Featured साहित्य

कारूण्यमयी बहिणाबाई

Written by shekhar patil

आज बहिणाबाई चौधरी यांची पुण्यतिथी. आजवर बहिणाबाईंच्या सृजनातील अनेक अंगांवर लिखाण झाले. यात त्यांचे माहेर, काव्यात आढळून येणार्‍या जळगावातील पाऊलखुणा, त्यांच्या काव्यातील पाऊस, त्यांचे माहेर, आसोदे गावाशी असणारा भावबंध आदींबाबत लिहून झाले. आज त्यांच्या सृजनातील करूणरसाबाबत.

बहिणाबाईंचे पती नथ्थूजी चौधरी हे अकालीच वारल्यामुळे त्यांच्यावर वैधव्याचा डोंगर कोसळला. भारतात विधवेचे जगणे किती कठीण असते हे नव्याने सांगण्याचे आवश्यकता नाही. यातच आजच्या शंभर वर्षांपूर्वीच्या भयावह स्थितीची आपण तर कल्पनाही करू शकत नाही. वैधव्य ही केवळ सामाजिक, आर्थिक, सांस्कृतीक समस्या नसून व्यापक अर्थाने जीवन कलहात तगून राहण्यासाठीतील एक सर्वात मोठा अडथळाच असतो. सावकाराकडून काढलेल्या कर्जाची फेड करण्यासह आपल्या चिल्ल्या-पिल्ल्यांना वाढीस लावतांना बहिणाबाईंची परिस्थितीने खूप परीक्षा घेतली. त्यांनी मोठ्या हिंमतीने याला तोंड दिले. मात्र आयुष्यातील या वेदना त्यांच्या काव्यातून आपोआपच स्त्रवल्या. यातील ‘आता माझा माले जीव’ या कवितेत त्या बहिणाबाईंची किव करणार्‍यांचीच समजूत काढतात.

अरे रडता रडता
डोये भरले भरले
आसू सरले सरले
आता हुंदके उरले

आसू सरले सरले
माझा मालेच इसावा
असा आसवा बगर
रडू नको माझ्या जीवा

सांग सांग धर्ती माता
अशी कशी जादू झाली
झाड गेलं निंघीसनी
मांंघे सावली उरली

देव गेले देवाघरी
आठी ठेयीसनी ठेवा
डोयापुढे दोन लाल
रडू नको माझ्या जीवा

रडू नको माझ्या जीवा
तुला रड्याची रे सव
रडू हासव रे जरा
त्यात संसाराची चव

कुंकू पुसलं पुसलं
आता उरलं गोंदन
तेच देइन देइन
नशिबाले आवतन

जरी तुटल्या बांगड्या
मनगटी करतूत
तुटे मंगयसूतर
उरे गयाची शपत

नका नका आयाबाया
नका करू माझी किव
झालं माझ समाधान
आता माझा माले जीव

यात बहिणाबाई आपल्या मनालाच नव्हे तर आजूबाजूच्या कनवाळू आया-बायांनाही समजावत आहेत. बांगड्या फुटल्या तरी मनगटात कर्तृत्व आहे अन् मंगळसूत्र तुटले तरी गळ्याची शपथ उरल्याचा दुर्दम्य आशावाद यात आहे. मात्र या कवितेच्या पुर्वार्धातील कारूण्य कुणाही संवेदनशील मनाला स्पर्श केल्याशिवाय राहत नाही. या भागात शोकमग्न असणार्‍या बहिणाबाई अवघ्या काही ओळीनंतर विलक्षण संकल्पवान आणि आशावादी वाटतात. एकाच वेळेस कारूण्य आणि आशावाद व्यक्त करण्याची किमया ही फक्त त्यांच्या उत्तुंग प्रतिभेलाच शक्य आहे. याचमुळे मला ‘आता माझा माले जीव’ ही कविता विलक्षण आशावादी आणि जीवनाच्या लढाईत कितीही विपरीत स्थिती आली तरी ‘दोन हात’ करण्याची शिकवण देणारी वाटते. ‘लपे करमाची रेखा’ या कवितेत हीच दुर्दम्य इच्छाशक्ती अजून वेगळ्या स्वरूपात अभिव्यक्त झाली आहे.

लपे करमाची रेखा
माझ्या कुंकवाच्या खाली
पुशिसनी गेलं कुंकू
रेखा उघडी पडली

देवा, तुझ्याबी घरचा
झरा धनाचा आटला
धन रेखाच्या चर्‍यानं
तयहात रे फाटला

बापा, नको मारू थापा
असो खर्‍या असो खोट्या
नाही नशीब नशीब
तयहाताच्या रेघोट्या

अरे नशीब नशीब
लागे चक्कर पायाले
नशिबाचे नऊ गिर्‍हे
ते भी फिरत राह्यले

राहो दोन लाल सुखी
हेच देवाले मागनं
त्यात आलं रे नशीब
काय सांगे पंचागन

नको नको रे जोतिषा
नको हात माझा पाहू
माझं दैव माले कये
माझ्या दारी नको येऊ

तळहाताच्या रेघोट्या म्हणजेच नशिब नसल्याचे बहिणाबाई जाणून आहेत. कथित धनरेषेच्या चर्‍याने आपला हात फाटल्याचे सांगतांना त्या आपल्या आयुष्यातील श्रमांची महत्ता सहजपणे सांगतात. कुणीही दैववादी नव्हे तर कर्मवादी बनावे असा त्यांचा यातून संदेश आहे. परिणामी माझे दैव मला कळत असल्याने ज्योतिष्याने आपल्या दारीदेखील येऊ नये असे त्या ठणकावतात. याचमुळे-

माझं दुख, माझं दुख
तयघरात कोंडलं
माझ सुख, माझ सुख
हांड्याझुंबरं टांगलं

माझं दुख, माझं दुख
जशी अंधारली रात
माझ सुख, माझ सुख
हातातली काडवात

अशा त्या म्हणू शकतात. भोवती कितीही अंधकार असला तरी हातात काडेपेटी असल्यामुळे घाबरायचे तरी कशासाठी? आपण दु:खाला पूर्णपणे नष्ट करू शकत नसलो तरी काही क्षण हे आयुष्याला नवीन उभारी देत असतात. याच पध्दतीने बहिणाबाई चौधरी यांचे काव्य फक्त भावविभोर करत नाही तर जगण्याला नवीन अर्थ प्रदान करते. जीवनातील थोड्याफार त्रासाने आपण जेव्हा गळून पडतो तेव्हा त्यांच्या सृजनातील आशावाद आपल्याला प्रेरित करतो. आज इतकेच !
पुढे केव्हा तरी बहिणाबाईंच्या सृजनाचा नवीन आयाम सादर करण्याचा योग नक्कीच जुळून येईल ही खात्रीदेखील आहेच.

About the author

shekhar patil

1 Comment

  • Thanks a lot for this blog, and really appreciate your explanation. I was looking for this Poem after reading book “Partner” by Va. Pu. God Bless.

Leave a Comment