Featured चालू घडामोडी

खान्देश कन्येचा गौरव!

महिला बचत गटांच्या माध्यमातून हजारो महिलांच्या जीवनात आशेचा नवा किरण बनणार्‍या बहादरपूर (ता. पारोळा) येथील निलीमादिदी मिश्रा यांचा ‘रेमन मॅगेसेसे’ पुरस्काराने झालेला गौरव हा समस्त खान्देशवासियांसाठी अत्यानंदाचा क्षण ठरला आहे. या माध्यमातून समाजाच्या तळागाळातील जनतेसाठी झटणार्‍या एका व्यक्तीमत्वाच्या कर्तृत्वाला खर्‍या अर्थाने सलाम करण्यात आला आहे.
राजकारणाप्रमाणेच समाजसेवेतही महिलांचे प्रमाण तसे कमी आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळाल्याने राजकारणात किमान नामधारी का होईना महिलांचा ‘टक्का’ वाढणार आहे. मात्र सामाजिक कार्यात कुटुंबाची साथ असल्याशिवाय कुण्या महिलेने कार्य केल्याचे ऐकिवात नाही.

निलीमादिदी मिश्रा

यातही बहादरपूरसारख्या ग्रामीण भागातील एक तरूणी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी अर्पण करते यावर सहसा कुणाचा विश्‍वास बसणार नाही. मात्र, निलीमादिदींनी हे करून दाखविले. याचाच परिपाक म्हणजे त्यांची किर्ती जगभर गेली. आता ‘मॅगेसेसे’च्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करण्यात आला आहे. कोणत्याही व्यक्तीची महत्ता ही त्याला मिळणारे पुरस्कार अथवा मानसन्मानांवरून ठरते ही खेदजनक बाब आहे. गेल्या सात वर्षांपासून निलीमादिदी अगदी झपाटल्यागत काम करत असतांनाही त्यांच्या कामाला हवी ती प्रसिध्दी मिळाली नाही. किंबहुना, हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचे कार्य किती मोठे आहे याची आपणास जाणीव झाली आहे. मॅगेसेसे पुरस्कारांमध्ये निलीमा मिश्रा यांचे नाव झळकल्यावर बहुतांश जनतेला कोण ही तरूणी? असाच प्रश्‍न पडला. यात जनतेचा काहीही दोष नाही. दिदींनी समाजसेवा करतांना कधीही प्रसिध्दीचा हव्यास केला नाही. एवढेच नव्हे तर समाजाने आपल्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी अशी अपेक्षाही केली नाही. अर्थात शहरी जनतेला कोण निलीमा मिश्रा? हा प्रश्‍न पडला तरी ग्रामीण भागातील हजारो माता-भगिनींच्या ह्दयात मात्र त्या कधीच विराजमान झालेल्या आहेत.
   शहरी महिला या ‘चुल आणि मुल’ या दुष्टचक्रातून बाहेर आल्या असल्या तरी ग्रामीण स्त्रियांच्या नशिबात मात्र अद्यापही हे भोग चुकलेले नाहीत. यात दारिद्ˆयाची भर पडल्यास महिलांचे आयुष्य अक्षरश: नरक बनते. बहादरपूर येथे बालपणापासूनच दिदींनी महिलांची ही केविलवाणी अवस्था पाहिली. यामुळे उच्चशिक्षण घेऊनही संसारात अथवा करियरमध्ये अडकून न पडता त्यांनी समाजातील विषमता दुर करण्यासाठी आपले आयुष्य अर्पण करण्याचा निर्णय घेतला. यासाठी कर्मभूमी म्हणून त्यांनी आपल्याच गावाची निवड केली. यासाठी २००५ साली ‘भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन’ या संस्थेची मुहुर्तमेढ त्यांनी रोवली. प्रारंभी संगणक वर्ग सुरू केल्यावर त्यांनी महिलांना स्वयंरोजगार  मिळवून देण्याचा संकल्प केला. बहुतांश समाजसेवकांना जगात होणार्‍या बदलांचे ज्ञान नसते. मात्र खेडेगावात राहूनही दिदींना जगातील बदलाचे वारे कळत होते. बांगलादेशात महंमद युनुस यांनी बचत गटांच्या माध्यमातून केलेल्या क्रांतीचे त्यांनी डोळसपणे अध्ययन केले. यामुळे अगदी कमी भांडवलात महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करावयाचे असल्यास बचतगटांसारखा मार्ग नसल्याचे त्यांना दिसून आले. केंद्र व राज्य सरकारने बचतगटांना प्राधान्य देण्याआधीच दिदींना या चळवळीचे सामर्थ्य ओळखले होते हे विशेष.
   काही सन्माननीय अपवाद वगळता सामाजिक सुधारणा करणार्‍यांना जगातील घडामोडींचे भान नसते. मात्र निलीमादिदींनी काळाची पाऊले अचूक ओळखली. ग्रामीण भागातील महिलांनी कोणत्याही वस्तूचे उत्पादन केले तरी त्याला बाजारपेठ मिळणार कोठे? हा प्रश्‍नही होता. यातच दिदींनी गोधडीचे उत्पादन करण्याचा निर्णय घेतला. खरं तर आपल्याकडे आता पांढरपेशा मंडळीही गोधडी वापरत नाही. यामुळे गरीबांचे वस्त्र म्हणून ओळखली जाणारी गोधडी विकत घेणार कोण? हा प्रश्‍न उपस्थित झाला. मात्र यथावकाश दिदींच्या सहकारी भगिनींनी केलेल्या गोधड्यांना मागणी वाढली. महानगरांमधून या गोधड्या चक्क युरोप-अमेरिकेत गेल्या. दिदींच्या प्रयत्नांना फळ आले अन् त्यांच्या कार्याची चळवळ व्यापक बनली. आज उत्तर महाराष्ट्रातील सुमारे १८०० बचत गटांचे पालकत्व स्वीकारून दिदींनी जवळपास १६ हजार महिलांना स्वयंरोजगाराचा मार्ग दाखविला आहे.
  आज मॅगेसेसे पुरस्कार मिळाला म्हणून हुरळून न जाता आपण ग्रामीण विकासाच्या मार्गावर मार्गक्रमण करतच राहणार असल्याची दिदींनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया ही अत्यंत बोलकी आहे. त्यांनी ग्रामीण विकासाचे स्वप्न पाहिले आहे. महिलांना स्वत:च्या पायावर उभे करून त्यांनी अर्धा पल्ला तर गाठला आहे. याशिवाय शिक्षण, आरोग्य, सुसंस्कार आदींकडे त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. आपला समाज निर्व्यसनी आणि सुसंस्कृत बनण्यासाठी त्यांनी पाऊले उचलली आहेत. दिदींच्या या कार्यात त्यांना यश मिळेलच याची आम्हाला खात्री आहे. खान्देश कन्येच्या गौरवाने आम्ही मोहरून आणि गहिवरून गेलो आहोत. आमची ही भगिनी येत्या काळात ग्रामीण विकासासाठी भरीव कार्य करेल अन् तिच्यासमोर जगातील तमाम गौरव नतमस्तक होतील यात तिळमात्रही संशय नाही. प्रत्येक पुरस्काराचे काही ना काही महत्व असतेच. ‘मॅगसेसे’ तर ‘आशियाई नोबेल’ म्हणून गणले जाते. दिदींना हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद तर आहेच पण मात्र हजारो महिलांच्या जीवनात उगवलेली पहाट ही या पुरस्काराहून किती तरी श्रेष्ठ आहे. आगामी काळात दिदी याच तडफेने कार्य करतील ही खात्री आहेच. त्यांनी या कार्यात यशाचे शिखर पादाक्रांत करून गावं परिपूर्ण व स्वयंपूर्ण होण्याचं दिदींचं स्वप्न साकार होवो हीच शुभेच्छा!

About the author

shekhar patil

1 Comment

Leave a Comment