Featured slider राजकारण

खलपुरूष ते महापुरूष

Written by shekhar patil

पाकिस्तानचे जनक मोहंमदअली जीना यांच्या अलीगड विद्यापीठातील प्रतिमेवरून रणकंदन सुरू असतांना भाजपच्या बहराईच येथील खासदार सावित्रीबाई फुले यांनी ‘जीना हे महापुरूष असून त्यांच्या प्रतिमा शक्य तिथे लावाव्यात’ ही अचाट सूचना करून खळबळ उडवून दिली आहे. मुळातच इतिहासाकडे एकांगी नजरेतून पाहिल्यामुळे वारंवार कोलांटउड्या माराव्या मारणे अटळ असल्याचे भाजप नेत्यांच्या लक्षात कधी आलेच नाही. याचमुळे आजवर जिनांना खलपुरूष संबोधणार्‍या पक्षाचे नेते आता त्यांच्या महापुरूषत्वाची जाहीर प्रमाणपत्रे वाटू लागली आहेत. अर्थात, यातूनच भाजपमधील अंतर्विरोधही स्पष्ट झाला आहे.

अनेकदा जिवीत व्यक्ती वा प्रत्यक्षातील घटनांपेक्षा त्याच्या पश्‍चात त्याच्यावरून वाद होत असतात. यांनाच इतिहासातील छळणारी भूते असे अनेकदा संबोधिले जाते. भारतीय उपखंडात अनेक महापुरूषांच्या भाग्यात हा कुयोग असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात पाकिस्तानचे निर्माते म्हणून ख्यात असणारे मोहंमदअली जीना यांचाही समावेश असून त्यांच्यावरून सुरू असणारे वाद थांबण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहेत. अलीगड विद्यापीठात असणार्‍या जीना यांच्या प्रतिमेवरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहेत. यावरून हिंदूत्ववादी विद्यार्थी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यातूनच संघर्षाची ठिणगी पडली आहे. जीना यांची प्रतिमा अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून असल्यामुळे आताच याला हलविण्याची आवश्यकता नसल्याचे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे मत आहे. तर देशाच्या फाळणीस कारणीभूत असणार्‍यांची प्रतिमा कशासाठी ? हा सवाल विरोधी गटाने उपस्थित केला आहे. यावरून अलीगडसह परिसरातील तणावाचे वातावरण कमी झाले नसतांनाच राजकीय नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे हा वाद अजूनच चिघळला आहे. वास्तविक पाहता, भाजपच्या राजकीय विचारसरणीत मोहंमदअली जीना यांना ‘फाळणी पुरूष’ म्हणून संबोधिले जाते. यामुळे अलीगडच्या वादात भाजप नेते हिंदूत्ववादी विद्यार्थ्यांच्या मदतीला येतील असे वाटत होते. आणि झालेही तसेच ! अलीगड येथील भाजपचे खासदार सतीश गौतम यांनी तातडीने ही प्रतिमा हटविण्याची मागणी केली. तर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लागलीच याच आशयाचे वक्तव्य करून त्यांना पाठींबादेखील दिला. तथापि, त्यांचेच सहकारी आणि उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी मोहंमदअली जीना हे महापुरूष असून त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नसल्याचे वक्तव्य केल्यामुळे खळबळ उडाली. याहूनही पुढचा पल्ला भाजपच्या युपीतल्याच बहराईच येथील खासदार सावित्रीबाई फुले यांनी गाठला. त्यांनी जीना हे महापुरूष असून त्यांच्या प्रतिमा आवश्यक तिथे लावल्या पाहिजेत असे वक्तव्य करून नवीन वादाला आमंत्रण दिले आहे.

गत लोकसभा निवडणुकीत तत्कालीन युपीए सरकारविरोधी रोषाला कथित मोदी लाटेमध्ये परिवर्तीत करून भाजपने दणदणीत विजय संपादन केला असला तरी या पक्षातील वैचारिक अंतर्विरोध अनेकदा उफाळून येत असतात. विशेष करून अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिल्यानंतर भाजपमधील एससी व एसटी प्रवर्गातील खासदारांनी एकमुखाने याचा जोरदार प्रतिकार केला. यावरून खुद्द पंतप्रधानांनी भाष्य करून असला कोणताही प्रकार होणार नसल्याची ग्वाही दिली. तर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांना फिरवण्यासाठी अध्यादेश आणण्याची तयारीदेखील सुरू करण्यात आली आहे. या वादात भाजपचे खासदार उदीत राज यांच्यासोबत बहराईच मतदारसंघातून निवडून आलेल्या सावित्रीबाई फुले यांनीही अतिशय आक्रमक भूमिका घेतली होती. आता याच सावित्रीबाईंनी भाजपच्या विरोधातील भूमिका घेतल्याने खळबळ उडाली आहे. यावरच न थांबता गरीबी, भूकबळी आदींसह अन्य महत्वाच्या मुद्यांवरून लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी जिनांच्या प्रतिमेचा प्रश्‍न उकरून काढल्याचे सांगत त्यांनी आपल्या पक्षाला घरचा आहेरदेखील दिला. विशेष बाब म्हणजे याच प्रकारचा आरोप काँग्रेससह विरोधी पक्षदेखील करत असल्यामुळे सावित्रीबाई फुले यांनी थेट विरोधकांचे समर्थन केल्याचे स्पष्ट झाले आहे.

अखंड भारताची फाळणी हा आपल्या इतिहासातील अतिशय वेदनादायी अध्याय आहे. मुळातच फाळणीसाठी कुणी एक व्यक्ती अथवा पक्ष कारणीभूत नाहीय. तर याला अनेक घटकांचा हातभार लागला असल्याची बाब आपण समजून घेतली पाहिजे. द्विराष्ट्रवादाचा सिध्दांत हा कट्टर मुस्लीम आणि हिंदू विचारांमधून जन्माला आला असला तरी मुस्लीम लीग आणि काँग्रेस नेत्यांच्या सहमतीविना फाळणी शक्यच नव्हती. अर्थात मोहंमदअली जिनांच्या नेतृत्वाखालील मुस्लीम लिगने मुसलमानांसाठी स्वतंत्र राष्ट्राची मागणी करत यावर विचार न झाल्यास ‘डायरेक्ट अ‍ॅक्शन’ची धमकी दिली. याचा प्रारंभच इतका भयंकर होता की, फाळणी झाली नसती तर अख्खा भारतीय उपखंड एका प्रदीर्घ रक्तरंजीत गृहयुध्दात होरपळला असता. नेमका हाच धोका लक्षात घेत काँग्रेसने ही मागणी मान्य केली आणि यातूनच भारत आणि पाकिस्तान विलग झाले. यामुळे फाळणीचे पाप हे फक्त आणि फक्त मोहंमदअली जीना वा अन्य कोणत्याही तत्कालीन नेत्यांच्या माथी मारता येणार नाही. आणि उरला प्रश्‍न प्रतिमेचा; तर हा मुद्दा आताच उपस्थित करणे यामागील हेतू हा राजकीय असल्याचेही कुणापासून लपून राहिलेले नाही.

आपण इतिहासाकडे निकोप दृष्टीने पाहू शकत नाही. यामुळे आपल्या विचारधारेच्या विरोधात असणार्‍यांचे नाव, प्रतिमा, वास्तू अथवा पुतळादेखील आपण सहन करू शकत नाही. यामुळे पाकमध्ये शहीद भगतसिंग यांच्या नावाला विरोध करणारे व भारतात जिनांच्या प्रतिमेवरून अकांड-तांडव करणार्‍यांची मानसिकता एकच मानावी लागणार आहे. प्रतिमेला विरोध करा कंपू भविष्यात मुंबईमधील ‘जीना हाऊस’ उद्ध्वस्त करण्यासाठी पुढे सरसावल्यास नवल वाटणार नाही. तर दुसरीकडे भारतातील राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांची इतिहासाकडे पाहण्याची दृष्टीसुध्दा समतोल नाही. यामुळे इकडे भारतात जिनांची प्रतिमा गाजत असतांना काँग्रेसचे बोलभांड निलंबीत नेते मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानात जाऊन त्यांचे जाहीर गुणगान केले. तर भाजपने लागलीच याला कर्नाटक निवडणुकीत मुद्दा बनविला. म्हणजेच मृत जीना हे अनेकांसाठी जणू काही राजकीय यशाचा ‘जीना’ बनल्याची बाब आपण अनुभवत आहोत. देशाच्या राजकारणात पाक आणि त्या राष्ट्रातील नेत्यांबाबत आपल्या अनेक मान्यवरांनी टोकाची वक्तव्ये केली आहेत. मात्र अलीकडच्या कालखंडाचा विचार केला असता, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या राजकीय कारकिर्दीची अखेर जिनांमुळेच झाल्याचे आपण पाहिले आहे. जिनांच्या मजारवर पुष्पांची उधळण करत ते खर्‍या अर्थाने धर्मनिरपेक्ष असल्याची श्रध्दांजली अर्पण करताच, अडवाणींची भाजपमधील सद्दी संपुष्टात आली. याच जिनांमुळे सध्या राजकीय विजनवासात असणार्‍या अडवाणींच्या भारतीय जनता पक्षामध्ये सुंदोपसुंदी सुरू झाल्याची बाबदेखील लक्षणीय आहे. मोहंमदअली जिनांना ‘सेक्युलर’ म्हणून अडवाणी गोत्यात आले असतांना त्यांच्याच पक्षाची एखादी नवखी खासदार व एका राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांना ‘महापुरूष’ म्हणून गौरवान्वित करतात हा विलक्षण विरोधाभास दिसून येत आहे. संघ-भाजपच्या विचारसरणीत खलपुरूष असणार्‍या जिनांना त्यांच्याच पक्षाचे नेते महापुरूषांच्या पंक्तीत बसवत असल्याची बाब हा काळाचाच महिमा नव्हे तर काय !

About the author

shekhar patil

Leave a Comment