Featured slider चालू घडामोडी

कटू सत्य आणि अनुत्तरीत प्रश्‍न

Written by shekhar patil

‘कास्टींग काऊच’ अर्थात देहाच्या बदल्यात काम वा संधी या प्रकारची विकृत कीड ही मनोरंजन विश्‍वाला किती भयंकर पध्दतीत लागलीय याचे अत्यंत भेसूर पध्दतीचे वर्णन सरोज खान यांनी केले. तर अगदी संसदसुध्दा याला अपवाद नसल्याचे सांगत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रेणुका चौधरी यांनी याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात असल्याचे नमूद केले आहे. सरोजबाईंनी माफी मागत यावर सोयिस्करपणे पडदा […]

‘कास्टींग काऊच’ अर्थात देहाच्या बदल्यात काम वा संधी या प्रकारची विकृत कीड ही मनोरंजन विश्‍वाला किती भयंकर पध्दतीत लागलीय याचे अत्यंत भेसूर पध्दतीचे वर्णन सरोज खान यांनी केले. तर अगदी संसदसुध्दा याला अपवाद नसल्याचे सांगत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रेणुका चौधरी यांनी याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात असल्याचे नमूद केले आहे. सरोजबाईंनी माफी मागत यावर सोयिस्करपणे पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी रेणुका चौधरी आपल्या वक्तव्यावर ठाम असून याला शत्रुघ्न सिन्हा यांनीही दुजोरा दिलाय. ही विकृती आपल्या कथित सभ्य समाजात मान्यता पावली असल्याचे कटू सत्य आपण गृहीत धरले तरी अनेक प्रश्‍न अनुत्तरीतच राहतात.

सध्या अत्यंत गतीमान अशी प्रसारमाध्यमे आणि विशेष करून सर्वव्यापी सोशल मीडियामुळे उथळ वक्तव्यांमधून मिळणारी प्रसिध्दी मिळवण्याचा हुकमी मार्ग अनेकांना गवसला आहे. अगदी ‘उचलली जीभ आणि लावली टाळ्याला’ या प्रकारातील वक्तव्ये करून थोडी खळबळ उडवून द्यायची. आणि नंतर साळसुदपणे माफी मागत हे प्रकरण झटकून टाकायचे हा ‘पॅटर्न’ अनेकांना भुरळ पाडणारा ठरला आहे. विशेष करून जगाचे लक्ष आकृष्ट करून घेण्यासाठी अनेक सेलिब्रिटी याचा वापर करतांना दिसतात. तथापि, अशाच काही बेताल बडबडींमधून आपल्या सार्वजनीक जीवनातील भेदक सत्य बाहेर येते तेव्हा समाजमन नक्कीच अस्वस्थ होते. सरोज खान या विख्यात कोरिओग्राफरने ‘बॉलिवुडमधील कास्टींग काऊचच्या प्रथेतून किमान बलात्कारीत तरूणीला रोजगार तरी मिळतो’ असे केलेले वक्तव्य हे वक्तव्यदेखील याच भयंकर प्रकारचे आहे. महिलेच्या देहाचा उपभोग हा निव्वळ काही पैशांच्या तुलनेत करणार्‍या जात पंचायती आपल्या देशात आजही अस्तित्वात आहेत. यासोबत बलात्कार करणार्‍यासोबत पिडीतेचा विवाह लाऊन देणारी कथित वडिलधारी मंडळीदेखील अनेक समाजांमध्ये आहे. यांच्यात आणि सरोज खान यांनी वर्णन केलेल्या प्रणालीत काहीच फरक नाही. स्त्री ही निव्वळ उपभोग्य निर्जीव वस्तू असल्याचा समज अडाणी व गोरगरीबांमध्ये नव्हे तर कथित सुशिक्षित आणि रग्गड पैसा असणार्‍यांमध्येही असतो यात शंकाच नाही. फक्त आर्थिक वा सामाजिक स्थिती बदलली तरी पुरूषप्रधान मानसिकतेचा दंश हा महिलेला कमी-जास्त प्रमाणात सहनच करावा लागतो.

सरोज खान यांनी आपल्या वक्तव्यात बॉलिवुडमध्ये करियर करू इच्छीणार्‍या मुलींनी वाममार्गाला लागावे की लागू नये? याचे स्वातंत्र्य असल्याची मखलाशी केली आहे. खान यांच्या मते ज्यांच्यात टॅलेंट असेल वा ज्या या मार्गाला जाऊ इच्छीत नाहीत त्यासाठी त्यांचा मार्ग मोकळा आहे. तथापि, भारतीय समाजात पुरूषी वर्चस्वाशी टक्कर घेत कोणत्याही क्षेत्रात करियर करणे किती अवघड आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. यातच पुरूषी शोषणाची बाब चव्हाट्यावर आणणार्‍यांना किती अडचणी येतात हे अलीकडच्या काही उदाहरणांवरून आपल्याला समजू शकते. याच महिन्याच्या प्रारंभी श्री रेड्डी या अभिनेत्रीने तेलगू चित्रपटसृष्टीतील कास्टींग काऊचच्या विरोधात टॉपलेस आंदोलन करून खळबळ उडवून दिली होती. मात्र तिच्या आरोपांवर कारवाई होण्याऐवजी तिला तेथील ‘मुव्ही आर्टीस्ट असोसिएशन’मधून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. यानंतर तामिळनाडूतल्या एका विद्यापीठात विद्यार्थीनींच्या उपभोगाच्या बदल्यात मार्क वाढवून देण्याच्या प्रकरणाबाबत राज्यपालांना विचारणा केली असता त्यांनी हसण्याच्या पलीकडे काहीही उत्तर दिले नाही. बीबीसीने तयार केलेल्या ‘बॉलीवुडस् डार्क सिके्रट’ या डॉक्युमेंटरीत राधिका आपटे आणि उषा जाधव यांनीही याच प्रकारातील भयंकर गौप्यस्फोट केल्याची माहिती आहे. ही डॉक्युमेंटरी उद्या प्रदर्शीत होणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत आघाडीची अभिनेत्री म्हणून गणल्या जाणार्‍या कंगणा राणावत हिने तर काही महिन्यांपूर्वीत कास्टींग काऊचबाबत गौप्यस्फोट केला तरी यावर फारशी प्रतिक्रिया उमटली नव्हती. यामुळे पुरूषप्रधान समाजात असे होणारच ही धारणा किती भयंकर प्रमाणात रूढ झालीय हे आता दिसून येत आहे. या आधीदेखील ममता कुळकर्णी, पायल रोहतगी, कल्की कोचलीन, समीरा रेड्डी, तिस्का चोपडा, सर्वीन चावला यांनीही यावर भाष्य केले आहे. तर प्रिती जैन या अभिनेत्रीने मधुर भंडारकर या निर्मार्त्यावर बलात्काराचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. धक्कादायक बाब म्हणजे काही अभिनेत्यांना बॉलिवुडमध्ये प्रख्यात असणार्‍या समलैगिंक मान्यवरांकडूनही याच प्रकारच्या ऑफर देण्यात आल्याच्या घटनादेखील उघड झाल्या आहेत. यात रणवीर सिंग आणि आयुष्यमान खुराणा यांनी आपल्याला ‘कास्टींग काऊच’चे निमंत्रण आल्याचे आधीच जाहीर केले आहे. अर्थात बॉलीवुडसह देशातील अन्य भाषिक चित्रपटसृष्टींमध्ये हा प्रकार ‘कॉमन’ असल्याचा समज रूढ झाला आहे. मात्र आता याला राजकारणाचाही आयाम जुडला आहे.

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या तथा माजी केंद्रीय मंत्री रेणुका चौधरी यांनी आधीदेखील अनेकदा विविध वाह्यात वक्तव्यांमुळे खळबळ उडवून दिलेली आहे. तथापि, सरोज खान यांच्या दाव्याला पुष्टी देतांना त्यांनी राजकारण आणि थेट संसदेपर्यंत ही कीड लागल्याचा दावा केल्याची बाब ही खरोखरच गंभीर आहे. राजकीय वर्तुळात अनेक स्त्री-पुरूष राजकारण्यांबाबत गेल्या अनेक दशकांपासून या स्वरूपाची चर्चा होत असते. आजही अगदी गल्लीपासून ते दिल्लीच्या राजकारणातील अशी उदाहरणे आपल्यासमोर आहेत. तथापि, रेणुका चौधरी यांनी याचा भेसूर चेहरा आपल्यासमोर आणला आहे. किंबहुना त्यांनी समाजाला आरसा दाखविला आहे. आधी दबक्या आवाजात सुरू असणार्‍या चर्चेला त्यांनी चव्हाट्यावर आणले आहे. यासोबत त्यांनी कोणत्याही वर्कप्लेसमध्ये महिला सुरक्षित नसून हा प्रकार सर्वत्र रूढ झाल्याचाही आरोप केला आहे. तर भाजपचे असंतुष्ट नेते शत्रुघ्न सिन्हा यांनीही याला दुजोरा दिला आहे. गेल्या वर्षाच्या उत्तरार्धात हॉलिवुडमध्ये कास्टींग काऊचची एकामागून एक प्रकरणे समोर आल्याने खळबळ उडाली होती. यातूनच सोशल मीडियात ‘मी टू’ या नावाच्या हॅशटॅगच्या माध्यमातून जगभरातील महिलांनी आपल्यावर झालेल्या शोषणाची माहिती देण्यास प्रारंभ केला असून तो आजवर सुरू आहे. हॉलिवुडमध्ये ज्यांच्यावर या प्रकारचे आरोप झाले त्यांची मोठ्या प्रमाणात छी-थू झाली. आपल्याकडे मात्र सगळा उफराटा कारभार. येथे या प्रकारचा गौप्यस्फोट करणार्‍यांनाच समाज हिन दृष्टीकोणातून पाहतो ही शोकांतिकाच आहे. अर्थात यावर एक समर्पक उपाय रेणुका चौधरी यांनी सुचविला आहे. महिलांनी ‘मी टू’च्या माध्यमातून आपल्यावरील शोषणाला नक्कीच जगासमोर आणावे. मात्र यासोबत अत्याचार करणार्‍यांना ‘यू टू’ असे ठणकावून सांगत त्याच्या सभ्यपणाचा बुरखा टराटरा फाडून टाकावा असे त्यांनी सूचित केले आहे. खुल्या विचारांच्या आणि अर्थातच महिलांना बरोबरीचा दर्जा देणार्‍या पाश्‍चात्य राष्ट्रांमध्ये ही बाब शक्य आहे. मात्र भारतासारख्या देशात ही बाब किती कठीण आहेच याची जाणीव आपल्या सर्वांनाच आहे. तथापि, संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘अन्याय करणार्‍यापेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्त दोषी असतो’, हे आधीच सांगून ठेवले आहे. अर्थात अशा प्रकारच्या शोषणाला सामोर्‍या गेलेल्या अथवा याला जवळून अनुभवणार्‍या महिलांनी निडरपणे जगासमोर येण्याची आवश्यकता आहे. मात्र हे वाटते तितके सोपेदेखील नाही. कुणी मान्यवर महिलेने आढेवेढे घेत वा मोठे धाडस दाखवत या प्रकारांना जगासमोर मांडले तरी शोषण करणार्‍यांपेक्षा त्या महिलेचीच कुचेष्टा मोठ्या प्रमाणात होत असते. श्री रेड्डी, सरोज खान, रेणुका चौधरी, कंगना राणावत, राधीक आपटे आदींनी याला वाचा फोडली असली तरी त्यांच्याही वाट्याला हा प्रकार आला आहे. आता या गैरप्रकाराला कारणीभूत असणार्‍यांना कायद्याचा दणका देण्याचे काम संपूर्ण समाजाचे आहे. यातून या सर्व महिलांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांचे उत्तरदेखील मिळू शकते. असे न झाल्यास या प्रकारचे गैरप्रकार भविष्यातही होतच राहतील. आणि क्षणिक क्षोभाच्या वा खिल्ली उडविण्याच्या पलीकडे याला फारसे महत्वदेखील उरणार नाही.

About the author

shekhar patil

1 Comment

  • कुलटा देखावा आणि उलटा कांगावा.

    ज्या महिलांनी लैंगिक शोषण विरोधात आता उतारवयात आक्षेप घेणेच त्यांचे स्वताचे अपराधी असणे सिद्ध करीत आहेत.पुरूषाने देहसुखाची मागणी केल्यावर नाकारण्याऐवजी त्याचा स्वाहा करणे,यशाची पायरी वर चढणे हे तितके समर्थक वाटत नाही.नाटक,सिनेमा क्षेत्रातील महिला त्यांचे कैलीबर नसतांना आपले भविष्य उज्वल करू पाहातात,हेच अनैतिक आहे.जर कैलीबर असेल तर पुरूषाची मागणी धुडकाऊन देऊन स्वतंत्र अभिव्यक्तीचा मार्ग का स्विकारू नये ?
    स्रीपुरूष लैंगिक संसंबंधाचा सोयीस्कर,फायदेशीर मार्ग स्विकारावा व नंतर पुरूषावर दोषारोप करावा ,हे ठिक नाही.काम मिळावे म्हणून संबंध स्विकारणे व पैसा कमवण्यासाठी सेक्सी सीन देणे याचे धाडस असलेल्या महिलांनी तरी पावित्र्यतेचा आव आणू नये.अनुभव,बॉबी,चांदणीबार,डर्डी पिक्चर असे अनेक सिनेमात महिलांनी बंद खोलीतील क्रिया कैमेरासमोर करून दाखवल्या आहेत.सेन्सार बोर्ड ला हे चित्र प्रदर्शित करणे लाज वाटते पण महिला कलाकराला कृती करतांना थोडी ही लाज वाटू नये.हे चित्र बोलके आहे.स्टोरीत गरज नसतांना कैमेरासमोर संभोग सीन करण्याची,करोडो पुरूषांना दाखवून पैसे मिळवण्याची तयारी सिनेमातील महिलांची झालेली दिसते.कुलटा बनून उलटा कांगावा करणे ,संयुक्तिक नाहीच.

Leave a Comment