चालू घडामोडी राजकारण

कुठे गेलेत मराठी अस्मितेचे स्वयंघोषित तारणहार?

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाकडे एक पत्रकार म्हणून तर्क व वास्तववादी भूमिकेतून पाहता या आंदोलनातील अनेक त्रुटी नजरेस पडतात तर सर्वसामान्य नागरिक म्हणून देशात उठलेली लाट चकीत करते. मात्र या दोन विचारांपेक्षाही मला सर्वाधीक रोमांचित करणारी बाब वाटते की या युगप्रवर्तक क्रांतीचे नेतृत्व एका अस्सल मराठी माणसाकडे आहे. अगदी भणंगावस्थेतील अन् कुठल्याशा खेड्यातील अनामिक चेहर्‍यासमान असणार्‍या अण्णा हजारे नामक वादळाने अख्ख्या भारताला कवेत घेतलं. नव्हे अस्वस्थ केलंय. याची दखल मराठी जनांनी मोठ्या उत्साहात घेतली. मात्र मराठी अस्मितेचा उदो उदो करणारे अन् मराठीचे काय होणार या भितीने गळा काढणारे ‘चिंतातूर जंतू’ गेलेत कुठे ? याचा शोध घेऊनही पत्ता लागला नाही.

आपण मारे अभिमानाने ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ अशी टिमकी वाजवतो. मात्र इतिहासातून बाहेर पडल्यास भयाण वास्तवाकडे साहजिक दुर्लक्ष करतो. अल्पकाळ देशावर मराठी वर्चस्व होते हे कुणीही मान्य करेल. मात्र यानंतर देशभरात मराठी जनांविषयीचा आकस लपून राहिला नाही. याला राजकीय क्षेत्रही अपवाद नाही. आजही दिल्लीच्या राजकीय वर्तुळात मराठी राजकारण्यांची प्रतिमा ही दगाबाज म्हणूनच आहे. यामुळे कुणी एक मराठी वरचढ होण्याची चिन्हे दिसतात तमाम गैरमराठी एकत्र होतात. याचा फटका यशवंतराव चव्हाणांपासून शरद पवारांपर्यंत सार्‍यांना बसलाय. यातच देशाचा हिंदी-इंग्रजी मीडियालाही मराठीचा आकस आहे. यामुळेच आसामात हिंदी भाषकांना गोळ्या घातल्या जात असतांना मनसेच्या कार्यकर्त्यांच्या लाठ्या-काठ्या त्यांना मिसाईलपेक्षाही भयंकर भासतात. दाक्षिणात्य राज्यांमधील पराकोटीच्या हिंदीद्वेषापेक्षा त्यांना राज ठाकरे देशद्रोही वाटतात. एकंदरीत पाहता ‘मेनस्ट्रीम मीडिया’त मराठी माणसाची प्रतिमा ही अत्यंत असहिष्णू, भांडकुदळ आणि इतिहासात जगणारा अशी झाली आहे. मात्र याच महाराष्ट्रातून अण्णा हजारे हा फकीर देशातील अत्यंत व्यापक अशा क्रांतीचे नेतृत्व करतोय याचे अप्रूप माझ्यासारख्याला वाटल्यावाचून राहत नाही. मात्र मराठीचे तारणहार म्हणवणारे जेव्हा अण्णांच्या समर्थनार्थ समोर न आल्याने ह्दयात कळ आल्याशिवाय राहत नाही.
महाराष्ट्राने देशाला अनेक नररत्ने दिलीत. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला-क्रीडा अशा कित्येक क्षेत्रांमध्ये मराठी जन अग्रेसर आहेत. शेकडो मराठी जनांना देशात-परदेशात मान्यता मिळाली. मात्र, या सार्‍यांनाही मात देणारा अण्णा हजारे हा अवलिया सध्या संपूर्ण देशाच्या जिव्हाळ्याचा अन् काहीसा कुतुहलाचा विषय झाला आहे. खरं तर अण्णा हजारे यांनी रेटा लावल्याने महाराष्ट्र सरकारने माहितीचा अधिकार अंमलात आणला. यावरून केंद्रानेही हा नियम लागू केला. निव्वळ माहितीच्या अधिकाराचे जनक म्हणून अण्णा अजरामर झाले असते. पण ‘पिकते तिथे विकत नाही’ यानुसार अण्णांची सर्वाधीक हेटाळणी महाराष्ट्रातच झाली. अगदी वाकड्या तोंडाच्या गांधींपासून ब्लॅकमेलरपर्यत त्यांना कित्येक शेलक्या विशेषणांनी हिणवण्यात आले. अण्णांचे ट्रस्ट, यांचे कार्यकर्ते आदींवर संशय व्यक्त करण्यात आला. अगदी ‘जनलोकपाल’ विधेयकावरून या वर्षाच्या एप्रिल महिन्यात ‘जंतरमंतर’वर त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचे जाहीर झाले तेव्हाही बर्‍याच जणांना या चळवळीचे बारा वाजणार अशी खात्री होती. मात्र पहिल्याच फटक्यात महाराष्ट्रातील या फाटक्या माणसाला देशाने डोक्यावर घेतले. अन् आता तर ह्दयाच्या देव्हार्‍यातही स्थान दिले आहे.

अण्णा हजारे यांचा भाबडा आशावाद, ‘जनलोकपाला’तील अनेक तृटी, अण्णांच्या सहकार्‍यांचा हेकेखोरपणा या सार्‍या बाबी गृहीत धरल्या तरी अण्णा हा माणूस आभाळाएवढा वाटतो. कारण त्यांनी आम्हाला आत्मविश्‍वास दिलाय. आत्मविश्‍वास जुलूमी व भ्रष्ट नेत्यांविरूध्द उभा राहण्याचा…आत्मविश्‍वास आपण ही व्यवस्था बदलू शकतो याचा! अन् सर्वात महत्वाची बाब म्हणजे कुणी तरी नि:स्वार्थीपणे देशासाठी सर्वस्व पणाला लावू शकतो याची प्रचिती अण्णांमुळेच आपणास मिळाली. आजवर आपल्या देशात राजकारण, बॉलिवुड वा क्रिकेटसाठीच गर्दी जमू शकते असा समज होता. किंबहुना पुढारी, सिनेनट आणि क्रिकेटपटूंच्या भक्तीखातर देशातील पिढ्यानपिढ्या बरबाद झाल्या आहेत. देशात भ्रष्टाचार, महागाई अन् लाचखोरीचा आगडोंब उसळला असतांना जनतेला राजकारण, सिनेमा वा क्रिकेटच्या माध्यमातून कायम गुंगीत ठेवण्यात आले आहे. मात्र विश्‍वचषक जिंकल्यावर काही दिवसांतच अण्णा हजारे यांनी पहिल्या आंदोलनात विजयाचा उन्माद फिका पाडला. खरं तर तेव्हाच अण्णांच्या रूपात देशाला नवीन स्वप्न मिळाल्याचे संकेत मिळाले होते. आज ती बाब प्रत्यक्षात उतरली आहे.
अण्णांच्या आंदोलनाचा आता अत्यंत सूक्ष्म किस पाडला जातोय. यासाठी लागणार्‍या धनापासून ते विचारापर्यंत परकीय शक्तीचा हात असल्याचा शोध लावण्यात आला आहे. खरं तर भारत हा इतिहासात कधीच एकसंघ देश नव्हता. राष्ट्र,राष्ट्रभक्ती अन् स्वातंत्र्य या बाबी आपण पाश्‍चात्य राष्ट्रांकडून घेतल्या आहेत. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील तमाम मान्यवरांचे प्रेरणास्त्रोत हे अन्य देशांमधील आहेत. यात अगदी फ्रेंच राज्यक्रांती, रशियन क्रांती, ब्रिटीश लोकशाही, चिनी स्वातंत्र्य लढा, अमेरिकेचे स्वातंत्र्ययुध्द, इटालियन स्वातंत्र्य योध्दे, एवढेच नव्हे तर हिटलरसारख्यांनीही भारतीय स्वातंत्र्यलढ्यास बळ दिले ही बाब कुणी नाकारू शकत नाही. यामुळे परकीय विचारांचा मुद्दा बाद ठरतो. अण्णा हजारे यांचे आंदोलन सर्वव्यापी नसल्याचाही आरोप होत आहे. खरं तर आपला स्वातंत्र्यलढाही कोणत्याही टप्प्यावर सर्वव्यापी नव्हता. समाजातील मुठभर स्वातंत्र्य सैनिकांनी देशाला परकीय जोखडातून मुक्त करण्यासाठी आयुष्य वेचले. खुद्द ब्रिटीशांची हाजी हाजी करणारे संस्थानिक, व्यापारी आणि उद्योजकांनीही स्वातंत्र्याची फळे चाखली. सांगायचा मुद्दा असा की, अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची महत्ता कुणी नाकारू शकत नाही. पैसा-अडका, उच्च शिक्षण वा कोणतेही राजकीय पद नसणार्‍या अण्णा हजारेंसोबत आज ‘इंडिया’ आणि ‘भारत’ दोन्ही उभे राहिले आहेत. महाराष्ट्रातील सामान्यजनही त्यांच्यासोबत असल्याचे दिसून आले आहे. मात्र अभिजनांचे काय?

सौ. प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी जाहीर झाल्यावर शिवसेनेने राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात अगदी अभिमानपूर्वक मतदान केले होते. सौ. प्रतिभाताईंना केवळ मराठीच्या मुद्यावरून शिवसेनेने समर्थन दिले. एवढेच नव्हे तर कधी काळी शरदराव पवार वा अन्य कुणी मराठी नेता पंतप्रधान बनण्याची वेळ आल्यास आपण हीच भूमिका घेऊ असे शिवसेनेने वारंवार सांगितले आहे. मात्र आज अण्णा हजारे यांच्या पाठीशी देश उभा राहिल्याचे दिसत असतांनाही शिवसेनेचा ‘मराठी बाणा’ कोठे गेलाय? नाही म्हटल्यास रामलीला मैदानावर खा. संजय राऊत यांनी ‘दूत’ बनून शिष्टाई करण्याचा फुटकळ प्रयत्न केला. बाळासाहेब ठाकरे यांचे पत्र त्यांनी पोहचविले. यात अण्णांच्या सहकार्‍यांना चिमटा घेत त्यांना उपोषण सोडविण्याचे आवाहन करण्यात आले. ही बाब वगळता शिवसेनेने कोणताही ठाम पवित्रा घेतला नाही. इकडे मराठीच्या नावावर टोकाची भूमिका घेऊन त्याचा पुरेपूर राजकीय लाभ उचलणारे राज ठाकरे यांनीही अण्णांनी परप्रांतीयांची घाण साफ करण्याचा सल्ला देत चुप्पी साधली आहे. नुकतीच गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळणार्‍या राजसाहेबांची वाणी अण्णा हजारे नामक महापुरूषासमोर मूक का बनलीय याचा उलगडा झाला नाही. मानलं अण्णांना पाठींबा दिल्याचा राजकीय लाभ होणार नाही. मात्र एक मराठी योध्दा निर्यायक लढाईचे नेतृत्व करत असतांना खुद्द मराठी ह्दयसम्राट गप्प का बसलेत? अगदी कॉंग्रेसचे सरचिटणीस राहूल गांधी यांच्याप्रमाणे राज ठाकरे यांचे मौन हे अनाकलनीय आहे. कदाचित, आपल्यासोबत असणारी तरूणाई अण्णासारख्या कोणतेही वलय नसणार्‍याकडे वळली कशी? याबद्दल त्यांचे मंथन सुरू असावे. या वर्षी जानेवारी महिन्यात बनारस हिंदू विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात अण्णा हजारे यांनी मनसेच्या मराठी अस्मितेचे समर्थन केले होते. यावरून अण्णा हजारेंवर टीकाही करण्यात आली होती. मनसेचे समर्थन करतांना अण्णांनी कोणत्याही परिणामाचा विचार केला नव्हता ही बाब याठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे. अण्णांच्या प्रश्‍नावरून ‘जाणता राजा’ही चुप आहे अन् कॉंग्रेसचे तर विचारायलाच नको. भाजपाने या आंदोलनास ‘हायजॅक’ करण्याचे प्रयत्न केले. मात्र यात ते सफल ठरले नाहीत. असो.

महाराष्ट्रातील राजकीय पक्षांची लाचारी आपण एकवेळेस समजू शकतो. मात्र, खुद्द मराठीचा गजर करणारे लेखक, पत्रकार, कलावंत आदी मंडळीही गप्प आहे. किंबहुना राज्यातील निवडक वर्तमानपत्रांचा अपवाद वगळता अण्णांच्या आंदोलनास ‘सामूहिक उन्माद’ या स्वरूपात सादर करण्यात येत आहे. तमाम मराठी बोरूबहाद्दर अण्णा आणि त्यांच्या सहकार्‍यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यासाठी आपली लेखणी झिजवत आहेत. याहूनही नेभळट भूमिका कलावंतांची आहे. दाक्षिणात्य महानायक रजनीकांत, भोजपुरी सुपरस्टार मनोज तिवारी, बॉलिवुडमधील डझनवारी कलावंत यांच्यासह देशातील अनेक चित्रपट कलावंत अण्णांच्या समर्थनार्थ समोर आले आहेत. मराठी कलावंत मात्र ‘कातडी बचाव’ भूमिकेत आहेत. कदाचित अण्णांना पाठींबा दिल्यास राज्य शासनाकडून मिळणार्‍या अनुदानाचे काय? हा प्रश्‍न त्यांना सतावत असावा. बरं ही पोटार्थी मंडळी वेळ येताच ‘मराठी’चा गजर करण्यास मोकळे! असा हा सगळा खेळ सुरू आहे. साहित्यिक मंडळी तर याहूनही लेचीपेची आहे. सत्ताधार्‍यांच्या विरोधात ब्रदेखील काढण्यास घाबरणारी मंडळी काय डोंबलाचं तेजस्वी साहित्याचे सृजन करणार? हो वेळोवेळी इतिहासाचे गौरवगान करण्याची भाटगिरी मात्र सुरूच राहिल.

पुन्हा पहिल्या मुद्याकडे वळूया. एक पत्रकार म्हणून अण्णांच्या आंदोलनाची इतिश्री कशात होणार? इतिहासात अण्णा आणि त्यांच्या आंदोलनाचे नेमके काय स्थान राहणार? हे आजच सांगणे कठीण आहे. मात्र, माझ्या एका मराठी बांधवाच्या इशार्‍यावर देशातील करोडो जनता पेटून उठली याचा मला सार्थ अभिमान आहे अन् राहील. मराठीच्या नावाने राजकारण आणि व्यापार करणार्‍यांनो अण्णांचे समर्थन न करण्यासाठी आपल्याकडे खूप बहाणे असतील. मात्र तुम्ही कपाळकरंटे आहात. आपल्या स्वभाषी योध्द्याच्या पाठीशी उभे राहण्याची संधी तुम्ही दवडली अन् ‘मराठीच मराठी माणसांचा दुश्मन’ ही ऐतिहासिक परंपराही जपली. अण्णा…राजकारणी तुमच्या सोबत नसतील मात्र मराठी जनता आहेच…मराठी माणूस कधी पंतप्रधान बनणार? मराठी लेखकाला कधी नोबेल मिळणार? आपल्या चित्रपटाला ऑस्कर कधी? सचिनला ‘भारतरत्न कधी? अशा भाकड चर्चा आम्ही पत्रकार सातत्याने करतो. मात्र पंतप्रधानपद, ‘ऑस्कर’,‘नोबल’ वा ‘भारतरत्न’ यांच्यापेक्षाही जनतेचे प्रेम अनमोल असते. अन् याच्यात मोजदाद केली असता आज अण्णा समस्त पद वा पुरस्कारांपेक्षा मोठे आहेत.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या रूपाने सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावल्याचा उल्लेख वारंवार करण्यात येतो. मात्र खुद्द हिमालयच राळेगणसिध्दीसारख्या खेड्यातील एका मंदिरात वास्तव्यास होता याची जाणीव महाराष्ट्राला फार उशीरा झाली. आज या गौरीशंकराकडे समस्त भारतवासी आशास्थान म्हणून पाहताहेत तेव्हा तरी सारे राजकीय वा व्यापारी फायदे-तोटे बाजूला सारून त्यांच्यासोबत उभे राहण्याची गरज आहे. अर्थात आता अण्णांना राजकीय सौदेबाजांची गरजही नाही म्हणा!

(छायाचित्र आंतरजालावरून साभार)

About the author

shekhar patil

1 Comment

  • agadi ya haram khoranchya dolyat anjan ghalanare likhan tumhi kele ahe Shekharji!
    thanks for sharing

Leave a Comment