Uncategorized राजकारण

एक गॉडफादर द्या मज आणुनी!

राज्याचे महसूलमंत्री नारायण राणे हे एक अजब व्यक्तीमत्व. राजकारणात मनात एक अन्‌ ओठांवर भलतेच हा प्रकार सर्रास चालतो. किंबहुना राजकारणात यशस्वी होण्यासाठी हा गुण लागतोच. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांचे आजवरचे वागणे याच्या अगदी उलट आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न उराशी बाळगणारे राज्यात डझनवारी नेते असले तरी आपल्या आकांक्षेला जाहीर प्रकट करण्याची हिंमत फार थोड्यांमध्ये आहे. यात नारायणरावांचे नाव आघाडीवर आहे. मुख्यमंत्रीपदासाठी आसुसलेल्या राणे यांना कॉंग्रेस संस्कृती अजूनही पुरेपूर पचवता आली नाही. यामुळे इतर कॉंग्रेसी नेते सावधपणे वक्तव्य करत असले तरी त्यांच्या मनातील खदखद अगदी बिनधास्तपणे प्रकट करतात. यातून बरेचसे मनोरंजक किस्से जन्माला येतात. नुकतेच राणे यांच्या मुखातून असेच एक वचन प्रकटले आहे.
केंद्रीय उर्जा मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत एका कार्यक्रमात नारायण राणे यांच्या मनातली मळमळ बाहेर पडली. राजकारणात स्थिरावण्यासाठी एका ‘गॉडफादर’ची आवश्यकता असल्याचे नमूद करत त्यांनी आपण स्वत: ‘गॉडफादर’च्या शोधात असल्याचे सांगितले.  या वक्तव्याद्वारे राणे यांनी कॉंग्रेसमध्ये प्रथमच ‘स्वाभीमान’ बाजूला ठेवला आहे. खरं तर ‘गॉडफादर’ शिवाय अगदी नगरसेवकही होता येत नाही. यामुळे राणे हे आजवर कुणाच्या आश्रयाविना राजकारणातील यशाचा पायऱ्या चढले हे म्हणणे धाडसाचे ठरेल. ‌शिवसेनेत अगदी शाखा प्रमुखापासून मुख्यमंत्र्यांपर्यंतचा प्रवास हा बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानेच झाला हे राणे आजही जाहिररित्या मान्य करतात. यामुळे खरं तर शिवसेनाप्रमुख हेच राणे यांचे ‘गॉडफादर’ होत. असे असूनही सुशीलकुमार शिंदे यांच्याशी सलगी वाढविण्याचे जाहीर प्रयत्न करण्याची त्यांना आवश्यकता वाटते यामागे राणे यांची आजची मनोदशा कारणीभूत असावी.
शिवसेनेसारख्या पक्षांतर्गत लोकशाहीला जराही थारा नसणाऱ्या पक्षात दीर्घ काळ घालवल्यावर राणे कॉंग्रेसमध्ये आले खरे पण येथील नियम त्यांच्या गळी उतरले नाहीत. शिवसेनेतील बाळासाहेबांचा ‘रिमोट कंट्रोल’ अन्‌ कॉंग्रेसश्रेष्ठींच्या कार्यप्रणालीत फारसे अंतर नाही. मात्र मातोश्रीवरील मार्ग हा ‘10 जनपथ’पेक्षा फार सोपा असल्याची जाणीव नारायणरावांना निश्चित झाली असणार. शिवसेनेसारख्या पक्षात अगदी फाटके कार्यकर्तेही मोठे झाले तरी कॉंग्रेसमध्ये पद मिळवणे आणि टिकवणे यासाठी दिल्ली दरबाराची मर्जी राखावी लागते. बरं दिल्लीश्वरांनाही राज्यात सगळे काही आलबेल असेलेले चालत नाही. यामुळे कोणत्याही राज्यातील प्रमुख नेत्यांच्या खुर्चीखाली सुरूंग पेरून श्रेष्ठी मजा लुटत असतात. महाराष्ट्रही याला अपवाद नाही.  2005 साली शिवसेनेच्या ताकदीलाच आव्हान देत राणे जेव्हा कॉंग्रेसमध्ये सहभागी झाले तेव्हा त्यांना मंत्रीपद मिळाले मात्र तेदेखील कॉंग्रेसश्रेष्ठींच्या खेळातील प्यादे बनले. यामुळे पक्षाशी विद्रोह करण्याचा प्रयत्न करूनही त्यांना कॉंग्रेसशिवाय पर्याय उरला नाही.
तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर कुरघोडी करण्याची एकही संधी नारायण राणे यांनी वाया घालवली नाही. मुख्यमंत्रीविरोधी गटात त्यांनी उघडपणे काम केले. मात्र विलासरावांनंतर त्यांच्याऐवजी अशोक चव्हाण यांना संधी मिळाली. राणे यांना हा कॉंग्रेसी राजकारणाचा पहिला धक्का होता. आता तर बरेच पाणी वाहून गेले आहे. राणे यांनी कॉंग्रेसमध्ये आपले स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. स्वत:च्या मुलास खासदार बनवतांना त्यांनी कोकणात आपले वर्चस्व कायम राखले आहे. हे सारे होत असतांनाही मुख्यमंत्र्यांची खुर्ची मिळत नसल्याची सल त्यांच्या मनात आहे. यामुळे राणे आपला जन्मजात धाडसी आणि बेछूट स्वभाव सोडण्याचे प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. काही दिवसांपूर्वी आपले कट्टर विरोधक विलासराव देशमुख यांना ‘प्रहार’च्या वर्धापनदिनला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्याची चाल त्यांनी खेळली. याशिवाय सुशीलकुमार शिंदे यांची आर्जवे केली. मुख्यमंत्रीपदासाठी अगदी कासाविस झालेल्या नारायण राणे यांनी आपल्या आकांक्षेपूर्तीसाठीच स्वभावाला मुरड घालत ‘एक गॉडफादर द्या मज आणुनी’ अशी विनवणी केली असावी. अर्थात ताठ बाणा सोडल्यास राणे यांची आकांक्षापूर्ती अगदीच अशक्य बाब नाही. कॉंग्रेसचा आजवरचा इतिहास हेच सांगतोय!

About the author

shekhar patil

Leave a Comment