चालू घडामोडी राजकारण

खेळ कुणाला दैवाचा कळला ?

नियतीचा खेळ अनाकलनीय असल्याची प्रचिती आज केंद्रीय मंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या अपघाती मृत्यूने आली आहे. या उमद्या नेत्याचा मृत्यू आपल्याला जितका चटका लावणारा आहे तितकाच जीवनाच्या क्षणभंगुरपणाची खात्री पटवणारा आहे.

नियतीचा खेळ अनाकलनीय असल्याची प्रचिती आज केंद्रीय मंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या अपघाती मृत्यूने आली आहे. कायम संघर्ष करून आता कुठे यशोशिखरावरून उंच भरारी घेण्याच्या तयारीत असणार्‍या या उमद्या नेत्याचा मृत्यू आपल्याला जितका चटका लावणारा आहे तितकाच जीवनाच्या क्षणभंगुरपणाची खात्री पटवणारा आहे.

भारतीय लोकशाहीला घराणेशाहीचा शाप असल्याचे मानले जाते. काही मोजकी घराणी देश चालवत असल्याचा आरोपही वारंवार करण्यात येतो. मात्र सर्वसामान्य घरात जन्मून तसेच कोणताही राजकीय वारसा नसतांना राजकारणात यश मिळवणार्‍या मोजक्या मान्यवरांमध्ये गोपीनाथरावांचे नाव घ्यावे लागेल. आंबेजोगाई तालुक्यातील नाथरा या गावासारख्या ठिकाणी शेतकरी घरात जन्मलेला तरूणाचे स्वप्न फार तर एखादी सरकारी नोकरी मिळवण्याचे असणार होते. मात्र स्वकर्तृत्वाने त्यांनी गाठलेली उंची ही कुणालाही चकीत करणारी अशीच आहे. भारताच्या इतिहासात आणीबाणीचा कालखंड हा एखाद्या विभाजनरेषेसमान आहे. या कालखंडाने आपल्या देशाला अनेक नेते दिले. त्यातच गोपीनाथराव आणि प्रमोद महाजन या दोन मित्रांचा समावेश होता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले हे दोन मित्र आणीबाणीत नाशिक कारागृहात राहिले. तुरूंगातील दिवसांनी त्यांच्या आयुष्याला नवीन आयाम दिला. जनसंघ विसर्जित होऊन भारतीय जनता पक्षाची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्रात या पक्षाला रूजविणे हे काम सोपे नव्हते. एक तर भाजप हा शेटजी-भटजींचा पक्ष असल्याचा विरोधक सातत्याने प्रचार करत होते. यातच कॉंग्रेसची पाळेमुळे खोलवर gopinath_mundeरूजलेल्या महाराष्ट्रात नव्या राजकीय विचाराला मान्यता मिळवणे हे कठीण होते. मात्र मुंडे-महाजन या जोडीने अख्खा महाराष्ट्र पिंजून काढत भाजपचे बिजारोपण केले. यात बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जोडीला आली. एका व्यापक अर्थाने विचार करता महाराष्ट्रात कॉंग्रेसला खर्‍या अर्थाने धक्का देण्याचे काम बाळासाहेब, महाजन आणि मुंडे या त्रिमुर्तिने केले. यथावकाश मुंडे विधानसभेवर निवडून आले. ८५ साली त्यांना पराभवाचा धक्का बसला तरी १९९० साली त्यांनी पुन्हा विधानसभा गाठली.

साधारणत: नव्वदच्या सुमारास प्रमोद महाजन यांनी दिल्लीत तर गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात लक्ष देण्याचे या दोघांनी सामंजस्याने चढविले. काही वर्षातच महाजन हे केंद्रातील मोठे शक्तीस्थळ बनले तर मुंडेदेखील राज्यात मातब्बर नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. राज्याचे विरोधी पक्षनेते असतांना त्यांनी सत्ताधार्‍यांवर जोरदार प्रहार केले. युती शासनाच्या काळात उपमुख्यमंत्रीपदाची धुरा त्यांनी सांभाळली. सत्तारूढ असतांना आणि नंतरही शिवसेना व भाजपात कोणताही वाद निर्माण झाल्यास महाजन-मुंडे हे मातोश्रीवर जाऊन यशस्वी मध्यस्थी करत असत. १९९९पासून महाराष्ट्रात युती सत्ताबाहेर राहिल्याने मुंडे काहीसे खट्टू झाले होते. यातच प्रमोद महाजन यांच्या करूण अंतामुळे त्यांना भाजपमधील हितशत्रूंनी जेरीस आणले होते. यामुळे २००९च्या निवडणुकीत त्यांनी लोकसभेत जाणे पसंत केले. तेथे त्यांना पक्षाचे उपनेतेपद मिळाले. या लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर त्यांना ग्रामविकास हे महत्वाचे खाते मिळाले होते. भाजपमधील सुत्रांच्या माहितीनुसार ते पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार राहणार हे निश्‍चित होते. एका अर्थाने गोपीनाथराव यांच्या डोळ्यात अनेक स्वप्ने असतांना त्यांची अशी एक्झीट झाली आहे.

गोपीनाथ मुंडे यांचे नाव आल्यानंतर प्रमोद महाजन यांचा उल्लेखही येणे स्वाभाविक आहेच. एकेकाळचे अभिन्न मित्र असणारे हे दोन्ही नेते नंतर नात्याच्या बंधातही अडकले. महाजन यांची भगिनी प्रज्ञा यांच्याशी गोपीनाथराव विवाहबध्द झाले. या दोघांच्या मैत्रीमध्ये अनेकांनी खडा टाकण्याचा प्रयत्न केला तरी यात त्यांना यश आले नाही. २००५मध्ये प्रमोद महाजन यांच्यावर त्यांच्या बंधूंनी गोळ्या झाडल्यानंतर मुंडे यांनी त्यांच्या परिवारावर मायेचे छत्र धरले. प्रमोद महाजन यांच्या मृत्यूनंतर भाजपमध्ये मुंडे यांची कोंडी करण्याचे अनेक प्रयत्न झाले. यातच महाराष्ट्रात नितीन गडकरी यांच्यासारखा मातब्बर नेता थेट भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष बनल्याने महाराष्ट्रात त्यांच्या समर्थकांचा गट प्रबळ बनला. यामुळे नाराज झालेल्या मुंडे यांनी बंडाचे निशाण फडकवल्याने मात्र भाजप नेतृत्व हादरले होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना विरोधकांनी विशेषत: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने चांगलेच कोंडीत पकडले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट त्यांचे बंधू पंडितअण्णा आणि पुतणे धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीत प्रवेश देत त्यांना आव्हान दिले होते. धनंजय यांनी परळी नगरपालिकेत आपली ताकद दाखवून त्यांना शह दिला होता. या लोकसभा निवडणुकीतही बीड मतदारसंघात राष्ट्रवादीने सुरेश धस यांच्या रूपाने त्यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले होते. या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या तमाम नेत्यांनी मुंडे यांच्यावर घणाघाती प्रहार केले. त्यांचा यामुळे ते मतदान होईपर्यंत अडकून पडले. या निवडणुकीत मुंडे पडणार अशी हवा पसरली होती. प्रत्यक्षात मात्र त्यांनी चक्रव्यूह यशस्वीपणे भेदत दणदणीत विजय मिळवून दिल्लीत मंत्रीपदही पटकावले. अर्थात आपले वडील बंधू आणि पुतण्याचे बंड त्यांच्या चांगलेच जिव्हारी बसले होते. मुंडे हे महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार राहणार म्हणून त्यांचा मंत्रीमंडळात समाविष्ट न करण्याचा पवित्रा पंतप्रधान मोदी यांनी घेतला होता. मात्र गडकरींसारख्या पक्षांतर्गत विरोधकानेही मुंडे यांच्याबाजूने कौल दिल्यामुळे त्यांना अखेर मंत्रीपद मिळाले होते. गेल्या काही दिवसांपुर्वी गोपीनाथराव यांनी राज्यातील मातब्बर कॉग्रेस व राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये येण्यासाठी आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. याचाच अर्थ महाराष्ट्र भाजपमध्ये ते महत्वाची भुमिका बजावणार हे निश्‍चित असतांना काळाने घात केला.

वास्तविक पाहता महाराष्ट्राचा विचार केला असता मराठा, दलित, मुस्लीम आदी समुदाय राजकीयदृष्ट्या सजग मानले जातात. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये इतर मागासवर्गीयांना राजकीय भान आल्याचे दिसून येत आहे. मंडलपश्‍चातच्या युगात या समुहातील अनेक नेते चमकदारपणे पुढे आलेत. यात मुंडे यांचे नाव अग्रस्थानी झळकत होते. भारतीय जनता पक्षासाठी ते बहुजनांचा चेहरा बनले. आज महाराष्ट्रात गोपीनाथराव मुंडे, छगन भुजबळ व एकनाथराव खडसे आदी नेते इतर मागासवर्गिय समूहाचे प्रतिनिधी मानले जातात. अर्थात छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या माध्यमातून ज्या प्रखरपणे ओबीसी अस्मिता बुलंद केली इतक्या जाणीवपुर्वक मुंडे यांनी आपली प्रतिमा बनवली नाही. सर्व जाती, धर्मातील अभिजनांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत त्यांचे संबंध होते. अगदी आपल्या पक्षविरोधी भुमिका घेत त्यांनी नामांतराच्या चळवळीत भाग घेतला. अनेक भाजप नेत्यांच्या तोंडी चिथावणीची भाषा असतांना त्यांनी कधी याबाबत चकार शब्द काढला नाही. यामुळे यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांच्यानंतर त्यांना ‘लोकनेता’ म्हणून संबोधण्यात आले. लाखो लोकांचे प्रेम त्यांना मिळाले. यातच आता राजकीय कारकिर्द पुन्हा बहरली असतांना त्यांचा अपघाती अंत झाल्याने एका युगाची समाप्ती झाली आहे. मुंडे यांचा उल्लेख होताच प्रमोद महाजन यांच्याप्रमाणेच विलासराव देशमुख यांचेही नाव कुणाच्याही ओठावर येत असे. समागृहात एकमेकांवर तुटून पडणारे हे दोन्ही नेते वैयक्तीक आयुष्यात एकमेकांचे जीवाभावाचे मित्र होते. त्यांनी सातत्याने एकमेकांना मदत केली होती. राजकारणातील मुंडे-देशमुख यांच्या मैत्रीचे अनेकदा दाखले देण्यात येत असत. विलासराव देशमुख यांच्याप्रमाणेच गोपीनाथराव यांचेही अकाली निधन व्हावे हा अत्यंत दुर्दैवी योगायोग मानावा लागणार आहे.
आपल्याला राजकारण्यांची फक्त वट आणि त्यांना मिळणारे वलय दिसते. मात्र यासाठी त्यांनी केलेला त्याग कुणाला दिसत नाही. राजकारण्यांना अगदी घरादाराचा विचार न करतांना त्यांना अहोरात्र कामात गुंतवून घ्यावे लागते. यातून वेळी-अवेळी प्रवास या बाबी आल्याच. गेल्या काही वर्षांचा विचार केला असता माजी राष्ट्रपती ज्ञानी झैलसिंग, माधवराव शिंदे, राजेश पायलट, जीएमसी बालयोगी, वाय.एस. राजशेखर रेड्डी, येरन नायडू आदी नेत्यांना अपघातात मृत्यूने गाठले आहे. यातच आता कामाच्या रगड्यातूनच गोपीनाथ मुंडे यांचा अपघातात अंत झाला आहे. गोपीनाथराव मुंडे यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांची तर हानी झालीच आहे पण महायुतीसमोर महाप्रश्‍न उभे राहिले आहेत. यात बहुजन चेहर्‍यासह जमीनीशी जुळलेल्या या नेत्याच्या जाण्याने झालेली हानी कशी भरणार ते ‘डॅमेज कंट्रोलर’ची भुमिका कोण बजावणार? मुंडे यांना पर्याय कोण? सोशल इंजिनिअरिंग कसे साधणार? या प्रश्‍नांची उत्तरे महायुतीच्या नेत्यांना शोधावी लागणार आहेत. त्यांनी आयुष्यात नेहमीच संघर्ष केला. काही वेळेस विरोधकांनी त्यांना आव्हान दिले तर बर्‍याचदा स्वकीयांनीही त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते सर्वांना पुरून उरले. १९९९ सालापासून कायम विरोधी बाकांवर बसणार्‍या या नेत्याला आता कुठे खर्‍या अर्थाने सुखाचे दिवस आले होते. आयुष्यभरातील संघर्षाचे फलित म्हणून त्यांच्याकडे केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी आली होती. येत्या काही महिन्यात त्यांना मुख्यमंत्रीपदाचीही संधी होती. मात्र त्यांनी याआधीच घेतलेली विदाई आपल्याला नियतीवर विश्‍वास ठेवण्यास भाग पाडते. शायर म्हणतो

बडे शौक से सुन रहा था जमाना मगर
तुम ही सो गये दास्ता कहते कहते…

याचप्रमाणे मुंडे हुरहूर लावून परलोकी गेलेत…

About the author

shekhar patil

Leave a Comment