Featured चित्रपट

खट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…

Written by shekhar patil

आज दादा कोंडके यांची जयंती. माय मराठीच्या या थोर सुपुत्राला अजूनही हवे ते स्थान मिळाले नाही याची खंत मनाला नक्कीच वाटते. अर्थात समाजातील ढुढ्ढाचार्यांनी दादांना मान्यता दिली नसली तरी असंख्य रसिकांच्या हृदयातील त्यांचे स्थान कुणी हिरावून घेणार नाही. त्यांच्या प्रत्येक जयंती आणि पुण्यतिथीला या महान कलावंताला लिखाणातून मानाचा मुजरा नक्कीच करावासा वाटतो. मग यात आज तरी खंड कसा पडणार ?

मी दादा कोंडकेंचा जबरदस्त चाहता असल्याचे आधीही अनेकदा सांगितले आहे. आम्ही सर्व बालमित्र दादांवर निस्सीम प्रेम करणारे होतो. आजही अनेकदा या आठवणी निघतात. काल म्हणजेच दादांच्या जयंतीच्या आदल्या सायंकाळी माझे मित्र सुनील चौधरी यांच्यासोबत त्यांच्याशी संबंधीत गप्पांचा फड रंगला. अनेक आयामांमधून दादांच्या कलाकृतींचे रसग्रहण सुरू झाले. अचानक दादांच्या संपूर्ण आयुष्यावर पीएच.डी. केलेले मित्र मिलींद दुसाने यांचे स्मरण झाले. मिलींदजी सध्या रायगडचे जिल्हा माहिती अधिकारी आहेत. ते जळगावला असतांना जुळलेला स्नेह कायम असल्याने साहजीकच त्यांना फोन लावला. यानंतर जवळपास ३५-४० मिनिटे फक्त आणि फक्त दादा कोंडके यांच्यावर चर्चा झाली. यातील सर्व तपशील आज सांगणे अप्रस्तुत आहे. मात्र यातून दादांच्या चित्रपटांकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी मिळाली. याबाबत कधी तरी नक्कीच सविस्तरपणे लिहणार आहे. मात्र आज दादांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून त्यांच्या एका अजरामर गाण्याबाबत दोन शब्द.

दादांच्या ‘तुमचं आमचं जमलं’ या चित्रपटातील ‘झाल्या तिन्ही सांजा…’ हे गाणे मला खूप आवडते. याला असंख्य वेळेस ऐकून वा पाहूनही मन तृप्त होतच नाही. खरं तर, या चित्रपटात एकापेक्षा एक सरस गाणी आहेत. आजही महाराष्ट्राच्या कान्याकोपर्‍यात दुमदुमणार्‍या ‘अंजनीच्या सूता’ या गाण्याने केव्हाच अमरत्व धारण केले आहे. यावर मी आधीच लिहले आहे. याच प्रमाणे ‘चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटामधी’, ‘आल्या आल्या जाऊ नका’ तसेच ‘चल रं वाघ्या रडू नको’ आदी गाणीदेखील एकापेक्षा एक सरस अशीच आहेत. तथापि, ‘झाल्या तिन्ही सांजा’मध्ये असणार्‍या विविधांगी विलोभनीय रंगांची सर कुणाला नसल्याचे माझे तरी मत आहे. प्रेमाच्या अभिव्यक्तीमध्ये चोवीस तासांमधील विविध कालखंडाला दर्शविण्यात आले आहे. यात रात्र, चंद्र, चांदण्या आदी बाबी प्रेम आणि विरहाशी निगडीत असल्यामुळे या प्रतिमा अनेक गाण्यांमध्ये आल्या आहेत. ते साहजीकही आहे. दिवसातील प्रतिकांमध्ये सृष्टीच्या विविध रूपांना प्रेमाशी जोडण्यात आल्याचेही आपण अनेक गाण्यांमधून अनुभवतो. मात्र तिन्ही सांजेच्या कातरवेळेच्या हुरहुरीला एखादा उत्तुंग प्रतिभावंत शब्द साज चढवू शकतो. सायंकाळशी संबंधीत गाणी विपुल आहेत. उर्दूत तर संध्यासमयाला प्रेम विरहाची कारूण्यपूर्ण झालर प्रदान करण्यात आली आहे. अर्थात तिन्ही सांज ही मनातील कल्लोळ अधिक प्रभावीपणे ठसविणारा असतो. (येथे फक्त चित्रपट गीतांचाच विचार केल्यामुळे साहजीकच ग्रेस यांच्या काव्यातील संध्या जाणीवपूर्वक टाळतोय.) या पार्श्‍वभूमिवर, ‘झाल्या तिन्ही सांजा’ हे गाणे एकाच वेळी अनेक पातळ्यांवरून सर्वोत्तमतेला स्पर्श करणारे ठरले आहे.

( खाली दिलेल्या व्हिडीओत पहा हे नितांतसुंदर गाणे !)

दादांच्या या गाण्याला अनुभवण्याआधी याची पार्श्‍वभूमि समजून घेणे महत्वाचे आहे. या चित्रपटात अगदी साधाभोळा असणारा नायक आपल्या दुष्ट व व्यसनी भावामुळे अक्षरश: देशोधडीला लागलेला असतो. हाताला मिळेल ते काम करून गुजराण करतो. यामुळे व्यवहारी जगात त्याची पत घसरलेली असली तरी त्याची वाग्दत्त वधू असणारी नायिका मात्र त्याच्यावर अनुरूक्त असते. तिला त्याचा निष्कपट स्वभाव आणि सरळपणा खूप भावत असतो. मात्र एखाद्या लहानशा खेड्यात आपल्या प्रेमाची अभिव्यक्ती करणे फारसे सोपे नसते. याच गाण्यात म्हटल्यानुसार…घालू कशी मी साद…होईन गाजावाजा अशी अनामिक भिती तिला असते. यामुळे तिन्ही सांजेच्या मन भरून आलेल्या क्षणांमध्ये ती स्वप्नांच्या दुनियेत शिरते. येथूनच बैलगाडीच्या घुंगरांच्या तालावर हे गाणे सुरू होते. या ड्रीम सिक्वेन्समध्ये नायक असणारे दादा कोंडके हे बाहेर गावावरून नायिका (अंजना मुमताज) हिला संध्याकाळी भेटायला येत असल्याचे दर्शविण्यात आले आहे. एकीकडे मुग्ध नायिका आपल्या मनातील भावना अतिशय अलवारपणे व्यक्त करते. गावातील जीवनात शक्य असणारा साधासुधा श्रुंगार करून ती आपल्या सख्याची डोळ्यात प्राण आणून वाट पाहू लागते. तो आल्यानंतर ‘मी हे करेल….मी ते करेल’ असे स्वप्नरंजन करतांनच आपल्या सजणाला अंमळ उशीर होत असल्याचे पाहून ती कावरीबावरी होते. तर दुसरीकडे नायकालाही भेटण्याची अधिरता असली तरी अकस्मात घडणार्‍या घटनांनी तो त्रासून जातो. केव्हा त्याच्या बैलगाडीचे चाक निखळून पडते तर केव्हा वांड बैल सुटून पुढे पळू लागतो. त्याचे सोबती मात्र या सर्व परिस्थितीत आपापल्या वाद्याची इमानदारीने संगत करतात. नायिका आपल्या सख्या-शेजारणींना मनातील गुपीत उघडे करून दाखवितांना बेभानपणाच्या सर्वोच्च शिखरावर पोहचत असतांनाच नायकाला अवचितपणे मारलेली मिठी ही अवघ्या गावात बोभाटा करते आणि हे विलक्षण सुंदर गाणे संपते. कुणी तरी आपली वा आपण कुणाची तरी वाट पहावी अशी एक तरी संध्याकाळ आपल्या आयुष्यात यावी; कुणाच्या तरी खट्याळ मनातील खोट्या चाहूलीत आपण रंग भरावे अशी अपेक्षा सर्वांचीच असते. कुणाची इच्छा पूर्ण होते तर कुणी सुस्कारेच सोडत राहतात. यामुळे तिन्ही सांजेला जेव्हाही कधी भावनांची गर्दी दाटते तेव्हा असल्या अनेक सुगंधीत संध्या माझ्या मनात रूंजी घालू लागतात…आणि ओठांवर आपोआप हेच गाणे येते.

‘झाल्या तिन्ही सांजा’ या गाण्याला खुद्द दादा कोंडके यांनीच लिहले आहे. दादांना अभिनयासोबत काव्याचेही अंग होते. त्यांनी अगदी मोजकी गाणी लिहली असून ती मराठी भाषेचे वैभव बनलेली आहेत. प्रस्तुत गीताचादेखील यात कधीच समावेश झालेला आहे. ग्रामीण मराठी भाषेचा अत्यंत लीलया वापर करणार्‍या मोजक्या मान्यवरांमध्ये त्यांचे नाव आघाडीवर आहे. या गाण्यातही दादांच्या प्रतिभेची उत्तुंग झेप आपण अनुभवू शकतो.

त्यांच्याच ओठांचा ओठी रंग लाल ।
आठवणीने त्यांच्या बाई रंगले हे गाल ॥

यातील निखळ प्रणय आणि निव्वळ आठवणीने गाल रंगण्याची उपमा ही दादांशिवाय कुणाला सुचू शकते का ? याच प्रमाणे एकाहून एक उपमांनी प्रेमाच्या विविध रंगांची उधळण या गाण्यातून आपण अनुभवू शकतो. राम-लक्ष्मण यांच्या अस्सल मराठी मातीचा सुगंध असणार्‍या संगीताने या शब्दांना जणू काही कोंदणच प्रदान केले आहे. उषा मंगेशकरांच्या विलक्षण उर्जावान स्वराने याला नवीन उंची प्रदान केली आहे. आणि यावर कळस चढवलाय तो खुद्द दादा कोंडके आणि अंजना मुमताज यांनी ! या चित्रपटातील नायिका ही शहरातून गावात आलेली असते. यामुळे दादांनी उषा चव्हाण यांच्याऐवजी अंजना मुमताज यांनी संधी दिली होती. त्यांनी या गाण्यातील सर्व आयाम अगदी तन्मयतेने वठविले. तिन्ही सांजेला आपल्या रायाच्या प्रतिक्षेत असणारी नायिका, तिच्या मनातील कल्लोळ, आतुरता आदी सारे काही त्यांनी विलक्षण ताकदीने रंगवले आहे. आणि दादांबाबत तर बोलणे नकोच. नायकाच्या धांदरटपणामुळेच त्याला उशीर होत असतो. मात्र तो कसा तरी वेळेत पोहचतो. या प्रवासाच्या अंतीम टप्प्यांना दादांनी दोन हात उंचावून केलेले बेभान नृत्य हे मनाला मोहवून जाते. या गाण्यात दादांच्या तोंडी एकही शब्द नसला तरी ते भाव खाऊन जातात. आणि हे गाणे ऐकणार्‍याला, पाहणार्‍याला आणि खरं तर पूरेपूर अनुभवणार्‍याला एक विलक्षण अनुभूती प्रदान करतात हीच दादांची महत्ता. याचमुळे दादांना लब्धप्रतिष्ठितांनी कायम हेटाळणीच्या दृष्टीने पाहिले तरी असंख्य मराठी जनांनी त्यांना आपल्या हृदयात मानाचे स्थान दिले आहे. थँक्स दादा…असल्या अनेक क्षणांची उधळण केल्याबद्दल…आम्हाला आणि समस्त मराठी जनांना निखळ आनंदाचा अक्षत स्त्रोत प्रदान केल्याबद्दल !

या गाण्यातील प्रत्येक शब्दातून आपल्याला दादांचे विलक्षण भाषासौंदर्य अनुभवास येते.

झाल्या तिन्ही सांजा करून सिणगार साजा
वाट पहाते मी गं येणार साजण माझा ॥

प्रितीच्या दरबारीचं येणार सरदार
मायेच्या मिठीचा त्यांच्या गळ्यात घालीन हार
दिलाच्या देव्हार्‍यात घालीन मी पूजा
वाट पहाते मी गं येणार साजण माझा ॥

भेटीत रायाच्या सांगेन मी सारं
सोसवेना बाई मला यौवनाचा भारं
तान्हेल्या हरिणीला हळूच पाणी पाजा
वाट पहाते मी गं येणार साजण माझा ॥

त्यांच्याच ओठांचा ओठी रंग लाल
आठवणीने त्यांच्या बाई रंगले हे गाल
धुंद व्हावी राणी रंगून जावा राजा
वाट पहाते मी गं येणार साजण माझा ॥

वाटतं सख्याचं वाजलं पाऊल
खट्याळ मनाला लागे खोटीचं चाहूल
घालू कशी मी सादं होईल गाजावाजा
वाट पहाते मी गं येणार साजण माझा ॥

इचारच पडला बिजार्‍या मनाला
वेळ का गं व्हावा बाई सख्या सजणाला
बिलगून बसावी संभूला सारजा
वाट पहाते मी गं येणार साजण माझा ॥

About the author

shekhar patil

1 Comment

  • खुप छान वर्णन केलात, तो रम्य काळ पुन्हा आठवला, आणि झाल्या तीन्ही सांजा सारखे काव्य आता पुन्हा अशक्यच…!

Leave a Comment