चालू घडामोडी राजकारण

ओवेसींची हुकमी चाल

एमआयएम पक्षाचे नेते अकबरूद्दीन ओवेसी यांनी उध्दव ठाकरे यांना थेट दिलेले आव्हान वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. अर्थात याच प्रकारचा आगलावेपणा करत राष्ट्रीय राजकारणात बस्तान मांडण्याच्या प्रयत्नांत असणार्‍या ओवेसी बंधूंच्या दीर्घकालीन रणनितीचा हा भाग असल्याची शक्यताही यातून अधोरेखित झाली आहे.

वांद्रे पुर्व विधानसभा मतदारसंघातील पोट निवडणुकीतील प्रचार शिगेला पोहचला असतांना ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलीम अर्थात एमआयएम पक्षाचे नेते अकबरूद्दीन ओवेसी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना थेट आव्हान देत हैदराबादेत येण्याचे दिलेले आव्हान वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. अर्थात याच प्रकारचा आगलावेपणा करत राष्ट्रीय राजकारणात बस्तान मांडण्याच्या प्रयत्नांत असणार्‍या ओवेसी बंधूंच्या दीर्घकालीन रणनितीचा हा भाग असल्याची शक्यताही यातून अधोरेखित झाली आहे.

एमआयएम हा पक्ष निजामच्या राजवटीतून उदयास आलेला आहे. निझामाची राजधानी असलेल्या हैदराबादमध्ये सुलतान सलाउद्दीन ओवेसी यांनी एएमआयएमची स्थापना केली. असदुद्दीन आणि अकबरुद्दीन ही सलाउद्दीन यांची दोन मुले. मुस्लिमबहुल हैदराबादमधून त्यांच्या पक्षाचे कायम सहा-सात आमदार निवडून येतात. तेथील महापालिकाही त्यांच्याच ताब्यात आहे. एमआयएम हा कट्टर पक्ष म्हणून ओळखला जात असला तरी हैदराबादच्या पलीकडे याला फारशी ओळख मिळालेली नव्हती. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांपासून ओवेसी बंधूंनी जाणीवपुर्वक आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचे ठरविले तेव्हा त्यांनी निजाम स्टेटचा भाग असणार्‍या मराठवाड्याची निवड केली. यानुसार त्यांच्या पक्षाने प्रारंभी नांदेड महापालिकेची निवडणूक लढविली. यात फारसा गाजावाजा न करता एमआयएमने मिळवलेले यश हे अनेक राजकीय पक्षांना धक्का देणारे ठरले. विशेषत: कॉंग्रेसला यामुळे धडकी भरली. नांदेडच्या राजकारणाची सुत्रे हाती असणारे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या निकालावर जाहीर भाष्य करत कॉंग्रेसला यामुळे भविष्यात अडचणी येऊ शकतात अशी चिंता व्यक्त केल्याने यातील गांभिर्य सर्वांच्या लक्षात आले.
oweseibrothers

खरं तर २००७ साली मुस्लीम धर्मावर टीका करण्याचा आरोप असणारे लेखक सलमान रश्दी व विजनवासात असणार्‍या बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांना जिवे मारण्याचा फतवा काढून त्यांनी खळबळ उडवून दिली होती. यानंतर असदुद्दीन आणि अकबरूद्दीन या दोन्ही बंधूंनी वादग्रस्त वक्तव्यांची श्रुंखला सुरू ठेवल्याने मुस्लीम समुदायातील एक गट त्यांच्याकडे आकर्षीत झाला. लोकसभा निवडणुकीस अवघे काही महिने उरले असतांना अकबरूद्दीन ओवेसी यांनी तर ‘केवळ १५ मिनिटांसाठी पोलीस हटवा, २५ कोटी मुसलमान १०० कोटी हिंदूंना आपली ताकद दाखवतील ’ अशी गरळ ओकल्याने प्रचंड खळबळ उडाली. यामुळे त्यांना काही दिवस कारागृहाची हवादेखील खावी लागली. याच कालखंडात भारतीय जनता पक्षाने तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर केल्यानंतर तर ओवेसी बंधू चेकाळले. त्यांनी मोदींवर टीका करत हैदराबादेत येण्याचे आव्हान दिले. अर्थात मोदींनी हैदराबाद येथे विराट सभा घेऊन त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. यानंतर ओवेसींनी मात्र अचाट आव्हाने देण्याची शैली बदलली तरी मोदींवरील टीका सोडली नाही. विशेषत: मोदींच्या झंझावाताने अल्पसंख्यांक समाजाचे अस्तित्व धोक्यात आल्याची आवई उठवत एमआयएमला आपला विस्तार करावयाचा आहे.

महाराष्ट्र विधानसभेत निवडक जागांवर एमआयएमने उमेदवार दिले. यात औरंगाबाद मध्य आणि भायखळा या जागांवर पक्षाचे उमेदवार निवडून आल्याने ओवेसी बंधूंचा उत्साह दुणावला. यानंतर त्यांच्या महाराष्ट्रातील फेर्‍या वाढल्या आहेत. मुस्लीम आणि दलित समाजांमध्ये पाया मजबुत करण्यास त्यांनी प्राधान्य दिले आहे. गंगाराम गाढे यांच्यासारखे दलित नेते एमआयएममध्ये दाखल झाले आहेत. पुणे येथील त्यांची सभा वादात सापडली. अर्थात त्यांनी संघभुमी असणार्‍या नागपुरातही सभा घेतली. महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक मतपेढी निर्णायक स्थितीत असणार्‍या मतदारसंघावर त्यांचा डोळा आहे. यानुसार औरंगाबाद महापालिका निवडणूक पुर्ण शक्तीनिशी लढण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. याचीच पुर्वतयारी म्हणून वांद्रे पुर्व मतदारसंघातील पोट निवडणुकीला पाहण्यात येत आहे. या मतदारसंघातील मुस्लीम मतांचे विभाजन हे सरळ शिवसेनेच्या पथ्यावर पडणार असल्याचे नारायण राणे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत एमआयएमने उमेदवार देऊ नये म्हणून प्रयत्न केले. अर्थात ही बोलणी अयशस्वी झाल्यानंतर राणे यांनी सातत्याने ‘एमआयएमला मत म्हणजे शिवसेनेला मत’ असा प्रचार सुरू केला आहे. एवढेच नव्हे तर मुंबईतील मुस्लीम समुदायाचे मातब्बर नेते आ. अबु आझमी यांच्यासह विविध संघटनांचे नेते राणे यांच्यासाठी प्रचार करत आहेत. मात्र अकबरूद्दीन ओवेसी यांनी निर्णायक क्षणाला थेट उध्दव ठाकरे यांना आव्हान दिल्याने खळबळ उडाली आहे. काही दिवसांपुर्वीच अकबरूद्दीन यांचे बंधू असदुद्दीन यांनीही असलीच वक्तव्ये केली होती. भारतीय राजकारणात भावना नेहमी विकासाच्या मुद्यावर वरचढ ठरलेली आहे. या पार्श्‍वभुमीवर आता एमआयएमचा वांद्रे येथील उमेदवार नेमकी किती मते घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

आता महत्वाची बाब म्हणजे एमआयएम आणि सेना-भाजप यांचे नेते एकमेकांविरूध्द जितके बोलणार तितका दोन्ही बाजूंना जास्त लाभ होणार हे साधे गणित आहे. अर्थात यातून शिवसेना आणि एमआयएमच्या उमेदवारांना आपापल्या मतपेढीचा भक्कम पाठींबा मिळेल. यामुळे मात्र राजकारणात नव्याने भरारी घेण्याच्या प्रयत्नात असणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय राजकारणात नरेंद्र मोदी यांच्या उदयानंतर ‘एमआयएम’ने आक्रमकपणे विस्ताराची रणनिती आखल्याचे स्पष्ट आहे. आजवर अल्पसंख्यांक समाज हा कॉंग्रेसोबत राहत होता. मध्यंतरी उत्तरप्रदेशात मुलायमसिंग यादव यांच्याकडे तेथील समाजाचा कल वळला. अर्थात असे असले तरी साधारणपणे धर्मनिरपेक्ष प्रतिमा असणारा राष्ट्रीय वा प्रादेशिक पक्षासोबत देशातील मुस्लीम समुदाय राहत असल्याचे चित्र आहे. अलीकडेच दिल्लीत झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ला मिळालेल्या देदीप्यमान यशातही या समुदायाचा हात आहेत. या पार्श्‍वभुमीवर ‘मुस्लीमांचा मुस्लीमांसाठी असणारा पक्ष’ म्हणून ‘एमआयएम’ देशव्यापी पातळीवर अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न करू शकतो. मध्यंतरी याबाबत उत्तरप्रदेशातही या पक्षाने चाचपणी केली आहे. या राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत एमआयएमची एंट्री ही सर्व समीकरणे बिघडवू शकते. अर्थात यासाठी विकासाचा अजेंडा देण्याऐवजी वादग्रस्त वक्तव्यांचा मार्ग सोपा असल्याने ओवेसी बंधूंनीही याचीच निवड केल्याचे दिसून येत आहे. या माध्यमातून ते राष्ट्रीय पातळीवर मुस्लीमांचे तारणहार म्हणून आपली प्रतिमा बनविण्याच्या प्रयत्नांत आहेत. खरं तर बहुतांश राजकीय पक्षांमध्ये मुस्लीम चेहरे आहेत. मात्र या समुदायातील व्यक्ती अध्यक्ष असणार्‍या राजकीय पक्षांची उदाहरणे दुर्मिळ आहेत. यात ओवेसी बंधूंसोबत आसाममधील बदरूद्दीन अजमल यांचे नाव अग्रस्थानी आहे. त्यांच्या अल्पसंख्यांकांचा चेहरा असणार्‍या ‘एआययुडीएफ’ या राजकीय पक्षाने चांगल्या प्रमाणात आपले बस्तान बसविले आहे. आज या पक्षाचे लोकसभेत तीन खासदार असून विधानसभेत १८ आमदार आहेत. आजचे संख्याबळ पाहता अजमल यांची ताकद ओवेसींपेक्षा जास्त आहे. आसामात पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत या पक्षाच्या कामगिरीवर लक्ष लागणार आहे.

खरं तर आसाम, पश्‍चिम बंगाल, उत्तरप्रदेश, केरळ आदी राज्यांमध्ये मुस्लीमबहुल मतदारसंघांचे प्रमाण तुलनेत जास्त आहे. यामुळे तेथे ‘एमआयएम’च्या प्रसाराला वाव आहे. अर्थात यासाठी जुन्या निजामाच्या राज्यातून महाराष्ट्रात चाचपणी करत ओवेसी बंधू राष्ट्रीय राजकारणात पाय भक्कम रोवण्याच्या प्रयत्नांत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे मुस्लीम अस्मितेला हवा देणारी हुकमी वक्तव्ये करण्यात येत आहेत. भविष्यात याचे अजून विखारी स्वरूप आपल्यासमोर येऊ शकते. आता पोलीस संरक्षणात असणारे नेते एकमेकांना धमक्या देतात, पाहून घेण्याच्या वल्गनादेखील करतात. मात्र जनतेच्या पदरात मात्र काय पडते? हा प्रश्‍नदेखील उरतोच. ‘एमआयएम’ला अखिल भारतीय पातळीवर मुस्लीम समाजाचा चेहरा बनायचे झाल्यास या समाजासमोरील अनेक समस्या सोडविण्यावर भर देणे आवश्यक आहे. मात्र असे न होता भावनांच्या उद्रेकाला प्राधान्य दिले जात आहे. अर्थात हिंदुत्ववादी विचारधारेचे पक्षही नेमकी असलीच कट्टर भुमिका घेत सत्तारूढ झालेत हेदेखील आपल्याला विसरून चालणार नाही. यातूनच भारतीय राजकारणाचे वारे कोणत्या दिशेला वाहत आहेत याचे भेदक दर्शन घडलेय हे मात्र निश्‍चित.

About the author

shekhar patil

Leave a Comment