Uncategorized

कौटुंबिक पक्ष-कलह

राजकारणात दगाफटका, शह-काटशह हे सारे नित्याचेच असते. यातच सरंजामशाही मनोवृत्तीच्या भारतीय राजकीय क्षेत्रात तर याला कौटुंबिक कलहाची जोडही मिळाल्याचे दिसून येते. राजे-महाराजांच्या युगात सिंहासन हिसकावण्यासाठी मोठ्या प्रमाणात रक्तपात होत असे. आता राजेशाही लयास गेली असून सिंहासन शब्दही प्रतिकात्मक बनला असला तरी राजकारण्यांच्या मनोवृत्तीत फारसा बदल झाले नाही. आपल्या घराण्याचा राजकीय वारसा अथवा योग्य ‘वाटा’ न मिळाल्यास, त्या कुटुंबातील कलह चव्हाट्यावर येतो. यातूनच बापासमोर मुलगा तर भावासमोर भाऊदेखील उभा ठाकत असल्याची उदाहरणे गल्लीपासून दिल्लीपर्यंत पाहण्यास मिळतात. यातून कित्येक राजकीय घराण्यांच्या अब्रूंची लक्तरे पार वेशीवर टांगली जातात. काही दिवसांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्नुषा स्मिता ठाकरे यांनी फडकावलेले बंडाचे निशाणही याच प्रकारचा एक अध्याय मानावा लागेल. भाऊबंदकीच्या अनुषंगाने भारतीय राजकारणाचा वेध घेतला असता, अनेक नाविन्यपूर्ण बाबींचे आकलन होते.
आपल्या देशातील अनेक राजकीय कुटुंबांमध्ये अंतर्गत वादळे उठली असून यात सर्वात जास्त फटका प्रादेशिक पक्षांच्या सुभेदारांना बसला आहे. याचे सर्वप्रथम उदाहरण तामिळनाडूत घडले. एम.जी. रामचंद्रन या अत्यंत लोकप्रिय अभिनेत्याने रूपेरी पडद्यावरून राजकारणात प्रवेश केला तो कॉंग्रेसच्या माध्यमातून. तर, सी.एन. अन्नादुराई आणि एम. करूणानिधी यांच्या सोबतीने द्रविडवादाचा नारा बुलंद करत त्यांनी ‘द्रमुक’ची पताका खांद्यावर घेतली. करूणानिधींशी झालेल्या वादामुळे त्यांनी ‘अण्णा द्रमुक’ या नव्या पक्षाच्या माध्यमातून तामिळनाडून तब्बल 10 वर्षे सत्ता उपभोगली. 87 साली रामचंद्रन यांच्या निधनानंतर त्यांच्या सौभाग्यवती जानकी यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला. यामुळे रामचंद्रन यांच्या अत्यंत महत्वाकांक्षी सहकारी जयललिता यांनी आपला सवतासुभा मांडला. जानकी रामचंद्रन यांचे सरकार अवघ्या 24 दिवसांत पडल्यानंतर, जयललिता यांनी संघटनेवरील आपली पकड घट्ट करत ‘अ.भा. अद्रमुक’ नावाने नवीन पक्ष स्थापन करून आपली स्वतंत्र वाटचाल सुरू ठेवली.
दैवाची गती इतकी विचित्र असते की याच जयललिता यांचे हाडवैरी आणि द्रमुकचे अध्यक्ष करूणानिधी यांनाही आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात कौटुंबिक वादाने हैराण केले आहे. तीन विवाह करणार्‍या करूणानिधी यांच्या परिवारात कधीपासूनच वादाची ठिणगी पडली आहे. मोठा मुलगा एम.के. स्टालिन याला उपमुख्यमंत्री बनवून सत्ता सोपवण्याची तयारी करताच, या कुटुंबातील कलह नव्याने उफाळून आला. कन्या कनिमोझी व सेल्वी यांच्यासह मुलगा एम.के. अझागिरी आणि मुथ्थू या भावंडांमध्ये भांडणे सुरू झाली आहेत. यातच त्यांच्या दयानिधी आणि कलानिधी मारन या नातवांनी (भाच्याची मुले) उडी मारल्याने परिस्थिती आणखी चिघळली आहे. यातून द्रमुकचेच भविष्य पणाला लागल्याचे दिसत आहे.
याच प्रकारे आंध्रचे दिग्गज अभिनेते आणि राजकारणी एन.टी. रामाराव यांना आयुष्याच्या शेवटच्या कालखंडात प्रचंड धक्के सहन करावे लागले होते. पहिल्या पत्नीपासून झालेली सात मुले आणि चार मुलींना डावलून, रामाराव यांनी दुसर्‍या पत्नीला झुकते माप देण्याचा प्रयत्न करताच त्यांचा अवघा परिवार बिथरला. या संधीचा लाभ घेत त्यांचे जावई चंद्राबाबू नायडू यांनी ‘तेलगू देसम’ पक्षावर ताबा मिळवत स्वत: मुख्यमंत्रीपद बळकावले. कॉंग्रेस पक्षाच्या विचारधारेचा प्रखर विरोध करत, रामाराव यांनी तेलगू अस्मितेचे राजकारण केले. काळाचा महिमा असा की, त्यांची कन्या पुरंदेश्वरी या विद्यमान केंद्र सरकारमध्ये कॉंग्रेसच्या राज्यमंत्री आहेत. काही वर्षांपूर्वी ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्यातही अशाच प्रकारचे वाद झाले होते. राजमाता विजयाराजे शिंदे यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीस कॉंग्रेसपासून प्रारंभ केला तरी त्या पुढे हिंदुत्ववादी जनसंघ आणि नंतर भाजपात सक्रिय झाल्या. त्यांच्या मुली वसुंधरा आणि यशोधरा यांनीही हाच मार्ग चोखाळला तरी पुत्र माधवराव यांना हे मंजूर नव्हते. प्रथम जनसंघाच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून निवडून आल्यावर ते 1977 पासून कॉंग्रेसजन झाले. यानंतर अल्पकाळ अपवाद वगळता, ते कॉंग्रेसशीच निष्ठावंत राहिले. राजकीय विचारधारेवरून शिंदे कुटुंबातही मोठ्या प्रमाणात वाद झाले होते.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजद नेते लालूप्रसाद यादव यांचे मेहुणे साधू यादव यांनी तिकिट वाटपावरून नाराज होत, कॉंग्रेसचा आश्रय घेतला होता. कौटुंबिक वादाची अशी उदाहरणे तर खूप आहेत पण याचा सर्वात भयावह अध्याय महाजन बंधूंच्या रूपाने दिसून आला. भाजपाचे मातब्बर नेते आणि बर्‍याचदा भावी पंतप्रधान म्हणून उल्लेख होणारे प्रमोद महाजन यांना त्यांचाच भाऊ प्रवीण याने गोळ्या घालून ठार केल्यावर संपूर्ण देश स्तब्ध झाला होता. या निर्घृण हत्येमागे राजकीय नसले तरी अंतर्गत कलहाचे कारण असणार हे उघड सत्य आहे. या सर्व प्रकरणांमध्ये काही अपवाद वगळता, घरगुती वादामुळे सर्वात जास्त तोटा प्रादेशिक पातळींवरील नेत्यांचा झालेला आहे. यामागे अनेक कारणेदेखील आहेत.
आपल्या देशातील बहुतांशी प्रादेशिक पक्ष हे संकुचित भाषिक अथवा सांस्कृतिक अस्मितेच्या विचारधारेवर आधारित आहेत. याचसोबत या पक्षांचे नेतृत्व हे एकखांबी तंबूसारखे असल्याचेही आपल्या निदर्शनास येते. स्थानिक अस्मितेला गोंजारल्यामुळे राज्यातील सत्ता मिळवणे पर्यायाने सोपे असते. जनतेला कोणताही विधायक विचार अथवा कार्यक्रम न देता, केवळ विद्वेषाच्या विचारावर वर्षानुवर्षे सत्ता उपभोगता येते हे बर्‍याच प्रादेशिक नेत्यांनी सिध्द केले आहे. अर्थात मोठ्या पक्षांप्रमाणे बहुतांशी प्रादेशिक पक्षांमध्ये लोकशाही विचार कधी रूजलेच नाहीत. कार्यकरिणींची निवड असो की, पदांची वाटणी यात त्या नेत्याचा शब्द अंतिम मानला जातो. यातून हुजरेगिरीला चालना मिळते हे सांगणे नकोच. अत्यंत महत्वाकांक्षा बाळगणारे मात्र वाट पाहण्यात पटाईत असतात. यामुळे नेता जर्जर झाल्यावरच त्याच्या कुटुंबात धुम्मस सुरू होते हा मुद्दादेखील या ठिकाणी विचारात घ्यावा लागेल. बाळासाहेब ऐन भरात असते अथवा 2004च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला यश मिळाले असते तर कदाचित राज ठाकरे अन्‌ राणे यांची पावले पक्षाबाहेर पडण्यासाठी वेळ लागला असता. हीच बाब स्मिता ठाकरे यांनाही लागू होते. युती सरकारच्या काळात स्वतंत्र सत्ता केंद्र असणार्‍या सौ. ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील अपयशानंतरचाच मुहुर्त साधला आहे. यावेळी युतीला सत्ता संपादन करण्यात आलेल्या असफलतेतूनच त्यांनी बंड पुकारले असले तरी यानिमित्ताने पक्षनेत्यांची दुटप्पी भूमिकाही अधोरेखित झाली आहे.
शिवसेनेने आजवर अनेक कोलांटउड्या मारल्या आहेत. जनतेला ‘जय महाराष्ट्र’ म्हणून साद घालणार्‍या सेनेने अनेक धनाढ्य अमराठी नेत्यांना राज्य सभा अथवा विधान परिषदेवर धाडले आहेे. यावेळी सेनाप्रमुखांना निष्ठावंतांचा सोयिस्कर विसर पडला आहे. स्मिता ठाकरे यांनी भरतकुमार राऊत यांना राज्यसभेचे तिकिट दिल्यावरूनही शरसंधान केले आहे. राऊत हे पत्रकार म्हणून कितीही विख्यात असले तरी शिवसेनेशी त्यांचा तसा थेट संबंध फारसा नव्हता. यामुळे कार्यकर्त्यांनी परिश्रम करावे अन्‌ उपर्‍यांनी पदे भोगावीत हा प्रकार कुणालाही अस्वस्थ करणाराच ठरू शकतो. हीच बाब उध्दव यांच्याकडे पक्षाची सूत्रे सोपवितांना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा कल लक्षात घेणेही आवश्यक होते. कोणत्याही पक्षात कार्यकर्त्यांच्या मताला काडीचीही किंमत न देता, हुकुमशाही पध्दत राबवली जात असेल तर कलह होणारच. याला कौटुंबिक संघर्षाची जोड मिळाल्यास काय होते हे आपण अनेक उदाहरणांवरून अनुभवले आहे. ठाकरे कुटुंबातील भाऊबंदकी हे याचेच ताजे उदाहरण आहे. जर्जरावस्थेतील करूणानिधी वा ठाकरे हे आज अंतर्गत कलहाने बेजार झाले असले तरी इतर नेत्यांच्या घरातही सगळेच आलबेल आहे अशी खात्री नाही. राष्ट्रवादीत ना. अजितदादा व खा. सुप्रिया सुळे यांच्यात राजकीय संघर्ष होऊ शकतो. लालू व मुलायमसिंग आदी दिग्गज थकल्यावर त्यांच्या घरात यादवी माजणारच नाही हे आज सांगणेही कठीण आहे. एक प्रकारे हा काळाने त्यांच्यावर उगवलेला सूडच असेल. लोकांच्या भावनांना भडकावून सत्ता मिळवणे सोपे असते मात्र उत्तम प्रशासन आणि पक्षांतर्गत लोकशाही या बाबीदेखील आवश्यक असतात. यांच्याअभावी काय होते हे ठाकरे कुटुंबाने दाखवून दिले आहे. यापासून इतर राजकीय मातब्बरांनीही धडा घ्यायला हवा. अन्यथा आज ठाकरे जात्यात असले तरी इतर सुपात आहेत हे विसरता कामा नये.

About the author

shekhar patil

Leave a Comment