Featured Uncategorized चालू घडामोडी राजकारण

एकदम खरं बोललात शिंदेसाहेब!

देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पुणे येथील भाषणात ‘बोफोर्स वा पेट्रोलपंप वाटप प्रमाणे कोळसाकांडही विसरले जाईल’ अशी भविष्यवाणी केल्यामुळे उडालेला गहजब निरर्थक आहे. शिंदेसाहेबांनी सांगितलेले कटू सत्य हे अनेकांच्या पचनी पडणार नाही. मात्र अवचितपणे का होईना मुखातुन सत्य पडल्याने त्यांचे आपण अभिनंदनच करायला हवे.

भारतीय राजकारण्यांवर कामाचा बोजा खूप असतो. मात्र वेळात वेळ काढून ते विविध विषयांवर आपले मतही प्रदर्शित करत असतात. काही जणांना हा पुढार्‍यांचा वाह्यातपणा वाटतो मात्र भारताचे नागरिक म्हणून त्यांनाही अभिव्यक्तीचा अधिकार आहेच की! जनता मात्र नेते काहीही बोलतात म्हणून शिमगा करायला मोकळे! आता हेच पहा ना एका नेत्याला महिलांच्या फॅशनमुळे समाजात बलात्कार वाढल्याचे वाटते अन् ते असे बोलतात यामुळे कुणाला वाईट वाटता कामा नये. एक विकास पुरूष अन् एका रणरागिणीला आजकालच्या तरूणींचे डायटिंग हे कुपोषणाचे कारण असल्याचा साक्षात्कार होतो तर आपले काय जाते? एक महानेता तर चक्क खाद्यान्नाचे भाव केव्हा कडाडणार याची अचूक भविष्यवाणी करतो याचे आपल्याला वैषम्य वाटता कामा नये. खरं तर ही बाब जनतेच्या फायद्याचीच आहे. एका केंद्रीय मंत्र्याला आपला देश शौचालयासारखा वाटतो तर वाटू द्या. आपले आबा म्हटलेच होते ना…‘बडे बडे शहरो मे छोटे-मोटे हादसे होते है!’’ अशाच प्रकारे आपल्या आदरणीय नेत्यांचा एखाद-दुसरा शब्द इकडे-तिकडे झाला तर मनाला लावून घेण्याची गरज नाही. यातच माननीय शिंदे महोदयांचे वक्तव्य हे तर भारतीय राजकारण्यांची मनोदशा दर्शविणारे आहे.

सामूहिक स्मृती ही अत्यंत क्षणभंगुर असते हे रहस्य राजकीय मंडळी चांगलेच जाणून असतात. आयत्या मुद्यावर आपली पोळी भाजून घेणे अन् अडचणीत आलेल्या प्रश्‍नावर वेळ मारून नेणे हा भारतीय राजकारणातील यशाचा मूलमंत्र आहे. अगदी गल्लीबोळापासून ते देश चालवणार्‍यांपर्यंत जनतेला याच मंत्राच्या सहाय्याने मुर्ख बनवत असतात. एखाद्या सरपंचापासून ते पंतप्रधानापर्यंत प्रत्येकावर आरोप होत असतात. यामुळे त्या-त्या पदधारकाच्या वकुबानुसार गदारोळ होत असतो. मात्र यातून सिध्द काय होते हा संशोधनाचाच प्रश्‍न आहे. काहींचे पद जाते. थोडेफार तुरूंगात जातात तर काहींची राजकीय कारकीर्द झाकोळली जाते. मात्र भ्रष्टाचाराच्या एखाद्या प्रकरणात संबंधीताला शिक्षा होऊन त्याची पाळेमुळे उखडण्यात आली असे कधी दिसून येत नाही. आता शिंदे यांनी उल्लेख केलेल्या बोफोर्स, पेट्रोल पंप वाटप आणि कोळसा खाण वाटप या प्रकरणांचे अध्ययन केले असता अनेक बाबींचे साम्य दिसून येते. बोफोर्सच्या धक्क्याने तत्कालीन राजीव गांधी यांचे सरकार यांचे सरकार कोसळले. मात्र यामुळे काही पहाड तुटून पडला नाही. या प्रकरणात कथितरित्या सहभागी असणार्‍या राजीव गांधी यांच्या कॉंग्रेस पक्षालाच देशाने नंतर निवडून दिले. यथावकाश अनेक चौकशांच्या सोपस्कारानंतर राजीवजींचे ‘निर्दोषत्व’ सिध्द झाले. दरम्यान, देशवासियांच्या स्मृतीतून हे प्रकरण निघून गेले. आज राजीवजींचा पक्ष सत्तेवर असून ‘रिमोट कंट्रोल’ त्यांच्याच कुटुंबियांच्या हातात आहे. बरं असल्या प्रकरणात फक्त कॉंग्रेसच निष्णात आहे असे नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सत्ताकाळातही अनेक घोटाळे उघडकीस आले असाच गोंधळ झाला अन् विस्मरणातही गेले.

महाराष्ट्रातील मातब्बर पुढार्‍याचे दाऊद इब्राहिम, तेलगी यांच्यासोबत संबंध असल्याचे घणाघाती आरोप झाले अन् हवेत विरले. आता आरोप झालेले अन् करणारे एकमेकांच्या मैत्रीचे कायम गोडवे गात असून गरीब बिच्चारी जनता थक्क होऊन पाहत आहे. ही केवळ राजकारण्यांची चलाखी नाही. यासाठी जनतेचा मुर्खपणाही तितकाच कारणीभूत आहे. ए. राजासारख्या भ्रष्ट नेत्यांचे तुरूंगातून सुटल्यानंतर होणारे स्वागत; त्यांच्यासाठी लोटलेला अपार जनसागर काय दर्शवितो? अनेक बहाद्दर तुरूंगातूनच निवडणूक लढवून जिंकतातही. त्यांना मते देणारेही आपणच आहोत. याचाच अर्थ असा आहे की नेत्यांचे भ्रष्ट आचरण हे आपण गृहीतच धरत आहोत. ‘पकडला गेला तो चोर अन् पकडून देणारा अथवा आरडा-ओरड करणारा साव’ असा साधासरळ हिशोब भारतीय राजकारणात सुरू आहे. आज कोळसा कांडात कॉंग्रेसी पुढार्‍यांचे हात काळे झाल्याची ओरड होत आहे. यात ‘एनडीए’चा संबंध असल्याचा आरोपही होत आहे. याबाबत ठोस पुरावे मिळाल्यास पडद्याआड हातमिळवणी होईल यात शंकाच नाही. किंबहुना तसे संकेत आतापासूनच मिळाले आहेत. कॉंग्रेस असो की भाजपा आपणास उडदामाजी काळे-गोरे निवडावे लागणार आहे. अर्थात ही बाब सुशीलकुमार शिंदे याच्यासारख्या मुरब्बी नेत्याला चांगलीच ज्ञात आहे. भारतीयांना निवडण्यासाठी कुणताच चांगला ‘ऑप्शन’ नसल्याचेही ते जाणून आहेत. यामुळे त्यांच्या वक्तव्यावर कितीही टीका झाली तरी ते बोले ते योग्यच आहे.

शिंदेसाहेब आपले आभार…भारतीय राजकारणातील निरपेक्ष सत्य आपल्या तोंडून इतक्या सहजपणे बाहेर पडले…आम्ही धन्य झालो! याचसोबत ‘कोळशामुळे हात थोडे काळे होतात हे खरे, पण धुतले की पुन्हा स्वच्छ होतात, हेही खरे’ असे आपले तात्विक चिंतनही अत्यंत कौतुकास्पद आहे. आज कराडमध्ये आपण या प्रकरणी सारवासारव केली. आपण गंमत करण्याचा प्रयत्न केला मात्र तो आपल्या अंगलट आल्याचे आपले म्हणणे आहे. मात्र या गमतीतून आपण एक भेदक सत्य कथन केले हे ही नसे थोडके!

About the author

shekhar patil

Leave a Comment