Featured अनुभव

एक रात्र मंतरलेली…!

आज पौर्णिमा…अन् तीसुध्दा वैशाख अर्थात बुध्द पौर्णिमा! कितीही अरसिक व्यक्ती चंद्राचे सौदर्य नाकारू शकत नाही. चंद्र त्यातही पुर्ण चंद्र आपल्याला बेभान करतो. माझ्या आयुष्यातही पौर्णिमेशी संबंधीत मधुर आठवणींचा पट उलगडून दाखवण्यासाठी आजच्यापेक्षा दुसरा मुहुर्त कोणता असेल?

चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. चंद्र आणि मानवी मन यावर झालेल्या वैज्ञानिक संशोधनांनीही हे सिध्द केले आहे. सर्वसाधारणपणे पौर्णिमा ही शुभ आणि अमावस्या अशुभ असा समज जगभर दृढ झाला आहे. यातील अंधश्रध्देचा भाग जाऊ द्या मात्र मानवी मनाचा विचार करता पौर्णिमा ही मनोविकारांना उधाण आणणारी moonअसते. पौर्णिमेच्या दिवशी जगातील सर्वात जास्त लोक वेडसर बनतात. आपल्या पुर्वजांना ही बाब माहित होती. यामुळे इंग्रजीत वेडसर माणसासाठी लुनाटिक (लुनार म्हणजे चंद्र!) हा एक शब्द आहे. याचप्रमाणे हिंदीत ‘चांदमारा’ म्हणतात ही बाब लक्षणीय आहे. पौर्णिमेच्या काळात जगभरात अपराधांच्या संख्येत वाढ होते तर अमावस्येच्या काळात हे प्रमाण तुलनेत कमी असते. (पत्रकारितेत आल्यानंतर मी काही वर्षे पौर्णिमा आणि गुन्हेगारी कृत्ये, घात-अपघात यांचे अध्ययन केले असता यात आश्‍चर्यकारकरित्या वाढ झाल्याचे दिसून आले. नंतर मात्र हा प्रकार मी सोडून दिला. असो.) जगातील बहुतेक प्रतिभावंतांना चंद्राने वेड लावले होते. चंद्रावर जितके सृजन झाले तितके निसर्गातील कोणत्याही घटकावर झाले नाही. बालकांना विस्मय वाटणारा पुर्ण चंद्र हा रसिकांचा सखा, कलावंताचे प्रेरणास्थान, प्रेमिकांचा साक्षीदार आहे. आपल्या मनोदशेनुसार चंद्र आपल्याला दिसतो. यामुळे बालकांना खेळण्यासाठी तो हवा असतो…कुणाला प्रेयसीचा चेहरा तर कुणाला भाकरीचा आकार त्यात दिसतो. एका व्यापक अर्थाने पुर्ण चंद्र मनाला उधाण आणतो, विकारवश करतो. मात्र मनोविकारांना चालना देणार्‍या पौर्णिमेला आध्यात्मिक आणि गुढ आयामही आहे.

विविध धर्म आणि संस्कृतींमधील बहुतांश पुरातन कॅलेंडर्स हे चंद्राच्या कलेवर आधारित आहे. भारतीय संस्कृतीचा विचार करता वर्षातील बहुतांश पौर्णिमांना विशिष्ट महत्व देण्यात आले आहे. यात समस्त गुरूजनांच्या चरणी वंदन करण्यासाठीची गुरूपौर्णिमा, दोन-तीन ढगाळ महिन्यानंतरची स्वच्छ, सुंदर आणि प्रसन्न शरद पौर्णिमा, वसंत ऋतुचे खुल्या दिलाने स्वागत करणारी हुताशनी (होळी) पौर्णिमा आदींचा समावेश आहे. याचसोबत हनुमान जयंती, दत्त जयंतीसारख्या धार्मिक प्रतिकांसोबत समुद्र शांत झाल्याचा संकेत देणारी नारळी पौर्णिमाही आहे. मात्र सर्वात अनोखी आहे ती वैशाख पौर्णिमाच! तथागत गौतम बुध्द यांचा जन्म, बुध्दत्व प्राप्ती आणि महानिर्वाण हे एकाच दिवशी अर्थात वैशाख पौर्णिमेला घडल्याचे मानले जाते. यातील रूपक समजून घेणे महत्वाचे आहे. पृथ्वीतलावर तथागतांचे आगमन, निर्गमन आणि ज्ञानप्राप्ती ही युगायुगातून एकचदा घडणारी दुर्मिळ घटना आहे. यामुळे त्यांच्या जीवनाशी हा दिवस जोडण्यात आला आहे. एका अर्थाने वैशाख वणव्यासमान असणार्‍या जीवनात राजकुमार सिध्दार्थ याने क्षणभंगुर आयुष्यावर मात करण्याचा मार्ग शोधलाच नव्हे तर जगालाही दाखविला. यामुळे वैशाखातील तप्त दिवस हा मानवी कटकटीचा तर रात्रीचा शीतल पुर्ण चंद्र हा दैवी शांततेचा अशा प्रतिकानेही आपण वैशाख पौर्णिमेकडे पाहू शकतो.

वर्षातील प्रत्येक पौर्णिमेला स्वत:चे सौदर्य आहे. मात्र माझ्या मते वैशाख पौर्णिमेची सर कुणालाच नाही. आपण बालपणापासून चंद्र पाहतो. यात प्रारंभी अजाणतेपण असते. तारूण्यावस्थेनंतर मात्र आपल्या मनोदशेशी चंद्र एकरूप होतो. मला आठवते मी (खरं तर आम्ही काही मित्र!) पौर्णिमेच्या प्रेमात १९९९च्या सुमारास पडलो. प्रत्येक पौर्णिमेला तापी नदीच्या पात्रात जाऊन किमान दोन तास तरी तेथे घालविण्याचे आम्ही ठरविले. हा नेम सुमारे तीन-चार वर्षे सुरू होता. यात काही वेळा पौर्णिमा चुकली तर चतुदर्शी अथवा पौर्णिमेनंतरच्या दुसर्‍या दिवशी तापीकाठी जाण्याचे आम्ही कधी टाळले नाही. २००५ साली जळगावला शिफ्ट होण्याआधी साधारणत: चाळीसएक वेळा आम्ही हा योग साधला…आयुष्यातील हे क्षण कधीही विसरू शकणार नाही. सर्वसाधारणपणे नदीच्या लहान पुलाकडील पात्रात उतरून किमान अर्धा ते एक तास आम्ही प्रत्येक जण मौन पाळत असू. या वेळेत फक्त आणि फक्त आपल्या भोवतीची जादू डोळ्यात साठवून घेण्याचा प्रयत्न करत असू. यानंतर तेवढाच काळ हास्यविनोद आणि क्वचितप्रसंगी संगीताच्या सोबतीने मंत्रमुग्ध वातावरणात घालवायचो. तसे आम्ही सर्व मित्र ‘घेणारे’ असलो तरी यावेळी पिण्याला पुर्ण फाटा दिला जाई. अगदी दोन-चार वेळा हा ‘कार्यक्रम’ झाला. अर्थात यामुळे विरस झाल्याने आम्ही ही बाब कटाक्षाने टाळली. अगदी खाद्यापदार्थांनीही बाधा येत असल्याचे पाहून आम्ही तेदेखील टाळू लागलो. अलौकीकाचा शोध घेण्यासाठी कुठे जाण्याची गरज नाही. पौर्णिमेच्या रात्री घराच्या बाहेर निघा…क्षितीज नजरेत येईल अशा मोकळ्या जागी या अन् पहा काय होते ते! अशा अनेक दिव्य, मैत्रीच्या गंधाने सुगंधीत आणि मनाला रोमांचित करणार्‍या रात्रीचा आनंद घेऊन आम्ही अक्षरश: हवेत तरंगत घरी येत होतो. आमच्या या आनंदयात्रेत माझ्यासह अनेक जण आले आणि गेले. यातील सेरील पीटर्स (पीटर अंकल) आता काळाच्या पडद्याआड गेलेत. चंद्राच्या दुधाळ प्रकाशातील जादुई वातावरणात पीटर अंकल बोलताहेत आणि आमच्या हसून मुरकुंड्या वळत आहेत अशा स्वरूपाच्या आठवणी काळजाच्या एका कोपर्‍यात हळुवारपणे सांभाळल्या आहेत. आठवण आली तरी गलबलल्यासारखे होतयं.

यथावकाश अनेक मित्र कामधंद्यानिमित्त दुरावलेत. कधीतरी बोलणं होतं. जळगावला आल्यानंतरच्या पौर्णिमा कधी मेहरूण तलावावर, कधी मोहाडी रोडवरील टेकड्यांवर, कधी जी.एस. मैदानावर तर कधी घराच्या गच्चीवरच साजर्‍या झाल्या. जीवनाच्या प्रत्येक क्षणाला आत्यंतिक आसक्तीने जगणारी मित्रमंडळी येथेही भेटली. अर्थात कामाच्या चक्रव्यूहामुळे लवकरच हा उपक्रम बंद पडला अन् उसासे टाकत आठवणींना उगाळल्यापलीकडे काहीही करू शकत नव्हतो. घराच्या खिडकीतून चंद्र दिसतो याचे कौतुक असले तरी चांदण्याला मिठी मारण्यासाठी जाऊ शकत नसल्याची खंत मनाला टोचत होती. यातच माझा परममित्र जयकिसन टेकवाणी याने तापीच्या काठावर बंद पडलेल्या ‘हॉटेल क्रॉसवे’च्या इमारतीमध्ये ओशो ध्यान केंद्र सुरू केल्यानंतर पुन्हा पौर्णिमाप्रेम सुरू होणार या विचाराने आनंद गगनात मावेनासा झाला. अर्थात याचा प्रारंभ बुध्द पौर्णिमेच्या पर्वावरच होतोय हे सांगणे नको!

गेल्या १४ वर्षांमध्ये जीवन किती बदलले! सुरवातील दुचाकीवरून जाणारे आम्ही नंतर मित्रांसोबत कारमधून जाऊ लागलो. कारमधील साऊंड सिस्टीमवर ह्दयाच्या तारा छेडणार्‍या संगीताच्या लकेरींनी पौर्णिमेच्या गुढ सौदर्यानुभुतीला नवीन पंख लावले. दरम्यान, जीवनातही झपाट्याने बदल झाला. प्रत्येक जण जीवन कलहात बध्द झाला. बहुतेक जण संसारात गुरफटले. मात्र कुणीही आयुष्यातील हे जादुई क्षण विसरला नव्हता. या मंतरलेल्या क्षणांना नव्याने उजाळा देत जगण्यासाठी आज ‘पौर्णिमावारी’तील जुने वारकरी पुन्हा नव्याने श्रीगणेशा करत आहोत. …आपण येणार?

About the author

shekhar patil

3 Comments

  • अतिशय सुंदर विज्ञान मांडणारा लेखं !!

  • या प्रकारे मी कधी पौर्णिमेच्या बाबतीत विचार केला नव्हता
    पण आता मानसिकता बदलवत बघतो काही नियोजन होते का ?ते

Leave a Comment