चालू घडामोडी साहित्य

एका निवडणुकीची ‘भेदक’ गोष्ट

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत असतांनाच एरंडोल येथील डॉ. संग्राम पाटील लिखीत ‘एका निवडणुकीची गोष्ट’ हे पुस्तक वाचले.

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत असतांनाच एरंडोल येथील डॉ. संग्राम पाटील लिखीत ‘एका निवडणुकीची गोष्ट’ हे पुस्तक वाचले. निवडणूक म्हटल्यानंतर साम-दाम-दंड-भेद आदींसह पैशांचा महापुर, जाती-पातीची गणिते, आमिषे, दबाव, ब्लॅकमेलींग हे प्रकार आपण गृहीत धरतोच. मात्र या सर्व प्रकारांना झुगारून लावत; या प्रक्रियेत स्वत: उतरून यातील सत्य अनुभवून ते मांडण्याचे धाडस डॉ. पाटील यांनी दाखविले आहे.

तसं पाहता डॉ. संग्राम पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती डॉ. नुपूर यांची एक आदर्श जोडपे म्हणून ओळख आहेच. खान्देशातल्या ग्रामीण भागातून तसे हजारोंनी युवक विदेशात कर्तबगारी बजावत आहेत. आपल्या मायभुमीत गोरगरिबांना उच्च प्रतीची वैद्यकीय सेवा प्रदान करण्यासाठी विदेशातून एरंडोलसारख्या लहानशा शहरात परत येणारा ध्येयवेडा विरळाच. हेच उच्च ध्येय मनात बाळगून डॉ. संग्राम आणि डॉ. नुपूर गेल्या चार-पाच वर्षांपासून गरजूंची सेवा करत आहेत. महाविद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर या दाम्पत्याने इंग्लंडमध्ये सहा वर्षे काढली तेव्हा तेथील खुल्या आणि समतेवर आधारित वातावरणाने ते भारावून गेले. कोणताही भेदाभेद न मानता निव्वळ गुणांना महत्व देणार्‍या ब्रिटीश समाजाची मुल्ये आत्मसात करून ते मायदेशी परतले तेव्हा त्यांच्यासमोर अनेक अडचणी bookउभ्या राहिल्या. एक तर कुणी खरोखर दुसर्‍याची मदत करू शकते हे आपल्या कल्पनेपलीकडचे आहे. यामुळे प्रारंभी या दाम्पत्यासमोर अनेक अडचणी आल्या. अनेक समव्यावसायिकांना त्यांच्यापासून धोका वाटू लागला. यातून काहींनी अकारण वैमनस्याची भुमिका घेतली. या अडथळ्यांवर मात करून त्यांनी वैद्यकीय सेवा सुरू केली. यानंतर ‘सम्यक फाऊंडेशन’च्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम सुरू केली. हे सारे होत असतांना एरंडोल नगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागतात. खरं तर निस्वार्थी सेवेमुळे हे दाम्पत्य आधीच लोकप्रिय झाले असल्याने काही स्थानिक पुढार्‍यांसह सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच बर्‍याच सर्वसामान्यांनी त्यांना राजकारणात प्रवेश करण्याचे सुचविले. अर्थात डॉ. संग्राम पाटील यांचा निवडणुकीबाबत एकदम कटू अनुभव होता. एक तर त्यांच्या वडिलांनी एकदा ग्रामपंचायत निवडणुकीत उतरल्यानंतर भाऊबंदकीत झालेला वाद हिंसक वळणावर आला होता. यानंतर स्वत: ते वैद्यकीय शिक्षण घेत असतांना ‘मार्ड’ या पदव्युत्तर वैद्यकीय प्रशिक्षण घेणार्‍यांच्या संघटनेच्या सचिवपदाच्या निवडणुकीला उभे राहिले. यावेळी जातीवर प्रचार झाल्याने त्यांचा चार मतांनी पराभव झाला हा अनुभवही त्यांच्याकडे होता. अर्थात खुद्द डॉ. संग्राम यांच्या जातीचे फारसे मतदार नसतांनाही त्यांना चांगली मते मिळाली होती ही बाब त्यांच्या लक्षात होती.

डॉ. संग्राम पाटील यांचा राजकारण्यांवरील राग अकारण नव्हता. कारण ते राहत असलेल्या भागाचे खासदार लाच घेतांना पकडले गेले होते. नगरपालिका व विधानसभा पातळीवरही विकासाचा ठणठणाट होता. त्यांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतील पैशांचा नंगानाच तर पाहिलाच होता. याच काळात झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीनेही ते अंतर्मुख झाले. २०१०च्या अखेरीस झालेली ही (१०० करोडची!) निवडणूक राज्यात गाजली होती. कै. मधुकरराव चौधरी, प्रतिभाताई पाटील यांच्या काळतला राजकारणातील आदर्शवाद केव्हाच लोप पावल्याची खंत त्यांना वाटू लागली. एव्हाना पाटील दाम्पत्य मतदान यादीतील नावासह अधिकृत एरंडोलकर झाले होते. यातच अनेक घटनांमधून नगरपालिकेत पाठपुरावा करतांना सर्वसामान्य असल्याने येणार्‍या मर्यादांचीही जाणीव त्यांनी होऊ लागली होती. यात सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, रोगराईवरील उपाययोजना, पाणी पुरवठ्यातील अडचणी आदींसाठी या दाम्पत्याने पुढाकार घेतला असता नगरपालिका प्रशासनाचा ढिम्मपणा त्यांना जाणवला. यात एरंडोल नगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले. या निवडणुकीत चांगल्या उमेदवारांनी मते द्यावीत यासाठी डॉ. पाटील यांनी जनजागृती सुरू केली. मात्र उभे राहणार्‍यांमध्ये ‘चांगले’ शोधण्यातील अडचणी लोकांनी त्यांच्या लक्षात आणून दिल्या. यातून नागरिकांच्या मागण्या नगरपालिकेत मांडण्यासाठी डॉ. संग्राम अथवा त्यांच्या सौभाग्यवतींनी निवडणुकीला उभे रहावे असे काही तरूणांनी सुचविले. यावेळी डॉ. नुपूर यांनी याला प्रारंभी साफ नकार दिला. मात्र हळूहळू त्यांची मानसिकता बदलली. दरम्यान, एरंडोल नगरपालिकेसाठी खान्देश विकास आघाडी विरूध्द शहर विकास आघाडी अशी लढत होणार असल्याचे चित्र निर्माण झाले. यात आ. सुरेशदादा जैन यांनी भ्रष्टाचारविरहीत राजकारणासाठी समाजातील मान्यवरांना १०० रूपयांत उमेदवारी देण्याचे आवाहन केल्याचे त्यांच्या वाचनात आले. यातून त्यांचा हुरूप वाढला. अखेर सर्वसामान्यांपासून ते आपले कलेक्टर मित्र राजेश पाटील यांच्याशी डॉ. संग्राम यांनी चर्चा केली. यात त्यांना अनेकांची मते परस्परविरोधी वाटली. काहींच्या मते बिना पैशांने निवडणूक लढविताच येणार नाही तर काहींनी जाती-पातीचे गणित मांडले. काहींनी कोणत्या तरी आघाडीकडून निवडणूक लढविण्याचे सुुचित केले. खुद्द राजेश पाटील यांनी एरंडोलसारख्या ‘क’ वर्गीय नगरपालिकेपेक्षा लोकसभा वा विधानसभेत प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. मात्र आपण हा निवडणुकीचा ‘प्रयोग’ करत असल्याचे त्यांनी सर्वांना पटवून सांगितले. जात-पात, पैसे वा कोणत्याही दबावतंत्राचा वापर न करता आपण सरळमार्गाने निवडणूक लढवू, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पैसे वाटणार नाही असा संकल्प त्यांनी केला. यातून पराभव आला तरी बेहत्तर पण दहातील किमान एक तरी जण आपल्याला या मार्गाने मत देणार का? हे आपण पाहणार असल्याचे प्रतिपादन डॉ. संग्राम यांनी केले. ही निवडणूक आपली परीक्षा नसून शुध्द लोकशाहीच्या क्षेत्रात मतदारांचीच परीक्षा असल्याची भुमिका त्यांनी घेतली. एरंडोलमधील तरूणांचा एक गट त्यांच्या पाठीशी उभा राहिला. दरम्यान हे सारे होत असतांना पडद्याआड वेगळेच शिजत होते.

जवळपास एक वर्षापुर्वी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत स्थानिक नगरसेवकांना चांगलात मलीदा (किमान १५ ते २० लाख रूपये!) मिळाला होता. सर्वसामान्यांच्या कानावर या बाबी गेलेल्या असल्याने अनेक मतदारांनी उमेदवारांना ‘यावेळी किमान दोन हजार रूपये फुली तर लागेलच’ अशी गळ घातली. यातून राजकारणात मुरलेल्या मंडळीने एक अफलातून चाल केली. विविध जाती-धर्माचे गणित मांडून वेगवेगळ्या प्रभागातील जागा बिनविरोध निवडणूक आणण्याचा प्रयत्न सुरू झाला. यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोडी करण्यात आल्या. पैशांचे आमिष आणि दबावतंत्राला अनेक उमेदवार बळी पडून खान्देश विकास आघाडीच्या बहुमताने जागा बिनविरोध निवडून आल्या. उमेदवारांच्या या माघारनाट्याने एरंडोलसह जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली. खुद्द डॉ. संग्राम पाटील यांनी त्यांच्या सौभाग्यवतींची उमेदवारी मागे घ्यावी म्हणून त्यांना वेगवेगळी आमिषे दाखविण्यात आली. याला ते न बधल्याने तुम्हाला निवडणुकीत फार तर ५० (काही दिवसांत हा आकडा पाचशेवर गेला!) मते मिळतील असे सांगून हतोत्साहीत करण्यात आले. मात्र याचाही लाभ झाला नाही अन् आधीच खान्देश विकास आघाडीचे बहुमत झालेल्या नगरपालिकेत डॉ. नुपूर पाटील या निवडणुकीसाठी सज्ज झाल्या.

खरं तर आपल्या प्रत्येक निवडणुकीत लोकशाहीचे वस्त्रहरण होत असते. मात्र एरंडोलसारख्या लहानशा गावात एका प्रभागातील निवडणुकीतच डॉ. संग्राम पाटील, डॉ. नुपूर आणि त्यांच्या मोजक्या सहकार्‍यांनी इतके भयंकर रूप पाहिले की आपलाही लोकशाहीवरील विश्‍वास उडू पाहतो. खरं तर डॉ. पाटील यांनी सांगितलेल्या बाबी आपणही अनेकदा अनुभवलेल्या असतात. आज नगरपालिकेच्या निवडणुकीत लाखोंचा खुर्दा होतो. विधानसभेसह अन्य निवडणुकीत हाच आकडा काही खोक्यांमध्ये जात असतो. मात्र आपण या निवडणुकीत हरणारच असे मान्य करून पाटील दाम्पत्य ज्या पध्दतीने अत्यंत तटस्थपणे या प्रक्रियेकडे पाहते ते मात्र कौतुकास्पद आहे. यात त्यांना आजच्या समाजव्यवस्थेतील अत्यंत भयावह बाबी आढळतात. यात व्यसनांच्या आहारी गेलेले तरूण, निवडणूक काळातील रोजगारावर जाणारी मंडळी, नेत्यांच्या पार्ट्यांमध्ये कोवळ्या जीवांना लागणारे दारूचे व्यसन, अतिमद्यपानाने रूग्णालयात दाखल होणारे लोक, हात पसरणारी जनता, धनदांडग्या राजकारण्यांच्या दावणीला बांधलेले प्रशासन, धमकावणारे गुंड, सराईतपणे पैसे वाटणारे उमेदवारांचे बगलबच्चे, जाती-पातीच्या नावावर फुलविलेल्या अस्मिता, त्याच नावावर मांडण्यात येणारा बाजार, मतांचा बाजार मांडणारी अगदी सधन पांढरपेशा मंडळी, दुपारी उशीरा मतदानास निघणारे लोक आणि या सर्वांकडे सोयिस्कर कानाडोळा करणारी प्रसारमाध्यमे आदी सर्वांचा अनुभव हा डॉ. संग्राम पाटील यांच्या शब्दातच वाचणे योग्य आहे.

‘परत मायभुमीकडे’ या पुस्तकातून डॉ. संग्राम पाटील यांच्याकडे ओघवती लिखाणशैली असल्याचे दिसले होते. या पुस्तकातही याचा प्रत्यय येतो. मात्र राजहंससारख्या ख्यात

डॉ. संग्राम पाटील

डॉ. संग्राम पाटील

प्रकाशनसंस्थेच्या या पुस्तकातील काही खटकणार्‍या चुका आहेत. एक तर एरंडोल नगरपालिकेची निवडणूक ११ डिसेंबर २०११ रोजी (पुस्तकात २०१२ दिलेय ) झाली होती. दुसरी बाब म्हणजे एरंडोलचे आमदार हे चिमणराव पाटील (पुस्तकात चिंतामण पाटील दिलेय) आहेत. या चुका पुढील आवृत्ती दुरूस्त कराव्यात ही अपेक्षा. डॉ. संग्राम पाटील यांनी निवडणूक कालखंडातील चित्र अतिशय उत्तम रंगविले आहे. मात्र डॉ. नुपूर पाटील यांचा प्रभाग क्रमांक, विरूध्द उमेदवार, सर्वांना मिळालेली मते, निवडणुकीनंतरच्या राजकारण्यांसह सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया, यानंतर त्यांना आलेले अनुभव आदींबाबत सविस्तर विवेचन अपेक्षित होते. तेदेखील यात आलेले नाही.

या पुस्तकात डॉ. नुपूर पाटील यांनी लढविलेल्या नगरपालिका निवडणुकीतील अनुभवांचे कथन आहे. यानंतरही दाम्पत्य नाऊमेद झाले नाही. भ्रष्टाचारविरूध्द लढा बुलंद करणार्‍या आम आदमी पक्षाच्या माध्यमातून खुद्द डॉ. संग्राम यांनी जळगाव लोकसभा निवडणूक लढविली. नगरपालिका निवडणुकीत त्यांनी १० टक्के मतदानाची अपेक्षा केली यात त्यांना २० टक्के मते मिळाली. लोकसभेत मात्र डॉ. संग्राम पाटील यांना एक टक्क्यांपेक्षाही कमी मते मिळाली. खरं तर नगरपालिकेपेक्षा लोकसभेसारख्या मोठ्या निवडणुकीत गैरप्रकार थोड्या वेगळ्या स्वरूपात होतात. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आपण सर्वांनी ते अनुभवले. आता खुद्द निवडणूक लढविणार्‍या डॉ. संग्राम यांना यातील अनेक भयंकर बाबी लक्षात आल्या असतील. त्या त्यांनी नव्या पुस्तकाच्या स्वरूपात जगासमोर आणाव्यात हीच अपेक्षा.

हे पुस्तक वाचत असतांना मुनव्वर राणा यांची एक गझल आठवली.

शरीफ़ इन्सान आख़िर क्यों इलेक्शन हार जाता है
किताबों में तो ये लिक्खा था रावन हार जाता है

जुड़ी हैं इससे तहज़ीबें सभी तस्लीम करते हैं
नुमाइश में मगर मिट्टी का बरतन हार जाता है

मुझे मालूम है तुमने बहुत बरसातें देखी हैं
मगर मेरी इन्हीं आँखों से सावन हार जाता है

अभी मौजूद है इस गॉंव की मिट्टी में ख़ुद्दारी
अभी बेवा की ग़ैरत से महाजन हार जाता है

अगर इक कीमती बाज़ार की सूरत है यह दुनिया
तो फिर क्यों कॉंच की चूड़ी से कंगन हार जाता है

राजकारण हे असच असतं. यामुळे राजकारणात येणार्‍यांनी, समजून घेणार्‍यांनी किंबहुना प्रत्येक मतदाराने ‘एका निवडणुकीची गोष्ट’ हे पुस्तक वाचावेच…नव्हे यावर मनन करावे. आपल्या भोवती कुणी धडपडणारा डॉ. संग्राम वा डॉ. नुपूर यांच्यासारखे तरूण भेटले तर त्यांना भलेही प्रोत्साहन नाही दिले तरी नाउमेद तरी करू नका हे सांगणारे हे प्रांजळ आत्मकथन आहे.

एका निवडणुकीची गोष्ट
लेखक- डॉ. संग्राम पाटील
राजहंस प्रकाशन

About the author

shekhar patil

1 Comment

  • Educated Person ne Rajkarnat asne Khup Garjeche ani Samjachya hitavah aahe, pan Kadhi Gandhi-G tar Kadhi Bhagatsingh Whave lagte…….

Leave a Comment