Featured चित्रपट

खानचा नेम अन्‌ जनतेचा `गेम’

आपले समाजमन हे अगदी क्षुल्लक कारणावरूनही प्रक्षुब्ध होण्यास वेळ लागत नाही. याला वाह्यात आणि नादान प्रसारमाध्यमांनी खतपाणी घातल्यावर काय होऊ शकते हे ‘खान’ प्रकरणावरून दिसून आले आहे. या वादातून जय आणि पराजयाचे खूप दावे-प्रतिदावे करण्यात आले तरी खरा पराभव मात्र जनता-जनार्दनाचाच झाला. गेल्या आठ-दहा दिवसात अवघ्या देशासाठी खान, त्याचे समर्थक आणि विरोधकांशिवाय दुसरे काही कामच नसल्याचे चित्र रंगविण्यात आले. गगनाला भिडलेली महागाई, बिघडलेली कायदा आणि सुरक्षा व्यवस्था, सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचार, समाजातील विषमता, फुटीर प्रवृत्तींना आलेले उधाण आदींमुळे अवघा देश बेजार झालेला आहे. मात्र या सर्व बाबींवर ‘खान’च्या ‘नायकत्वा’ने मात केली.
दीड शतकापूर्वी कार्ल मार्क्स यांनी धर्म ही अफूची गोळी असल्याचा विचार मांडला होता. आज मार्क्सबाबा भारतात आला तर येथील गोंधळ पाहून तो डोके झोडून घेईल. आज आपल्या देशात धर्मच नव्हे तर जात, पंथ, भाषा, प्रांत, संस्कृती एवढेच नव्हे तर महापुरूषांचे पुतळे वा विचार आदीदेखील अफूच्या गोळ्या बनल्या आहेत. सर्वांनाच पोटभर अन्न न मिळणार्‍या या देशात क्षणार्धात टाळके फिरवणार्‍या अफुचे उदंड पीक जाहले आहे. अगदी एखाद्या खुर्द वा बुद्रुक गावातील लोकांच्या भावना कशाने चिघळतील हे सांगता येत नाही. ‘खान’ प्रकरणाला तर अगदी वैश्विक परिमाण लाभल्याने ते नक्की गाजणार हा अंदाज होता आणि झालेदेखील तसेच. काही वर्षांपूर्वी ‘नेबर्स एन्ही…ओनर्स प्राईड’ ही ओनिडाची जाहिरात झळकली होती तेव्हा आपणास धक्का बसला होता. यातील सैतान चक्क ज्या उत्पादनाची जाहिरात करायची त्याला फोडून टाकतो. ही जाहिरात आणि पर्यायाने उत्पादन असफल ठरणार असा होरा प्रारंभी वर्तविण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात या जाहिरात मोहिमेने इतिहास निर्माण केला. मानवाचा मनोव्यापार असाच अनाकलनीय आहे. बहुतांश प्रसंगी अगदी वाईट मार्गाने मिळणारी प्रसिध्दीदेखील लाभदायक असते. याचमुळे ‘बदनाम ही सही, नाम तो हुवा’, असे म्हटले जाते. आता यावर व्यवसायिकच नव्हे तर राजकीय पोळी शेकण्याची जी प्रथा आलेली आहे ती अत्यंत चिंताजनक अशीच आहे.
वास्तविक पाहता गेल्या काही वर्षांपासून शाहरूखची जादू फिकी पडली आहे. ‘डर’, ‘बाजीगर’ वा ‘दिलवाले…’च्या काळातील त्याचे वलय नाहीसे होत आहे. त्याच्याकडे आमिरसमान निवड कौशल्य व सहजसुंदर अभिनय तसेच सलमानसारखी ‘रफ-टफ’ प्रतिमाही नाही. भरीस भर म्हणजे त्याच्या मालकीच्या ‘नाईट रायडर्स’ या संघाने आयपीएलच्या गेल्या हंगामात अत्यंत सुमार कामगिरी केली आहे. यामुळे ‘माय नेम..’ हा त्याच्यासाठी अस्तित्वाचा प्रश्न होता. यातच कट्टर प्रतिस्पर्धी आमिर खानच्या ‘थ्री इडियटस्‌’च्या अभूतपूर्व यशाने त्याची झोप उडाली नसली तरच नवल! आता खेळाडूंची बोली लावण्याप्रसंगी या बहाद्दराला पाकी खेळाडूंची आठवण झाली नाही. नंतर मात्र त्याने याबाबत पध्दतशीरपणे गळा काढला. शिवसेनेने याला प्रतिकार करताच त्याला चेव चढला. अर्थात यामागे खूप कारणेही होती. पाकिस्तानमध्ये अद्यापही भारतीय चित्रपटांवर अधिकृत बंदी आहे. बॉलिवुडमधील चित्रपटांच्या पायरेटेड डिव्हीडीचा उद्योग तेथेच बहरला आहे. एवढेच नव्हे तर ‘सांँग्ज डॉट पीके’ यासह अनेक पाकिस्तानी वेबसाईटस्‌वरून अगदी प्रदर्शित न झालेल्या हिंदी चित्रपटांची गाणीही मोफत डाऊनलोड करता येतात. यामुळे बॉलिवुडला करोडोंचा फटका बसतो. शाहरूखला या सर्व बाबींची कल्पना निश्चित असणार. मात्र चित्रपटाच्या व अभिनेत्याच्या नावात खान आणि त्याला हिंदुत्ववादी संघटनेचा विरोध…जगभरात मोफत प्रसिध्दीसाठी याहून मोठा फॉर्म्युला कोठे मिळणार!
हिंदी चित्रपटांची बाजारपेठही आता ‘ग्लोबल’ झाली आहे. ‘माय नेम’च्या वितरणाचे हक्क तर ‘ट्वेंटींएथ सेंच्युरी फॉक्स’ या हॉलिवुडच्या विख्यात कंपनीने घेतले आहेत. यामुळे या चित्रपटाचे यश सर्वांचीच गरज होती. यामुळे पाकीप्रेमासोबत शाहरूखच्या मुखातून मुंबईविषयीदेखील मुक्तचिंतन (!) अवतरले. या प्रकरणातून शिवसेनेला राजकीय लाभ होणार हे दिसताच राज्य सरकारने विशेषत: कॉंग्रेसने अगदी ठामपणे शाहरूखची पाठराखण केली. अर्थात त्यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीने तर शिवसेनेला श्रेय मिळू नये म्हणून मनसेनेही रणांगणात उडी घेतली. शरद पवारांची आकस्मिक ‘मातोश्री’ भेट आणि मनसेची शाहरूखप्रकरणी मवाळ भूमिका यामुळे पडद्याआडच्या अभद्र युती आणि आघाडीचे दर्शनही आपणास घडले.
या प्रकरणात सर्वात महत्वाची भूमिका प्रसारमाध्यमे-त्यातही वृत्तवाहिन्यांनी वठवली. जणू आपल्या देशातील सर्वात महत्वाचा प्रश्न हा ‘माय नेम..’च असल्याचे त्यांनी भासविले. दररोज सकाळी ‘सामना’ वाचून त्याचे दिवसभर चर्वण करणार्‍यांना शाहरूख ‘ट्विटर’वर काय सांगतो याचीही भलतीच उत्सुकता लागून होती. त्याच्या लघु संदेशावर तास-अर्ध्या तासांचे कार्यक्रम रंगविण्यात आले. काही वाहिन्यांवर तर शिवसेनेच्या माध्यमातून अवघ्या मराठी जनांवरच असंकुचितपणाचा ठपका मारण्यात आला. सेनेच्या विरोधामुळे अवघे जग शाहरूखला पाहण्यासाठी कसे आसुसलेले आहे हे दर्शवतांना अतिशयोक्तीचा मनमुराद वापर पाहता, हसावे की रडावे हेच समजेनासे झाले. बर्लिन शहरातील एक चित्रपटगृह (तेथे चित्रपट महोत्सव सुरू होता हे या ठिकाणी लक्षात घ्यावे.) पूर्ण भरताच अख्खे युरोपच शाहरूखच्या प्रेमात पडल्याचा साक्षात्कारही काहींना झाला. अखेर काही वाद वगळता, चित्रपट हिट झाला आणि या वाहिन्यांनी काही प्रमाणात उसंत घेतली. पुणे येथील दहशतवादी हल्ल्यानंतर तर हे प्रकरणही मागे पडले.
या सर्व तमाशात कुणी काय मिळवले? क्रमांक एकवर शाहरूख. अफाट प्रसिध्दी व फुकटच्या पोलिस बंदोबस्तामुळे सुमार चित्रपटाला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे तोच बॉलिवुडचा बादशहा असल्याचे सिध्द झाले. क्रमांक दोन कॉंग्रेस. आणिबाणीच्या काळातील ‘आंधी’ आणि ‘किस्सा कुर्सी का’ या चित्रपटांविरूध्द दडपशाहीचा वापर करणार्‍या कॉंग्रेसने यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची टिमकी वाजवून घेतली. आपण धार्मिक आणि भाषक अल्पसंख्यांकांचे रक्षणकर्ते असल्याचेही त्यांनी दाखवून दिले. जनतेचे लक्ष महागाईपासून दुसरीकडे वळविण्यात या प्रकरणाने महत्वाची भूमिका पार पाडली. राहुलजींच्या दौर्‍यापाठोपाठ ‘खान’ प्रकरणातून मुख्यमंत्री चव्हाण यांनी पक्षांतर्गत विरोधकांवर मात केली. इकडे लागोपाठच्या पराजयाने जर्जर झालेली शिवसेना या काळात पुन्हा आपल्या जुन्या रंगामध्ये दिसली. याचा त्यांना काही प्रमाणात तरी लाभ होणार असल्याचे राजकीय निरिक्षकांचे मत आहे. शरदरावांनी बाळासाहेबांना महत्व देऊन केंद्र आणि राज्यातील आपल्या सहकार्‍यांना योग्य तो संदेश दिला. मनसेनेही या प्रकरणी अमिताभ आणि पर्यायाने शिवसेनेवर शरसंधान करण्याची संधी सोडली नाही. मात्र भाजपाची या प्रकरणी पूर्णत: गोची झाली. अर्थात यामुळे युतीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लागले आहे.
जनतेच्या पदरी मात्र भ्रमनिरासाशिवाय काहीही नाही. वृत्तवाहिन्यावरील ‘खान’चा खमंग ‘रिअॅलिटी शो’ आणि त्यानंतर मुद्दामहून त्या चित्रपटाला पाहिल्यावरही सर्वसामान्यांच्या जीवनात फारसा फरक पडला नाही. गेल्या आठवड्यात दुधाच्या भावात प्रति लिटर दोन रूपयांनी वाढ झाली. आता पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसचीही दरवाढ अपेक्षित आहे. दहशतवादी नवनवीन ठिकाणी निष्पाप जनांना मारत आहेत. अर्थात याविरूध्द रस्त्यावर उतरण्यात ना विरोधकांना रस आहे ना सत्ताधार्‍यांना फिकीर! ते तर घेताहेत जनतेच्या भावना भडकावणार्‍या…आपली राजकीय पोळी शेकणार्‍या प्रकरणांचा शोध. राजकारण, सिनेमा आणि क्रिकेट याभोवतीच फिरणार्‍या आपल्या समाजाला कुणीही अगदी साध्या मुद्यावरून मूर्ख बनवतो. या प्रकरणातूनही यापेक्षा वेगळे काही सिध्द झाले नाही.
(प्रसिध्दी दिनांक १८ फेब्रुवारी २०१०)

About the author

shekhar patil

Leave a Comment