Featured slider साहित्य

कालातीत फिराक

Written by shekhar patil

उर्दू काव्यातील उत्तुंग व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाणारे रघुपती सहाय उर्फ फिराक गोरखपुरी यांची आज जयंती! गालीब, मीर, फैज, इकबाल आदींसारख्या महान कविंसोबत गणना होणारे फिराक यांच्या काव्यात मानवी जीवनातील विविध भावनांना अत्यंत सारगर्भ अशा पध्दतीत अभिव्यक्त करण्यात आले आहे. संस्कृत ही हिंदूंची तर उर्दू मुस्लीमांची अशा सरळसोप्या विभाजनाला छेद देणार्‍या अनेक बाबी आहेत. धर्म, वंश, जाती आणि भाषांच्या पलीकडे जाणारे किंबहुना या भेदांवर आधारित दरीवरील सेतू म्हणून काम करणारे अनेक मान्यवर आहेत. यातील मोजक्या नावांपैकी एक म्हणून देखील फिराक ओळखले जातात. किंबहुना भारतीय ऐक्याचे प्रतिक म्हणून ओळखल्या जाणार्‍या गंगा-जमुनी तहजीबचे (संस्कृतीचे) प्रतिक म्हणूनदेखील त्यांच्याकडे पाहिले जाते.

हो जिन्हें शक, वो करें और खुदाओं की तलाश
हम तो इंसान को दुनिया का खुदा कहते है

अशा शब्दातील मानवतेचा जयघोष त्यांच्या काव्यातून सातत्याने स्त्रवला आहे. फिराक यांचे नाव येताच एक अक्खड व मनस्वी व्यक्तीमत्व डोळ्यासमोर उभे राहते. आपल्या आयुष्यात अत्यंत फटकळ असणार्‍या या शायराने आपल्या काव्यातून मात्र अत्यंत कोमल अभिव्यक्तीने गुणवत्तेचा एक मापदंड प्रस्थापित केला आहे. आपल्या आयुष्याप्रमाणेच फिराक यांनी काव्यातही विद्रोह आणला. पारंपरीक प्रतिकांच्या पलीकडे ते गेले. उर्दूतील प्रतिमासृष्टी बदलण्याची कामगिरी करणार्‍या मोजक्या प्रतिभावंतांमध्ये त्यांचा समावेश होतो. या भाषेतील तरक्कीपसंद अर्थात प्रगतीशील कविंमध्ये त्यांचा समावेश होत असून त्यांनी आपल्या काव्यातून सातत्याने पुरोगामीत्वाला प्राधान्य दिले.

आने वाली नस्लें तुम पर
रश्क करेंगी हमअस्रों
जब ये ख्याल आयेगा उनको
तुमने फ़िराक़ को देखा था।

अशा शब्दात आपल्या महत्तेला वर्णन करणारा हा शायर वरकरणी अहंकारी आणि स्वमग्न वाटतो. मात्र प्रत्यक्ष आयुष्यात फिराक यांना अनेक न्यूनगंडांनी पछाडलेले होते. अबोध वयात निरक्षर, गावठी संस्कार असणार्‍या मुलीसोबत घरच्यांनी लावून दिलेल्या विवाहाच्या वेदना त्यांना आयुष्यभर सतावत राहिल्या. त्यांची स्वप्नसुंदरी फिराक यांना आयुष्यात कधी भेटलीच नाही. आणि घरचे वास्तव त्यांना प्रचंड अस्वस्थ करणारे ठरले. तर दुसरीकडे आपले दिसणे हेदेखील चारचौघांसारखेच असल्याची सलदेखील त्यांना जाणवत असे. अर्थात या घुसमटीतून अजरामर काव्य जन्मास आले. यात अत्यंत विलोभनीय प्रेमाविष्कार असला तरी अनेक ठिकाणी असफल प्रेमाच्या वेदनादेखील आहेत.

कुछ इशारे थे जिन्हें दुनिया समझ बैठे थे हम
उस निगाह-ए-आशना को क्या समझ बैठे थे हम

अशा शब्दात व्यथा व्यक्त करणारा हा प्रतिभावंत मुग्ध प्रेयसीचे वर्णन करतांना विलक्षण हळूवारही होतो.

लहरों में खिला कंवल नहाए जैसे
दोशीजाए सुबह गुनगुनाए जैसे
ये रूप ये लोच ये तरन्नुम ये निखार
बच्चा सोते में मुस्काए जैसे

अर्थात फिराक गोरखपुरी यांच्या काव्यात प्रेमाच्या पलीकडच्या संवेदनाही आढळून येतात. विशेष करून मानवी जीवनावर भाष्य करणारे त्यांचे शेर काळाच्या कसोटीवर टिकणारे ठरले आहेत. ते म्हणतात…

बहुत पहले से उन कदमो की
आहट जान लेते है
तुझे ऐ जिंदगी हम
दूर से पहचान लेते है

याच पध्दतीने फिराक यांच्या काव्यात जीवनाच्या विविध अंगांवर समर्पक भाष्य करण्यात आले आहे. गजल, नज्म, अशआर या सर्व काव्य प्रकारांमध्ये त्यांनी लिलया संचार केला. त्यांना नवीन उंची प्रदान केली. खरं तर फिराक समजून घेणे अवघड आहे. त्यांनी आपल्या दीर्घायुष्यात विपुल सृजन केले. अनेकविध विषयांना स्पर्श केला. आयुष्यातही विविध मान-सन्मान त्यांच्या वाट्याला आलेत. यात ज्ञानपीठाचाही समावेश आहे. फिराक यांनी म्हटल्यानुसार त्यांना पाहण्याचे, ऐकण्याचे आपल्याला भाग्य लाभले नाही. तथापि, आपल्या सृजनाच्या माध्यमातून येणार्‍या अनेक पिढ्यांवर त्यांनी खरोखर उपकार करून ठेवले आहेत हे कोण नाकारणार ? ते एका ठिकाणी म्हणतात-

मिल आओ फ़िराक से भी एक दिन
वह शख्स एक अजीब आदमी है

फिराक हा माणूस म्हणून विचीत्र असेल, विक्षीप्तही असू शकतो. तथापि, याच माणसाने जीवन सुंदर करणारे बरेच काही निर्मित केलेय हे कुणी विसरू शकणार नाही. १९६२ साली चीनसोबत झालेल्या युध्दाच्या कालखंडात फिराक गोरखपुरी यांची ही गजल खूप गाजली होती.

सुखन की शम्मां जलाओ बहुत उदास है रात
नवाए मीर सुनाओ बहुत उदास है रात
कोई कहे ये खयालों और ख्वाबों से
दिलों से दूर न जाओ बहुत उदास है रात
पड़े हो धुंधली फिजाओं में मुंह लपेटे हुये
सितारों सामने आओ बहुत उदास है रात।

आज आपला धुमसणारा भोवताल पाहता या ओळी किती समर्पक आहेत हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाहीच.

About the author

shekhar patil

Leave a Comment