांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. स्मार्टफोनच्या रूपाने अगदी सहजगत्या इंटरनेट उपलब्ध होत असल्याने येत्या काळात हा वेग याहूनही वाढणार आहे. देशात सध्या साडेबारा करोड इंटरनेटधारक असल्याचा अंदाज आहे. त्यापैकी सहा कोटी लोक ‘फेसबुक’चा वापर करतात. अन्य सोशल साईटचा विचार करता हा आकडा अजून वाढतो. ही संख्या दुर्लक्ष करण्यासारखी जराही नाही. मात्र अत्यंत आश्‍चर्याची बाब म्हणजे भारतीय राजकारणात थोडेफार अपवाद वगळता या माध्यमाकडे सर्वांचे काहीसे दुर्लक्ष झाले आहे. सोशल मीडियाचे नाव येताच राजकारणातील शशी थरूर यांचे नाव सर्वप्रथम समोर येते. विविध विषयांवरील त्यांचे विद्वतापूर्ण भाष्य हे ‘ट्विटर’च्या माध्यमातून जगासमोर येते. इंटरनेटवर त्यांचा स्वत:चा एक चाहतावर्ग तयार झाला आहे. या पाठोपाठ गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा क्रमांक लागतो. मुख्य प्रसारमाध्यमांमध्ये खलनायक म्हणून मोदी यांचे चित्र रंगविण्यात येत असले तरी ‘न्यू मीडिया’त मात्र त्यांना मोठ्या प्रमाणात पाठींबा असल्याचे दिसून येते. माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी हे सातत्याने आपल्या ब्लॉगवरून जगाशी संवाद साधतात. अर्थात आपल्या ब्लॉगवरील लिखाणाच्या माध्यमातून काही तरी खळबळ उडण्याची योग्य ती तजवीज करण्यास ते विसरत नाहीत. विद्यमान लोकसभेतील सर्वात तरूण खासदार असणार्‍या कॉंग्रेस पक्षातील राहूल गांधी, सचिन पायलट, ज्योतिरादित्य सिंदीया, मिलिंद देवरा, नवीन जिंदल आदी मंडळी कमी-अधिक प्रमाणात सोशल मीडियात सक्रीय आहेत. मात्र खुद्द कॉंग्रेस पक्षाचे अधिकृतरित्या कोणत्याही सोशल साईटवर अस्तित्व नाही. डाव्या पक्षांनाही याचे वावडे आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेससह शिवसेना, अण्णा द्रमुक, बिजद, जद(से), जद(यू), राजद, शिरोमणी अकाली दल आदी पक्षांनाही सोशल मीडियाचे भान नाही. अर्थात भाजपा, बसप, समाजवादी पक्ष, तृणमुल कॉंग्रेस, डीएमके, तेलगू देसम आणि राष्ट्रीय लोक दल आदी पक्ष मात्र या माध्यमाच्या मदतीने जनतेपर्यंत पोहचली आहेत.

भारतीय जनता पक्षातील सुषमा स्वराज, अरूण जेटली, नवज्योत सिध्दू तसेच शरद यादव, सुब्रमण्यम स्वामी आदी मंडळीही याच माध्यमातून जगाशी संवाद साधत असतात. मनसेप्रमुख राज ठाकरे हे स्वत: सोशल साईटवर कार्यरत नसले तरी या पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फेसबुकसारख्या माध्यमाचा समर्पक वापर करून घेतला आहे. राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनीही ब्लॉगच्या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र यात सातत्य राहिले नाही. अण्णा हजारे आणि त्यांच्या सहकार्‍यांनीही या माध्यमाचा समर्पक वापर करून घेतला आहे. ममता बॅनर्जी यांनी ‘फेसबुक’वर एक पेज तयार करून ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी मोहिम राबवली. याचा फार उपयोग झाला नसला तरी या रूपानेही आपला विचार जगासमोर अत्यंत परिणामकारकरित्या मांडता येतो ही बाब आता राजकारण्यांच्या लक्षात येऊ लागली आहे. यामुळे सरपंच, नगरसेवकांपासून ते थेट आमदार-खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांनाही हा प्रकार भावत आहे.

फेसबुक-ट्विटर, युट्युब-फ्लिकर, ब्लॉग व अन्य ‘न्यू मीडिया’ची साधने पूर्णत: मोफत स्वरूपात उपलब्ध आहेत. मात्र याचा उत्तम वापर करण्यासाठी मात्र कौशल्य आवश्यक असते. अगदी सॅम पित्रोदा यांच्यासारखा टेक्नोसॅव्ही व्यक्तीही ट्विटरचा वापर करण्यात काहीसा कच्चा असल्याचे त्यांच्या ‘त्या’ पत्रकार परिषदेत दिसून आले. या बाबीचा विचार करता प्रत्येक नेता आणि पक्षाला आगामी काळात ‘सोशल मीडिया’च्या वापरात तज्ज्ञ असणार्‍यांची गरज भासू शकते. आज मुद्रीत आणि इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांवर प्रत्येक पक्ष आणि नेत्याला रग्गड खर्च करावा लागत आहे. भविष्यात ‘न्यू मीडिया’साठीही अशाच स्वरूपाची तजवीज करावी लागणार आहे. याचेच संकेत सॅम पित्रोदा यांनी घेतलेल्या पुढाकारातून अधोरेखित झाले आहे.

*********************************

पुन्हा एकदा ‘शायनिंग इंडिया’

Posted on September 25, 2012

भारतवासियांसाठी आपण घेतलेल्या कथित क्रांतीकारी निर्णयांना जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी केंद्र शासनाने तब्बल १०० कोटी रूपये जाहिरातींवर खर्च करण्याची योजना जाहीर केली आहे. सर्वसामान्यांना होरपळून काढणार्‍या महागाईवर कोणतीही ठोस उपाययोजना करण्याऐवजी न केलेल्या कामांचा उदोउदो करण्यासाठी केंद्रांची ही उधळपट्टी म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे. हातात सत्ता असली म्हणजे आपणास काहीही करण्याचा अधिकार असल्याच्या गुर्मीत जनतेचा पैसा पाण्यासारखा वाहवण्याची ही प्रवृत्ती भारतीय लोकशाहीच्या वटवृक्षाला लागलेली कटू फळेच मानावी लागतील.

खरं तर आपल्या देशातील सत्ताधार्‍यांच्या दिमतील सरकारी प्रचारयंत्रणा आहे. आकाशवाणीसह अन्य सरकारी प्रक्षेपण केंद्र तसेच दुरदर्शन, लोकसभा-राज्यसभा टिव्ही, सह्याद्री वाहीनी आदींसारख्या चॅनल्सवरून सातत्याने सरकारच्या आरत्या ओवाळण्यात येत असतात. याच्या दिमतीला केंद्र व राज्य पातळीवरील सरकारी प्रकाशनेही असतात. निधीची कमतरता नसल्याचे या माध्यमातून सरकारला कोट्यवधी जनतेपर्यंत आपला विचार पोहचवून प्रचार-प्रसार करणे सहजसाध्य आहे. शासनाच्या योजना आणि त्यांची उपयुक्तता पटवून देण्यासाठी ही माध्यमे अत्यंत परिणामकारक असल्याचे सिध्द झाले आहे. मात्र जगातील कोणत्याही सरकारी प्रचारयंत्रणेमध्ये असणारे कमकुवत घटक आपल्याही आकाशवाणी-दुरदर्शनादी सरकारी मीडियात आहेत. एक तर ही माध्यमे सरकारच्या बाजूने एकतर्फी झुकलेली असतात. यातील वृत्तांना विश्‍वासार्ह व तटस्थ कुणीही म्हणू शकत नाही. मात्र खासगी प्रसारमाध्यमे न परवडू शकणार्‍या ग्रामीण व गरीब जनतेला त्यांच्यावाचून पर्याय नसतो. परिणामी, सरकारी मडिया हाताशी असूनही समाजातील अभिजन तसेच मध्यमवर्गापर्यंत पोहचण्यासाठी खासगी प्रसारमाध्यमांना मुठीत ठेवणे अथवा त्यांना ‘मॅनेज’ करणे क्रमप्राप्त ठरते. ही बाब अगदी स्वातंत्र मिळाल्यापासून सुरू आहे. यासाठी मोठ्या आर्थिक उलाढाली होतात. यामुळे अगदी आणीबाणीतही काही वर्तमानपत्रे सरकारच्या हातातील बाहुले असल्यागत प्रचारतंत्र राबवत असल्याचे दिसून आले होते. सरकारी योजनांचा प्रचार-प्रसार आणि सत्ताधार्‍यांची तळी उचलण्यासाठी यापूर्वी वर्तमानपत्रांना दिल्या जाणार्‍या जाहिरातींचा वापर करण्यात येत असे. या अनुषंगाने सरकारच्या मर्जीतील वृत्तपत्रांवर जाहिरातींची खैरात केली जात असे. याशिवाय, निवडणुकीच्या काळातील जाहिराती, पेड न्यूज आदींच्या रूपाने वर्तमानपत्रांना भरभरून दिले जात असे. हे आताही घडत आहे. मात्र इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या आगमनानंतर या प्रसारमाध्यमालाही हातात ठेवणे सत्ताधार्‍यांना भाग पडत आहे. या अनुषंगाने केंद्र शासनासह विविध राज्य सरकारे जाहिरातबाजीवर कोट्यवधी रूपयांची उधळण करीत आहेत. याचाच पुढचा अध्याय आता केंद्र सरकारच्या १०० कोटी रूपयांच्या तरतुदीद्वारे समोर आला आहे.

मुद्रीत तसेच इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांचे सुनियोजित प्रचारतंत्र सर्वप्रथम राबविण्याचे श्रेय भाजपाकडे जाते. भाजपच्या हिंदुत्वाला कार्पोरेट रंग चढविणारे स्व. प्रमोद महाजन हे माहिती आणि प्रसारणमंत्री असतांना त्यांनी नवीन माध्यमांची ताकद अन् त्यांना हाताशी धरण्याचे तंत्र हेरले. यामुळे २००४च्या लोकसभा निवडणुकीसाठी ‘शायनिंग इंडिया’ या संकल्पनेवर आधारित भारताच्या इतिहासातील सर्वात व्यापक अन् महागडी प्रचारमोहिम राबविण्यात आली. साधारणत: ‘देशातील आर्थिक उदारीकरणाला आलेली मधुर फळे आणि यामुळे भारतात आलेली सुबत्ता’ या विषयावर आधारित खूप कल्पक जाहिराती वर्तमानपत्रे, नियतकालिके आणि दुरचित्रवाणी वाहिन्यांवर झळकल्या. याचाच महिमा की काय पण राष्ट्रीय लोकशाही आघाडीच पुन्हा केंद्रात सरकार बनविणार असे देशातील मीडियाने चित्र रंगविले. यासाठी अधिकृतरित्या १०० कोटींचा चुराडा करण्यात आला. याचा अनधिकृत आकडा ५०० कोटींच्या वर असल्याची चर्चा होती. मात्र सरकारचा अन् त्यांच्यात सुरात सुर मिळवणार्‍या मीडियाचा हा ‘फिल गुड फॅक्टर’ जनतेच्या पचनी पडला नाही. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे पानीपत झाले. यात भाजपाची तर जबर हानी झाली. ‘शायनिंग इंडिया’ प्रचारयंत्रणेच्या अपयशावर खूपदा चर्वण झाले आहे. यातील तमाम विश्‍लेषणांचा सार एकच की, जनता वाटते तितकी भोळी-भाबडी नाही. मतदारांना अगदी हायटेक प्रचारयंत्रणा राबवून फसवणे शक्य नसल्याचेही यातून अधोरेखित करण्यात आले होते. २००४ साली भारतीय जनता पक्ष ‘शायनिंग इंडिया’ कँपेनिंगच्या जोरावर पुन्हा सत्तेवर आरूढ होण्याचे स्वप्न पाहत असतांना सोनिया गांधी या एकाकी शिलेदाराप्रमाणे देश पिंजून काढत होत्या. या युध्दात बाजी सोनियांनी मारली. मात्र काळाचा अगाध महिमा असा की, याच सोनियांना आता आपले अपयश झाकण्यासाठी भाजपाच्याच वाटेवर जावे लागत आहे.

मुद्रीत प्रसारमाध्यमांइतकेच किंबहुना कांकणभर सरस असणार्‍या इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांकडे दुर्लक्ष करणे केंद्र तसेच कोणत्याही राज्य सरकारला परवडणारे नाही. यामुळे अगदी मायावतीसारख्या एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्रीदेखील आपल्या कार्याच्या प्रसिध्दीसाठी शेकडो कोटी रूपये उडवतात. सध्या केंद्र सरकारच्या सुरू असणार्‍या ‘भारत निर्माण’च्या जाहिरातीतही केंद्र सरकार पाण्यासारखा पैसा वाहवत असल्याचे दिसून येत आहे. आता याच्या जोडीला अजून १०० कोटी रूपयांचे पॅकेज येत आहे. यामुळे मीडियाची चांदी होणार असली तरी सर्वसामान्य जनतेच्या पदरात नेमके काय पडणार याचे उत्तर कुणीही देऊ शकणार नाही. देशवासियांना उदारीकरणाचे खूप लाभ झालेत हे कुणी अमान्य करणार नाही. यामुळे देशात मर्यादीत स्वरूपात का होईना आर्थिक क्रांती झाली हेदेखील सत्य आहे. मात्र याचे लाभ समाजाच्या तळागाळापर्यंत झिरपले हे म्हणणे धाडसाचे ठरेल. उदारीकरणाने अर्थकारणाला गती आली. यातून नवश्रीमंतांचा नवीन वर्ग उदयास आला. मध्यम व उच्च मध्यमवर्गालाही प्रगतीची संधी मिळाली. गर्भश्रीमंत, व्यापारी व उद्योगपतींना तर हर्षवायू होण्याइतपत फायदे झाले. मात्र याचसोबत ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ या वर्गांमधील दरी अजूनच रूंदावली. देशातील उदारीकरण आणि सरकारच्या नुकत्याच निर्णयांचा सर्वात मोठा फटका हा या सर्वसामान्य जनतेलाच बसणार आहे. ‘वॉलमार्ट’ची उत्सुकतेने वाट पाहणारा एक समूह देशामध्ये आहे. याचसोबत देशात येणारा पैसा अन् संधी हेरून तिचे सोने करणारा वर्गही आपल्या देशात आहे. यामुळे ‘एफडीआय’ने आभाळ कोसळणार नसले तरी याचा थेट लाभ हा सर्वसामान्यांना होणार नाही हे निश्‍चित. हे उमगत असूनही आपणास ‘आम आदमी’चा तारणहार म्हणवणार्‍या कॉंग्रेसचे सरकार जाहिरातींच्या माध्यमातून या सर्व प्रकाराचे गुणगान करणार हे देशाच्या राजकीय इतिहासातील मोठे विडंबन ठरणार आहे.

आपणास भारतीय जनतेची नस सापडली असा दावा करणारे अनेक राजकारणी आणि पक्ष देशाने पाहिले. मात्र वेळ येताच जनतेने प्रत्येकाला धडा शिकवला. जेव्हा सत्ताधारी उन्मत्त होतात; काहीही अचाट दावे करतात तेव्हा लोक निमूटपणे ऐकून घेतात. मात्र वेळ येताच आपली ताकद दाखवून देतात. गल्लीपासून दिल्लीपर्यंत असे प्रकार अनेकदा घडले आहेत. भारतीय लोकशाही अपरिपक्व असून यात मुद्दे नव्हे तर भावना प्रभावी ठरतात, लोक जाती-पातीवर मतदान करतात असे अनेक आक्षेप घेण्यात येतात. यात सत्यांशही आहे. मात्र उतलेल्या, मातलेल्या अन् जनसेवेचा वसा टाकलेल्या गर्विष्ठ सत्ताधार्‍यांना पाणी दाखवण्यातही भारतवासी मागे नाहीत. असे नसते तर जनता आपल्या मुठीत असल्याच्या गमजा मारणारे धुळीस मिळाले नसते. गत सव्वा आठ वर्षांपासून केंद्रात सत्ता उपभोगणार्‍या ‘युपीए’ सरकारलाही आता सत्तेचा माज चढला आहे. यामुळे सर्वसामान्यांना वारंवार डागण्या देण्याचे काम सुरू आहे. डिझेलची दरवाढ आणि सिलेंडरवरील निर्बंधांमुळे जनमानस प्रक्षुब्ध झाले आहे. सरकार मात्र ‘एफडीए’च्या कथित क्रांतीकारी निर्णयाचे गौरवगान करण्यासाठी जनतेच्याच पैशांमधून उधळपट्टी करण्यास सरसावले आहे. सत्ता हाताच असल्यामुळे त्यांचे कुणी वाकडे करू शकत नाही. मात्र वेळ येताच जनता या मदोन्मत्तांना धडा शिकवण्यावाचून राहणार नाही. आपला इतिहास हेच सांगतोय!

************************

दिदी तेरा तेवर पुराना

Posted on September 20, 2012

केंद्र सरकारचा पाठींबा काढून तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी देशाच्या राजकारणाला हादरा दिला आहे. राजकीय तडजोड करून कदाचित केंद्र सरकार तरूनही जाईल मात्र अचानक असे काय झाले की ममता दिदींनी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा राजकीय जुगार लावला हा प्रश्‍न विश्‍लेषकांना सतावू लागला आहे. याबाबत आपण तटस्थपणे निरिक्षण केले असता याची मुळे खुद्द ममता बॅनर्जी यांच्या स्वभावातच दडल्याचे दिसून येते.
२००९च्या लोकसभा निवडणुकीत तृणमुलची देदीप्यमान कामगिरी (१९) जागा अन् २०११च्या विधानसभा निवडणुकीत लाल सत्तेला भुईसपाट केल्यानंतर ममता बॅनर्जी यांना आहे ते व्यवस्थित सांभाळून मार्गक्रमण करणे सोपे होते. खरं तर डिझेलची दरवाढ, रिटेलमधील थेट परकीय गुंतवणूक आणि गॅस सिलींडरवरील निर्बंधाची झळ सर्वांना बसली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व द्रमुकसारख्या केंद्रात सहभागी पक्षांनीही यावर नाराजीचा सुर लावला आहे. मात्र पाठींबा काढण्याचा आतताईपणा कुणी केला नाही. परंतु दिदींनी ही हिंमत का केली? हे जाणून घेण्यासाठी पश्‍चिम बंगालच्या राजकारणाकडे लक्ष वळविणे क्रमप्राप्त आहे. आज पश्‍चिम बंगालमध्ये डावे सरकार कोसळले असले तरी ही विचारधारा समाप्त झाल्याचे धाडस कुणी करू शकणार नाही. ममता बॅनर्जी यांनी ‘तृणमूल’ची स्थापना केली तेव्हा हा पक्ष बंगालमध्ये ‘प्रति कॉंग्रेस’ बनणार असा समज होता. (या ठिकाणी महाराष्ट्रातील शरदराव पवार यांच्या राष्ट्रवादीचा संदर्भ लक्षात घेण्याजोगा आहे.) दिदींनी काही काळ कॉंग्रेसच्याच निधर्मी विचारधारेवर वाटचाल केली. याचा त्यांना लाभ झाला पण मर्यादीत स्वरूपात. यामुळे त्या काही तरी बदलाच्या शोधात होत्या. ही संधी त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री बुध्ददेव भट्टाचार्य यांनी दिली. भट्टाचार्य हे तसे काळाचा रोख ओळखणारे राजकारणी. डाव्या विचारसरणीपासून ‘यू-टर्न’ घेत त्यांनी भांडवलदारांना पश्‍चिम बंगालमध्ये आमंत्रित केले. हे खरं तर क्रांतीकारक पाऊल होते. यामुळे या राज्याच्या खुंटलेल्या विकासाला गती मिळण्याची शक्यता होती. एका अर्थाने डावे सत्ताधारी उदार बनू पाहत होते. यातच सिंगूर येथील जमीन अधिग्रहणामुळे स्थानिक पातळीवर वातावरण चिघळले. या माध्यमातून ममतांना नामी संधी मिळाली याचा त्यांनी पुरेपुर लाभ घेतला. सिंगूर प्रकरणी रान उठवत राज्य सरकारला जेरीस आणून ममतांनी गोरगरिबांची तारणहार म्हणून ख्याती अर्जित केली. एका अर्थाने त्यांनी डाव्या विचारसरणीचा अजेंडाच राबविला. यामुळे डाव्या सरकारवर रूष्ट झालेल्यांना ‘तृणमूल’च्या रूपाने एक सशक्त पर्याय मिळाला. याचेच पर्यावसान लाल सत्तेच्या पतनात झाले. तेव्हापासून गरीबांची वाली म्हणून आपली प्रतिमा जपण्यासाठी त्या कसोशीने प्रयत्न करीत आहेत. याचमुळे दिनेश त्रिवेदी यांच्यासारख्या अत्यंत कार्यक्षम सहकार्‍याने रेल्वेसाठी सुचवलेली अल्प भाडेवाढही त्यांनी खपवून न घेता अकांडतांडव करत चक्क त्रिवेदींचा राजीनामा घेतला. महागाईवरून सरकारला अधुनमधुन धमकावण्याचे कामही त्यांनी सातत्याने सुरू ठेवले होते. आता तर केंद्राचा पाठींबा काढून सर्वांना चकीत केले आहे.

सध्या दिल्लीत पडद्याआड अनेक घडामोडी होत आहेत. ‘युपीए’तील द्रमुक, जनता दल (सेक्युलर) आदी सहकार्‍यांनीही कॉंग्रेसवर डोळे वटारण्यास सुरवात केली आहे. मात्र याचसोबत पदरात काही तरी पडत असेल तर समाजवादी, बसपा व एवढेच नव्हे तर नितीश कुमारही सरकारला पाठींबा देण्यासाठी उत्सुक आहेत. एकंदरीत दिल्लीच्या राजकीय वर्तुळात देण्या-घेण्याचा खेळ रंगला आहे. या सर्व गदारोळात दिदींच्या पदरात काय पडणार याचे पुरेपूर आकलन होणे मात्र सध्या तरी कठीण आहे. कॉंग्रेसने आपली संपूर्ण शक्ती पणाला लावून सरकार वाचवल्यास ‘तृणमूल’ला केंद्राच्या सत्तेपासून किमान दीड वर्षे वंचित रहावे लागेल. याचसोबत केंद्र सरकारकडून पुरेपूर सहकार्य न मिळाल्याने ममता यांना अडचणी येतील. सरकार कोसळून मध्यावधी निवडणुका झाल्यास मात्र ममतांना फार मोठी संधी मिळू शकते. त्यांनी पश्‍चिम बंगालमध्ये अनेक लोकप्रिय घोषणा करून ठेवल्या आहेत. नुकताच त्यांनी राज्यातल्या मदरशांमधील सुमारे ३० हजार इमामांना सरकारकडून दरमहा तीन हजार रूपये वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे त्यांचे मुस्लीम समुदायासोबत असणारे संबंध अजून घट्ट होणार आहेत. याशिवाय, त्या कट्टर स्त्रीवादी आहेत. या सर्व बाबींचा त्यांना तात्काळ निवडणुका झाल्यास लाभ होऊ शकतो. लोकसभेच्या ३०च्या आसपास जागा निवडून आणल्यास त्या त्रिशंकु अवस्थेत फार मोठी ‘डिलींग’ करू शकतात. त्यांनी आजवर कॉंग्रेस आणि भाजपाप्रणित आघाड्यांसोबत काम केले आहे. भविष्यात त्या तिसरीच नव्हे तर अन्य कोणत्याही आघाडीसोबतही जाण्यास पुढेमागे पाहणार नाहीत. एकंदरीत पाहता आपली जमीनिशी घट्ट जुडलेली नाळ, गरिबांची वाली म्हणून असणारी प्रतिमा, साधे राहणीमान, लढवय्येपणा व राजकीय धोका पत्करण्याची क्षमता या शिदोरीवर ममता दिदींनी पश्‍चिम बंगालच्या राजकारणावर मांड पक्की केली आहे. याच्याच आधारे मध्यावधी झाल्यास जास्तीत जास्त जागा निवडून आणत दिल्लीत मोठे पद पटकावण्याचे त्यांचे स्वप्न असू शकते.

अडवाणी, मुलायम सिंग, लालूप्रसाद, मायावती, शरद पवार, नरेंद्र मोदी,नितीश कुमार आदी मंडळी पंतप्रधानपदाचे स्वप्न बाळगून आहेत. ममतांनी याबाबत आजवर एक चकारही शब्द काढला नसला तरी त्यांची अचाट राजकीय महत्वाकांक्षा कुणापासून लपून राहिलेली नाही. फायद्या-तोट्याचा विचार न करता अगदी रस्त्यावर संघर्ष करून या महिलेने आजवरचा मारलेली मजल ही कुणालाही आश्‍चर्यचकीत करणारी आहे. कुणी सांगावे लोकसभेत त्रिशंकु स्थिती आल्यास दिदींकडे देशाची सुत्रेही जाऊ शकतात. अर्थात त्यांचा स्वभाव हा अत्यंत बेभरवशाचा आहे. उद्या तृणमुलचे मंत्री राजीनामा मागे घेऊन सरकारमध्ये पुन्हा सहभागी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. सांगायचा मुद्दा एकच की अत्यंत महत्वाकांक्षी, स्वयंकेंद्रीत, हेकट आणि लढवय्या स्वभावाच्या या बाईने राजकीय निरिक्षकांना वारंवार चकवले आहे. आताही तसेच होणार का? हा प्रश्‍न आता निरिक्षक स्वत:लाच विचारू लागले आहेत.

==========================

एकदम खरं बोललात शिंदेसाहेब!

Posted on September 16, 2012

देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पुणे येथील भाषणात ‘बोफोर्स वा पेट्रोलपंप वाटप प्रमाणे कोळसाकांडही विसरले जाईल’ अशी भविष्यवाणी केल्यामुळे उडालेला गहजब निरर्थक आहे. शिंदेसाहेबांनी सांगितलेले कटू सत्य हे अनेकांच्या पचनी पडणार नाही. मात्र अवचितपणे का होईना मुखातुन सत्य पडल्याने त्यांचे आपण अभिनंदनच करायला हवे.

भारतीय राजकारण्यांवर कामाचा बोजा खूप असतो. मात्र वेळात वेळ काढून ते विविध विषयांवर आपले मतही प्रदर्शित करत असतात. काही जणांना हा पुढार्‍यांचा वाह्यातपणा वाटतो मात्र भारताचे नागरिक म्हणून त्यांनाही अभिव्यक्तीचा अधिकार आहेच की! जनता मात्र नेते काहीही बोलतात म्हणून शिमगा करायला मोकळे! आता हेच पहा ना एका नेत्याला महिलांच्या फॅशनमुळे समाजात बलात्कार वाढल्याचे वाटते अन् ते असे बोलतात यामुळे कुणाला वाईट वाटता कामा नये. एक विकास पुरूष अन् एका रणरागिणीला आजकालच्या तरूणींचे डायटिंग हे कुपोषणाचे कारण असल्याचा साक्षात्कार होतो तर आपले काय जाते? एक महानेता तर चक्क खाद्यान्नाचे भाव केव्हा कडाडणार याची अचूक भविष्यवाणी करतो याचे आपल्याला वैषम्य वाटता कामा नये. खरं तर ही बाब जनतेच्या फायद्याचीच आहे. एका केंद्रीय मंत्र्याला आपला देश शौचालयासारखा वाटतो तर वाटू द्या. आपले आबा म्हटलेच होते ना…‘बडे बडे शहरो मे छोटे-मोटे हादसे होते है!’’ अशाच प्रकारे आपल्या आदरणीय नेत्यांचा एखाद-दुसरा शब्द इकडे-तिकडे झाला तर मनाला लावून घेण्याची गरज नाही. यातच माननीय शिंदे महोदयांचे वक्तव्य हे तर भारतीय राजकारण्यांची मनोदशा दर्शविणारे आहे.

सामूहिक स्मृती ही अत्यंत क्षणभंगुर असते हे रहस्य राजकीय मंडळी चांगलेच जाणून असतात. आयत्या मुद्यावर आपली पोळी भाजून घेणे अन् अडचणीत आलेल्या प्रश्‍नावर वेळ मारून नेणे हा भारतीय राजकारणातील यशाचा मूलमंत्र आहे. अगदी गल्लीबोळापासून ते देश चालवणार्‍यांपर्यंत जनतेला याच मंत्राच्या सहाय्याने मुर्ख बनवत असतात. एखाद्या सरपंचापासून ते पंतप्रधानापर्यंत प्रत्येकावर आरोप होत असतात. यामुळे त्या-त्या पदधारकाच्या वकुबानुसार गदारोळ होत असतो. मात्र यातून सिध्द काय होते हा संशोधनाचाच प्रश्‍न आहे. काहींचे पद जाते. थोडेफार तुरूंगात जातात तर काहींची राजकीय कारकीर्द झाकोळली जाते. मात्र भ्रष्टाचाराच्या एखाद्या प्रकरणात संबंधीताला शिक्षा होऊन त्याची पाळेमुळे उखडण्यात आली असे कधी दिसून येत नाही. आता शिंदे यांनी उल्लेख केलेल्या बोफोर्स, पेट्रोल पंप वाटप आणि कोळसा खाण वाटप या प्रकरणांचे अध्ययन केले असता अनेक बाबींचे साम्य दिसून येते. बोफोर्सच्या धक्क्याने तत्कालीन राजीव गांधी यांचे सरकार यांचे सरकार कोसळले. मात्र यामुळे काही पहाड तुटून पडला नाही. या प्रकरणात कथितरित्या सहभागी असणार्‍या राजीव गांधी यांच्या कॉंग्रेस पक्षालाच देशाने नंतर निवडून दिले. यथावकाश अनेक चौकशांच्या सोपस्कारानंतर राजीवजींचे ‘निर्दोषत्व’ सिध्द झाले. दरम्यान, देशवासियांच्या स्मृतीतून हे प्रकरण निघून गेले. आज राजीवजींचा पक्ष सत्तेवर असून ‘रिमोट कंट्रोल’ त्यांच्याच कुटुंबियांच्या हातात आहे. बरं असल्या प्रकरणात फक्त कॉंग्रेसच निष्णात आहे असे नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सत्ताकाळातही अनेक घोटाळे उघडकीस आले असाच गोंधळ झाला अन् विस्मरणातही गेले.

महाराष्ट्रातील मातब्बर पुढार्‍याचे दाऊद इब्राहिम, तेलगी यांच्यासोबत संबंध असल्याचे घणाघाती आरोप झाले अन् हवेत विरले. आता आरोप झालेले अन् करणारे एकमेकांच्या मैत्रीचे कायम गोडवे गात असून गरीब बिच्चारी जनता थक्क होऊन पाहत आहे. ही केवळ राजकारण्यांची चलाखी नाही. यासाठी जनतेचा मुर्खपणाही तितकाच कारणीभूत आहे. ए. राजासारख्या भ्रष्ट नेत्यांचे तुरूंगातून सुटल्यानंतर होणारे स्वागत; त्यांच्यासाठी लोटलेला अपार जनसागर काय दर्शवितो? अनेक बहाद्दर तुरूंगातूनच निवडणूक लढवून जिंकतातही. त्यांना मते देणारेही आपणच आहोत. याचाच अर्थ असा आहे की नेत्यांचे भ्रष्ट आचरण हे आपण गृहीतच धरत आहोत. ‘पकडला गेला तो चोर अन् पकडून देणारा अथवा आरडा-ओरड करणारा साव’ असा साधासरळ हिशोब भारतीय राजकारणात सुरू आहे. आज कोळसा कांडात कॉंग्रेसी पुढार्‍यांचे हात काळे झाल्याची ओरड होत आहे. यात ‘एनडीए’चा संबंध असल्याचा आरोपही होत आहे. याबाबत ठोस पुरावे मिळाल्यास पडद्याआड हातमिळवणी होईल यात शंकाच नाही. किंबहुना तसे संकेत आतापासूनच मिळाले आहेत. कॉंग्रेस असो की भाजपा आपणास उडदामाजी काळे-गोरे निवडावे लागणार आहे. अर्थात ही बाब सुशीलकुमार शिंदे याच्यासारख्या मुरब्बी नेत्याला चांगलीच ज्ञात आहे. भारतीयांना निवडण्यासाठी कुणताच चांगला ‘ऑप्शन’ नसल्याचेही ते जाणून आहेत. यामुळे त्यांच्या वक्तव्यावर कितीही टीका झाली तरी ते बोले ते योग्यच आहे.

शिंदेसाहेब आपले आभार…भारतीय राजकारणातील निरपेक्ष सत्य आपल्या तोंडून इतक्या सहजपणे बाहेर पडले…आम्ही धन्य झालो! याचसोबत ‘कोळशामुळे हात थोडे काळे होतात हे खरे, पण धुतले की पुन्हा स्वच्छ होतात, हेही खरे’ असे आपले तात्विक चिंतनही अत्यंत कौतुकास्पद आहे. आज कराडमध्ये आपण या प्रकरणी सारवासारव केली. आपण गंमत करण्याचा प्रयत्न केला मात्र तो आपल्या अंगलट आल्याचे आपले म्हणणे आहे. मात्र या गमतीतून आपण एक भेदक सत्य कथन केले हे ही नसे थोडके!

******************

‘जय हो!

त सुमारे २८ वर्षांपासून ज्या क्षणाची देशातील क्रिकेट रसिक आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण ‘याची देही याचि डोळा’ पाहण्याचे भाग्य नुकतेच आपणास लाभले आहे. क्रिकेट जगतातील अनेक शिखरांना स्पर्श करणारे विक्रमवीर आपल्याकडे असले तरी विश्‍वचषकरूपी ‘माऊंट एव्हरेस्ट’ आपण पुन्हा सर करू शकत नाही याचे शल्य सच्चा क्रिकेटप्रेमी उराशी बाळगून होता. २००३च्या स्पर्धेत अगदी हातातोंडाशी आलेला घास अत्यंत दारूण रितीने सोडावा लागल्यानंतर तर आपण कधी ‘वर्ल्ड कप’ पटकावू हे स्वप्न पाहणेही कोट्यवधी रसिकांनी सोडून दिले होते. मात्र या बाबतीत कोणताही अवास्तव दावा न करता ‘धोनी ब्रिगेड’ने ही अवघड कामगिरी पार पाडली तेव्हा कोटी कोटी कंठांमधून जयघोष निनादला. हा विश्‍वविजय ही नव्या युगाची नांदी ठरो हीच प्रार्थना गदगदलेल्या ह्दयांमधून निघत आहे.

भारतीय उपखंडातील देशांमध्ये तर क्रिकेट हा खेळ नव्हे तर एक संस्कृती बनला आहे. आता तर याने धर्माचे स्वरूपही धारण केल्याचे दिसून येत आहे. अब्जावधींचे अर्थकारण असणार्‍या या खेळातील नायक हे तुम्हा आम्हा सर्वांच्या भावजीवनाचा अविभाज्य घटक आहेत. यामुळे खुद्द या खेळाचे जन्मस्थान असणार्‍या ब्रिटनमध्ये क्रिकेटची लोकप्रियता घसरली तरी भारतीय उपखंडात मात्र अक्षरश: कोट्यवधींवर याचे गारूड आहे. या विश्‍वचषकात याच भागातील दोन संघ विजेतेपदासाठी झुंजले ही बाब या संदर्भात लक्षात घेण्याजोगी आहे.

भारतीय क्रिकेटला उज्ज्वल इतिहास आहे. एकेकाळी लिंबू-टिंबू म्हणून हिणवण्यात आलेल्या आपल्या संघाला सुनील गावस्करच्या या विक्रमादित्याने स्वाभिमान शिकविला. यानंतर कपिल देव या रांगड्या गड्याने समोरच्याच्या डोळ्याला डोळा भिडवण्याची उभारी दिली. यातूनच १९८३चा विश्‍वविजय साकारला. गावस्कर-कपिलच्या आदर्शावर पाऊल ठेवून गुणवंत क्रिकेटपटूंच्या पिढ्या उदयास आल्या. त्यांनी वैयक्तीक आणि सांघीक पातळीवर यशाची अनेक शिखरे गाठली. मात्र १९८३चा पराक्रम करण्यात आपण कुठे तरी कमी पडत होतो. या सर्व जखमा सहजासहजी भरून निघतील असे वाटत नव्हते मात्र या विजयामुळे हे घाव तर भरलेच पण आता आसुसलेल्या मनांना नवी उभारी देणारी स्वप्नेही मिळाली आहेत.

हा विश्‍वचषक नेमका कुणामुळे मिळाला अथवा यातील इतर पैलूंवर खूप काही लिहून-बोलून झालेय. मला मात्र यातून विश्‍वविजेतेपदाचे एक वर्तुळ पुरे झाल्याचे जाणवत आहे. गत २८ वर्षात जग किती बदललयं! १९८३ साली सर्व संघाला मिळालेल्या रकमेपेक्षा जास्तची पारितोषिके आज आश्‍विनसमान नवोदिताला मिळालीत. सर्व भारतीय संघाचा विचार केला तर प्रत्येक खेळाडू करोडपती झालाय. धोनी-सचिन सारख्यांना तर येत्या काही दिवसातच अब्जावधींचे जाहीरातींचे कंत्राटे मिळणार यात शंकाच नाही. अर्थात हे प्रतिभावंत या सार्‍यांसाठी पात्र आहेतच. गेल्या २८ वर्षात झालेला एक लक्षणीय बदल म्हणजे एके काळी देशातील तमाम क्रिकेटपटू हे महानगरांमधील उच्च मध्यमवर्गातून येत असत. आता मात्र लहानशा शहरांमधून क्रिकेटचे तारे उदयास येत आहेत. खुद्द आपला सेनापती महेंद्रसिंह धोनी हा रांचीसारख्या शहरातील सामान्य कुटुंबातून या ठिकाणापर्यंत पोहचलाय. गावस्कर-कपिल-सचिनला आदर्श मानणार्‍या पिढीसमोर आता धोनीसारखे नवीन आदर्श निर्माण झाले आहेत. एक प्रकारे क्रिकेट हा अभिजनांनाच नव्हे तर सर्वसामान्यांचा जसा खेळ आहे त्याच प्रकारे याचे नायकही समाजाच्या कोणत्याही स्तरातून येऊ शकतात हे धोनीसारख्यांनी दाखवून दिले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने एकदिवसीय, कसोटी आणि ‘टी-२०’ सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी करणार्‍या आपल्या संघाने विश्‍वचषकावर कब्जा करून आपण क्रिकेटचे खरे राजे आहोत हे दाखवून दिले आहे. १९८३चा आपला विजय हा ‘लक’ असल्याची हेटाळणी करण्यात आली होती. यावेळेस मात्र आपल्याशिवाय ही स्पर्धा जिंकण्यास कुणीही पात्र नाही असे म्हटले जात होते. झालेही तसेच! अर्थात क्रिकेट हा खेळ ‘हुकला तो संपला’ या प्रकारचा आहे. विश्‍वविजय हा आपल्या अभिमानाचा आणि राष्ट्रीय स्वाभिमानाचा विषय असल्याने या दिग्वीजयाचा कैफ रसिकांच्या मनांवरून कित्येक महिने उतरणार नाही हे निश्‍चित. खेळाडूंना मात्र पाय जमिनीवर पाय ठेवून वागावे लागणार आहे. अर्थात आपली विजयी सेना एका विश्‍वविजयाने हुरळून जाणार नाही अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

*****——-********——–*************———

लिटल मास्टर


तंत्रशुध्दता, संयम, एकाग्रता, जिद्द, तीक्ष्ण नजर, चिकाटी आणि अर्थातच निडरता आदी गुणांचा संगम असणारा प्रज्ञावंत क्रिकेटादित्य सुनिल गावस्कर आज एकसष्टाव्या वर्षात पदार्पण करत आहे. सध्या क्रिकेट हे अधिक आकर्षक आणि वेगवान व्हावे याचे प्रयत्न सुरू आहेत. जागतिक पातळीवर विचार केला असता मजबुत बाहुंचा उपयोग करणार्‍या फलंदाजांचीच चलती असल्याचे दिसून येते. यामुळे फलंदाजीची तंत्रशुध्द आणि अभिजात पध्दत कालबाह्य होणार की काय अशी भिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमिवर, या ‘लिटल मास्टर’ची कारकीर्द ही क्रिकेटच्या इतिहासातील मर्मबंधातली ठेव मानावी लागेल.

सुनिल गावस्कर यांनी रचलेली विक्रमांची रास, यशापयशाचा लेखाजोखा तसेच मैदान आणि मैदानाबाहेरचे त्याचे व्यक्तीमत्व यांच्याविषयी आजवर विपुल लिखाण करण्यात आले आहे. सर्वसामान्य रसिकांनाही या बाबी ज्ञात आहेत. परिणामी, त्यांचे भारतीय आणि जागतिक क्रिकेट विश्वातील स्थान याविषयीचा वेध घेण्याचा हा प्रयत्न. 1970च्या दशकाच्या प्रारंभी गावस्कर यांचा क्रिकेटच्या क्षितीजावर उदय झाला. खरं तर, भारतीय संघासाठी हा काळही संक्रमणाचा होता. देशात क्रिकेटला अमाप लोकप्रियता असली तरी जागतिक पातळीवर आपली गणना ‘डल डॉग्ज’ अर्थात लिंबू-टिंबू म्हणूनच करण्यात येत होती. काही सन्माननीय अपवाद वगळता, आपण यशाची चव कधी चाखलीच नव्हती. विशेषत: परदेशी खेळपट्यांवर आपल्या खेळाडूंची उडणारी भंबेरी हा जगभर काहीसा हेटाळणीचाच विषय ठरला होता. आपल्या देशात बर्‍यापैकी कामगिरी करून कसोटी अनिर्णीत राखावी अथवा क्वचित विजय मिळवावा असे भारतीय संघाचे सूत्र होते. परदेशात मात्र आपली पळता भुई थोडी व्हायची. आपले फलंदाज हे फिरकीला उत्तम खेळू शकत असले तरी द्रुतगतींसमोर ते गलितगात्र व्हायचे. या पार्श्वभूमिवर, अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली 1971 साली विंडिज आणि त्यानंतर इंग्लंड विरूध्दच्या मालिकेतील विजयाने भारतीय क्रिकेटमध्ये ‘रेनेसॉं’ अर्थात नवयुग अवतरले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या यशातच आपल्याला एक महानायक भेटला. मुंबईकर सुनिल मनोहर गावस्कर या वामनमूर्तीने पहिल्याच दौर्‍यात जगाचे लक्ष वेधून घेतले. यानंतर 1987 साली क्रिकेटला राम राम ठोकेपावेतो त्यांनी विविध यशोशिखरे सर केली.

क्रिकेटमध्ये आघाडीला येऊन फलंदाजी करणे हा तोंडचा खेळ नाही. नवीन चेंडू आणि ताजेतवाने गोलंदाज यांचे मिश्रण भल्याभल्या फलंदाजांना जेरीस आणते. सलामीच्या फलंदाजासमोर अक्षरश: तोफखान्याला तोंड देत आपल्या संघाला चांगली सुरवात करून देण्याचे दुहेरी आव्हान असते. याचमुळे आजवर बोटावर मोजण्याइतकेच सलामीचे फलंदाज यशस्वी झाले असून यात गावस्कर यांचे नाव अग्रभागी आहे. एकाग्रता आणि संयम हे त्यांच्या खेळाचे महत्वाचे गुण होत. अगदी नवज्योत सिध्दूच्याच भाषेत सांगायचे तर, ‘‘द्रविड ही भिंत असली तर गावस्कर हा अभेद्य किल्लाच होय.’’ संयमाच्याच जोरावर त्यांनी आपल्या कारकीर्दीत विविध विक्रम प्रस्थापित केले. अर्थात केवळ आकडेवरीवरून कुणाही खेळाडूचे अस्सल मूल्यमापन करता येत नाही. यासाठी मैदानावरील प्रत्यक्ष खेळ हाच प्रमाणभूत मानायला हवा. या निकषावरही गावस्कर सरस ठरतात. त्यांचा फलंदाजीसाठी उभा राहण्याचा पवित्रा (स्टान्स) हा आदर्शवत होता. यामुळे कशाही प्रकारचा चेंडू ते लिलया खेळू शकत. त्यांचा बचाव अत्यंत भक्कम असला तरी ते मैदानावर कोठेही चेंडू टोलवण्याची त्यांची क्षमता वादातीत होती. बुटक्या फलंदाजांना अतिशय सुंदर पदलालित्य सहजशक्य असते. लारा, तेंडुलकर वा जयसूर्या आदींचे उदाहरण आपल्यासमोर आहेच. गावस्कर यांच्या पायाची हालचाल अतिशय उत्तम रितीने होत असल्याने द्रुतगती आणि फिरकीसुध्दा ते अगदी सहज खेळत. याच्या जोडीला त्यांच्या भात्यामध्ये क्रिकेटच्या शैली पुस्तिकेत असणारे जवळपास सर्व फटके होते. स्ट्रेट ड्राईव्ह हा तर त्यांचा हुकमी फटका होता. यष्टीच्या अगदी जवळून सण्णदिशी सीमेकडे झेपावणारा चेंडू आणि याकडे हताशपणे पाहणारा गोलंदाज असे चित्र त्यांच्या कारकीर्दीत बर्‍याचदा पहायला मिळाले. स्लीपमधून अत्यंत कुशलतेने तटवलेला ‘लेट कट’ हीदेखील त्यांची खासियत. यष्टीरक्षकाच्या हातात विसावण्याआधी चेंडूला अगदी शेवटच्या क्षणाला बाजूने वळवून त्यांनी कित्येकदा चौकार वसूल केले आहेत. आजवरच्या निवडक सुंदरतम फट्नयांमध्ये याची गणना केली जाते. याशिवाय, फ्लीक, कव्हर ड्राईव्हज्सह अन्य सर्व प्रकारांमध्ये ते पारंगत होते. बर्‍याचदा त्यांनी ‘हूक’ आणि ‘पूल’चाही अतिशय उत्कृष्ट उपयोग केला.

सुनिल गावस्कर यांच्यावर बर्‍याचदा रटाळ फलंदाजी व अशाच स्वरूपाच्या कर्णधारपदाचा आरोप करण्यात येतो. यात सत्यांश असला तरी यासाठी तत्कालिन परिस्थितीही विचारात घ्यायला हवी. त्यांच्या आधी आणि नंतरही अनेक उत्तम फलंदाज झाले. यापैकी गावस्कर यांना अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती. सुरवातीच्या काही वर्षात तर ते संघाचे अक्षरश: एकमेव आधारस्तंभ होते. अगदी सलामीचाच विचार केला तर त्यांना चेतन चौहान यांच्या अल्पकाळाचा अपवाद वगळता, योग्य साथीदार मिळाला नाही. परिणामी, स्वत:ची विकेट टिकवून घरत संघाचा गाडा ओढण्याच्या प्रयत्नात संथपणा तसा अपेक्षितच मानावा लागेल. असे असले तरी त्यांनी बर्‍याचदा दिग्गज गोलंदाजांना झोडपून काढले आहे, हे विसरता कामा नये. संघनायक म्हणून त्यांनी सातत्याने बचावात्मक पवित्रा घेतला तरी कपिलसारख्या हिर्‍याला पैलू पाडण्याचेही काम त्यांनीच केले.

आकडेवारीच्या पलिकडे जाऊन जागतिक क्रिकेटच्या पटावर गावस्कर यांची महत्ता असण्याची खूप कारणे आहेत. आजवर अनेक उत्तम सलामीवीर झालेत. यापैकी विंडिजची ग्रिनिज आणि हेन्स तसेच ऑस्ट्रेलियाची हेडन आणि लँगर या जोड्या सर्वात जास्त यशस्वी आहेत. या दोन्ही जोड्यांचा संघ हा फलंदाजी आणि गोलंदाजीत सरस होता. यामुळे ते मुक्तपणे फलंदाजी करू शकत होते. गावस्कर यांना मात्र नेहमीच मोठ्या प्रमाणात ‘भार’ वहावा लागला. भारतीय उपखंडातील तमाम फलंदाजांप्रमाणे गावस्करही फिरकीला उत्तमपणे खेळू शकत. मात्र त्यांची खरी महत्ता परदेशी खेळपट्यांवर एकाहून एक सरस जलद गोलंदाजांना खेळण्यात होती. त्यांच्या आगमनानंतर काही वर्षांमध्येच क्रिकेटमध्ये हेल्मेटचा वापर प्रचलित झाला तरी गावस्कर हे फक्त एक ‘स्कल कॅप’ घालून तमाम गोलंदाजांना सामोरे गेले. त्यांच्या कालखंडात इतिहासातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज ऐन भरात होते. विंडिजची मार्शल, होल्डिंग, गॉर्नर आणि रॉबर्टस ही तुफानी चौकडी; कांगारूंचा लिली, थॉप्ससन, लॉसनादी तोफखाना; इंग्लंडचे विलीस, बॉथम, हेंड्रिं्नस, लिव्हर; किवीजचा जिगरबाज रिचर्ड हॅडली तर पाकी इम्रान, सर्फराज व सिकंदर बख्त आदी नावे कुणाही फलंदाजाच्या छातीत धडक भरविण्यास समर्थ होते. मात्र गावस्कर यांनी या सर्वांशी यशस्वीपणे ‘दोन हात’ केले. विंडिजच्या तोफखान्याला तर त्यांच्यात देशात नामोहरम करणार्‍या गावस्कर यांच्यावर तेथे लोकगीते (कॅलिप्सो) रचली गेली. आजही त्यांच्याविषयी विंडिजमध्ये खूप आदर आहे. दैवदुर्लभ मानसन्मान लाभूनही त्यांचे पाय सुदैवाने जमिनीवरच राहिले. याचमुळे ते इतिहासात सर्वात प्रथम 10 हजार धावांचा विक्रम करू शकले. याशिवाय, विक्रमादित्य डॉन ब्रॅडमन यांच्या 29 शतकांचा विक्रम मागे टाकण्याचा बहुमानही त्यांनी पटकावला. नंतर त्यांच्या आकडेवारीला पार करणारे फलंदाजही जगाने पाहिले तरी गावस्कर यांनी ज्या प्रतिकूल स्थितीमध्ये कामगिरी पार पाडली हे लक्षात घेतले तर त्यांचे मोठेपण सहज लक्षात येते.

गावस्कर यांच्या उदयापूर्वी मैदानावर भारतीय खेळाडू हे जणू न्यूनगंडाने ग्रासलेले वाटत. गावस्कर यांनी त्यांना आत्मविश्वास दिला. भारताकडे जगाला दिपवण्याची प्रतिभा असल्याचे त्यांनी दाखवून दिले. गुणवत्तेची हीच उंची त्यांनी मैदानाबाहेरही दाखवली आहे. त्यांच्या ‘सनी डेज’, ‘आयडॉल्स’, ‘वन डे वंडर्स’ व ‘रन्स अँड रूईन्स’ या पुस्तकांमधून भारतीय क्रिकेटच्या एका युगाचे अत्यंत पारदर्शक दर्शन घडते. ‘आयसीसी’ आणि ‘बीसीसीआय’च्या अनेक समित्यांवर त्यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे. काही दिवसांपूर्वी क्रिकेटच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला आहे. समालोचक आणि स्तंभलेखक यांच्या माध्यमातून समकालिन क्रिकेटवरील त्यांचे भाष्य ही रसिकांना एक मेजवानीच असते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर ते वेळोवळी अत्यंत परखड मत व्यक्त करतात. विशेषत: जागतिक क्रिकेटमधील वर्णभेदाविरूध्द त्यांनी वारंवार आवाज उठवला आहे. एकेकाळी ‘सद्गृहस्थांचा खेळ’ असणार्‍या क्रिकेटचे बाजारीकरणही त्यांना अस्वस्थ करते. क्रिकेटमधील एक मानाचा अध्याय निर्माण करणारा हा ‘लिटल मास्टर’ भारतीय आणि त्यातही मराठी असणे आपल्यासाठी निश्चितच अभिमानास्पद आहे. त्यांनी केलेल्या उत्तुंग कामगिरीबद्दल मानाचा गुजरा…अन् भविष्यात त्यांना क्रिकेटची विविध रूपाने सेवा करण्यासाठी दीर्घायुष्य लाभो हीच जनन्नियंत्यास प्रार्थना!

(प्रसिध्दी दिनांक 10 जुलै 2009)
==========================

चार दिवसांची ‘कसोटी’!

क्रिकेट हा फक्त झटापटीचाच खेळ आहे का हो?… संयम, चिकाटी, तंत्रशुध्दता आणि अर्थातच शैली आदी बाबींचा या खेळाशी जराही संबंध नाही?…‘टी-20’पासून कसोटी क्रिकेटच्या अभिजात स्वरूपाला धोका आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे कुणीही सच्चा क्रिकेट रसिक नकारार्थीच देईल. किंबहुना, क्रिकेटच्या सर्वांगसुंदर रूपाचे दर्शन फक्त कसोटी सामन्यातच होते यावर जास्तीत जास्त चहात्यांचे मतैक्य असू शकते. पण आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष डेव्हिड मॉर्गन या सद्गृहस्थांनी नुकताच वेगळा सूर लावला आहे. ‘ट्वेंटी-20’ या प्रकारच्या सामन्यांना लाभलेल्या अफाट लोकप्रियतेमुळे कसोटी क्रिकेटसमोर अस्त्विाचेच आव्हान उभे राहिले असल्याचे मत मॉर्गन यांनी नुकतेच व्यक्त केले आहे. एवढ्यावरच न थांबता, या महाशयांनी कसोटी या प्रकाराला अधिक आकर्षक(!) करण्यासाठी सुचविलेल्या सुचनांचा विचार केला तर हसावे की रडावे हेच समजत नाही. येत्या वर्षातच कसोटी सामन्यांचा कालावधी पाचऐवजी चार दिवस करण्यावर ‘आयसीसी’ विचार करत असल्याचे त्यांनी जाहीर केले. याशिवाय, इतरही सुधारणा करण्यात येणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. यात प्रामुख्याने प्रत्येक दिवशी किमान 100 षटकांचा खेळ, दिवस-रात्रीचा खेळ, पांढर्‍या रंगाच्या चेंडूचा वापर आणि खेळाडूंना रंगीबेरंगी कपडे आदींचा समावेश आहे. परिवर्तनाच्या वार्‍यापासून कुणीही वाचू शकत नाही. क्रिकेटही याला अपवाद नाही. परिणामी, या खेळात काळाच्या ओघात अनेक बदल करण्यात आले. रसिकांनी हे स्वीकारलेही. मात्र मॉर्गन यांनी सुचविलेले अव्यवहार्य बदल रसिक आणि खेळाडूंच्या पचनी पडणार का? हा कळीचा मुद्दा आहे.

क्रिकेटसाठी लागणारा वेळ हा नेहमी वादाचा मुद्दा राहिला आहे. याच मुद्द्यावरून क्रिकेटवर सातत्याने टीकेची झोड उठविण्यात येते. जास्त वेळेमुळे या खेळाच्या जगभरातील प्रसाराला बर्‍याच मर्यादा आल्या आहेत हे निश्चित. असे असूनही, जगाच्या काही भागातील रसिक क्रिकेटवर लुब्ध आहेत. यात कसोटी सामने हा तर क्रिकेटचा आत्मा समजला जातो. सुमारे सव्वाशे वर्षांची परंपरा असणारे कसोटी सामने हे अभिजात प्रकारात गणले जातात. साधारणत: 35-40 वर्षांपूर्वी एकदिवसीय सामने रूढ झाले असता, कसोटी आता बाद होणार अशी श्नयता वर्तविण्यात आली होती. अर्थात, ही भिती निराधार ठरली. आज कसोटी आणि एकदिवसीय हे दोन्ही प्रकार रसिकांनी ह्दयापासून स्वीकारले आहेत. यातच कालपरवा आलेली ‘ट्वेंटी-20’ ही झटपट क्रिकेटची आवृत्तीदेखील चाहत्यांच्या चांगल्याच पसंतीस उतरली आहे. ‘आयपीएल’ आणि ‘टी-20 विश्वचषका’च्या यशामुळे दिपावलेली आयसीसी भविष्यात या प्रकाराला झुकते माप देणार असा तज्ज्ञांचा अंदाज होता. झालेही तसेच. नुकत्याच झालेल्या विश्वचषकानंतर अवघ्या 10 महिन्याच्या अंतरातच ‘चँपियन्स लीग’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. एव्हढेच नव्हे तर, ‘आयपीएल’च्या नियोजनात अडथळा येऊ नये म्हणून या स्पर्धेचे वेळापत्रक पुढे ढकलण्याचा धोरणीपणाही ‘आयसीसी’ने दाखविला आहे. ‘ट्वेंटी-20’च्या रूपाने आयसीसीसह सर्व देशांच्या क्रिकेट संघटनांना सोन्याचे अंडे देणारी कोंबडी गवसली आहे यात शंकाच नाही. मात्र या माध्यमातून खोर्‍याने पैसा ओढतांना या खेळाच्या मूळ स्वरूपालाच धक्का बसेल, अशी अपेक्षा कुणी केली नव्हती. मात्र मॉर्गन यांच्या वक्तव्यातून याचेच संकेत मिळाले आहेत. यामुळे अवघे क्रिकेटविश्व ढवळून निघणे स्वाभाविकच मानावे लागेल.

मॉर्गन यांनी कसोटी सामन्यांना गती प्रदान करण्यासाठी सुचविलेले उपाय हे उपयुक्ततेऐवजी या खेळाच्या आत्म्यावरच घाव घालतील अशी भिती आता बहुतेक खेळाडू, विशेषज्ञ आणि रसिक व्यक्त करत आहेत. पाच दिवसाच्या कसोटीवर मुख्यत: जास्त वेळ, वाढते अनिर्णित सामने आणि षटकांचा संथ वेग हे आक्षेप घेण्यात येतात. मॉर्गन यांनी याच गृहितकांवर उपाय सुचविलेले आहेत. सर्वात महत्वाचा बदल हा कसोटीच्या पाचऐवजी चार दिवस हाच आहे. यामुळे वेळेत बचत होऊन खेळ गतिमान होणार. याशिवाय, सामन्यांचा निकाल लागण्याचे प्रमाण वाढेल असा युक्तिवाद करण्यात आला आहे. वास्तविक पाहता जवळपास सर्व क्रिकेट खेळणार्‍या राष्ट्रांमधील प्रमुख प्रथम श्रेणीच्या देशांतर्गत स्पर्धा (उदा. रणजी चषक) या तीन वा चार दिवसांच्या असतात. असे असूनही, यात अनिर्णित सामन्यांचे प्रमाण खूप आहे. यामुळे कसोटीचा एक दिवस कमी केला तर निकालाचे प्रमाण वाढेलच हे कुणीही छातीठोकपणे सांगू शकणार नाही. याऊलट एखादा लिंबूटिंबू संघही बलवान टीमविरूध्द सामना ‘ड्रॉ’ करण्याची श्नयता वाढीस लागेल.

कसोटी सामना हा दिवस-रात्र या पध्दतीने खेळवावा हा मुद्दादेखील वादग्रस्त आहे. ‘डे-नाईट’ सामन्यामुळे प्रेक्षकांची संख्या काही प्रमाणात निश्चितच वाढू शकते. मात्र, मैदानावरील वातावरण आणि दंवबिंदूंची स्थिती दिवसा आणि रात्री सारखीच नसते. परिणामी, यामुळे एखाद्या संघालाच याचा अधिक लाभ मिळू शकतो. काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियातील ‘शेफिल्ड शील्ड’ ही स्पर्धा दिवस-रात्र या प्रकारात आयोजित करण्यात आली असता तिचा पूर्णत: फज्जा उडाला होता. याचीच पुनरावृत्ती कसोटीतही घडण्याची श्नयता आहे. सामन्यासाठी रंगीत कपडे वापरण्यामुळे कसोटी सामने अधिक आकर्षक होऊ शकतात. यामुळे प्रायोजकांच्या माध्यमातून अधिक पैसा येऊ शकतो. परिणामी, हा मुद्दा तसा व्यवहार्य आहे. पांढर्‍या चेंडूचा वापर मात्र वादाच्या भोवर्‍यात सापडू शकतो. सध्या दिवस-रात्रीच्या एक दिवसीय सामन्यात हा चेंडू वापरण्यात येत असल्याने याच्या मर्यादाही समोर आल्या आहेत. एक तर हा चेंडू फारच लवकर खराब होतो. विशेषत: रात्रीच्या वेळेला तर बर्‍याच सामन्यात हा बदलावे लागतो. सुरवातीच्या 20 षटकांमध्ये स्विंग झाल्यावर तो जुना होतो. याचे आयुष्यही 60 षटकांपेक्षा जास्त नसते. परिणामी, या चेंडूचा फिरकीपटूंना फारसा उपयोग होणार नाही. यामुळे भविष्यात फिरकीची कलाच अस्तंगत झाल्यास नवल वाटू नये. याशिवाय, प्रत्येक दिवशी 100 षटकांचा खेळ हा नियमही त्या त्या दिवसाच्या नैसर्गिक वातावरणावर अवलंबून राहू शकतो. महत्वाची बाब म्हणजे षटकांच्या गतीविषयी नियम केला तरी धावांची गती चांगली राहिलच याची शाश्वती काय? कसोटी सामन्यांची तथाकथित गती वाढविण्याच्या हव्यासापायी आयसीसीचे प्रस्तावित बदल अंमलात येण्याआधीच वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. माजी कसोटीपटूंनी तर यावर कडाडून टीका करत हे बदल न करण्याचा आग्रह धरला आहे. त्यांचे विचार हे वस्तुस्थितीला धरून असल्याने यावर अवश्य विचार होण्याची आवश्यकता आहे.

एकदिवसीय क्रिकेटचा कसोटी सामन्यांवरही बर्‍याच अंशी प्रभाव पडला आहे. यामुळे या सामन्यांमध्ये निकालाचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दशकाचा विचार केला असता सुमारे 75 टक्के कसोट्यांमध्ये निकाल लागला आहे. परिणामी, निकालाच्या मुद्यात काही दम नाही. खरी मेख तर पैशांबाबतच आहे. ‘ट्वेंटी-20’च्या रूपाने लाभलेल्या घबाडाच्या मार्गाने जवळपास सर्व क्रिकेट संघटना हुरळून गेल्या आहेत. यामुळे खेळाडूंना एखाद्या बैलाप्रमाणे दावणीला बांधण्यात येत आहे. अर्थात याचा अगदी पूरेपूर मोबदला मिळत असल्याने तेदेखील गप्प आहेत. एखादा धोनीसारखा कर्णधार मात्र पराभवाचे कारण म्हणून ‘व्यस्त वेळापत्रक’ हा मुद्दा पुढे करतो एवढेच! यातून अतिक्रिकेटची थोडीफार चर्चा वगळता, काहीही निष्पन्न होत नाही. खरं पाहिलं तर एकदिवसीय सामन्यांच्या तुलनेत कसोटींची संख्या याआधीच मर्यादित करण्यात आली आहे. आता यात एक दिवसाची कपात करण्याचे पध्दतशीर प्रयत्न सुरू आहेत. यातून वाचलेल्या दिवसात अगदी हुकमी उत्पन्न देणारा एकदिवसीय अथवा ‘ट्वेंटी-20’ सामना आयोजित करणे हे अगदीच आर्थिक व्यवहाराला धरून आहे. यामुळे ‘आयसीसी’ला आपल्या भरगच्च वेळापत्रकात वाढीव दिवस मिळणार आहेत. याचा थेट संबंध उत्पन्नाशी आहे हे सांगणे नकोच!

क्रिकेटचे मूळ काहीसे संथ स्वरूप बदलून त्याचे फुटबॉलीकरण करण्याचा ‘आयसीसी’चा हव्यास या खेळाच्या मुळावरच उठण्याची श्नयता आहे. बाजारपेठेचा विचार करून खेळाचे स्वरूप बदलणे हे कितपत योग्य आहे, याचा रसिक कसा स्वीकार करतील हा तर भविष्यातील प्रश्न आहे. मॉर्गन यांच्या वक्तव्याने मात्र सच्चे रसिक निश्चितच धास्तावले आहेत. झटपट क्रिकेटमधील हिरो हे महान असल्याचा समज आता पसरत चालला आहे. आयसीसीदेखील याच प्रकाराला प्राधान्य देऊन या समजाला दृढ बनविण्याचा प्रयत्न करत आहे. मैदानावर चेंडू आणि बॅटमधील रंगणारे समग्र नाट्य हे झटपट प्रकारात पूर्णत: निश्चितच रंगणार नाही. पाच-सहा स्लीप लावून आग ओकणारा जलद गोलंदाज अथवा फलंदाजाभोवती क्षेत्ररक्षकांचे कोंडाळे करून त्याला नाचवणारा फिरकी गोलंदाज आता पुढे दिसणार की नाही? कोणत्याही प्रकारच्या अचूक मार्‍याला अतिशय संयमीपणाने खेळणारे अभिजात फलंदाजही आयसीसीच्या लहरीपणामुळे नामशेष होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याऐवजी बचावात्मक गोलंदाज आणि बॅटीला दांडपट्यासमान वापर करणारे हाणामारी वीर भविष्यात निपजण्याची अधिक श्नयता आहे.
बाजाराच्या तालावर नाचणारे आयसीसी हे आपल्या निरंकुश सत्तेचा वापर करून कदाचित हे बदल आपल्या माथी मारतीलही, पण याची कुर्‍हाड खर्‍याखुर्‍या क्रिकेटवर कोसळणार आहे. सच्च्या रसिकासाठी हीच वेदनादायी बाब राहणार आहे.

(प्रसिध्दी दिनांक 5 जुलै 2009)
=======================================

महानायकाचे अर्धशतक

kapildev

एक विद्यार्थी शालेय क्रिकेट स्पर्धेतील भोजनाच्या वेळात संतापाने आयोजकांकडे गेला. ‘‘ मी जलद गोलंदाज आहे, मला सकस जेवण हवे’’. यामुळे आयोजक चांगलेच चपापले. एका बुजुर्गाने मात्र त्याची फिरकी घेतली. ‘‘तू कसला रे फास्ट बॉलर? भारतात कोणी जलद गोलंदाज तरी आहे का?’’ संतापाने लालबुंद झालेला तो पोरगा उद्गारला ‘‘ कोणी असो की नसो, मी मात्र आहे’’. त्या मुलाचा संतापयुक्त आत्मविश्वास व्यर्थ नव्हताच. तो पुढे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील जीवंतपणीची दंतकथा बनणार होता. आज हाच महान कपिल देव आपल्या वयाची 50 वर्षे पूर्ण करत आहे. आपल्या क्रिकेटच्या इतिहासात 1983च्या विश्वचषकातील विजय हे एक सुवर्ण पान आहे. या अध्यायाचा नायक असणार्‍या कपिलचा ‘विस्डेन’ने ‘शतकातील महान भारतीय क्रिकेटपटू’ म्हणून यथार्थ गौरव केला आहे. याशिवाय, सच्च्या रसिकाने आपल्या ह्दयातही त्याला खास स्थान दिलेलेच आहे.

भारतात फिरकी गोलंदाजांची उज्ज्वल परंपरा आहे. आपल्या खेळपट्ट्या आणि वातावरण हे तसे फिरकीलाच पोषक मानले जाते. महंमद निसार, अमरसिंग आणि रमाकांत देसाई यांचा अपवाद वगळता, आपल्याकडे जलदगती गोलंदाज तसे झालेच नाहीत. सत्तरच्या दशकाच्या मध्यात बेदी-प्रसन्ना-चंद्रशेखर आणि वेंकटराघवन ही फिरकी चौकडी ऐन भरात होती. यामुळे जगातील सर्व संघ नवीन चेंडूची चकाकी टिकवण्याचा प्रयत्न करत असले तरी भारतीय संघ मात्र ही चकाकी घालवून या चौघांना गोलंदाजीला आणण्याचा प्रयत्न करत होता. यासाठी चक्क सुनिल गावस्कर सलामीला गोलंदाजी करायचा हे आज सांगून कुणाला पटणारे नाही. याशिवाय, चेंडूला जुना करण्यासाठी क्षेत्ररक्षक एकमेकांकडे त्याला जमिनीवरून घरंगळत फेकायचे. एकंदरीत भारतीय जलद गोलंदाजी हा विनोदाचाच विषय होता. अशा वातावरणातच कपिलदेवचा उदय झाला. चंदीगड येथे 6 जानेवारी 1959 रोजी त्याचा जन्म झाला होता. देशप्रेम आझाद या प्रशिक्षकाने त्याच्यातील रांगडेपणाला नवीन दिशा देत पैलू पाडले. आंतरशालेय तसेच रणजी आणि दुलिप स्पर्धा गाजविल्याने त्याला अवघ्या 18व्या वर्षी भारतीय संघात संधी मिळाली अन् भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एका अध्यायास प्रारंभ झाला.

पाकिस्तानच्या 1978च्या दौर्‍यात भारतीय संघाचा पराभव झाला तरी कपिलच्या रूपाने भारताला एक हिरा गवसला. इमरान आणि सर्फराज नवाझ यांच्या झंझावातासमोर भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्करली असता कपिलने त्यांना झोडपून काढत दोन अर्धशतके ठोकली. कपिलला गोलंदाजीस मर्यादित यश आले तरी त्याचे भयावह बाऊन्सर्स आणि सुरेख स्विंग मुळे पाकी फलंदाजांना धडकी भरली. त्याच्या गोलंदाजीची शैली अगदी ‘कॉपी बुक’ प्रमाणे नसली तरी त्यात एक नैसर्गिक लयबध्दता होती. उंचपुरा आणि बलदंड शरिययष्टीचा कपिल प्रारंभी तुफान वेगाने गोलंदाजी करत असला तरी त्याने नंतर वेग कमी करत अचूकतेसह स्विंगवर हुकूमत मिळवली. अचूक टप्पा आणि त्याला ‘आऊटस्विंग’ची जोड या अप्रतिम मिश्रणाने तर त्याने भल्याभल्यांना चकविले. याशिवाय, त्याने नंतर ‘इनस्विंग यॉर्कर’चे घातक अस्त्र विकसित केले. फलंदाजीत मात्र त्याने कोणत्याही पुस्तकी नियमाला जुमानले नाही. बॅटिंग करताना त्याच्यातील रांगडेपणाचे सहजदर्शन व्हायचे. एखाद्या दांडपट्यासारखी त्याची बॅट फिरायला लागली की तमाम गोलंदाजांची पाचावर धारण बसत असे. एका पायावर उभा राहून पुल आणि हुकमधील मध्य गाठणारा त्याचा फटका पाहिल्यावर रसिकांच्या डोळ्याचे पारणे फिटत असे. अर्थात त्याच्या फलंदाजीत बेभरवशीपणा होताच. कोणत्याही कठीण चेंडूला सीमापार भिरकावून देणारा कपिल हा बर्‍याचदा अतिसामान्य बॉलवर विकेटही गमावून बसायचा. त्याच्या कसोटी आगमनाच्या कालखंडात भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सुनिल गावस्करच्या हाती होती. त्याने कपिलच्या नैसर्गिक गुणवत्तेचा संघासाठी पुरेपूर वापर करून घेतला. पुढे मात्र त्यांच्यात दुर्दैवी शीतयुध्द सुरू झाले.

1982च्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात मेलबोर्न कसोटीत गुडघा जायबंदी झाला असतानाही कपिलने कांगारूंची दिग्गज फळी उद्ध्वस्त करत भारताला विजय मिळवून दिला. याच वर्षाचा पाकिस्तानातील दौरा मात्र भारतीय संघासाठी दु:स्वप्न ठरला. इम्रानने आपल्या फलंदाजांची दाणादाण उडवली. कपिल आणि मोहिंदरचा अपवाद वगळता, पाकी तुफानाचा प्रतिकार कुणी करूच शकला नाही. परिणामी, गावस्करच्या कर्णधारपदावर संक्रांत येऊन अवघ्या 24व्या वर्षी कपिलकडे नेतृत्व आले. आजवरच्या सर्व भारतीय कर्णधारांनी बचावात्मक पवित्रा घेतला होता. गावस्करच्या कालखंडात तर कसोटी अनिर्णित राहणे म्हणजे जणू काही विजयच मिळवणे असे मानले जात होते. परिणामी, भारतीय संघ हा ‘डल डॉग्ज’ म्हणून गणाला जाऊ लागला. कपिलने संघात चैतन्याचे वारे फुंकले. याचा परिणामही लवकरच दिसून आला.

आक्रमकतेअभावी आपला संघ एक दिवसीय सामन्यांमध्ये फारशी चमक दाखवू शकला नव्हता. यामुळे 1983च्या विश्वचषकाप्रसंगी आपण कुणाच्या खिजगणतीतही नव्हतो. लागोपाठ दोनदा विश्वविजेते बनलेल्या विडिंजसह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि पाकिस्तान हे बलाढ्य संघ विजेतेपदाचे दावेदार होते. या तमाम दिग्गजांना पाणी पाजत भारताने विश्वचषक पटकावला यात कपिलचे महत्वाचे योगदान होते. झिम्बॉम्बेविरूध्दची त्याची विस्फोटक खेळी तर कुणी विसरूच शकणार नाही. पाच बाद 17 या दयनीय अवस्थेतून त्याने खेळाची सूत्रे स्वत:कडे घेतली. नाबाद 175 धावांची लयलूट करताना त्याने संघाचा विजयही खेचून आणला. अंतिम सामन्यात मोहिंदरने कमाल दाखवली असली तरी खेळपट्टीवर जम बसवून आपली धुलाई करणार्‍या रिचर्डस्चा अत्यंत अफलातून झेल घेऊन कपिलने सामन्याला कलाटणी दिली. 25 जून 1983 साली लॉर्डसवर फडकलेल्या तिरंग्याचा थरार क्रिकेटरसिक कसा विसरतील! भारतीय क्रिकेट रसिकांसाठी ही मर्मबंधातली ठेवच होय. यानंतर यशाचे हे गौरीशंकर आपण आजवरही गाठू शकलेलो नाही. विश्वचषकानंतरच्या मालिकेत विंडीजकडून सपाटून मार खाल्ल्यामुळे त्याचे कर्णधारपद गेले. यानंतर 84 साली त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे त्याची भेदकता कमी झाली तरी अचूकता कायम होती. 1994 साली कपिलने क्रिकेटला रामराम ठोकला तेव्हा त्याच्या नावावर विक्रमांची रास जमा झाली होती. त्याचा कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमधील बळींचा विक्रम काही दिवसातच मोडला गेला असला तरी कसोटीत चार हजार धावा आणि 400 बळी हा पराक्रम आजवर कोणताच अष्टपैलू खेळाडू मोडू शकलेला नाही. कपिलच्या कालखंडात तर त्याच्यासकट इम्रान, बॉथम आणि हॅडली हे चार महान अष्टपैलू ऐन भरात होते. आजही त्यांच्यात महान कोण यावर हिरीरीने चर्चा होत असते. यात आकडेवारीच्यादृष्टीनेच नव्हे तर इतरही बाबींनी कपिलच सरस आहे. इम्रान, बॉथम आणि हॅडली हे जास्तीत जास्त सामने जलदगती गोलंदाजांना अनुकूल असणार्‍या खेळपट्यांवर खेळले. याशिवाय, त्यांना इतर गोलंदाजांची समर्थ साथ होती. कपिलला मात्र भारतातील निर्जीव खेळपट्यांवर सगळा भार एकट्याच्याच खांद्यावर उचलावा लागला. यावरूनही त्याची महानता दिसून येते. एकेकाळी देशातील शाळकरी मुले फलंदाज अथवा फिरकी गोलंदाज होण्याची स्वप्ने पाहत असत. कपीलनंतर मात्र जलद गोलंदाजीलाही वलय प्राप्त झाले. श्रीनाथ आणि त्याच्या नंतरच्या कालखंडात आपल्याकडे चांगल्या प्रतिचे जलद गोलंदाज तयार झाले त्यांना कपिलनेच प्रेरणा दिली. आपल्या संघाला त्याच्या तोडीचा अष्टपैलू मात्र आजवरही मिळालेला नाही.

निवृत्तीनंतर कपिल हा भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून साफ अपयशी ठरला. मॅच फिक्सिंगच्या काळ्या अध्यायात तर त्याच्यावरही शिंतोडे उडाले. यातच मैदानावर राजासारखा वावरणारा कणखर कपिल अख्ख्या देशासमोर ढसाढसा रडला. ‘विस्डेन’च्या सर्व्हेक्षणात रसिकांनी मात्र गावस्कर आणि तेंडुलकरला बाजूला सारत, त्यालाच ‘शतकातील सर्वात महान भारतीय खेळाडू’ म्हणून सन्मानित केले. आज तो ‘आयसीएल’ या विद्रोही मालिकेशी संलग्न आहे. आजवरच तो बर्‍याचदा वादाच्या भोवर्‍यात सापडला तरी रसिकांना मैदानावरील कपिलच जास्त भावला आहे. ‘ओठावर एक आणि मनात एक’ असे त्याला कधी जमलेच नाही. या बाबतीत तो त्याच्या फलंदाजीसारखाच आक्रमक पण सरळ आणि निर्व्याज आहे. भारताला क्रिकेटचा 75 वर्षांचा इतिहास आहे. कपिलच्या पूर्वी आणि पश्चातही अनेक दिग्गजांनी आपल्या संघासाठी महान योगदान दिले. सचिन, सौरव आणि धोनीने तर कपिलच्याही पुढे जाऊन स्वत:चे वलय निर्माण केले. असे असले तरी कपिलला क्रिकेटच्या इतिहासात अत्यंत महत्वाचे स्थान राहणारच आहे. त्याने आपल्या संघाच्या पराभूत मनोवृत्तीला झुगारून लावत चैतन्याचे वारे फुंकले. यातूनच गांगुली आणि धोनीसारखे अत्यंत आक्रमक संघनायक आपल्याला मिळाले.

आज भारतीय संघाची मैदानावरील देहबोली अत्यंत आत्मविश्वासपूर्ण आहे. हा प्रखर आत्मविश्वास आणि जिद्द कपिलच्या रूपाने भारतीय संघात प्रथमच दिसली होती. आज हा महानायक वयाची पन्नास वर्षे पूर्ण करत आहे. त्याने वयाचेही दर्जेदार शतक झळकवावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

(प्रसिध्दी दिनांक 6 जानेवारी 2009)
====================================================

विजयपर्वाचा सेनापती

उगवत्याला सलाम ठोकणार्‍या संधीसाधू दुनियेत मावळत्याकडे कुणी ढुंकनही पाहत नाही. काही भाग्यवान मात्र याला अपवाद असतात. भारतीय क्रिकेट संघाचा आजवरचा सर्वात यशस्वी कर्णधार सौरव गांगुली याला निरोप देताना देशभर जी भावना उचंबळून आली ती याच प्रकारातील होय. निवृत्ती हा क्रिकेटपटूंच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असतो. आज सौरववर उधळणारी स्तुतिसुमने काही दिवस टिकतील. तो कोणत्यातरी माध्यमाद्वारे क्रिकेटशी संलग्न राहिला तरी एक खेळाडू म्हणून तो मैदानावर दिसणार नाही याचे शल्य सच्च्या क्रिकेटप्रेमीला निश्र्चितच जाणवणार आहे.

सौरव गांगुलीचे नाव येताच डोळ्यासमोर अनेक प्रतिमांची गर्दी होते. धुरंधर फलंदाज, चतुर कर्णधार, आळशी क्षेत्ररक्षक, मैदानावरचा महाराजा, कायम वाद अंगावर घेणारा यातील खरा गांगुली कोणता हे निश्र्चित सांगणे कठीण आहे. एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून त्याचे मूल्यमापन इतिहास करेलच पण रसिकांनी आपल्या ह्दयात त्याला खास स्थान दिलेले आहे. भारतीय क्रिकेटचा इतिहास हा सचिन-सौरव या नावांशिवाय पूर्ण होणे अशक्य आहे. सचिनला 16 व्या वर्षीच संधी मिळाली असली तरी सौरवला मात्र यासाठी वाट पहावी लागली. एक दिवसीय सामन्यात विसाव्या वर्षी विंडीजविरुध्द मिळालेल्या संधीचा लाभ न घेता आल्याने त्याचा कसोटीतील प्रवेश लांबला. अर्थात, सौरवच्या कारकीर्दीत नशिबानेही सौरवला बर्‍याचदा साथ दिली. अझरुद्दीनशी उडालेल्या खटक्यामुळे सिध्दू दौर्‍यावरून परतला अन् 1996 साली लॉर्डस कसोटीत त्याला स्थान मिळाले. यावेळी मात्र त्याने लागोपाठ दोन शतके झळकावत संघातील आपले स्थान पक्के केले. पुढील तीन-चार वर्षात एकदिवसीय आणि कसोटी संघातील तो महत्त्वाचा घटक बनला. इ.स. 2000 साली ‘मॅच फिक्सिंग’ च्या रूपाने क्रिकेटच्या इतिहासातील काळाकुट्ट अध्याय समोर आला. यातूनच गांगुलीला संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. भारतीय संघाचा तत्कालीन कर्णधार महंमद अझरुद्दीनसह कपिल देव, मार्क वॉ, हॅन्सी क्रोनिए आदी दिग्गजांवरील संशयाच्या सुईमुळे क्रिकेटविश्र्व ढवळून निघाले. यातच भारतीय संघाची गलितगात्र अवस्था झालेली होती. खरं तर आपल्याकडे गुणवंतांची वानवा नव्हतीच. भारताकडे सचिनसारखा विक्रमादित्य आणि त्याच्या जोडीला सौरव आणि द्रविडसारखे खंदे शिलेदार होते. ऐन भरातील श्रीनाथच्या जोडीला कुंबळेची समर्थ साथ होती. असे असूनही प्रखर जिद्दीच्या अभावी संघाला विजयाची सवय जडली नव्हती. मैदानावर वैयक्तिक विक्रमांची रास रचणार्‍या गुणवंतांची सेना क्वचितच यशाची चव चाखत होती. या प्रतिभावंतांमध्ये चैतन्याचे वारे फुंकण्याचे कार्य सौरवने केले. त्याने आजच्या ओबामांच्या भाषेतील ‘येस वुई कॅन’ हा मंत्र सहकार्‍यांच्या रोमारोमात भिनवला. यातूनच भारतीय क्रिकेटमधील एका चैतन्यपर्वास प्रारंभ झाला. या कालखंडाचा नायक हा पारंपरिक नव्हे तर नव्या युगाची भाषा बोलणारा होता. ‘देशात वाघ तर परदेशात शेळी’ अशी प्रतिमा असणार्‍या भारतीय संघाच्या मनातील न्यूनगंड झुगारून लावण्यासाठी त्याला अनेक पातळ्यांवर कार्य करावे लागले.

सचिन, राहुल, लक्ष्मण व कुंबळे या वरिष्ठांकडून उत्तम कामगिरी करवून घेतानाच त्याने सेहवाग, झहीर, हरभजन, युवराज आदी नवप्रतिभेलाही पैलू पाडले. आजवरचे भारतीय कर्णधार बहुतांशी बचावाचा पवित्रा घेत असत. गावस्करच्या नेतृत्वात तर कसोटी अनिर्णीत राखणे हे जणू काही विजयासमानच मानले जात होते. या पार्श्र्वभूमीवर सौरवने भारतीय संघाला आक्रमकता शिकवली. रणभूमीवरून पळ काढण्यापेक्षा दोन हात करण्यावरच त्याचा भर होता. शेवटच्या क्षणांपर्यंत हार न मानण्याची ही जिद्द भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच पाहायला मिळत होती. याचमुळे अविस्मरणीय विजयपथावर आपण विलक्षण झुंज देत काही ‘ग्रेसफुल’ पराभवही पचविले. विशेष बाब म्हणजे हे सर्व करत असताना ‘जशास तसे’ हा मंत्रही सौरवसेनेच्या अंगवळणी पडला होता. विसरले असाल तर आठवून पहा, 2002 च्या ‘नॅटवेस्ट ट्रॉफी’ तील लॉर्डस्वरील तो थरार! सचिन बाद झाला म्हणजे बोंबला…म्हणण्याचे ते युग होते. संघातील तमाम दिग्गज तंबूत परतल्यावर युवराज सिंह आणि मोहंमद कैफ यांनी तडाखेबंद खेळाने विजय अक्षरश: खेचून आणला. विजयोन्मादात ड्रेसिंग रूमकडे धावणार्‍या शिलेदारांना त्यांच्या सेनापतीने शर्ट भिरकावत त्याच तोलामोलाची सलामी दिली. नऊ वर्षांपूर्वी याच बाल्कनीत कपिल देव आणि त्याच्या सहकार्‍यांनी शालिनतेने विश्र्वचषक उंचावला होता. सौरवच्या शर्ट भिरकावण्यामुळे मात्र परंपरावाद्यांचे पित्त खवळले. प्रत्यक्षात सौरवने भारत दौर्‍यात अशाच स्वरूपाचा आचरटपणा करणार्‍या फ्लिंटॉफला उत्तर म्हणून हे कृत्य केले होते.

सौरवचे टीकाकार भारतातील सामाजिक बदल सोयिस्कररीत्या विसरले होते. अगदी हिंदी सिनेमातील ढेरपोटे नायक आणि थोराड नायिकांचा झाडामागचा ‘खेळ’ केव्हाच इतिहासजमा झाला होता. आता पिळदार नायक आणि मादक मदालसा एकमेकांना थेट ‘आमंत्रण’ देऊ लागली होती. याच पिढीतील सौरवने क्रिकेटमध्ये आक्रमक देहबोली आणली. 2003 च्या विश्र्वचषकाप्रसंगी सौरवसेना ऐन शिखरावर होती. यातील पराजयामुळे निराश न होता भारतीय संघाची वाटचाल सुरूच राहिली. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात बलाढ्य संघांपैकी एक म्हणून गणल्या जाणार्‍या ऑस्ट्रेलियाला भारतच पाणी पाजू शकतो हे सौरवने दाखवून दिले. परदेशातील उसळणार्‍या खेळपट्ट्यांवरही वैयक्तिक आणि सांघिक यश मिळवत त्याने टीकाकारांना चोख उत्तर दिले. सर्व काही सुरळीत सुरू असताना सौरवने अत्यंत खडूस पण परिपूर्ण व्यावसायिक मनोवृत्तीच्या ग्रेग चॅपेल यांनाच प्रशिक्षक नेमण्याचा आग्रह धरला आणि एका वादग्रस्त कालखंडास प्रारंभ झाला.

ग्रेग चॅपेल यांनी संघहितासाठी शिस्त आणि कामगिरीला प्राधान्य दिले. येथेच सौरव आणि त्यांच्यात खटके उडाले. सौरवची कामगिरी ढासळत असतानाच त्याच्यातील आळस आणि उद्दामपणा कमी होत नव्हता. त्याच्या नेमक्या याच प्रवृत्तीवर प्रकाश टाकणारा ई-मेल जगजाहीर होताच धरणीकंप झाला. उत्तम कामगिरीअभावी सौरवला वगळण्यात आले तर चॅपेल यांनी कंटाळून आपला गाशा गुंडाळला. यातच सौरवचे पाठीराखे जगमोहन दालमिया यांची सद्दी संपल्याने त्याच्यासमोरील अडचणी अजूनच वाढल्या. त्याला निवड समितीकडून जाहीररीत्या अपमानित करण्यात आले. याविरुध्द त्याचे चाहते रस्त्यावर उतरले तरी महाराजाचे युग सरत आल्याची भेदक जाणीव सर्वांना झाली. याच कालावधीत त्याने प्रयत्नपूर्वक जोरदार पुनरागमन केले. मोहिंदर अमरनाथनंतर ही जिद्द फक्त सौरवनेच दाखवली. दरम्यान, त्याने रोवलेल्या विजिगिषु वृत्तीला चांगले फळ आले. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली ‘यंग टीम इंडिया’ ने ट्वेंटी-20 विश्र्वचषक पटकावला. नंतर सौरवला एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांसाठी निवडण्यात आले. विशेषज्ञांच्या मते तो एक-दोन वर्षे तरी खेळू शकत होता. अर्थात, त्याने हा निर्णय योग्य वेळीच घेतला आहे.

सौरवने एकदिवसीय आणि कसोटी या दोन्ही प्रकारात उत्तम कामगिरी केली असला तरी त्याचा मूळ पिंड आक्रमकतेचाच होता. परिणामी, एकदिवसीय क्रिकेटमधील महान फलंदाज म्हणून त्याला इतिहासात मानाचे स्थान मिळणार आहे. डावर्‍या फलंदाजांमध्ये देखणी शैली असते. सौरवही याला अपवाद नव्हता. ‘ऑफ साईडचा परमेश्र्वर’ हा किताब त्याच्या शैलीचे यथार्थ वर्णन करतो. ऑफ बाजूला आलेल्या कोणत्याही कठीण चेंडूला सीमापार लीलया टोलवताना त्याचा राजेशाही थाट पाहण्यालायक असायचा. त्याने पुढे येत खेचलेल्या षटकारांचा थरारही रसिक विसरणार नाहीत. त्याच्यातील गोलंदाजाकडेही कुणी दुर्लक्ष करू शकत नाही. मैदानावर सर्वांना प्रिेरत करणार्‍या या महान खेळाडूचे अनेक कमकुवत दुवेदेखील होते. क्षेत्ररक्षण करताना त्याचा आळसपणा हा कुचेष्टेचा विषय बनला होता. याचमुळे तो अनेकदा धावबादही झाला आहे. याशिवाय उसळत्या चेंडूवर त्याची उडणारी भंबेरीदेखील जगाने पाहिली आहे. याहूनही महत्त्वाची बाब म्हणजे सौरव आणि वाद यांचे अभिन्न नाते होते. याचमुळे तो अनेकदा अडचणीत सापडला.

संघाची धुरा सांभाळताना त्याने अनेकदा स्वत:हून सहकार्‍यांमध्ये फूट पाडल्याचे आरोप झाले. तो आणि सचिन यांच्यातील शीतयुध्दही बरेच गाजले. पाकविरुध्द सचिन द्वि-शतकाच्या उंबरठ्यावर असताना प्रभारी कर्णधार द्रविडला डाव घोषित करण्यास सुचविणार्‍या सौरववर यामुळे टीकेची झोड उठविण्यात आली. याशिवाय स्टीव्ह वॉसह अनेक परदेशी खेळाडूंना त्याच्या अहंमान्यतेचा फटका बसला आहे. भारतीय क्रिकेट संघाला सोन्याचे दिवस दाखविणार्‍या या महानायकाचे पायही मातीचेच असल्याचे बर्‍याच घटनांमधून दिसून आले असले तरी, त्याची महत्ता मात्र कोणीही नाकारू शकत नाही.

सचिन, राहुल, कुंबळे आणि लक्ष्मण हे सद्गृहस्थांच्या क्रिकेटचे प्रतिनिधित्व करत असले तरी सौरवने मात्र झुंजार आणि निर्भय खेळाडूंना घडविले. ही मंडळी गुणवान तर होतीच पण समोरच्याच्या नजरेला नजर भिडवत ‘अरेला कारे’ म्हणणारी होती. काहीही करून विजय हवाच ही मनोवृत्ती या खेळाडूंमधून दिसू लागली. यामुळे मैदानावर भारतीय खेळाडूंचा उच्छृंखलपणा बर्‍याचदा दिसू लागला तरी ही पध्दत जगातील सर्व संघांनी अवगत केली होती. स्लेजिंग, आक्रस्ताळेपणा, खुन्नस, धसमुसळेपणा या बाबी आधुनिक क्रिकेटच्या अविभाज्य घटक बनल्या आहेत. भारतीय संघ यातही मागे नसून याचे संपूर्ण श्रेय सौरवला जाते. त्याने आपल्या सहकार्‍यांना निर्भयता शिकवली. यामुळे अगदी लहान शहरांमधून आलेले धोनी-पठाण आदी खेळाडूही मैदानावर आत्मविश्र्वासाने वावरू लागले. न्यूनगंड झुगारून लावत ‘टीम इंडिया’ विजेत्यांच्या देहबोलीत वावरू लागली. आज धोनीसारखा आत्मविश्र्वासाने परिपूर्ण नायक भारतीय संघाला लाभला आहे. तो सौरवचा वारसा पुढे चालविणार हे आजच दिसून येत आहे.

संकटकाळातील सेनापतीला इतिहास कधी विसरत नाही. सौरवने तर याहूनही पुढचा पल्ला गाठला आहे. भारतीय क्रिकेटला संकटातून काढतानाच त्याने सातत्याने विजयाची झुंजार वृत्तीही निर्माण केली. रुक्ष आकडेवारीचे दाखले देत इतिहास त्याचे काहीही मूल्यमापन करो…गांगुलीच्या कर्णधारपदाचा काळ हा भारतीय क्रिकेटमधील एक महत्त्वाचा अध्याय होता, आणि याचमुळे या कालखंडाच्या नायकाला आपण विसरणार तरी कसे?

(दि.16 नोव्हेंबर 2008)

धवल क्रांतीचे जनक

भारताला दुग्ध उत्पादनात स्वयंपूर्ण बनविणार्‍या ‘ऑपरेशन फ्लड’ अर्थात श्‍वेत क्रांतीचे जनक डॉ. वर्गिस कुरियन यांच्या निधनाने एका युगाचा अस्त झाला आहे. सहकार चळवळीला द्रष्टे नेतृत्व अन् त्यासोबत कुशल प्रशासकीय व्यवस्थापन लाभले असता काय चमत्कार होऊ शकतो हे गुजरातमधील ‘आणंद पॅटर्न’ने दाखवून दिले आहे. अर्थात याच्या यशामध्ये डॉ. कुरियन यांचा महत्वाचा वाटा आहे.

नियतीने एखाद्याच्या आयुष्यात घडवलेले चमत्कार हे एखाद्या राष्ट्राच्या भाग्याशी कसे निगडीत असतात हे डॉ. कुरियन यांच्या आयुष्यातील एका घटनेवरून दिसून येते. अत्यंत कुशाग्र बुध्दीच्या कुरियन यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला जायचे होते तेव्हा त्यांनी भारत सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला. याप्रसंगी झालेल्या मुलाखतीत एका परिक्षकाने त्यांना ‘पाश्‍चरीकरण म्हणजे काय?’ हा प्रश्‍न विचारला. यावर त्यांनी ‘ही प्रक्रिया म्हणजे दुधाचे निर्जंतुकीकरण करून त्याला दीर्घ काळापर्यंत टिकवणे’ असे अचूक उत्तर दिले. यामुळे कुरियन यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली. मात्र त्यांना एक अट टाकण्यात आली. या अंतर्गत त्यांना मिशिगन विद्यापीठात दुग्ध विकास आणि दुग्ध उत्पादनाचा अभ्यासक्रम पूर्ण करावयाचा होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना शासकीय सेवेत रूजू व्हावे लागेल. त्यांनी भारतात परतल्यावर शासकीय सेवा न केल्यास दंड म्हणून ३० हजार रूपयांची परतफेड करण्याची अटही शिष्यवृत्तीच्या करारनाम्यात टाकण्यात आली होती. अर्थात त्या काळात ही रक्कम खूप मोठी असल्याने अमेरिकेतून पदवी मिळाल्यानंतर २८ वर्षांचा हा युवक गुजरातमधील आणंद येथे येऊन पोहचला.

कुरियन येथे येण्याआधी दुग्ध उत्पादनाच्या क्षेत्रात खूप काही घडामोडी घडल्या होत्या. स्वातंत्र्यपूर्व काळात दुग्ध व्यवसाय हा मुख्यत्वे व्यापारी आणि दलाल यांच्या हातात एकवटला होता. मुंबईसारख्या शहराच्या दुधाची गरज गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील दुध उत्पादक पुरवत होते. यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी होती. मात्र या व्यवहारातील सर्व नफा हा ‘पोल्सन’ या खासगी कंपनीच्या घशात जात होता. पेस्टनजी एडुलजी हा पारशी व्यापारी यातून गबर झाला असला तरी गरीब दुध उत्पादकांच्या पदरात फार काही पडत नव्हते. यामुळे सरदार पटेल आणि मोरारजी देसाई यांच्या प्रेरणेने त्रिभुवनदास पटेल यांनी १९४६ साली आणंद येथे देशातील प्रथम सहकारी दुग्ध उत्पादन संस्था सुरू केली. तत्कालीन ब्रिटीश शासनाकडून या चळवळीला सहकार्य मिळाले नाही. इकडे पोल्सन कंपनीनेही आडमुठी भूमिका घेतली. यामुळे या कंपनीची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी खेडा जिल्ह्यातील दुग्ध उत्पादकांनी १५ दिवस आंदोलन करून अखेर ‘पोल्सन’ला नमती भूमिका घ्यावी लागली. शेतसारा प्रकरणी केलेल्या आंदोलनाप्रमाणेच खेडा जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी या प्रकरणी आपल्यातील लढावू प्रवृत्ती दाखवून दिली. दरम्यान, स्वातंत्र्य मिळाले अन् याच कालखंडात डॉ. कुरियन हे आणंद येथे पोहचले. त्यांच्यातील चमक त्रिभुवनदास पटेल यांची तात्काळ जोखली. यामुळे सहकारी चळवळीचे नेतृत्व पटेल यांचे तर प्रशासकीय व्यवस्थापक कुरियन अशी अफलातून जोडी जमली. या जोडगोळीने खेडा जिल्हाच नव्हे तर देशाच्या दुग्ध उत्पादनाला एक नवीन दिशा दिली. डॉ. कुरियन यांनी झपाट्याने काम करून ‘आणंद मिल्क युनिअन लिमिटेड’ अर्थात ‘अमूल’ हा ब्रँड विकसित केला. १९५५ साली तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांनी याचे उद्घाटन केले. यथावकाश ‘टेस्ट ऑफ इंडिया’ या आपल्या ‘कॅचलाईन’प्रमाणे ‘अमूल’ देशभरात पोहचला. दरम्यान देशात ठिकठिकाणी ‘अमूल’ प्रमाणेच सहकारी दुग्ध विकास चळवळी उभ्या रहाव्यात म्हणून १९६५ साली पंतप्रधान लालबहाहूर शास्त्री यांच्या पुढाकाराने केंद्रीय पातळीवर ‘नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड’ (एनडीडीबी) या संस्थेची स्थापना केली. अर्थातच याची धुरा डॉ. कुरियन यांच्या खांद्यावर आली. याच कालावधीत भारतात हरीत क्रांतीची मुहुर्तमेढ रोवण्यात आली होती. याच अनुषंगाने देशाला दुग्ध उत्पादनात अग्रेसर बनविण्यासाठी १९७० साली ‘ऑपरेशन फ्लड’ ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना आखण्यात आली. याच्या अंमलबजावणीची जबाबदारी आपसूकच डॉ. कुरियन यांच्याकडे आली. त्यांनी या संधीचे अक्षरश: सोने केले.

देशात सहकारी चळवळीच्या माध्यमातून दुध वितरणात डॉ. कुरियन यांना सफलता मिळाली होती. मात्र दुग्ध उत्पादन व गुणवत्तेत वाढ, गुरांच्या संकरीत जाती विकसित करणे, गुरांना पौष्टीक खाद्य देणे, अत्याधुनिक प्रकल्प उभारणे आदी बाबीही तितक्याचा महत्वाच्या होत्या. हे सारे करत असतांना भारतात दुग्ध जाल उभारणे अत्यंत जिकिरीचे होते. यावेळी त्यांनी अत्यंत चतुराईचा वापर केला. १९७०च्या दशकात आंतराष्ट्रीय करारानुसार विकसित देश भारतासारख्या विकसनशील देशाला आपल्याकडील अतिरिक्त दुध पावडर मोफत देत असत. यापासून तयार झालेले दुध भारतात अल्प दराने उपलब्ध करून देण्याची शक्कल त्यांनी लढविली. यामुळे देशातील दुध टंचाईवर मात करून त्यांना अन्य बाबींवर लक्ष केंद्रीत करता आले.

जगातील बहुतांश राष्ट्रांमध्ये दुधाचा प्रमुख स्त्रोत हा गायीपासून येतो. भारतात मात्र परिस्थिती भिन्न आहे. आपल्याकडे म्हशीचे प्रमाण खूप आहे. यामुळे शिल्लक दुधापासून भुकटी तयार करणे शक्य होते. मात्र यासाठी लाभणारे तंत्र विकसित झाले नव्हते. इकडे न्यूझिलंड, हॉलंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या दुग्ध उत्पादनातील अग्रेसर देशांमधील शास्त्रज्ञांनीही म्हशीच्या दुधापासून भुकटी बनविणे अशक्य असल्याचे जाहीर केले होते. मात्र डॉ. कुरियन यांनी म्हशीच्या दुधापासून भुकटी तयार करून जगाला चकीत केले. १९७० ते ९६ या कालखंडात तीन टप्प्यांमध्ये राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन फ्लड’ला अभूतपूर्व यश लाभले. यामुळेच आज आपण जगातील प्रथम क्रमांकाचे दुग्ध व दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादक बनलो आहोत याचे श्रेय डॉ. कुरियन यांनाच जाते. देशातील हरीत क्रांतीला मर्यादीत यश मिळाल्याने राजकारणी वारंवार दुसर्‍या हरीत क्रांतीचे नारे देतात. दुग्ध उत्पादनात मात्र स्वयंपूर्णता आल्यामुळे मात्र दुसर्‍या श्‍वेत क्रांतीची भाषा मात्र कुणीही करत नाही. डॉ. कुरियन यांना पदावरून हटविण्यासाठी जंग जंग पछाडण्यात आले. बाबू जगजीवनराम यांच्यासारख्या मातब्बर नेत्याने जोर लावूनही ते डॉ. कुरियन यांना हटवू शकले नाही. कारण त्यांनी आपल्या कार्यक्षमतेचा मापदंड प्रस्थापित केला होता. याचमुळे त्यांना पद्मविभूषण, मॅगेसेसे, वर्ल्ड फुड प्राईज आदी पुरस्कारांनीही गौरविण्यात आले. शाम बेनेगल यांच्यासारख्या संवेदनशील दिग्दर्शकाने मंथन हा चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा गौरव केला.

स्वातंत्र्योत्तर कालखंडातील सर्वात यशस्वी उपक्रमाचे नेतृत्व करणार्‍या डॉ. वर्गिस कुरियन यांना खरं तर कधीच ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान मिळायला हवा होता. असो. त्यांना मरणोत्तर भारतरत्न मिळो वा नको, आपल्या कर्तबगारीने ते अजरामर बनले आहेत. देशात जेव्हाही दुग्ध चळवळीचा उल्लेख येईल तेव्हा त्यांचे नाव कुणीही टाळू शकणार नाही हे मात्र नक्की.

*********<<<<<<<**********>>>>>>>>>>>>>>>

प्रमोद तावडेंचा ‘खाकी’तल्या वेदनेला हुंकार!

मनसेच्या कालच्या महामोर्च्यात राज ठाकरे यांनी केलेली तिरंदाजी ही कुणाकुणाच्या वर्मी बसणार हे तर येणारा काळ ठरवणार आहे. मात्र सभेनंतर त्यांचे जाहीर अभिनंदन अन् नंतर पोलीस खात्यातील खदखद व्यक्त करून प्रमोद तावडे हा खर्‍या अर्थाने ‘हिरो’ बनला आहे. वेळोवेळी बदनामीचे डाग घेऊन कुख्यात झालेल्या ‘खाकी’लाही अनेक समस्या भेडसावत असून सरकार त्यांचे शोषण करत असल्याचे दाहक सत्यही यातून जगासमोर आले आहे.

पोलीस खात्यातील नोकरी ही अत्यंत जिकिरीची आहे. अर्थात ही जाणीव ‘जावे त्याच्या वंशा’ तेव्हाच कळू शकते. पोलिसांना मिळणारी चिरीमिरी, मलाई, मलीदा आदींवर नेहमी चर्चा होत असते. यावरून त्यांची हेटाळणी होत असते. आता तर चित्रपटांमुळे त्यांच्याकडे एखाद्या विनोदी पात्राप्रमाणेच पाहण्यात येते. त्यांना वेतनाची जराही गरज नाही किंबहुना त्यांनीच सरकारला दरमहा पगार द्यावा अशी शहाजोग मल्लीनाथीही वारंवार करण्यात येते. मात्र खरोखरीच अशी स्थिती आहे का हो? या वृत्तामधून पोलिसांची बाजू मांडण्याचा प्रयत्न नाही. मात्र पोलीस खात्याशी निकटचा संबंध आल्यानंतर या खात्यातील अधिकार्‍यांपासून शिपायापर्यंत सर्व मंडळी किती भयंकर तणावात राहते? त्यांच्यावर किती प्रकारचे ओझे असते? ते किती संकटमय वातावरणात काम करतात? याची जाणीव झाल्यावाचून राहत नाही. अनेक प्रकारच्या हस्तक्षेपांनी हे खाते अक्षरश: बेजार झाले आहे. अगदी ट्रॅफिक पोलिसाने वाहन पकडल्यापासून ते अतिभयंकर गुन्ह्यांची नोंद होत असतांना प्रत्येक जण ‘ओळख’ दाखविण्याचा प्रयत्न करतो. ही ओळख सर्वसाधारणपणे राजकीय, पत्रकारिता, सामाजिक, व्यावसायिक अशा स्वरूपाची असते. यात काही जण वैयक्तीक दादागिरीही दाखवतात. यामुळे गुन्हा दाखल झाला तर पेच निर्माण होतो. नाही दाखल झाला तरी ही मंडळी शंख फुंकायला मोकळी! असला प्रकार सुरू असतो. बरं राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, मीडिया, कथित मानवाधिकार संघटना आदी नेहमीच पोलिसांवर तोंडसुख घेत असतात. ‘हे खाते बिनकामाचे आहे’ अशी ओरड करत बदनामीही होते. याच बदनामीच्या जोडीला आता गेल्या काही वर्षांपासून पोलिसांमध्ये असुरक्षेची भावना वाढीस लागत आहे.

काही राजकीय पक्ष गेल्या काही वर्षांपासून विशिष्ट व्होट बँकेचे राजकारण करू लागले आहेत. यामुळे त्या समुदायाला कुरवाळण्याचे काम सुरू झाले आहे. यातच पोलिसांच्या हातात लाठ्या आणि कालबाह्य शस्त्रे असली तरी हुकुम देण्याची शक्ती मात्र राजकारण्याच्या हातात आहे. याचमुळे मावळमधील मूठभर शेतकर्‍यांवर गोळीबाराचा आदेश देऊन हे आंदोलन चिरडण्यात येते. रामदेवबाबांच्या अहिंसक आंदोलनावर लाठीमार करून महिलेचा जीव घेतला जातो. मात्र रजा अकादमीच्या हिंस्त्र जमावाला मोकळे रान सोडण्यात येते यातील दुटप्पीपणा जनतेच्या लक्षात येऊ लागला आहे. या राजकीय खेळात सत्ताधारी आणि विरोधक आपापली राजकीय पोळी शेकून घेण्यात गर्क आहेत. बळी मात्र पोलिसांचा जात आहे…कुख्यातीही त्यांचीच होत आहे! कोणतेही आंदोलन आणि दंगेखोरांचे एक मानसशास्त्र असते. एस.टी.सारखी सरकारी मालमत्ता दंगेखोरांसाठी ‘सॉफ्ट टार्गेट’ असते. बसवर हल्ला करून दंगेखोरांना आपण सरकारलाच झोडपल्याचे समाधान होते. याचप्रमाणे पोलिसांवरील हल्ला हा सरकारवरील हल्ला असल्याची मानसिकता आता बळावत चालली आहे. यामुळे दंगेखोरांसाठी पोलिसही ‘सॉफ्ट टार्गेट’ बनू पाहत आहे. १९९३ साली मुंबईत झालेल्या भीषण दंग्यांमध्ये जमावाने एकट्या-दुकट्या पोलिसांना गाठून त्यांना यमसदनी पाठविले होते. अवघ्या २० वर्षात बदललेल्या राजकीय स्थितीमुळे दंगेखोरांची मजल आता पोलिस ताफ्यावर हल्ला चढवण्यापर्यंत गेली आहे. भिवंडी येथे दोन पोलिसांना जीवंत जाळण्यात आले. यानंतर आता सीएसटीवरील दंग्यातही त्यांना याची झळ बोहचली. खरं तर पन्नास हजारांच्या प्रक्षुब्ध जमावाला पांगवणे पोलिसांना सहजशक्य होते. मात्र यासाठी लागणारी ‘ऍक्शन’ घेण्याआड राजकीय लाचारी आली. यामुळे हातात शस्त्रे असूनही पोलीस हतबल बनले अन् हिंस्त्र जमावाने त्यांना यथेच्छ झोडपले तर महिला पोलिसांची छेड काढण्यात आली. पोलिसांची शस्त्रे पळवून त्यांच्यावरच उगारण्यात आली. या सर्व प्रकारात सत्ताधार्‍यांची काही मते ‘पक्की’ झाली असली तरी कायदा-सुव्यवस्थेचे पालन करण्याची जबाबदारी असलेली पोलीस यंत्रणा मात्र हादरली आहे. भविष्यातील असले प्रकार कसे हाताळावेत? ही धास्ती आता त्यांना मनात बसल्यास नवल वाटू नये.

राजकारणी मंडळीने पोलीस यंत्रणेला फक्त आपल्या लाभापुरते वापरल्याचे यापूर्वीही वारंवार दिसून आले आहे. यातच आता देशद्रोही समूहासमोर त्यांना बळीच्या बकर्‍याप्रमाणे सादर करण्याची भयंकर पध्दत सुरू झाली आहे. शौर्यात महाराष्ट्र पोलीस कुठेही कमी नाहीत. या खात्याला शौर्याचा अन् बलीदानाचा इतिहास आहे. २००८च्या दहशतवादी हल्ल्यात सशस्त्र दहशतवाद्याला पकडून देणार्‍या तुकाराम ओंबळेंच्या हाती फक्त पोलीसी लाठी होती. परंतु, निव्वळ धाडसाच्या जोरावर ओंबळे यांनी जगात पहिल्यांदाच आत्मघातकी पथकातील दहशतवाद्याला पकडण्याची कामगिरी पार पाडली. मात्र राजकारण्यांच्या कृत्यामुळे आता पुन्हा नवीन ओंबळे तयार होतील का? हा खरा प्रश्‍न आहे. जुनाट शस्त्रांच्या मदतीने पोलीस कसे तरी समाजकंटक आणि दहशवाद्यांशी लढताहेत अन् घायाळ वा शहीद होताहेत. त्यांचे मनोधैर्य उंचावण्याऐवजी खच्चीकरण होत असेल तर त्यांनी जावे कुठे? आज अधिकार्‍यांपासून ते पोलीस शिपायापर्यंत प्रत्येकाला आठ-दहा तासांपेक्षा जास्त ड्युटी करावी लागते. संकटसमयी तर पोलीस कर्मचारी घरी कधी परत येणार हे कुणीही सांगू शकत नाही. राज्यात पोलीस खात्यात पाच हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त असल्याचे गृहमंत्र्यांचेच म्हणणे आहे. या सर्व जागांचा भार विद्यमान पोलिसांवर आहे. यामुळे पोलिसांना अनेक व्याधी जडल्याचे यापूर्वीच दिसून आले आहे. कामाचे वाढलेले तास, यातून येणारा तणाव, वरिष्ठांची मनमर्जी यामुळे पोलीस अक्षरश: जेरीस आले आहेत. आयपीएस अधिकार्‍यांची संघटना अत्यंत प्रबळ आहे. यामुळे अधिकार्‍यांवर अन्याय झाल्यास ही संघटना धावून येते. मात्र अन्य अधिकारी व कर्मचारी हे अत्यंत असुरक्षित आहेत. राज्यात त्यांची संघटना नाही. वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय नेते हेच त्यांचे मायबाप आहेत. एवढे होऊनही सर्वात बदनामही होणारे तेच! नेमक्या याच विदारक स्थितीला प्रमोद तावडे याने अगदी अचूक वेळेवर चव्हाट्यावर आणले आहे. त्याने राज ठाकरे यांना मारलेला ‘सॅल्यूट’ हा खरं तर संधीसाधू सत्ताधारी अन पुचाट अधिकार्‍यांविरूध्दच्या तळतळाटाची तीव्र प्रतिक्रिया आहे. राज यांच्याकडे सत्ताही नाही अन् जादूची कांडीही नाही. यामुळे ते चुटकीसरशी पोलीस खात्याच्या समस्या दुर करतील अशी शक्यताही नाही. मात्र सर्व जग हेटाळणी करत असतांना कुणी तरी आपल्या बाजूने बोलते, आपल्या वेदनांवर फुंकर घालते याचे अप्रूप तावडेंच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे जाणवत होते. राज्याच्या कान्याकोपर्‍यात असणार्‍या हजारो तावडेंच्या मनातही हीच भावना असू शकते.

प्रमोद तावडे याने केलेले कृत्य हे सत्ताधार्‍यांना खटकणारे आहे. यामुळे त्याच्यावरील कारवाई अटळ आहे. मात्र एका तावडेने हजारो पोलिसांच्या व्यथेला ‘आवाज’ दिला आहे. ‘खाकी’ ही अमानवी आणि असूर प्रवृत्तीची नसून ती मानवी आहे. तिलाही काही व्यथा-वेदना आहेत याची जाणीव कालच्या घटनेतून आली आहे. यामुळे कालच्या सभेतून राज ठाकरे यांना काही मिळो अथवा नको मिळो…पोलिसांना मात्र दिलासा मिळालाय….याचमुळे खरा हिरो प्रमोद तावडेच ठरला आहे.

छायाचित्र आंतरजालावरून साभार.

*************===============*************================

कुठे गेलेत मराठी अस्मितेचे स्वयंघोषित तारणहार?

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाकडे एक पत्रकार म्हणून तर्क व वास्तववादी भूमिकेतून पाहता या आंदोलनातील अनेक त्रुटी नजरेस पडतात तर सर्वसामान्य नागरिक म्हणून देशात उठलेली लाट चकीत करते. मात्र या दोन विचारांपेक्षाही मला सर्वाधीक रोमांचित करणारी बाब वाटते की या युगप्रवर्तक क्रांतीचे नेतृत्व एका अस्सल मराठी माणसाकडे आहे. अगदी भणंगावस्थेतील अन् कुठल्याशा खेड्यातील अनामिक चेहर्‍यासमान असणार्‍या अण्णा हजारे नामक वादळाने अख्ख्या भारताला कवेत घेतलं. नव्हे अस्वस्थ केलंय. याची दखल मराठी जनांनी मोठ्या उत्साहात घेतली. मात्र मराठी अस्मितेचा उदो उदो करणारे अन् मराठीचे काय होणार या भितीने गळा काढणारे ‘चिंतातूर जंतू’ गेलेत कुठे ? याचा शोध घेऊनही पत्ता लागला नाही.

आपण मारे अभिमानाने ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ अशी टिमकी वाजवतो. मात्र इतिहासातून बाहेर पडल्यास भयाण वास्तवाकडे साहजिक दुर्लक्ष करतो. अल्पकाळ देशावर मराठी वर्चस्व होते हे कुणीही मान्य करेल. मात्र यानंतर देशभरात मराठी जनांविषयीचा आकस लपून राहिला नाही. याला राजकीय क्षेत्रही अपवाद नाही. आजही दिल्लीच्या राजकीय वर्तुळात मराठी राजकारण्यांची प्रतिमा ही दगाबाज म्हणूनच आहे. यामुळे कुणी एक मराठी वरचढ होण्याची चिन्हे दिसतात तमाम गैरमराठी एकत्र होतात. याचा फटका यशवंतराव चव्हाणांपासून शरद पवारांपर्यंत सार्‍यांना बसलाय. यातच देशाचा हिंदी-इंग्रजी मीडियालाही मराठीचा आकस आहे. यामुळेच आसामात हिंदी भाषकांना गोळ्या घातल्या जात असतांना मनसेच्या कार्यकर्त्यांच्या लाठ्या-काठ्या त्यांना मिसाईलपेक्षाही भयंकर भासतात. दाक्षिणात्य राज्यांमधील पराकोटीच्या हिंदीद्वेषापेक्षा त्यांना राज ठाकरे देशद्रोही वाटतात. एकंदरीत पाहता ‘मेनस्ट्रीम मीडिया’त मराठी माणसाची प्रतिमा ही अत्यंत असहिष्णू, भांडकुदळ आणि इतिहासात जगणारा अशी झाली आहे. मात्र याच महाराष्ट्रातून अण्णा हजारे हा फकीर देशातील अत्यंत व्यापक अशा क्रांतीचे नेतृत्व करतोय याचे अप्रूप माझ्यासारख्याला वाटल्यावाचून राहत नाही. मात्र मराठीचे तारणहार म्हणवणारे जेव्हा अण्णांच्या समर्थनार्थ समोर न आल्याने ह्दयात कळ आल्याशिवाय राहत नाही.
महाराष्ट्राने देशाला अनेक नररत्ने दिलीत. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला-क्रीडा अशा कित्येक क्षेत्रांमध्ये मराठी जन अग्रेसर आहेत. शेकडो मराठी जनांना देशात-परदेशात मान्यता मिळाली. मात्र, या सार्‍यांनाही मात देणारा अण्णा हजारे हा अवलिया सध्या संपूर्ण देशाच्या जिव्हाळ्याचा अन् काहीसा कुतुहलाचा विषय झाला आहे. खरं तर अण्णा हजारे यांनी रेटा लावल्याने महाराष्ट्र सरकारने माहितीचा अधिकार अंमलात आणला. यावरून केंद्रानेही हा नियम लागू केला. निव्वळ माहितीच्या अधिकाराचे जनक म्हणून अण्णा अजरामर झाले असते. पण ‘पिकते तिथे विकत नाही’ यानुसार अण्णांची सर्वाधीक हेटाळणी महाराष्ट्रातच झाली. अगदी वाकड्या तोंडाच्या गांधींपासून ब्लॅकमेलरपर्यत त्यांना कित्येक शेलक्या विशेषणांनी हिणवण्यात आले. अण्णांचे ट्रस्ट, यांचे कार्यकर्ते आदींवर संशय व्यक्त करण्यात आला. अगदी ‘जनलोकपाल’ विधेयकावरून या वर्षाच्या एप्रिल महिन्यात ‘जंतरमंतर’वर त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचे जाहीर झाले तेव्हाही बर्‍याच जणांना या चळवळीचे बारा वाजणार अशी खात्री होती. मात्र पहिल्याच फटक्यात महाराष्ट्रातील या फाटक्या माणसाला देशाने डोक्यावर घेतले. अन् आता तर ह्दयाच्या देव्हार्‍यातही स्थान दिले आहे.

अण्णा हजारे यांचा भाबडा आशावाद, ‘जनलोकपाला’तील अनेक तृटी, अण्णांच्या सहकार्‍यांचा हेकेखोरपणा या सार्‍या बाबी गृहीत धरल्या तरी अण्णा हा माणूस आभाळाएवढा वाटतो. कारण त्यांनी आम्हाला आत्मविश्‍वास दिलाय. आत्मविश्‍वास जुलूमी व भ्रष्ट नेत्यांविरूध्द उभा राहण्याचा…आत्मविश्‍वास आपण ही व्यवस्था बदलू शकतो याचा! अन् सर्वात महत्वाची बाब म्हणजे कुणी तरी नि:स्वार्थीपणे देशासाठी सर्वस्व पणाला लावू शकतो याची प्रचिती अण्णांमुळेच आपणास मिळाली. आजवर आपल्या देशात राजकारण, बॉलिवुड वा क्रिकेटसाठीच गर्दी जमू शकते असा समज होता. किंबहुना पुढारी, सिनेनट आणि क्रिकेटपटूंच्या भक्तीखातर देशातील पिढ्यानपिढ्या बरबाद झाल्या आहेत. देशात भ्रष्टाचार, महागाई अन् लाचखोरीचा आगडोंब उसळला असतांना जनतेला राजकारण, सिनेमा वा क्रिकेटच्या माध्यमातून कायम गुंगीत ठेवण्यात आले आहे. मात्र विश्‍वचषक जिंकल्यावर काही दिवसांतच अण्णा हजारे यांनी पहिल्या आंदोलनात विजयाचा उन्माद फिका पाडला. खरं तर तेव्हाच अण्णांच्या रूपात देशाला नवीन स्वप्न मिळाल्याचे संकेत मिळाले होते. आज ती बाब प्रत्यक्षात उतरली आहे.
अण्णांच्या आंदोलनाचा आता अत्यंत सूक्ष्म किस पाडला जातोय. यासाठी लागणार्‍या धनापासून ते विचारापर्यंत परकीय शक्तीचा हात असल्याचा शोध लावण्यात आला आहे. खरं तर भारत हा इतिहासात कधीच एकसंघ देश नव्हता. राष्ट्र,राष्ट्रभक्ती अन् स्वातंत्र्य या बाबी आपण पाश्‍चात्य राष्ट्रांकडून घेतल्या आहेत. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील तमाम मान्यवरांचे प्रेरणास्त्रोत हे अन्य देशांमधील आहेत. यात अगदी फ्रेंच राज्यक्रांती, रशियन क्रांती, ब्रिटीश लोकशाही, चिनी स्वातंत्र्य लढा, अमेरिकेचे स्वातंत्र्ययुध्द, इटालियन स्वातंत्र्य योध्दे, एवढेच नव्हे तर हिटलरसारख्यांनीही भारतीय स्वातंत्र्यलढ्यास बळ दिले ही बाब कुणी नाकारू शकत नाही. यामुळे परकीय विचारांचा मुद्दा बाद ठरतो. अण्णा हजारे यांचे आंदोलन सर्वव्यापी नसल्याचाही आरोप होत आहे. खरं तर आपला स्वातंत्र्यलढाही कोणत्याही टप्प्यावर सर्वव्यापी नव्हता. समाजातील मुठभर स्वातंत्र्य सैनिकांनी देशाला परकीय जोखडातून मुक्त करण्यासाठी आयुष्य वेचले. खुद्द ब्रिटीशांची हाजी हाजी करणारे संस्थानिक, व्यापारी आणि उद्योजकांनीही स्वातंत्र्याची फळे चाखली. सांगायचा मुद्दा असा की, अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची महत्ता कुणी नाकारू शकत नाही. पैसा-अडका, उच्च शिक्षण वा कोणतेही राजकीय पद नसणार्‍या अण्णा हजारेंसोबत आज ‘इंडिया’ आणि ‘भारत’ दोन्ही उभे राहिले आहेत. महाराष्ट्रातील सामान्यजनही त्यांच्यासोबत असल्याचे दिसून आले आहे. मात्र अभिजनांचे काय?

सौ. प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी जाहीर झाल्यावर शिवसेनेने राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात अगदी अभिमानपूर्वक मतदान केले होते. सौ. प्रतिभाताईंना केवळ मराठीच्या मुद्यावरून शिवसेनेने समर्थन दिले. एवढेच नव्हे तर कधी काळी शरदराव पवार वा अन्य कुणी मराठी नेता पंतप्रधान बनण्याची वेळ आल्यास आपण हीच भूमिका घेऊ असे शिवसेनेने वारंवार सांगितले आहे. मात्र आज अण्णा हजारे यांच्या पाठीशी देश उभा राहिल्याचे दिसत असतांनाही शिवसेनेचा ‘मराठी बाणा’ कोठे गेलाय? नाही म्हटल्यास रामलीला मैदानावर खा. संजय राऊत यांनी ‘दूत’ बनून शिष्टाई करण्याचा फुटकळ प्रयत्न केला. बाळासाहेब ठाकरे यांचे पत्र त्यांनी पोहचविले. यात अण्णांच्या सहकार्‍यांना चिमटा घेत त्यांना उपोषण सोडविण्याचे आवाहन करण्यात आले. ही बाब वगळता शिवसेनेने कोणताही ठाम पवित्रा घेतला नाही. इकडे मराठीच्या नावावर टोकाची भूमिका घेऊन त्याचा पुरेपूर राजकीय लाभ उचलणारे राज ठाकरे यांनीही अण्णांनी परप्रांतीयांची घाण साफ करण्याचा सल्ला देत चुप्पी साधली आहे. नुकतीच गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळणार्‍या राजसाहेबांची वाणी अण्णा हजारे नामक महापुरूषासमोर मूक का बनलीय याचा उलगडा झाला नाही. मानलं अण्णांना पाठींबा दिल्याचा राजकीय लाभ होणार नाही. मात्र एक मराठी योध्दा निर्यायक लढाईचे नेतृत्व करत असतांना खुद्द मराठी ह्दयसम्राट गप्प का बसलेत? अगदी कॉंग्रेसचे सरचिटणीस राहूल गांधी यांच्याप्रमाणे राज ठाकरे यांचे मौन हे अनाकलनीय आहे. कदाचित, आपल्यासोबत असणारी तरूणाई अण्णासारख्या कोणतेही वलय नसणार्‍याकडे वळली कशी? याबद्दल त्यांचे मंथन सुरू असावे. या वर्षी जानेवारी महिन्यात बनारस हिंदू विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात अण्णा हजारे यांनी मनसेच्या मराठी अस्मितेचे समर्थन केले होते. यावरून अण्णा हजारेंवर टीकाही करण्यात आली होती. मनसेचे समर्थन करतांना अण्णांनी कोणत्याही परिणामाचा विचार केला नव्हता ही बाब याठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे. अण्णांच्या प्रश्‍नावरून ‘जाणता राजा’ही चुप आहे अन् कॉंग्रेसचे तर विचारायलाच नको. भाजपाने या आंदोलनास ‘हायजॅक’ करण्याचे प्रयत्न केले. मात्र यात ते सफल ठरले नाहीत. असो.

महाराष्ट्रातील राजकीय पक्षांची लाचारी आपण एकवेळेस समजू शकतो. मात्र, खुद्द मराठीचा गजर करणारे लेखक, पत्रकार, कलावंत आदी मंडळीही गप्प आहे. किंबहुना राज्यातील निवडक वर्तमानपत्रांचा अपवाद वगळता अण्णांच्या आंदोलनास ‘सामूहिक उन्माद’ या स्वरूपात सादर करण्यात येत आहे. तमाम मराठी बोरूबहाद्दर अण्णा आणि त्यांच्या सहकार्‍यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यासाठी आपली लेखणी झिजवत आहेत. याहूनही नेभळट भूमिका कलावंतांची आहे. दाक्षिणात्य महानायक रजनीकांत, भोजपुरी सुपरस्टार मनोज तिवारी, बॉलिवुडमधील डझनवारी कलावंत यांच्यासह देशातील अनेक चित्रपट कलावंत अण्णांच्या समर्थनार्थ समोर आले आहेत. मराठी कलावंत मात्र ‘कातडी बचाव’ भूमिकेत आहेत. कदाचित अण्णांना पाठींबा दिल्यास राज्य शासनाकडून मिळणार्‍या अनुदानाचे काय? हा प्रश्‍न त्यांना सतावत असावा. बरं ही पोटार्थी मंडळी वेळ येताच ‘मराठी’चा गजर करण्यास मोकळे! असा हा सगळा खेळ सुरू आहे. साहित्यिक मंडळी तर याहूनही लेचीपेची आहे. सत्ताधार्‍यांच्या विरोधात ब्रदेखील काढण्यास घाबरणारी मंडळी काय डोंबलाचं तेजस्वी साहित्याचे सृजन करणार? हो वेळोवेळी इतिहासाचे गौरवगान करण्याची भाटगिरी मात्र सुरूच राहिल.

पुन्हा पहिल्या मुद्याकडे वळूया. एक पत्रकार म्हणून अण्णांच्या आंदोलनाची इतिश्री कशात होणार? इतिहासात अण्णा आणि त्यांच्या आंदोलनाचे नेमके काय स्थान राहणार? हे आजच सांगणे कठीण आहे. मात्र, माझ्या एका मराठी बांधवाच्या इशार्‍यावर देशातील करोडो जनता पेटून उठली याचा मला सार्थ अभिमान आहे अन् राहील. मराठीच्या नावाने राजकारण आणि व्यापार करणार्‍यांनो अण्णांचे समर्थन न करण्यासाठी आपल्याकडे खूप बहाणे असतील. मात्र तुम्ही कपाळकरंटे आहात. आपल्या स्वभाषी योध्द्याच्या पाठीशी उभे राहण्याची संधी तुम्ही दवडली अन् ‘मराठीच मराठी माणसांचा दुश्मन’ ही ऐतिहासिक परंपराही जपली. अण्णा…राजकारणी तुमच्या सोबत नसतील मात्र मराठी जनता आहेच…मराठी माणूस कधी पंतप्रधान बनणार? मराठी लेखकाला कधी नोबेल मिळणार? आपल्या चित्रपटाला ऑस्कर कधी? सचिनला ‘भारतरत्न कधी? अशा भाकड चर्चा आम्ही पत्रकार सातत्याने करतो. मात्र पंतप्रधानपद, ‘ऑस्कर’,‘नोबल’ वा ‘भारतरत्न’ यांच्यापेक्षाही जनतेचे प्रेम अनमोल असते. अन् याच्यात मोजदाद केली असता आज अण्णा समस्त पद वा पुरस्कारांपेक्षा मोठे आहेत.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या रूपाने सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावल्याचा उल्लेख वारंवार करण्यात येतो. मात्र खुद्द हिमालयच राळेगणसिध्दीसारख्या खेड्यातील एका मंदिरात वास्तव्यास होता याची जाणीव महाराष्ट्राला फार उशीरा झाली. आज या गौरीशंकराकडे समस्त भारतवासी आशास्थान म्हणून पाहताहेत तेव्हा तरी सारे राजकीय वा व्यापारी फायदे-तोटे बाजूला सारून त्यांच्यासोबत उभे राहण्याची गरज आहे. अर्थात आता अण्णांना राजकीय सौदेबाजांची गरजही नाही म्हणा!

(छायाचित्र आंतरजालावरून साभार)

=========================

खान्देश कन्येचा गौरव!

महिला बचत गटांच्या माध्यमातून हजारो महिलांच्या जीवनात आशेचा नवा किरण बनणार्‍या बहादरपूर (ता. पारोळा) येथील निलीमादिदी मिश्रा यांचा ‘रेमन मॅगेसेसे’ पुरस्काराने झालेला गौरव हा समस्त खान्देशवासियांसाठी अत्यानंदाचा क्षण ठरला आहे. या माध्यमातून समाजाच्या तळागाळातील जनतेसाठी झटणार्‍या एका व्यक्तीमत्वाच्या कर्तृत्वाला खर्‍या अर्थाने सलाम करण्यात आला आहे.

राजकारणाप्रमाणेच समाजसेवेतही महिलांचे प्रमाण तसे कमी आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळाल्याने राजकारणात किमान नामधारी का होईना महिलांचा ‘टक्का’ वाढणार आहे. मात्र सामाजिक कार्यात कुटुंबाची साथ असल्याशिवाय कुण्या महिलेने कार्य केल्याचे ऐकिवात नाही.

निलीमादिदी मिश्रा

यातही बहादरपूरसारख्या ग्रामीण भागातील एक तरूणी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी अर्पण करते यावर सहसा कुणाचा विश्‍वास बसणार नाही. मात्र, निलीमादिदींनी हे करून दाखविले. याचाच परिपाक म्हणजे त्यांची किर्ती जगभर गेली. आता ‘मॅगेसेसे’च्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करण्यात आला आहे. कोणत्याही व्यक्तीची महत्ता ही त्याला मिळणारे पुरस्कार अथवा मानसन्मानांवरून ठरते ही खेदजनक बाब आहे. गेल्या सात वर्षांपासून निलीमादिदी अगदी झपाटल्यागत काम करत असतांनाही त्यांच्या कामाला हवी ती प्रसिध्दी मिळाली नाही. किंबहुना, हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचे कार्य किती मोठे आहे याची आपणास जाणीव झाली आहे. मॅगेसेसे पुरस्कारांमध्ये निलीमा मिश्रा यांचे नाव झळकल्यावर बहुतांश जनतेला कोण ही तरूणी? असाच प्रश्‍न पडला. यात जनतेचा काहीही दोष नाही. दिदींनी समाजसेवा करतांना कधीही प्रसिध्दीचा हव्यास केला नाही. एवढेच नव्हे तर समाजाने आपल्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी अशी अपेक्षाही केली नाही. अर्थात शहरी जनतेला कोण निलीमा मिश्रा? हा प्रश्‍न पडला तरी ग्रामीण भागातील हजारो माता-भगिनींच्या ह्दयात मात्र त्या कधीच विराजमान झालेल्या आहेत.

   शहरी महिला या ‘चुल आणि मुल’ या दुष्टचक्रातून बाहेर आल्या असल्या तरी ग्रामीण स्त्रियांच्या नशिबात मात्र अद्यापही हे भोग चुकलेले नाहीत. यात दारिद्ˆयाची भर पडल्यास महिलांचे आयुष्य अक्षरश: नरक बनते. बहादरपूर येथे बालपणापासूनच दिदींनी महिलांची ही केविलवाणी अवस्था पाहिली. यामुळे उच्चशिक्षण घेऊनही संसारात अथवा करियरमध्ये अडकून न पडता त्यांनी समाजातील विषमता दुर करण्यासाठी आपले आयुष्य अर्पण करण्याचा निर्णय घेतला. यासाठी कर्मभूमी म्हणून त्यांनी आपल्याच गावाची निवड केली. यासाठी २००५ साली ‘भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन’ या संस्थेची मुहुर्तमेढ त्यांनी रोवली. प्रारंभी संगणक वर्ग सुरू केल्यावर त्यांनी महिलांना स्वयंरोजगार  मिळवून देण्याचा संकल्प केला. बहुतांश समाजसेवकांना जगात होणार्‍या बदलांचे ज्ञान नसते. मात्र खेडेगावात राहूनही दिदींना जगातील बदलाचे वारे कळत होते. बांगलादेशात महंमद युनुस यांनी बचत गटांच्या माध्यमातून केलेल्या क्रांतीचे त्यांनी डोळसपणे अध्ययन केले. यामुळे अगदी कमी भांडवलात महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करावयाचे असल्यास बचतगटांसारखा मार्ग नसल्याचे त्यांना दिसून आले. केंद्र व राज्य सरकारने बचतगटांना प्राधान्य देण्याआधीच दिदींना या चळवळीचे सामर्थ्य ओळखले होते हे विशेष.

   काही सन्माननीय अपवाद वगळता सामाजिक सुधारणा करणार्‍यांना जगातील घडामोडींचे भान नसते. मात्र निलीमादिदींनी काळाची पाऊले अचूक ओळखली. ग्रामीण भागातील महिलांनी कोणत्याही वस्तूचे उत्पादन केले तरी त्याला बाजारपेठ मिळणार कोठे? हा प्रश्‍नही होता. यातच दिदींनी गोधडीचे उत्पादन करण्याचा निर्णय घेतला. खरं तर आपल्याकडे आता पांढरपेशा मंडळीही गोधडी वापरत नाही. यामुळे गरीबांचे वस्त्र म्हणून ओळखली जाणारी गोधडी विकत घेणार कोण? हा प्रश्‍न उपस्थित झाला. मात्र यथावकाश दिदींच्या सहकारी भगिनींनी केलेल्या गोधड्यांना मागणी वाढली. महानगरांमधून या गोधड्या चक्क युरोप-अमेरिकेत गेल्या. दिदींच्या प्रयत्नांना फळ आले अन् त्यांच्या कार्याची चळवळ व्यापक बनली. आज उत्तर महाराष्ट्रातील सुमारे १८०० बचत गटांचे पालकत्व स्वीकारून दिदींनी जवळपास १६ हजार महिलांना स्वयंरोजगाराचा मार्ग दाखविला आहे.

  आज मॅगेसेसे पुरस्कार मिळाला म्हणून हुरळून न जाता आपण ग्रामीण विकासाच्या मार्गावर मार्गक्रमण करतच राहणार असल्याची दिदींनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया ही अत्यंत बोलकी आहे. त्यांनी ग्रामीण विकासाचे स्वप्न पाहिले आहे. महिलांना स्वत:च्या पायावर उभे करून त्यांनी अर्धा पल्ला तर गाठला आहे. याशिवाय शिक्षण, आरोग्य, सुसंस्कार आदींकडे त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. आपला समाज निर्व्यसनी आणि सुसंस्कृत बनण्यासाठी त्यांनी पाऊले उचलली आहेत. दिदींच्या या कार्यात त्यांना यश मिळेलच याची आम्हाला खात्री आहे. खान्देश कन्येच्या गौरवाने आम्ही मोहरून आणि गहिवरून गेलो आहोत. आमची ही भगिनी येत्या काळात ग्रामीण विकासासाठी भरीव कार्य करेल अन् तिच्यासमोर जगातील तमाम गौरव नतमस्तक होतील यात तिळमात्रही संशय नाही. प्रत्येक पुरस्काराचे काही ना काही महत्व असतेच. ‘मॅगसेसे’ तर ‘आशियाई नोबेल’ म्हणून गणले जाते. दिदींना हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद तर आहेच पण मात्र हजारो महिलांच्या जीवनात उगवलेली पहाट ही या पुरस्काराहून किती तरी श्रेष्ठ आहे. आगामी काळात दिदी याच तडफेने कार्य करतील ही खात्री आहेच. त्यांनी या कार्यात यशाचे शिखर पादाक्रांत करून गावं परिपूर्ण व स्वयंपूर्ण होण्याचं दिदींचं स्वप्न साकार होवो हीच शुभेच्छा!

======================

‘ते’ उपोषण आणि ‘हे’ उपोषण!

एखाद्या विजयी विराच्या थाटात आपले उपोषण सोडणारे अण्णा हजारे वा केविलवाण्या मुद्रेने ज्युस पिणारे रामदेव बाबा यांच्यात सध्या तुलना सुरू आहे. या दोन्ही मान्यवरांपैकी नेमके कोण जिंकले यावरही चर्चा झडत आहे. या गदारोळात हरिद्वार येथील मातृसदन या आश्रमाचे संत निगमानंद यांचा उपोषणात झालेल्या मृत्यूकडे लक्ष देण्यास ना प्रसारमाध्यमांना वेळ आहे ना जनतेला! भारतीय लोकशाहीला लाजविणार्‍या या घटनेमुळे आपल्या समाजाची दुटप्पी भूमिकाही प्रकर्षाने समोर आली आहे.

निगमानंद

अवघ्या दोन महिन्यांपूर्वी नवी दिल्ली येथील ‘जंतरमंतर‘वर अण्णा हजारे यांच्या उपोषणाला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता देशात जणू नवक्रांती अवतरणार असल्याचा बहुतांश भाबड्या जीवांचा समज झाला होता. अर्थात हा ‘मीडिया’चा अतिरेकी उन्माद होता. यामुळे उपोषणाच्या काळात अण्णा हजारे आणि कंपनीच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार्‍या प्रसारमाध्यमांनी नंतर त्यांच्या निंदा-नालस्तीच्या मोहिमेतही याच उत्साहाने भाग घेतला. आता मीडियाला चळ लागलाय तो बाबा रामदेव यांचे आंदोलन कसे फसले याचा शोध घेण्याचा! या गोंधळात हरिद्वार येथील संत निगमानंद यांच्या मृत्यूची, खरं तर हत्त्येची दखल कुणाला घ्यावीशी वाटली नाही ही खेदजनक बाब आहे. निगमानंद यांच्याकडे रामदेव वा हजारे यांच्याप्रमाणे वलय नव्हते. मात्र त्यांनी उचललेला मुद्दा हा दुर्लक्ष करण्याजोगा नव्हता. गंगा नदीच्या पात्रात अवैधरित्या चालणारे स्टोन क्रशर्स आणि या पैशांवर गब्बर होणारे माफिया यांच्या विरोधात निगमानंद यांनी २००८ सालीच उपोषणाचे हत्यार उपसले होते. तब्बल ७३ दिवसांचे उपोषण करून त्यांनी माफियांच्या तोंडचे पाणी पळविले होते. उत्तराखंड सरकारने कारवाई करण्याचे आश्‍वासन देऊन निगमानंद यांचे उपोषण सोडले. मात्र यावर काहीही कार्यवाही न झाल्याने या वर्षी ते पुन्हा उपोषणाला बसले. उपोषणाच्या ६८व्या दिवशी अर्थात २७ एप्रिल २०११ रोजी त्यांना स्थानिक पोलिसांनी अटक करून बळजबरीने रूग्णालयात भरती केले. यावेळी त्यांची काया कमजोर बनली तरी ते शुध्दीवर होते. मात्र २ मे रोजी संशयास्पद पध्दतीने ते ‘कोमा’त गेले. अखेर दोन दिवसांपूर्वी त्यांची प्राणज्योत मालविली. निगमानंद यांना औषधीतून विष देण्याचा आरोप याआधीच करण्यात आला होता. आता त्यांच्या मृत्यूने यावर शिक्कामोर्तब झाले आहे. नुकत्याच आलेल्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार त्यांच्या शरिरात विषाचा अंश सापडला आहे.

बाबा रामदेव ज्या हिमालयन हॉस्पिटलमध्ये भरती होते त्याच्याच एका खोलीत निगमानंद यांच्यावर उपचार सुरू होते. रामदेव यांना भेटण्यासाठी देशातील तमाम संतमंडळी आणि ‘हाय प्रोफाईल’ मंडळींची वर्दळ सुरू होती. मात्र निगमानंद यांच्याकडे पाहण्याला कुणाला वेळ मिळाली नाही. रामदेव यांचा ‘इव्हेंट’ कव्हर करणार्‍यांनाही या गंगापुत्राची दखल घ्यावीशी वाटली नाही. आपले नायक आणि खलनायक घडविण्याची किमया मीडिया करत असतो. यामुळे प्रसारमाध्यमांच्या मर्जीनुसार आपण कुणाला डोक्यावर घेतो तर कुणाला पायदळी तुडवितो. रामदेव अथवा अण्णा हजारे यांचे आंदोलन अगदीच निरर्थक होते असा दावा कुणी करणार नाही. मात्र निगमानंद यांच्या उपोषणाचेही महत्व कमी नव्हते. देशभरातील नदी पात्रांमध्ये वाळू उपसा वा स्टोन क्रशर्सच्या माध्यमातून अंधाधुंद उत्खनन सुरू आहे. यामुळे जीवनवाहिन्या मानल्या जाणार्‍या नद्यांचे व पर्यायाने आपलेच अस्तित्व धोक्यात येणार आहे. खरं तर भ्रष्टाचार, लोकपाल वा काळे धन यांच्या प्रमाणेच हा मुद्दाही अत्यंत महत्वाचा आहे. मात्र अण्णा-बाबांच्या आंदोलनास अतिरेकी प्रसिध्दी तर निगमानंदाची घोर उपेक्षा हे कशाचे प्रतिक आहे?

पर्यावरणवादी आंदोलने हा काहीसा चेष्टेचा विषय बनविण्यात आला आहे. मेधा पाटकरांच्या आंदोलनांचीही अशीच उपेक्षा करण्यात येते. हे आंदोलनकर्ते विकासाचे विरोधक असून परदेशी एजंट असल्याचा प्रचारही सातत्याने करण्यात आला आहे. यामुळे बाबा-अण्णांच्या आंदोलनांना मिळणारे वलय वा प्रसिध्दी निगमानंद यांच्यासारख्यांच्या वाटेला येत नाही. बरं, रामदेव बाबांच्या आंदोलनास ‘हायजॅक’ करणार्‍या व स्वत:च्या नैतिकतेचा टेंभा मिरवणार्‍या भाजपाची सत्ता असणार्‍या राज्यातच एका तरूण आंदोलनकर्त्याची हत्त्या होते ही बाब संतापजनक आहे. याहूनही चिंताजनक बाब म्हणजे ना मीडिया याची दखल घेतोय ना आपण! आता त्यांच्या मृत्यूचेही भांडवल सुरू झाले आहे. देशातील तमाम भगव्या वस्त्रातील मंडळीला ‘आरएसएस’चे एजंट ठरविणार्‍या कॉंग्रेसला आता संत निगमानंद यांचा पुळका आलाय. म्हणे उत्तराखंड सरकारच्या उपेक्षेने त्यांचा जीव गेलाय. इकडे बाबा रामदेवांना डोक्यावर घेणारा भाजपाही कॉंग्रेसवर पलटवार करत आहे. काही दिवसांत हा मुद्दा विस्मरणात जाईल. फक्त काही जणांच्या आठवणीत राहील गंगामातेच्या हितासाठी लढणारा निगमानंद नामाचा निधड्या छातीचा योध्दा आणि त्याची करूण अखेर!

=======================

दुध भेसळखोरांना फाशीच हवी

अपघातात अगदी कुणाचाही जीव घेतला तरी आपल्या देशात वाहन चालक अगदी सहजगत्या जामिनवर सुटतो. अशीच मुजोरी कोट्यवधींच्या जीवनाशी खेळणार्‍या भेसळखोरांची आहे. वाहन अपघाताप्रमाणेच अन्न भेसळीच्या खटल्यांमध्ये शिक्षा होणार्‍यांचे प्रमाण अत्यल्प आहे. या पार्श्‍वभूमीवर, राज्य सरकारने दुधात भेसळ करणार्‍यांना फाशीच्या शिक्षेचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवून दिलासादायक पाऊल उचलले आहे.

महाराष्ट्राच्या दुग्धविकास खात्याचे राज्यमंत्री ना. गुलाबराव देवकर यांनी विधानसभेत अन्नभेसळ प्रतिबंधक कायद्यात दुरूस्ती करून दुधात भेसळ करणार्‍यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात यावी अशी शिफारस राज्य सरकारने केंद्राला केली असल्याची माहिती दिली. दुध भेसळ हा अत्यंत संवेदनशील पण दुर्लक्षित असा विषय आहे. अब्जावधींचे अर्थकारण असणार्‍या दुग्ध व्यवसायात कित्येक वर्षांपासून अपप्रकार होत आहेत. नजीकच्या काळात तर याचे अत्यंत भयावह पैलू समोर आलेत. दुधात पाणी मिसळणे हे पूर्वापार चालत आले आहे. यावरून अनेक विनोद आणि किस्से प्रचलित आहेत. मात्र ‘आता दुधात पाणी चांगले’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. कारण पाण्याची भेसळ ही कुणाच्या जीवावर उठत नव्हती. दुध भेसळीचे नवीन प्रकार मात्र अक्षरश: जीवघेणे आहेत.

दुध घट्ट भासावे म्हणून त्यात स्टार्च वा तांदूळ बारीक करून टाकण्यात येत असे. अर्थात ही भेसळही त्या तुलनेत आरोग्याला घातक नव्हती. मात्र दुधात युरीया मिसळण्याचे प्रकार समोर आल्याने हे प्रकरणी किती गंभीर आहे याची जाणीव झाली. दुधात युरीया मिश्रीत केल्यामुळे ते घट्ट दिसते. यामुळे यात हवे तितके पाणी टाकता येते. मात्र दुधातील युरियाच्या मिश्रणामुळे आरोग्याची मोठ्या प्रमाणात हानी होते. यामुळे मुत्रपिंडासह अन्य विकार हमखास जडण्याची शक्यता असते. अलीकडच्या काळात तर दुधात भेसळ करण्याऐवची ते चक्क कृत्रीम पध्दतीने तयार करण्याचा प्रकार वाढीस लागला आहे. अगदी चमचाभर रसायनाच्या मदतीने १०० लीटर दुध तयार करणेही शक्य आहे. हे दुध युरियामिश्रीत दुधापेक्षाही जीवघेणे असल्याचे निदर्शनास आले आहे. बरं भेसळ ही दुधापुरती मर्यादीत न राहता दुग्धजन्य पदार्थांमध्येही सर्रास होत असते. दिपावलीच्या काळात देशभरात ‘कृत्रीम मावा’ प्रकरण भलतेच गाजले होते. राज्यातही बर्‍याच ठिकाणी या भेसळीविरोधात कारवाई करण्यात आली तरी याचे पुढे काय झाले हे कुणाला समजलेच नाही. याला सर्वस्वी आपले अत्यंत तकलादू कायदेच कारणीभूत होत यात शंकाच नाही.

या पार्श्‍वभूमीवर, राज्य सरकारची अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा कठोर बनवत दुध भेसळखोरांना फाशी देण्याची केलेली शिफारस योग्यच म्हणावी लागेल. अर्थात ही शिफारस आजच अंमलात येणार नाही. केंद्राने अगदी यावर विचार केला तरी याला कायद्याचे स्वरूप प्राप्त होण्यासाठी काही वर्षे लागतील. यातच महाराष्ट्रासह देशातील दुग्ध व्यवसायावर राजकारण्यांची पकड आहे. ते इतक्या कठोर कायद्याची तरतूद करू देणार नाहीत. कायदा झालाच तरी याची अंमलबजावणी होणार का? हादेखील प्रश्‍न आहे. ना. देवकर यांनी विधानसभेत गत दोन वर्षात दुध भेसळ करणार्‍या २७ ठिकाणांवर धाडी टाकल्याची माहिती दिली. आता राज्यात दररोज अक्षरश: हजारो ठिकाणी भेसळ होत असतांना दोन वर्षात फक्त २७ ठिकाणी धाडी टाकणारे संबंधीत खाते हे किती ‘कार्यक्षम’ आहे याची चुणूक दिसते. यामुळे भेसळखोरांना फाशीची तरतूद करण्याची तडफ दाखविणार्‍या राज्य सरकारने हा कायदा झालाच तर याची कठोर अंमलबजावणीही करावी ही अपेक्षा. याचसोबत इतर खाद्य पदार्थांमधील भेसळीला आळा घालण्यासाठीही अशाच प्रकारची तरतूद करण्याची आवश्यकता आहे. चीनसारख्या राष्ट्रांमध्ये भेसळखोरीला सदोष मनुष्य वधासमान मानत दोषींना मृत्यूदंड ठोठावण्याची तरतूद आहे. दुध भेसळखोरीचे भयावह स्वरूप पाहता याची भेसळ करणारांनाही फाशीचीच शिक्षा हवी यात दुमत नसावे.

=======================

बिहार सुधरतोय अन् महाराष्ट्र बिघडतोय!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना केलेल्या जाहीर दमबाजीनंतर राज्यातील पत्रकारविश्‍वात उसळलेली संतापाची लाट यथायोग्यच म्हणावी लागेल. खुद्द उपमुख्यमंत्र्यांच्या या झोटींगशाहीमुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहर्‍याला निश्‍चितच जबर धक्का लागला आहे.

नुकत्याच नांदेड जिल्ह्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीरपणे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर तोंडसुख घेतले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी पत्रकारांना फोडून काढण्याची केलेली भाषा आणि यामुळे चेकाळलेल्या त्यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा हैदोस पाहता आपले राज्य खरेच प्रगतीपथावर आहे हे म्हणणे धाडसाचे ठरेल. अजित पवार हे अत्यंत फटकळ स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या करडेपणाचा फटका बर्‍याचदा विरोधकांसह सहकारी नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अधिकार्‍यांना बसला आहे. खुशमस्कर्‍यांना थारा न देता धडाडीने काम करणारा नेता ही त्यांची दुसरी ओळख आहे. यामुळे काही महिन्यांपूर्वी त्यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्यावर एका कार्यक्षम नेत्याला न्याय मिळाला ही प्रतिक्रिया व्यक्त झाली होती. मात्र काही महिन्यांतच अजित पवार यांच्या उद्दाम स्वभावाचे नवनवीन स्वरूपात दर्शन घडले.

उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान होतांना अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील आमदारांच्या मिळवलेल्या समर्थनाने त्यांचे पक्षांतर्गत विरोधक धास्तावले होते. यानंतरही त्यांनी छगन भुजबळ व आर.आर. पाटील यांच्यासारख्या विरोधकांना नामोहरम करण्याची एकही संधी सोडली नाही. अजितदादांची मुख्यमंत्रीपदाची मनीषा जगापासून लपून राहिलेली नाही. यातच उपमुख्यमंत्रीपद जवळपास हिसकावून आणण्यात यश मिळाल्याने त्यांचा वारू बेभान उधळला आहे. याचीच परिणिती पत्रकारांना फोडून काढण्याच्या भाषेत झाली आहे. सध्या देशभरातील प्रसारमाध्यमे त्यातही बहुतांश वृत्तवाहिन्या अतिरेकी स्वरूपाचे वृत्तांकन करतात हे मान्य करावे लागेल. मीडियाची न्यायाधिशाची भूमिकाही चुकीची आहे. मात्र यासाठी पवार यांनी वापरलेली हिंसक भाषा ही समर्थनीय ठरू शकत नाही.

एका विशाल राज्याचे उपमुख्यमंत्री असणार्‍या अजित पवार यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रश्‍नांना उत्तर देण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. यासाठी त्यांच्याकडे वेळ नसल्यास त्यांनी तसे जाहीर करावे. यामुळे मीडिया त्यांना ‘सतावणार’ नाही. अर्थात असे करणे जवळपास अशक्य आहे. राजकारण आणि पत्रकारिता हे लोकशाहीचे अविभाज्य घटक आहेत. यामुळे उपमुख्यमंत्र्यांच्या तोंडची प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करण्याची भाषा ही अत्यंत निषेधार्ह आणि चुकीची आहे. राज्यात सध्या माफियांचे राज्य असल्यासारख्या घटना घडत आहेत. सरकारी अधिकार्‍यांना दिवसाढवळ्या जाळण्यात येत असतांना राज्याचे मंत्री एकमेकांच्या उखाळ्यापाखळ्या काढण्यात मग्न आहेत. गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांना बातम्या ‘लीक’ करण्याबद्दल आपल्या सहकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले होते. राज्यातील कायदा सुव्यवस्थेची घडी बसविण्याऐवजी गृहमंत्री भलत्याच ठिकाणी लक्ष केंद्रीत करताहेत. अजित पवार आणि आबा पाटील यांच्या असल्या वर्तणुकीने महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लागतोय याचे काय?

नरेंद्र मोदींचा गुजरात जगभरातील लक्षावधी कोटींची गुंतवणूक खेचतोय. नितीशकुमार विकासाच्या मुद्यावर इतिहास घडविताहेत. आपले मंत्री मात्र अंतर्गत लाथाळ्यांसोबत आपल्या उन्मत्त वागुणकीचे दर्शन जगाला घडवताहेत. आजवर राज्यातील कायदा सुव्यवस्थतेवर टीका करतांना विरोधक सातत्याने ‘राज्याचा बिहार होतोय’ हे तुणतुणे लावत असत. मात्र अजित पवारांची दादागिरी आणि नजीकच्या काळातील घटनांचा विचार करता ‘बिहार सुधरतोय अन् महाराष्ट्र बिघडतोय’ असे चित्र दिसून येत आहे. बिहारसारखी नेहमी हेटाळणी होणारी राज्ये प्रगतीपथावर आहेत तर शाहू-फुले-आंबेडकरी विचारांचे वारसदार म्हणवणारे चिथावणीखोर भाषा करताहेत याला काय म्हणावे?

====================

परिवर्तनाच्या लढाईला धक्का

पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांच्या पुतळ्यावरून सुरू असलेले रणकंदन एका नव्या सामाजिक फुटीची नांदी ठरणार का? याचे उत्तर आजच देता येणार नाही. मात्र या प्रकरणाला असणारी राजकारणाची झालर ही अत्यंत संतापजनक बाब मानावी लागेल. या एका प्रकरणामुळे गगनाला भिडणारी महागाई, भ्रेटाचार, लाचखोरी, घोटाळेबाज राजकारणी आदींसह सर्वसामान्यांना सतावणारे अनेक मुद्दे क्षणार्धात गायब झाले अन् राज्यात दुहीचा नवी अध्याय सुरू झाला. या प्रकरणाचे सखोल अवलोकन केल्यावर याच्याआड सुरू असणार्‍या घृणित राजकारणाचे दर्शन झाल्यावाचून राहत नाही.

महाराष्ट्राला ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद नवा नाही. याला शतकापेक्षाही जास्त कालखंडाचा इतिहास आहे. बहुजनांना आलेले आत्मभान हे याच संघर्षाचे फलित. बहुजनांचा अवमान करणार्‍या इतिहासाची पुनर्रचना हीदेखील याच्याशी संबंधित असणारी बाब होय. यामुळे बहुसंख्य मराठी समाज आपल्या इतिहासाकडे अत्यंत डोळसपणे पाहू लागला हे कुणी नाकारू शकत नाही. खरं तर हा परिवर्तनाच्या लढाईचाच भाग आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून राजकारण्यांनी याचा पध्दतशीर वापर करण्यास सुरवात केली अन् या चळवळीचा सत्यानाश झाला. हा संघर्ष मुद्यांवरून गुद्यांवर आला. यामुळे, यातील वैचारिकता जाऊन झोटींगशाहीचा धुमाकूळ सुरू झाला. या संदर्भात गेल्या काही वर्षांमधील घटना अत्यंत सूचक आहेत.

२००४च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती. यावेळी जेम्स लेन यांच्या पुस्तकाचा मुद्दा सत्ताधार्‍यांच्या कामास आला. आर.आर. आबांसारख्या तडफदार नेत्यांनी जेम्स लेनच्या मुसक्या आवळण्याची गर्जना केली. परिणामी, भारनियमनासह अन्य विविध कारणांनी पिचलेल्या मराठी जनांनी पुन्हा एकदा आघाडीच्या पदरात दान टाकलं. आबांना लागलीच उपमुख्यमंत्रीपदाची बढतीदेखील मिळाली. या प्रकरणी लेनच्या माहिती स्त्रोतांवर कारवाई करण्याचे त्यांनी टाळले. नंतर न्यायालयानेही राज्य सरकारची फजिती केली. लेन प्रकरणी सत्ताधार्‍यांना लाभ झाल्यावर लाल महालातील दादोजी कोंडदेव यांच्या पुतळ्याबाबत अचूक ‘मुहूर्त’ साधण्यात आल्याचे दिसून येत आहे.

सध्या राज्य सरकारला विविध समस्यांनी ग्रासले आहे. राज्यातील अनेक दिग्गज राजकारण्याांवर भ्रष्टाचाराचे शिंतोडे उडाले आहेत. खुद्द पवार कुटुंबियांवर ‘लवासा’प्रकरणी संशयाची सुई आहे. या गदारोळाने सरकारची विश्‍वासार्हता पार रसातळाला गेली आहे. या पार्श्‍वभूमीवर, जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी ‘दादोजी’शिवाय चांगला पर्याय शोधूनही सापडला नसता. यामुळे आघाडीची सत्ता असणार्‍या पुणे महापालिकेत दादोजींचा पुतळा हटविण्यात आला. या प्रकरणी विरोधकांनी संयम पाळला असता तर तो त्यांच्या हिताचा होता. मात्र सत्ताधार्‍यांनी फेकलेल्या जाळ्यात विरोधक पुन्हा एकदा अलगद सापडल्याचे दिसून येत आहे.

दादोजी कोंडदेव यांच्या बाजूने लढणार्‍यांना फारसा राजकीय लाभ होणार नाही. किंबहुना नुकसान होण्याची भिती आहे. यामुळे राज्यातील सत्ताधीशांनी जनतेचे लक्ष विचलित तर केलेच पण विरोधकांनाही कोंडित पकडले आहे. दादोजी प्रकरणातील ऐतिहासिक वास्तवाबद्दल होणार्‍या वैचारिक लढ्यास कुणाचा विरोध असू शकत नाही. एक प्रकारे हे समाजाच्या जिवंतपणाचेच लक्षण आहे. मात्र राज्यकर्त्यांनी सामाजिक संघर्षाला हातोहात पळवत भावनेचा रंग दिल्यामुळे हे प्रकरण चिघळलं. दादोजी प्रकरणामुळे पुणे महापालिकेच्या येत्या निवडणुकीसह अन्य ठिकाणी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला भरघोस लाभ होईलच. इकडे विरोधक मात्र शंख बजावण्याशिवाय काहीही करू शकणार नाहीत. एक प्रकारे यातून राज्यकर्त्यांनी अत्यंत धुर्त खेळी करत विरोधकांना वाकुल्या दाखवल्या आहेत. मात्र याद्वारे परिवर्तनाच्या लढाईला जबर धक्का बसला याचे भान कुणालाही नाही.

=======================

चिदंबरमबुवांची भविष्यवाणी

भ्रष्टाचार, महागाई आणि विविध घोटाळ्यांनी केंद्र सरकारची लक्तरे वेशीवर टांगली असतांनाच कॉंग्रेसचे महाअधिवेशन नुकतेच झाले. या आधी ‘विकिलीक्स’या वेबसाईटने राहूल गांधी यांचे हिंदू दहशतवादाबद्दल कथित उद्गार जगजाहीर करून खळबळ उडवून दिली होती. यामुळे या अधिवेशनात हा मुद्दा गाजणार याची चिन्हे दिसत होती. अर्थात कॉंग्रेसी राजपुत्राने स्वत: याविषयावर मौन बाळगत दिग्वीजयसिंह यांच्यासारख्यांकडून आपले विचार वदवून घेतले. एकशे पंचवीस वर्षांच्या इतिहासात गांधी-नेहरू घराण्याच्या पलीकडे न पाहणार्‍या कॉंग्रेसी नेत्यांनी या अधिवेशनात राहूल गांधी यांच्या राज्याभिषेकाची पुरेपूर तयारी केल्याचे जाणवले. गांधी माता-पुत्राची हाजी-हाजी करणार्‍यांच्या गलबल्यात गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आपले ज्योतिषविषयक ज्ञानही पाजळले. भाजपावर प्रहार करतांना त्यांनी येत्या १० वर्षातही ‘आपका नंबर नही आयेगा’ असे सांगत जनता कॉंग्रेसच्याच पाठीशी असल्याचे झोकात नमूद केले.

पी. चिदंबरम हे तसे नेमस्त गृहस्थ. कधी कुणाच्या अध्यात-मध्यात न पडणार्‍या चिदंबरम यांचे पक्षात आणि पक्षाबाहेरही विरोधक फारसे नाहीत. नेहमी बुध्दीमत्तेच्या तेजाने झळकणारा त्यांचा चेहरा मात्र केंद्रीय गृहमंत्रीपदाचा भार आल्यापासून चिंतेने ग्रासल्यागत वाटत आहे. अर्थात भारताचे गृहमंत्रीपद हे काटेरी मुकुटासमानच होय. यामुळे या पदावर काम करणे सहजसोपे नाही. २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर शिवराज पाटील यांच्या जागी चिदंबरम यांची वर्णी लागली तेव्हा देशाला त्यांच्याकडून फार मोठी अपेक्षा होती. मात्र, त्यांनीही सातत्याने शिवराज पाटील यांच्यासमान पुचाट भूमिका घेतली. याचा परिणाम आपण पाहतच आहोत. देशातील निम्म्यापेक्षा जास्त भूभागात नक्षलवाद्यांनी थैमान घातले आहे. दहशतवादी कृत्यांमध्ये जराही घट झाली नाही. असे असतांना गृहमंत्रीपदाच्या माध्यमातून यावर कठोर उपाययोजना करण्याऐवजी चिदंबरम यांनी वाचाळपणाच केला.

वाराणसी स्फोटाबाबत केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी उत्तर प्रदेश सरकारला आधीच धोक्याचा इशारा दिला होता, असे सांगत केंद्राची व पर्यायाने आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्नही केला. राजकीय कारकीर्दीत अशा स्वरूपाची कोलांटउडी अपरिहार्य असली तरी याचे समर्थन कुणी करू शकणार नाही. यातच चिदंबरम महोदयांनी सर्वप्रथम देशाला भगव्या दहशतवादापासून धोका असल्याचे सांगून खळबळ उडवून दिली. याचीच री दिग्वीजयसिंह, राहूल गांधी यांनी ओढली. या अनुषंगाने भगव्या दहशतवादाच्या ताज्या वादाचे जनक हे चिदंबरमच आहे यात दुमत नाही. वास्तविक पाहता कॉंग्रेसच्या महाअधिवेशनात अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा या अत्यंत कळीच्या मुद्यावर ठाम भूमिका स्पष्ट करणे अपेक्षित होते. मात्र यात देशाचे गृहमंत्री सोनिया गांधींना ‘सुपर पीएम’ बनण्याची गळ घालत आरत्या ओवाळतात. राहूलच्या बाळबोध भाषणात त्यांना राजीव गांधींची छवी दिसते. राहूलच्या संभाव्य मंत्रीमंडळात स्थान मिळण्यासाठी ही लाचारी जरूरी असली तरी येणारी तब्बल दहा वर्षे जनता आपल्यासोबत राहणार हा त्यांचा आशावाद म्हणजे विनोदी स्वप्नरंजनच मानावे लागेल.

गगनाला भिडलेल्या महागाईने ‘आम आदमी’ पिचलेला आहे. देशात धर्म आणि भाषेच्या मुद्यावरून फुट पडत आहे. सीमेवरही स्फोटक वातावरण आहे. यामुळे कॉंग्रेस १० वर्षे सत्तेवर राहिल्यास नवनवीन कलमाडी, राजा, राडिया, भूमाफिया मुख्यमंत्री, लाचखोर राजकारणी आणि नोकरशहांशिवाय आपणास काय मिळणार आहे? महागाई आणि भ्रष्टाचारावर मौन बाळगणारे कॉंग्रेसी कथित भगव्या दहशतवादावर तुटून पडत गांधी माता-पुत्राची हुजरेगिरी करत असल्याचे चित्र आज दिसून येत आहे. यात चिदंबरम यांच्यासारखे चांगल्या प्रतिमेचे नेतेही सहभागी होतात ही आपल्या लोकशाहीची शोकांतिकाच मानावी लागेल. अर्थात, काहीही लटपटी खटपटी करून कॉंग्रेसप्रणित सत्ता अबाधित राहण्याची चिदंबरम यांची भविष्यवाणी खरी ठरल्यास काय होणार? याची कल्पनाही न केलेलीच बरी!

==============================

खानचा नेम अन्‌ जनतेचा `गेम’

आपले समाजमन हे अगदी क्षुल्लक कारणावरूनही प्रक्षुब्ध होण्यास वेळ लागत नाही. याला वाह्यात आणि नादान प्रसारमाध्यमांनी खतपाणी घातल्यावर काय होऊ शकते हे ‘खान’ प्रकरणावरून दिसून आले आहे. या वादातून जय आणि पराजयाचे खूप दावे-प्रतिदावे करण्यात आले तरी खरा पराभव मात्र जनता-जनार्दनाचाच झाला. गेल्या आठ-दहा दिवसात अवघ्या देशासाठी खान, त्याचे समर्थक आणि विरोधकांशिवाय दुसरे काही कामच नसल्याचे चित्र रंगविण्यात आले. गगनाला भिडलेली महागाई, बिघडलेली कायदा आणि सुरक्षा व्यवस्था, सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचार, समाजातील विषमता, फुटीर प्रवृत्तींना आलेले उधाण आदींमुळे अवघा देश बेजार झालेला आहे. मात्र या सर्व बाबींवर ‘खान’च्या ‘नायकत्वा’ने मात केली.

दीड शतकापूर्वी कार्ल मार्क्स यांनी धर्म ही अफूची गोळी असल्याचा विचार मांडला होता. आज मार्क्सबाबा भारतात आला तर येथील गोंधळ पाहून तो डोके झोडून घेईल. आज आपल्या देशात धर्मच नव्हे तर जात, पंथ, भाषा, प्रांत, संस्कृती एवढेच नव्हे तर महापुरूषांचे पुतळे वा विचार आदीदेखील अफूच्या गोळ्या बनल्या आहेत. सर्वांनाच पोटभर अन्न न मिळणार्‍या या देशात क्षणार्धात टाळके फिरवणार्‍या अफुचे उदंड पीक जाहले आहे. अगदी एखाद्या खुर्द वा बुद्रुक गावातील लोकांच्या भावना कशाने चिघळतील हे सांगता येत नाही. ‘खान’ प्रकरणाला तर अगदी वैश्विक परिमाण लाभल्याने ते नक्की गाजणार हा अंदाज होता आणि झालेदेखील तसेच. काही वर्षांपूर्वी ‘नेबर्स एन्ही…ओनर्स प्राईड’ ही ओनिडाची जाहिरात झळकली होती तेव्हा आपणास धक्का बसला होता. यातील सैतान चक्क ज्या उत्पादनाची जाहिरात करायची त्याला फोडून टाकतो. ही जाहिरात आणि पर्यायाने उत्पादन असफल ठरणार असा होरा प्रारंभी वर्तविण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात या जाहिरात मोहिमेने इतिहास निर्माण केला. मानवाचा मनोव्यापार असाच अनाकलनीय आहे. बहुतांश प्रसंगी अगदी वाईट मार्गाने मिळणारी प्रसिध्दीदेखील लाभदायक असते. याचमुळे ‘बदनाम ही सही, नाम तो हुवा’, असे म्हटले जाते. आता यावर व्यवसायिकच नव्हे तर राजकीय पोळी शेकण्याची जी प्रथा आलेली आहे ती अत्यंत चिंताजनक अशीच आहे.

वास्तविक पाहता गेल्या काही वर्षांपासून शाहरूखची जादू फिकी पडली आहे. ‘डर’, ‘बाजीगर’ वा ‘दिलवाले…’च्या काळातील त्याचे वलय नाहीसे होत आहे. त्याच्याकडे आमिरसमान निवड कौशल्य व सहजसुंदर अभिनय तसेच सलमानसारखी ‘रफ-टफ’ प्रतिमाही नाही. भरीस भर म्हणजे त्याच्या मालकीच्या ‘नाईट रायडर्स’ या संघाने आयपीएलच्या गेल्या हंगामात अत्यंत सुमार कामगिरी केली आहे. यामुळे ‘माय नेम..’ हा त्याच्यासाठी अस्तित्वाचा प्रश्न होता. यातच कट्टर प्रतिस्पर्धी आमिर खानच्या ‘थ्री इडियटस्‌’च्या अभूतपूर्व यशाने त्याची झोप उडाली नसली तरच नवल! आता खेळाडूंची बोली लावण्याप्रसंगी या बहाद्दराला पाकी खेळाडूंची आठवण झाली नाही. नंतर मात्र त्याने याबाबत पध्दतशीरपणे गळा काढला. शिवसेनेने याला प्रतिकार करताच त्याला चेव चढला. अर्थात यामागे खूप कारणेही होती. पाकिस्तानमध्ये अद्यापही भारतीय चित्रपटांवर अधिकृत बंदी आहे. बॉलिवुडमधील चित्रपटांच्या पायरेटेड डिव्हीडीचा उद्योग तेथेच बहरला आहे. एवढेच नव्हे तर ‘सांँग्ज डॉट पीके’ यासह अनेक पाकिस्तानी वेबसाईटस्‌वरून अगदी प्रदर्शित न झालेल्या हिंदी चित्रपटांची गाणीही मोफत डाऊनलोड करता येतात. यामुळे बॉलिवुडला करोडोंचा फटका बसतो. शाहरूखला या सर्व बाबींची कल्पना निश्चित असणार. मात्र चित्रपटाच्या व अभिनेत्याच्या नावात खान आणि त्याला हिंदुत्ववादी संघटनेचा विरोध…जगभरात मोफत प्रसिध्दीसाठी याहून मोठा फॉर्म्युला कोठे मिळणार!

हिंदी चित्रपटांची बाजारपेठही आता ‘ग्लोबल’ झाली आहे. ‘माय नेम’च्या वितरणाचे हक्क तर ‘ट्वेंटींएथ सेंच्युरी फॉक्स’ या हॉलिवुडच्या विख्यात कंपनीने घेतले आहेत. यामुळे या चित्रपटाचे यश सर्वांचीच गरज होती. यामुळे पाकीप्रेमासोबत शाहरूखच्या मुखातून मुंबईविषयीदेखील मुक्तचिंतन (!) अवतरले. या प्रकरणातून शिवसेनेला राजकीय लाभ होणार हे दिसताच राज्य सरकारने विशेषत: कॉंग्रेसने अगदी ठामपणे शाहरूखची पाठराखण केली. अर्थात त्यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीने तर शिवसेनेला श्रेय मिळू नये म्हणून मनसेनेही रणांगणात उडी घेतली. शरद पवारांची आकस्मिक ‘मातोश्री’ भेट आणि मनसेची शाहरूखप्रकरणी मवाळ भूमिका यामुळे पडद्याआडच्या अभद्र युती आणि आघाडीचे दर्शनही आपणास घडले.

या प्रकरणात सर्वात महत्वाची भूमिका प्रसारमाध्यमे-त्यातही वृत्तवाहिन्यांनी वठवली. जणू आपल्या देशातील सर्वात महत्वाचा प्रश्न हा ‘माय नेम..’च असल्याचे त्यांनी भासविले. दररोज सकाळी ‘सामना’ वाचून त्याचे दिवसभर चर्वण करणार्‍यांना शाहरूख ‘ट्विटर’वर काय सांगतो याचीही भलतीच उत्सुकता लागून होती. त्याच्या लघु संदेशावर तास-अर्ध्या तासांचे कार्यक्रम रंगविण्यात आले. काही वाहिन्यांवर तर शिवसेनेच्या माध्यमातून अवघ्या मराठी जनांवरच असंकुचितपणाचा ठपका मारण्यात आला. सेनेच्या विरोधामुळे अवघे जग शाहरूखला पाहण्यासाठी कसे आसुसलेले आहे हे दर्शवतांना अतिशयोक्तीचा मनमुराद वापर पाहता, हसावे की रडावे हेच समजेनासे झाले. बर्लिन शहरातील एक चित्रपटगृह (तेथे चित्रपट महोत्सव सुरू होता हे या ठिकाणी लक्षात घ्यावे.) पूर्ण भरताच अख्खे युरोपच शाहरूखच्या प्रेमात पडल्याचा साक्षात्कारही काहींना झाला. अखेर काही वाद वगळता, चित्रपट हिट झाला आणि या वाहिन्यांनी काही प्रमाणात उसंत घेतली. पुणे येथील दहशतवादी हल्ल्यानंतर तर हे प्रकरणही मागे पडले.

या सर्व तमाशात कुणी काय मिळवले? क्रमांक एकवर शाहरूख. अफाट प्रसिध्दी व फुकटच्या पोलिस बंदोबस्तामुळे सुमार चित्रपटाला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे तोच बॉलिवुडचा बादशहा असल्याचे सिध्द झाले. क्रमांक दोन कॉंग्रेस. आणिबाणीच्या काळातील ‘आंधी’ आणि ‘किस्सा कुर्सी का’ या चित्रपटांविरूध्द दडपशाहीचा वापर करणार्‍या कॉंग्रेसने यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची टिमकी वाजवून घेतली. आपण धार्मिक आणि भाषक अल्पसंख्यांकांचे रक्षणकर्ते असल्याचेही त्यांनी दाखवून दिले. जनतेचे लक्ष महागाईपासून दुसरीकडे वळविण्यात या प्रकरणाने महत्वाची भूमिका पार पाडली. राहुलजींच्या दौर्‍यापाठोपाठ ‘खान’ प्रकरणातून मुख्यमंत्री चव्हाण यांनी पक्षांतर्गत विरोधकांवर मात केली. इकडे लागोपाठच्या पराजयाने जर्जर झालेली शिवसेना या काळात पुन्हा आपल्या जुन्या रंगामध्ये दिसली. याचा त्यांना काही प्रमाणात तरी लाभ होणार असल्याचे राजकीय निरिक्षकांचे मत आहे. शरदरावांनी बाळासाहेबांना महत्व देऊन केंद्र आणि राज्यातील आपल्या सहकार्‍यांना योग्य तो संदेश दिला. मनसेनेही या प्रकरणी अमिताभ आणि पर्यायाने शिवसेनेवर शरसंधान करण्याची संधी सोडली नाही. मात्र भाजपाची या प्रकरणी पूर्णत: गोची झाली. अर्थात यामुळे युतीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लागले आहे.

जनतेच्या पदरी मात्र भ्रमनिरासाशिवाय काहीही नाही. वृत्तवाहिन्यावरील ‘खान’चा खमंग ‘रिअॅलिटी शो’ आणि त्यानंतर मुद्दामहून त्या चित्रपटाला पाहिल्यावरही सर्वसामान्यांच्या जीवनात फारसा फरक पडला नाही. गेल्या आठवड्यात दुधाच्या भावात प्रति लिटर दोन रूपयांनी वाढ झाली. आता पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसचीही दरवाढ अपेक्षित आहे. दहशतवादी नवनवीन ठिकाणी निष्पाप जनांना मारत आहेत. अर्थात याविरूध्द रस्त्यावर उतरण्यात ना विरोधकांना रस आहे ना सत्ताधार्‍यांना फिकीर! ते तर घेताहेत जनतेच्या भावना भडकावणार्‍या…आपली राजकीय पोळी शेकणार्‍या प्रकरणांचा शोध. राजकारण, सिनेमा आणि क्रिकेट याभोवतीच फिरणार्‍या आपल्या समाजाला कुणीही अगदी साध्या मुद्यावरून मूर्ख बनवतो. या प्रकरणातूनही यापेक्षा वेगळे काही सिध्द झाले नाही.
(प्रसिध्दी दिनांक १८ फेब्रुवारी २०१०)

*******(((——–)))—–*************

शापित शिखर

(28 जून 2009)
micheal

नुकताच काळाच्या पडद्याआड गेलेला पॉप सम्राट मायकेल जॅक्सन याच्या रूपाने संगीतातील एक महान व्यक्तीमत्व लयास गेले आहे. एखाद्याची आपण उपेक्षा करू शकत नाही. मायकेलदेखील याच प्रकारातील होता. त्याला डोक्यावर घेणारे व कडाडून टीका करणारेही खूप होते. त्याच्या अवघ्या 50 वर्षांच्या आयुष्यातील वादग्रस्त घटनांची मालिका पाहिली असता तो फक्त वाह्यातपणाच्या जोरावरच सेलिब्रिटी बनला की काय असा प्रश्न मनात डोकावल्यावाचून राहत नाही. अर्थात एकदा का त्याचे संगीत कानावर पडले की त्याला ‘किंग ऑफ पॉप’ असे का म्हणत होते याची प्रचिती येते. जगभरातील आबालवृध्दांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनलेली डझनवारी गाणी, त्याची अनोखी शैली आणि अक्षरश: शेकडो खर्‍या-खोट्या विक्षिप्तकथा मागे ठेवून हा अवलिया आता चिरनिद्रेत विसावला असला तरी त्याच्या सृजनाच्या माध्यमातून तो जगाच्या कायम स्मरणात राहिल.

मायकेल जॅक्सनच्या कर्तबगारीची ओळख करून घेण्याआधी त्याच्या आधी पॉप संगीत व तत्कालिन अमेरिकन समाज संरचनेची पूर्वपिठीका समजून घ्यावी लागेल. कधीकाळी संगीत हा प्रकार तथाकथित अभिजनांसाठीच होता. सर्वसामान्यांना मात्र लोकसंगीत आणि गीतांवरच समाधान मानावे लागत असे. श्रीमंतांसाठी शास्त्रीय तर गरीबांसाठी लोकसंगीत असा हा प्रकार आपल्याकडेही अस्तित्वात होताच. विसाव्या शतकात अमेरिकेत समस्त जनांसाठी आधुनिक पॉप्युलर अर्थात पॉप संगीत हा प्रकार उदयास आला.साधारणत: याच कालखंडात आपल्याकडे चित्रपटगीतांच्या माध्यमातून पॉप प्रकार रूढ झाला हा एक योगायोगच म्हणावा लागेल. अमेरिकेत प्रारंभी याकडे हेटाळणीच्या नजरेने पाहण्यात आले. नंतर मात्र याला सर्व स्तरातून जोरदार प्रतिसाद मिळाला. रॉक सम्राट एल्विस प्रिस्ले, फ्रँक सिनात्रा व जगविख्यात ‘बीटल्स ग्रुप’ आदींनी पॉप संगीताला नवीन उंची प्रदान केली. त्यांचे संगीत अमेरिकेच्या सीमारेषा ओलांडून जगभर पोहचले. या प्रकारालाही एक सूक्ष्म कंगोरा होता. वरील सर्व दिग्गज हे श्वेतवर्णीय होते. विसाव्या शतकाचे मध्य उलटून गेल्यावरही कृष्णवर्णीयांचे संगीत कुणाच्या खिजगणतीतही नव्हते. याच कालखंडात दि. 28 ऑगस्ट 1958 रोजी गरीब अश्वेत जॅक्सन परिवारात मायकेलचा जन्म झाला. हे कुटुंब तसे संगीतवेडे होते. जोसेफ जॅक्सन यांनी आपल्या मुलांना करड्या शिस्तीत संगीताचे धडे दिले. जॅक्सन भावंडांच्या प्रतिभेच्या किर्तीचा सुगंध हळूहळू दरवळू लागला. त्यांनी विविध सार्वजनिक कार्यक्रमात आपली कला सादर केली. यानंतर त्यांनी एक धाडसी निर्णय घेत ‘जॅक्सन-5’ हा स्वत:चा बँड स्थापित केला. अवघ्या 11 वर्षाचा मायकेलही याचा सदस्य होता. या बँडने संपूर्ण अमेरिकेत ख्याती मिळवली. यातील चुणचुणीत वाटणारा मायकेल सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. त्यांच्या ग्रुपला दूरचित्रवाणीवरही संधी मिळाली. त्यांच्यावर कार्टून मालिकाही काढण्यात आली. जॅक्सन भावंडे पैसा आणि प्रसिध्दीकडे वेगाने प्रवास करत असतानाच, मायकेलने जाणीवपूर्वक स्वत:ची वाट चोखाळली. आपल्या भावंडांसोबत समूहामध्ये यश संपादन केल्यावर त्याने ‘सोलो’ या प्रकारातही उत्तम कामगिरीस सुरवात केली. 1977च्या सुमारास त्याची गाठ क्विन्सी जोन्स या विख्यात संगीतकाराशी पडली. येथूनच त्याच्या कारकीर्दीला नवीन वळण मिळाले. मायकेलमधील गायनाची प्रतिभा तसेच अत्यंत चित्ताकर्षक नृत्यकौशल्यास जोन्स यांनी पैलू पाडले. यातूनच 78 साली ‘ऑफ द वॉल’ हा अल्बम प्रसिध्द झाला. यामुळे रातोरात मायकेल हा संगीत रसिकांच्या गळ्यातला ताईत बनला. असंख्य रसिकांच्या ओठांवर त्याची गाणी पोहचली. याचसोबत त्याच्या नृत्यातील ठेक्यावर लोक बेभान होऊन नाचू लागले.

मायकेलच्या प्रतिभेची भुरळ फक्त तरूणाईलाच पडली नाही. त्याने प्रौढांच्याही ह्दयाला साद घातली. ‘बीटल्स’च्या गारूडावरच जगणार्‍या प्रौढांच्याही जीवनात मायकेलच्या रूपाने ताजी झुळूक अवतरली. त्याची गाणी रसिकांनी तर डोक्यावर घेतलीच पण याला उत्तम व्यावसायिक यशही मिळाली. यानंतर मात्र त्याने कधी मागे वळून पाहिलेच नाही.वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी त्याला मिळालेले वलय ही तर अजून सुरवातच होती. चार वर्षानंतर बाजारात आलेल्या ‘थ्रिलर’ या अल्बमने तो काय चीज आहे हे जगाला दाखवून दिले. त्याने जगभर अक्षरश: धमाल केली. लोकप्रियतेच्या क्रमवारीत हा अल्बम तब्बल 37 आठवडे प्रथम क्रमांकावर राहिला. हा एक विक्रमच होता. यासाठी त्याला तब्बल सात ‘ग्रॅमी अॅवॉर्डस्’ प्रदान करण्यात आले. त्याला एकूण 15 ‘ग्रॅमी’ मिळालेत. 25व्या वर्षीच त्याला ‘जिवंतपणीची दंतकथा’ बनण्याचे भाग्य लाभले. हा त्याच्या कारकीर्दीचा परमोच्च बिंदू होता. 84 साली ‘पेप्सी’ची जाहिरात करताना चेहरा भाजल्याने त्याच्या कारकीर्दीवरच प्रश्नचिन्ह लागले. मात्र त्याने यातूनही भरारी घेतली. यानंतर त्याचे ‘बॅड’ व ‘डेंजरस’ या अल्बमचे तुलनेत थंड स्वागत झाले. नव्वदच्या दशकात तो वारंवार वादाच्या भोवर्‍यात सापडला. आता त्याच्या मृत्यूने हे वादळ कायमचे शमले आहे.

गायक, संगीत दिग्दर्शक, गीतकार आणि अर्थातच नर्तक म्हणून मायकेलची महत्ता वादातीत होती. विशेषत: त्याची नृत्यशैली अत्यंत चित्ताकर्षक आणि अफलातून अशीच होती. डोक्यावरील हॅट व खूप बटणे असणारे जॅकेट ही त्याचे आवडती फॅशन जगभरातील तरूणाईने लागलीच आत्मसात केली. एखाद्या कसलेल्या जिम्नॅस्टलाही लाजविणारा त्याचा ‘ब्रेक डान्स’ही अमाप लोकप्रिय झाला. हातात गिटार अथवा की-बोर्डवर बसणारे पॉपस्टार्स जगाने पाहिले होते. काही नृत्यप्रविणही असले तरी मायकेलने खर्‍या अर्थाने ‘डान्सिंग स्टार’ हा प्रकार रूढ केला. त्याच्या यशात केबल टिव्हीसारख्या अत्याधुनिक माध्यमाचाही निश्चितच हात होता. ऐशीच्या दशकात अमेरिकेत उपग्रह वाहिन्या लोकप्रिय झाल्या. प्रारंभी एमटीव्ही हा कोणत्याच कृष्णवर्णीय गायकाला संधी देत नसे. मात्र मायकेलची प्रतिभा पाहून त्याचा शो आयोजित करण्यात आला. याला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून नंतर एमटीव्ही आणि मायकेल जॅक्सन हे अभिन्न समीकरण बनले. त्याने जगभरातील महत्वाच्या शहरांमध्ये केलेले दौरेही तुफान गाजले. तारूण्याच्या ऐन भरातच पैसा अन् प्रसिध्दीच्या शिखरावर स्वार झालेल्या मायकेलच्या वैयक्तिक जीवनातील विक्षिप्तपणाला काही अंशी विकृत असणार्‍या प्रसारमाध्यमांनी अजूनच रंगविले. यशाच्या शिखरावर असतानाही तो जणूकाही एखादे शापित जीवन जगला. त्याच्या जीवनाला एक गूढ वलय प्राप्त झाले. आता त्याच्या मृत्यूच्या रहस्याचे होणारे चर्वणही त्याच्या लौकिकाला साजेसेच म्हणावे लागेल.

मायकेलच्या चाहत्यांनी तर त्याला कधीच दैवताचे स्वरूप बहाल केले आहे. मात्र खरा मायकेल कोण? याचे उत्तर सहजसोपे नाही. धर्म,भाषा, संस्कृती आणि वंशाच्या भिंती उद्ध्वस्त करून आपल्या उत्तुंग प्रतिभेने ठेका धरायला लावणार्‍या या किमयागाराला स्वत:च्या कातडीच्या रंगाचा खूप न्यूनगंड वाटत असे. त्याने आपल्या चेहर्‍याची वारंवार कॉस्मेटीक सर्जरी करून केलेली दैना ही काहीशी चेष्टेचाच विषय बनली. संपूर्ण विश्वात नावलौकिक असतानाही त्याला सातत्याने ‘आयडेंटिटी क्रायसिस’ सतावत असे. यातूनच त्याने धर्मांतर केले. याशिवाय, समलैगिकता, अंमली पदार्थांचे सेवन, बालकांचे कथित शोषण, आपल्या मुलाला गॅलरीतून खाली फेकण्याचा केलेला आविर्भाव यामुळे एक सनकी म्हणून त्याची प्रसिध्दी झाली. त्याने पूर्वायुष्यात गरीबी, शिखरावर असताना समृध्दी तर शेवटच्या काळात कर्जबाजारीपणाही अनुभवला. त्याला जवळून ओळखणार्‍यांच्या मते मात्र तो एखाद्या बालकाप्रमाणेच निरागस होता. आपल्या अवाढव्य प्रासादासमान घरात ‘अॅम्युझमेंट पार्क’ उभारण्याच्या चक्रमपणावर त्याचे उत्तर कुणालाही स्तब्ध करेल असेच होते. रोजीरोटीच्या रगाड्यात आपण कधी बालपण उपभोगलेच नाही म्हणून अक्षरश: गलबलणारा मायकेलही जगाने पाहिला आहे. त्याने आपल्या बर्‍याच कार्यक्रमांचा पैसा हा गरीब राष्ट्रांना दान केला. कारकीर्दीच्या उत्तरार्धात प्रसिध्दीच्या हव्यासापोटी वाट्टेल ते करण्याचे आरोप त्याच्यावर करण्यात आले. अर्थात याला बर्‍याच प्रमाणात वलयांकित लोकांच्या खासगी आयुष्याची लक्तरे वेशीवर टांगण्यासाठी वखवखलेल्या मिडीयाचाही मोठा हात होता. या सर्व बाबींचा विचार करता स्टेजवरील आणि प्रत्यक्ष रूपातील मायकेल याची सांगड घालण्याचा कुणी प्रयत्न करू नये हेच उत्तम.
सूर, ताल आणि लयीची विलक्षण समज; अत्यंत समर्पक गीतरचना आणि अर्थातच विद्युल्लतेप्रमाणे दीपवणारे नृत्य आता फक्त व्हिडीओ चित्रीकरण आणि स्मृतींमध्ये उरणार! मायकेलच्या रूपाने संगीत क्षेत्रातील एका चैतन्याचा अंत झालाय हे मात्र निश्चित. या पॉप सम्राटाला मानाचा मुजरा!

***********()()()())()()()()()0000000000————–

भाईगिरीला नवी ‘मान्यता’


sanjay

रूपेरी पडद्यावरील गुलछबू व सर्वगुणसंपन्न कलावंत हे प्रत्यक्ष आयुष्यातही असेच असते तर किती बरे झाले असते! काही क्षणांकरता आपणास स्वप्नांच्या जगाची मुशाफिरी घडविणारे अभिनेते हे त्यांच्या आभासी प्रतिमेप्रमाणेच आदर्श नेते बनले असते तर देशातील सर्व समस्या चुटकीसरशी संपल्या असत्या. प्रत्यक्षात मात्र ही बाब अशक्य असल्याचेच आजवर दिसून आले आहे. अत्यंत गोंडस मुखवट्यांमागचे घृणास्पद चेहरे आपणास वारंवार दिसले आहेत. विख्यात अभिनेता संजय दत्त याच्या प्रकरणातून हीच बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ असणार्‍या संजुबाबाची संसदेत जाण्याची लज्जास्पद धडपड आणि अमरसिंग व मुलायमसिंग यादव यांचा यासाठीचा आटापिटा पाहिल्यावर आपल्या राजकारणाचे वारे कोणत्या दिशेला वाहत आहेत याचे भेदक दर्शन होते. सुदैवाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या दणक्यामुळे संजयचे खासदार बनण्याचे स्वप्न भंग पावले असले तरी समाजवादी पक्षाने त्याला राष्ट्रीय सरचिटणीस पद बहाल करून आपली वैचारिक (?) दिवाळखोरी पुन्हा एकदा जाहीर केली आहे.

कोणत्याही लोकशाही प्रणालीत समाजाच्या सर्व स्तरातील घटक हे निवडणुकीच्या रणांगणात कौल मागू शकतात. परिणामी, देशातील विविध वलयांकित व्यक्तींना संसदेत जाण्याची इच्छा झाल्यास ती गैर नव्हे. अशा सेलिब्रिटीजला राज्यसभेतही काही जागा आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून थेट निवडणुकीच्या मार्गानेच संसद अथवा विधिमंडळात जाण्याकडे या मंडळीचा कल वाढला आहे. याला सर्वस्वी विविध राजकीय पक्षांचा आपमतलबीपणाच कारणीभूत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रारंभीच्या काही काळात तर विविध राजकीय नेत्यांनाच देशभरात नायकाचा दर्जा मिळाला. यामुळे पडद्यावरील नायकांनी राजकारणात येण्याची टाळले तरी दक्षिणेत मात्र कलावंतांनी आपल्या कारकीर्दीसोबतच राजकारणाचा श्रीगणेशा केला होता. एम.जी. रामचंद्रन हा दिग्गज अभिनेता आणि एम. करूणानिधी हा पटकथाकार हे द्रविड चळवळीचे खंदे समर्थक बनले. पुढे दोन्ंही जण तामिळनाडूचे मुख्यमंत्रीही बनले. त्यांचा हा वारसा जानकी रामचंद्रन, जयललिता आणि विजयकांत यांनी चालविला. खर्‍या अर्थाने मात्र नव्वदच्या दशकाच्या सुरवातीपासून चित्रपट कलावंत मोठ्या प्रमाणात राजकारणात आले. आंध्रात एन.टी. रामाराव यांनी तेलगू अस्मितेला साद घालत सत्तेचे सिंहासन मिळवले. आज चिरंजीवीही याच मुद्द्यावर मतदानाचा जोगवा मागत आहे. उत्तरेत अमिताभच्या माध्यमातून कॉंग्रेसने हेमवतीनंदन बहुगुणा यांचा पाडाव केला तरी या महानायकाला राजकीय हवा मानवली नाही. नव्वदच्या दशकात तर सर्वच पक्षांना वलयांकित चेहर्‍यांची आवश्यकता भासू लागली तरी समाजवादी पक्षाने याबाबत सर्वांवर मात केली. देशातील तमाम दिग्गज कलावंतांना लोकसभा अथवा राज्यसभेवर पाठवत त्यांनी आपल्या पक्षाचा चेहरा ग्लॅमरस केला. याच पक्षाने काही संशयास्पद पार्श्वभूमि असणार्‍यांनाही संधी दिली. हे सर्व होत असताना जाती-पातीच्या आधाराने हा पक्ष सातत्याने वाढला आहे.

या यशाने उन्मत्त झालेल्या सपा नेत्यांनी काही दिवसांपूर्वी लखनौ लोकभा मतदारसंघातून मुन्नाभाईला उतरवण्याचे ठरविताच देशभर वावटळ उठणे तसे स्वाभाविक होते. गेल्यावेळी येथून अटलबिहारी वाजपेयी निवडून गेले होते. यावेळी प्रकृतीच्या कारणास्तव ते निवडणूक लढविणार नसल्याचे काही महिन्यांपूर्वीच जाहीर करण्यात आले होते. संजय दत्तच्या उमेदवारीच्या दाव्यानंतर हा मतदारसंघ पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला. अर्थात अटलजी जर उमेदवार असतील तर आपण माघार घेऊ अशी मखलाशी करण्यास तो विसरला नाही. काही दिवसांपासून त्याने हा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरवात केली होती. यात अमरसिंग आणि त्याने बर्‍याच प्रमाणात अकलेचे तारे तोडले. संजूबाबाने तर आपल्या बहिणीवरही शरसंधान करण्यास पुढे मागे पाहिले नाही. आपल्या घरातील कलह चव्हाट्यावर मांडताना त्याने आपल्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा जराही विचार केला नाही. दत्त घराण्याचा राजकीय वारसा हा बहीण प्रिया हिला कसा मिळाला? ही त्याची पोटदुखी असल्याचे यातून दिसून आले. वास्तविक पाहता संजूबाबाचा इतिहास हा फार काही चांगला नाही. आई-वडलांच्या पुण्याईने त्याला लवकरच बॉलिवुडमध्ये संधी मिळाली असली तरी त्याने कारकीर्दीकडे कधी गंभीरतेने पाहिलेच नाही. तारूण्यात तर बिघडलेले धनिक बाळ हीच त्याची प्रतिमा होती. यामुळे काही अपवाद वगळता, तो चित्रपटात सुरवातीच्या काळात काहीच दिवे लावू शकला नाही. तो अंमली पदार्थांच्या आहारीदेखील गेला. याच काळात मुंबई बॉंबस्फोटातील सहभागाच्या आरोपाखाली त्याला अटक झाली. खरं पाहता, ‘टाडा’ नियमाच्या तरतुदीनुसार तो तुरूंगातून सुटू शकत नव्हता. याप्रसंगी सुनील दत्त यांनी ‘मातोश्री’वर हजेरी लावताच चमत्कार घडला. हिंदू ह्दयसम्राटांना संजुबाबा हा चक्क उगवता तारा वाटू लागला. यामुळे अवाक् झालेल्या जनतेला याचे रहस्य लवकरच उलगडले. 1996च्या लोकसभा निवडणुकीत दत्तसाहेबांनी उमेदवारी केली नाही अन् त्यांच्या मतदारसंघातून शिवसेनेचा खासदार निवडून आला. दत्तसाहेबांच्या अपत्यप्रेमाची त्यावेळी चांगलीच चर्चा रंगली होती. यथावकाश संजय हा चित्रपटसृष्टीत स्थिरावला. ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस.’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’च्या नेत्रदीपक यशाने त्याला अभूतपूर्व ख्याती मिळताच त्याची सर्व पापे जणू काही धुतली गेली असे मानले जाऊ लागले. याच कालखंडात मुंबई बॉबस्फोट प्रकरणी त्याला सहा वर्षाची शिक्षा झाली यानंतर तो जामिनावर सुटला तरी त्याच्या कौतुकाचे पुराण काही कमी झालेच नाही. एक प्रकारे हे आपल्या घसरलेल्या नैतिकतेचे उदाहरणच बनले. दरम्यान, दत्तसाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांचा राजकीय वारसा न मिळाल्याने बिथरलेल्या संजयने मान्यताशी केलेल्या विवाहात कुटुंबियांनाही सहभागी केले नाही. यानंतर त्याची राजकीय महत्वाकांक्षा अमरसिंगसारख्या कुटील नेत्याच्या लक्षात येताच त्यांनी आपला डाव साधला.

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाला बसपाचे कडवे आव्हान आहे. यातच काही दिवसांपूर्वी बाबरी प्रकरणी संशयास्पद भूमिका घेणारे कल्याण सिंग यांना सपाने आपल्या पक्षात सहभागी करताच,उत्तर प्रदेशातील मुस्लिमांमध्ये अस्वस्थता पसरली. हा समुदाय सपाचा मुख्य आधारस्तंभ असून त्यांच्यातील चलबिचलमुळे मुलायम-अमर ही जोडगोळी चिंताग्रस्त होणे तसे स्वाभाविक होते. याचमुळे संजयसारखा मोहरा हाती आल्यावर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आनंदाच्या भरात त्यांनी न्यायालयीन आदेशाची पर्वा न करता लखनौमधून संजयची उमेदवारी जाहीर केली. प्रसारमाध्यमांनीही त्याला नको तेवढे उचलून धरले. काही वाहिन्यांनी तर जणू काही खराखुरा मुन्नाभाई देशसेवेसाठी संसदेत जाणार असल्याचे चित्र रंगवले. मात्र या मनोरथांवर सर्वोच्च न्यायालयाने नि:स्पृहतेने पाणी फिरवले आहे. खरं तर, ही आपल्या वलयाचा गैर पध्दतीने लाभ घेणार्‍या पुंडांना मोठी चपराक आहे. कायद्यासमोर सर्व जण समान असल्याचेही याने सिध्द झाले. या निर्णयाने संसदेची मानमर्यादा कायम राहिली असली तरी आगामी काळात संजुबाबासारख्या प्रवृत्तींना संसदेत जाण्यापासून रोखण्यासाठी व्यापक स्वरूपाची तरतूद हवी. न्यायदेवतेने संजय दत्तला निवडणूक लढविण्यापासून थांबविले तरी समाजवादी पक्षाने त्याला राष्ट्रीय सरचिटणीस बनवून या निर्णयाची बूज राखली नाही. त्याने न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर सातत्याने कॉंग्रेसला लक्ष्य केल्याचेच हे पारितोषिक असल्याची जगजाहीर आहे. या पदामुळे चेकाळलेल्या संजयने कॉंग्रेससह विरोधकांवर टीकेचे तिखट हल्ले केले आहेत. कॉंग्रेस पक्ष, संजय निरूपम, केंद्रिय कायदेमंत्री भारद्वाज आणि मायावतींना त्याने टार्गेट केले आहे. यात त्याने आपल्या पित्याच्या मृत्यूचेही भांडवल केले. त्याचे वाक्बाण हे अगदीच बालिश आणि अपरिपक्व या श्रेणीतील असले तरी सपाला यामुळे मिळणारी फुकट प्रसिध्द हवीच आहे. आगामी काळात चित्रपट सोडून आपल्या दावणीला बांधण्यासाठी त्यांना एक हक्काचा सेलिब्रिटी मिळाला आहे. अर्थात हा सौदा दोघांसाठी लाभाचाच आहे. संजय दत्तच्या गतायुष्यातील चुकांचे परिमार्जन(!) करण्याची त्याला आयती संधी मिळाली आहे. इकडे सपा यातून राजकीय लाभ उठवण्याच्या प्रयत्नात आहे. या तमाशाला टीआरपीसाठी टपलेल्या वाहिन्या चांगलेच उचलून धरत आहेत. एकंदरीत पाहता मुन्नाभाईच्या उल्लुगिरीला न्यायालयाने झिडकारले असले तरी संधीसाधू राजकारणी आणि उथळ प्रसारमाध्यांनी त्याला नायकत्व केव्हाच प्रदान केले आहे. अर्थात या दोघांचा जनसामान्यांवरील पगडा पाहता काही दिवसातच लोकांनाही त्याच्यातील गुणांचा साक्षात्कार होईल. अर्थात गतकाळात ‘मातोश्री’वासींना खूप काही मिळाले तसेच भविष्यात अमर-मुलायम आणि वाहिन्यांच्या पदरात बरेच काही पडणार असले तरी जनतेच्या नशिबात भ्रमनिरासाशिवाय काहीही नसेल हे निश्चित!

(प्रसिध्दी दिनांक 5 एप्रिल 2009)
====================================================

भारतरत्न, बुश आणि बालिशपणा

कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रवक्ता हा अत्यंत चतुराईने बोलणारा असावा असे अपेक्षित असते. अर्थात वाक्चातुर्य आणि वाचाळपणा यांच्यातील सीमारेषा अत्यंत पुसट असते. चुरचुरीत बोलण्याच्या हव्यासापायी बर्‍याचदा भलताच घोटाळा होत असतो. या संदर्भात स्व. प्रमोद महाजन, सुषमा स्वराज, अमरसिंग, अंबिका सोनी, वेंकय्या नायडू आदी प्रभृतींनी वेळोवेळी ओढावून घेतलेले वाद आपल्या स्मरणात असतीलच. आता कॉंग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांचे नाव या मान्यवरांच्या यादीत दाखल झाले आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश महोदयांना भारतरत्न या आपल्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी अचाट शिफारस करून त्यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. प्रथेप्रमाणे कॉंग्रेसने या प्रकरणात हात झटकले तर सिंघवी यांनीही सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणातून काहीही साध्य होणार नसले तरी सिंघवी यांनी एका नव्या वादाला जन्म दिला आहे. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बुश यांच्यावर ‘भारत मित्र’ म्हणून स्तुतीसुमने उधळली होती. आता त्यांना भारतरत्न द्यावे अशी जाहीर शिफारस त्यांच्या सहकार्‍याने करावी यात काही दुवा असेलच असे नाही. परंतु यामुळे बुश यांचे तथाकथित भारत प्रेम आणि भारतरत्न याविषयी नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

आपल्या देशातील सर्वोच्च बहुमान म्हणजेच भारतरत्न होय. कला, साहित्य, संस्कृती, विज्ञान-तंत्रज्ञान तसेच देशसेवेत मापदंड प्रस्थापित करणार्‍यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार असल्याचे नमूद करत, देशाचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी 2 जानेवारी 1954 रोजी या पुरस्काराची घोषणा केली होती. आजवर 41 महनीय व्यक्तींना हा बहुमान देण्यात आलेला आहे. भारतरत्न हा पुरस्कार सुरू करताना देशहिताचे सर्वोच्च कार्य करणार्‍यांना सन्मानित करावे हाच विचार होता. प्रारंभी हा पुरस्कार फक्त जीवित व्यक्तीलाच द्यावा असे ठरविण्यात आले तरी यात दोन वर्षांनीच बदल करण्यात आला. असे असूनही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले नाही. याशिवाय, सरदार पटेल, डॉ. बाबासोहब आंबेडकर व जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या महान नेत्यांना हा गौरव मरणोत्तर पण फार उशीरा मिळाला. नेताजी बोस यांच्या कुटुंबियांनी तर हा पुरस्कारच नाकारला. मध्यंतरी, यावर राजकारणाची गडद छाया पडल्याने हा पुरस्कार बंद करावा अशी मागणी करण्यात आली होती. कित्येक वर्षांच्या विरामानंतर पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न जाहीर झाले. आता सिंघवी यांनी बुश यांना हा सन्मान द्यावा अशी जोरदार शिफारस केल्याने आता हा पुन्हा एकदा वादग्रस्त विषय बनला आहे. विद्यमान नियमानुसार परदेशी नागरिकाला हा पुरस्कार मिळू शकतो. सरहद्द गांधी (खान अब्दुल गफ्फार खान) आणि नेल्सन मंडेला या दोन विदेशी प्रभृतींना भारतरत्न मिळाल्याने बुश यांना तशी कायदेशीर अडचण काहीच नाही. यातच काही अडचण आल्यास, सर्वातोपरी मदत करण्यासाठी सिंघवी यांच्यातील विधीज्ञ धावून येणार असल्याची खुली ऑफर त्यांनी दिलीच आहे. बुश यांनी असे कोणते महान कार्य केले की ज्यामुळे त्यांना भारतरत्न द्यावे? या प्रश्नाचे सिंघवी यांनी दिलेले अफलातून उत्तरही अत्यंत हास्यास्पद आहे.

अमेरिकेत बराक हुसेन ओबामा यांनी सत्तेची सूत्रे हाती घेऊन काही काळच झाला असला तरी माजी राष्ट्राध्यक्ष बुश यांच्या कारकीर्दीची चिरफाड करण्याचे कार्य वेगाने सुरू आहे. इराक-अफगाणिस्तानातील अत्याचारांसह जगभरात दादागिरी करणार्‍या बुश यांच्या पक्षाला अमेरिकन मतदारांनी साफ नाकारले. नुकत्याच करण्यात आलेल्या जनमत चाचण्यांमध्ये तर बुश यांना युध्दखोर ठरवून त्यांच्यावर खटला भरावा अशी प्रबळ भावनाही व्यक्त झाली. बुश प्रशासनाच्या ‘जगाचा फौजदार’ या अहंमान्यतेतून राबविण्यात आलेल्या परराष्ट्र धोरणाचाही आता खरपूस समाचार घेण्यात आला आहे. त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळेच अमेरिकेची जगभर प्रतिमा खराब तर झालीच पण, अर्थव्यवस्थाही कोलमडून पडल्याचा आरोप करण्यात येत आहे. ओबामा यांना जनतेचा मिळालेला पाठिंबा हा बुशनितीविषयी उद्रेकाचा परिपाक असल्याचे जगातील तमाम राजकीय निरीक्षकांचे मत आहे. लक्षणीय बाब म्हणजे बुश यांना देशातच नव्हे तर जगभरही प्रखर विरोध झाला आहे. मुंतजार अल झैदी या इराकी पत्रकाराने त्यांना दिलेल्या जोड्याच्या ‘प्रसादा’नंतर जगभरात विशेषत: अरब भागात जी हर्षोल्हासाची लाट उसळली ती पाहता, बुश यांची अप्रियता सहज दिसून येते. मानवतेच्या रक्षणाची जबाबदारी आपलीच असल्याच्या भावनेतून जगातील बर्‍याचशा राष्ट्रांच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करण्याचे पातक ज्या बुश यांनी केले त्यांची वकिली करताना सिंघवींनी दिलेली कारणेही तकलादूच आहेत.

अमेरिका आणि भारत यांच्यातील आजवरचे संबंध तसे फारसे मधुर राहिलेले नाहीत. शीतयुध्दकालीन कालखंडात भारताची सोव्हिएत संघाशी असलेल्या सलगीमुळे आपण अमेरिकेच्या शत्रूराष्ट्रांच्या यादीत होतो. याचमुळे 1971च्या भारत-पाक युध्दात अमेरिकेने बंगालच्या उपसागरात आपले सातवे आरमार आणून दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. 90च्या दशकातील उदारीकरणानंतर ही परिस्थिती बदलली. भारत एक आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येऊ लागला. पोखरणच्या अणुचाचणीनंतर अमेरिकेने लादलेले निर्बंध आपण झुगारून दिले. यानंतर बदलत्या वातावरणात दोन्ही देश निकट आले तरी तथाकथित दहशतवादाविरूध्दच्या लढाईत अमेरिकेने पाकचीच तळी उचलून धरली. या पार्श्वभूमिवर, बुश यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कालखंडात भारत-अमेरिका मैत्रीचे एक नवीन पर्व सुरू झाल्याचे सिंघवी यांचे म्हणणे आहे. 60 वर्षाच्या इतिहासात प्रथमच भारत-अमेरिका संबंध शिखरावर पोहचले आहे. याचे सर्वात मोठे प्रतिक अणुकरार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे. खरं पाहता अणुकरारात अमेरिकन दादागिरीचाच मोठा वाटा आहे. या करारामुळे अनेक अमेरिकन कंपन्यांचा लाभ होणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे……असे असूनही बुश हे भारतवासियांसाठी आजवरचे सर्वात उत्तम अमेरिकन राष्ट्राध्यक्ष असल्याचा साक्षात्कार सिंघवी यांना व्हावा याचे रहस्य आहे तरी काय?

जगभरातील विविध पुरस्कारांमध्ये ‘लॉबिंग’ हा अत्यंत महत्वाचा भाग असतो. अगदी नोबेल, ऑस्कर व बुकरचाही हा अविभाज्य घटक आहे. आपल्या देशातही प्रस्ताव पाठविण्यापासून ते पुरस्कार मिळेपर्यंत बर्‍याच ठिकाणी ‘आधार’ घेतला जातो. याची जाहीर वाच्यता होत नसली तरी सुज्ञास याचे आकलन होत असते. असे असूनही भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराच्या निवडीमध्ये बर्‍याच प्रमाणात काटेकोरपणा राखण्यात आली ही सुदैवाची बाब होय. गेल्या काही दिवसांपासून मात्र अमुक एकाला हा पुरस्कार द्यावा अशी जाहीर मागणी करण्याची प्रथा रूढ झाली आहे. भारतरत्नाची निवड ही एखादा पाचकळ ‘रिअॅलिटी शो’ नाही. ‘एसएमएस’चे मतदान आणि तथाकथित तज्ज्ञांचा हा गोलमाल खेळही नव्हे. काही वर्षांपूर्वी बसपा नेत्या मायावती यांनी त्यांचे नेते कांशिराम यांना भारतरत्न द्यावे अशी जाहीर मागणी केली होती. यानंतर या यादीत माजी पंतप्रधान वाजपेयी, सचिन तेंडुलकर यांची नावे आली. आता तर ही यादी हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढतच आहे. ही सर्व नावे आदरणीय आणि या पुरस्काराच्या तोलामोलाची असली तरी भारतरत्न पुरस्कार हा आजवर सुरू असलेल्या निवड प्रक्रियेतून जाहीर व्हायला हवा. आता तर विविध पक्षांचे नेते व सेलिब्रिटीजच नव्हे तर आध्यात्मिक गुरूंनाही भारतरत्न हवे, अशी लॉबिंग सुरू आहे. या बालिशपणावर अभिषेक मनु सिंघवी यांनी कळस चढविला आहे.
जनभावना क्षुब्ध होऊ नये म्हणून राजकीय नेत्यांनी तोलून-मापून बोलण्याची गरज असते. पुढारी मात्र धुंदीत काय बोलतील याचा नेमच नाही. यातूनच अडवाणींना महंमदअली जीना धर्मनिरपेक्ष असल्याचा साक्षात्कार होतो तर जसवंतसिंग दहशतवादी सोडण्यासाठी आपली सेवा(?) पुन्हा एकदा देऊ करतात. सिंघवी यांचे बुश प्रेमही याहून वेगळे नाही. वर्णभेदाविरूध्द शांततेने संघर्ष करणारे मार्टीन ल्युथर किंग (ज्युनिअर) अथवा महारोग्यांना नवजीवन प्रदान करणारे बाबा आमटे यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी जर सिंघवी यांनी केली असती तर ते औचित्यपूर्ण ठरले असते. मात्र बुश यांचे नाव पुढे करून त्यांनी स्वत:चे हसे करून घेतानाच पक्षालाही काही प्रमाणात अडचणीत आणले. लोकशाहीत स्वत:चे मत व्यक्त करण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. याचा अर्थ अवास्तव बडबड करणे नव्हे. आज बुश यांना भारतरत्न हवे ही मागणी उठली तर हिटलर, माओ त्से तुंग, दाऊद इब्राहिम, परवेज मुशर्रफ, प्रभाकरन, जर्नेलसिंग भिंद्रनवाले या महापुरूषांनी(!) काय घोडे मारले आहे? उद्या त्यांची शिफारस करणारा कुणीतरी माईचा लाल येईलच. अर्थात तो दिवस आपल्यासाठी सर्वात दुर्दैेवी राहील. याचमुळे आपल्या देशाचे मानचिन्ह असणार्‍या भारतरत्नाविषयी सिंघवी आणि इतर राजकीय पक्षांचे फुकटचे सल्ले यांची गणना थिल्लरपणातच करायला हवी.

-(प्रसिध्दी दिनांक 22 ङ्खेब्रुवारी 2009)
=====================================================

पशुपती ते तिरूपती:दहशतवादी नक्षलरेषा

काही दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी अत्यंत क्रूरतेने 15 पोलीसांची हत्या केल्याने या विषयाचे गांभीर्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणार्‍या या घटनेने भविष्याची भयसूचना मिळालेली आहे. अत्यंत खेदाची बाब म्हणजे जिहादी दहशतवाद्यांविषयी व्यापक उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी नक्षलवाद्यांना ठेचण्यासाठी कोणताही सूत्रबध्द कार्यक्रम राबविण्यात आलेला नाही. ही समस्या फक्त राज्य सरकारांशीच संबंधित असल्याचे केंद्र सरकार मानत असल्याने या प्रश्नाला गंभीरतेने घेतलेले नाही. याच्या प्रतिकारासाठी आजवर केंद्रिय पातळीवर कोणत्याही स्वरूपाची उपाययोजना आखण्यात आलेली नाही.

आज संपूर्ण जगात डावी विचारधारा बर्‍याच प्रमाणात क्षीण झालेली आहे. रशिया आणि पूर्व युरोपातील साम्यवादी राजवटींचा कधीच अंत झाला असून चीनमध्येही आर्थिक उदारीकरणाचे वारे वाहू लागलेले आहेत. या पार्श्वभूमिवर, भारतीय उपखंडात माओच्या विध्वंसक विचारांना सर्वस्व मानणार्‍या नक्षलवाद्यांच्या वाढत्या हिंसक कृत्यांना अत्यंत व्यापक अर्थ आहे. नक्षलवादाची पाळेमुळे इतिहासात असली तरी वर्तमानाशीही याचे धागेदोरे जुळलेले आहेत. नक्षलवादी दहशतवादाच्या दाहकतेचे आकलन होण्यासाठी इतिहासाबरोबरच वर्तमानातील घटनाही समजून घ्याव्या लागतील. सुमारे 40 वर्षात नक्षलवाद भारतीय भूभागावर मोठ्या प्रमाणात फोफावला असला तरी याची तीव्रता आता वाढीस लागलेली आहे. गेल्या वर्षाच्या उत्तरार्धात नेपाळमध्ये माओवादी मतपेटीच्या मार्गाने सत्तेवर आल्याने भारतीय उपखंडातील सशस्त्र गटांना फार मोठा आधार मिळाल्याचे दिसून येत आहे. याचे भयंकर परिणाम आता दिसू लागले आहेत.

कार्ल मार्क्स यांनी कामगार एकतेच्या माध्यमातून समाजवादी विचारधारा मांडली. लेनिन यांनी रशियान क्रांतीच्या रूपाने याची यशस्वी अंमलबजावणी केली. चीनमध्ये माओ-त्से-तुंग यांनी या तत्वज्ञानात मात्र काही अंशी बदल केला. कामगारांऐवजी शेतमजुरांना हाक देत त्यांनी सशस्त्र क्रांती घडवून आणली. परिणामी, मार्क्स-लेनिन-माओ हे जगभरातील साम्यवाद्यांसाठी वंदनीय त्रिमूर्ती बनले. याचा आपल्या देशाच्या संदर्भात विचार केला असता, अजून नाविन्यपूर्ण बाबी दिसून येतात. भारतात स्वातंत्र्यपूर्व काळापासून साम्यवादी विचारधारेला पाठबळ मिळाले आहे. कॉंग्रेस आणि महात्मा गांधी यांच्या अहिंसक आंदोलनांची खिल्ली उडवत, सशस्त्र क्रांतीची स्वप्ने पाहणार्‍या काही युवकांना साम्यवादाचे तत्वज्ञान चांगलेच भावले. साम्यवाद्यांनी प्रारंभी कामगार संघटनांच्या माध्यमातून आपला जम बसविला. 1942च्या ‘चले जाव’ आंदोलनात साम्यवाद्यांची संभ्रमावस्था झाली. या अत्यंत व्यापक जनचळवळीला विरोध करून त्यांनी आपल्या पायावर धोंडा मारून घेतला. आपल्याला स्वातंत्र्य मिळताच साम्यवाद्यांमधील दुही अजून समोर आली. भांडवलशाही भारतात खरी क्रांती अजून अवतरलीच नाही अशी जहाल भूमिका काहींनी घेतली. यातच 1949च्या चिनी क्रांतीने भारावलेल्या माओवाद्याना भारतातही अशाच स्वरूपात क्रांती घडावी असे वाटू लागले. या कालखंडातील आंध्र प्रदेशातील तेलंगण आणि यानंतर त्रिपुरा आणि केरळच्या सशस्त्र उठावांमागे माओवाद्यांचाच हात होता. या उठावांना कणखरपणे चिरडण्यात आल्याने त्याला व्यापक स्वरूप मिळाले नसले तरी माओच्या ‘बंदुकीच्या नळीतूनच क्रांतीचा उदय होतो’ या तत्वज्ञानाला पाठबळ मिळाले.

स्वातंत्र्योत्तर काळात सोव्हिएत रशियाशी आपले सूर जुळल्याने, डाव्या विचारसरणीचे पक्ष भारतीय लोकशाही प्रक्रियेत सहभागी झाले. 1957च्या सार्वत्रिक निवडणुकीत तर भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा संसदेतील सर्वात मोठा विरोधी पक्ष बनला. याच वर्षी केरळमध्ये जगातील पहिले लोकनियुक्त साम्यवादी सरकार सत्तारूढ झाले. डावी विचारधारा मुख्य राजकीय प्रवाहात स्थिरावली तरी त्यांच्यात अंतर्गत कलह होताच. त्यांची सोाव्हिएतनिष्ठ आणि चीननिष्ठ अशी विभागणी झाली. 1962 साली चीनने भारतावर केलेल्या आक्रमणाप्रसंगी तर माओवाद्यांनी उघडपणे चीनी सरकारची बाजू उचलून धरली. सोव्हिएतवाद्यांनी मात्र भारताची पाठराखण केली. परिणामी, 1964 साली कम्युनिस्ट पक्षाची मार्क्सवादी आणि माओवादी अशी सरळ शकले उडाली. यातच 1967 साली पश्चिम बंगालमधील नक्षलबाडी या ठिकाणी चारू मुजूमदार यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक जमिनदारांच्याविरोधात सशस्त्र ठिणगी पडली. यावेळी तत्कालिन राज्य सरकारमध्ये डावेही सहभागी होते. त्यांनी आपल्या कॉम्रेडस्चे हे बंड निष्ठूरतेने मोडून काढले. आपल्याच पक्षीय बांधवांच्या या पवित्र्याने माओवादी बिथरले. यामुळे सशस्त्र क्रांती हाच शेवटचा मार्ग असल्याची त्यांची खात्री पटली. यातूनच उभ्या राहिलेल्या नक्षलवादाने शोषितांना काय दिले हा संशोधनाचाच प्रश्न असला तरी त्याने आपल्या केंद्र आणि राज्य सरकारांना मात्र मोठ्या प्रमाणावर डोकेदुखी दिली आहे.

आज नक्षलबाडी येथील उठावाला 40 पेक्षा जास्त वर्षे उलटल्यावर या साध्या ठिणगीने अधूनमधून वणव्याचे रूप धारण केले असल्याचे दिसून येते. गनिमी काव्याने लढून आपल्या सुरक्षा यंत्रणेच्या तोंडाला त्यांनी बर्‍याचदा फेस आणला. चकमकी, गनिमी हल्ले आदींच्या माध्यमातून त्यांनी भयावह नरसंहार घडवून आणला. याशिवाय, कोट्यवधी रूपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसानही झाले. दरम्यान, जागतिक राजकारणात अनेक उलथापालथी घडून आल्या तरी माओवाद्यांची ताकद वाढतच गेली यामागे अनेक कारणे आहेत.

आपल्या देशात काही भाग इंडिया आणि काही भाग भारत आहे. यातील ‘इंडिया’च्या वाट्याला स्वातंत्र्योत्तर कालखंडातील विकासाचा वाटा आला. उदारीकरणाची फळेही ‘इंडिया’च चाखत आहे. ‘भारता’तील गरीब आदीवासींच्या परिस्थितीत मात्र फारसा बदल झाला नाही. वनमाफिया, राजकारणी, कंत्राटदार आणि सरकारी नोकरशाहीने शोषितांना नागविण्यात काहीही कसर सोडलेली नाही. यामुळे त्यांचा सरकारी यंत्रणेवर विश्वास राहणार तरी कसा? नेमक्या याचाच पुरेपूर लाभ उठवत नक्षलवादाने हातपाय पसरले. गरिबांचे वाली म्हणून त्यांनी आदिवासींचा विश्वास संपादन केला. याच कारणामुळे त्यांना व्यापक जनाधार मिळाला. मात्र नंतर ही चळवळ भरकटत गेली. सनदशीर मार्गाने आपल्या मागण्या मान्य करण्याचा मार्ग सोडून, केवळ बंदुकीची भाषा ही लोकशाहीत मान्य होणारी नाहीच. परिणामी, प्रारंभी रोमांचकारी वाटचार्‍या नक्षलवादाचे कालौघात अध:पतन झाले. माओवाद आणि विध्वंस हे समानार्थी शब्द बनले. याच बाबीचा भारताला अस्थिर करण्यासाठी टपलेल्यांनी लाभ घेतला.

विविध सरकारी व खासगी सर्व्हेक्षणांनुसार, भारतातील 611 जिल्ह्यांपैकी जवळपास 160 जिल्हे नक्षलवादाने कमी-जास्त प्रमाणात बाधीत झालेली आहेत. याचा फटका आंध्र, बिहार, छत्तीसगड, ओरिसा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आदींना मोठ्या प्रमाणात बसला. देशातील सुमारे एक पंचमांश भागात त्यांचीच अघोषित सत्ता आहे. नक्षलवादी हे प्रारंभी चीनच्या इशार्‍यांवर नाचत असले तरी आता त्यांचे पाकिस्तानी ‘आयएसआय’शी संबंध असल्याचे उघड झाले आहे. याशिवाय, ‘लिट्टे’, ‘उल्फा’ आणि ‘बब्बर खालसा’ या दहशतवादी गटांशीही त्यांचे साटेलोटे आहे. लक्षणीय बाब म्हणजे या सर्वांची विचारधारा भिन्न आहे. दहशतवादाला धर्म अथवा जात नसते तर तो निधर्मीदेखील असतो हे नक्षलवादाने सिध्द केले आहे. ‘आयएसआय’ आता नक्षलवाद्यांच्या व्यापक ‘नेटवर्क’चा उपयोग अंमली पदार्थांची वाहतूक आणि नकली चलनासाठी करत असल्याचे वृत्त आहे. या बदल्यात त्यांना पैसे आणि शस्त्रास्त्रे मिळतात. याचाच अर्थ असा की, नक्षलवाद हा एक प्रकारे अंतर्गत आणि बाह्य दहशतवादातील ‘सेतू’ बनत आहे. आता तर नेपाळमध्ये माओवादी सत्तेवर आल्याने त्यांचा नक्षलवाद्यांना लाभ झाला आहे. नेपाळसोबतची भारतीय सीमा जवळपास खुलीच आहे. आपल्यासाठी हीच धोक्याची घंटा आहे.

नक्षलवादावर आजवर करण्यात आलेले उपाय तकलादू सिध्द झालेले आहेत. छत्तीसगडमध्ये काही वर्षांपूर्वी ‘सलवा जुडूम’ नावाने मोहिम सुरू करण्यात आली. यात आदिवासींचा विश्वास संपादन करून त्यांना नक्षलवादाचा प्रतिकार करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत होते. आता मात्र ही मोहिमच वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. बिहारमध्ये ‘रणवीरसेना’ या जमिनदारांच्या टोळीने तर नक्षलवाद्यांप्रमाणेच क्रौर्य दाखविले आहे. यामुळे त्यांच्या नक्षलवाद्यांच्या प्रतिकारासाठी अत्यंत व्यापक उपाययोजनेची गरज आहे. यासाठी आदिवासींना विकासाच्या प्रवाहात सामील करणे आवश्यक आहे. याशिवाय, नक्षलवाद्यांच्या प्रतिकारासाठी केंद्रिय पातळीवर सर्वंकष स्वरूपाची उपाययोजना हवी. यासाठी राष्ट्रीय धोरण आखण्याचीही आवश्यकता आहे. गरीबांचे मसिहा म्हणून नक्षलवाद्यांनी सुरवातीला आदिवासींच्या ह्दयात स्थान निर्माण केले तरी ते लवकरच आपल्या ध्येयापासून दूर गेले. यामुळेच आता आदिवासींनाही त्यांची दहशत वाटू लागली आहे. बंदुकीच्या नळीतून क्रांती नसली तरी दहशत निर्माण करण्यात नक्षलवादी यशस्वी ठरले आहेत. त्यांना आजच प्रतिकार न केल्यास भविष्यात अजूनही रक्तरंजित क्रौर्य पहायला मिळू शकते. असा इशारा गडचिरोलीतील दुर्घटनेने दिलेला आहे.

(प्रसिध्दी दिनांक 8 ङ्खेब्रुवारी 2009)
====================================================

चांद तारो को छुने की आशा!


ए.आर. रेहमान

ए.आर. रेहमान


सुमारे 15 वर्षांपूर्वी चित्रपटगृहात झळकलेल्या ‘रोजा’ चित्रपटाने राष्ट्रीय पातळीवर मणिरत्नमसारख्या दमदार दिग्दर्शकाची ओळख करून दिली. याच चित्रपटातील सुमधुर चालींची गाणी आणि ह्दयस्पर्शी संगीतानेही रसिकांना भावविभोर केले. भारतीय चित्रपटांच्या साचेबध्द संगीताच्या पार्श्वभूमिवर ए.आर. रेहमान या युवा संगीतकाराने ‘रोजा’त वैविध्याची उधळण करत अक्षरश: जादू केली होती. यथावकाश ही ताजी झुळुक स्थिरावली तरी त्यातील प्रतिभा कधीही कुंठित झाल्याचे जाणवले नाही. याउलट हिंदुस्तानी आणि कर्नाटकी शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, सुफी, पाश्चात्य पॉप, रॉक, जाझ आणि अभिजात संगीताची अप्रतिम घुसळण करत रेहमान याने रसिकांना धुंद केले. त्याच्या नवनवीन प्रयोगांची नोंद अगदी जागतिक पातळीवरही घेण्यात आली. संगीतिका (ऑपेरा) आणि इंग्रजी चित्रपटांना संगीत देण्याची संधीही त्याला मिळाली. आता तर ‘गोल्डन ग्लोब’ या अत्यंत मानाच्या पुरस्काराच्या रूपाने त्याच्या प्रतिभेवर वैश्विक मोहर उमटली आहे. वयाच्या अवघ्या 42व्या वर्षीच ‘जीवंतपणीची दंतकथा’ बनण्याचे भाग्य त्याला लाभले आहे. आता जागतिक पातळीवर रेहमान नावाचा खास ब्रँड बनला आहे.
रेहमानचे वडील आर. के. शेखर हे तामिळ आणि मल्याळम चित्रपटांचे संगीतकार होते. वडलांच्या संगतीत बालपणीच त्याला संगीताचे बाळकडू मिळाले. तो नऊ वर्षाचा असतांना शेखर यांचा मृत्यू झाला आणि त्याचा परिवार अक्षरश: उघडा पडला. 11व्या वर्षीच त्याला इलय्याराजा या दिग्गज तामिळ संगीतकाराच्या पथकात सामील व्हावे लागले. की-बोर्ड या वाद्याच्या आत्यंतिक प्रेमात पडलेल्या रेहमानने लंडनच्या विख्यात ‘ट्रिनिटी कॉलेज ऑफ म्युझिक’ मधून संगीताची पदवी मिळवली. तेथून परत आल्यावर त्याला जाहिराती, वृत्तचित्रे, दूरचित्रवाणी वाहिन्यांचे काम मिळाले.

जाहिरातींच्या ‘जिंगल्स’च्या क्षेत्रात रेहमानचे नाव होऊ लागले. जाहिरातींमधील सुमधूर संगीत आणि अफलातून चालींमुळे त्याला अनेक पारितोषिकांनी गौरविण्यात आले. अशाच एका समारंभात विख्यात तामिळ चित्रपट निर्माता व दिग्दर्शक मणिरत्नमशी त्याची ओळख झाली. मणिरत्नम यांनी त्याला आपल्या ‘रोजा’ या आगामी चित्रपटासाठी करारबध्द केले. 15 ऑगस्ट 1992 रोजी ‘रोजा’ तामिळनाडूत झळकला आणि 25 वर्षीय रेहमान तेथील घराघरात पोहचला. पुढच्याच वर्षी ‘रोजा’ हिंदीत प्रदर्शित झाल्याने त्याचे देशभर नाव झाले. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. रोजा ते नुकताच प्रदर्शित झालेला गजनी व ‘गोल्डन ग्लोब’ मिळालेल्या ‘स्लमडॉग मिलेनियर’ पर्यंतचा रहेमानच्या संगीताचा पट हा आत्यंतिक विलक्षण आणि थक्क करणारा असाच आहे.

भारतीय चित्रपट संगीत हा तसा अद्भुत प्रकार आहे. चित्रपटाच्या आगमनापूर्वी आपल्या देशातील अभिजनांसाठी शास्त्रीय संगीत तर सर्वसामान्यांसाठी लोकसंगीत असे ढोबळ विभाजन झाले होते. चित्रपटांनी मात्र हा भेद नाहीसा केला. परिणामी, चित्रपट गीतांना झोपडीपासून महालापर्यंत प्रतिष्ठा मिळाली. एक प्रकारे हा पॉप संगीताचा भारतीय अवतारच आहे. अवघ्या पाच-सात मिनिटांमध्ये रसिकांना नवरसयुक्त सप्तस्वरांचा आस्वाद घडविणे हे सोपे काम नाही. संगीताचा कोणताही एक प्रकार यासाठी अपूर्ण आहे. परिणामी, चित्रपटातील संगीत हे कोणत्याच एका प्रकारात बांधले गेले नाही. अगदी हिंदी चित्रपटांचा विचार केला तर संगीतकारांनी भारतीय आणि पाश्चात्य संगीताचे मिश्रण रसिकांना सादर केले. ओ.पी. नय्यर यांनी पंजाबी ठेक्याला पाश्चात्य साज चढविला. आर.डी बर्मन यांनी तर याहूनही पुढचा पल्ला गाठला. त्यांनी पाश्चात्य वाद्यांचा मनमुराद वापर केला. रेहमानने मात्र भारतीय चित्रपट संगीताला खर्‍या अर्थाने वैश्विक चेहरा प्रदान केला. अर्थात हीच त्याची खरी महत्ता आहे.

रेहमानला लय, सूर आणि ताल याची विलक्षण समज आहे. भारतीय आणि पाश्चात्य अभिजात व लोक संगीतातील बारकाव्यांचे त्याला सखोल ज्ञान आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यात त्याचा हातखंडा आहे. संगीत आणि तंत्रज्ञानाचा अद्भुत संगम असलेले सिंथेसायझर हे त्याचे सर्वात आवडते वाद्य होय. त्याच्या बहुतांशी गाण्यांमध्ये याचा मुक्त वापर केलेला असतो. त्याचे जास्तीत जास्त काम संगणकावरच होत असते. पाश्चात्य अभिजात संगीताचाही त्याने अत्यंत समपर्क वापर केलेला आहे.

सर्वप्रथम ‘टायटन’ या कंपनीच्या जाहिरातीत त्याने सिंफनीच्या सुरावटीचा अत्यंत सुंदर वापर केला. रसिकांना आजही या जाहिरातीतील अवीट मधुर सूर आठवत असतील. ‘रोजा’तील ‘दिल है छोटा सा’ या गाण्यात मोझार्टच्या सिंफनीचे सूर अत्यंत कुशलतेने पेरलेले आहेत. विशेष बाब म्हणजे ही सुरावट शब्दांच्या विरामात नव्हे तर गाण्याच्या चालीतील मुख्य संगीताच्या मध्ये ठेवलेली आहे. सिंफनीमध्ये डझनावारी वादक आणि वाद्यांना नियंत्रित करून त्यांचा एकत्रित परिणाम साधण्यात येतो. हा तसा अत्यंत क्लिष्ट प्रकार असल्याने आजवर भारतीय संगीतकारांनी याचा अत्यंत मर्यादित वापर केला आहे. रेहमानने मात्र हा प्रकार अगदी मुक्तपणे हाताळला आहे. त्याची बरीच गाणी आणि पार्श्वसंगीताचा हा अविभाज्य घटक असतो. यामुळे ‘टाईम’ नियतकालिकाने त्याचा एकेकाळी ‘मोझार्ट ऑफ मद्रास’ असा गौरव केला होता. याचा अर्थ रेहमान फक्त पाश्चात्य संगीताचाच वापर करतो असे नव्हे! लोकसंगीत आणि सुफी संगीताचाही त्याने वापर केला आहे.

‘लगान’ मधील गाण्यांमधून अस्सल मातीचा सुगंध जाणवतो. हे रेहमानचे यशच नव्हे तर तो साचेबध्द झालाय ही ओरड करणार्‍यांना चोख उत्तरही होते. ‘छैया छैया’ आणि ‘ख्वाजा मेरे ख्वाजा’तील सुफियाना अंदाज कोण विसरणार? सुफी तत्वज्ञानानुसार संगीत म्हणजे फक्त मनोरंजन नव्हे, तर ते आत्मा आणि परमात्म्यातील दुवा होय. स्वत: रेहमानची सुफी विचारधारेवर खूप श्रध्दा आहे. यामुळे त्याच्या संगीतात सुफी स्वरांची आर्तता आढळून येते. बर्‍याच मुलाखतीतून त्याने संगीत हे आपल्यासाठी व्यवसाय नव्हे तर उपासना (इबादत) असल्याचे नमूद केले आहे. नुसरत फतेह अली खानसारख्या सुफी संगीतातील दिग्गजासोबत मिळालेल्या संधीचे त्याने सोने केले. गत शतकातील नव्वदच्या दशकात भारताने प्रत्येक क्षेत्रात कात टाकली. जगभरात विविध क्षेत्रांमध्ये भारतीयांनी गुणवत्तेची मोहर उमटवण्यास सुरवात केली. आर्थिक उदारीकरण आणि आयटी क्रांतीच्या कालखंडातील तरूणाईची नस रेहमानला बरोबर गवसली. त्याच्या संगीतातून नव्या युगाचे ध्वनी उमटले. याचमुळे त्याच्या रूपाने भारतीय सिनेसंगीतात ‘रेनेसॉं’ अर्थात उष:काल अवतरल्याचे यथार्थ मत बर्‍याच समीक्षकांनी व्यक्त केले आहे.

कोणत्याही क्षेत्रातील नवप्रतिभा ही चाकोरीला जुमानत नसते. रेहमाननेही पारंपरिकतेला छेद देत रसिकांना संगीताच्या नवविश्वाचे दर्शन घडविले. अगदी गुलजार यांच्याच शब्दात सांगायचे तर रेहमानने भारतीय गाण्यांचा ‘मुखडा-अंतरा-मुखडा’ हा ढोबळ ढाचा उद्ध्वस्त केला. त्याने रसिकांना वारंवार धक्के दिले. ‘कहेना ही क्या’ या गाण्यात मूळ चाल तोडून कव्वालीची तान टाकण्याचे धाडस तोच करू शकतो. ‘तनहा…तनहा’ या गीतातून विलक्षण वेगाने शिखरावर पोहचल्यावर येणारा विराम आणि अत्यंत लाजवाब सिंफनीद्वारे पुन्हा गती पकडण्याचा रोमांच आपण अनुभवू शकतो. गाण्याचा गाभा आणि आशयाला धक्का लागू न देण्याच्या सर्जनशीलतेमुळे ‘जिया जले..’मधील तामिळ तर ‘ओ री छोरी…’तील इंग्रजी ओळी या आपला रसभंग करत नाहीत.

जगभरात भारतीय चित्रपट संगीत हा काहीसा हेटाळणीचाच विषय होता. भारतीय चित्रपटांसारखाच हा बटबटीत प्रकार असल्याची टीका यापूर्वी करण्यात येत होती. रेहमानच्या संगीतामुळे मात्र या टीकाकारांना चोख उत्तर मिळाले. त्याच्या संगीतात उत्तम सुरावटींसोबतच भन्नाट ठेकाही असतो. ‘हम्मा-हम्मा’, ‘मुक्काला-मुकाबला’ व ‘के सेरा सेरा’ या गाण्यांमधील ठेक्यामध्ये नृत्याचे ‘युनिव्हर्सल अपिल’ आहे. तामिळ, तेलगू वा हिंदी चालींवर अवघ्या जगाला थिरकवण्याची किमया त्याने साध्य केली. त्याने प्रभूदेवासह दक्षिणेतील कलावंतांचा एक ग्रुप स्थापन करून नृत्यसम्राट मायकेल जॅक्सनला आपल्या तालावर नाचविले. याचसोबत सर अॅन्ड्रयु लॉईड वेबर यांच्या ‘बॉंबे ड्रीम्स’ या ऑपेराला संगीत देण्याचे भाग्यही त्याला लाभले. ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ सारख्या हॉलिवुडपटाला पार्श्वसंगीत देण्याचे आव्हान त्याने लीलया पेलले.

1970च्या दशकात पाश्चात्य राष्ट्रांमध्ये रविशंकर यांनी अमाप प्रसिध्दी मिळवली. यानंतर अनेक संगीतकारांनी ख्याती मिळवली तरी ते ‘भारतीय संगीतकार’ म्हणूनच ओळखले गेले. रेहमानने मात्र याहूनही पुढचा पल्ला गाठला. जगातील सर्व प्रकारांच्या संगीतील उत्तम घटकांचे अफलातून ‘फ्युजन’ त्याने रसिकांसमोर सादर केले आहे. ‘गोल्डन ग्लोब’च्या रूपाने आता त्याला जगभर मान्यता मिळाली आहे. आगामी काळात हॉलिवुडमध्ये त्याला अनेक संधी मिळण्याची शक्यता आहे. अल्पावधीतच यशोशिखरावर आरूढ झाल्यावरही त्याचे पाय जमिनीवरच आहेत. अत्यंत मितभाषी आणि कोणत्याही वादामध्ये न अडकणारा रेहमान पक्का राष्ट्रवादी आहे. तो संगीतामध्ये भाषिक भेद न मानता, भारतीय हाच एकमेव प्रकार मानतो. याशिवाय ‘वंदे मातरम’ आणि ‘जन गण मन’ या अल्बममधून त्याने प्रखर देशभक्ती प्रकट केली आहे.

‘रोजा’मध्ये एका मुग्ध युवतीचे भावविश्व ‘दिल है छोटासा’ या गाण्यातून रेखाटण्यात आले आहे. खरं तर, जगापासून अलिप्त राहत सृजन करणारा रेहमानच यातून बोलतोय असे वाटते. ‘चांद तारो को छुने की आशा’ व्यक्त करणार्‍या रेहमानने प्रतिभेच्या गगनाला अशीच गवसणी घालावी हीच समस्त रसिकांची इच्छा असणार यात शंकाच नाही.
(प्रसिध्दी दिनांक 18 जानेवारी 2009)
==================================================

5 April_ShabdPan1lekh30-NOV_ARTICLE
08Feb_lekh18Jan-Shabd-Article
Pandit
BEDI

3 Comments

  • Wonderful site. Very nice writing. I will distribute among our circle here. You could also publish the same content in English.
    I like the Bhaigiri.

Leave a Comment