चालू घडामोडी राजकारण विज्ञान-तंत्रज्ञान

गुगल बॉम्ब आणि धोक्याचा इशारा

Written by shekhar patil

सर्चमध्ये बाह्य हस्तक्षेप करणे/मॉनिटरींग करणे हे गुगलला शक्य नाही. यामुळे भविष्यात वेगवेगळ्या प्रकारे ‘गुगल बॉंब’ आपल्यासमोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गुगल इमेज सर्चमध्ये ‘टॉप इंडियन क्रिमिनल’ या शब्दांचा शोध घेतला असता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमा येत असल्याने सध्या प्रचंड खळबळ उडाली आहे. हा देशाचा अपमान असल्याने गुगलचा व्यापक पातळीवर विरोध करण्यात येत आहे. या प्रतिमा हटविण्याची मागणीदेखील करण्यात येत आहे. मात्र मुळातच हा खोडसाळपणा गुगलचा नसून या कंपनीच्या तंत्रज्ञानाला हवे तसे वापरून घेणार्‍या विकृती मनोवृत्तीचा आहे. आज याचाच वेध.

साधारणत: दोन दिवसांपुर्वी गुगलच्या ‘इमेज सर्च’मध्ये ‘टॉप इंडियन क्रिमीनल’ हे शब्द टाकून शोध घेतला असता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमा समोर येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली. याचा सोशल मीडियात व्यापक निषेध करण्यात आला. हा ट्विटरवर ट्रेंड बनला असून बहुतांश लोक मोदींच्या समर्थनार्थ समोर आले आहेत. यात दिग्विजय सिंह यांच्यासारख्या मोदी विरोधकांचाही समावेश आहे. अनेकांनी गुगलने माफी मागण्याची मागणी केली. मोजक्या लोकांनी मोदी यांच्यावर २००२च्या दंगलीतील भुमिकेबाबत टिकाही केली. मात्र सोशल मीडिया मोदींच्या समर्थनार्थ एकवटल्याचे दिसून आले. हा जनक्षोभ पाहून गुगलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लेखी माफीदेखील मागितली. गुगलच्या सर्चमध्ये अनेकदा आश्‍चर्यकारक ‘रिझल्ट’ येत असल्याचे सांगत संबंधीत कंपनीने या प्रकरणी खेद प्रकट केला. अर्थात सोशल मीडियातून या छायाचित्रांच्या लिंक काढण्याची केलेली मागणी मात्र फेटाळण्यात आली आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे आधी या सर्च रिझल्टमध्ये मोदी यांची प्रतिमा दुसर्‍या क्रमांकावर होती. आता सर्च केला असता पहिल्या तीन क्रमांकावर मोदी यांच्याच प्रतिमा आल्याचे दिसून येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात मोदीच नव्हे तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केंद्रीय मंत्री हर्षवर्धन, माजी मंत्री राम जेठमलानी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता आदींच्या प्रतिमादेखील येत आहेत. ओसामा बीन लादेन, दाऊन इब्राहिम, लखवी, सलाऊद्दीन आदींसह अनेक कुख्यात मंडळींसोबत वर नमुद केलेल्या मान्यवरांच्या प्रतिमा येत असल्याने खळबळ उडणे स्वाभाविक आहे. याचे सर्व खापर गुगलवर फोडता येणार नाही. मात्र यातून गुगल सर्चमधील काही बाबींचा विघातक वापर करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा स्पष्टपणे अधोरेखित झाला आहे. याबाबत विवेचन करण्याआधी गुगलची सर्च प्रणाली नेमकी कशी कार्य करते ते पाहू.

गुगलची कार्यप्रणाली

अनेक जणांचा इंटरनेटवरील माहिती ही ‘गुगलवर’ असल्याचा गैरसमज आहे. प्रत्यक्षात मात्र हे सर्च इंजिन असून सायबर विश्‍वातील अजस्त्र माहितीचे वर्गीकरण करून ते आपल्याला हवी असणारी माहिती क्षणार्धात सादर करते. इंटरनेटवरील संपुर्ण माहिती ही एखाद्या अजस्त्र सार्वजनिक वाचनालयासारखी आहे. अर्थात वाचनालयात आपल्याला हवे तसे पुस्तक मिळावे म्हणून त्याची विषय, प्रकार, प्रकाशन आदींवरून वर्णीकरण केलेले असते. आणि वाचनालयातील कर्मचारी आपल्याला हवे ते पुस्तक काढून देतात. आता सायबरविश्‍वात अनेक टेराबाईटस्चा साठा असून यात प्रत्येक क्षणाला भर पडतच आहे. या माहितीला अचूकपणे आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी गुगलसारखे सर्च इंजिन्स उपयोगात येतात. गुगल हे इंटरनेटवरील माहितीचे नेमके कसे वर्गीकरण करते याची संपुर्ण माहिती सांगता येणार नाही. यातील महत्वाच्या बाबी गुगलने स्वाभाविकपणे ‘सिक्रेट’ ठेवल्या आहेत. मात्र ढोबळ मानाने गुगलने आपल्या कार्यप्रणालीची माहिती दिली आहे. इंटरनेटवर माहिती शोधण्यासाठी गुगलचे दोनशेच्यावर निकष आहेत. यातील प्रमुख खालीलप्रमाणे आहे.

(याच्या प्राथमिक माहितीसाठी खालील व्हिडीओ उपयुक्त आहे.)

आपल्याला एखाद्या शब्दाशी संबंधीत माहिती हवी असल्यास ती गुगलच्या सर्च बॉक्समध्ये टाकावी लागते. येथे ‘एंटर’ केल्यास गुगलचे वेब क्रॉलर्स (याला स्पायडरही म्हणतात) सुसाट वेगाने संपुर्ण आंतरजालावरून भ्रमंती करतात. समजा आपल्याला टेबल या विषयावर माहिती शोधायची असल्यास हे क्रॉलर्स टेबलशी संबंधीत वेबसाईटचे युआरएल, वेब पेजेस, व्हिडीओज, छायाचित्रे, सोशल नेटवर्कीग साईटस्, ग्रुप्स आदींचा शोध घेतात. बहुतांश वेबसाईटच्या संचालकांनी आपल्या संकेतस्थळासाठीचे सांकेतिक शब्द (कि-वर्डस) तसेच ‘साईट मॅप’ आधीच गुगलकडे सादर केलेला असल्याचा सर्च प्रणालीस लाभ होतोच. यानंतर ही माहिती सुचिबध्द करण्यात येते. यात ‘टेबल’ शब्दाशी संबंधीत माहिती असणार्‍या वेबसाईट या त्याच्या लोकप्रियतेनुसार आपल्यासमोर येतात. ही संपुर्ण प्रक्रिया अगदी मिलीसेकंदात पार पडून आपल्यासमोर अक्षरश: लाखो वेबसाईटची यादी येते. आता ही संपुर्ण प्रक्रिया गुगलच्या स्पेशल अलॉगरिदमद्वारे करण्यात येते. याला ‘पेज रँक’ असे नाव आहे. या रँकनुसार जे पेज पहिल्या क्रमांकावर असते ते साहजिकच सर्च रिझल्टमध्ये अग्रभागी येते. यानंतर क्रमाक्रमाने वेबसाईटची यादी आपल्यासमोर येते.

पेजरँक प्रणालीचे कार्य

आधीच नमुद केल्याप्रमाणे गुगलच्या सर्चमध्ये तब्बल दोनशे महत्वाचे फॅक्टर्स कार्यरत असतात. यातून संबंधीत संकेतस्थळाचे पेजरँक ठरविण्यासाठी खालील बाबी अत्यंत महत्वाच्या असतात.

* संबंधीत वेबपेजच्या डेव्हलपरने गुगलकडे सादर केलेल्या कि-वर्डमधील शब्द हे त्याच्या शीर्षकासह कंटेंटमध्ये किती वेळा आलेला आहेत? ही बाब अत्यंत महत्वपुर्ण अशी आहे. हे शब्द जितके जास्त तितके गुणही जास्त तर शब्द जितके कमी तितके गुण कमी असा याचा साधा-सरळ हिशोब आहे.

* संबंधीत वेबपेज हे कधीपासून कार्यरत आहे? याचाही पेजरँकवर फरक पडतो. खरं तर प्रत्येक क्षणाला नवनवीन पेजेसची भर पडत आहे. मात्र गुगल हे विश्‍वासार्ह ‘हिस्ट्री’ असणार्‍या वेबपेजेसला प्राधान्य देते. यामुळे वेबसाईट जितकी जुनी तितकी तिची पेजरँक जास्त असण्याची शक्यता असते.

* सर्वात महत्वाचा मुद्दा लिंक्सचा आहे. यात संबंधीत वेबपेजला अन्य बेवसाईटवर किती वेळा लिंकच्या स्वरूपात देण्यात आलेले आहे याचाही फरक पडतो. आता आपण ‘टेबल’ हा शब्द शोधत असतांना समजा संबंधीत शब्दासाठी ‘अबक’ वेबसाईटची लिंक ही इतर सर्वाधीक वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. यामुळे याचा ‘स्कोअर’ सर्वाधीक झाला. याचमुळे साहजीकच ‘अबक’ ही वेबसाईट ‘टेबल’ या शब्दासाठी गुगल सर्च रिझल्टमध्ये पहिल्या क्रमांकावर राहील. म्हणजेच दुसर्‍या वेबसाईटवरील लिंक ही संबंधीत संकेतस्थळासाठी मतदानाचे काम करते. यामुळे सर्वाधीक वेळा ‘लिंक’ करण्यात आलेले वेबपेज हे अग्रस्थानी विराजमान होते. एका अर्थाने गुगलची पेजरँक ही लोकशाही प्रणालीप्रमाणे काम करते. अर्थात काही जण या प्रणालीचा दुरूपयोगही करतात. मोदी यांच्या प्रकरणातही असेच घडले आहे.

गुगलला चकमा

गुगलच्या सर्च रिझल्टमध्ये अग्रस्थानी येण्यासाठी ‘सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन’च्या अनेक ट्रिक्स आहेत. यासाठी अगदी समर्पक डोमेन नेमच्या निवडीपासून ते वारंवार सर्च करण्यात येणार्‍या ‘कि-वर्डस’चा वापर, अन्य वेबसाईटवर लिंकची सुविधा आदी बाबी महत्वाच्या आहेत. गुगलच्या सर्च रँकमध्ये आघाडीवर जाण्याचा हा राजमार्ग आहे. मात्र अनेक जण हुशारीने गुगलच्या सर्च अलॉगरिदमला चकमा देतात. ही खर तर एक स्वतंत्र शाखाच आहे. यावर कधी तरी सविस्तरपणे लिहणारच. आता मात्र मुद्दा पेज रँक मॅन्युपिलेशनचा. यातील पहिला प्रकार हा ‘कि-वर्ड’च्या निवडीचा. यात एखाद्याच्या वेबसाईटवर टेबलाच्या छायाचित्राच्या नावासह कि-वर्ड हा खुर्चीचा देण्याचा आल्यास काही दिवसांनी गुगल सर्चमध्ये टेबल शोधल्यास खुर्चीचे छायाचित्र समोर येऊ शकते. यामुळे समजा एखाद्या व्यक्तीला बदनाम करावयाचे असल्यास त्याची छायाचित्रे संबंधीत नावाने विविध वेबसाईटवर अपलोड केल्यास परिणाम साधू शकतो. मात्र यासाठी आपल्याकडे वेबसाईट असणे आवश्यक आहे. मात्र दुसर्‍यांच्या वेबसाईटवरील कंटेंटचा उपयोग करून गोलमाल करण्यासाठी लिंकचा हुकमी मार्ग आहे.

आता गुगल सर्चवरील ‘अबक’ या वेबसाईटमध्ये टेबलाशी संबंधीत माहिती आहे. यातील एका छायाचित्राला अनेक अन्य वेबसाईट आणि ब्लॉगवर खुर्चीच्या नावाने लिंक करण्यात आल्यानंतर साहजीकच त्या वेबसाईटला ‘टेबल’साठी गुगल पेजरँक जास्त गुण देते. परिणामी आपण गुगलच्या सर्चबॉक्समध्ये खुर्ची शब्द सर्च केला तरी पहिल्या क्रमांकावर टेबलाचीच माहिती येईल. आता नरेंद्र मोदी यांच्या प्रकरणातही हेच घडले आहे. अर्थात गेल्या कित्येक वर्षांपासून असे घडत आहे. या प्रकाराला ‘गुगल बॉंब’ वा ‘गुगल वॉश’ म्हणतात. साधारणत: १९९९ साली हा प्रकार सर्वप्रथम उघडकीस आला. या कालखंडात गुगलमध्ये ‘मोअर एव्हील दॅन सॅटन हिमसेल्फ’ हा शब्द सर्च केल्यानंतर पहिल्या क्रमांकावर चक्क मायक्रोसॉफ्ट कंपनीची वेबसाईट दिसत होती. २००१ साली याचे गुगल बॉंब हे नामकरण झाले. २००५ साली या शब्दाला ऑक्सफोर्ड शब्दकोशात स्थान देण्यात आले. यानंतर आजवर अनेकदा या प्रकाराने वाद निर्माण झाले आहेत. म्हणजे २००६च्या सुमारास गुगलमध्ये ‘मिसरेबल रिझल्ट’ हा शब्द सर्च केल्यास पहिल्या क्रमांकावर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांची अधिकृत बायोग्राफी समोर आल्याने खळबळ उडाली. काही दिवसांनी हा प्रकार नाहीसा झाला तरी अनेक रूपांनी असले कृत्य होतच राहिले. यातून कधी गुगलमध्ये ‘लायर’ अर्थात खोटारडा हा शब्द सर्च केल्यास ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांची माहिती समोर आली. तर कधी ‘फेक प्रेसिडेंट’ शब्द शोधल्यानंतर फिलीपाईन्सच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्षांचे संकेतस्थळ दिसले. २००९ साली बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर गुगलच्या सर्च रिझल्टमध्ये ‘फर्स्ट लेडी’ हा शब्द शोधल्यानंतर त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांचा फोटोशॉपमध्ये वानराप्रमाणे विकृत केलेली प्रतिमा पहिल्या क्रमांकावर दिसत होती. यातून गुगलवर वर्णभेदाचा आरोप करण्यात आला. काही काळानंतर ही प्रतिमा हटविण्यात आली तरी यातून अनेकदा वाद झाले आहेत. ‘गुगल बॉंब’ हा प्रकार सातत्याने विविध स्वरूपांमध्ये समोर आला आहे. साधारणपणे राजकारणी, धार्मिक गुरू, सेलिब्रिटी आदींना यातून लक्ष्य करण्यात येते. आता नरेंद्र मोदी यांना ‘टॉप टेन इंडियन क्रिमिनल’मध्ये अग्रस्थानी दाखविण्याचे कृत्यही याच प्रकारातील असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मोदींच्या छायाचित्राची कथा

जुलै २०१४मध्ये टेलिग्राफ या ब्रिटनमधील विख्यात दैनिकामध्ये निग्रोंवर वर्णभेदी टिपण्णी करणार्‍या दिनानाथ बत्रा या भारतीय शिक्षणतज्ज्ञावर लेख प्रकाशित केला होता. यात भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र देण्यात आले होते. कुणालाही कोणत्याही वेब पेजचा ‘कोड’ पाहता येतो. यामुळे मी या पेजच्या कोडचे अवलोकन केले असता खाली नमुद केल्याप्रमाणे ‘टेलिग्राफ’ने या छायाचित्राला नरेंद्र मोदी यांचेच नाव दिले असल्याचे दिसून आले.

meta_news1

दुसर्‍या छायाचित्रात गुगलसाठी दिलेल्या ‘मेटाडाटा’मध्ये नरेंद्र मोदी यांच्यासह ‘क्रिमिनल’ शब्दाचा उल्लेख केल्याचे आपल्याला स्पष्ट दिसून येत आहे. यातील क्रिमिनल या शब्दानेच घोळ झाला आहे. यामुळे गुगलच्या इमेज सर्चमध्ये क्रिमिनल शब्द टाईप केल्यानंतर खाली कुठे तरी नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र येत असेल. याचाच फायदा घेत एखाद्या गटाने जाणीवपुर्वक संबंधीत लेखास ‘टॉप इंडियन क्रिमिनल’ या शब्दाशी संबंधीत लिंक मोठ्या प्रमाणात दिल्या असतील.

meta_news

साहजीकच वर नमुद केल्याप्रमाणे गुगलच्या सर्च रिझल्टमध्ये नरेंद्र मोदी यांची प्रतिमा झळकू लागली आहे. यामुळे या प्रकरणात गुगलचा थेट संबंध नाही. परिणामी मोदींचे समर्थक वा या प्रकरणातून भारताचा अपमान झाल्याचा आरोप करणारे ज्या पध्दतीने गुगलवर तुटून पडलेत त्यांनीही ही तांत्रिक बाब समजून घेणे आवश्यक आहे.

यावर इलाज काय?

‘गुगल बॉंब’च्या माध्यमातून ‘पेजरँक’शी छेडछाड करण्याचे प्रकार सातत्याने होत असतात. यामुळे गुगलही वेळोवेळी आपला अलॉगरिदम अपडेट करत असते. मात्र यावरही मात करण्याचा प्रयत्न होत असतो. नरेंद्र मोदी यांच्या प्रकरणानंतर गुगलने ‘टॉप इंडियन क्रिमीनल’ या शब्दाशी संबंधीत इमेज सर्च करतांना वैधानिक चेतावनी टाकली आहे. ‘इमेज सर्च रिझल्टस’मध्ये गुगलचे वैयक्तीक मत वा त्यासाठी समर्थन नसल्याचे स्पष्टपणे नमुद केले आहे. ही प्रणाली गुगलच्या अलॉगरिदमनुसार करण्यात आल्याचेही यात म्हटले आहे. गुगलची सर्च आणि पेजरँक प्रणालीत काही प्रमाणात त्रुटी असल्या तरी त्या बर्‍यापैकी तटस्थ आहेत. आता नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र गुगल काही दिवसांत काढू शकते. मात्र भविष्यात असला प्रकार होणार नाही याची शाश्‍वती गुगलही देऊ शकणार नाही. बरं गुगलने यात हस्तक्षेप केल्यास अन्य प्रकरणांमध्येही याची मागणी होऊ शकते. मात्र सध्या तरी गुगल सर्चमध्ये बाह्य हस्तक्षेप करणे/मॉनिटरींग करणे हे गुगलला शक्य नाही. यातून त्यांची विश्‍वासार्हतादेखील लयास जाऊ शकते. यामुळे भविष्यात वेगवेगळ्या प्रकारे ‘गुगल बॉंब’ आपल्यासमोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वेबसाईट हॅक करण्याप्रमाणेच एखाद्याची प्रतिमा मलीन करण्यासाठी असले प्रकार करण्यात येतात. यात खोडसाळपणा, विकृती आदी मुख्य हेतू असतो. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतीय गुन्हेगारांच्या यादीत टाकण्यासाठी काही महिन्यांपासून नियोजनपुर्वक प्रयत्न करण्यात आले असावेत असे या प्रकरणातून दिसून आले आहे. एक प्रकारे हॅकींगसारखाचा हा सायबरयुध्दाचा प्रकारही असल्याची शक्यता नाकारता येत नाही. याचे अनेक खोडसाळ वा विकृत स्वरूप भविष्यातही वेगवेगळ्या मार्गांनी समोर येतच राहण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ असा की, या प्रकरणाने धोक्याचा इशारा दिला आहे.

About the author

shekhar patil

1 Comment

Leave a Comment