Featured चालू घडामोडी राजकारण

‘कार्टुन नेटवर्क’चा नवा राजकीय प्रयोग

Written by shekhar patil

अनेक विषयांमध्ये पारंगत असणारा माझा एक विद्वान मित्र माझ्याशी नेहमी एका विषयावरून भांडतो. ‘अरे कसला शब्दसाठा रे तुम्हा पत्रकारांचा ?…च्यामारी पॉप कल्चरमधील एखादा शब्द पार वैताग येईपर्यंत घासतात. अन् आम्हालाही त्रास देतात राव !” यावरून मला नेहमी निरूत्तर व्हावे लागते. एखादा गाजणारा चित्रपट, त्यातील खमंग व खटकेबाज संवाद, गाणी अथवा पात्रांच्या नावावरून सारखा बातम्यांचा रतीब घातला जातो. अलीकडच्या काळात ‘सैराट’ आणि ‘सर्जिकल स्ट्राईक’ या आशयाच्या शीर्षकांवरून आपण वाचलेल्या अथवा वाचत असलेल्या बातम्या आठवून पाहिल्या तर माझ्या मित्राचे म्हणणे आपल्याला पटू शकते. यात गोची अशी की, वाचणारालाही हे आवडते म्हणून आम्ही लोक जनतेला त्याच शब्दांमध्ये सादर करतो. मात्र यावर माझ्या मित्राचे म्हणणे असे की, “तुम्ही वेगळ्या शब्दांचे प्रयोग तर करा…आम्हाला पर्याय द्या. आम्ही ठरवू काय घ्यायचे ते !” मात्र एकसुरीपणातून लोकप्रिय अभिव्यक्ती सहजसोपी असल्याने आम्ही लोक हाच मार्ग निवडतो हे सांगणे नको. आता तुम्ही म्हणाल आज काय हे पुराण लावले? तर याला संदर्भ आहे तो आपल्या राजकारण्यांच्या आरोप-प्रत्यारोपांचा.

बहुतांश राजकारण्यांकडेही फार काही विपुल शब्दसाठा आणि उपमा नसतात. अत्यंत रसाळ आणि सुलभ भाषेत बोलण्याचे कसब मोजक्या नेत्यांकडे असते. यातच ‘पॉईंट-टू-पॉईंट’ आणि अगदी धारदार पध्दतीचे आरोप-प्रत्यारोप नेहमी लोकप्रिय शब्द, वाक्प्रचार, कविता, शायरी, चित्रपट, त्यातील गाणी अथवा संवादांच्या माध्यमातून करण्यात येतात. यामुळे विरोधी पक्षनेत्यांनी सरकारला डोरेमॉन आणि नोबिता या कार्टुन कॅरेक्टर्सच्या माध्यमातून संबोधल्यानंतर याला उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनाही मोगली आठवल्यानंतर मला खूपच गंमत वाटली. नंतरही याचे चर्वण झाले. अनेकांनी यावरून आपल्या राजकारण्यांवर टिकेची झोड उठविली आहे. आपले राजकारणी शाळकरी मुलांच्या पायरीवर उतरल्याचा आरोपदेखील करण्यात येत आहे. मात्र यातील सकारात्मकता लक्षात घ्या. राजकारणी आता उपमांचा वापर करतांना माझ्या मित्राच्या भाषेत ‘नवीन प्रयोग’ करू लागले आहेत. भलेही ते भालचंद्र नेमाडेंनी निर्मित केलेल्या खंडेरावाच्या वा कवि ग्रेसांच्या भरजरी भाषेत एकमेकांवर हल्लाबोल करण्याइतपत वयात आले नसतील; ते शाळकरी मुलांच्या भाषेत बोलत असतील…तरी त्यांनी मळलेली पाऊलवाट सोडली हे महत्वाचे. आणि हो कार्टुन्सचा संबंध फक्त वयाशी नक्कीच नाही. आमच्या मुलांना आज जे पहायला मिळते ते आम्हाला मिळाले नाही. मात्र कार्टुन्समधील ‘इमॅजिनेशन’ भन्नाट असते. अगदी पारंपरिक चित्रपटांना असणार्‍या मर्यादादेखील ते सहजपणे झुगारून लावते. माझी मुले कार्टुन्स पाहत असतांना मी त्यांना भारावल्यागत पाहतो. त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद, उत्सुकता आणि कुतुहल मला माझ्या बालपणात घेऊन जाते. जेव्हा दूरदर्शनवरील मोजक्या मालिकांशिवाय काहीही उपलब्ध नव्हते. तेव्हा वाचलेले चाचा चौधरी, मोटू-पतलू आता माझ्या मुलांना सजीव स्वरूपात पहायला मिळतात तेव्हा आपसूकच बालपणही आठवते अन् मन मोहरून जाते. मला आजही कार्टुन्सचे अनेक कॅरेक्टर्स आवडतात. आणि हे सांगण्यात मला कसलाही कमीपणा वाटत नाही. लोटपोटसारख्या कॉमिक्स आणि चांदोबासारख्या मासिकांनी माझ्यावर वाचनसंस्कार केलेत. याचे ऋण मी कधीही विसरणार नाही. यामुळे कार्टुन्स हे बालीश वा कमअस्सल असल्याची हेटाळणी मी कधीही करू शकत नाही. खरं तर अनेकांना कार्टुन्स आवडत असले तरी त्यातील अनेकांना हे मान्य करणे आवडत नाही. या पार्श्‍वभूमिवर आपल्या नेत्यांना डोरेमॉन व नोबिताच्या स्वभाववैशिष्टांचा आधार घेत बोलण्याचे कसे सुचले? याचे मला खूप कुतुहल आहे. त्यांना ही बाब सुचली असल्यास उत्तम! अथवा ज्यांनी त्यांना हा सल्ला दिला त्यांचेही कौतुक करायलाच पाहिजे. वास्तविक पाहता राजकारण्यांचा समावेश व्यंगचित्रकारांचा आवडत्या विषयांमध्ये करण्यात येतो. नेते हे व्यंगचित्रकारांना नेहमीच नवनवीन खाद्य पुरवत असतात. मात्र एखाद्या लोकप्रिय कार्टुनच्या माध्यमातून केलेले राजकीय आरोप-प्रत्यारोप हे ताज्या झुळुकेसारखेच नव्हेत काय ?

उरला सर्वात महत्वाचा मुद्दा. प्रगतीशील वा एखाद्या क्षेत्रात अग्रेसर असणार्‍या समाजाच्या संस्कृतीच्या प्रचार-प्रसाराला विपुल संधी मिळतात असे साधे गणीत आहे. हिंदी चित्रपट अथवा दूरचित्रवाणी मालिकांमध्ये मराठी माणसाची भूमिका कशी दर्शवितात हे नव्याने सांगण्याची गरज नाही. याच्या अगदी विरूध्द बाब म्हणजे चित्रपट सृष्टीत आघाडीवर असणार्‍या पंजाब्यांनी आपली संस्कृती जगभरात पोहचवली. याचप्रमाणे अन्य प्रगत समाजांनीही याचाच कित्ता गिरवला आहे. मात्र ‘मराठी पाऊल पडते पुढे’ म्हणणारे आपण यात कुठे आहोत? अगदी शाळकरी मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख लावणार्‍या कार्टुन्समध्ये अस्सल मराठी कॅरेक्टर आहे कुठे? आपला फास्टर फेणे, गोट्या वा चिंटू हे डोरेमॉन, नोबिता, मिकी माऊस वा टॉम अँड जेरीप्रमाणे जग पादाक्रांत करणे तर सोडाच मोटू-पतलू वा छोटा भीमप्रमाणे भारतीय बालकांवर तरी गारूड करणार का? याचा विचार आपण करावयाचा आहे. यामुळे आपल्या नेत्यांच्या तोंडी परकीय कार्टुन पात्रांचा उल्लेख येणे हा मराठीतल्या या क्षेत्रातील उणीवेवर थेट बोट ठेवणारेखील आहे. असो. सध्या तरी आपले राजकारणी वयात येण्याच्या मार्गावर आल्याचे मला तरी वाटत आहे. पारंपरिक उपमांचा आधार न घेता नवा मग तो भलेही ‘बालसुलभ’ मार्ग असेल तरी त्यावरून जाण्याचा प्रयत्न ते करताहेत. यामुळे सध्याचे राजकीय ‘कार्टुन नेटवर्क’ नक्कीच मस्त आणि स्वागतार्ह आहे.

About the author

shekhar patil

Leave a Comment