Featured slider चित्रपट

क्षण एक पुरे प्रेमाचा…!

Written by shekhar patil

रूपेरी पडद्यावरील महान शोकात्म कथा म्हणून ख्यात असणार्‍या ‘टायटॅनिक’ला आज २० वर्षे होत आहेत. पहिल्यांदा टायटॅनिक पाहिल्यानंतरची अवस्था आजही मी विसरू शकलो नाही. तीन तासांपेक्षा मोठा असणारा हा चित्रपट संपल्यावर अक्षरश: भारावून गेलो. व्हिज्युअल्स संपून चित्रपटाची श्रेयनामावली सुरू होताच बाहेर पडण्याचा विचार केला तोच…काळजाचा ठाव घेणार्‍या शब्दांनी पाय थबकले. या चित्रपटातील थीम म्युझिकच्या जोडीला मिळालेल्या शब्दांच्या साथीने मंत्रमुग्ध झालो. पडद्यावर काळ्या पार्श्‍वभूमिवरील पांढर्‍या निर्जीव अक्षरांनाही या गाण्याने जणू काही जीवंत केले.

टायटॅनिक चित्रपटासोबतच या गाण्यानेही भावविभोर केले. इंटरनेटचा वापर सुरू झाल्यावर या गाण्याला असंख्य वेळेस ऐकले/पाहिले तरी मन भरतच नाही. प्रत्येक वेळी आपल्याला नवीन काही तरी गवसल्याची जाणीव होते. ‘टायटॅनिक’चे अनेक अंगांनी विश्‍लेषण करण्यात आले आहेत. या चित्रपटातील एकही अंग नसेल की ज्यावर भरभरून लिहले/बोलले गेले नाही. यावर अनेक पुस्तके आलीत. डॉक्युमेंटरीज तयार करण्यात आल्या. लेखांची तर मोजदादच करता येणार नाही. मात्र माझ्या मते या चित्रपटाचा संपूर्ण सार यातील ‘माय हार्ट विल गो ऑन’ या गाण्यात आहे. याच्या अंगाने आपण टायटॅनिक पाहिला तर प्रेमाचे अत्यंत विलोभनीय आणि अजरामर स्वरूप आपण अनुभवू शकतो.

आज दोन दशके उलटूनही टायटॅनिकचे गारूड आपल्या मनावरून उतरण्यास तयार नाही. याची भव्यता आणि याच विशाल कॅनव्हासवरील जॅक आणि रोझची प्रेमकथा आपल्याला भारून टाकते. वास्तविक पाहता, टायटॅनिकवरील प्रचंड हॅपनींग्न हे सूचक पध्दतीने दाखविण्यात जेम्स कॅमरान यशस्वी झाला आहे. विशेषत: दोन हजारांपेक्षा आबालवृध्दांना घेऊन जाणार्‍या टायटॅनिकमधील नायक-नायिका आणि त्यांच्याशी संबंधीत मोजक्या पात्रांना त्यांच्या स्वभावदर्शनासह ठसविणे फारसे सोपे नव्हते. मात्र हे शिवधनुष्यही त्याने लिलया पेलले. अर्थात केंद्रस्थानी असणार्‍या रोझ आणि जॅकच्या अंतर्बाह्य उलगडून दाखवितांना त्याच्या प्रतिभाशक्तीने उत्तुंग झेप घेतली आहे. एकीकडे भणंग चित्रकार जॅक डॉसन तर दुसरीकडे विलक्षण कलासक्त आणि स्वतंत्र विचारसरणीची बंडखोर रोझ डेव्हिट बकाटेर. जॅकला जुगारात टायटॅनिकचे तिकिट जिंकल्यामुळे योगायोगाने प्रवासाची संधी मिळाल्याने तो जाम खूश आहे. आपल्या मित्रासोबत तो भविष्यरंजन करतो. त्याच्यासाठी टायटॅनिक हा विलक्षण आशादायी प्रवास आहे. तर याच्या अगदी उलट रोझसाठी टायटॅनिक म्हणजे गडद नैराश्याने युक्त असणार्‍या अधांतरी भविष्याकडची वाटचाल होय. कोणताही आगापिछा नसणारा जॅक आपल्या फक्कड जीवनात खूश आहे. तर आत्यंतिक श्रीमंतीतल्या बेगडी शिष्टाचाराने रोझ अक्षरश: गुदमरून जातेय. एकीकडे रोझच्या विवाहामुळे आपल्या आयुष्यातील उर्वरित कालखंड सुखद जाणार असल्याचा व्यवहारवाद तिच्या आईकडे आहे. तर दुसरीकडे ज्याच्याशी रोझचा विवाह होणार तो कॅल हॉकले हा तिच्यावर पराकोटीचा हक्क गाजविणारा ‘पझेसिव्ह’ स्वभावाचा आहे. रोझच्या बंडाचा सूर नेहमी तिच्या आईच्या रडगाण्यासमोर हरत असतो. मात्र जेव्हा अति होते तेव्हा आत्मघाताशिवाय तिच्यासमोर काहीही मार्ग उरत नाही. याच बिंदूपासुन सुरू होणार्‍या या प्रेमकथेतील अनेक वळणे टायटॅनिकच्या प्रवासाला समांतर चालतात. या वाटचालीतील सर्वात लक्षणीय बदल म्हणजे रोझचे फुलणे होय. टायटॅनिकच्या प्रवासाकडे आत्यंतिक त्राग्याने पाहणार्‍या रोझला जॅकचे प्रेम आयुष्याकडे पुन्हा एकदा सकारात्मकतेने पहायला लावते. ती अवखळ, स्वच्छंदी बनते. जीवनावर प्रेम करू लागते. खरं तर जॅकसमोर ‘न्यूड’ बसल्यावरही तो चित्र काढण्याच्या पलीकडे काहीही करत नाही याचे तिला अप्रूप वाटते. मात्र आपल्या प्रेमकथेचा नेमका काय शेवट होणार? याचा अंदाज आल्यानंतर ती स्वत:हून जॅकला समर्पित होते. टायटॅनिक बुडतांनाही ती जॅकची साथ सोडत नाही. येथून सुरू होणारा या प्रेमकथेचा उत्तरार्ध टायटॅनिकला एक उच्च कलाकृतीच्या पातळीवर नेऊन सोडणारा आहे.

टायटॅनिकला जलसमाधी मिळाल्यानंतर एका लाकडी दरवाज्यावर रोझला बसवून जॅक स्वत: बर्फासमान पाण्यात उभा राहतो. खरं तर त्याला मृत्यूची चाहूल लागलेली असते. यामुळे मरणप्राय वेदनांनी कुडकुडत असतांनाही तो रोझला जीवन जगण्याची उमेद देतो. टायटॅनिक चित्रपटाची ही दोन टोके आहेत. एकीकडे प्रेमात धुंद झालेले आणि उन्मुक्त जीवनाची आस असणारे जॅक व रोझ हे टायटॅनिकच्या समोरील रेलींगवर हात पसरवत आनंदोत्सव साजरा करतात. एकमेकांना जन्मभर साथ देण्याचा मनोमन संकल्प करतात. जीवनाला जणू काही कवेत घेऊ पाहतात. त्यांची ही पोझिशन टायटॅनिकची ओळख बनली आहे. मात्र दुसरीकडे मृत्यूकडे वाटचाल करणारा जॅक हा रोझशी शेवटचे बोलतांनाचे चित्रदेखील आपण विसरता कामा नये. एकीकडे उत्फुल्लता तर दुसरीकडे नैराश्य; एकीकडे रसरशीत जीवन तर दुसरीकडे मृत्यूची गडद छाया! जीवनाचे हेच शाश्‍वत सत्य टायटॅनिकमधून आपल्याला समजते. आणि अर्थात हीच या चित्रपटाची महत्तादेखील होय.

जॅक आणि रोझच्या प्रेमकथेला रूपेरी पडद्यावर तीन तासांपेक्षा जास्त कालखंडात चित्रीत करण्यात आले आहे. मात्र या चित्रपटाचे थीम साँग असणार्‍या ‘माय हार्ट विल गो ऑन’ या गाण्यात अवघ्या काही मिनिटांमध्ये (चित्रपटात ५.११ मिनिटे तर अल्बममध्ये ४.३९ मिनिटे) या चित्रपटाचा संपूर्ण सार अभिव्यक्त करण्यात आला आहे. मुळातच टायटॅनिकचा निर्माता व दिग्दर्शन जेम्स कॅमरॉनला या चित्रपटात कोणतेही थीम साँग नको होते. मात्र ‘माय हार्ट’च्या रेकॉर्डींगनंतर त्याने चित्रपटाच्या शेवटी या गाण्याला परवानगी दिली. नंतर दिलेल्या अनेक मुलाखतींमधून या गाण्याबातची सांगोपांग माहिती समोर आली आहे. या गाण्याने गायिका सेलीन डिऑनला विश्‍वव्यापी किर्ती प्रदान केली. मात्र तीदेखील सुरवातीला या गाण्याबाबत फारशी आशादायक नव्हती. तथापि, जेम्स हॉर्नरचे संगीत, विल जेनींग्जचे शब्द आणि सेलीनचा आवाज यातून एक अजरामर कलाकृती जगासमोर आली.

‘माय हार्ट विल गो ऑन’ हे गाणे म्हणजे निव्वळ स्मरणरंजन नाही. स्मृती या मधुर असतात…अन् व्याकुळ करणार्‍याही. या गाण्यातेखील माधुर्य आणि व्याकुळता असली तरी यातील आशावाद हा यापेक्षा किती तरी मोठा आहे. आपण काही क्षणांसाठी एकत्र आलो तरी तू जे काही भरभरून दिलेय हे मी कधीही विसरणार नाही…असा आशावाद नायिका व्यक्त करतेय. जॅक गोठलेला असतांना रोझ विलक्षण कातर आवाजात कम बॅक…कम बॅक अशी साद घालते. मात्र त्याने कधीच आपला निरोप घेतल्याचे लक्षात आल्यानंतर तिने त्याला दिलेला शब्द आठवतो. आणि तिला जीवन हाक देते. ही सर्व घालमेल या गाण्यातून व्यक्त करण्यात आली आहे. खरं तर ‘माय हार्ट’ या गाण्याची सुरवातच अफलातून आहे. आयरिश फ्लुटमधील मनमोहक सुरांच्या सोबतीला सेलीनच्या कुजबुजण्याच्या स्वराची साथ मिळते. जणू काही नवख्या प्रेमिकांचे गुज! यथावकाश सेलीनचा सूर टिपेला जातो तेव्हा टायटॅनिकची शोकांतिकादेखील आपोआपच अधोरेखित होते. अर्थात हे सारे होत असतांना नायिकेचा आशावादही प्रखर होत जातो. जीवनात कितीही नैराश्याचा क्षण आला तरी तुला आणि तुझ्या संगतीत जे काही मिळाले ते आठवून मी जगेल…आनंदाने…उत्स्फुर्तपणे आणि अर्थातच तुझ्या आठवांसह! हेच नायिका सांगते. आणि आपण अक्षरश: भावविभोर होतो. आशावादाने भारून जातो…अगदी चिंब होतो. आयरिश फ्ल्युट, बॅगपाईप, सेक्सॉफोन, गिटार आणि पियोनोच्या साथीला सेलीन डिऑनचा विलक्षण आवाज या गाण्याला नवीन उंची प्रदान करतो. संगीत आणि सेलीनच्या आवाजातील चढउतार ‘टायटॅनिक’च्या महाकाव्यातील अनेक पदर अवघ्या काही मिनिटांमध्ये अशा काही विलक्षण पध्दतीने उलगडून दाखवितात की आपण अक्षरश: थक्क होतो. आपले जीवन रूक्ष आहे. गद्य…कोणतेही सौंदर्य नसणारे. मात्र प्रेमाचा एक स्पर्श संपूर्ण आयुष्यभर पुरणारा असल्याचा संदेश देणारे हे गाणे कोट्यवधी रसिकांसाठी मर्मबंधातील ठेवीसमानच होय. गोविंदाग्रजांच्या ‘प्रेम आणि मरण’ कवितेतील-

क्षण एक पुरे प्रेमाचा
वर्षाव पडो मरणांचा । मग पुढे ॥

या काव्यपंक्ती जॅक आणि रोझची कथा आणि ‘माय हार्ट’ गाण्याच्या माध्यमातून आपल्या समोर अक्षरश: साकारतात. जणू काही क्षणभंगुर जीवनातील प्रेमाचे अमरगान ! मी जेव्हाही या गाण्याला ऐकतो वा पाहतो तेव्हा सर्व आठवणी सर्व वेदना जाग्या होतात. हे गाणे आपल्याला झपाटून टाकते. हे शब्द…हे सूर फक्त जॅक आणि रोझसाठीच नव्हे तर प्रत्येकासाठी बनल्याचे आपल्याला जाणवते. एखाद्या रचनेच्या महत्तेसाठी यापेक्षा कोणत्याही मानकाची गरज नाहीत.

Every night in my dreams
I see you, I feel you
That is how I know you go on
Far across the distance
And spaces between us
You have come to show you go on

Near, far, wherever you are
I believe that the heart does go on
Once more you open the door
And you’re here in my heart
And my heart will go on and on

Love can touch us one time
And last for a lifetime
And never let go until we’re gone
Love was when I loved you
One true time I hold to
In my life we’ll always go on

Near, far, wherever you are
I believe that the heart does go on
Once more you open the door
[And you’re here in my heart
And my heart will go on and on

You’re here, there’s nothing I fear
And I know that my heart will go on
We’ll stay forever this way
You are safe in my heart
And my heart will go on and on

About the author

shekhar patil

1 Comment

Leave a Comment