Featured चालू घडामोडी पत्रकारिता

कुबेर महोदयांचा उलटा चष्मा

Written by shekhar patil

लोकसत्ताचे संपादक तथा सद्यस्थितीत मराठीत वैचारिक लिखाणासाठी ख्यात असणार्‍या गिरीश कुबेर यांच्या ‘बळीराजाची बोगस बोंब’ या अग्रलेखाने अभुतपुर्व हलकल्लोळ उडाला आहे. याबाबत माझे हे विचार.

लोकसत्ताचे संपादक तथा सद्यस्थितीत मराठीत वैचारिक लिखाणासाठी ख्यात असणार्‍या गिरीश कुबेर यांच्या लोकसत्तामध्ये ‘बळीराजाची बोगस बोंब’ या अग्रलेखाने अभुतपुर्व हलकल्लोळ उडाला आहे. याबाबत माझे हे विचार.

मंगळवार दि. १६ डिसेंबर रोजी सकाळपासूनच या अग्रलेखाबाबत सोशल मीडियातून तीव्र टिकेचा सुर उमटल्याने माझे कुतुहल चाळवले गेले. पहिल्यांदा मी हा अग्रलेख अनेकदा वाचला. यानंतर याविरूध्द उमटलेल्या प्रतिक्रियादेखील जाणून घेतल्या. अगदी ‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळावरील प्रतिक्रियादेखील वाचल्या. आज दुपारपर्यंत याविरूध्द लिहण्यात आलेले सारे काही जाणून घेतल्यानंतर मी मत प्रदर्शन करत आहे. साधारणत: गिरीश कुबेर यांनी बळीराजाचा केेलेला अपमान, शेतकर्‍यांच्या व्यथा-वेदनांची उडविलेली खिल्ली, यासाठी वापरलेले धारदार शब्द आणि अर्थातच पराकोटीची संवेदनहिनता याचा विविध मान्यवरांनी आपापल्या परीने समाचार घेतला आहे. याची पुनरावृत्ती टाळत मी अन्य मुद्यांकडेही आपले लक्ष वेधू इच्छितो. सर्वप्रथम गिरीश कुबेर यांच्या या वादग्रस्त लेखातील काही महत्वाचे मुद्दे मी आपल्यासमोर मांडतो.

* शेतकरी हा ‘गरीब बिच्चारा’ असल्याचे चुकीचे गृहितक समाजाने मांडलेय आणि समाजाचा सारासारविवेक क्षीण आहे.

* खरा शेतकरी हा अल्पभुधारक असून शेतमजुराच्या समस्या बिकट आहेत.

* कोणताही शेतकरी सुगीचे दिवस असल्याबद्दल समाधान व्यक्त करत नाही.

* निसर्गनिर्मित आपत्तीचे हलाखीचे चित्रण करण्याचा ‘सपाटा’ दुरचित्रवाणी वाहिन्यांनी लावलाय.

* सत्ताधार्‍यांना असणारी कळकळ हेतुपुर्वक कॅमेर्‍यात बंदिस्त होत आहे.

* बहुतांश संकटग्रस्त शेतकरी हे बागायतदार असून अंगाखांद्यावर दागिने मिळवणार्‍या या शेतकर्‍यांना ‘करशुन्य’ उत्पन्न मिळत असते.

* हा शेतकरी राजकीयदृष्ट्या सक्रीय तसेच कांगावेखोर असतो. त्याच्याप्रमाणे कुणी व्यावसायिक आत्महत्येची धमकी देत नाही.

* शेती हा व्यवसाय असल्याने यात नुकसानीची तयारी हवीच.

* शेतकरी आपल्यातील किती वाटा शेतमजुरांना देतो ?

* शेतकर्‍यांप्रमाणेच उठसुठ देण्यात येणार्‍या नुकसान भरपाया आणि मदत या भिकेला लावणार्‍या आहेत.

या सर्व मुद्यांचा उहापोह करण्याआधी गिरीश कुबेर हे ‘इंडिया’तील विचारवंत असल्याचे आपण लक्षात घ्यावे. यामुळे हस्तीदंती मनोर्‍यात बसून आपण भलतेच क्रांतीकारी आणि आणि विचारप्रवर्तक लिहल्याचा भास त्यांना कदाचित झालाही असेल. मात्र ‘भारत’ आणि ‘इंडिया’तील भेद त्यांच्या लिखाणात अगदी ठसठशीतपणे जाणवतोय. अर्थात हा उग्र दर्प त्यांच्या अंगलट आलाय. खरं तर भारतात जगातील सर्वात मोठा मध्यम वर्ग आहे. हाच मध्यम आणि विशेषत: उच्च मध्यमवर्ग सातत्याने ‘ग्रेट इंडियन ड्रीम’मध्ये रंगून गेलाय. याला सामाजिक जाणीवांचे काहीएक देणेघेणे नाही. खुल्या स्पर्धात्मक आणि शुध्द भांडवलशाही जगातील तमाम फळे चाखण्याची यांची तीव्र आकांक्षा आहे. मग सामाजिक न्यायाच्या भावनेतून देण्यात आलेल्या आरक्षणासह अर्थातच सर्वसामान्यांसाठी असणार्‍या लोकल्याणकारी योजना त्यांना कुबड्या वाटतात. याला तो नाक तर मुरडतोच पण वेळप्रसंगी विरोधही करतो. उरलीसुरली कसर त्यांचे प्रतिनिधीत्व करणारे गिरीश कुबेर हे त्यांचेच विचार प्रखरतेने मांडत पुर्ण करत असतात. याचमुळे शेतकरी हा ‘गरीब बिच्चारा’ तर मुळीच नाही पण असे म्हणणारा समाजही सारासारविवेक हरवून बसल्याचे ते बिनदिक्कतपणे नमुद करतात. समाजमन हे विचारांवर नव्हे तर भावनेच्या हिंदोळ्यावर झुलते हे कुणीही मान्य करेल. मात्र शेतकर्‍यांच्या कथित दु:खात वाहवून जाणारा सारासारविवेक हा अन्य कोणत्याही सामाजिक समजांइतकाच खोटा असल्याची ठाम भुमिका जेव्हा कुबेर घेतात तेव्हा कुणीही सुज्ञ जन संतापणार नाही तर काय? आपल्या सामाजिक जाणीवा खोट्या असतील तर महिलांवरील अत्याचारांपासून विविध संवेदनशील मुद्यांवर रस्त्यावर उतरणारा आणि विविध स्वरूपात आपली प्रतिक्रिया व्यक्त करणारा समाजही भंपक आणि याला व्यापक प्रसिध्द देणारा मीडियादेखील (आता कुबेर साहेबही याचेच घटक आहेत हो!) याच प्रकारातील मानायला हवा.

कुबेर यांनी अल्पभूधारक आणि शेतमजुरांच्या समस्या तरी खर्‍या असल्याचे मान्य केले आहे. मात्र महाराष्ट्रातील ९९ टक्के शेतकरी हे अल्पभुधारक याच प्रकारातील असल्याचे त्यांनी लक्षात घ्यावे. मुळात अगदी बागायती असली तरी एक-दोन एकर वा त्याहूनही कमी तुकडा असणार्‍यांना त्यातून चांगले उत्पन्न काढणे हे अत्यंत जिकरीचे असते. राहिला प्रश्‍न शेतमजुरांचा तर त्यांची हालतही हलाखीची आहेच. शेतीच लाभदायक नसेल तर शेतमजुराची स्थितीही यथातथाच राहणार. कोणताही शेतकरी एखाद्या वर्षी चांगले उत्पन्न आल्याचे सांगत नसल्याबद्दलही कुबेर यांची तक्रार आहे. आता काही पाश्‍चात्य राष्ट्रांचा अपवाद वगळता जगातील कोणताही व्यावसायिक आपल्या क्षेत्रात ‘तेजी’ असल्याचे सांगत नाही. भारताचा विचार करावयाचा तर चहा टपरीवाल्यापासून ते बड्या उद्योजकापर्यंत प्रत्येकासाठी आपापला धंदा हा जेमतेमच चालणारा असतो. आता वर्तमानपत्रांचा विचार करता निवडणुकीच्या काळात कुणी किती ‘कमाई’ केली याचे जाहीर प्रदर्शन कुणी केलेले नाही. खुद्द गिरीशजी कुबेर यांनी स्वत: ‘लोकसत्ता’ हा नफ्यात चाललाय की तोट्यात याचा उहापोह केल्याचे ऐकिवात नाही. यामुळे शेतकर्‍यांना चांगला हंगाम गेला अन् त्यांनी नाही सांगितले तरी कुणाच्या पोटात दुखायला नको. या ठिकाणी मुद्दाम नमुद करावेसे वाटते की, कुबेर यांच्याप्रमाणेच ‘इंडिया’तील बर्‍याच जणांना कृषी उत्पादनांच्या भाववाढीने प्रचंड खदखदते. या देशातील शरद पवार हाच एकमेव नेता कृषी उत्पादनांच्या भाववाढीने शेतकर्‍यांना दोन पैसे जास्त मिळणार असल्याचे अगदी टिका-टिपण्णी सहन करून जाहीरपणे सांगतो. इतर राजकारणी मात्र कांदा-बटाट्यांच्या माळा घालून निषेध करण्याचा थिल्लरपणा करतात. कांदा, बटाटे, टमाटे आदींचे भाव वाढल्यामुळे आपण संतापतो. मात्र जेव्हा याचे भाव कोसळतात तेव्हा काय? याचे उत्तर आपण कधी शोधत नाही.

विविध दुरचित्रवाणी वाहिन्यांनी नैसर्गिक आपत्तीचे चित्रीकरण करण्याचा सपाटा लावला असून त्यांच्या रेट्याने सत्ताधार्‍यांचे मन विरघळत असल्याचा अचाट दावादेखील कुबेर यांनी केला आहे. सत्ताधार्‍यांचा हा कळवळा व्यवस्थित कॅमेराबंद करण्यात येत असल्याचाही त्यांचा आरोप आहे. कमाल आहे बुवा! आता समाजाचे प्रतिबिंब वर्तमानपत्रे आणि वाहिन्यांमध्ये नाही उमटणार तर कुठे? भलेही आपण आपल्या वर्तमानपत्रातून याला थारा देऊ नका. मात्र इतरांना असे न करण्याचा सल्ला देण्याचा अनाहुतपणा कशासाठी? बरं बहुतांश संकटग्रस्त शेतकरी हे बागायतदार असल्याचा त्यांचा जावईशोध तर अत्यंत भयंकर आहे. महाराष्ट्रातील सिंचनाची तमाम साधने वापरूनही एक तृतीयांशपेक्षा जास्त शेतजमीन सिंचनाखाली येणार नसल्याचे बहुतांश तज्ज्ञांनी व्यक्त केलेले मत त्यांच्या गावीच नसावे. यातच सिंचनाच्या अनुशेषाचीही त्यांना माहिती नसावी. शेतकर्‍यांच्या अंगाखांद्यावरील सोन्याचाही या महोदयांना तीव्र आकस आहे. अहो वीस-पंचवीस वर्षांपुर्वी सायकल वापरणारा मध्यमवर्ग वातानुकुलीत कारमध्ये गेला. त्यांची मुलेबाळे परदेशात गेली. आर्थिक उदारीकरणाचे लाभही त्यांना मिळाल्याने शेतकर्‍यांच्या मुठभर वर्गाकडे असणारे सोने-नाणे तसे असुयेचा विषय बनता कामा नये. बरे ते म्हणतात तसे ‘अंगा-खांद्यावर’ सोने मिरवणारे असतील तरी ते फक्त एक टक्के. इतरांचे काय? या शेतकर्‍यांना करशुन्य उत्पन्न मिळते याचा त्यांनी स्पष्ट उल्लेख केलाय. कुबेर हे अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक आहेत. बडे जमीनदार हे प्राप्तीकराच्या कक्षेत यावेत असे विचार कधीपासून मांडण्यात येत आहेत. मात्र याबाबत केंद्रीय पातळीवरून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात न आल्यामुळे यावरून ओरड करण्यात आणि शेतकर्‍यांना दुषण देण्यात काहीही तथ्य नाही.

शेतकरी हा राजकीयदृष्ट्या सक्रीय आणि कांगावेखोर असल्याचे कुबेर म्हणतात. राज्यातील बहुतांश राजकारणी हे शेतकरी पार्श्‍वभुमीचे असल्याने कदाचित त्यांचा हा समज असावा. मात्र मंत्रीपदे, आमदारकी, खासदारकी तसेच राजकारण आणि सहकारातील बहुतांश मलाईदार पदे उपभोगणारे शेतकरी हे ०.००१ टक्के असतील. मात्र त्यांच्याकडे पाहून इतरही याच प्रकारातील असल्याचा दावा हास्यास्पद या प्रकारातील आहे. आता शेतकरी कांगावेखोर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आता देशातील प्रत्येक घटक सरकारकडून आपापल्या पदरात काहीतरी पाडून घेण्याचा प्रयत्न करतो. विविध समाजघटक आरक्षणाची मागणी करतात, शासकीय कर्मचार्‍यांना वाढीव महागाईभत्ता हवा असतो. उद्योजकांना सवलती हव्या असतात. सर्वसामान्यांना विविध कल्याणकारी योजना हव्या असतात. कामगारही सरकारकडून अपेक्षा बाळगतात. मग शेतकर्‍यांनीच काय घोडे मारले हो? शेतकर्‍यांच्या मागण्यांना ‘कांगावा’ म्हणणे ही कुबेर यांची त्यांच्याप्रती असणारी दृष्टी दर्शविते हेदेखील आपण लक्षात घ्यावे.

गिरीशजी कुबेर यांनी ‘शेती हा व्यवसाय असल्याने त्यात नुकसानी तयारी ठेवावी’ आणि ‘शेतकरी आपल्या उत्पन्नातील किती वाटा शेतमजुरांना देतो?’ हे परस्परविरोधी दोन मुद्दे अधोरेखीत केले आहेत. शेती हा व्यवसाय असला तरी तो बहुतांश लहरी मान्सूनवर अवलूंन असल्याने आतबट्टट्याचा आहे. यात बियाण्यांपासून ते व्यापार्‍यांपर्यंत अनेक ठिकाणच्या फसवणुकी आहेत. मात्र असे असुनही कुबेर म्हणतात त्याप्रमाणे थोडा वेळ हे क्षेत्र ‘व्यवसाय’ असल्याचे मानत त्यांच्या पुढील मागणीकडे वळूया. यात त्यांनी रग्गड कमाई करणारा शेतकरी हा शेतमजुरांना योग्य तो वाटा देत नसल्याचा स्पष्ट आरोप केला आहे. आता शेती हा व्यवसाय जर असेल तर कोणता व्यावसायिक हा आपल्याकडे काम करणार्‍यांना आपल्या उत्पन्नातील वाटा देतो? याचे उत्तर कुबेरांनीच देणे अपेक्षित आहे. त्यांचा कार्पोरेट कंपन्या आणि याच्याशी संबंधीत अर्थकारणाचा गाढा अभ्यास आहे. अब्जावधींची उलाढाल असणार्‍या अजस्त्र कंपन्यादेखील मुठभर एक्झिक्युटीव्हजचा अपवाद वगळता कामगारांची अक्षरश: पिळवणूक करतात हे त्यांना माहित नसेल असे म्हणणे धाडसाचे ठरेल. यामुळे शेतीला व्यवसाय म्हणायचे आणि लागलीच त्यांनी आदर्श व्यावसायिक तत्वांचे पालन करण्याची अपेक्षादेखील बाळगायची हे कुठल्या प्रकारात बसते? बरं आपल्या प्रगतीनुसार कर्मचार्‍यांना वेतन देणार्‍या तसेच आपला नफा कर्मचार्‍यांमध्ये वाटून देणार्‍या कंपन्यांची यादी कुबेर यांनी जाहीर केल्यास महाराष्ट्रातील जनतेच्या ज्ञानात भर पडू शकेल. वाढत्या महागाईनुसार शेतमजुरीचे दरही वाढलेत याची माहिती त्यांनी आपल्या ग्रामीण वार्ताहरांकडून जाणून घ्यावीत. गावोगावी स्थलांतरामुळे शेतमजुर मिळण्यातील अडचणीही त्यांच्या लक्षात येतील.

गिरीशजी कुबेर यांनी आपल्या अग्रलेखाच्या शेवटी मांडलेला मुद्दा हा अतिशय गंभीर असा आहे. शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या भरपायांसह कर्जमाफीसारख्या योजना सरसकट रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. कुबेर यांच्या या एक-दोन ओळींच्या मुद्याआड अनेक बाबी दडल्या आहेत. भांडलवदारी दृष्टीकोनातून जगाकडे पाहिल्यास सर्वसामान्यांना देण्यात येणार्‍या सवलती, विविध लोकल्याणकारी योजना, अनुदाने आदी बाबी ‘सरकारी तिजोरीवरील ताण’ असल्याचे मानत हेटाळणी केली जाते. मात्र यातील सामाजिक न्यायाची भावना कुणाच्या लक्षात येत नाही. केंद्र आणि राज्य सरकार शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, सार्वजनिक वाहतूक आदी पायाभुत सुविधांमध्ये प्रचंड अनुदान देत असते. यामुळे अगदी अनुदानयुक्त सिलेंडरसह, पेट्रोल-डिझेलादी इंधनाचे भाव, एस.टी. आणि रेल्वेचा तुलनेत किफायतशीर प्रवास या बाबींमागे केंद्र आणि राज्याच्या तिजोरीतील पैसा असतो हे उघड आहे. याशिवाय समाजाच्या विविध दुर्बल घटकांसाठी असणार्‍या योजनांचाही कोट्यवधी जनतेला लाभ होतोय हे कुणी नाकारू शकत नाही. त्रुटी असतील तर त्या या योजनांच्या अंमलबजावणीत आहेत. मग कुबेर महोदय म्हणतात त्याप्रमाणे कर्जमाफी आणि सवलतींसोबत ज्या दिवशी वर नमुद केलेल्या बाबींमधून सरकार अंग काढेल त्यादिवशी अराजक निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. बरं आपत्तीत बळी पडलेल्यांच्या मदतीवरही त्यांना आक्षेप असल्याची बाब कुणाच्या पचनी पडणारी नाही. तसे तर सैनिकदेखील पगारासाठी काम करतात. मग शहीद झालेल्यांचा उदो-उदो आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतही कशासाठी? असा प्रश्‍नदेखील यातून निर्माण होऊ शकतो. सर्वात भयंकर बाब म्हणजे त्यांच्यासारखाच कुणी विद्वान महाराष्ट्रातील साधारणत: ७० टक्के लोक शेेतीशी संबंधीत असल्याने आत्महत्या करणार्‍यांपैकी शेतकर्‍यांचे तितकेच प्रमाण असल्याचेही सिध्द करू शकतो.

भारत हे लोकशाही राष्ट्र असले तरी अमेरिकेसारख्या भांडवलशाहीप्रधान राष्ट्रांपेक्षा आपली स्थिती भिन्न आहे. हजारो वर्षांपासून पराकोटीची विषमता असणार्‍या आपल्या देशात सर्व समाजघटकांना प्रगतीच्या समान संधी उपलब्ध करून देणे सोपे काम नाही. यामुळे दीर्घ कालावधीसाठी आरक्षणासह विविध कल्याणकारी योजना तर अल्प कालावधीसाठी अनुदान, सवलती, पॅकेजेस, नुकसान भरपाई हे आवश्यक घटक आहेत. ‘सर्व्हायव्हल ऑफ दि फिटेस्ट’ या कठोर नियमाप्रमाणे भलेही जग चालत असेल. मग त्यात कुबेरांचा ‘इंडिया’देखील असेल. मात्र ‘भारता’ला पुढे जायचे तर सरकारला मानवी चेहरा धारणच करावा लागणार असल्याचे सर्वांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. कुबेर यांच्या वर्तमानपत्रात सातत्याने ‘भारता’वर टिकास्त्र सोडण्यात येत असते. मग कधी काही आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा नक्षलवाद्यांशी बादरायण संबंध जोडण्यात येतो तर कधी पॅकेजसंस्कृतीवर घणाघात करण्यात येतात. या सर्व लिखाणाला वाचकवर्ग निश्‍चितच आहे. मात्र तो त्यांच्याप्रमाणेच ‘आहे रे’ या वर्गातील आहे. काही दिवसांपुर्वी गिरीशजींचा ‘तेलगंगेच्या दोन तिरांवर’ हा अत्यंत विचारप्रवर्तक लेख वाचनात आला. याचेच प्रतिक घेऊन सांगावेसे वाटते की, कुबेर महोदयांनी ‘इंडिया’च्या तिरावरून ‘भारता’च्या दुसर्‍या तिराकडे पाहत भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र हे करतांना त्यांनी इकडच्या तिरासाठी सरळ तर समोरच्या तिरासाठी उलटा असणारा चष्मा धारण केलाय. यामुळे ‘इंडिया’च्या निकषांवर त्यांनी ‘भारता’ला घासून पाहण्याचा प्रयत्न केला. यात ते साफ फसलेत. असो. गिरीशजी कुबेर यांच्या लिखाणाचा मी मनापासून चाहता आहे अन् राहणारही. मात्र जिथे खटकले तिथे लिहले. विचाराचा प्रतिकार विचारानेच करावा. यात व्यक्तीद्वेष मुळीच नसावा. परिणामी ‘बळीराजाची बोगस बोंब’चे उत्तर आपण सर्वांनीदेखील विचारांनीच द्यावे ही अपेक्षा. याच विचारानुसार मी माझे तोकडे ज्ञान आणि आकलन वापरत त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय.

About the author

shekhar patil

24 Comments

 • दादा आपले विचार वाचुन कळले की एखाद्या विषयाचे दोन्ही बाजुनी आकलन करुन ते लिखान करणे हे फार अवघड आहे . एकाच बाजुने स्षटीकरण केल्याने फसगत होते.

 • Shekharji,
  Nice n factual postmortem of article of Indian Girish Kuber by Bhartiya Shekhar

 • कोणावरही आकस न ठेवता कोट्यावधी जनतेचे विचारच अधोरेखित केले आहेत. धन्यवाद

 • Atishay mast lekh aahe. Wastusthiti parkhad shbtant mandli aahe. Shetkaryanbaddal dwesh nirman karnaryana chokh uttar aahe.

 • शेखर सर, तुमच्याकडून जे अपेक्षित अस्त तेच आलय. या उत्तरासाठी एका शेतक-याच्या पोराचा सलाम।।

 • Dear Shri Shekhar jee…

  Namaskar…

  Girish Kuber sir is in fact good friend of mine also…

  But you are right..this time how he has lost his control

  any way…i will speak to him on the same issue..

  Thanks

  santosh D Patil,Mumbai

 • शेखर पाटीलसाहेब…
  लोकसत्ताचे आदरनिय संपादक गिरीश कुबेर यांच्या लिखानाचे आम्ही चाहते आहोते. पत्रकार म्हणून आम्हाला त्यांचा आदर आहे. परंतु अशा प्रकारच्या लिखानाला आमची हरकत आहे. विचारांच्या माध्यमातून तुम्ही ‘शेतकऱ्यांच्या बोगस बोंबा’चा घेतलेला समाचार अतिशय स्तूत्य आहे.

 • शेतकरी दोन पैसे कमवत असेल तरी त्यामागे त्याचे कष्ट,मेहनत,धोका पत्करण्याची जोखिम ई.चा विचार कुबेर जी नि केला नसावा आणि करू पण शकत नाही.
  त्यांना आपण चार एकर जमिनिचा एक टुकड़ा 2 वर्ष कसायला द्या आणि मग लिहा म्हणां “कुबेर-मंत्र”…!!

Leave a Comment