चालू घडामोडी राजकारण

कालाय तस्मै नम:

राजकारणात किती ताणून धरावे आणि किती लवचिक रहावे हे ज्याला समजले तो नेता व त्याचा पक्ष कितीही आघात पचवून टिकून राहतो. नेमका हाच लवचिकपणा उध्दव ठाकरे यांनी अमित शाह यांना मातोश्रीवर स्वत: आमंत्रण देऊन दाखविला आहे.

राजकारणात किती ताणून धरावे आणि किती लवचिक रहावे हे ज्याला समजले तो नेता व त्याचा पक्ष कितीही आघात पचवून टिकून राहतो. नेमका हाच लवचिकपणा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना मातोश्रीवर स्वत: आमंत्रण देऊन दाखविला आहे. यातून महायुतीतील तणाव बर्‍याच प्रमाणात तर निवळला तसेच उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वातील मुत्सद्देगिरी व लवचिकता पुन्हा एकदा दिसून आली आहे.

राजकीय उपद्रवमुल्याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर अगदी ग्रामपंचायतपासून ते संसदेपर्यंत दिसून येतात. विशेषत: त्रिशंकू राजकीय स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात ब्लॅकमेलिंग करण्यात येते. व्ही.पी. सिंग ते मनमोहन सिंग यांच्या सरकारांनी हे वेळोवेळी अनुभवले आहे. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र देशवासियांनी भाजपला स्पष्ट बहुमत देऊन एका क्षणात तमाम प्रादेशिक व लहान पक्षांचे उपद्रवमुल्य खलास केले. याचा स्पष्ट परिणाम मंत्रिमंडळात वाटपात दिसून आला. शिवसेनेला इतिहासात सर्वाधिक जागा मिळूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पक्षाला दुय्यम आणि तुलनेत कमी मंत्रीपदे बहाल केली. यावरून शिवसेनेतून थोड्या प्रमाणात खळखळ करण्यात आली तरी याला भाजपने फारसे महत्व दिले नाही. यानंतरuddhavji_thakre वारंवार शिवसेनेला मंत्रीमंडळ विस्तारात चांगले प्रतिनिधीत्व देण्यात येईल असे सांगण्यात आले तरी ही बाब सध्या तरी धुसरच वाटत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी शिवसेनेला नवसंजीवनी मिळाली ही बाब कुणी नाकारू शकत नाही. मात्र याच निकालांनी या पक्षाच्या नेतृत्वाला अधिक प्रगल्भ आणि लवचिक बनण्यास भाग पाडले.

देशाच्या राजकीय इतिहासात सर्वात जास्त काळ चालणारी राजकीय मैत्री ही शिवसेना आणि भाजपच्या रूपाने महाराष्ट्रात पहावयास मिळते. मात्र आजवर अनेकदा युतीत मिठाचा खडा पडला तर बर्‍याचदा तणावही निर्माण झाला. यातील प्रत्येक प्रसंगी भाजप नेत्यांनी मातोश्री गाठून दिलजमाई केली. स्व. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी तर यासाठी अनेकदा मातोश्रीच्या पायर्‍या चढल्या. भाजपच्या केंद्रीय नेत्यांनीही अनेकदा हेच काम केले. या सर्व प्रसंगांमध्ये शिवसेनेची भुमिका ही नेहमी ताठर अशीच होती. एकदा तर तत्कालिन उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना बाळासाहेबांची भेट ते विश्रांती करत असल्याने नाकारण्यात आली होती. शिवसेनाप्रमुखांनी अनेकदा ठाकरी प्रहार करत भाजपची संभावना ‘कमळाबाई’ म्हणून केली तरी सहन करण्यापलीकडे भाजप नेत्यांना पर्याय नव्हता. कारण महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्यात शिवसेनेसमान प्रबळ राजकीय मित्राला गमावणारे परवडण्याजोगे नव्हते. यामुळे भाजपने नमती भुमिका घेत पक्षविस्ताराला प्राधान्य दिले. कधी काळी शेटजी-भटजींचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणार्‍या भाजपने शिवसेनेच्या ताकदीचा आपल्या विस्तारासाठी खुबीने वापर केला. लोकनेते कै. गोपीनाथ मुंडे, एकनाथराव खडसे, विनोद तावडे आदी नेत्यांनी भाजपला बहुजन चेहरा प्रदान केला. यात लोकसभेच्या निवडणुकीतील मोदी लाटेने महाराष्ट्रात अक्षरश: राजकीय सुनामी आली. या झंझावातात सत्तारूढ आघाडी भुईसपाट तर झालीच पण यासोबत शिवसेनेचा ताठरपणाही वाहून गेला.

आज केंद्रात शिवसेना कधी नव्हे इतकी प्रबळ आहे. राज्यातही हा पक्ष चांगली कामगिरी करणार हे संकेत आहेत. मात्र महायुतीतील शिवसेनेची मोठ्या भावाची भुमिका पुर्णपणे लयास जाण्याच्या मार्गावर आहे. या स्थितीतही शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी स्वबळाच्या डरकाळ्या फोडल्या. देशातील पोट निवडणुकांमधील भाजपला अपेक्षेइतके यश न मिळाल्याने याला जोर आला. इकडे भाजप नेत्यांनीही अनेकदा हाच सुर लावला.यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियातून थेट भाजप अध्यक्षांनाच ‘शहा’णा हो असा सल्ला दिल्याने आगील तेल ओतले गेले. यामुळे शहा हे मातोश्रीवर भेट देणार नसल्याचे वृत्त आल्याने खळबळ उडाली. अखेर उध्दव ठाकरे यांनी स्वत: शहा यांना मातोश्री भेटीचे आमंत्रण दिले. यासोबत काल रात्री प्रितीभोजनही आयोजित करण्यात आले.

आज महाराष्ट्रात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे शिवसेनेच्या शक्तीस्थळांवर प्रहार करण्यासाठी हा पक्ष सज्ज झाला आहे. मुंबईत आपल्या पक्षाची ताकद वाढविण्याचे अमित शहा यांनी दिलेले आदेश या अनुषंगाने महत्वाचे आहेत. या पंचवार्षिकच्या शेवटच्या कालखंडात विदर्भ स्वतंत्र करून त्याचे श्रेय पदरात पाडून घेत ते राज्य काबीज करण्याची मोहीम भाजपने उघडपणे सुरू केली आहे. नितीन गडकरी यांनी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. विदर्भाच्या मुद्यावर शिवसेनेच्या विरोधाला भाजप जुमानणार नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. एकाच वेळी विदर्भ स्वतंत्र करून काबीज करणे आणि उर्वरित महाराष्ट्रातही ताकद वाढविण्याचा भाजपचा पवित्रा हा शिवसेनेच्याच मुळावर येणार हे निश्‍चित. याचा प्रतिकार करतांना उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. मात्र सध्या तरी भाजपची साथ सोडणे ही राजकीय आत्महत्या ठरणार असल्याची जाणीवही त्यांना आहे. यामुळे आजवर भाजपला असंख्य वेळेस हिणवणार्‍या शिवसेनेला आपला कणखरपणा बाजूला ठेवावा लागला आहे. हा खर तर काळाने उगवलेला सुडच मानावा लागेल. मात्र उध्दव ठाकरे हे निव्वळ भावनेच्या भरात नव्हे तर मुत्द्दीपणाने निर्णय घेत असल्याचेही यातून दिसून आले आहे. अमित शहा यांना आमंत्रित करतांना ठाकरे यांनी दाखविलेली लवचिकता कायम ठेवल्यास ते आपल्या राजकीय विरोधकांचा सामना करत भाजपसारख्या मित्रपक्षाच्या कुरघोडींवरही मात करू शकतात.

About the author

shekhar patil

Leave a Comment