Featured slider चित्रपट

क्रांतीचे बीजारोपण आणि पोलादी संकल्प

Written by shekhar patil

महान क्रांतीकारक अर्नेस्टो चे ग्वेरा याचा आज ५० वा स्मृती दिन! खरं तर एखाद्या वर्गाचा क्रांतीकारक हा दुसर्‍या (विरोधी) समूहासाठी खलनायक असतो. मात्र राष्ट्र, धर्म, भाषा, वंश, विचार आणि संस्कृतीच्या पलीकडे जात वैश्‍विक पातळीवर क्रांतीला समानार्थी वापरला जाणारा शब्द म्हणजे चे ग्वेरा होय. आज तब्बल अर्ध्या शतकानंतर अनेक संदर्भ बदलले आहेत. विशेषत: चे ने ज्याच्यासाठी आपले आयुष्य समर्पित केले त्या कम्युनिझमची विचारधारा क्षीण झालीय. पूर्व युरोप आणि रशियातील साम्यवादाचा पोलादी पडदा केव्हाच वितळला असून चीनदेखील आर्थिक उदारीकरणाच्या मार्गावरून सुसाट वेगाने आगेकूच करतोय. आज मोजक्या राष्ट्रांमध्ये खर्‍या अर्थाने साम्यवादी सरकारे आहेत. तर जगातील काही देशांमध्ये या विचारधारेवरून चालणारे गट सशस्त्र क्रांतीच्या माध्यमातून आजही संघर्ष करत आहेत. एका अर्थाने ज्या विचारांनी चे ला अजरामर केले तोच विचार आज बर्‍याच प्रमाणात कालबाह्य ठरू लागलाय. असे असूनही एकविसाव्या शतकातसुध्दा क्रांतीचा महानायक म्हणून त्याचा करण्यात येत असलेला गौरव हा अत्यंत विलक्षण असाच आहे. विसाव्या शतकाने अनेक नायक दिलेत. यात मार्क्सवादी विचारधारेचा विचार करता थेट लेनीन, ट्रॉटस्की, स्टॅलीनपासून ते माओ झेडाँग, फिडेल कॅस्ट्रो आणि चे ग्वेरा यांची नावे आपल्या समोर येतात. यातील चे वगळता अन्य दिग्गजांवर काळाने सूड उगवल्याचे दिसून येत आहे. रशियात तर लेनीन, स्टॅलीनचे पुतळे उखडण्यात आले. चीनमध्ये अद्याप माओ छायाचित्रांपुरता मर्यादीत असला तरी त्याची महत्ता कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कॅस्ट्रोच्या मृत्यूला थोडाच कालखंड झाल्यामुळे त्याच्या मूल्यमापनाबाबत आपण बोलू शकत नाही. मात्र कोणत्याही प्रकारची सत्ता हाती नसतांना चे ग्वेरा याच्यात असे काही तरी होते की, ज्यामुळे आज त्याच्या हत्येनंतरही तो आयकॉनीक फिगर म्हणून ओळखला जातोय. जगाच्या अगदी कोणत्याही कोपर्‍यात गेले तरी क्रांती म्हणजेच चे ग्वेरा असे समीकरण दर्शविणार्‍या अनेक बाबी आढळून येतात हीच त्याची महत्ता. आजही त्याला नायकाचा दर्जा मिळाल्याची बाब लोकविलक्षण अशीच आहे.

चे ग्वेरा बाबत खूप लिखाण झालेय. आजही सुरू आहे. त्याच्यावर अनेक चित्रपट निघालेत. डॉक्युमेंटरीज तयार करण्यात आल्या. अजूनही चे ग्वेराचा विविधांगी शोध सुरू आहे. मराठीत दिवंगत अरूण साधू यांनी ‘फिडेल, चे आणि क्रांती’ या पुस्तकातून क्युबन क्रांतीचे अनेक रंग उलगडून दाखविले आहे. अलीकडे तर त्याच्यावर बरीच पुस्तके आली आहेत. या सर्वांपेक्षा २००४ साली आलेला ‘मोटारसायकल डायरीज’ हा चित्रपट वेगळा आहे. एक तर हा त्याच्याच पुस्तकावर आधारित चित्रपट आहे. यात तो तो क्रांतीकारक बनण्याआधीच्या कालखंडाला दर्शविण्यात आले आहे. मात्र एक सर्वसामान्य युवकापासून ते शोषितांच्या हितासाठी आपले आयुष्य पणाला लावण्याचा संकल्प करण्यापर्यंतच्या त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा टप्पा यात विलक्षण परिणामकारकरित्या रेखाटण्यात आला आहे. वयाच्या एकविसाव्या वर्षी मेडिकल कॉलेजातून एक वर्षाचा ‘ड्रॉप’ घेत दक्षिण अमेरिकेचा संपूर्ण खंड आपल्या मोटारसायकलीवरून फिरण्याचा संकल्प अर्नेस्टो चे ग्वेरा करतो. त्याच्या सोबतीला बायोकेमिस्ट असणारा अल्बर्टो ग्रेनाडो हा मित्र येतो. प्रारंभी गंमत व फार तर एक साहस म्हणून ते आपल्या भ्रमंतीकडे पाहत असतात. मात्र या प्रवासात त्यांची मनोदशा बदलत जाते. एका बाजूला ‘आहे रे’ तर दुसरीकडे ‘नाही रे’ या वर्गांमधील भीषण विषमता त्याला अस्वस्थ करते. शेतकरी, शेतमजूर, कामगार, सटरफटर काम करणारे, निरोद्योगी, व्यसनांच्या आहारी गेलेले, रोगराई, दारिद्ˆय, अज्ञानाने पिचलेले तसेच कफल्लक लोक पाहून तो हादरतो. त्यांच्यावर अन्याय करणार्‍यांची मुजोरीदेखील तो अनुभवतो. यातून त्याच्या मनात क्रांतीचे स्फुल्लींग प्रस्फुटीत होते. तो आपले आयुष्य जगात समानता आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी समर्पित करण्याचा संकल्प करतो. या प्रवासातील विविध पैलू अनुभवण्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष मोटारसायकल डायरीज हा चित्रपट पहावा लागेल. मात्र यातील एक दृश्य अविस्मरणीय आहे. खरं तर हा अर्नेस्टो चे ग्वेराच्या आयुष्याला वळण लावणारा क्षण असून या चित्रपटात तो अत्यंत परिणामकारकरित्या साकार करण्यात आला आहे.

‘मोटारसायकल डायरीज’मधील एक दृश्य.

आपल्या प्रवासात अर्नेस्टो आणि अल्बर्टो हे कुष्ठरोग्यांच्या एका वस्तीत पोहचतात. या वस्तीतले भयावह चित्र पाहून त्यांना धक्का बसतो. कारण सर्वसामान्य लोकच नव्हे तर या रोग्यांची कथितरित्या सेवा करणारेदेखील त्यांच्यापासून जे अंतर राखतात ते पाहून त्यांना धक्का बसतो. अगदी नदीच्या एका काठाला रोग्यांची वस्ती तर दुसर्‍या काठावर त्यांचे क्वार्टर्स असतात. मात्र हे दोन्ही मित्र कुष्ठरोग्यांमध्ये बिनधास्त मिसळतात. त्यांच्यासोबत खेळतात, त्यांच्या वेदना जाणून घेतात. त्यांच्यासोबत गीत-संगीताचा आनंद लुटतात. मात्र कथित सेवेकर्‍यांना हे फारसे रूचत नाही. यातच १४ जून १९५२ रोजी अर्नेस्टो चे ग्वेरा याचा वाढदिवस असतो. यानिमित्त कर्मचार्‍यांच्या वस्तीत जंगी पार्टी होते. सर्व जण त्याला शुभेच्छा देतात. चे देखील जोरदार भाषण ठोकतो. मात्र तो मनोमनी उदास असतो. त्याला अमेझॉन नदीच्या दुसर्‍या काठावर असणार्‍या कुष्ठरोग्यांची आठवण येते. आणि आपला खरा वाढदिवस हा त्यांच्यासोबतच साजरा करावा असे तो ठरवतो. आता इथे एक अडचण येते. रात्रीची वेळ असल्याने नदी पार करण्याचे काम करणारी बोट तेथे नसते. यामुळे सकाळपर्यंत वाट पाहण्याशिवाय त्याला कोणताही पर्याय नसतो. मात्र अर्नेस्टो तिथे जायचेच असा अडून बसतो. अल्बर्टोदेखील त्याला समजावतो. मात्र समोरची वस्ती त्याला खुणावत असते. शेवटी तो चक्क नदी पोहून पार करण्याचे ठरवतो. आता अमेझॉन नदीच्या विशाल पात्राला पोहून पार करणे म्हणजे थट्टाबाजीचा खेळ नव्हे. त्या भागात या नदीचा प्रवाह विलक्षण वेगवान असतो. यातच यात हिंस्त्र जलचरांचीही भिती असतेच. सर्वात महत्वाचे म्हणजे अर्नेस्टो चे ग्वेरा याला बालपणापासून दम्याचा त्रास असतो. याच प्रवासात थंड पाण्यात पाच मिनिटे पोहल्यावर त्याला खूप त्रास झाला असतो. यामुळे अर्थातच अमेझॉन नदी पोहून पार करण्याचा संकल्प हा वेडेपणाच्या कोटीतलाच होता. मात्र अर्नेस्टो अमेझॉनच्या थंडगार आणि विलक्षण वेगवान धारेत आपल्याला झोकून देतो तेव्हा हलकल्लोळ उडतो. नदीचे विशाल पात्र पोहून तो दुसर्‍या किनार्‍यावर जातो तेथे त्याचे जोरदार स्वागत होते हे सांगणे नकोच. अर्नेस्टो याने अमेझॉनमध्ये मारलेली उडी ही त्याच्या भावी आयुष्यातील अनेक कठीण संकल्पांचे शिखर सर करण्याची फक्त सुरवातच असते. यातच त्याच्या आयुष्यातील भावी क्रांतीकारी विचारांचे बिजारोपण झालेले असते. ‘मोटारसायकल डायरीज’ हा चित्रपट हा आपल्या भोवतालामुळे अस्वस्थ झालेल्या तरूणातील बदलांना दर्शविणारा आहे. यातील चित्रीकरणदेखील अप्रतिम असेच आहे.

येथे एक योगायोग मुद्दाम सांगावासा वाटतो. चे ग्वेराच्या या धाडसी पोहण्याच्या जवळपास १४ वर्षांनी म्हणजेच १४ जुलै १९६६ रोजी चीनचे राष्ट्राध्यक्ष माओ झेडाँग यांनीही यांगत्से नदीत उडी मारत तिला पार केले होते. एकीकडे वयाच्या विशीत अमेझॉन पार करणारा चे ग्वेरा तर दुसरीकडे वयाच्या ७३व्या वर्षी यांगत्से पार करणारा माओ ही साम्यवादी इतिहासातील पोलादी संकल्पाची उदाहरणे म्हणून ख्यात झाली आहेत. मात्र चे ग्वेराला सत्ता आणि सुखासीनपणा कधी भावला नाही. यामुळे क्रांतीपश्‍चातच्या क्युबातील सुखी जीवन सोडून तो बोलेव्हियाच्या स्वातंत्र्ययुध्दात लढण्यासाठी गेला आणि सीआयए एजंटच्या हातून मारला गेला. मात्र ज्यांनी अर्नेस्टोला गोळ्या घातल्या त्या अमेरिकेतूनही त्याचा ठसा मिटलेला नाही. कदाचित काळाने उगवलेला सूड यालाच म्हणत असावेत. ज्या विचारांसाठी क्रांती होते ते विचार भलेही कालौघात बदलत जातात. मात्र क्रांती चिरायू असते…आणि क्रांतीचे महान नायकसुध्दा! आज अर्नेस्टो चे ग्वेरा याच्या हत्येच्या पाच दशकानंतरदेखील त्याचे होत असलेले स्मरण याचीच ग्वाही देणारे आहे.

पहा: अर्नेस्टो चे ग्वेरा अमेझॉन नदी पोहून पार करण्याचे दृश्य.

About the author

shekhar patil

Leave a Comment