चालू घडामोडी

कोणताच धर्म नव्हे…ठेकेदारी धोक्यात !

साक्षी महाराजांच्या ‘हम दो हमारे चार’ या घोषणेसोबत केरळातील कॅथलिक चर्चनेही पाच मुलांना जन्म देणार्‍यांना पारितोषिकाची घोषणा करून आपणही खुळचटपणात मागे नसल्याचे दाखवून दिले आहे.

अनेकदा भिन्नधर्मीय कट्टरपंथी एकाच भाषेत बोलू लागतात तेव्हा हसू आवरले जात नाही. आता साक्षी महाराजांच्या ‘हम दो हमारे चार’ या घोषणेसोबत केरळातील कॅथलिक चर्चनेही पाच मुलांना जन्म देणार्‍यांना पारितोषिकाची घोषणा करून आपणही खुळचटपणात मागे नसल्याचे दाखवून दिले आहे. अन्य धर्मातील धर्मगुरूदेखील अनेकदा याच भाषेत बोलत असतात. पण संख्या वाढली म्हणजे धर्म मजबूत आणि कमी म्हणजे कमकुवत असला प्रकार खरा आहे का? यावर विचार करण्याची आता आवश्यकता आहे. आणि लोकसंख्या वाढीवर अशास्त्रीय विचार करणार्‍यांचा मेंदू तपासून पाहण्याची गरजही यातून अधोरेखित झाली आहे.

ओशोंनी अनेकदा पुरोहित आणि राजकारण्यांमधील अभद्र युतीवर प्रहार केले आहेत. ‘प्रिस्ट अँड पॉलिटिशियन्स आर माफिया ऑफ दी सोल’ अर्थात धर्मगुरू आणि राजकीय नेते हे मानवी आत्म्याचे शोषक असल्याचा त्यांनी वारंवार केलेला उल्लेख हा अगदी समर्पक असाच आहे. या दोघांनाही वाढीव लोकसंख्या हवीय. धर्मगुरूंना आपापल्या कथित धर्माची संख्या वाढल्यानंतर धंदा करण्याची तेवढीच वाढीव संधी मिळणार आहे. तर राजकारण्यांनाही याच्या आड आपली ‘व्होट बँक’ वाढून दुकानदारीची वाढीव संधी मिळणार आहे.

(प्रतिकात्मक छायाचित्र ‘फ्लिकर’वरून साभार)

(प्रतिकात्मक छायाचित्र ‘फ्लिकर’वरून साभार)

अनेकदा गंमत वाटते. अगदी गल्लीतल्या निवडणुकीपासून ‘आपले किती’? हा प्रश्‍न सुरू होतो. समाज, धर्म, भाषा, प्रांत, देश आदींच्या मापनासाठी ‘संख्या’ हीच महत्वाची ठरते. मग बहुसंख्य, अल्पसंख्य, मतपेढी, ध्रुविकरण आदी खेळही सुरू होतात. ‘आपले इतके तर त्यांचे तितके’ हे गणित तर लहानपणापासूनच ठसविण्यात येते. या सामुदायिक संमोहनाच्या जबर पगड्यातच प्रत्येक बालकाची मनोभुमिका ठरत असते. यातूनच ‘ब्रेनवॉश’ केलेले तरूण आयतेच धर्मगुरू आणि राजकारण्यांच्या हातात पडतात. मग त्यांना हवे तसे वापरून घेणे अगदी सहजशक्य होते. कळपातील या मेंढरांची संख्या जितकी जास्त तितके म्होरक्याचे वजनही जास्त असे हे अगदी साधेसोपे गणित आहे. यातून आपापला धर्म, पंथ, जाती, संप्रदायाचे संख्याबळ वाढविण्याशिवाय कोणताही सोपा पर्याय सध्या तरी उपलब्ध नाहीये. यातूनच प्रत्येक धर्मातील ढुढ्ढाचार्यांना आपल्या धर्माची संख्या वाढविण्याची चिंतेने ग्रासले आहे.

प्रत्येक धर्मातील विचारधारांमध्ये खुप फरक आहेत. मात्र प्रत्येक धर्ममार्तंडांचा लोकसंख्येबाबतचा दृष्टीकोन एकसमान असल्याचे आढळून येते. प्रत्येक धर्माचे तारणहार समजणार्‍यांना जणू काही आपापल्या कळपाची संख्या कशी वाढेल हीच एकमेव चिंता लागलेली असते. यातून ‘जन्माला येणारी मुले ही ईश्‍वराची देण’ असल्याचा हवाला देत आपापली संख्या वाढवावी अशी शर्यत सुरू झाली आहे. प्रत्येक धर्माचे मार्गदर्शक हे संततीनियमन आणि गर्भपाताच्या विरूध्द आहेत. मात्र संततीनियमन न केल्यास पृथ्वीवर येत्या काही दशकांमध्ये काय भयावह स्थिती होईल याची आज थोडीफार कल्पना आपल्याला येऊ लागली आहे. तुडुंब ओसंडून वाहणारी महानगरे, भरगच्च गर्दीची सार्वजनिक ठिकाणे, खाद्यानाची वाढीव मागणी, गरिबी, बेरोजगारी, कुपोषण, हिंसाचार, धार्मिक वा वांशिक तणाव, लैंगिक अत्याचार या सर्व बाबींच्या मुळाशी कुठे तरी लोकसंख्येचा विस्फोट असल्याचे स्पष्ट आहे. मात्र असे असुनही आकड्यांच्या स्पर्धेत सारासारविवेकाचा आवाज क्षीण करण्यात येत आहे. परिणामी प्रत्येकाला आपापला धर्म हा आकडेवारीनुसार पीछाडीवर असल्याच्या भयगंडाने पछाडले आहे. मुस्लीम धर्मात लोकसंख्यावाढ सर्वात जास्त आहे. अलीकडच्या काळात काही प्रमाणात तरी जागृतीची चिन्हे दिसत असतांना धर्ममार्तंड मात्र संख्यावाढीचे उघड समर्थन करताहेत. गेल्या काही वर्षांपासून अनेक हिंदू नेतेदेखील असलेच जाहीर वक्तव्ये करत आहेत. कॅथॉलिक चर्चचा संततीनियमनाला विरोध जगजाहीर आहे. ज्यूंनाही आपली संख्या वाढविण्याची चिंता पडली आहे. अगदी धार्मीक बाबींमध्ये फारसे कट्टर नसणार्‍या पारशी समाजानेही लोकसंख्या वाढविण्यासाठी खास मोहिमच सुरू केली आहे. प्रत्येकाला आपला धर्म वाढविण्यासाठी संख्येत वृध्दी करावयाची आहे. मात्र आहे त्या लोकसंख्येच्या कल्याणाची चिंता करतांना कुणी दिसत नाही. कारण त्यांना याच्याशी काहीएक घेणेदेणे नाही. त्यांना निरोगी, दिर्घायु, शिक्षणात अग्रेसर, सर्व सुविधांनी युक्त संपन्न समाज नव्हे तर भयाने ग्रासलेल्या आणि त्यांच्या इशार्‍यांवर नाचणार्‍या कठपुतळ्यांची फौज तयार करावयाची आहे. कदाचित हाच त्यांचा ‘धर्म’ असावा.

मी मागेदेखील एका लेखात विख्यात पाकिस्तानी चित्रपट ‘बोल’मधील नायिकेचा उल्लेख केला होता. ती फासावर लटकण्याआधी आपल्या मृत बापाला आणि सर्व समाजालाच उद्देशून विचारते की ‘खिला नही सकते तो पैदा क्यु किया?’ आणि ‘अगर खुन करना जुर्म है तो जनम देना क्यु नही?’ नेमक्या या दोन्ही प्रश्‍नांवरच आज मंथन होण्याची गरज आहे. आधीच अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांमुळे मानवाचे आयुर्मान वाढल्याने मानवाची संख्या प्रचंड गतीने वाढत आहे. यात लोकसंख्येचा विस्फोट झाल्यास आपल्या वसुंधरेचे अस्तित्वच धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. यामुळे जन्मदर हा कमीत-कमी असणे ही आजच्या काळाची प्रथम क्रमांकाची गरज आहे. मात्र नेमक्या याच बाबीवर जगभरातील तमाम धर्मांचे ठेकेदार ही एकसमान अर्थात उलट भुमिका घेत आहेत. अर्थात कोणताही धर्म मुळीच धोक्यात नाही तर या ढुढ्ढाचार्यांची ठेकेदारी धोक्यात असल्याची बाब अगदी उघड आहे. यामुळे या खुळचटांच्या विचारांना थारा न देणेच योग्य!

About the author

shekhar patil

1 Comment

Leave a Comment