अनुभव

एक झिंग एक हुरहूर !

Written by shekhar patil

आपण ‘खास’ नसून ‘आम’ असल्याचे मानल्यास अनेक बारीक-सारीक प्रसंगांमध्ये अत्यानंदाचे क्षण उपभोगता येतात. मात्र काही खास क्षण फक्त कल्पनेतच शक्य असतात.

शंभरातील नव्व्याण्णवांपैकी एक असण्यातील सुख घेण्याचे अनेक प्रसंग आयुष्यात आले. आपण ‘खास’ नसून ‘आम’ असल्याचे मानल्यास अनेक बारीक-सारीक प्रसंगांमध्ये अत्यानंदाचे क्षण उपभोगता येतात. मात्र काही खास क्षण फक्त कल्पनेतच शक्य असतात. म्हणजे उस्ताद नुसरत फतेह अली खान यांच्याप्रमाणे दैवी सूर नसला तरी त्यांच्या शागीर्दांच्या ताफ्यात आपण असावे असे मला वाटते. मग गानकोकिळेच्या ‘अजीब दास्तॉं है ये….’ या गाण्यातल्या मनभावन कोरसमधील शेकडो आवाजांपैकी एक आपला असावा अशी आकांक्षा गैर नक्कीच नाही. दादा कोंडकेंच्या चित्रपटातील एखादे गावठी पात्र साकारण्याची संधी आपल्याला मिळावी असे मला खूप वाटते. ओशो जीवन रहस्य समजावून सांगत असतांना आपण त्यांच्या समोरच कोपर्‍यात कुठे तरी कानात प्राण साठवून श्रवण करावे हे स्वप्न सोडण्यास मी तयार नाही. आपण कुणावर चांगले लिहू शकत नसले तरी दुसर्‍या कुणी आपल्यावर अगदी ‘वल्ली’ म्हणून लिहण्यास हरकत काय? असो. आपण जीवनाचा अगदी एक क्षणही शब्दांत, सुरात, चित्रात, नृत्यात वा शिल्पात बांधू शकत नसल्याचे दु:ख कवटाळण्यापेक्षा दुसर्‍यांच्या कलेस डोक्यावर घेणे किती सहजसोपे आहे हो! मात्र मन मानत नाही. अशीच एक आयुष्यातील हुरहूर दहिहंडीच्या दिवशी हटकून आठवली.

खरं दहीहंडीशी निगडीत आठवणी खूप आहेत. या दिवशी अनेक गाणी आठवतात. त्यांना आवर्जून ऐकले जाते. आजही ऐकले. मात्र एका गाण्याचे गारूड मनावरून उतरण्यास तयार नाही. हे गाणे श्रवणीय कमी आणि प्रेक्षणीय जास्त आहे. मी आपल्याला सांगतोय ‘ओ माय गॉड’ मधील प्रभू देवा आणि सोनाक्षी सिन्हा यांच्यावर चित्रीत झालेल्या ‘गो गो गोविंदा…’ या झिंग आणणार्‍या गाण्याची!

प्रभू देवावर स्पेशल कधी तरी लिहणारच. मात्र आज त्याच्या या गाण्याबद्दल मत मांडण्याचा मोह आवरत नाहीय. खरं उंच व्यक्तीला फारसे चांगले नाचता येत नसल्याचा समज आहे. मात्र प्रभू याला अपवाद आहे. नव्वदच्या दशकातील अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमधून हा शेलाट्या बांध्याचा हा तरूण जेव्हा पडद्यावर अफलातून पदलालित्याचे दर्शन घडवू लागला तेव्हा त्याला साहजीकच ‘भारतीय मायकेल जॅक्सन’ म्हणणे स्वाभाविक होते. प्रारंभी हिंदी सिनेमात त्याला फारसे स्वीकारण्यात आले नाही. अर्थात काही गाण्यांमधूनच त्याची चमक दिसून आली. पुकार चित्रपटातील ‘के सेरा सेरा’ आठवून पहा. या गाण्याची खासियत म्हणजे प्रभूच्या अगदी तोडीस तोड माधुरीने नृत्य करून धमाल उडवून दिली होती. आजही हे गाणे पाहतांना दोन उत्तम नर्तकांचा अफलातून संगम आपल्यालाही ठेका धरण्यास भाग पाडतो. याचीच पुढील आवृत्ती ‘गो गो गोविंदा’मध्ये दिसून येते.

खरं तर ‘पुकार’प्रमाणे ‘ओ माय गॉड’मध्ये प्रभू देवा गाण्यापुरताच दिसला आहे. यातील ‘गो…गो…’ तर तद्दन आयटम सॉंग आहे. अर्थात यात प्रभूच्या तोडीस तोड सोनाक्षी सिन्हाने डान्स केलाय. तिचे पदलालित्य आणि याच्या जोडीला चेहर्‍यावरील भाव अप्रतिम. खूप कमी गाण्यांमध्ये नायक, नायिका आणि एक्स्ट्राजच्या फौजेची भट्टी जमून येते. मी शेकडो वेळेस या गाण्याचा आनंद घेतलाय. आपणही काही वेळेस पाहिले असेल. आता मनातील हुरहूर अशी की, या गाण्यात प्रभू देवाच्या सहकारी नर्तकांमध्ये तरी आपला समावेश असावा असे मला कधीपासूनच वाटते. मी अनेकदा माझे मित्र, सहकारी आणि घरच्यांना सांगितलेय. अर्थात सर्वांना ही विनोदी बाब वाटली. मात्र यातून मार्ग माझ्या बच्चे कंपनीनेच सुचविलाय. एक दिवस मी घरी व्हिडीओ एडिटींग करत असतांना (माझ्या अनेक ‘रिकाम्या’ उद्योगांपैकी हा एक. म्हणजे मी जसा कामचलावू पत्रकार आहे तसाच व्हिडीओ ‘एडिटर’ही होय!) मुले बारकाईने अवलोकन करत होते. तेव्हाच मुलीने नकळत मला एक भन्नाट आयडिया सुचवली. ती म्हणाली, ‘‘पप्पा आपण नाचण्याचा व्हिडीओ तयार केल्यानंतर तो हिरो-हिरॉइन्ससोबत मिक्स करू शकतो का?’’ माझ्या डोक्यात एकदम ट्युब पेटली. गायकाचा आवाज म्युट करून गायनात ‘कराओके’ पध्दत वापरतात. त्याचप्रमाणे व्हिडीओसाठी याचा उपयोग करता येईल का? या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. अर्थात एकट्या हिरो वा हिरॉईनसह नृत्याचे मिक्सींग सोपे असले तरी समूहनृत्यात नायक वा नायिकेच्या मागे अचूकपणे आपला व्हिडीओ मिक्स करणे तितके सोपे नसल्याचे मला समजले. मी मुलांना तसे समजून सांगितले मात्र त्यांना ते कितपत समजले याची मला जाणीव नाही. मात्र यातून ‘गो गो गोविंदा…!’मध्ये आपण कधी तरी प्रभू देवाच्या मागच्या बाजूला कुठे तरी नाचू शकतो याची आस निर्माण झालीय. यासाठी मग यासाठी अगदी ‘अडोबी प्रिमीयर प्रो’ वा ‘फायनल कट प्रो’ सारखे सॉफ्टवेअर आत्मसात करावे लागले तरी बेहत्तर…एक दिवस प्रभू देवाचा सहकारी बनून नाचणारच असा संकल्प बायकोला सांगितला तेव्हा तिने साहजीकच आ वासला. आपण स्वत: सहा फुट उंच असल्याने त्याच्या मागे सहज ‘खपून’ जाईल तसेच एक्ट्रॉप्रमाणे नाचण्याइतके कौशल्य माझ्यात नक्कीच असल्याचा युक्तीवादही मी केला. तेव्हा ती गंभीर चेहरा म्हणाली, ‘‘आता मला सांगितले ते ठीक. दुसर्‍यांनी ऐकले तर ते तुम्हाला वेडात काढतील!’’ मात्र जाऊ द्या हो…नेहमीच सभ्यतेचा बुरखा पांघरून वागले तर जीवन जगणार तरी कधी? म्हणून आज माझ्या मनातले हे झिंगलेले स्वप्न आपल्याला सांगून टाकले. मी अनेकदा झपाटून व्हिडीओ एडिटींग शिकण्याचा निर्धार केला तरी अनेक विरून गेलेल्या स्वप्नांसमान याची गत झालीय. असो…कधी तरी ही स्वप्नपूर्ती झाल्यावर धमाल होणारच !

….अटक मटक झटके मारे है….तु आज शोला तो हम भी फव्वारे है…

About the author

shekhar patil

1 Comment

Leave a Comment