काही प्रतिभावंतांच्या नशिबी मरणोत्तर प्रसिध्दी आणि लौकीकाचा योग लिहिलेला असतो. गॅलेलिओ, व्हिन्सेंट व्हॅन गॉग, काफ्का, एमिली डिकीन्सन आदींच्या नशिबात हा कुयोग होता. मराठी भूमितले याचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी होत. बहिणाबाईंचे निधन झाल्यानंतर त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी यांनी थोडेसे दबकतच आचार्य अत्रे यांना आपल्या आईच्या कविता दाखविल्या; तेव्हा अत्रेंनी उत्स्फुर्तपणे हे ‘शंभर नंबरी सोने’ असल्याचे सांगितले. यानंतर काय झाले हा इतिहास आपल्यासमोरच आहे. बहिणाबाईंच्या प्रतिभेची पारख करणारे आचार्य अत्रे हे स्वत: उत्तुंग प्रतिभावंत होते. मात्र जॉन मलूफ नावाच्या एका सर्वसामान्य तरूणाने व्हिवियन मायर या आपले आयुष्य जवळपास अज्ञात अवस्थेत व्यतीत करणार्या महिलेच्या छायाचित्रांचा अनमोल खजिना जगासमोर आणण्याचे महत्वाचे कार्य केले.
‘स्ट्रीट फोटोग्राफी’ हा खरं तर एकदम भन्नाट विषय आहे. रस्त्यावर जीवन हे अगदी खुल्या रूपाने वाहत असते. यातील अनमोल क्षण टिपण्याचे काम हे छायाचित्रकार करत असतात. आज स्मार्टफोनच्या रूपाने जगातील अब्जावधी लोकांच्या हातात कोणताही क्षण टिपण्याची सुविधा असली तरी कधी काळी हा महागडा छंद होता. याच कालखंडात कुणी महिला आपल्या आयुष्यात लाखांपेक्षा जास्त छायाचित्रे काढू शकेल यावर कुणी विश्वास ठेवणार नाही. मात्र आज जगातील सर्वोत्तम छायाचित्रकारांपैकी एक म्हणून ख्यात असणार्या व्हिवियन मायर या महिलेची लोकविलक्षण कथा आपल्याला थक्क केल्यावाचून राहणार नाही.
या सर्व अभुतपूर्व प्रकरणाची सुरूवात झाली २००७ साली झालेल्या एका लिलावातून. शिकागो शहरातील एका ‘ऑक्शन हाऊस’मधील खुल्या लिलावात एका महिलेने काढलेल्या छायाचित्रांच्या निगेटिव्हज, पुस्तके, रेकॉर्डिंग्ज आणि काही फिल्म होत्या. जॉन मलूफ या शिकागोच्या इतिहासावर पुस्तक लिहिण्याची तयारी करणार्या तरूणाचे याबाबत कुतुहल चाळवले गेले. त्याने या लिलावात भाग घेत तब्बल ३० हजार निगेटिव्हजसह अन्य वस्तू फक्त ३८० डॉलर्समध्ये खरेदी केल्या. यातील अन्य वस्तूंची खरेदी इतर दोघांनी केली. घरी आल्यानंतर मलूफ याने लिलावात मिळालेल्या पेट्यांमधील सर्व साहित्य बाहेर काढले तेव्हा तो अक्षरश: थक्क झाला. कारण यात निगेटिव्हजसह अन्य बर्याच वस्तू होत्या. यात फिल्म्स, विविध बिले, वर्तमानपत्रांची कात्रणे, रेकॉर्डिंग्ज, रंगीबेरंगी हॅट, बटने, रूमाल आदींचा समावेश होता. यातील काही छायाचित्रे डेव्हलप केल्यानंतर मलूफ अक्षरश: स्तिमीत झाला. कारण ही छायाचित्रे अतिशय उच्च दर्जाची होती. यामुळे त्याला ही छायाचित्रे घेणारा कोण असावा? ही उत्कंठा लागली. त्याने खरेदी केलेल्या अनेक कागदपत्रांवर व्हिवियन मायर हे नाव नमुद केल्याचे आढळले. यामुळे त्याने प्रारंभी गुगलवर शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्याला अगदी एकही संदर्भ आढळला नाही. यानंतर त्याने आपल्या परीने खूप प्रयत्न करूनही कोणताच दुवा न आढळल्याने त्याने आपले प्रयत्न सोडून दिले. या दरम्यान, त्याने दुसर्या खरेदीकर्त्याला शोधून त्याच्याकडील सामग्रीदेखील खरेदी केली. यातून त्याच्याकडे तब्बल एक लाखांपेक्षा जास्त निगेटिव्हजसह फिल्म्स आणि अन्य सामग्रीचा खजिना जमा झाला. दरम्यान, एप्रिल २००९ मध्ये मलूफने पुन्हा गुगलवर सर्च केले असता त्याला व्हिवियन मायर नावाच्या महिलेची निधन वार्ता ‘शिकागो ट्रिब्यून’ या वर्तमानपत्राच्या वेबसाईटवर वाचण्यास मिळाली. अर्थात त्याला लाखांवरील विलक्षण छायाचित्रे काढणार्या व्यक्तीचा शोध लागला. यानंतर मलूफने यातील डेव्हलप केलेली मोजकी छायाचित्रे ‘फ्लिकर’ या फोटो शेअरिंग साईटवर टाकले. नंतर त्याने हीच छायाचित्रे आपल्या ट्विटर हँडलवरही अपलोड केले. लागलीच ही छायाचित्रे ‘व्हायरल’ झाली. अनेकांनी मलूकचे मुक्तकंठाने कौतुक करत व्हिवियन मायरविषयी विचारणा केली? यामुळे मलूकने या विलक्षण महिलेचा शोध लावण्याचा चंग बांधला. यातूनच जन्माला आली ‘फाईंडिंग व्हिवियन मायर’ ही जगप्रसिध्द डॉक्युमेंटरी! जॉन मलूफ याने चार्ली सिस्केलच्या समवेत अतिशय परिश्रपूर्वक तयार केलेला हा माहितीपट सर्वत्र वाखाणण्यात आला. अगदी ऑस्करची अंतिम फेरीदेखील या डॉक्युमेंटरीने गाठली. याशिवाय अन्य अभ्यासकांनीही आपापल्या परीने व्हिवीयन मायरचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यातून तुकड्या-तुकड्यांनी या विलक्षण प्रतिभावंत महिलेची माहिती जगासमोर आली.
१ फेब्रुवारी २०२६ रोजी जन्मलेल्या व्हिवीयन मायरचे आयुष्य तसे फारसे सुखासीन नव्हते. तिची आई फ्रेंच तर वडील ऑस्ट्रीयन. फ्रान्स आणि अमेरिका यांच्यात तिचे आयुष्य व्यतीत झाले. तिच्या पालकांमध्ये नेहमी खटके उडायचे. सेंट-बॉनेट-इन-चंपसॉर या फ्रान्समधील लहानशा खेड्यातल्या आजोळी तिचे बालपण गेले. तेथेच त्यांच्या कुटुंबाशी जिन बट्रांड या व्यावसायिक छायाचित्रकाराचा संबंध असल्याचे पुरावे आहेत. अर्थात यामुळेच व्हिवीयनला फोटोग्राफीत रस निर्माण झाल्याचे मानले जाते. यानंतर मायर कुटुंब हे न्यूयॉर्क आणि शिकागो येथे गेले. वयाच्या पंचविशीत व्हिवीयन शिकागोत गेली. यानंतर सुमारे सहा दशके ती याच शहरात वास्तव्यास होती. तिने सुरवातीला काही सटरफटर नोकर्या केल्या. मात्र पन्नासच्या दशकात तिने दाईचे काम सुरू केले. थकेपर्यंत म्हणजेच पुढील सुमारे ४० वर्षे तिने विविध कुटुंबांमध्ये हेच काम केले. आता काम करत असलेल्या कुटुंबात बालकांचे संगोपन करत असतांना ती त्या बालकांची छायाचित्रे काढत असे. याचसोबत तिच्याकडे असणार्या आठ मिमी कॅमेर्याच्या मदतीने ती त्यांचे चित्रीकरणही करत असे. अनेक कुटुंबांनी नंतर या आठवणी शेअर केल्या आहेत. मात्र याचसोबत ती फावल्या वेळात शिकागो आणि न्यूयॉर्क शहराच्या विविध भागांमध्ये जाऊन छायाचित्रे काढत असे. या दोन महानगरांचा भोवताल हा तिने आपल्या कॅमेर्यात कैद केला. यात विविध वास्तू, उद्याने, सार्वजनिक ठिकाणे, हॉटेल्स, क्लब्ज, संग्रहालये आदी ठिकाणांना तिने प्राधान्य दिले असले तरी तिला खरी आवड होती ती माणसांमध्येच! त्रासलेली, गांजलेली, अत्यानंदात असणारी, अतिव दु:खाने विव्हळणारी, कंटाळलेली, कामूक, क्रोधी, बिलंदर, भोळसट, बालसुलभ, गुन्हेगारी वृत्तीची, लब्धप्रतिष्ठीत, दरिद्री या सर्व प्रकारांमधील माणसांचा तिच्या कॅमेर्याने वेध घेतला. मानवाची इतक्या विविध प्रकारांमधील छायाचित्रे क्वचितच कुणा छायाचित्रकाराने टिपले असतील. वडिलोपार्जित शेती विकून आलेल्या पैशांमधून १९५९-६० या वर्षांमध्ये तिने काही देशांचा प्रवास केला. यात भारतासह फ्रान्स, इटली, फिलीपाईन्स, चीन, इजिप्त, सिरीया आदी देशांमध्येही तिने मुक्तपणे छायाचित्रे टिपली.
व्हिवीयनने कृष्णधवल आणि रंगीत या दोन्ही प्रकारांमधील छायाचित्रे काढली, तरी तिने बहुतांश ब्लॅक-अँड-व्हाईट मध्येच काम केले आहे. या प्रकारातील छायाचित्रांमधील तिची प्रतिभा ही भल्याभल्यांना चकीत करणारी ठरली आहे. छायाचित्रातील प्रकाश आणि छायेचे प्रमाण, त्यातील स्पेस, बोलके चेहरे, अचूक क्षण आदींची तिची समज ही एखाद्या उच्च कोटीच्या व्यावसायिक फोटोग्राफरला लाजवणारी होती. अनेकदा ती ज्याचे छायाचित्र काढले त्याच्याशी होणारे बोलणे रेकॉर्डदेखील करत असे. अशा शेकडो रेकॉर्डिंग्ज तिने जतन करून ठेवल्या आहेत. तर सर्वात महत्वाची बाब म्हणजे, तिने काही खासगी चलचित्र रेकॉर्डही जतन करून ठेवल्या. यातील बहुतांश फिल्म्समध्ये ती जेथे दाई म्हणून काम करायची त्या घरातील बालकांच्या बाललिलांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. व्हिवियन जितकी कुशल छायाचित्रकार होती तितकीच ती जतन करण्यातही कुशल होती. यामुळे तिने आपल्याकडील सामग्री अतिशय सुलभ असे वर्गिकरण करून जतन करून ठेवली होती. १९७०च्या सुमारास तर तिच्याकडे तब्बल २०० पेट्या भरून सामग्री असल्याची आठवण अनेक जणांना सांगितली आहे हे विशेष. तिला पुढे या पेट्या सांभाळण्या कठीण झाले. परिणामी तिने एका बँकेच्या लॉकरमध्ये हा ठेवा सुरक्षित जतन करून ठेवला. मात्र लॉकरचे पैसेदेखील भरणे जिकरीचे झाल्याने तिला दुर्दैवाने याचा लिलाव करावा लागला. जॉन मलूफ प्रमाणेच जिल निकोलस यांनी बीबीसीसाठी ‘व्हिवियन मायर: हू टुक नॅनीज पिक्चर्स’ ही डॉक्युमेंटरी निर्मित केली. तीदेखील खूप गाजली. तिच्यावर अनेक पुस्तके लिहिण्यात आले असून अनेक जण सखोल संशोधनदेखील करत आहेत. यातून तिच्या स्वभावाचे अनेक पैलूदेखील समोर आले आहेत. ती आयुष्यभर अविवाहीत राहिली. तिचा कुणी साथीदार असल्याचे पुरावेदेखील समोर आले नाहीत. एका अर्थाने तिने अक्षरश: एकाकी आयुष्य काढले. विचारांनी ती स्त्रीवादी असल्याचे तिच्या संपर्कात आलेल्या अनेकांचे म्हणणे आहे. ती तशी एकलकोंडी असली तरी वेळात वेळ काढून शिकागो शहराच्या विविध भागात जाण्याचा छंद तिने जोपासला होता. गळ्यात कॅमेरा लटकावून ती अतिशय झपाझप चालत विविध रस्त्यांवरून फिरत असे. प्रारंभी तिच्याकडे कोडॅकचा ब्राऊनी बॉक्स कॅमेरा होता. यानंतर ५०च्या दशकात तिने रॉलिफ्लेक्स कॅमेरा खरेदी केला. या मालिकेतील अनेक कॅमेरे तिने वापरले. आयुष्याच्या शेवटी तिने एसएलआर कॅमेरेही वापरले. मात्र तिने काढलेली सर्वाधीक छायाचित्रे ही रॉलिफ्लेक्स कॅमेर्यातीलच होती. गळ्यात लटकावलेल्या कॅमेर्यात खाली बघून ती समोरच्या व्यक्तीचे छायाचित्र काढत असे. अर्थात छायाचित्र काढतांना तिची नजर नेहमी खाली असे. या माध्यमातून काढलेली अनेक छायाचित्रे आज ‘क्लासिक’ म्हणून गणले जात आहेत. विशेष म्हणजे तिची सर्व छायाचित्रे अजून जगासमोर येणे बाकी आहे.
व्हिवियनला कॅमेर्याचे वेड असले तरी ती या छंदाबाबत कुणाशी फार बोलत नसे. तिने स्वत:चेही बरेच छायाचित्रे काढलेली आहेत. यात आरशाचा उपयोग करून काढलेल्या ‘सेल्फी’सह इतरांच्या हाती कॅमेरा देऊन काढलेल्या छायाचित्रांचा समावेश आहे. तर तिने आठ मिमी कॅमेर्याच्या मदतीने अनेक घटनांचे चित्रीकरणदेखील केले आहे. या सर्वांचे ‘डिजीटायझेशन’ करण्यात येत असून जगभरात तिला आता एक महान छायाचित्रकार म्हणून ख्याती मिळाली आहे. अर्थात संपूर्ण आयुष्य अज्ञातवासात काढलेली व्हिवीयन मायर नावाचे कोडे अद्यापही पूरेपुर उलगडलेले नाही. काहीही असो याच गुढ महिलेने हौशी ‘स्ट्रीट फोटोग्राफी’च्या इतिहासात मानाचे स्थान प्राप्त केले आहे यात शंकाच नाही. खर तर व्हिवियनचे स्वत:चे जीवन अत्यंत खडतर होते. ती आयुष्यात एकटी होती. तिला जवळचे कुणी आप्तदेखील नव्हते. मात्र आपल्या या सर्व एकाकीपणाची भर तिने आपल्या छंदाद्वारे भरून काढली. नंतर करण्यात आलेल्या संशोधनातून तिचे शेवटचे दिवस खूपच हलाखीचे होते. आता तिच्या छायाचित्रांना करोडो डॉलर्सची रक्कम मिळू शकत असली तरी याचा तिला स्वत:ला काडीचाही लाभ झाला नाही ही शोकांतिकाच नव्हे काय ?
शेवटी व्हिन्सेंट व्हॅन गॉगच्याच शब्दांत सांगायचे तर “Stars are the souls of dead poets, but to become a star, you have to die.” व्हिवियन मायरलाही आयुष्यभर जोपासलेल्या छंदातून मानाचे स्थान प्राप्त होण्यासाठी याच मार्गाने जावे लागले हेच खरे!
व्हिवियन मायरची माहिती असणारे संकेतस्थळ: http://www.vivianmaier.com
तिच्या छायाचित्रांचा खजिना: http://www.vivianmaier.com/gallery/street-1
निवडक छायाचित्रे
सुंदर, खूप आवडले फोटोग्राफी, सलाम